कायापालट

Submitted by प्रकाश कर्णिक on 15 August, 2012 - 06:35

ठेंगण्या दुस्तरला आज उठायला खूप उशीर झाला होता. अजूनही तो त्याच्या लोखंडी कॉटवर भकासपणे छताकडे आणि त्या अतिशय जुन्या थकलेल्या पंख्याकडे पहात पडला होता. त्याच्या सेल मधील दुसरी कॉट रिकामी होती. त्यावरचं पांघरून व्यवस्थित घडी करून ठवलेलं होतं. सत्या इतका वेळ सेल मध्ये असणं शक्यच नव्हतं. सत्या लवकर उठून तुरुंगाच्या जिम मध्ये व्यायामाला जातो आणि त्या नंतर त्याला भटारखान्यात डूटी असते हे गेल्या तीन वर्षांचे वेळापत्रकच होते. मुलगा तरुण होता आणि पहिल्यांदाच घरफोडीच्या गुन्ह्यासाठी आत आला होता म्हणून काही त्याने आपला नियमित व्यायामाचा सराव सोडला नव्हता आणि आता तर सत्याला सुटायला दोन आठवडेच उरले होते. विशीतला पोरगा तो, त्याला आत काय आणि बाहेर काय, काहीच फरक पडला नव्हता. आत निदान गँग पासून संरक्षण, वेळेवर भाकरी, व्यायामाला जिम आणि संध्याकाळी फुटबॉल खेळायला दांडगट सवंगडी मिळत होते. त्याला तर तीन वर्षात तुरुंगाची सवय झाली होती. त्यात भटारखान्यात कामाला असल्यामुळे जेवणाची कमतरता नव्हती आणि त्याची भूक जबरदस्त होती. उलट बाहेर पडल्यावर नवीन जॉब करे पर्यंत काय हाल होणार आहेत याची चिंता त्याला भेडसावत होती. नवीन जॉब करणं ही काय सोपी गोष्ट नव्हती . पोलीस रेकॉर्ड मध्ये त्याचे नाव आदराने उच्च स्थानावर होते आणि कधी कधी पोलीस त्याचा घरफोडीच्या प्रकरणात अनौपचारिक सल्ला घेत असत. जरी त्याने कधीही कोणा माणसाचे नाव सांगितले नसले तरी एखाद्या केस मध्ये पोलिसांना न उलगडणारे तंत्र तो सांगत असे. आणि म्हणून कोणी पकडला गेला तर गँग मधील लोक उगाचच त्याचा संशय घेत.
सत्याला फक्त बाहेरच्या जगाची दोन कारणांमुळे आठवण यायची, ती म्हणजे नवीन पिक्चर जे तो दर आठवड्याला पाही आणि दुसरे वडार वाडीतल्या गल्लीतील मुली ज्या त्याच्याकडे कौतुकाने बघत. जेल मध्ये कधी कधी सिनेमा दाखवत पण फार जुने. त्यात रंग नसे आणि गाणी पण खूप जुनी. त्याला झोप येई बघताना पण इतर म्हातारे कैदी अतिशय गुंग होऊन पहात. जरी सत्यानं कुठल्याही मुलीकडे अजून ठीक पाहिलं नसलं तरी त्याला माहित होतं की मुली त्याच्याकडे कश्या बघतात आणि त्याला ते आवडत असे. दिसायला तो काही हिरो नव्हता पण कमावलेलं शरीर,काळ्या पाथराचा तुकतुकीत रंग, तेल लाऊन चापून चोपून बसवलेले केस, निमुळती पेंट आणि त्यावर पट्यांचा टी शर्ट, हातात तांब्याचा कडा, डाव्या कानात चांदीची रिंग आणि दुसऱ्या हातात गंडे अशी स्वारी खोलीतून बाहेर पडायची तेंव्हा लहान थोर स्त्री वर्ग त्याकडे पहायचा आणि त्याची छाती अधिकच फुगायची, हातावरच्या बेडक्या मोठ्या व्हायच्या आणि चालीत झोक यायचा.
पण त्याला कुठल्याही मुलीच्या फंदात पडायचं नव्हतं आणि त्याचं कारण त्याचा धंदा. मुळात गावच्या फासेपारध्याच्या कुटुंबातून अगदी लहानपणीच शहरात पळून आल्यावर आणि बरेचशे आयुष्य फूटपाथवर काढल्यावर त्याला कोणाचीच जबाबदारी नको होती, त्यात असे हे कधीही पकडले जाण्याची भीती.
