लंडन ऑलिम्पिक्स २०१२ - मुलांसाठी माहिती आणि कलाकुसर

Submitted by रुणुझुणू on 22 July, 2012 - 07:45

"तू एक दिवस ऑलिम्पिक्सबद्दल चर्चा करशील" हे जर कधीकाळी कुणी मला सांगितलं असतं तर मी असं सांगणार्‍याची मनसोक्त चेष्टा केली असती.
कारण माझी खेळातील गती म्हणजे विषामृत, लगोरी, लंगडी, शिवणापाणी, लपाछपी आणि कबड्डी....तेही शालेय जीवनापुरतंच.

काही गोष्टी स्वतःला जमत नसल्या तरी कायम खुणावत राहतात. बीजे पडलेली असतात, अंकुरत मात्र नाहीत.
तसंच ऑलिम्पिक सामन्यांबद्दल झालंय. ह्यातल्या खेळांमध्ये गती नसल्याने चर्चेत किंवा बातम्या वाचण्यातही कधी फार रस घेता आला नाही. पण ह्या गोष्टीचं वैषम्य मात्र कायमच वाटत राहिलं.

यंदाच्या ऑलिम्पिक्सबद्दल चर्चा करणारा धागा मायबोलीवर आधीच आहे.
तिथली चर्चा आवडणार्‍या पण कळण्याइतकं ज्ञान नसलेल्या जीवांपैकी मी एक.
कधीनाकधी लेकाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी माहिती मिळवावी लागणार आहे. शिवाय खेळाबाबतीत त्याने आमच्याइतकं अडाणी राहू नये, अशीही इच्छा आहे.

मला जेवढी झेपली तेवढी माहिती इथे सोप्पी करून लिहिली आहे. त्यात गंभीर चुका असण्याची घनघोर शक्यता आहे. Blush
जाणकारांना कळकळीची विनंती आहे की हक्काने चुका दाखवून द्याव्या आणि जमेल त्या पद्धतीने आमचे अज्ञान दूर करण्यास हातभार लावावा Happy
मुलांना (आणि माझ्यासारख्या अज्ञ जीवांना) सांगण्यासाठी लिहिलं असल्याने माहिती अगदीच वरवरची आहे.
पण ह्यातून आणखी माहितीचा साठा वाढत जाईल अशी अपेक्षा.

**********************************************************************************************************************

यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा लंडन येथे भरवल्या जाणार आहेत.
उद्घाटन सोहळा २७ जुलै २०१२ आणि समारोप १२ ऑगस्ट २०१२ ह्यादिवशी असणार आहे.

ह्या ऑलिम्पिक्सचे ध्येयवाक्य (Motto)
: Inspire the generation !

(ऑलिम्पिक्सचे नेहमीचे ध्येयवाक्य (Motto) : Citius, Altius, Fortius म्हणजेच Swifter, Higher, Stronger)

ऑलिम्पिक्सचा झेंडा :

olympic flag.jpg

ह्या झेंड्यामध्ये पांढर्‍या पार्श्वभूमीवर निळा, काळा, लाल, पिवळा आणि हिरवा ह्या पाच रंगाच्या वर्तुळाकार कड्या दाखवलेल्या असतात.
हे रंग आशिया, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप ह्या पाच खंडांचे प्रतिक आहेत.
स्पर्धांमध्ये सामील होणार्‍या प्रत्येक देशाच्या झेंड्यामध्ये ह्या सहा रंगांपैकी (पाच कड्या आणि पांढरी पार्श्वभूमी)
एका तरी रंगाचा समावेश आहे.

