आपल्याला आयुष्यभर आनंद देणार्या या भारतीय चित्रपटसृष्टीला, तिला आकार देणार्या सार्या तंत्रज्ञांना आणि तिच्या द्रष्ट्या जनकाला सलाम करण्यासाठी, भारतीय चित्रपटसृष्टीचं शतकमहोत्सवी वर्ष दणक्यात साजरं करण्यासाठी मायबोली.कॉमवर आपण आयोजित करत आहोत गाथाचित्रशती लेखनस्पर्धा!!!
गाथाचित्रशती लेखनस्पर्धेसाठीचे विषय आहेत -
१. माझी आवड / आठवण - या विषयांतर्गत तुम्हांला तुमच्या आवडत्या / आठवणीतल्या / एखाद्या खास आठवणीशी निगडित असलेल्या चित्रपटाबद्दल / चित्रपटांबद्दल, चित्रपटातल्या प्रसंगाबद्दल, आवडत्या / उल्लेखनीय वाटत असलेल्या कलावंताबद्दल, दिग्दर्शक, गायक - गायिका, संगीतकार, गीतकार, संकलक, ध्वनिमुद्रक, नृत्यदिग्दर्शक, कलादिग्दर्शक, रंगभूषाकार, वेशभूषाकार, संगीतसंयोजक, वादक, निर्माता अशा तंत्रज्ञांबद्दल, आणि त्यांच्या कामाबद्दल, चित्रपटसमीक्षकाबद्दल, चित्रपटविषयक पुस्तकाबद्दल किंवा कार्यक्रमाबद्दल, आवडत्या चित्रपटगृहाबद्दल किंवा चित्रपट या माध्यमाबद्दल, किंवा एखाद्या चित्रपटानं तुमच्यावर काय परिणाम केला, याबद्दल लिहिता येईल.
हा विषय केवळ भारतात तयार झालेल्या, भारतीय भाषांमधल्या चित्रपटांपुरता व भारतीय कलाकार - तंत्रज्ञांपुरताच मर्यादित आहे.
२. गेल्या शंभर वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत झालेले बदल - गेल्या शंभर वर्षांत भारतातल्या चित्रपटनिर्मितीचं तंत्र, भारतीय चित्रपटांतल्या प्रतिमा, त्यांतली सामाजिकता यांत अनेक बदल होत गेले. उदाहरणार्थ, संगीताचं, संगीतसंयोजनाचं, ध्वनिमुद्रणाचं तंत्र बदललं. कॅमेरे आधुनिक झाले, पूर्वी चित्रपट बघायला टूरिंग टॉकिजं होती, आता घरबसल्या चित्रपट पाहिले जाऊ लागले. चित्रपटातल्या खलनायकाचं, आईचं रूप बदललं. चित्रपटात समाजाचं वास्तव दिसतं का, किंवा समाजावर चित्रपटांचा परिणाम होतो का, ही उत्तरं शोधणं कठीण झालं कारण समाज आणि चित्रपट यांचा संबंध शोधणं गुंतागुंतीचं झालं. तुम्हांला महत्त्वाच्या वाटणार्या, चित्रपटांशी संबंधित असलेल्या, गेल्या शंभर वर्षांतल्या, किंवा त्यातल्या एखाद्या विशिष्ट कालखंडात झालेल्या अशा बदलाबद्दल, किंवा बदलांबद्दल, तुम्ही या विषयांतर्गत लिहिणं अपेक्षित आहे.
३. माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट
वर दिलेल्या प्रत्येक विषयाला अनुसरून स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांपैकी प्रत्येकी तीन स्पर्धक विजेते म्हणून निवडले जातील.
गाथाचित्रशती लेखनस्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि., मुंबई, यांनी प्रायोजित केलेली बक्षिसं.
पहिलं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे तीन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी
दुसरं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दोन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी
तिसरं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे एक पुस्तक आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटाची एक सीडी / डीव्हीडी
स्पर्धेचं स्वरूप -
१. या स्पर्धेसाठी 'गाथाचित्रशती लेखनस्पर्धा' हा नवीन ग्रूप १ ऑगस्टला उघडण्यात आला आहे. या ग्रुपाचं सभासदत्व घेतल्यावर तुम्हांला तिथे लेखन करता येईल. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०१२, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रुपामध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून तुमचे लेख प्रकाशित करू शकता.
तुमच्या प्रवेशिका सर्वांना वाचता याव्यात म्हणून हा धागा सार्वजनिक करण्यास कृपया विसरू नका.