त्याला पोलीस मधील ओळखीचे लोक मधून मधून समाजावून सांगायचे पण प्रश्न उदर निर्वाहाचा नव्हताच मुळी. प्रश्न असा होता कि त्याने घर फोडी केली नाही तर तो काय करणार? त्याला त्याच्या धंद्याशिवाय कशातही रस नव्हता. एक घरफोडी करायला महिना महिना वाट बघायला लागे. घरावर पळत ठेवावी लागे. कधी फुटाणेवाल्याचे सोंग तर कधी भिकाऱ्याचे तर कधी चक्क विक्रेता बनून घराचा दरवाजा पण ठोठावी. या कामा मध्ये जे समाधान त्याला लाभे ते कशानेही मिळणारे नव्हते. आलेला माल तो ठराविक शेट लोकांकडे देई आणि जे देतील ते पैसे घेऊन निघून जाई म्हणून शेट लोक त्याच्यावर खूष असत आणि कधी पैशाची अडचण त्याला भासली तर त्याच्या हातात ते त्याच्या जरुरीपेक्षा जास्त पैसे कोंबत. या वेळेला मात्र त्याची चुकी झाली होती आणि कोणा तरी महत्वाच्या माणसाच्या घरात त्याने डल्ला मारला होता. एक शेट सामानासकट पकडला गेला आणि त्याच्या मुळे सत्या.
सत्याला आता दुसऱ्या शहरात बस्तान बसवावे लागणार होते हे नक्की.
तुरुंगात त्याला आणले गेले तेंव्हा त्याला दुसरीच सेल मिळाली होती पण दोन दिवसातच त्याला ठेंगण्या दुस्तरच्या सेल मध्ये हलवण्यात आले. अफवा होती कि ठेंगण्याची तुरुंगात वट होती.
ठेंगण्या दुस्तर हे नाव कसे पडले आणि कोणी दिले याचे उत्तर हे स्वत ठेंगण्या पण देऊ शकत नव्हता . उंचीनं ठेंगणा होता त्यामुळे साहजिकच लोक त्याला ठेंगण्या म्हणत असावेत पण दुस्तर का चिकटले हे कोणाला माहित नव्हते. त्याचे नाव सुद्धा पोलीस, कोर्ट आणि तुरुंगाच्या नोंदी शिवाय कुठेही नमूद असण्याचे कारण नव्हते. जन्मापासून रस्त्यावर आणि त्यानंतर गुन्हेगारीत वाढलेल्या ठेंगण्याला शाळेचा दाखला कधी मिळाला नाही ना रेशन कार्ड . उपासमारी आणि अवहेलना या शिवाय कोणीही त्याला काही देऊ केले नाही आणि जगाने ज्या क्रूरतेने त्याला वाढवले तेवढीच क्रूरता त्याच्या अंगवळणी पडली. त्याच्या क्रूरतेला कोणतीही सुडाची भावना नव्हती. कारण त्याला दुसऱ्या कोणत्याही भावनेचा अनुभव नव्हता आणि कधी स्पर्श झाला नाही. एखादा वाघ जसा सावजाला मारताना नैसर्गिक रित्या अलिप्त असतो तसाच ठेंगण्या अलिप्त आणि भावनाशून्य होता.
ज्यावेळी कोर्टानं ठेंगण्याला दोन जन्म ठेपेच्या शिक्षा एका मागून एक भोगण्याची शिक्षा सुनावली तेंव्हा ठेंगण्याचा निर्विकार चेहेरा बघून त्याची केस लढवणाऱ्या आणि आयुष्यभर गुन्हेगार जवळून बघितल्याने निर्ढावलेल्या सरकारी वकीलाचा सुद्धा थरकाप झाला होता. ठेंगण्याची फाशी एकाच कारणामुळे टळली होती कि त्याला अघोरी बाबा शंभूनाथजी, त्यांची पत्नी पार्वतीदेवी आणि चार मुले आणि एक मुलगी या सर्व कुटुंबाची निर्घृण हत्या करताना कोणीही प्रत्यक्ष पहिले नव्हते.
