विषय क्र. १ - "आप्पाचा सिनेमा... १६ एम एम"

Submitted by -शाम on 12 August, 2012 - 09:01

दहावीत नापास झाल्याने घर सोडून गेलेला आपला मुलगा आज बर्‍याच दिवसांनी घरी आल्याचा मोठा आनंद आजीच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता. मुलं कितीही चुकली तरी आईवडील शेवटी त्यांना माफ करणारचं ह्या जगरीतीप्रमाणे आजी क्षणात विरघळली होती.
पायात बूट, बेलबॉटम पँट, अ‍ॅपलकट शर्ट, त्याला मोठ्ठी कॉलर, डोळ्यांवर मोठ्ठा गॉगल आणि केसांचा हिप्पीकट त्या जरा जराजराश्या पडू लागलेल्या अंधारात मी आप्पाला बारकाईने निरखू लागलो. आणि माझं लक्ष त्याच्या हातातल्या पेटीकडे गेलं.
आप्पाने जाताना अशी पेटी नेली नव्हती मग येताना कुठून आणली या विचारात मी मोठ्यांचे संवाद ऐकू लागलो

"मी आता इथेच रहायचं ठरवून आलोय"

"जायला तरी कोणी सांगीतलं होतं?"... भाऊ म्हणजे माझे आजोबा, तावाने बोलत होते.

"मला वाटलं शिक्षणं सुटलं त् काम बघावं शहरात."

"मग संपली शहरातली सारी कामं..?"

"नाही, आता इथेच राहून धंदा करावा म्हणतोय."

"इथं? खेड्यात? कोणता धंदा?"

"सिनेमा"

रोजच्या भाकरीची मारामार असलेल्या घरात "सिनेमा" या शब्दोच्चाराबरोबर सगळ्यांची तोंडं एकदम चालू झाली. कोण काय बोलतं होतं काहीच कळत नव्हतं. त्या गडबडीत भाऊंनी करडू समजून दाराला लाथ मारली, आजीनी मिसरी समजून चहापावडर तोंडात भरली, दादांनी उगाचच येरझरा घातल्या तर काकूचे आणि आईचे जितक्या वेळा खूखू ऐकू आले, तितक्या वेळा "गबसा गं पोरींनो" असं कोणं म्हणत होतं ते काही समजलच नाही.
या धुमाळीत आप्पाने ती पेटी उघडण्यासाठी डबा मागवला, दुसर्‍या थैलीतून बैलगाडीला असतात अशी काही लहान चाकं बाहेर काढली. समोरच्या भिंतीला भाऊंचं सुकलेलं धोतर होतं, ते पुन्हा घरातच सुकायला घातलं आणि थोड्या जोडाजाडीनंतर,.. चमत्कार!
भाऊंच्या धोतरावर चालती बोलती चित्र दिसत होती. आम्ही भानामती झाल्यासारखे डोळे वासून त्या धोतराकडे बघत होतो.
हा होता आप्पाचा सिनेमा... १६ एम एम

आमच्या घरी प्रोजेक्टर आल्याची बातमी दुसर्‍याच दिवशी गावभर पसरली. गावाबाहेर थोडीफार फिरणारी मंडळी वगळता गावात बहुतेकांनी सिनेमा पाहिलेला नव्हता. जो तो येऊन नुसती एकच चौकशी करत होता
"कधीच्याला हाये शिलिमा?"
आप्पाने सोबत आणलेली डॉक्यूमेंट्री गावाला दाखवायचं ठरवलं. भोंग्यावर ओरडून जाहिरात झाली. आजचा शो फु़कटात होता.

बाजार तळावर दोन बांबू रोवून त्याला भर दुपारी पडदा लावण्यात आला आणि दुपार पासूनच माणसं पड्द्याच्या पुढ्यात येऊन बसू लागली.
आमची जेवणं होईपर्यंत आख्खा गावं पडद्यासमोर येऊन टेकला. मधल्या काळात आप्पाने, प्रोजेक्टरवर फिल्म कशी लावायची, भिंग कसे पुसायचे, मशीन चालू-बंद कसे करायचे आदी माहिती सांगून माझ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले."

मशीनला नारळ फोडण्यात आला. आणि सूरू झाला गावचा चित्रप्रवास....
माणसे पडद्यावरच्या हालचाली टिपत होते. काही पडद्यामागे जावून पहात होते. काही पडद्यावरच्या पात्रांशी संवाद साधत होते. त्या अनाकलनिय कथानकाला प्रचंड दाद मिळत होती.... सिनेमा संपला काही सदगृहस्थ मशीनवर पैसे ठेऊन निघून गेले... आप्पाची पहिली कमाई.... ९रुपये पस्तीस पैसे...