ऑलिम्पिक्सची ज्योत :

olympic-torch-300x300.jpg

उद्घाटन सोहळ्याच्या कित्येक महिने आधी ग्रीस देशातील ऑलिम्पिया ह्या ठिकाणी पॅराबोलिक आरशावर सूर्यकिरण पाडून ज्योत प्रज्वलित केली जाते.
संपूर्ण ग्रीस देशभर ही ज्योत फिरवली जाते.
मग ही ज्योत ज्या देशात स्पर्धा भरणार आहेत तिथे (बर्‍याचदा) विमानाने आणली जाते.
तिथे ही ज्योत वेगवेगळ्या पद्धतीने (चालत, पळत, स्कुबा डायविंग, उंट, घोडे, सायकल) देशभर फिरवली जाते.
स्पर्धांच्या उद्घाटनाच्या दिवशी ही ज्योत मैदानावर आणली जाते आणि मग ह्या ज्योतीने मैदानात असलेल्या Cauldron मधील ज्योत प्रज्वलित केली जाते.
मैदानातील ज्योत स्पर्धांच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रज्वलित ठेवली जाते.
(ऐनवेळी ही ज्योत विझलीच तर ती पुन्हा प्रज्वलित करता यावी ह्यासाठी ग्रीस देशातून आणखी काही ज्योती बॅक-अप म्हणून आणून ठेवलेल्या असतात.)

ऑलिम्पिक्सची पदके :

प्रथम विजेत्याला सुवर्ण पदक, द्वितीय विजेत्याला रौप्य पदक आणि तृतीय विजेत्याला कांस्य पदक दिले जाते.
प्राचीन ऑलिम्पिक्समध्ये विजेत्याला ऑलिव्हच्या पानांनी बनवलेला मुकुट प्रदान केला जात असे.

olympic medals.jpgolive wreath.jpgऑलिम्पिक्सचे मॅस्कॉटस :

यंदाच्या ऑलिम्पिक्सचा मॅस्कॉट आहे - 'वेनलॉक - Wenlock' आणि पॅरालिम्पिक्सचा मॅस्कॉट आहे - 'मॅण्डेविल - Mandeville'

(पॅरालिम्पिक्स म्हणजे शारीरिक व्यंग असणार्‍या खेळाडूंसाठी भरवल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धा. ज्या देशात ऑलिम्पिक्स होतात तिथेच पॅरालिम्पिक्सच्या स्पर्धाही भरवल्या जातात.
यंदाच्या स्पर्धा लंडनमध्येच २९ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०१२ ह्या काळात होणार आहेत)

वेनलॉक आणि मॅण्डेविलबद्दल जरा विस्तारात :

त्यांची जन्मकथा -
ऑलिम्पिक्ससाठी बोल्टन येथे स्टेडियम बांधण्याचे काम चालू असते. शेवटच्या खांबासाठी पोलाद वितळवत असताना त्याचे दोन थेंब खाली सांडतात.
खाली पडलेले थेंब थंड झाल्यावर जॉर्ज नावाचा माणूस ते थेंब उचलतो. तो जॉर्जच्या सेवानिवृत्तीचा दिवस असतो.
घरी आल्यावर जॉर्जची पत्नी आणि नातवंड केक वगैरे देऊन जॉर्जची सेवानिवृत्ती साजरी करतात.
सगळे जण झोपी गेल्यावर नातवंडांना भेट देण्यासाठी जॉर्ज त्या पोलादाच्या थेंबांपासून दोन बाहुले बनवतो.
सकाळ झाल्यावर बाहुले पाहून आनंदी झालेली मुले त्या बाहुल्यांना खिडकीत ठेवतात. त्याचवेळी खिडकीतून इंद्रधनुष्याचे रंग आत डोकावून बाहुल्यांवर पडतात आणि ते दोन बाहुले रंगीबेरंगी आणि सजीव होतात....त्यांचंच नाव वेनलॉक आणि मॅण्डेविल.

वेनलॉक आणि मॅण्डेविल मुलांसोबत रमतात, वेगवेगळे खेळ शिकतात.....मग अचानक एक दिवस इंद्रधनुष्य परत येतं, त्यावर बसून वेनलॉक आणि मॅण्डेविल त्यांच्या निर्धारित कामासाठी निघतात....जगभरात फिरून वेगवेगळ्या खेळाडूंना उत्साहित करायला, ऑलिम्पिक्सची बातमी पोहोचवायला....
उद्घाटनाच्या दिवशी वेनलॉक आणि मॅण्डेविल पुन्हा एकदा लंडनमध्ये जल्लोषात दाखल होणार....जगभरातील खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांसोबत !

Wenlock & Mandville.jpgरंग : वेनलॉक - केशरी-पिवळा, मॅण्डेविल - निळा

डोक्याचा आकार : वेनलॉक - स्पर्धेत जिंकल्या जाणार्‍या तीन पदकांचे प्रतीक (काहींच्या मते स्टेडियममधील तीन जागांचे प्रतीक),
मॅण्डेविल - हेल्मेटच्या आकाराच्या डोक्यावर पॅरालिम्पिक्सच्या तीन रंगांचे पट्टे आहेत.

डोक्यावरील पिवळा दिवा : लंडनच्या टॅक्सीवर असतो तसा पिवळा दिवा वेनलॉक आणि मॅण्डेविलच्या डोक्यावर आहे.

एक डोळा : दोघांच्या चेहर्‍यावरील एक डोळा हा कॅमेर्‍याचे काम करतो. भेटलेले लोक, पाहिलेले खेळ सगळं ह्या कॅमेर्‍याच्या मदतीने हे दोघे टिपून ठेवतात.

हातातील दागिने : वेनलॉकच्या उजव्या हातात निळा आणि पिवळा , तर डाव्या हातात लाल, हिरवा आणि काळा ह्या रंगाचे फ्रेंडशिप कडे आहेत (ऑलिम्पिक्सच्या कड्यांचे रंग)
मॅण्डेविलच्या उजव्या हातात गुलाबी रंगाचे अचूक वेळ मोजणारं घड्याळ आहे (Personal best timer)

यंदाच्या ऑलिम्पिक्समध्ये समावेश असलेले खेळ :

१. जलविभाग : Aquatics

- Diving
- Swimming
- Synchronized Swimming
- Water polo

२. धनुर्विद्या : Archery
३. अ‍ॅथलेटिक्स : Athletics
४. बॅडमिंटन : Badminton
५. बास्केटबॉल : Basketball
६. बॉक्सिंग :Boxing
७. Canoe kayak

- Slalom
- Sprint

८. सायकलिंग :Cycling

- Cycling BMX
- Cycling Road
- Cycling Track
- Mountain Bike

९. घोडेस्वारी : Equestrian

- Dressage
- Eventing
- Jumping

१०. Fencing
११. फुटबॉल : Football
१२. गोल्फ : Golf
१३. जिम्नॅस्टिक्स : Gymnastics

- Artistic Gymnastics
- Rhythmic Gymnastics
- Trampoline

१४. हँडबॉल : Handball
१५. हॉकी : Hockey
१६. ज्युडो : Judo
१७. मॉडर्न पेन्टॅथलॉन ?? : Modern pentathlon
१८. नौकानयन : Rowing
१९. रग्बी : Rugby
२०. Sailing
२१. नेमबाजी : Shooting
२२. टेबल टेनिस : Table tennis
२३. तायक्वोंदो : Taekwondo
२४. टेनिस : Tennis
२५. ट्रायॅथलॉन : Triathlon
२६. व्हॉलीबॉल : Volleyball

- Beach volleyball
- Volleyball

२७. वजन उचलणे : Weightlifting
२८. कुस्ती : Wrestling

- Greco-Roman
- Freestyle

********************************************************************************************************************
- सर्व चित्रे जालावरून साभार.
- वर यादी केलेल्या अनेक खेळांची मराठी नावे आणि अर्थ माहीत नाही. ज्यांना माहीत आहे त्यांनी ती सांगावी अशी विनंती.
- ह्या साइटवर वेनलॉक आणि मॅण्डेविलची गोष्ट, खेळ वगैरे आहेत.