पोलिसांनी जंग जंग पछाडले, मार मार मारले, तळ पायाची कातडी सोलून काढली , पाण्याशिवाय चार दिवस ठेवले तरीही ठेंगण्याच्या तोंडातून एक हुंकार आला नव्हता का हत्येचे शस्त्र पोलिसांना सापडले नव्हते. गुन्ह्याचे स्वरूप इतके भीषण होते कि कित्येक महिने नाशकाच्या रहिवाश्यांची झोप उडाली होती.
ठेंगण्या गुन्ह्याच्या मध्य रात्री पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या जीपला भ्रमिष्टावस्तेत रस्त्यावर फिरताना आढळला . त्याचे कपडे रक्ताने माखलेले नव्हे भिजलेले होते. अंगावर मांसाचे तुकडे जशे एखाद्या खाटकाच्या अंगावर असतात तसे दिसत होते. त्याला पकडून तपासणीसाठी इस्पितळात नेल्यावर लवकरच अघोरी बाबाच्या वाड्यात हत्या झाल्याचे आढळून आले. ठेंगण्याने कधीही जबानी दिली नाही न कोर्टात त्याने एक चकार शब्द काढला. केस लवकर संपली पण त्या मुदतीत पोलीस विसरून गेले कि ठेंगण्या मुका नाही. सरकारी वकील अनेकदा ठेंगण्याला लॉकप मध्ये भेटला पण जर कधी बोललाच तर ठेंगण्याच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडे " मी बाबाला मारला नाही" आणि त्या नंतर तो आपल्याच तंद्रीत जाई ! ठेंगण्याच्या वकिलांनी सुद्धा केस स्वयंचलित मार्गावर टाकली आणि त्यांना कोर्टात हजर राहण्याचे जे पैसे मिळत ते गुपचूप हनुमानाच्या मंदिराच्या पेटीत ते टाकून देत.
ठेगण्या जरी वरून अबोल आणि शांत वाटायचा तेव्हडाच तो रागीट आणि भयंकर होता. त्याची एक अतिशय दुखरी आणि नाजूक भावनिक बाजू होती जिला जर कोणी हात घातला तर ठेगण्या जीवे मारायला पण मागे पुढे बघत नसे. ती बाब म्हणजे त्याचे कुरूप दिसणे. त्याला कधी आरश्यात पाहायला आवडत नसे . या त्याच्या अतिशय कुरूप दिसण्याने त्याचे लग्नच काय पण कोणी स्त्री ने त्याच्याकडे पाहणे दुर्लभ होते. या त्याच्या आयुष्यभर सलत असलेल्या दुक्खामुळेच तो अघोरी बाबा कडे आकृष्ट झाला होता. ठेंगण्याला पैश्याची कमतरता नव्हती आणि तो कधीच पैशाला हपापलेला नव्हता. कुठल्याही आणि कोणाच्याही पैशाच्या व्यवहारात नुसत्या धमकावणीने त्याला पैसे मिळत आणि तो सुद्धा हे काम जेंव्हा गरज पडे तेंव्हाच करे. त्याच्या गरजा कमी होत्या आणि अगदी वारांगना सुद्धा त्याच्याकडे बघायला टाळत असत त्यामुळे स्त्री जातीशी त्याचा काही संबंध आला नाही तेंव्हा पैशाची गरज फारशी भासत नसे. लोक सुद्धा अगदी साध्या साध्या कामाचे घाबरून खुप पैसे देऊन जात.
ठेंगण्याला सलत असलेल्या दुक्खावर अघोरी बाबाने उपाय करायचे आश्वासन दिले होते. अघोरी बाबा कुठून नाशिकात आला हे कुणालाच माहित नव्हते. कधी एके काळी कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो तांत्रीकां बरोबर आला असावा पण त्याने नाशिकच्या जुन्या भागात वाडा घेतला होता, त्याला मुले पण झाली तरीही अजून तो पूजाअर्चा आणि गूढ तांत्रिक उपाय करत असे. बाबा कोणाला कधी दिसत नसे . त्याची मुले मात्र लंगड्या नोकराबरोबर शाळेला जाताना दिसत. असे ऐकिवात होते कि बरेच धनवान लोक आणि राज्यकर्ते बाबाचे भक्त होते. त्या भयाण रात्री अघोरी बाबाने ठेंगण्याला वाड्यावर बोलावले होते. बाबाची दक्षिणा अगोदरच ठरली होती त्या प्रमाणे ठेंगण्या दहा दहा तोळ्याच्या दोन सोन्याच्या विटा घेऊन आला होता. त्याला बाबाने दोन गळ्यात बांधायच्या पेट्या म्हणजे लॉकेट पण आणायला सांगितले होते, एक सोन्याचे आणि दुसरे चांदीचे. त्यात घालायला म्हणे बाबा मंत्रवलेले भस्म देणार होता. पुढे काय होणार होते याची ठेंगण्याला काहीही कल्पना नव्हती.

