प्रतीक्षा

Submitted by प्रकाश कर्णिक on 8 August, 2012 - 02:14

महादेवला खरंच खूप उशीर झाला होता. त्याची ठाण्यावरून सुटणारी जलद गाडी चुकली तेंव्हाच त्याला जाणीव झाली कि आता मुंबईला पोचायला खूप रात्र होणार. पावसाने तर कहरच केला होता. नशिबाने गाड्या अजूनही विस्कळीत झाल्या नव्हत्या म्हणून बरे. तो जेंव्हा दुपारी दोन नवीन मृदुंग डिलिव्हरीसाठी घेऊन निघाला तेंव्हा त्याला वाटले नव्हते की हा गोंधळ होईल. एक तर त्या भजनी मंडळाचा पत्ता बरोबर नव्हता आणि तेथे पोचून त्यांच्या म्होरक्याला गाठून त्याला पैसे मिळेपर्यंत कितीतरी तास गेले. आषाढी एकादशी तोंडावर आली असताना डिलिव्हरी तर देणे गरजेचे होते. त्यात पांडुरंगची प्रकृती हल्ली बरी नसते, म्हातारा झाला. दूरच्या कामाला त्याला आता नाही पाठवता येत. म्हातारा परतच नाही आला म्हणजे? महादेवला या परिस्थितीत आपल्याच विनोदावर हसू आले. महादेवचा पांडुरंगवर जीव होता. म्हातारा होता खडूस पण त्याच्यामुळेच तर महादेव आज ....... जाऊदे.
एक गाडी धापा टाकत खूप कष्टाने आणि मंदगतीने स्टेशनात आली. बहुधा लांबची असावी. खात्रीने मुंबईपर्यंत जाणार या विश्वासाने महादेव आत चढला. लोक पेंगुळलेले बसले होते. त्यालाही जागा मिळाली. निदान ही गाडी मधल्या स्टेशनाना तरी थांबणार नाही! पण सिग्नल मिळेल तशीच पोचणार हे महादेवाच्या लक्षात आले. खिशातून "गोवा" ची पुडी काढली आणि त्याला जाणवले की कामाच्या टेन्शनमुळे बराच वेळ त्याने तोंडात जर्दा ठेवलेला नाही. हल्ली 'गोवा'सुद्धा सगळीकडे मिळत नसे पण त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. वयाच्या अठराव्या वर्षापासून लागलेली सवय, बघायला गेले तर पांडुरंगमुळे लागलेली. आणि त्यामुळे ठरलेले दुकान, कितेक वर्षाची मैत्री! आता सत्ताविसाव्या वर्षी ही सवय सुटायची नाही! पण आश्चर्य आहे, पांडुरंग हल्ली फारसा गुटखा खात नाही. महादेवला याची चिंताही होती. म्हातारा झाला हे ठीक आहे. हरितात्या पण नाहीका म्हातारे? हरितात्या गुटखा खात नसत पण त्यांना चहा मात्र अनेकदा लागे. ते चहा घेण्यापुरतेच सजीव असत .एरवी त्यांची नजर शून्यातच लागलेली असे. बोलत नाहीत, वाचत नाहीत आणि मोठ्याने रेडीओ पण लावलेले त्यांना आवडत नसे.
हरितात्या पांडुरंगहून खरेतर लहान पण पांडुरंग पेक्षा जास्त वार्धक्य. पांडुरंग हरीतात्यांच्या वडिलापासून दुकानावर कामाला होता म्हणे. अगदी लहानपणा पासून म्हणाना. पांडुरंग ने कधी लग्न नाही केले पण दुकानाशी एकनिष्ठ राहिला . पांडुरंग हे खरं नाव होतं का हे सुद्धा इतक्या वर्षात महादेवला माहित नव्हतं. पहिल्यांदा ग्रांट रोड ला कोणा मावशीच्या एका रूम च्या चाळीतील घराच्या बाल्कनीत रात्र आणि आयुष्य काढले आणि आता तेथेच मानलेल्या नातवंडांच्या कुटुंबात उरलेले आयुष्य ... महादेवला वाटले कि म्हातारा बहुतेक दुकानातच एके दिवशी मरणार. मग त्याला असल्या अभद्र विचारांची लाज वाटली.
महादेवला क्षणभर आपल्या विचारांच वाईट ही वाटलं. पांडुरंग वर त्याचा जीव होता. पांडुरंग जणू दुसरा बाप च कि . आबाशी भांडून सोळाव्या वर्षी चंद्रपूरहून पलायन केल्यावर पांडुरंगच त्याचा मार्गदर्शक आणि संगोपन कर्ता. एकाच वेळी त्याला हरितात्या आणि आबाची आठवण झाली आणि परत टेन्शन आलं.
हरीतात्यांच काही वेगळच ! ते काय मालक , पण कधी मालकांसारखे वागलेच नाहीत . जुजबी बोलणं आणि विचारल्यावरच उत्तर हा त्यांचा खाक्या. बाकी सर्व पांडुरंगवरच सोडलेलं. इतकी वर्ष दुकानात काम केल्यावर महादेवाला त्या स्तब्ध असलेल्या गांधीजींच्या अर्ध पुतळ्यात आणि बाजूच्या शिसवी खुर्चीत बसणाऱ्या हरीतात्यात काहीच फरक जाणवेनासा झाला होता. कोणीही आला तरी पांडुरंग , काळा फोन खणखणला तरी पांडुरंग. हरितात्या प्रमाणे जर पांडुरंग शुभ्र विजार आणि वर कोट घालू लागेल तर मालकच वाटेल , हरीतात्यांसारखा !
रक्कम घेणे आणि पगार देणे या व्यतिरिक्त हरितात्यांना काही काम नव्हते. अगदी चहाचे पैसे सुद्धा पांडुरंग ड्रावर मधून काढून देई. जेवणाच्या वेळेला पांडुरंग पिशवीतून त्यांचा छोटा डबा टेबलावर काढून ठेवी तो ते शांतपणे चवीने खात . मधून मधून हरितात्या गायब होत आणि क्वचित एखादेवेळी कोणीतरी बुवा दुकानात घेवून येत. धूप , उदबत्या आणि अंगारे लावून आणि बहुदा हरीतात्यांकडून बरीच रक्कम घेवून बुवा लोक पोबारा करत असावेत असा महादेवला दाट संशय होता. महादेवला दुसरा एक संशय होता. त्याला आता वाटायला लागले होते कि हळू हळू , पांडुरंग पण गारठत चाललाय आणि महादेवचा “पांडुरंग ” होत आहे. या विचारांनी त्याला अनेकदा खूप अस्वस्थ करून सोडलं होतं. पांडुरंग कधी काळी तापा नं फणफणलाच तर दुकान बंद ! जरी कधी त्याने विचारले नाही तरी अचानक त्याला वाटे कि हरीतात्यांकडे दुकानाची चावी असते का नाही?
महादेवला कधी कधी अचानक भीती वाटत असे. नक्की कशाची हे त्यालाच सांगता येत नसे पण कशासारखी आहे याची जाणीव त्याला होई. त्याला तो दुष्काळ आठवे , ते कंद मुळांवर काढलेले दिवस , आबाचे आणि त्याचे जमिनीवर राबणे , आईचे आजारपण आणि लक्ष्मी चि उपासमार आणि तिची कृश छबी. त्या वेळेला जी भीती वाटत असे तशीच काहीशी , न आकलन होणारी पण हुरहूर लावणारी आणि सतत सोबत देणारी भीती त्याला वाटत होती. तो स्वताला खूप समजावत असे. आता रात्रीचे कॉलेज पण संपले होते . इतक्या वर्षात विचार करायला वेळच नव्हता. पण काळ पुढे सरकला आणि कितीतरी गोष्टी भूतकाळात गेल्या. महादेव कधी परत चंद्रपूरला गेला नाही पण आई गेल्यावर आबा आणि लक्ष्मी मुंबईला येवून महादेवला भेटून गेले . लक्ष्मी ला एका कृश शेंबड्या मुलीची मोठी मुलगी झाल्याचे पाहून महादेवला खूपच विचित्र वाटले. लाजऱ्या लक्ष्मी ला पाहून त्याच्या भीतीत आणखी भर पडली.