सध्या आमच्याकडे मुलाच्या कानावर हे शब्द अधूनमधून पडत राहतील अशा पद्धतीने फक्त चर्चा करत आहोत (त्यात आम्हा दोघांनाही अनेक नवीन गोष्टी कळत आहेत.)
हळुहळू त्याच्याकडून प्रश्नांना सुरूवात झाली की मग माहिती, गोष्टी सांगायच्या असा विचार आहे.
त्याला रूची वाटेल अशा पद्धतीने काही क्राफ्ट्स बनवायची योजनाही आहे.
त्यात ऑलिम्पिकचा झेंडा, ज्योत, ऑलिव्हचा मुकुट, पदके आणि मॅस्कॉटस बनवावे असं वाटतंय.
खेळाडूंची नावे आणि खेळ ह्याविषयी लगेच तो विचारेल किंवा आम्ही सांगू शकू की नाही ह्याचा अंदाज येत नाहीये.
पण सुरूवात तर करतोय.

तुमच्याकडे ह्यासंबंधित क्राफ्टसच्या काही कल्पना असतील तर इथे लिहाल का ?
तुम्ही किंवा तुमच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी बनवलेले क्राफ्टस, चित्रेसुद्धा आपण शेअर करू शकू.

उदा. - लाजोकडून ऑलिम्पिकच्या कड्यांचे आयसिंग असलेला केक, रचनाशिल्पकडून एखादी ओरिगामी वस्तू (झेंडयाच्या कड्या, मॅस्कॉटस वगैरे), जागूसारख्या निसर्गप्रेमींकडून रंगीत फुलांपासून बनवलेला झेंडा.

सगळ्यांच्याच छोट्यामोठ्या कल्पनांचे स्वागत Happy

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

धन्यावाद ! छान माहिती रुणू Happy

लाजोकडून ऑलिम्पिकच्या कड्यांचे आयसिंग असलेला केक<<< Uhoh बघते... प्रयत्न तर नक्की करेन Happy

रुणु, खुपच आवडला लेख! मलाही खेळात शुन्य गति आणि माहिती आहे. लेकीबरोबर या विषयावर बोलणे होणारच आहे त्यामुळे तुझा लेख अगदी वेळेवर आला! धन्यवाद.

प्लास्टिकच्या पाच रंगी बांगड्या घ्यायच्या.( आईकडे असतीलही) आणि त्या धाग्याने एका स्ट्रॉला बांधायच्या. मध्ये दोरा लावून हे मोबाइल भिंतीला टांगता येइल. दोर्‍याची उंची कमी जास्त करून पाच गोल एकमेकांत अडकले आहेत असा दृष्टिभ्रम करता येइल.

मुलांसाठी ऑलिंपिक पार्टी ठेवून त्यात ट्रिविया क्विझ करता येइल. शिवाय गेम्स इत्यादी.

आपल्या आव्डत्या गेमचे/ खेळाडूचे स्क्रॅप बुक, पोस्टर बनवायचे. फोटो बाबांचा पेपर वाचून झाला कि घेता येतील आई कापून देऊ शकेल. गेमसच्या दिवसांत प्रोजेक्ट पूर्ण होइल मग शाळेत देता येइल.

वेगवेगळ्या देशांचे ध्वज व राष्ट्र गीत अश्या जोड्या लावणे. रोज एक नवीन माहिती होइल. नेहमीचेच माहिती असलेले देश न घेता वेगळे अनवट घ्यावेत.

अरे वा!
लाजो, ओपनिंग सेरेमनी व्ह्यूविन्ग पार्टीसाठी मेनू येऊदे.

रुणुझुणू, तुम्ही मुलांबरोबर टीव्हीवर पहा. स्विमिन्ग्चे सगळे प्रकार, डायव्हिन्ग, जिम्नॅस्टिक्स, ट्रॅक अ‍ॅन्ड फील्ड इ. आणि सगळ्या प्रकारच्या शर्यती बघायला खेळायला काही कळत नसले तरी मजा येईल.