त्या प्रोजेक्टरच आणि सिनेमाचं मला प्रचंड वेड जडलं. आप्पालाही सोबत माणूस हवाच होता. गावच्या जत्रा, आठवडे बाजार अशा प्रसंगी सिनेमे घेऊन आम्ही गावोगाव जाऊ लागलो. आप्पाचा आणि घराचाही रोजीचा प्रश्न सुटला होता.

या प्रोजेक्टरसाठीच्या रीळ पुन्याहून एसटी महामंडळाच्या बसने येत. एका सिनेमाच्या चार पुली असत. प्रत्येकीवर खडूने केलेली कोणाचीतरी सही असायची. शेवटच्या पुलीवरची सही पुसली गेली नाही की सिनेमा अर्धाच झाला असे समजून भाडे माफ व्हायचे. आप्पाने हे गणित कसं जुळवलं होतं राम जाने.
पण कितीतरी सिनेमे आम्ही अर्धे पाहून परत केले होते... फुकटात.
...............................

श्रीदेवीचा नगीना सिनेमा आला आणि माणसं पुंगीच्या आवाजाची दिवाणी झाली.
"आप्पा, औंदा जत्रला ह्यो खेळ आणाच"
"नव्या सिनेमाला जास्त भाडं पडतं सरपंच"
"किती लागल"
"साडे तीन हजार"
"मंग नागाचा दुसरा कोन्चा आणा, पण नाग पायजे"
सुपारी घेऊन आप्पा आणि मी पुन्याला आलो.
...........................

चित्रांजली पुणे,
"नागाचा सिनेमा हवायं"
"अहो नागाचे खूप सिनेमे आहेत. नाव सांगा "
"मराठी"
"मराठी नाहीये"
"नंदू, अरे नानाचा नागीन देना त्याला"
"पण नाग आहे ना त्यात?"
"अरे नागीन म्हणजे नाग असणारच की?"

रीळ घेऊन आम्ही परतलो तेंव्हा गावकरी स्टँडवर बसून वाटच पहात होते.
आम्ही बसमधून उतरताच जल्लोश झाला. हा एक वेगळा आनंद गावोगाव आम्हाला येत होता. कुणी सिनिमावाले म्हणून आदराने जेवायला बोलवायचे. जेथे शो असेल तेथे चहापान मिळायचे. जत्रांतून सत्कार व्हायचे.
.............................

"पडद्यावर भव्य नाग पहाSSSS!
नाना पाटेकर आणि रंजना यांचा.. कौटुंबीक, सामाजिक आणि धार्मिक चित्रपट.
आवश्य पहाS! आवश्य पहाSS! आवश्य पहाSSS!!!" जाहिरात करणारा नेहमीच्या शैलीत ओरडत होता.

नेहमीप्रमाणे ८ - ८:३० ला आम्ही सिनेमा सुरू केला..

एक पुली संपून दुसरी चढवली तोवर नाग दिसला नव्हता..

"अरे नाग कुठंय नाग?" लोक विचारू लागले.

" पुढंये पुढं " आप्पा

दुसरी पुली संपली. नाग दिसला नाही. नाना आणि रंजनाच्या आदिवासी जीवनाला लोकं कंटाळली..

तिसरी पुली सुरू झाली ... नागाचा संदर्भ सुद्धा येत नव्हता

"आप्प्या आरं काय आणलंय हे? डोक्याचा भुगा झालाय रावं, कुठंय नाग?"

एक एक करून लोकं बोंबा मारत होती, आप्पा घाम पुसत काहीबाही सांगत होता, नंद्याला शिव्या घालत होता. पण नाग काही येत नव्हता.

चौथी पुली चढवली आणि

"नाग...नाग ,,,, " म्हणत एक जण पडद्या समोरून उठला तशी एकच तारांबळ उडाली. लोकं सैरा वैरा पळू लागली. आमच्या मदतीला खरा नाग धावून आला होता. थोड्याच वेळात लोकांनी घरं गाठली.

एकदा निळूभाऊंचा वहिणीसाहेब चालू होता. एकट्या बाईला एक नराधम ऊसात नेऊन जबरदस्ती करतो, हे आमचा मच्छू पैलवान गुमान पाहूच शकत नव्हता एक मोठ्ठा दगड त्याने निळूभाऊंना फेकून मारला आणि आमच्या पडद्याचे टारकन दोन भाग करून निघून गेला.....

या प्रोजेक्टरच्या खूप आठवणी आहेत. तो आमच्या घरातला सदस्यच बनला होता. आमच्यासाठी खरी कमाई तो करत होता... आता रोज ताजी भाकर मिळत होती... सिनेमा आम्हाला जगवत होता.
..............................