इतक्या वर्षात पांडुरंग कधी महादेवला आपल्या चाळीत घेवून गेला नाही. म्हणे "अरे जेथे मीच गच्चीमध्ये कसाबसा झोपतो . तेथे तूला कोणाकडे न्हेऊ ??" पण महादेवला पांडुरंगनच गिरगावातल्या चाळीच्या जिन्याखाली कायमची जागा मिळवून दिलेली होती . म्हणे त्याच्या एका मित्राने त्याच्या मृत्यू नंतर हे कागदोपत्री नसलेले हक्क दिले होते. मित्र गेला आणि महादेव आला . चाळीत कोणालाही या मोठ्या प्रॉपर्ट्टी च्या व्यवहाराची बातमी लागली नाही.
महादेवला मुंबई सारख्या महानगरात इतरांना जो त्रास होतो आणि राहण्याच्या जागेचा प्रश्न भडसावतो तसा कोणताच त्रास झाला नाही तर उलट गावाकडच्या साऱ्या अडचणी जाऊन तो मुंबई शहरातील एक रहिवाशी झाला . पण जागेच्या टंचाई चा किंवा अभावाचा प्रश्न त्याला फक्त आबा आणि लक्ष्मी आल्यावरच पडला होता तो सुद्धा दोन दिवसच. त्यावर त्याने इतर सामान्यासारखे आबांबरोबर फुटपाथवर झोपून मात केली आणि लक्ष्मीला आपला जीन्याखालील उबदार बिछाना दिला होता तेंव्हा त्याचा उर भरून आला होता. आबाला आणि तिला एडवर्ड थेटर मध्ये मराठी सिनेमा पण दाखवला होता. सुदैवाने या वेळेला फक्त आबा आला होता तो सुद्धा घाईत.
लक्ष्मीच लग्न ठरलं होतं. मुलगा म्हणे नात्यातलाच होता. आबाच्या पसंतीचा होता . एक तर त्याचा बाप जाऊन खूप वर्ष झाली होती पण आई खंबीर होती . जमीन होती आणि आई त्यात पिकं घेत होती. मुलाला तेच वळण . हुंडा काही मागितला नाही पण आबाच म्हणाला कि माझी चार एकर जमीन मुलीलाच देईन . लग्न थोडक्यात उरकणार होते म्हणे पण शहरातली कापड खरेदी जरुरीची होती . पैशाची पण अडचणच होती म्हणून ......
महादेवला खूप आनंद झाला होता. आता आबा मोकळा . खूप कष्ट केले त्याने. आबाचा जमीन लक्ष्मीला द्यायचा निर्णय तर त्याला फारच आवडला . नाहीतरी महादेवला त्या जमिनीविषयी रागच होता. पण लक्ष्मी तेथे वाढली, आबाने तेथे घाम गाळला आणि आई त्याच मातीत गेली तेव्हा एका अर्थी लक्ष्मीच या जमिनीची हकदार आहे असे त्याला वाटले. तसेही आता तो काही जमिनीत काम नाही करणार, नं कधी गावी परत जाणार. आबाचे कष्ट सत्कारणी लागले हेच चांगले झाले खरे. आता आबा त्याच्याकडे मुंबईला येवू शकतो असे उगीचच त्याला वाटले.
गाडीन जरा बऱ्यापैकी वेग पकडला होता त्यामुळे लोकांच्या माना आता एका तालात डुलू लागल्या होत्या. वरच्या बर्थ वरील तरुण अजूनही चोरून खिडकीत बसलेल्या मुलीकडे बघत होता आणि तिला त्याची जाणीव असून ती न कळल्यासारखे करत होती हे उघडपणे जाणवत होते कारण पंखा जोरात चालू असताना अचानक ती मासिकाने वारा घेत मान मुरडवत होती. तिच्या शेजारच्या बाईच्या मांडी वरले बाळ रडून दमल्यासारखे झोपले होते कारण अजूनही झोपेत मधून मधून त्याला हुंदके येत होते. त्या मुलाचा बाप आपण या जगाचे नसल्यासारखा घोरत होता. जमिनीवर एक म्हातारा बहुदा भिकारी काठीला गच्च धरून गाडीच्या तालावर डूलायचा प्रयत्न करत होता. डब्यातील मंद पिवळा प्रकाश अत्यंत खिन्न करणारा होता. बाहेर पावसाची संतत धार लागली होती आणि एखाद्याने प्यायला पाण्याची ओंजळ करावी आणि देणाऱ्याने घागरीतून रागाने पाणी ओतावे तसे वरून पाणी कोसळत होते.
आबा पण अचानक आला होता . काही पत्र , तार किंवा दुकानात फोन केला असता तर महादेवला खरेदीला वेळ मिळाला असता . आबा आला जसा काही त्याला महादेवच्या पगाराची बातमी मिळाली. नशीब कि महादेवने अजून कोठलाही खर्च केला नव्हता. त्याला स्वताला एक पेन्ट शर्ट घ्यायचा होता. जर पैशे खर्च झाले असते तर ? जसा आला तसा त्याला जायची पण घाई होती . बहुदा लक्ष्मीला पहिल्यांदाच एकट ठेवून घरा बाहेर पडला असावा कारण आबा बेचैन होता आणि त्यान तर सकाळचं तिकीट सुद्धा काढल होतं. पहाटेची गाडी होती.
महादेवला आबाचा खूप राग आला होता पण राग रुजायला त्याला वेळच नाही मिळाला . महादेवला आठवलं, पूर्वी आबाचा राग आला कि तो आबाला खूप घट्ट मिठी मारायचा , मग आबाला समजायचं आणि आबा समजूत काढायचा किंवा लिमलेटची गोळी द्यायचा . पण त्याला अनेक वर्षे लोटली होती आणि महादेव आता काही लहान मुलगा नव्हता. महादेवाला वाटलं, आबाच्या मनात तेव्हडाच ओलावा असेल का? महादेव नं हा विचार झटकून टाकला . आता या गोष्टीला काही अर्थ उरला नव्हता . बऱ्याच कालावधीनंतर अशा गोष्टींचा उहापोह करणं म्हणजे दोघांवरही अन्याय होता. त्याला वाटलं कि लक्ष्मी च्या लग्नामुळे आबा भांबावून गेला असावा . या चांगल्या बातमीमुळे महादेवचा राग सुद्धा गुळ मट झाला होता , ना धड चवीचा ना धड गोड , ना पिता येतो ना टाकता. अशा भारदस्त विचारांनी महादेवला मोठ्ठा झाल्यासारखं वाटलं आणि जबाबदारीच्या ओझ्यानी थकल्यासारख झालं.
महादेव नं सकाळीच लक्ष्मी साठी दोन साडया , नवर देवासाठी कापडं आणि सासू साठी लुगडं घेऊन टाकलं. आबाला आणि त्याला काहीही अनुभव नसल्यानं काम उलट सोपं झालं होतं. आबानं दुकानात यायला चक्क नकार दिला . शहरातल्या दुकानात त्याला घाबरं फुटायचं तेंव्हा त्यांनी महादेव बरोबर यायला नकार दिला. आबा जिन्याखालच्या वळकटी वर पडून राहिला . लग्नाचं खरच त्याला टेन्शन आलं असावं. महादेव नं आबाला बजावून सांगितलं " कुठही भटकू नकोस . हरवशील. कोपऱ्या वरच्या भटाच्या खानावळीत जेव. मी संद्याकाळी येतो. " महादेव चक्क कापडाच्या दुकानात गेला आणि त्यांनी ठरवलेल्या रकमेच्या आत असलेल्या साड्या मोठ्ठ्या धीराने घेऊन टाकल्या.
