उत्क्रांत

Submitted by अमृतवल्ली on 31 July, 2012 - 05:25

गोव्यातल्या कलंगुट बीचवर आले आणि मनात हाSS गोंधळ. इतक्या गर्दीच्या ठिकाणी एकदम कसे आलो आपण..काही कळेचना. सगळीकडे माणसेच माणसे..त्यांचे लहाने,मोठे घोळके, ट्राफिक, गाड्यांचे भोंगे, कचऱ्याचे ढीग, दुकानातली गर्दी, त्यात परत सोबतच्या मैत्रिणीचे “इथे वळ... पुढच्या चौकात राईट .. पार्किंग कडे बघ... अर्रर्र चुकला नं टर्न!!” गाडी जरा थांबली कि.. “ कित्याक जायचो? फोटो काढायचा का? पन्नास रुपयाला दोन... bedded plates चाहिये क्या?” एकदम लक्ष्यात येईना कुठे चाललो आपण? किती दिवस गेले मध्ये? ही सगळी माणसे कोण आहेत?

पाठीवर सॅक टाकून फोन switched off करून चोरला घाटात वेड्यासारख हिंडलो.चष्म्यावरच धुकं आणि पावसाच पाणी पुसून वाटा धुंडाळल्या. जगाचा उगम शोधावा तसा धबधब्याचा उगम शोधात प्रवाहाच्या कडेकडेने हिंडलो मिठाच्या पुड्या घेऊन जळवांच्या प्रदेशात! खोलीत येणारे ढग, हाकेवर असणारे धबधबे .. सगळच बुम्बाट!!

चोरला घाटाच्या शांत,अथांग जंगलातून गोव्यात आल्यावर भांबावल्यासारख झाल.वाटल, असे आवाज, वास आणि रंग जंगलात पण होते कि , पण आताचे हे सगळे आवाजाचे inputs process करायला इतका वेळ का लागत आहे? आवाज कानात झिरपताना तो कानाच्या पाळ्यातून हळूहळू झिरपून मग मेंदूकडे येत होता. असा signal process होताना बघून मजा वाटत होती. प्रत्येक ठिकाणी breakpoint लावून debug केल्यासारखा....’Debug केल्यासारखा ..’ माझ मलाच हसू आल. कानाच्या या पाळीपासून त्या पाळीपर्यंत पसरलेलं ते येड हसू बघून मैत्रिणीने कपाळावर हात मारला.मग मी पण मोठ्या शहाणपणे विचारलं.. “कोण वार आज?” माझ्याकडे बघत तिने एक उसासा टाकला.. “काय झालं हिला/ या येड्याला बरोबर न्यायच/ parking कुठे करायचं/ होटेल चा पत्ता हरवला का हिने?” असे असंख्य भाव तिच्या चेहऱ्यावर दाटले. माझ्याकडे दुर्लक्ष्य करून मला शेजारच्या सीट वर ढकलून तिने गाडीचा ताबा घेतला. मग मी गाडीत पडल्यापडल्या debugging आणि processing थांबवून निवांतपणे नुसत ओथंबणाऱ्या गर्दीकडे आणि पडणाऱ्या पावसाकडे पाहत राहिले. वाटल कि, काहीतरी कुठेतरी खोल आत झिरपाव अस काही उरलच नाही....

एक जाणवत होत, इथे आल्यावर बोथट झालेले सगळे सेन्सेस जंगलात मात्र तीव्र होते. स्वतःलाच नकळत आसमंताच्या हालचाली आपण कश्या टिपत होतो? इथलीच असल्यासारखे किती सहजपणे वावरत होतो. लहानपणी शिकलेला विज्ञानामधला biological pyramid ( अन्न- साखळीतले घटक ) अगदी डोळ्यासमोर होता. असंख्य झाडे, त्यांच्यावर चढलेल्या वेली,गवत, त्यांच्या मुळाशी अगणित कृमी कीटक, त्यावर जगणारे बेडूक, सुरुवंट, त्यांना खाणारे पक्षी, साप.. अशी लांबच लांब साखळी.. त्याच साखळीचा भाग झाल्यासारखा वाटत होत.. लहान परीघातला का असेना पण basic instict वरच जगण.. कुठल्याही आधाराच्या काठी शिवाय..आपापल्या अस्तित्वाचा संघर्ष.. म्हणून तर जळू पायावर चढली तरी चिडचिड नव्हती.. आणि तिच्यावर मीठ सोडताना अपराधीपणाची भावना नव्हती..