मामी, कल्पना छान आहेत. (पण कामे वाटून देऊ नका. Wink )

खेळ खेळणे आणि उत्तम खेळ, खेळाडू खेळताना पहाणे यासारखे दुसरे मनोरंजन नाही!

अरे वा रुणु. धन्यवाद.
वत्सला +१.
तरी बाबासोबत पाहणार आहे ती ऑलिंपिक्स. मी (उसना) उत्साह आणायचा प्रयत्न करते आहे. निदान ही चित्रं तरी काढुन घेऊ शकते.

लाजो, ओपनिंग सेरेमनी व्ह्यूविन्ग पार्टीसाठी मेनू येऊदे. >>
ये ब्बात ! लाजो, व्हर्च्युअल केक खाण्यासाठी आतुर आहोत. (आंखे मत घुमाइयें, आपके लिए ये बाएं हात का खेल है !)

लोला, तुमच्या टिप्ससाठी धन्यवाद.
(मला एकेरी हाक मारलेली आवडेल :))

मी (उसना) उत्साह आणायचा प्रयत्न करते आहे. >> रैना Happy
ऑलिम्पिक्सच्या प्रोजेक्टबद्दल मी त्याच्या शाळेतही बोलून बघणार आहे. इथे फूटबॉल सोडून कुठलाच खेळ फार लोकप्रिय नाही. त्यामुळे शिक्षकही ह्याबाबत आपल्याच जातकुळीतील असण्याची दाट शक्यता आहे. पण तरी प्रयत्न करून पाहते.

रुणू उत्तम धागा...

ऑलिम्पिक ज्योती विषयी... यंदाच्या वर्षी ती ज्योत फक्त इंग्लंड मध्येच फिरवली गेली ग्रीस मध्ये प्रज्वलित करुन पुढे इंग्लंडमध्ये फिरवली गेली..

नेहमी ती ज्योत सर्व सहभागी देशातील महत्त्वाच्या शहरात फिरवली जात असे... परंतू मागच्या वेळेस काही देशातील राजकिय अशांततेमुळे त्या देशात ज्योतीचा प्रवास त्रासदायक ठरल्यामुळे यंदा फक्त इंग्लंड मध्येच ज्योत फिरवण्यात आली...
ह्या व्यतिरिक्त कोणाकडे माहिती असल्यास ती सांगा...

वेगवेगळ्या खेळांसंदर्भातील मला माहिती असलेल्या गोष्टी इथे पोस्ट करत रहातो...

हँडबॉल म्हणजे दोन टीम बॉल हाताने टाकून गोल करतात... गोळाफेक आणि हँडबॉल पूर्णतः वेगळे आहेत.. गोळाफेक ट्रॅक&फिल्ड मधला खेळ आहे.. आणि हँडबॉल मैदानी खेळ आहे... त्यात एका खेळाडून कडून दुसर्‍याकडे बॉल टाकताना एक पाय स्थिर ठेऊनच बॉल टाकावा लागतो... बाकीचे डिटेल्स लवकरच टाकतो...

हिम्सकूल, शतशः धन्यवाद Happy
खेळांविषयी नक्की लिहा. आम्हा सगळ्यांना फायदा होईल.
ते गोळाफेकचं बदलते वर.

धन्यवाद रुणुझुणू, छान माहिती दिलीस.
अश्विनीमामी च्या कल्पना मस्तच आहेत विषेश करुन स्क्रपबुक ची आयडिया. त्याने मुलांचा वेळही जाईल आणि माहितीचे छान संकलनही होईल.
रचनाशिल्पकडून एखादी ओरिगामी वस्तू (झेंडयाच्या कड्या, मॅस्कॉटस वगैरे)>> बघते प्रयत्न करुन.

अरे वा. रुणुझुणु छान माहिती Happy काही माहिती नविनच समजली.
वत्सला +१
ऑलिंपिकच्या निमित्ते आमच्याकडे टिव्ही येणार या आठवड्यात.
अमा स्क्रॅपबुकची कल्पना आवडली. सध्या कागद कापायचे, फाडायचे आणि चिकटवायचे प्रचंड वेड आहेच.