मुंबई शहरात आता भटाच्या खानावळी औषधाला सुद्धा मिळेनाशा झाल्या होत्या पण गिरगावात अजूनही एक दोन सॅमपल शिल्लक आहेत त्यापैकी च . महादेव ला भटाची खानावळ आवडत असे त्याचे कारण स्वस्त आणि भरपेट घरगुती जेवण . इतकी वर्षे, वडा पाव, खानावळ आणि कधी घरगुती डबा यावर च तर तो टिकून होता. कित्येकदा एक वेळ जेऊन दुसऱ्या वेळी चाहात पाव बुडवून दिवस काढले होते . पण या गोष्टीच कोणतच अप्रूप महादेवला नव्हतं . त्याला गावाकडची उपासमार चांगलीच ठावूक होती आणि त्याच्या तुलनेत शहरात माणूस खूप चांगल्या परिस्थितीत राहू शकत होता हे त्याला अनुभवातून कळले होते.
मुंबईत पाऊल टाकलं तेंव्हा तर तो कितीतरी दिवसांचा उपाशी होता. ट्रेन मध्ये लोकांनी टाकलेल्या आणि स्टेशन वरच्या कचऱ्याच्या टोपली तून जे खाण्यालायक मिळेल ते त्यांनी उचलले होते. तरीही गाडीतून उतरल्यावर खूप अशक्त आणि भ्रमिष्ट अवस्थेत पांडुरंग ने त्याला बघितले आणि त्यानंतर आज महादेव पदवीधर बनण्याच्या मार्गावर होता. रात्रीची शाळा आणि नंतर रात्रीचं कॉलेज याचा पाठपुरावा महादेव नं पांडुरंग च्या प्रोस्साहनानेच केला. पांडुरंग ला त्यातलं काही कळत नव्हतं तरीही पांडुरंग फक्त महादेवला पुढे ढकलत होता जणू पांडुरंगचा महादेव हा मानसपुत्र .
महादेवची सुप्त भीती आता मूर्त स्वरूप घेऊ लागली होती. दुकानात आता काही भवितव्य राहिलं नव्हतं . हरितात्या आणि पांडुरंग दोघेही थकले होते . महादेवचं दुकानातील वास्तव्य काही काळच होतं हे त्याला उमगत होतं तरीही दुकानाची ओढ जबर होती. पदवी मिळाल्यावर दुसरी चांगली ऑफिस ची नोकरी घेणं क्रम प्राप्तचं होतं पण कोठल्याही बदलला माणूस घाबरतं याला महादेव अपवाद नव्हता.
ट्रेन अचानक स्लो झाली आणि लावलेल्या ब्रेकचा कर्कश आवाज पावसाच्या आवाजात एकजीव होऊ लागला आणि महादेवची तंद्री तुटली.
हातावरच्या जुन्या पण अचूकपणे वेळ दाखवणाऱ्या घड्याळाकडे महादेवने पहिले . अकरा वाजून गेले होते. घड्याळावरून त्याला आठवले . एकदा परीक्षेच्या दिवसात रात्री खूप जागरण झाल्यामुळे महादेव दुकानात हरीतात्यानंतर पोचला. हरीतात्यांनी न बोलता एक जुनी पेटी उघडून हे घड्याळ त्याला काढून दिलं होतं. चावी दिल्यावर ते व्यवस्थित सुरु झालं जसं काही महादेवची वाटच बघत होतं. महादेवला साधारण कल्पना आली कि हे घड्याळ हरीतात्यांच नाही पण ज्या काळजीनं त्यांनी ते हाताळलं त्यावरून ते खूप महत्वाचं असणार . यापेक्षा खोलावर जायची गरज त्याला वाटली नाही. यानंतर मात्र महादेव वेळेवर यायचा आणि संद्याकाळी वेळेवर दुकान सोडायचा . शाळा कॉलेज करत आल्याने उगाचच दुकानात बसून रहायची सवय त्याला कधीच लागली नाही.
सकाळी जर कधी महादेव चुकून लवकर पोचला तर पांडुरंग स्टुलावर चढून फोटो पुसताना दिसे. फोटो पुसणे आणि त्यावरचे चंदनाचे हार झटकून नीट करणे हा पांडुरंग चा नियम महादेवला अपरिचित नव्हता. तीन फोटो पैकी दोन त्याला सहज ओळखण्यासारखे होते . एक सरस्वतीचा आणि दुसरा लक्ष्मीचा . हे फोटो त्याने शहरात आल्यावरच बघितले आणि ओळखायला शिकला पण आतापर्यंत असंख्य दुकानात हेच फोटो लावलेले त्यांनी पहिले होते. तिसरा फोटो एका रुबाबदार पण करारी माणसाचा होता. काळा कोट , फरची टोपी, नाटकात घालतात तशी आणि रुबाबदार मिशा काजळ घातलेल्या तीक्ष्ण डोळ्याना शोभून दिसत . त्या फोटोत जुना असला तरी जिवंतपणा होता. असं वाटायचं कि माणसाचं लक्ष आहे. एवढं महादेवाला नकळत केव्हाच उमजलं होतं कि हे कोणीतरी हरीतात्यांचे लागतात पण त्याला कधी याहून जाणून घ्यायची उत्सुकता आणि गरज भासली नाही.
तरीही एका अशाच सकाळी महादेव सहज पुंडलीकाला विचारून गेला . पांडुरंगने तुटक उत्तर दिले "रावसाहेब मिरजकर , मोट्ठे मालक ". पांडुरंगच्या रुक्ष आवाजामुळे महादेवाला पुढे बोलण्याचे धैर्य झाले नाही आणि तो विषय तिथेच संपला.
थांबलेली ट्रेन परत पुढे सरकू लागली . आता लवकरच दादर स्टेशन येईल आणि नंतर ट्रेन वेग घेईल असे महादेवला वाटले. ही ट्रेन दादर ला थाबते का ? थांबली तरी फार वेळ थांबू शकत नाही , फार तर दोन तीन मिनिटं, हो पण स्टेशनच्या बाहेर थांबवू शकतात . पाणी भरले असेल का ? महादेवच्या मनात रास्त शंका उमटली. चला , आता फार तर पंधरा मिनिटं आणि नंतर मस्जिद पर्यंत तंगडतोड. पूर्ण भिजून जाणार यात काही शंकाच नव्हती.
भिजण्याची भीती मुंबई कराना असू शकत नाही . शक्यतो मुंबई कर छत्री नेत नाहीत आणि जेंव्हा लागेल तेंव्हा छत्री त्यांचे मुंबई च्या पावसापासून संरक्षण करायला असमर्थ आहे असे महादेवला वाटले. वरून कोसळणाऱ्या पावसाने नाही भिजवले तर वाहनांनी उडवलेल्या पाण्याने किंवा साचलेली डबकी आणि तुंबलेली गटारं हे काम चोख बजावतात . त्यात मस्जिद चा रस्ता अंधारी .
महादेवाला स्वताचाच खूप राग आला . काय हा मूर्खपणा . जर सामानाची पिशवी बरोबर घेतली असती तर ही पाळी आली नसती.पण हातात दोन जड मृदुंग असताना कशी काय पिशवी नेणार होतो? वेळेवर अक्कल आली असती तर निदान पांडुरंगला तरी पिशवी आबाला दे म्हणून फोन करता आला असता , पण नाही ! आता सुचून काय उपयोग? आता एकाच आशेवर तो दुकानाकडे जायला निघाला होता. त्याला आठवत होते कि पांडुरंग कुलपाची एक चावी दरवाज्याच्या वर भिंतीतल्या एका भोकात ठेवतो. खरं तर पांडुरंग चावी कधीच विसरू शकत नाही कारण ती त्याच्या तुळशीच्या माळेत असते. तरीही महादेवाने त्या भल्या मोठ्या जुनाट कुलुपाची पितळेची चावी भगदाडात ठेवलेली पहिली होती आणि सारी भिस्त आता त्या किल्लीवर होती.