२. धाग्याच्या शीर्षकात लेखाच्या नावाबरोबरच विषयाच्या क्रमांकाचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, सत्यजित रे यांच्या ’पथेर पांचाली’ या चित्रपटाबद्दल लिहिणार असाल, तर धाग्याचं शीर्षक - विषय क्र. १ - ’पथेर पांचाली’ - असं असावं. 'अशोककुमार ते शाहरुख खान' हा लेखनाचा विषय असेल, तर धाग्याचं शीर्षक ' विषय क्र. २ - 'अशोककुमार ते शाहरुख खान' असं असावं.
३. स्पर्धेचा निकाल मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धांच्या निकालाबरोबर जाहीर केला जाईल.
नियम व अटी -
१. गाथाचित्रशती लेखनस्पर्धा फक्त मायबोली.कॉमच्या सभासदांसाठीच आहे. आपण मायबोलीचे सभासद नसाल तर इथे नवं खातं उघडून आपण मायबोली.कॉमचे सभासद होऊ शकता. हे सभासदत्व विनामूल्य आहे.
२. प्रत्येक स्पर्धक तीनही विषयांसाठी लेख पाठवू शकतो.
३. प्रत्येक स्पर्धकाला लेखनस्पर्धेच्या पहिल्या दोन विषयांसाठी प्रत्येकी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका पाठवता येतील. मात्र, यांपैकी एकाच प्रवेशिकेचा बक्षिसासाठी विचार केला जाईल.
स्पर्धेतल्या तिसर्या विषयासाठी मात्र प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येईल.
४. लेखनस्पर्धेसाठीचे विषय केवळ भारतीय भाषांमधील व भारतात तयार झालेल्या चित्रपटांपुरते मर्यादित आहेत. परदेशी व परभाषीय चित्रपटांविषयी, कलाकारांविषयी अथवा तंत्रज्ञांविषयी केल्या गेलेल्या लेखनाचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.
५. लेखनासाठी शब्दमर्यादेचं बंधन नाही.
६. लेखन स्वतंत्र असावं, व ते पूर्वप्रकाशित नसावं. भाषांतरित लेख स्पर्धेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
७. लेखाबरोबर वापरलेली छायाचित्रं प्रताधिकारमुक्त असावीत. प्रताधिकारमुक्त नसलेली चित्र वापरली असतील, तर ती तशी वापरण्यासंबंधीच्या परवानगीचा व प्रताधिकाराचा लेखात स्पष्ट उल्लेख असावा.
लेखाबरोबर यूट्युब किंवा तत्सम संकेतस्थळांवरील व्हिडिओंचे दुवे कृपया देऊ नयेत.
८. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
९. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसं मायबोली.कॉमच्या पुण्यातील कार्यालयातून घेण्याची व्यवस्था करावी लागेल.
या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत गिरीश कुलकर्णी, वीणा जामकर व गणेश मतकरी हे चित्रसृष्टीतील मान्यवर.
गाथाचित्रशती लेखनस्पर्धेच्या परीक्षकांविषयीच्या व प्रायोजकांविषयीच्या अधिक माहितीसाठी कृपया हा धागा पाहा.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या गाथाचित्रशती लेखनस्पर्धेला सर्व मायबोलीकर भरघोस प्रतिसाद देतील, अशी खात्री आहे.
सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था.. आजभी है और कल भी रहेगा...
प्रत्येक भारतीयाच्या मनोविश्वाचा अविभाज्य भाग बनलेल्या भारतीय सिनेमानं यंदा शंभरी गाठली आहे; तेव्हा त्याच्याबद्दलची भावना व्यक्त करायला त्यातल्याच या गाण्याइतकं चपखल दुसरं काय असणार?
.. कधीतरी लहानपणी सिनेमाच्या अद्भुत जगाशी आपली ओळख होते. नायक, नायिका, खलनायक, खलनायिका अशा ठळक गोष्टींपासून सुरुवात होऊन मग हळूहळू बर्याच गोष्टी कळू लागतात. 'सिनेमात दाखवतात ते खोटं असतं, खरं नाही..' ही ज्ञानप्राप्ती होते आणि 'शोलेमध्ये अमिताभ मरतो, मग हेराफेरीमध्ये परत कसा येतो?' असे प्रश्न पडेनासे होतात. पुढे शाळेतल्या मित्रमैत्रिणींना काल पाहिलेल्या सिनेमाची कथा संवाद, पार्श्वसंगीतासकट सांगता येऊ लागते. सिनेमातली गाणी आवडू लागतात, गुणगुणता येऊ लागतात, गाण्यांच्या भेंड्या खेळणं जमायला लागतं. सिनेमा हळूहळू आपल्या मनात त्याची हक्काची जागा तयार करू लागतो. मग कॉलेजऑफिस बुडवून फर्स्ट डे फर्स्ट शो बघणं ही मूलभूत गरज बनते. बघताबघता चित्रपट आपलं आयुष्यच व्यापून टाकतो.