मस्त उपक्रम. आमच्याकडे पुढल्या ऑलिंपिकला राबवता येतील.

मला स्वतःला जिम्नॅस्टिक्समधले प्रकार बघायला अतिशय आवडतं.

लाजो, ओपनिंग सेरेमनी व्ह्यूविन्ग पार्टीसाठी मेनू येऊदे. >>>> माझी अजून एक उपसूचना. हेल्दी मेनू येऊ देत. Happy

मस्त लेख.
मला, जलतरण प्रकारातले खेळ खुप आवडतात. सींक्रोनाइज्ड स्विमिंग तर अतिप्रिय. जिमनॅस्टीक्स मधले सर्वच प्रकार आवडतात. १९७६ सालचा नादीयाचा पर्फेक्ट १० चा थरार मी अनुभवला आहे. तिच्या आयूष्यावर आधारीत ४ भागाची एक अप्रतिम सिरियल पण दूरदर्शनवर दाखवली होती.

पण गेली बरीच वर्षे, घरी टिव्हीच ठेवत नसल्याने, मी या आनंदाला मुकतोय. यू ट्यूबवरच्या क्लीप्स बघूनच समाधान मानावे लागतेय.

तिच्या आयूष्यावर आधारीत ४ भागाची एक अप्रतिम सिरियल पण दूरदर्शनवर दाखवली होती. >>> हो, मला पाहिल्याची आठवते आहे Happy

उद्घाटन सोहळ्यासाठी आमची तयारी सुरू झाली बरं का.
वेनलॉक घरी पोहोचला सुद्धा.

Wenlock orange.jpg

पण मेटॅलिक ग्रे रंग कसा बनवायचा ते न कळल्याने आम्ही त्याला टिपिकल भगव्या रंगात रंगवून मोकळे झालो.
तो मेटलसारखा दिसत नाहीये म्हणून सृजनची कुरकुर चालू होतीच.
मग दुधाच्या टेट्रापॅकच्या आतील बाजूवर चित्र काढून पुन्हा एकदा वेनलॉकला रंगवलं.

Wenlock-Silver.jpg

वा! रुणूझुणू..........छान माहिती ! विशेषतः वेनलॉक आणि मॅन्डवेलची माहिती इन्टरेस्टिन्ग!
आणि अमा.............मस्त आयडियाज!

छानच.
आदित्यही लहान असताना दरवेळी ऑलिंपिक आणि एशियाडच्या मॅस्कॉटची चित्रं अगदी आवडीने काढून रंगवायचा.

आम्ही शाळेत असताना आमच्या चित्रकलेच्या सरांनी आम्हाला दररोज एक चित्र तरी काढायचंच असा दंडक घातला होता. तारखेनिशी काढलेली आठवडाभराची चित्रं ते दर गुरूवारच्या तासाला तपासायचे. माझ्यासारख्या चित्रकलेतल्या औरंगझेबापुढे मोठं प्रश्नचिन्ह, की रोज नवीन चित्र आणायचं कुठून? शेवटी माझ्या एका मैत्रिणीने शक्कल लढवली. त्याच वर्षी दिल्लीत एशियाड होणार होतं. अप्पू हत्तीची निरनिराळे खेळ खेळतानाची चित्रं सतत सगळीकडे दिसायची. मग आम्ही त्यातलंच एक-एक चित्र दररोज काढायचो. अप्पूनं तेव्हा आमची जवळपास ३ आठवड्यांची बेगमी केली होती. Lol

अप्पूनं तेव्हा आमची जवळपास ३ आठवड्यांची बेगमी केली होती. >> ललिता-प्रीति Lol

मँडेविल आणि रिन्ग्जसुद्धा झाल्या तयार. जरावेळाने फोटो टाकते.
आजच्या अजेंड्यावर ज्योत आणि जमलं तर मेडल्स.

Pages