ठेंगण्या जेल मध्ये येऊन आता दोन तपांहून अधिक काळ लोटला होता. या काळात कित्येक कैद्यांनी ठेंगण्याशी दुष्मनी करायचा प्रयत्न केला. पण जो पर्यंत त्याच्या वर्मावर कोणी बोट ठेवले नाही तो पर्यंत ठेंगण्या गाय होता. ज्यांनी त्याच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवला त्यांचे हात, पाय आणि कधी तर दोन्ही कायमचे जायबंदी झाले. त्याच्या महतीमुळे किती तरी वर्षात त्याच्या वाट्याला कोणी गेल्याचे ऐकिवात नव्हते.
ठेंगण्या कोणाची तरी वाट पाहत होता कारण ज्या वेळेला नवीन कैदी येत तेंव्हाच तो आतुरतेने नवीन कैद्यांची माहिती विचारत असे. पण सत्या आल्यानंतर अशी विचारपूस करणं सुद्धा बंद झालं. ठेगण्याने वशिला लाऊन सत्याला आपल्या सेल मध्ये घेतल्याचा अनेकांना वहीम होता. ठेंगण्याचा आशीर्वाद असल्याने सत्याचं जेल मधलं आयुष्य किती सोपं झालं होतं याची सत्याला काहीच कल्पना नव्हती . ठेंगण्या फारसा बोलत नसे पण सत्याला बोलका करी . सत्याने केलेल्या अनेक धाडसी घरफोड्यांची माहिती सत्यानं त्याला दिली होती.
मागच्या सहा महिन्यात बरेचदा ठेंगण्या बरा नसायचा . त्याच्या पोटात खूप दुखायचं . एरवी बेरड असणारा ठेंगण्या पोटात दुखायला लागल्यावर मांजराहून गरीब दिसायचा. तुरुंगाच्या डॉक्टरने अनेकदा औषध उपचार केल्यानंतर नाशिकच्या सरकारी इस्पितळात तपासणीसाठी पाठवलं. त्यानंतर एक जबरदस्त अफवा तुरुंगभर पसरली " ठेंगण्या आता मरायला टेकलाय "
ठेंगण्याला आता सेल मध्ये झोपून रहायची मुभा असायची. जेवणाची थाळी सुद्धा सेल मध्ये पोचवली जायची. रात्री बेरात्री सत्या उठून टॉयलेट ला जायला हात देई. आज तर ठेंगण्याला नाश्ता खायची सुद्धा इच्छा नव्हती. आज रात्री त्याने सत्याशी बोलायचे ठरवले.
सत्याला ठेंगण्याच्या आजाराचे वाईट वाटत होते. तीन वर्षांच्या सहवासात ठेंगण्याने त्याला थोडी फार माया लावली होती. पण आता थोड्या दिवसात सत्या सुटणार होता तरीही त्याने ठेंगण्याला मधून मधून भेटायचे आश्वासन दिले होते.
रात्री भटारखान्यातून सत्या लवकर सेल मध्ये आला. सत्या येताना गरम दुधाचा पेला आठवणीनं ठेंगण्या साठी घेऊन आला. तेथे काम करण्याचे काही फायदे होते त्या पैकी एक म्हणजे जेलर आणि गार्ड ची काळजी घेतल्यानंतर बाकी रान मोकळे असायचे. सत्यानं पेला पुढे केला आणि म्हणाला “दादा, गरम दुध घ्या, प्याल्यावर बरं वाटेल." ठेगण्यानं पेला घेतला आणि म्हणाला " सत्या पोरा बस. मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे." सत्या कॉट वर बसला . ठेंगण्याचं एवढं मोठ्ठ वाक्य त्यानं क्वचितच ऐकलं होतं.
"पोरा , जवळ जवळ पंचवीस वर्षां पूर्वीची गोष्ट आहे. नाशकात एक बाबा होता. त्याचं नाव आता विसरलो पण त्याला अघोरी बाबा म्हणत."
सत्या कधी नाशिक शहरात गेला नव्हता पण जेंव्हा सत्या म्हणे कि आता त्याला दुसऱ्या शहरात जॉब करावे लागतील तेंव्हा ठेंगण्याच म्हणत असे कि नाशिक त्याला योग्य शहर आहे.