अचानक त्याला धस्स झाले. या सगळ्या विचारात आबाला तो विसरूनच गेला होता. बापरे ! आबा काय करत असेल , जेवला असेल का ? तो तर संध्याकाळ पासून डोळे लावून बसला असेल. महादेवाला प्रश्न पडला , आबा ला खरेदीची चिंता असेल का महादेवाची का पहाटेच्या गाडीची ? मग त्याच्या लक्षात आले कि जरी पावसामुळे महादेव घरी पोचला नाही तरी आबा पहाटेची गाडी पकडून थेट गावाला निघून जाईल. लक्ष्मी गावाला एकटी होती नं. आणि खरेदीच्या सामानाचं म्हणाल तर ते काय महादेव बरोबर पण जाऊ शकत होतं. म्हणजे महादेव दोन आठवड्या नंतर इतक्या वर्षांनी गावाला जाणारच होता कि. हो पण नवऱ्या मुलाच्या कापडांच काय ? आणि लक्ष्मीला साडी तर पहायची असेल नं ? का एकदम लग्नाच्या दिवशीच? नाही नाही , आत्ताच सामान दुकानातून न्हेणं भाग आहे. थोडक्यासाठी कोणाचाच विरस नको. महादेव ला आपल्याच निर्णयावर समाधान वाटले.
दादर स्टेशनात गाडी स्लो झाली पण थांबली नाही . आता महादेव बाहेर पाहू लागला . अचानक प्रवासी जागे झाले आणि सामानाची आवर आवर सुरु झाली . महादेव उठला आणि दारापाशी गेला . त्याला प्रवाशांच्या गोधळात बसायचे नव्हते.
बाहेर गडद काळोख होता . पावसाची धार आता थकल्यासारखी वाटत होती तरीही तिने हेका सोडला नव्हता . मागे जाणाऱ्या दिव्यांची पावसाच्या पाण्याने रेघोटी ओढल्याचा भास होत होता . दूरवरच्या निओनच्या जाहिराती पावसाने धूसर दिसत होत्या . महादेवाला शंका आली , दुकानाच्या इमारतीबाहेर पाणी साचले असेल का? म्हणजे घोट्याभर पाण्यात तरंगत असलेल्या कचऱ्यातून वाट काढायला लागणार वाटते. महादेवाला लहानपण आठवलं. गावाकडे कुठला आला पाऊस? कधी शितोडे पडले तर नशीब . गारा मात्र पडलेल्या त्याला आठवत होत्या . घरावरच्या पत्र्यावर केवढा मोठ्ठा आवाज करत गारा पडायच्या आणि नंतर पांढरा शुभ्र सडा दिसायचा . मुंबईत कधी गारा का पडत नाहीत ? महादेवाला पाण्याच वावड नव्हतं. गावाकडे आंघोळ हा प्रकार त्याला आठवतच नव्हता. पाण्याची इतकी टंचाई कि प्यायला नसे. उन्हाळ्यात तर हालच असत. नदीकडे गेल तर गढूळ पाण्यात म्हशींबरोबर डुंबायचं. मुंबईत कसं , स्वच्छ पाणी , लाल रंगाचा साबण , धुतलेले कपडे ! लक्ष्मी आली तेंव्हा त्यानच रात्री तिला चादर लाऊन नळापाशी न्हाणीघर करून दिलं होतं. लक्ष्मी खुश झाली. त्याला तर दररोज नळाखाली उघड्यावर आंघोळ करायला खूप आवडायचं. अर्थात "उघडयाखाली" करायला त्याला दुसरा पर्याय नव्हता. त्यात खिडकीतून पाटलाची विमल त्याच्याकडे बघते हे माहित असल्यामुळे त्याची आंघोळ आणखीन सावकाश होत असे. विमलने बहुदा कॉलेज अर्धवट सोडले असावे कारण हल्ली ती लवकर पुस्तक हातात घेऊन बाहेर पडताना दिसत नसे. बाप पोलीस मध्ये होता पण कधी घरी असल्याचं दिसलं नाही ,फिरतीवर असावा . विमल हे नाव सुद्धा तिची आई सर्व चाळीला एकू जाईल एवढ्या मोठ्याने हाक मारीत असे त्यामुळे माहित. महादेवला विमल च खूप कुतूहल वाटायचं म्हणजे ती त्याची छोटी बहिण लक्ष्मी पेक्षा वेगळी होती म्हणून असेल . महादेवला खात्री होती कि ज्या दिवशी त्याचा फायनल चा रिझल्ट लागेल तेंव्हा तो आपणहून विमल ला पेढे देईल अर्थात इतरांच्या बरोबर . पण तेंव्हा तिला कळेल नं कि तो पण शिकलेला आहे!
गाडी नं मस्जिद सोडलं . फलाटावर शुकशुकाट होता. प्रवासी आता मागे गर्दी करू लागले होते. सामान सांभाळत नसलेल्या जागेतून पुढे जायचा प्रयास चालू होता. महादेवला पाऊस कमी झाल्यासारखे वाटले . गाडी स्टेशनात शिरली आणि वेग कमी होताच महादेव ने फलाटावर उडी घेतली आणि झपाझपा चालायला सुरुवात केली. गाडी पूर्णपणे थांबायच्या आतच तो सराइता सारखा बाजूच्या दरवाज्याने स्टेशनच्या बाहेर पडला आणि रस्त्याला लागला. अंधार दाट काजळी सारखा पसरला होता. मग त्याच्या लक्षात आले कि दिवे गेले आहेत. त्यांनी एक शिवी हासडली मनातल्या मनात . पांडुरंगानं त्याची लहानपणाची शिव्या हासडण्याची सवय निर्धारान मोडून काढली होती पण सवयीला उपाय म्हणून तो मनातच शिवी देऊन टाके.
दुकानाच्या इमारतीपाशी पोहोचे पर्यंत पाऊण वाजला होता . अचानक बाजूला उभ्या ट्रक च्या खालून कुत्र्यांचा समूह भुंकू लागला . कुत्री मागे लागू नयेत म्हणून महादेवाने त्यांना हाड हाड ची धमकी दिली आणि एक शिवी मनात त्यांना बहाल केली. कुत्र्यांना बहुदा त्याची धमकी पोकळ आहे हे समजल्यामुळे ती गप्प झाली . इमारतीबाहेरच्या रस्त्यावरचा दिवा बंद होता. मुख्य कमानीत पण अंधारच. सर्व इमारतीत वीज नव्हती हे उघडच होते.
दुकानाची इमारत ऐतिहासिक असावी कारण तिचे वय सांगणे कोणालाच शक्य नव्हते. हरीतात्यांचे दुकान या लांबलचक चाळी सारख्या दिसणाऱ्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका कोपऱ्यात होते. इमारतीच्या वयाचा ढोबळ अंदाज एक तर मधल्या कमानीच्या बाजूला वखारी सारख्या दिसणाऱ्या एका गाळ्यावर इंग्रजीत लिहिलेल्या कंपनी च्या नावापुढे ESTD. 1895 या अक्षरामुळे येत होता आणि दुसरे सूचक म्हणजे रावसाहेब मिरजकर.