रात्री जागून 'गुंडा' चारशे बत्तिसाव्यांदा बघून सकाळी पिफ, मामि किंवा इफ्फीत चित्रपट बघण्यासाठी रांगेत उभं राहणं, गॉगल उडवणारा सुपरस्टार पडद्यावर आला की पडद्यावर पैसे उधळणं, आपल्या आवडत्या नटनट्यांची मंदिरं बांधणं, पोटाच्या आजारानं त्रस्त असलेल्या नायकाला बरं वाटावं म्हणून यज्ञ करणं, वीरपन्ननं हिरोचं अपहरण केल्यावर बस पेटवत सुटणं, राज कपूर, दारा सिंग, शम्मी कपूर, राजेश खन्ना गेल्यावर आपल्या घरातलं जिवाभावाचं कुणी जावं असं रडणं, लता-आशा-रफी-किशोर यांचे आवाज तासातासाला कानी पडले तरी त्या आवाजाशी नातं जोडलेली कुठलीशी आठवण येणं या गोष्टींचं मग अप्रूप वाटेनासं होतं.
धुंडिराज गोविंद फाळके यांची ही सारी पुण्याई. ३ मे, १९१३ रोजी त्यांनी अथक परिश्रमांनी तयार केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात झळकला. फाळक्यांच्या हलत्या चित्रांना सुरुवातीला काही घाबरले खरे, अनेकांना ती भुताटकीही वाटली, पण बघताबघता फाळक्यांच्या कधीही खोटं न बोलणार्या राजाच्या गोष्टीनं सार्यांना वश केलं. भारतीय चित्रपटसृष्टीची ही सुरुवात. बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी झालेली.
फाळक्यांची फॅक्टरी ते रामगोपाल वर्माची फॅक्टरी असा हा केवढा विलक्षण प्रवास. टूरिंग टॉकीज, एकपडदा चित्रपटगृहं ते आलिशान मल्टिप्लेक्स. छोटा चेतन ते रा.वन. रुस्तम सोहराब, आन, मुघल-इ-आझमसारखे भव्य, दिमाखदार चित्रपट. तमीळ चित्रपटसृष्टीने पाहिलेला एमजीआर ते रजनीकांतपर्यंतचा काळ. बंगाली सिनेसृष्टी आणि सत्यजित राय. मातीशी नातं टिकवून ठेवणारे मलयाळम चित्रपट. 'लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिरेखांपासून तुमच्याआमच्यासारख्या माणसांचं दर्शन घडवणारे चित्रपट. द्वयर्थी चावट विनोद, पुराणकथा, रहस्य, थरार, भुतं-आत्मे, पुनर्जन्म, बाँबस्फोट, अतिरेकी हल्ले, राजकारण, माणसांतली नाती आणि नात्यांतली गुंतागुंत, मानवी मनोव्यापार असे असंख्य विषय हाताळणारे चित्रपट.
-------
संयोजकः इन्ना, महागुरू, मवा, मृण्मयी, चिनूक्स
भारी आहे
भारी आहे स्पर्धा.
मायबोलीवरच्या, काही जणांकडून खुप अपेक्षा आहेत.
संयोजक, पहिल्या विषयाची रेंज
संयोजक, पहिल्या विषयाची रेंज फारच मोठी झाली आहे असे वाटत नाही का?
वा मस्तच आहे स्पर्धा.....
वा मस्तच आहे स्पर्धा.....
मायबोलीवरच्या, काही जणांकडून खुप अपेक्षा आहेत. +१
अरे वा! मस्तच. गेल्या
अरे वा! मस्तच.
गेल्या वर्षीच्या पुस्तक रसग्रहणानंतर आता चित्रपट रसग्रहण. खूपच छान कल्पना आहे
काही जणांकडून खुप अपेक्षा
काही जणांकडून खुप अपेक्षा आहेत >>> अगदी अगदी..
विषय छान आहेत.. छान लेख वाचायला मिळतील.
>> मायबोलीवरच्या, काही
>> मायबोलीवरच्या, काही जणांकडून खुप अपेक्षा आहेत.
+ १०१
काही जणांकडून खुप अपेक्षा
काही जणांकडून खुप अपेक्षा आहेत <<<
अगदी अगदी. वाचायला मजा येणार.
गाथाचित्रशती... नाव ऐकून
गाथाचित्रशती... नाव ऐकून घाबरलोच होतो.. पण विषय वाचले आणि झकास लेख वाचायला मिळणार याचा आनंद झाला...
व्वा! मस्त स्पर्धा
व्वा! मस्त स्पर्धा
मायबोलीवरच्या, काही जणांकडून खुप अपेक्षा आहेत<< ++१
शर्मिला , नीरजा, फारेंड ,
शर्मिला , नीरजा, फारेंड , ट्यु , अँकी , श्र लोकांचे लेख वाचायला आवडतील.
