पापण्यांना सोसवेना रात्रपाळी !

Submitted by सुप्रिया जाधव. on 26 July, 2012 - 10:48

आठवांनो जा निजा, अन या सकाळी...
पापण्यांना सोसवेना रात्रपाळी !

सोबतीने तू तुझ्या घेवून जा ना...
आठवे छळतात ही तीन्ही-त्रिकाळी !

कोरडे ठेवू कसे डोळे असे मी..
रात्र का सरते सख्याविण पावसाळी ?

शोधण्यामध्येच सारा जन्म जातो...
चार दिन नात्यातली टिकते नव्हाळी

'वाकला तो संपला' नसते असेही..
वादळाशी झुंजण्या झुकते डहाळी !

दैव लिहिते काय कोणाच्या कपाळी..
वाहतो तो ओंडका, तगती लव्हाळी !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रियातै मस्त गझल
जबरदस्त मतला ..जान कुर्बान!!
'पावसाळी'सुधा खूप आवडला!!..'डहाळी'ही मस्त ......

शेवटचे दोन शेर एकमेकास पर्यायी म्हणावेत की "मक्ता-ए -सानी "हे ठरवू शकलो नाहीये अजून !!:)

२, ३ आणि ४ हे शेर आवडले, अभिव्यक्ती छानच

टायटल ओळही आवडली

तिन्ही सहसा तीन मात्रा होतात. (नाहीतर मग तिन्न्ही असे लिहावे लागेल)

आठवांनो जा निजा, अन या सकाळी...
पापण्यांना सोसवेना रात्रपाळी !

सोबतीने तू तुझ्या घेवून जा ना...
आठवे छळतात ही तिन्न्ही-त्रिकाळी !

कोरडे ठेवू कसे डोळे असे मी..
रात्र का सरते सख्याविण पावसाळी ?

शोधण्यासाठी पुरा हा जन्म सरतो...
चार दिन नात्यातली टिकते नव्हाळी

दैव लिहिते काय कोणाच्या कपाळी...
वाहतो तो ओंडका, तगते लव्हाळी !
>>
वा वा!
सगळेच शेर आवडले
हे जास्तच!
मस्त मस्त मस्त

<<'वाकला तो संपला' नसते असेही..
वादळाशी झुंजण्या झुकते डहाळी !

दैव लिहिते काय कोणाच्या कपाळी...
वाहतो तो ओंडका, तगते लव्हाळी !<<

__/\__ अफाट शेर आहेत हे. Happy

सुप्रियाताई दंडवत. ही गझल माझ्या आवडत्या दहात.

दैव लिहिते काय कोणाच्या कपाळी...
वाहतो तो ओंडका, तगते लव्हाळी !>> सुप्रिया, कडक गझल!

मतला, सहज म्हणूनच सुंदर...

डहाळी, अ प्र ति म!

खूप आवडली गझल!

"'वाकला तो संपला' नसते असेही..
वादळाशी झुंजण्या झुकते डहाळी ! "

निवडक दहात नोंद! Happy

खुप खुप मनःपुर्वक आभार सगळ्यांचे

बेफीजी धन्यवाद! सुधारणा केलीय ,

गणेश, आर्या विशेष आभार!

-सुप्रिया.

मी दिलेले पर्याय जास्त योग्य असूनही आपणास आवडले नाहीत बहुधा ...किंबहुना पर्याय मी द्यावेत हे आपणास आवडले नसावे

कृपया माझ्याकडून झालेल्या या चुकीबद्दल /अपराधाबद्दल मला क्षमा करावी ही नम्र विनंती

______________

तिन्ही हा शब्द तिन् + ही असा वाचल्यास/उच्चारल्यास मात्रा चार होतात
ती + न्ही असा लिहून मग ती+ न्ही असाच वाचल्यास/उच्चारल्यासदेखील मात्रा चारच होतात.

तिन्ही हा शब्द ति + न्ही असा वाचत नाहीत /उच्चारत नाहीत
ति + न्न्ही असा तर मुळीच लिहीत / वाचत नाहीत

असो
पुनश्च क्षमस्व

आपला मानल्यास आपला नाहीतर परका
आपला नम्र
वैवकु !!
:)...........(:राग:)
_________________

असो सुप्रियातै राखीपौर्णिमा जवळ आलीये
आपणास माझ्याकडून हार्दीक शुभेछा!!

वैवकु,

धन्यवाद!