हरितात्यांच वयच सत्तर आणि अधिक असावं आणि ही माहिती उडत उडत पांडुरंगा नं फेकलेली. पांडुरंगाला हरीतात्यांहून मोठ्ठा असल्याचा का एवढा अभिमान होता कोण जाणे. पण पांडुरंग हरितात्यांची खूप काळजी घेई. नं बोलता चहा देणे , जेवणाचा डबा आणि औषधं काढून ठेवणे आणि जेंव्हा हरितात्या नाहीसे होत तेंव्हाची पांडुरंगाची घालमेल कोणाच्याही लक्षात येईल अशी होती. एखादा कुत्रा मालकाला कसा निष्ठावान असतो तसा पांडुरंग हरितात्यांना मानतात असे महादेवाला वाटे. असेल इतक्या वर्षांचा सहवास कारणीभूत पण महादेवाला नव्हते कुत्रा बनून राहायचे. आणि नाहीतरी आता कोण वारस आहे हरीतात्यानंतर हे दुकान सांभाळायला ? एवीतेवी या धंद्यात आता काही राम राहिला नव्हता हेही महादेवाला कळत होते. आता कुठे कोण ढोलकी , मृदुंग आणि इतर वाद्य वाजवतो आणि विकत घेतो ? हल्ली भजनी मंडळी केसिओ वर वाजवतात आणि तमाशाचे फड सीडी वरच्या गाण्यांवर चालतात . मंचा वरची मंडळी नुसतीच तोंडं हलवतात आणि गळ्यात ढोलकी अडकवून उभी असतात . पण जुनी मंडळी मात्र दुरून दुरून मुंबईला वाद्य दुरुस्ती किंवा नवीन वाद्य घ्यायला अजूनही येतात म्हणून चाललंय. महादेव फक्त आता पदवीच्या सर्टफिकेटची प्रतीक्षा करत होता. हरितात्या आणि पांडुरंग यांची वय लक्षात घेता दुकानाचे वय पण साधारण तेवढेच असावे असे महादेवला वाटे. आणि या उदास करणाऱ्या विचाराबरोबर या दुकाना समावेत आपलाही अंत होईल असा भीतीदायक विचारही चटका देऊन जाई. या सगळ्या मलूल आणि जीर्ण पार्श्व भूमीवर विमलचा चेहरा समोर येई आणि महादेवाच्या मनावरचे मळभ क्षणात दूर होई.
पूर्ण इमारतीसाठी एक राखणदार होता . त्याने घातलेल्या पेहेरावावरून तो बहुदा सिनेमा कंपनी ला कपडे पुरविणाऱ्या पारसी ड्रेसवाला कडून चोरून आणला असावा असे वाटे.तो धुवून सुद्धा अनेक वर्षे झाली असावीत . खात्रीने उत्तर हिदुस्तानी होता कारण कित्येक वर्षानंतरही मराठीत विचारलेल्या प्रश्नाचे हिंदीत उत्तर देई. त्याला कोणी पगारावर ठेवले होते का हे काम इमारतीत तो स्वखुशीने करत होता याचा छडा कोणालाही लागला नव्हता पण गाड्या , ट्रक आणि इतर वाहनांना जागा करून वाहनचालकांनी दिलेल्या बक्षिसावर त्याचा गुजारा होत असावा. मुंबईतील डूटी आणि त्या अनुसंगाने आमदनी न चुकवता त्याला गावाकडे अनेक मुले झाली. त्यांच्यात कदाचित मुले दत्तक घेण्याची पद्धत असावी असे महादेवला वाटे. पण हल्ली त्याचे काहीतरी बिनसले होते . आजकाल दुपारपासूनच तो दारू पीत असावा कारण त्याचा वावर "कटी पतंग " सारखा दिसे आणि जवळ गेल्यास दारूची दुर्गंध येई. तो आत्ता जागा असण्याची काही शक्यता नव्हती . महादेवला त्याला अंधारात शोधण्यात वेळ घालवायचा नव्हता. तो तडक सवयीच्या जिन्याकडे निघाला . इमारतीला अनेक जिने होते पण दुकानाला एक सर्वात जवळचा जिना होता. कितीही वाचनाची सवय असली तरी अंधुक प्रकाशात वाच म्हटल्यावर कसे अडखळायला होईल तसे महादेवला जिना चढताना जाणवले. रात्रीच्या अंधारात नेहमीच्या गोष्टी सुद्धा कशा बदलतात असा विचार महादेवाच्या मनाला स्पर्श करून गेला.
दोन जिने चढून महादेवला धाप लागली. जुन्या इमारतीतील जिने रुंद तर असतातच पण एक एक पायरी उंच पण असते हे तो नेहमी सांगत असे. हे सांगताना त्याला गावाकडल्या डोंगरा वरच्या देवळाची नेहमी आठवण येई आणि त्या अनुषंगाने देवीची . लहान असताना सवंगड्या बरोबर दिवसातून अनेकदा डोंगरा वरच्या असंख्य दगडी पायऱ्या तो चढला असेल . त्या पायऱ्या रुंद तर होत्याच पण का कोण जाणे , प्रत्येक पायरी खूप उंच असे. आणि दिवसातून अनेकदा देवीचे दर्शन फक्त भाविकांनी ठेवलेल्या फुटाणे , गूळ, खोबऱ्या साठी किंवा कधी कधी मिळणाऱ्या चुरमुऱ्याच्या लाडवासाठी होत असे.
महादेव आता बाल्कनीत पोचला होता. जीन्यापेक्षा तरी अंधार कमी होता आणि एक धूसर पण अंधुक तिरीप बाल्कनीत येत होती त्यामुळे महादेवच्या आता अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना आकार दिसू लागले होते. हातावरच्या घड्याळातील रेडीअमचे काटे चमकत होते पण महादेवला आता वेळेचं भान आणि पर्वा उरली नव्हती. अनेक वर्षे नाईट स्कूल आणि त्यानंतरची अभ्यासासाठी केलेली जागरणं यामुळे झोपेवर त्याचे पूर्ण नियंत्रण होते. पण आज तो खूप थकला होता आणि त्यातच पाउस , अंधार आणि प्रकाश हे त्याच्याबरोबर सावल्यांचे खेळ खेळत होते ज्यात त्याला काहीही स्वारस्य नव्हते. बाल्कनी खूप लांब लचक होती. अशा बाल्कनी लालबाग मध्ये कित्येक चाळीला असतात . पूर्वीच्या इमारती अशा का असत , जशा एका तुरुंगात असाव्यात तशा याचा महादेवला प्रश्न पडे. पण आज एरवी दिवसा न वाटणारी बाल्कनी रात्री रिकामी असताना खूपच लांब वाटली. दुकान शेवटच्या टोकाला होते आणि तेथे तर धुक्यात दिसतो तसा अंधुकपणा पसरला होता.
पांडुरंग कधी कधी गूढ बोलत असे. एकदा त्याने सांगितलेली सूचना त्याला आत्ता आठवली . बोलता बोलता पांडुरंग कशच्या तरी संदर्भात म्हणाला होता - कधीही माझ्या घरी तिन्हीसांजे नंतर भेटायला येऊ नकोस , काही झाले तरी . तेथे दिवसा भयंकर दिसणाऱ्या अवदसेचे रात्री परीत रुपांतर होते . महादेवला काही अर्थ लागला नाही पण पुढे विचारूनही काही उपयोग नव्हता कारण पांडुरंग काही पुढे बोलणार नाही हे सवयीने माहित झाले होते. त्याला आत्ता आठवले कारण खरच रात्रीचा अंधार आणि वेळ सगळ्या श्राव्य आणि दृश्य गोष्टींचा भास बदलून टाकतात.
महादेव दुकानाच्या दरवाज्याकडे पोचला पण त्याला दोन गोष्टी जाणवल्या , एक तर त्याला आता श्वास घेण थोड जड होत होतं जसं धुरात होईल तसं आणि त्याला वाटल कि दुकानाकडच्या शेवटच्या ढांगा घ्यायला त्याला खूप वेळ लागला . पण अस का वाटावं? त्यान स्वताच समाधान केलं कि आपल्याच अंतर्मनाच्या घडाळ्या नं धोका खाल्ला असेल . परत त्याला देवीचं देवूळ आठवलं. धावत पळत शर्यत लावून डोंगरावरच्या पायऱ्या चढताना नाही का शेवटच्या पायऱ्या खूप मोठ्ठ्या वाटायच्या, सर्व जग अंधुक व्हायचं, श्वास फुलायचा आणि क्षण लांबायचे जसे का मिनिटच !