आता मात्र ही गर्दी,दुकाने, हॉटेल,समुद्र,किनारे सगळच गलिच्छ वाटायला लागल.रस्त्यावरचे कळपाने फिरणारे घोळके आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा ‘Party Hard’ चा भाव बघून मळमळायला लागलं... एकदम उठून कुठे आलो आपण... गरम शॉवर खाली उभारल्यावर वाटल ..अनेक जीवांची सांगड घालणारी ती मगाशीची साखळीच अदृश्य झाली आहे. इतक सगळ एकमेकात गुंतल असताना ही साखळी तुटलीच कशी? कुठून सुरु झाल हे सगळ? जेव्हा इथल्या स्थानिकांनी पहिल्यांदा वस्ती केली तेव्हा की नंतरच्या चालुक्य, सातवाहनाच्या आणि मुघलांच्या सत्ता संघर्षात? खर तर पोर्तुगीझ पहिल्यांदा किनाऱ्यावर आले असतील तिथेच थांबवायला हव होत का त्यांना? तिथून सगळी ही नवी संस्कृती सुरु झाली..

Apocalypto नावाचा एक चित्रपट आहे. माया जमातीतल्या एका माणसाचा संघर्ष. या चित्रपटाचा शेवटचा प्रसंग.. जीवावर उठलेल्या अनेक प्रसंगातून निसटत शत्रूची माणसे पाठीवर घेत रानावारयातून पळत शेवटी थकून किनाऱ्यावर येतो , पाठलाग करणारी इतर माणसेही तिथे येतात आणि आता अखेरच्या लढाईला सुरुवात होणार तेवढ्या दूर समुद्रातून प्रचंड जहाज येताना दिसत..धर्माची पताका घेऊन त्यांच्या खंडावर वसाहत करण्यासाठी सज्ज असलेल.. आता चित्रपटाकडे बघण्याचा आपला सगळा दृष्टीकोनच बदलतो.. इतका वेळ त्या जमातींच्या चालीरीती, त्या माणसावरची संकट, दगडी हत्यारे, सूर्य ग्रहणाचा उपयोग करून सत्ता राखणारा जमातीचा राजा, नरबळीची प्रथा , रौद्र निसर्ग , दलदलीतला पाठलाग... आणि आता.. वसाहती करण्यासाठी तयार असलेली एक वेगळीच, अधिक उत्क्रांत, अधिक प्रगत जमात..आता त्या माणसाच्या संघर्षाला काही अर्थ उरत नाही .. आता सुरु होईल त्या आदिवासी संस्कृतीचा अस्तित्वासाठीचा संघर्ष....

तसच इथल्या लोकांचा आणि पर्यायान आपल झालं का? काय घडल असत म्हणजे ‘चांगल झाल’ असा वाटल असत....

प्रगत होत जाणाऱ्या माणसाच्या जमातीने नेमक कुठे थांबायला हव होत? खूप विचार करूनही या प्रश्नच उत्तर मिळेना. शेवटी शॉवर बंद करून बाहेर आले. याचा नीट , मुद्देसूद विचार करावा म्हणून अथ पासून इति पर्यंत मैत्रिणीला सांगितलं.माझ सगळ नीट ऐकून घेऊन थोड्यावेळ माझ्याकडे पाहत, मान हलवत ती म्हणाली, “च्च्क .. बहुतेक भूक लागलीये तुला..”

माझा एवढा गहन विचार चाललेला आहे आणि हिला त्याचं काहीच नाही. तोंडात आलेल काहीतरी फटकन बोलणार तेवढ्यात तिला अन् मला एकमेकांकडे बघून हसू फुटलं.. खरच होत कि ते. म्हणाली..”संस्कृती आणि पर्यायाने येणार तीच अध:पतन या नंतरच्या गप्पा..त्याच्या आधी जे हजर आहेत त्यांच्या गरजा महत्वाच्या... या घडीला भूक आणि झोप ... कुठल्याही जाती जमातीच्या किंवा काळाच्या बंधनात न अडकलेले तुझे basic insticts ..”