सल्ला योग्यच आहे पण विचार करतेय

बाकी सल्ल्यापेक्षा अवांतरावर भर कमी द्या! (असा एक आपला माझा सल्ला) Happy

-सुप्रिया

शोधण्यासाठी पुरा हा जन्म सरतो...
चार दिन नात्यातली टिकते नव्हाळी

'वाकला तो संपला' नसते असेही..
वादळाशी झुंजण्या झुकते डहाळी !

दैव लिहिते काय कोणाच्या कपाळी...
वाहतो तो ओंडका, तगते लव्हाळी !>>>>>>>>>>>>>>सुप्रिया खूऊऊऊऊऊऊऊप छान लिहीतेस तू. फार आवडली. माझ्याही आवडत्या दहात.:स्मित:

मतला वगळता ठिकठाक........

पापण्यांचा संबंध असल्याने मतल्यात आसवे चपखल अणि थेट भिडले असते. कारण पुढच्या शेरात
'आठवे' आहेच.

'तिन्न्ही' लिहण्याचे कारणच नाही.

तिन्ही लोक आनंदाने धुंद होऊ दे.... असाच उच्चार आणि लेखन प्रमाण आहे... पर्याय शोधावा लागेल.

मक्त्यातल्या लव्हाळीचे क्रियापदही तपासावे.

एक लव्हाळे / लव्हाळा...अनेक लव्हाळी

अभिव्यक्ती छानच>>> +१

...........................................शाम

शामराव,

१- प्रथम मलाही आसवेच सुचला होता परंतु आठवे जास्त समर्पक वाटला.

२-'तिन्ही' बाबत ' तीन्ही'च घेते झाल! Happy

३-<<<<मक्त्यातल्या लव्हाळीचे क्रियापदही तपासावे.

एक लव्हाळे / लव्हाळा...अनेक लव्हाळी>>>

तगते लव्हाळी...तगती केलय...:-)

( अवांतर- हा शेर शेवटचा खचित आहे पण याला मक्त्याचाशेर अथवा मक्ता म्हणता येणार नाही )

चु.भू.दे.घे.

-सुप्रिया.

'लव्हाळी' बाबत शामजीन्शी सहमत तै
मीही एकदा एका विडम्बनात अशाच स्वरूपात हा शब्द वापरला होता ...........

जिंकतो आम्ही! 'लव्हाळी'__ रोवुनी पाळीमुळी__
__विठ्ठलाची वीट तळि ; ये वादळा रेंगळ इथे !!!!

इथे 'लव्हाळे'चे अनेकवचन 'लव्हाळी' असेच आले आहे माझ्या लेखणीतुन...अपसूकच बरका..मी मुद्दाम तसे लिहिले नाही आहे

लव्हाळे हा नपुसकलिन्गी शब्द असावा_________ ते लव्हाळे अशा स्वरूपात तो आमच्याइकडे वापारला जातो
_______________

इनिन्ग्स हा शब्द वाटतो अनेकवचनी ..आहे एकवचनी
एका डावात १० फलंदाज खेळणार मग प्रत्येकाची एक या नात्याने १० इनिन्ग्स होतात नाही का
प्रत्येक फलंदाजाच्या वैयक्तिक खेळीस इनिंग म्हणतात की इनिन्ग्स माहीत नाही
पण इनिन्ग्स असा शब्द रूढ असल्याने तिलाही इनिन्ग्स असे म्हणत असावेत

तसेच काहीसे लव्हाळीचे झाले असावे (दिवाळीपेक्षा वेगळे)

'वाकला तो संपला' नसते असेही..
वादळाशी झुंजण्या झुकते डहाळी !

दैव लिहिते काय कोणाच्या कपाळी..
वाहतो तो ओंडका, तगती लव्हाळी ! ... हे दोनच पण खुप आवडले. Happy

दैव लिहिते काय कोणाच्या कपाळी..
वाहतो तो ओंडका, तगती लव्हाळी !

या शेरात ओंडका आणि लव्हाळी यांची तुलना फारशी पटली नाही. ओंडक्याला एका जागी थांबणे शक्य नसते कारण तो मूळ झाडापासून विभक्त झाला आहे आणि निर्जीव आहे, उलट लव्हाळी सजीव आहेत आणि आपली मुळे रोवून एका जागी राहू शकतात. ओंडक्याऐवजी एखाद्या वृक्षाशी तुलना जास्त योग्य झाली असती असे माझे मत.
कृपया राग नसावा..!
बाकी गझल चांगली आहे.
शेवटचे दोन शेरांबाबत वैभवशी सहमत..!

Pages