ठेंगण्या पुढं म्हणाला “बाबाचा जुन्या गावात वाडा आहे. आता कोण रहातं आणि कोणाच्या मालकीचा माहित नाही. पण त्या वाड्यात मी एक महत्वाची गोष्ट लपवली आहे. ती तू इथून बाहेर पडल्यावर माझ्याकडे आणायची.”
सत्याला आश्चर्य वाटलं. म्हातारा आजारानं वेडा झाला कि काय ? अगदी सोन्याचा हार जरी असेल तरी तुरुंगात काय कामाचा ?
काहीतरी बोलायचं म्हणून तो म्हणाला " म्हणजे घर फोडी म्हणा ? पण काय महत्वाचं आहे? सोनं का पैका ?"
“नाही, वाड्याच्या पटांगणात मध्यभागी तुळशीच्या उभ्या कुंडीच्या गोमुखात मी दोन चौकोनी ताईत ठेवलेत. गोमुख फोडायला लागलं तरी ते काढायचे आणि मला इथे आणून द्यायचे. त्या नंतर तुला कधी जॉब करायला लागणार नाही याची खात्री बाळग.”
सत्याला आता खरच म्हातारा वेडा झाल्याचा संशय येऊ लागला होता. एवढ्या छोट्या वस्तू साठी का कोण घर फोडीची जोखीम घेतं? पण म्हातारा खरच आजारी होता. कैदी बोलत होते कि त्याला पोटात कॅन्सर झालाय आणि फार दिवस म्हातारा टिकणार नाही ! त्याला माहित होतं कि ठेंगण्या एकटा आहे आणि त्याला आपलं जवळचं कोणच नाही. सत्याला वाटलं , आपली पण गत एक दिवस अशीच होणार आणि आपण कुठल्या तरी तुरुंगात एक दिवस अशेच मरणार. त्या भावनेच्या भरात सत्या हो म्हणून गेला. तसा जॉब सोपा होता. पटांगणात उतरायचं, आणि बाहेरच्या बाहेर ताईत घेऊन निघायचं , काहीच वेळ लागणार नाही. सत्याला वाटलं कि एवढ तर तो ठेंगण्या साठी करू शकतो.
दोन आठवडे कसे निघून गेले कळलंच नाही .सत्या आणि ठेंगण्या मध्ये फारसं बोलणं झालं नाही. ठेंगण्याची प्रकृती ढासळत होती आणि जेलरनं त्याला नाशिकच्या सरकारी इस्पितळात हलवायचा निर्णय घेतला होता. ठेंगण्याच्या आग्रहास्तव सत्या जाई पर्यंत सेल मध्ये ठेवायचं जेलरनं कबूल केलं, बहुतेक अखेरची इच्छा म्हणून असेल. ठेंगण्या काही जेल मध्ये परत येण्यासाठी जात नव्हता हे जेलरला माहित होतं. डॉक्टरांनि अधिकाऱ्यांना रेपोर्ट दिला होता कि ठेंगण्या यकृताच्या कर्क रोगानी आजारी आहे आणि रोग शेवटच्या स्टेजला आहे.
गेल्या पंधरा दिवसात ठेंगण्याने परत एकदा वाड्याच्या खाणा खुणा नि तेथून आणायच्या वस्तूची आठवण सत्याला करून दिली होती. ठेंगण्या अगदी निर्विकार पणे सत्याला म्हणाला कि तो काही फार दिवस टिकू शकत नाही, वेदना असह्य होत आहेत आणि डॉक्टर झोपेचे इंजेकशन देतील तेंव्हा जॉब लवकर कर, शक्य झालंच तर सुटण्याच्या रात्रीच.
सत्या सकाळच्या गडबडीत आणि सर्वांचा निरोप घेऊन सुटकेचे कागद अंगठा लाऊन घेईपर्यंत ठेंगण्याला नाशिकच्या इस्पितळात हलवण्यात आले होते. बहुतेक त्या दिवसा पर्यंत ठेंगण्याने खूप वेदना सहन केल्या असाव्यात किंवा सत्याला इस्पितळात भेटायला येणं सोपं जावं म्हणून असेल. ठेंगण्यानं इस्पितळात लगेच नेण्याची विनंती केली . तो नेताना वेदनेने अक्षरशा गडाबडा लोळत होता.