महादेव नं झटक्यात मनावरची आलेली पेंग दूर केली आणि दरवाज्यावरच्या भिंतीत चाचपडायला सुरुवात केली . भिंत चुन्यानं गिलावा केलेली होती आणि अर्थात त्यावर पिवडी चे अनेक थर फासले गेले होते . दिवसा तर इमारतीची भिंत अधून मधून संद्याकाळी मस्जिद स्टेशन च्या बाहेर आडोशाला उभ्या असलेल्या बायकांच्या चेहेऱ्या सारखी भकास दिसे. पण आत्ता मात्र हाताला तिचा गिलावा आणि रंग नवीन असल्यासारखा सपाट वाटत होता. हा विचार येई पर्यंत क्षणातच महादेव चा हात भिंतीवरून सटकला आणि त्याचा तोल गेला. स्वताला सावरून दोनी पंजे झटकतो तो त्याचा काळजाचा ठोका चुकला. हे काय झाले ? हातावरच्या घड्याळाची काच फुटून पूर्णपणे अपारदर्शक झाली होती. तरीही रेडीअंम च्या ठीपक्यामुळे अंधारातही दिसून येत होते. पहिला विचार डोक्यात आला कि आता पांडुरंग आणि कधी न कधी हरितात्या काय म्हणतील? त्याने ताबडतोब ठरविले कि काच उद्याच्या उद्या बदलून घ्यायची. पण चावीचे काय ? भिंती वरचे भोक कुठे गायब झाले आणि चावी कुठाय ? कुलूप तर बदलले नसेल ना? महादेव ला मूलभुत शंका आली. खात्री करायला महादेव नं कोयंड्याला चाचपडले आणि त्याला आश्चर्य वाटले कारण दाराला कुलूपच नव्हते. कमाल आहे ! म्हातारा विसरला काय , का आजच दुकानात गचकला ? पण कुलूप नाही कोयंडा घातला नाही म्हणजे दार उघडेच सोडले असणार ? मग अचानक महादेव च्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला आणि पांडुरंग विषयी त्याचा आदर एकदम द्विगुणीत झाला. म्हातारा एकदम ग्रेट आहे अशी कधी नव्हे ती भावना त्याच्या मनात निर्माण झाली.
पांडुरंगावर त्याचा आबा एवढाच जीव होता हे खरे पण आबा जसा अगतिक होता तसा पांडुरंग पण सामान्य होता हे महादेवाला कळत होतं . पांडुरंग देव भक्त होता, तिरसट होता, प्रेमळ होता कामसू होता हरीतात्यामुळे अबोलही झाला होता पण महादेव वर जीव करत होता आणि या अक्राळ विक्राळ महानगरात आपला म्हणण्या सारखा महादेवाला फक्त पांडुरंगच होता. तरीही पांडुरंगा न त्याला सामान न्हेता यावं म्हणून दुकानाचा दरवाजा उघडा ठेवला याची महादेवाला अपूर्वाई वाटली . त्याला झालेला हा उलगडा पडताळून पाहण्यासाठी त्याने दरवाजा लोटला आणि काय अगदी अपेक्षेप्रमाणे एक किवाड उघडले .
दुकानात काजळी हून काळा अंधार होता. पण महादेव ला त्याची काळजी वाटली नाही . दुकानात जरी त्याचा वावर एका ठराविक भागातच असे, त्यानी आपले सामान सुद्धा तेथेच ठेवले होते. महादेव कधी हरितात्या बसत त्या बाजूला फिरकत नसे. ती जागा आणि त्याच्या परिसरातील अनेक गोष्टी यांचा धंद्याशी काही संबंध असेल असे महादेवाला कधी वाटले नाही कारण त्या वस्तू आणि त्यांची मांडणी ही कित्येक वर्षापूर्वी तो आल्यापासून होती तशीच आजतागायत होती.
हरितात्या बसत ते खिडकीच्या पुढची जी काटकोनात भिंत होती तिला पाठ करून . त्यांच्या डाव्या बाजूला एक मोट्ठे उभे शिसवी काळे कपाट होते. त्या कपाटात काचेतून अनेक वस्तू दिसत . त्यात बांधलेला फेटा , डफ, मोठ्ठ्या घुन्गरुचे चाळ, कोरिव लाकडातला छोटा आरसा, पितळेचा पानाचा डबा, फिरकीचा तांब्या अशा अनेक जुन्या पुराण्या वस्तू जशा संग्रहालयात ठेवतात तशा ठेवल्या होत्या.
तेथे गणपतीची काळ्या दगडाची मूर्ती एका कप्यात होती तर खालच्या कप्यात पायातले कोरीव पण पुढे नक्षी असलेले लखनवी जोड पण होते. हे कपाट कोण साफ ठेवी ? बहुतेक पांडुरंग! कपाटाच्यावर बाजाची पेटी होती , नक्षीची पण ती कधी कोणी वाजवली असेल असे वाटत नव्हते. बहुतेक त्याचा भाता आता वाळवीने खाल्ला असावा. हरीतात्याच्या उजव्या बाजूला माळ्यावर जाण्याचा लाकडी जिना होता. महादेवाला माळ्यावर कधी चढल्याचे आठवत नव्हते पण पांडुरंग पण कधी चढताना दिसला नाही. तेथे काहीतरी घबाड असण्याची शक्यता होती , म्हणजे जुनी पुराणी पुस्तके , देव देवतांचे जुने फोटो , लाकडाच्या पेट्या , वगैरे. पण जिन्याखालच्या तुटपुंज्या आणि सताड उघड्या जागेत अनेक वर्षे काढल्यानंतर महादेव मौल्यवानच काय पण कुठल्याही वस्तूंच्या मोहा पलीकडे गेला होता.
फक्त हल्लीच तो घरी परत जाताना त्या छोट्या दुकानापाशी घुटमळत असे . तेथे जिग्नेश त्याचा मित्र दुकानावर बसायचा पण मुलींची आणि बायकांची सतत तेथे गर्दी होई. जिग्नेशला अजिबात त्याच्याशी बोलायला वेळ नसायचा पण डोळ्यानीच खूण करून तो हेलो म्हणत असे. जिग्नेशला एकाचवेळी अनेक कलकलणाऱ्या बायकांशी बोलायचे कसब होते. त्याला एकदा जिग्नेशला विचारायचे होते कि मुली कश्या टिकल्या , अंगठी , रिबिनी , पिना , लिपस्टिक , पावडर वगैरे वस्तू पसंत करतात आणि त्यांना काय आवडते. ही त्याची नवीन उद्भवलेली जिज्ञासा होती.
हरीतात्याच्या डोक्यावर तीन फोटो होते. त्यांना चंदनाच्या लाकडाच्या सालपटाचे हार होते. आठवड्यातून एकदा फुलाचे हार आणि दवाज्याला तोरण येत असे. दररोज उदबत्ती लागे. त्या तीन फोटो पैकी देवी अत्यंत मायाळू दृष्टीने बघत . पण रावसाहेब मात्र वर बसून जरब ठेवून होते. महादेव त्याच्याकडे पाहायचं टाळत असे.
हरितात्या खुर्चीतच बसून असत . उठले तर बाल्कनीत दूरवर असणाऱ्या मुतारीला जाण्यासाठी. त्यांचे लक्ष सदैव खिडकीत लागलेले असायचे. मधेमधे ते काहीतरी पुटपुट आहेत असे उगीचच वाटायचे. बहुतेक ते स्वताशी बोलत असावेत. पांडुरंग मात्र ते बोलत असताना थबकायचा आणि क्षणभर खिडकीकडे पाहायचा. हरितात्या कुणाची तरी प्रतीक्षा करताहेत का कावळ्या शी बोलताहेत हे मात्र सांगणे कठीण होते. खिडकीत कधी कावळा पण येत नसे . पांडुरंग आणि हरितात्यांना बघून वाटायचं कि आपलं पण डोक म्हातारपणी असच सटकणार आहे. आणि या वेळेला आबाला पाहून त्याला या गोष्टीची खात्री पटली.