कधी कधी उपलब्ध असणार्‍या सिनेमांची माहिती पुस्तिका वितरक रीळ सोबत द्यायचे ज्यामध्ये सिनेमाचे नाव, कलाकारांची नावे, रंगीत की कृष्ण-धवल आणि एका शोचे भाडे अशी माहिती असायची. शिवाय नव्या सिनेमांच्या जाहिरातीही असत. मला तेंव्हा दादा कोंडकेंचे सिनेमे खूप आवडत, म्हणून मी ते दरपत्रक आवर्जून पहात असे.

एकदिवस मी आप्पाला म्हणालो,
"आप्पा दादा कोंडकेचा एखादा सिनेमा आणा ना. घरी पाहू"
"घरी बघायला भाडे परवडेल का? कुठे शो असला की बघुया"
"आप्पा, तांबडीमाती फक्त दिडशे रुपयात आहे."
" अरे हो, पण आपल्याला एका शो चे जेमतेम शंभर रुपये मिळतात. कसं करणार सांग?"
परिस्थिती माणसाला आपोआपच मन मारायला शिकवते. मी ती गोष्ट विसरून गेलो.
.......................

त्या वेळी डॉक्टर आठवड्याच्या बाजारात उपलब्ध व्हायचा ही संकल्पना न पटणारी असली तरी सत्य होती. मला थंडी तापाने पछाडले होते. तीन दिवसांनंतर बाजारात आलेल्या डॉक्टरकडे मला नेले...
"मलेर्‍या.."
"ऑ, आता ओ? " आई शिवाय व्याकूळ कोण होणार?
ओषधोपचार घेऊन आई आणि मी घरी परतलो. पण काही उपयोग झाला नाही. आजार बळावला.

"चार दिवसापून पोटात काही नाही " आई चिंतेत होती.
"कसा खात नाही, आण बघू जेवन. . . संध्याकाळी 'शो' आहे बेट्या, लवकर बरं व्हायचं असेल तर खाऊन घे. मी फिल्म आणायला चाल्लोय."
जबरदस्ती चार घास भरवून आप्पा निघून गेला.
आप्पा परतला तेंव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. रीळं टेकवून आप्पा माझ्या बिछान्या जवळ आला.
"गाडी लेट झाली का? लोकं झोपले असतील. आता?" मी त्या अवस्थेतही 'शो'साठी बेचैन होतो.
"जाऊदे, आपण बघू पिच्चर"
आप्पाने घरात पडदा अडकवला. पुली लावली... तर्रर्रर्र र्र र्र र्र.. मशीन सुरू झाले. मी पडल्या जागीच उठून बसलो.
दगडी भीतींवर येणारी सबटायटल्स.... 'प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' चा सुमधूर कोरस.............आप्पाने माझ्यासाठी "तांबडी माती" आणला होता.
मी अजूनच सावरून बसलो.
"तिसरी पुली संपताच मी आप्पाला म्हणालो..
"नका लावू पुढे, सही पुसली तर भाडं पडेल."
आप्पाच्या डोळ्यातून झरझर पाणी ओघळले. जवळ येऊन त्याने मला मिठी मारली. आणि मग सगळं घरच ओलं होऊन गेलं.
..............................

'ननंद-भावजय' चा शो चालू होता. आम्ही परक्या गावात होतो. फोकसच्या खाली असणारा छोटासा दांडा ज्यावर छोटे चाक असते स्पीड कन्ट्रोलसाठी, तो चालू शोमधे तुटला फिल्म पळू लागली... मशीन बंद करून आम्ही दांडा शोधला पण तो मुळ ठिकाणी जोडणे अशक्य होते. लोकांचा आरडाओरडा चालू होता. कोणी कोणी शिव्याही देत होते. काहीजण पैसे परत मागत होते. अजून दोन पेक्षा जास्त पुली शिल्लक होत्या. काही सुचत नव्हते.
"हाताने धरून पाहू का?" मी आप्पाला विचारले
आप्पाने मशीन चालू केले. मी दांडा एका बोटाने धरून ठेवला चिमटीत धरणे शक्य नव्हते. फिल्म चढवली.... आणि सिनेमा सुरू झाला. माझा हात सैल पडला की फिल्म पुन्हा पळू लागे किवा मधेच तुटे. मग तिला टेप लावून पुन्हा चालू करे पर्यंत लोक नाही नाही ते बोलत.
"फिल्म जास्त तुटली तर भरपाई द्यावी लागेल" असे म्हणून आप्पाने मला अजून घाबरवले.
मी आता काहीही झाले तरी हात सैल करणार नव्हतो. फिल्म, मधून मधून बोटावर येत होती. फिल्मच्या कडेने असणार्‍या खिडक्यांच्या कोरा बोटावर घासत होत्या सुमारे सव्वा तास मी बोट न हालवता तसाच होतो. या काळात फिल्म कितीतरी वेळा बोटात घुसून रक्त काढून गेली. सिनेमा संपला. मशीन बंद झालं.
"कळ लागली का रे?"
"नाही आप्पा" शब्द संपेपर्यंत डोळ्यातून खळाळ धार वार वाहू लागली. मी हे का आणि कोणासाठी केले हे न समजण्याच्या वयात होतो. आप्पाने रुमालाने माझे बोट बांधले. डोळे पुसून आम्ही पडदा गुंडाळू लागलो. चित्रपट बघणारे मात्र कुणीही थांबले नव्हते.
........................