दुपारचं जेवण जेऊन आणि परत याच तुरुंगात कसं यायचं याबद्दलचे पाठ इतर कैद्यांकडून घेऊन सत्या तुरुंगाच्या बाहेर पडला. त्याला हे मात्र पटलं होतं कि ज्याला जगात कोणी नाही त्याला तुरुंगासारखी जागा पृथ्वीवर सापडणार नाही. पण जेंव्हा तो गेटच्या बाहेर पडला तेंव्हा मातीचा सुगंध आणि थंड वाऱ्याच्या झुळुकेने त्याला स्वातंत्र्याची ओळख परत पटवून दिली.
नाशिक दूर नव्हतं आणि त्याला खडखडाट करणारी धुळीनं माखलेली बस लवकरच मिळाली.
बस स्टॅंड पासून तो चालत सुटला आणि त्याला जुन्या गावात यायला फार वेळ लागला नाही. त्याला खाणा खुणा ओळखीच्या वाटल्या आणि तो एका उंच दगडी भिंती कडे आला . थोडा वेळ घुटमळल्यावर एक बामण उघड्या अंगानं लोटा घेऊन घाई घाईत जाताना दिसला. त्याला सत्यानं विचारला " दादा , बाबांचा वाडा कुठला ?" तो बामण त्याच्याकडे कपाळावर आठ्या घालून बघू लागला ' कोण बाबा? नाशकात सगळेच बाबा म्हणवणारे आहेत. " सत्या म्हणाला " अघोरी बाबा , जुना वाडा " आता तो बामण जरा चमकला . त्याने त्या भिंती कडे बोट दाखवले आणि परत घाई घाईत नाहीसा झाला. आता सत्याला रात्र व्हायची वाट बघण्याशिवाय काही काम नव्हते. तो वाड्याच्या भोवती फिरला. भिंतीच्या दरवाज्याला भले मोठे कुलूप होते. त्यावर कापड चिकटवून लाखेची मोहोर लावली होती आणि दरवाज्यावर कागदे चिकटवली होती. सत्याला वाचता येत नव्हते. पण त्याची खात्री झाली कि वाडा रिकामा आहे. काम खूपच सोपे होते.
सत्या प्रथम बाजारात गेला. त्यानं एक स्वस्तातली टॉर्च विकत घेतली आणि त्या नंतर एक वरवंटा. मग त्याच्या लक्षात आले कि जर गोमुख फोडायला लागले तर आवाज होईल म्हणून त्याने एका किराणा मालाच्या दुकानातून पोत्याचा तुकडा मागून घेतला आणि वाटेत वडापाव खाऊन तो वाड्याकडे परतला.
सत्यानं भिंत चढायची जागा हेरून ठेवली होती. भिंत दगडांची होती पण मधे मधे निखळलेले दगड आणि भोकं होती त्यामुळे चढणे अवघड नव्हते. भिंती भोवती गटार वाहत होतं आणि भिंतीवर काही ठिकाणी पारंब्या फुटल्या होत्या. बरीच वर्षे या वाड्यात कोणी पाऊल टाकल्याच्या खुणा नव्हत्या.
रहदारी अगदीच तुरळक होती आणि रस्त्यावर दिवे नव्हते. आठ वाजेपर्यंत एकदम अंधार पसरला होता. थंडीचे दिवस होते त्यामुळे लोक आपापल्या घरात लवकर परतले होते. सत्यानं पहिली चाल केली . पोत्यातला वरवंटा आणि टॉर्च घेऊन तो भिंतीवर चढला. खाली पटांगण असावे पण त्याला काहीच दिसेना . तरीही त्याने अंदाजाने उडी मारली. त्याची उडी सुकलेल्या रोपट्यांवर पडली असावी. टॉर्च काढून त्याने सराईतासारखा झोत फिरवला. पटांगण मोट्ठे होते. मध्यभागी तुळशी वृंदावन होते आणि त्या वरच्या गाईनं आ वासला होता. टॉर्च बंद करून सत्या पुढे सरला. त्याला अंधारात सवयीनं इतरांपेक्षा जास्त दिसत असे. त्याने हाताने चाचपडून गोमुखात हात घालायचा प्रयत्न केला. पण त्याच्या लक्षात आले कि आत पर्यंत हात जाणे कठीण आहे. त्याने पोते गोमुखावर टाकले अन वरवंट्याचा वार केला. त्याला तीन घाव घालावे लागले. गोमुख ढासळून खाली पडले. सत्यानं वरवंटा खाली टाकला आणि टॉर्च ऑन केला. जमिनीवर दोन लॉकेट होते. त्याने लॉकेट उचलले. एक जास्त काळवंडले होते. टॉर्च घेऊन तो भिंतीवर चढला. रस्त्यावर कोणीही नव्हते. त्यांनी खाली उडी मारली आणि झपाझप चालायला लागला. इतका सोपा जॉब त्याने कधीच केला नव्हता पण ठेंगण्या साठी आपण काहीतरी करतो याचे त्याला समाधान वाटत होते.