खिडकीच्या कोनाड्यात एक गोल स्टूल होत. त्याचा वरचा गोल फिरकीचा होता. महादेव कधी त्या स्टुलावर बसला नाही कारण ते हरीतात्याच्या खूप जवळ होतं आणि हरीतात्याची एकटक लागलेलीच असे. पण महादेव ला माहित होत कि त्या स्टुलावरून रस्त्यावरची सगळी रहदारी दिसते. तिथे बसून इमारतीची कमान पण दिसत असावी. महादेवच टेबल खिडकीपासून दूर होतं. मध्ये काचेचे दोन केस होते त्यामध्ये मृदुंग होती , नवीन. भिंतीवर अनेक ढोलकी लटकवली होती. त्यानंतर अलीकडे दरवाजा .एकंदरी रुंदीला कमी पण खोलीला जास्त दुकानाची आखणी होती , जुन्या पद्धतीची
लाकडाच्या दरवाज्याचे एक किवाड ढकलून महादेव ने आत पाऊल टाकले आणि तो तेथेच थांबला. त्याला अगदी अनपेक्षित पण मुग्ध करणारा सुगंध आला . घशात आलेला आवंढा गिळता येईना , ना श्वास पुरता घेवविना. महादेव ला खूप आश्चर्य वाटलं. त्याला हा वास ओळखीचा वाटला आणि त्याची सूप्त भीती एकदम उफाळून वर आली. छातीत अचानक धडधडायला लागलं आणि हृदया चे ठोके वाढल्याची जाणीव महादेवला झाली. हो , हा सुगंध त्याच्या परिचयाचा होता. परत त्याला डोंगरावरच्या देवीच्या देवळाची आठवण झाली. त्याला परत देवळात आल्यासारखे वाटले. उदबत्तीचा आणि धुपाचा श्वास रोकणारा वास , त्यात कापूर जळल्याचा धूर , मधेच दिव्याचे तेल आणि नारळाची शेंडी पेटवल्याचा संमिश्र गंध आणि वेगवेगळी फुले हे त्याला एका क्षणात आठवले. यामुळे त्याला एक प्रकारची गुंगी आली.
महादेवच्या सहन शक्तीचा आता अंत झाला होता. त्याला कधी एकदा सामानाची पिशवी घेवून बाहेर पडतो असे झाले होते . इतक्यात त्याचे लक्ष खिडकीकडे वेधले गेले. बाहेर परत पावसाने आपला मारा सुरु केला होता. पावसाच्या कोसळण्याने एक प्रकारचा सुन्न करून सोडणारा आवाज येत होता. अशा वेळी त्याचे लक्ष खिडकीकडे वेधले जाण्याचे काही कारण नसायला पाहिजे पण त्याला क्षणभर एक आकृती दिसल्याचा भास झाला , नंतर अंधार . त्याचा लक्षात आले की काही काळ बंद खिडकीच्या तावदानावर उजेड पडला आणि त्याला आकृती दिसली. त्याला वाटले तेथे कोणीतरी आहे. महादेव च्या अंगावर काटा आला. त्यानी हाक दिली " कोण आहे ? मी आलोय " महादेव ला "मी" कोण हे बोलायला पण सुचले नाही. क्षणाची शांतता उत्तराच्या अपेक्षेत टिकली पण वाटले कि किती काळ निघून गेला आणि मग परत एकदा खिडकीत उजेडाची तिरीप आली आणि महादेव ला आता स्पष्टपणे दिसले. खिडकीच्या स्टुलावर कोणीतरी व्यक्ती आहे. महादेव च्या पटकन लक्षात आले कि हा उजेड दुरून येतो आहे आणि तो बंदराच्या दीपस्तंभाचा आहे आणि म्हणून तो ठराविक वेळाने क्षणभरा साठी खिडकीच्या काचेवर येतो.
महादेव च्या मनात अनंत विचार एका पळात येऊन गेले. दुकानात रात्री कोण तरी रहात हे पांडुरंगा नं का नाही सांगितलं ? का कोणी चोर आहे ? पण मग स्टुलावर का बसून असेल ? ते सुद्धा इतक्या रात्री ? पांडुरंगा नं आबाला आणलं असत तर त्यानी महादेवाचा आवाज ओळखला असता. एवढ्यात परत खिडकीच्या काचेवर उजेड पडला.
महादेवाला मोठ्ठा धक्का बसला . स्टुलावर एक स्त्री बसली होती . त्या क्षणभराच्या उजेडात सुद्धा त्याच्या तरुण नजरेला कळले कि खूपच वयानी लहान आणि सुंदर असावी. केस पुढे घेतलेले आणि मोकळे सोडले होते. आता त्याच्या भीतेचे रुपांतर एकदम कुतूहलात झाले. धीर करून तो म्हणाला
" कोण आहे ?"
परत उजेडाची तिरीप आली . त्या आता महादेव कडे पाहत होत्या. कपाळावर मोट्ठे कुंकू , केसात पांढऱ्या फुलांचा गजरा आणि रंग गोरा पान एवढ्या अंधारात सुद्धा एका उजेडाच्या झोतात दिसून गेला.
"कोण? साहेब ?" महादेवाला एक मंजुळ आवाज आला. अंधारात त्या आवाजातील मार्दव महादेवाला अस्वस्थ करून गेलं.
"अहो असं काय करताय ? मी कमळा."
" काय मेला पाऊस. केव्हाचा कोसळतोय ."
"पण साहेब , कुठ गेला होतात ? मी किती वाट पाहतेय ?"
महादेव ला काहीच सुचेना . " अहो पण .."
परत एकदा उजेडाचा पट्टा फिरला . कमळा स्टुलावरून हलली नव्हती . महादेव पण उभ्या जागी स्तब्ध होता.
अंधारातून आवाज आला "तुम्ही भिजून चिंब झालाय . कापडं बदला बघू नाहीतर पडस होईल."
" तिथ वर ट्रंकत ठेवलीत " कमळा आर्जव करून म्हणाली.
महादेव ला हा काय प्रकार आहे ते कळेना पण त्या आवाजाने त्याला एका जागी खिळवून टाकले.
"किती दिवस लागले. मी केव्हाची वाट पहाते आहे." अंधारात गोड स्वर म्हणाला.
"अहो पण तुम्ही इथे काय करता आहात आणि मी महादेव आहे " महादेवाला शब्द फुटला
उजेडाच्या क्षणात महादेवाने सौंदर्य डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला.
महादेवाचे शब्द पोहोचल्याचे दिसले नाही आणि मग महादेवाच्या लक्षात आले कि त्याच्या घश्यातून आवाजच फुटत नाही आहे.
"गावाकडल्या माणसांनी किती वाईट वाईट खबर सांगितली हो. " आवाजात हळुवार पणा होता .
"मला म्हणाले , साहेबाना फडातल्या लोकांनी साताऱ्यात मारले."
" मला खरच वाटना, रडून रडून डोळे आटले, जेवण बंद , म्हटलं आता इथ खिडकीत डोळे लाऊन बसायचं तुम्ही येईस्तोवर."
महादेवाला आता खरं आणि खोटं यातला फरकच कळेना. त्याला ग्लानी येऊ लागली आणि तो आपल्या खुर्चीत टेकला.
महादेवानी ओठ हलवून आणि घशातून आवाज काढायचा प्रयत्न केला. " अहो तुमची काहीतरी गल्लत होतेय . मी पिशवी न्यायला आलोय."
महादेवाने पिशवी साठी हात पुढे केला पण हात पोचतच नव्हता जसे काही पिशवीच तेथे नाही.
"खूप मारलं का हो मेल्यांनी तुम्हाला ? जळली मेली फडा वरची कुत्री . पैशा साठी मला आयुष्यभर नाचविणार होती मेली."
आता महादेवाची दृष्टी अंधुक होऊ लागली होती आणि त्याने कमळा कडे पाहण्याचा खूप प्रयत्न केला पण आता त्या जागी भलतीच आकृती दिसत होती.