खरय तुझ म्हणत रीपरीपणाऱ्या पावसात हॉटेलचा रस्ता धरला. तेही तिनेच ठरवलेल होत.. infenteria कि काय.. लहानसच पण मस्त..गोवन पद्धतीच. तिथल्या बेकारीतल्या घमघमाटाने प्रचंड भूक लागल्याची जाणीव झाली.पण अजून मैत्रिणीच्या भाषेत मी अजून माणसाळलेले नव्हते. वेटरच्या चेहऱ्यावरून आणि मेनू कार्दातल्या अक्षरावरून नुसतीच नजर फिरवत होते पण अजून अर्थबोध होत नव्हता. सगळ समजून उमजूनही मी परत तिच्याच भाषेत ‘मर्त्य’ जगात यायला तयार नव्हते.

शेवटी तिनेच ऑडर केलेल ‘काहीतरी मस्त’ गपागप खाल्ल. पोटात गेल्यावर जरा तरतरी आली. आजूबाजूला पाहिलं तर बरीचशी टेबल भरली होती.. सकाळ पासून पहिल्यांदाच इतकी माणसे आजूबाजूला असूनही मी comfortable होते... उन्ह तर केव्हाच उतरणीला आली होती.आता ती अगदी तिरपी होऊन कुठेतरी अंधारात नाहीशी झाल्यासारखी वाटत होती. दूर दिसणारी घरे, माड पोफळीची झाडे , लोकांच्या झुंडी बाहेरच्या जांभळ्या –काळ्या रंगात केव्हाच ओघळून गेले होती. infenteria चा वरचा मजला मात्र क्षणात पिवळ्या – पांढऱ्या प्रकाशात उठावदार दिसत होता. जुन्या काळातील युरोपीय चित्रात असतो तसा पिवळा सोनेरी रंग खांबावरून, टेबलावरून, काचेच्या चषकावरून, काट्या-चमाच्यावरून परावर्तीत होवून सगळीकडे पसरला होता.. आणि .. आणि माझ्यासमोरच चित्र एकदम रंगतदार झाल...आता तिथल्या प्रत्येक व्यक्ती आणि त्यांच्या हालचाली ठळक झाल्या.. इतका वेळ झुंडीच्या भाग असणाऱ्या प्रत्येकाला जणू चेहरा मिळाला होता.मग हळूहळू या व्यक्तींच्या देहबोली आणि संवाद लक्षात यायला लागले.. टेबलाटेबलावरचे विषय, गप्पा, हसण्याचे आवाज, वेटर्सची धावपळ, मधूनच चीअर्स चा होणारा चीत्कार.. त्यापाठोपाठ ग्लासांची आणि काट्या-चमाच्याची मंद किणकिण, कुठे तावातावात चाललेली चर्चा, कुठे कानाताली कुजबुज, कुठे उन्मळून मित्राला भेटणं, कुणालातरी दिलेली टाळी, हसण्याचे तर शंभर तरी प्रकार आणि दूर कोपरयात रिचर्ड नामक एकशिड्या गायकाने बीटल्सच्या गाण्यावर धरलेला ताल..

आणि एकदम मला लख्खकन कळल, basic instict च्या गोष्टी करताना “संवादाची गरज” हे आपण मनुष्यप्राण्याच्या मुलभूत गरजेत धरली नाही की.. ह्याच गरजेतून हावभाव, भाषा, लिपी आली.हीच गरज जरा विस्तारली कि मग कुटुंबाची भावना, टोळ्या, समाज, वसाहती, गाव, शहरे, देश, प्रदेश, धर्म, संप्रदाय..’आपुल्या जातीचे भेटावे कोणीही’या अन्वायाने आलेली ओढ आणि तेढ ही...