सत्याने स्टँडवर येऊन फिरत्या गाडीवर एक गरम चहा घेतला . थंडी खूप पडली होती. त्याला वाटले कि जास्त वेळ झालेला नाही तेंव्हा आताच इस्पितळात जावे. रात्र ठेंगण्या बरोबर काढावी आणि सकाळी गावात रहायच्या सोयीसाठी पायपीट करावी. त्याने चौकशी केली . इस्पितळ दूर होतं आणि बस घ्यावी लागणार होती. फक्त दहा वाजले होते. सत्यानं एका छोट्या बायकांच्या वस्तुंच्या दुकानातून काळ्या दोऱ्याचा गुंडाळा विकत घेतला . सत्याला माहित होतं कि उद्या नंतर एखादे वेळेस तो ठेंगण्याला परत कधी भेटणार नाही. जर ठेंगण्याला मरण्यापूर्वी लॉकेट घालायचं असेल तर ? सत्यानं दोन्ही लॉकेट मध्ये दोरा गुंतला आणि खिशात टाकून तो निघाला.
ठेंगण्याला कळा आता सहन होत नव्हत्या तरीही डॉक्टरना तो सुई टोचायला देत नव्हता. त्याला जागे राहायचे होते आणि इंजेकशनने कळा कमी झाल्या असत्या पण झोप लागली असती. त्याला शेवटची आशा होती कि सत्या आज अघोरी बाबाच्या वाड्यात जाईल आणि लॉकेट घेऊन येईल. त्यासाठी त्याला वाट पहात रात्रभर जागे राहायचे होते.
पोटातल्या कळा आता असह्य होत होत्या . त्याला ग्लानी आली. पंचवीस वर्षांपूर्वीची ती रात्र भयानक रात्र डोळ्यासमोर येत होती. अघोरी बाबाने सांगितल्या प्रमाणे तो वेळेवर वाड्यावर पोचला . बाबाने प्रथम त्याची दक्षिणा घेतली आणि बायकोला तिजोरीत ठेवायला सांगितले. नंतर ते ठेंगण्याला आतल्या दालनात घेऊन गेले . मोठ्या दालनाच्या मध्यभागी एक वर्तुळ काढले होते आणि त्यामध्ये अग्नीकुंड होते . वर्तुळाकार बाबाची मुले बसली होती. बाबांनी ठेंगण्याला बसवले आणि ते आणि त्यांची बायको पण बसले. जसे बाबा मंत्र म्हणत तसा अग्नी जास्त प्रज्वलित होत होता. अचानक धुराच्या वलयातून एक आकृती निर्माण झाली आणि त्या आकृतीने बाबाच्या हातावर राख टाकली . बाबा खुश झाल्याचे त्याच्या तोंडावर दिसले . बाबाने ती राख ठेगण्याने आणलेल्या दोन लॉकेट मधे भरली आणि ठेंगण्याकडे लॉकेट दिली . बाबांनी पुढे सरकून ठेंगण्याच्या कानात सांगितलं. ठेंगण्या ने मान होकारार्थी हलवली आणि त्यानंतर काय काय झालं ते आता ठेंगण्याला पुसट आठवत होतं. बाबाची काहीतरी चूक झाली असावी. त्या धुराच्या प्रतिमेने अक्राळ विक्राळ रूप धारण केलं आणि झंजा वातासारखी तिने अकांड तांडव सुरु केलं. प्रथम मुलांच्या , नंतर बाई च्या अंगातून रक्ताचे फवारे उडाले आणि शरीरं छिन्न विच्छिन्न झाली. बाबा पळायला लागला आणि ती आकृती बाबाच्या मागे. ठेगण्या अतिशय बावचळला आणि त्याने घराबाहेर धाव घेतली. पटांगणात आला तर त्याला तुळशी वृंदावन दिसले. हातातील लॉकेट तो गोमुखात टाकून त्याने भिंतीवर उडी घेतली आणि त्या नंतर पोलीस पकडेपर्यंत त्याला भानच नव्हते. या गोष्टीला आता पंचवीस वर्षे झाली होती तरीही ठेंगण्या विसरू शकत नव्हता. या प्रसंगामुळे त्याला खात्री पटली होती कि त्या लॉकेट मध्ये काहीतरी अमूल्य आहे म्हणून बाबाचा जीव गेला.