"राव साहेब , फक्त तुमच्या कृपेनं बघा मी वाचले. तुमचे उपकार मला सात जन्म लागतील फेडायला तुमची सेवा करून." त्या आकृतीतून आलेला आवाज मात्र कमळे चाच होता.
महादेवाला एका उजेडाच्या धारेत दिसले कि कमळा का कोण , तिची स्टुला वरची आकृती आता विरत आहे आणि जसा उदबत्तीचा धूर हळू हळू हवेत पसरतो तसा धूर पसरत आहे.
" साहेब , आपला पांडुरंग बरा आहे . लहान पोर ते , आईपासून तुटलं बघा , काही दिवसा साठी असल, पण हाल होतात नं " आता आलेला कमळेचा आवाज खोलवरून आल्यासारखा वाटला.
“त्या कोण मावशी, तुम्ही ठेवलाय तिथल्या, काळजी घेतील नं? “
"मी इथ अशी लपलेली , नं बाहेर जाता येत नं काही . पण खबर सांगतात लोक येऊन."
महादेवाला त्याच्या गुंगीतही जाणवलं तो कुठे अडकलाय ते. त्यानी डोळे वर करून अंधारात भिंतीवरच्या फोटोकडे पाहायचा प्रयत्न केला. प्रकाशाच्या एका झोतात त्याला कळले कि भिंतीवर कोणतेही फोटो नाहीत. पण तिथ शिंग असलेला हरणाचं डोकं मात्र आहे. उजेडात हरणाचे काचेचे डोळे अगतिक दिसले. महादेवाची पण तीच अवगत झाली होती.
" आता काय चिंता नाही म्हणा . तुम्ही आलाय नं . आता सगळं. ठीक होईल. आपल्या पांडुरंगाची काळजी घ्यायला हवी बघा. नाहीतर पोर आजारी पडल." कमळे चा आवाज क्षीण झाला होता आणि धुराचे वलय हवेत विलीन होताना महादेव ला जाणवले. महादेवच्या काळजाचे ठोके आता मंद झाले होते. महादेवाची त्याला लहानपणापासून वाटणारी भीती गेली होती. त्याला अचानक शांत आणि समाधानी वाटलं. खूप अभ्यास केल्या नंतर कशी त्याला गाढ झोप लागे तशीच त्याला आता झोप आली असल्याच जाणवलं आणि तो अंधाराच्या स्वाधीन झाला.
-----*-------
सकाळी पाऊस पूर्ण पणे थांबला होता. चक्क कोवळे उन पडले होते आणि रस्ते ही धुवून निघाले होते. डबकी अजूनही भरलेली होती पण गटाराच्या पाण्याचा निचरा झाला होता. वर्दळ आता सुरु झाली होती आणि गाड्या दिमाखात पाणी उडवत जात होत्या . पांडुरंग वेळेवर पोहोचला. त्याला वाटले कि आज बहुतेक महादेव लवकर येईल कारण आबाला त्यांनी पहाटेचे बस वर बसवले असणार . एवढ्या पावसानंतर हरितात्या दुकानाला येण्याची शक्यता कमीच होती.
जिन्यावर पावसाचं पाणी खूप गळालं होतं आणि बाल्कनी तर निसरडी झाली होती. पांडुरंग दुकानापाशी पोचला तेंव्हा त्यानं दरवाज्यापाशी छत्री आणि जोडे बघितले. त्याला वाटले , महादेव आपल्या अगोदर आला आणि दार बंद पाहून चहा प्यायला गेला असावा.
दाराला लावलेला हाराचा आणि फुलांचा पुडा घेतला आणि दरवाज्याचं कुलूप उघडून पांडुरंग दुकानात शिरला आणि तेथेच थिजला . महादेवाच्या खुर्चीत कोण तरी बसल्या जागी झोपलं होतं .
क्षणभर पांडुरंगाच तोंड मोठ्ठ्या आ मध्ये वासलं आणि नंतर त्याच्या तोंडून नकळत हाक बाहेर पडली " राव साहेब ?"
किती काळ लोटला कोण जाणे , पण जेंव्हा पांडुरंग बधिरावस्थेतून बाहेर आला तेंव्हा त्याने पुढे पाउल टाकले आणि महादेवच्या खुर्चीच्या जवळ गेला. राव साहेबाना पाहून इतका काळ लोटला होतं कि राव साहेब पांडुरंगाला आठवेनासे झाले होते . पण राव साहेबांची प्रतिमा आता फक्त फोटोवरून मनात बिंबली होती. पांढरी विजार, सदरा आणि त्यावरचा काळा कोट तोच होता आणि ती फर ची टोपी ! रावसाहेबांना विसरणे शक्यच नव्हते. दररोज नव्हते का ते हरितात्या आणि पांडुरंगावर नजर ठेवीत? पांडुरंग नं धीर करून राव साहेबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि जागं करण्यासाठी त्यांना हलवलं. राव साहेब खुर्चीत एकदम निर्जीवपणे कलंडले आणि त्यांची फरची टोपी जमिनीवर पडली पांडुरंग नं घाबरून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या छातीत सुईने टोचल्या सारखी कळ आली. पांडुरंगासमोर महादेव एकटक शून्यात पाहत होता !
--------------*---------------------
दुकान कितीतरी दिवस बंद होतं. महादेवाचे सारे अंत्य संस्कार पांडुरंगनंच पार पाडले. महादेवाला राव साहेबांच्या वेषातच अग्नी दिला. म्हणतात एखाद्याचा बाप स्वर्गलोकी जाईल किंवा त्याच्या हयातीत त्याचा मुलगा मृत्यू पावेल तेंव्हा जे दुक्ख होईल ते पांडुरंगाला झाले. काही नाती अशीच अगम्य असतात . पांडुरंगाला एक कोडं होतं कि दाराला कुलूप शाबूत असताना महादेव आत कसा गेला असेल ? भिंतीच्या खबदाडात ठेवलेली चावी तेथेच होती त्यामुळे कोणी महादेवाला मारून परत कुलूप लावले असेल का? पण या वयात त्याला पोलिसांच्या प्रश्नाना उत्तरं द्यायची नव्हती. त्यानी महादेवकडे एक चावी असल्याचे सांगून वेळ मारून नेली. महादेवाचा मृत्यू हृदय बंद पडल्याने झाला असा निष्कर्ष काढून पोलिसांनी फाईल बंद केली . पोलिसांना मुंबई शहरात अनेक महत्वाची कामे पडली होती.
दुकान उघडल्यापासून हरितात्या नियमित येऊ लागले. त्याची खिडकीतून बाहेर पहायची आणि स्वताशी पुटपुटायची सवय आताशी गेली होती . हरीतात्यानी दुकानातले सगळे सामान कबाडी वाल्याला विकून टाकले आणि पांडुरंगाच्या सल्यानी दुकानाची जागा विक्रीस काढली होती. कोणी म्हणतात एका गुजरात्यानी जागेची ऑफर दिली होती आणि तेथे तयार कपड्याचे दुकान येणार होते. आता बिन्दास्तपणे कावळे खिडकीत येऊन रिकाम्या दुकानामध्ये डोकावून जात. इमारतीचा रखवालदार दिसेनासा झाला होता. कदाचित आपल्या गावी परतला असावा. इमारतीबाहेरच्या रस्त्यावर मात्र दिवसे दिवस रहदारी वाढतच चालली होती.
-----------*-------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्र.क.,

चांगली कथा आहे. खिळवून ठेवते. वाटतं की शेवटी काहीतरी रहस्य असेल. पण तसं नसल्याने थोडा अपेक्षाभंग होतो. बाकी वर्णन अगदी डोळ्यासमोर येतं.

आ.न.,
-गा.पै.

कथा चांगली रंगवली आहे .. माझाही अपेक्षा भंग झाला कथेच्या शेवटी .. वर्णनातच खूप वेळ गेल्यासारखं वाटलं ..