"आप्पा इथंच रहातो का?" आमच्या घरासमोर थांबलेल्या जीपमधल्या माणसाने विचारले
"हा. हा.. का ?" भाऊ अंगणातूनच म्हणाले
"कुठाय तो ?"
"भाईर गेलाया"
"सिनेमा दाखवतोका?"
"हा हा"
"मशीन कुठंय"
"हे काय, घरात"
भाऊंचं बोलणं संपेपर्यंत दोन पैलवान घरात घुसले आणि मशीन उचलून नेऊ लागले.
"कोण तुम्ही, असं परस्पर मशीन कसं काय नेता?"
भाऊंना बाजूला करत त्यांनी मशीन गाडीत टाकलं
"दिलावरशेटनी नेलंय मशीन सांगा"
सारं गाव तमाशा पहायला जमलं होतं. भाऊंना प्रचंड संताप आला होता. ते आप्पाला शिव्या घालत होते. ही बातमी कळाली तसं आप्पा घरी परतला.
"भाऊ उधार आणलं होतं, नाही चुकवता आलं. आता धंदाही नाही पहिल्या सारखा. टिव्ही आलेत. जाऊद्या"
भाऊ मानी होते. आठ दिवस घराबाहेर पडले नाहीत. घरातलं माणूस गेल्यासारखे सगळे खिन्न होते.
आप्पाने पुन्हा मुंबईचा रस्ता धरला आणि मी शाळेचा.

........................................................................................................................शाम

(स्पर्धेच्या विषयाशी किती रिलेट होतंय या बाबत संभ्रम आहेच पण या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचं मोठं समाधान आहे. धन्यवाद संयोजक.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलंय... जरासं निराळंच Happy

(पहिल्या विषयाशी रिलेट होईल, माझ्या मते.)

"नाही आप्पा" शब्द संपेपर्यंत डोळ्यातून खळाळ धार वार वाहू लागली. मी हे का आणि कोणासाठी केले हे न समजण्याच्या वयात होतो. आप्पाने रुमालाने माझे बोट बांधले. डोळे पुसून आम्ही पडदा गुंडाळू लागलो. चित्रपट बघणारे मात्र कुणीही थांबले नव्हते. >>> पाणावले रे डोळे हे वाचताना.....

काय काय घडून गेलंय तुझ्या आयुष्यात !!! पण किती अलिप्तपणे, तर कधी खेळकरपणे लिहिलंय तू हे सगळं.....
अवघड आहे रे असं सांगणं ही...

___/\___

शाम,

प्रथम स्पर्धेतील सहभागाबद्दल अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.

हे एक सुंदर ललितही आहेच.

ही आठवण अतिशय आवडली याचे कारण हे की तुम्ही जीव ओतून लिहिता. शब्दाशब्दात तुम्ही आम्हा वाचकांना दिसत असता. हा माणूस आतमधून किती हळवा आहे हे समजत राहते. एक वेगळे जगही तुमच्या लेखनातून मनात प्रवेश करतेच.

ही एक कथाही झाली. या लेखनाचे स्वरूप कशातही मोडेल असे झाले आहे. पुरंदरे शशांक यांनी कोट केलेला उतारा आणि लेखनाचा शेवट वाचून ही कविताही वाटत आहे.

जन्माच्या वाहत्या झर्‍यात असलेल्या रोपाप्रमाणे आपण आयुष्याला स्वतःवर झेलून वाहू देता आणि धडकून पुढे गेलेल्या क्षणांचे काव्य करता आणि अजून झेलून न झालेल्या क्षणांची हसून प्रतीक्षा करता.

शुभेच्छा

-'बेफिकीर'!

जन्माच्या वाहत्या झर्‍यात असलेल्या रोपाप्रमाणे आपण आयुष्याला स्वतःवर झेलून वाहू देता आणि धडकून पुढे गेलेल्या क्षणांचे काव्य करता आणि अजून झेलून न झालेल्या क्षणांची हसून प्रतीक्षा करता. >>> क्या बात है भूषणराव...
काय बोलावं हेच कळत नाहीये ... शाम ......

Pages