वा.वा.छानच
वा.वा.छानच
वाचायला मजा
वाचायला मजा येणार.
गाथाचित्रशती... नाव ऐकून घाबरलोच होतो. >>
नाव वाचून मीसुद्धा जरा गोंधळले होते.
एकदम भारी स्पर्धा.. नि भारी
एकदम भारी स्पर्धा.. नि भारी परिक्षक !! सहभागी मायबोलीकर नक्कीच त्यांचा अपेक्षाभंग करणार नाहीत याची पुरेपुर खात्री ! वाचण्यास उत्सुक ! ऑल दि बेस्ट !!
दिपांजली, खरतर तुझे पण लेख
दिपांजली, खरतर तुझे पण लेख वाचायला आवडतील.
रार, आगाऊचे नावही डोक्यात आहे.
मला काही या विषयात समजत असते तर.
मस्त विषय आहेत, पण मुद्देसूद
मस्त विषय आहेत, पण मुद्देसूद मान्डायला तितकेच अवघडही!
कितीही लिहीले तरी बरेच काही राहुनच गेलय अशी चुटपुट राहील.
स्पर्धेसाठी ग्रूप तयार केला
स्पर्धेसाठी ग्रूप तयार केला आहे. आता जोरदार प्रवेशिका येऊ द्या
गाथाचित्रशती लेखनस्पर्धा २०१२
मस्तच उपक्रम. वेळ मिळाला तर
मस्तच उपक्रम. वेळ मिळाला तर नक्की लिहिणार.
नंदिनी वेळ काढच! आणि लिहीच!
नंदिनी वेळ काढच! आणि लिहीच!
विणा जामकर माझ्या दहावीच्या
विणा जामकर माझ्या दहावीच्या वर्गत होती.त्यावेळिच ती अभिनय आणि न्रुत्यात पारंगत होती.अगदी बोलका अभिनय आहे तीचा.आणि या क्षेत्रात तर तिचा अनुभव हि दांडगा आहे. ती नक्किच चांगले परिक्ष्ण करेल.शुभेच्छा सर्व माय्बोलिकरांना.
वीणा मायबोलिकर आहे का???
वाह, मस्तच.. पण आगाऊ म्हणतो
वाह, मस्तच..
पण आगाऊ म्हणतो तसे पहिल्या विषयाची व्याप्ती फ़ारच मोठी आहे. मजा येइल लिहायला
मस्त स्पर्धा . वेळ मिळाला तर
मस्त स्पर्धा . वेळ मिळाला तर नक्कि भाग घेणार .
मस्त आहे उपक्रम.
मस्त आहे उपक्रम.
या स्पर्धेसाठीचे लेख कुठे
या स्पर्धेसाठीचे लेख कुठे वाचायला मिळतील? का स्पर्धेच्या शेवटी ते माबो वर प्रकाशित होतील?
अमृतवल्ली, स्पर्धेसाठी लेख
अमृतवल्ली,
स्पर्धेसाठी लेख लिहिण्यासाठी http://www.maayboli.com/node/36830 हा ग्रूप उघडण्यात आला आहे. इथेच सर्व लेख वाचायलाही मिळतील. तुम्हीही स्पर्धेत जरूर भाग घ्या.
चिनूक्स माझा मुघले आझम हा लेख
चिनूक्स
माझा मुघले आझम हा लेख इथे देऊ का ?
किरण, तो पूर्वप्रकाशित
किरण,
तो पूर्वप्रकाशित नसल्यास अवश्य दे. आणि एकच लेख नको. तुझ्याकडून प्रत्येक विषयासाठी एक लेख अपेक्षित आहे.
खरच मस्त स्पधा आहे.... छान
खरच मस्त स्पधा आहे.... छान छान वाचायला मिळणार....:)
हा विषय केवळ भारतात तयार
हा विषय केवळ भारतात तयार झालेल्या, भारतीय भाषांमधल्या चित्रपटांपुरता व भारतीय कलाकार - तंत्रज्ञांपुरताच मर्यादित आहे.
जे हॉलिवुडी षिणेमे हिंदीत डब झालेत त्याना तात्पुरतं भारतीय म्हणता येईल का?
शब्द मर्यादा किती आहे? किमान
शब्द मर्यादा किती आहे? किमान - कमाल.
<जे हॉलिवुडी षिणेमे हिंदीत डब
<जे हॉलिवुडी षिणेमे हिंदीत डब झालेत त्याना तात्पुरतं भारतीय म्हणता येईल का?>
नाही
शब्दमर्यादेचं बंधन नाही.
Pages