तेवढ्यात रिचर्डच्या कुठल्यातरी गाण्याला एका खूप मोठ्या ग्रुप कडून वन्स मोर मिळाला. १५-२० जणांच्या त्या ग्रुप मध्ये त्या गाण्याने खूप धमाल उडवली होती. खूप हसून आणि त्यांच्यातल्याच एकाला चिडवून टेबलाची बाके वाजवून त्यांनी पुन्हा एकदा वन्स मोर चा गजर केला. मान तुकवून रिचर्डने पुन्हा त्याच गाण्याच्या चार ओळी गायल्या. शब्द इंग्रजी पण चाल मात्र कोकणी अंगाने जाणारी...कोकणी आणि पोर्तुगीज संस्कृतीचा सुरेख मिलाफ.त्या गाण्याने मला सकाळपासून पाहिलेल्या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि पापुद्रे निघावे तसे आताच्या गोव्यावरची पांघरुणे निघाली...बाहेरून आलेली ,थापलेली किल्मिष गळाली. आता समोर आला तो मिलाफ..गोवन धाटणीची घरे, चर्च, तिथल्या घंटा, मराठीचा कोकणी हेल, ख्रिचन नावे, येशूच्या मूर्तीला तुळशीची माळ (?) आणि सगळ्यात सुंदर ,थोडीशी अगम्य वाटणारी इथली बोली भाषा..

दुष्काळ, पूर, व्यापार, परचक्र कुठल्याका कारणाने स्थलांतरे झाली, नव्या वस्त्या झाल्या तिथेही हीच संवादाची हातोटी कमी आली असेल का...

शेवटी दूर देशातून आलेल्यांचे पाय ही इथल्या मातीचे झाले तर...

कुठे थांबायला हव हा मुळातच माझा प्रश्न चुकीचा आहे का? उत्क्रांतीचा अखंड चाललेला प्रवाहच मुळी स्वयंभू. त्यातला कण अन् कण रसरसून जगणारा .. या प्रवाहातले असंख्य स्तर , त्यांचे एकमेकातले वळसे आणि पक्क्या झालेल्या रेशीमगाठी ..याच प्रवाहावराच्या अवचित वळणावरची मी. जे प्रवाहात आहे ते माझ्यात येणारच... थोड जुन.. बरचस नव...
माझ कोड माझ्यापुरता का होईना सुटल होत..

तेवढ्यात रिचर्डने बीटलच ‘imagine’ सुरु केल.. .. Imagine world without boundires...
पण निदान आता पुरती तरी मला ही एकमेकांपासून थोडी अलिप्त, थोडी गुंतलेली मनोहर गुंफणच छान वाटत होती...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

फारच सुरेख लिहिलं आहे. अगदी आतून.
फार आवडलं.
असं काही वाचलं की आत कुठे तरी काही तरी सुचल्यासारखं/स्फुरल्यासारखं वाटतं, पण त्याक्षणी तरी ते निद्रिस्त ज्वालामुखीसारखं राहतं. आणि जेव्हा केव्हा 'आता लिहिल्याशिवाय चैन मिळणार नाही' इतकं अनिवार होतं तेव्हा आधी असं काही वाचताना सुचलेलं/स्फुरलेलं सगळं एकवटून बाहेर पडतं. नक्की कळत नाही त्याचा उगम पण जाणवत असतं की 'हे माझं नाही, अनेकांच्या विचारांचं मिळून झालेलं आहे.' आणि एकदा का 'माझं नाही' ही जाणीव पक्की झाली की जे उतरतं ते जो जो वाचेल त्याला त्याला आपलंच आहे असं वाटेल इतकं नितळ, सुरेख असतं.
असो, हे अति-अवांतर आवरतो.
लिहीत रहा, शुभेच्छा!

नक्की कळत नाही त्याचा उगम पण जाणवत असतं की 'हे माझं नाही, अनेकांच्या विचारांचं मिळून झालेलं आहे.' आणि एकदा का 'माझं नाही' ही जाणीव पक्की झाली की जे उतरतं ते जो जो वाचेल त्याला त्याला आपलंच आहे असं वाटेल इतकं नितळ, सुरेख असतं. >>>>> +१००

मनमोकळं लिखाण अतिशय भावलं...

वा ! सुरेख! अगदी आतुन आलेलं. फार खरं. फार आवडलं.
>काय घडल असत म्हणजे ‘चांगल झाल’ असा वाटल असत.... < Happy
शेवटच्या ओळी खुप भावल्या.
लिहा, अजून खुप लिहा Happy