ठेंगण्याने डोळे उघडले आणि सत्याला पाहून धडपडत उठायचा प्रयत्न केला. सत्यानं त्याला उशी दिली. ठेंगण्या म्हणाला " मिळालं ? लॉकेट मिळालं ?" सत्या हसला . म्हातारा केवढा उतावीळ झालाय . असली लॉकेट रस्त्यावर पैशाला पासरी मिळतात . विकत आणून दिलं असतं तरी कळलं नसतं. त्याने लॉकेट खिशातून काढून ठेंगण्या च्या हातात दिली .ठेंगण्याचा आनंद त्याच्या चेहेऱ्या वर आता झळकत होता. ठेंगण्यानं लॉकेट टवकारून पहिली. त्याने ओळखलं कुठलं चांदीचं आणि कुठलं सोन्याचं. ठेंगण्यानं प्रथम चांदीचं लॉकेट स्वताच्या गळ्यात घातलं. आणि दुसरं लॉकेट सत्याला दिलं . ठेंगण्या म्हणाला "घे घाल तुझ्या गळ्यात . " सत्याला कळेना कि का एवढा खटाटोप ? हे लॉकेट बक्षीस देण्यासाठी ? सत्या म्हणाला " दादा, नको. अहो तुमच्यासाठी मी एवढा उद्योग केला आणि लॉकेट मला देताय ? " ठेंगण्या म्हणाला " अरे पण तू नाही घातलेस तर बाबाची इच्छा कशी पूर्ण होणार ? घे , घाल गळ्यात " सत्याला आता ठेंगण्या खरच मरणाच्या दारात उभा आहे असे वाटू लागले. त्याने हात पुढे करून लॉकेट घेतले आणि आपल्या गळ्यात घातले.
सत्याला एकदम मोठा विजेचा झटका लागावा तसे झाले. तो एक भुयारातून वेगाने जात होता. त्या क्षणात त्याचे सारे बालपण त्याच्या डोळ्यासमोरून सिनेमा सारखे मागे गेले आणि मग अंधार झाला.
जेंव्हा शुद्ध आली तेंव्हा पहिली जाणीव त्याला पोटातल्या तीव्र वेदनेची झाली. त्याने अशी वेदना कधीही अनुभवली नव्हती . अचानक समोर पहिले तर त्याला आपलीच प्रतिमा दिसली. आपण तर स्टुलावर बसलो होतो , कॉट वर कसे आलो हे त्याला कळेना. स्टुलावर पण आपणच बसलो आहे आणि ठेंगण्या कुठे ? त्याने आपल्या कपड्यांकडे पहिले आणि त्याला धक्का बसला.त्याच्या अंगावर इस्पितळाचे कपडे होते. परत पोटात अतिशय असहनीय वेदना झाली.. समोर बसलेल्या त्याच्या प्रतिमेने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला ऐकू आले. “आता तुला जॉब करायची कधीच गरज पडणार नाही.” असे म्हणून ती प्रतिमा स्टुलावरून उठून निघून गेली. जेंव्हा सगळे त्याच्या लक्षात यायला लागले त्याच वेळेला पोटातल्या एका असह्य वेदेनेने त्याची शुद्ध हरपली.
सत्या...... नव्हे सत्यारुपी ठेंगण्या इस्पितळाच्या बाहेर पडला, बाहेर गुलाबी थंडी पडली होती. कुठून तरी रातराणीचा सुगंध पसरला होता. ठेंगण्याला जाणीव झाली कि तो जरा उंची वरून खाली पाहतो आहे. पोटातली कळ आता पूर्ण पणे नाहीशी झाली होती . अचानक अंगात शक्ती आणि उत्साह आल्यासारखे वाटत होते. त्याने एक मस्त शीळ घातली आणि झोकात चालत तो अंधारात नाहीसा झाला.
------------------------------------------------- ----------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त