“ पुणे ते पानिपत ” भाग ८ : १२ तासात ३ राज्यं आणि ३ किल्ले

Submitted by सारन्ग on 13 July, 2012 - 12:27

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449

“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884

“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939

“ पुणे ते पानिपत ” भाग ७ - http://www.maayboli.com/node/36194

शेवटी एकदाचा आम्ही ११२० ला ग्वाल्हेर किल्ला सोडला आणि बाईक आग्र्याच्या रस्त्याला लागली. अजून १२१ किमी अंतर कापायचं होतं.

परत एकदा आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमध्ये प्रवेश करताच धौलपूर नावाचा किल्ला लागणार होता. तो हि जाता जाता बघू या हेतूने परत एकदा आम्ही गाडी १०० ने दामटली. अमर आणि बन्याला वाटेत चुकामुक झाली तर थेट धौलपूर किल्ल्यावर भेटू म्हणून सांगितले. धौलपूर किल्ल्याचेच दुसरे नाव शेरगढ आहे. आग्रा महामार्गावरच किल्ला उजव्या हाताला पडतो.

रस्त्याचे काम चालु असल्यामुळे गाडी जरा वळसे घेत घेत आतमध्ये घुसली. ठीक १३०० वाजता आम्ही किल्ल्यात घुसलो. किल्ला अतिशय भग्नावस्थेत आहे. आतमध्ये घुसतानाचेच बुरुज जरा बऱ्या स्थितीत आहेत. किल्ल्याच्या इथे बाईक लावत असतानाच एक चाचा किल्ल्यात जात असताना दिसले. लगेच आम्ही दोघे त्यांच्या मागे मागे गेलो. चाचा आम्हाला सय्यद श्री काले खॉ यांच्या दर्ग्यामध्ये घेऊन गेले. आम्ही दोघांनी पण दर्ग्यावरती डोके टेकवले, चाचांनी दोघांना पण तिळाच्या वड्या दिल्या आणि किल्ल्यावर अजून २-३ मंदिरे आहेत तिकडे पण जाऊन या म्हणून सांगितले.

किल्ल्याचे प्रवेशद्वार :
8DSCN2962.JPGशेरगढची तटबंदी :
8DSCN2959.JPG8DSCN2967.JPG

किल्ल्यावर सगळीकडे बाभळीचे साम्राज्य आहे. नुकताच ग्वाल्हेरचा किल्ला बघून आलो असल्याने, स्वागतने किल्ल्याला पाहताच नाक मुरडले. आता त्याचही खरं आहे म्हणा बासुंदी-पुरी चापल्यावर कारल्याच्या भाजीला कोण तोंड लावेल? पण त्यात मी बरोबर असल्याने त्याला नाही पण म्हणवेना. माझ्यापर्यंत तो थोडासा आत आला पण सगळीकडे बाभळीची झाडे असल्याने आणि त्यात मी नेहमीची वाट सोडून आडवाटेने घुसत असल्याने त्याने साऱ्या, चल ना परत जाऊ, आपल्याला अजून आग्र्याचा किल्ला बघायचा आहे, इकड बघण्यासारखं तरी काही आहे का? अशी भुणभुण सुरु केली. मी घड्याळात बघितलं. स्वाग्या, मला फक्त ३० मि. दे, तू बाहेर त्या मंदिराच्या इथे थांब मी आलोच. स्वागतला मी अजीजीने म्हणालो. ठीक आहे, फक्त ३० मि. म्हणत स्वागत त्या बाभळीच्या जंगलातून बाहेर पडला आणि मी अजून आतमध्ये घुसलो. सगळीकडे बाभळीचीच झाडे होती. आत घुसता घुसता आणि किल्ल्याची पडझड झालेली तटबंदी बघता बघता मी आत मध्ये कुठपर्यंत घुसलो माझे मलाच लक्षात आले नाही. आता बाहेर जायला रस्ता पण सापडेना.

छायाचित्रण यंत्राने मेमरी फुलचा मेसेज दाखवायला सकाळपासूनच सुरवात केली होती. स्वागतने कितीतरी वेळा बजावून सुद्धा मी दुसरं मेमरी कार्ड बरोबर ठेवलं नव्हतं. काल रात्री दिपकला मेमरी कार्ड देऊन सगळे फोटो नीलमच्या laptop वरून pen drive मध्ये घ्यायला सांगितले होते, पण नालायकाने ते देखील काम केले नव्हते.
बाभळीच्या काट्यांचा सामना करत करत रस्ता शोधात असतानाच एका बाजूला झुडपात थोडी खुसफुस झाली, बारकाईने बघितलं तर एक मोर चक्क निवांतपणे सावलीत बसला होता. मी मोराच्या बरोबर मागच्या बाजूला अवघ्या काही फुटाच्या अंतरावर उभा होतो. काही क्षण शांत उभा राहून मी पाहिलं त्याचे निसर्गाने दिलेले निरनिराळे रंग मनसोक्तपणे पाहून घेतले. आयुष्यात प्राणी संग्रहालय सोडलं तर पहिल्यांदाच इतक्या जवळून मोर बघत होतो. आता मात्र मला फोटो काढायचा मोह आवरला नाही, पण जस छायाचित्रण यंत्र सुरु केलं, तस यंत्राने नेहमी हवा हवासा वाटणारा आणि आज नको असलेला आवाज काढला आणि मोर क्षणात तिथून गायब झाला.
किल्यावरुन आजूबाजूच्या छोट्या छोट्या टेकड्या मोठ्या मजेशीर दिसत होत्या, आम्हा सह्याद्रीत भटकणाऱ्या लोकांना हे दृश्य नवीनच होतं. कसा बसा किल्ल्याच्या मागील प्रवेशद्वाराजवळ पोहचलो. आता मात्र अनंत फंदींच्या सूचनेप्रमाणे धोपट मार्ग न सोडता मंदिर गाठले. स्वागत, माझी वाटच बघत होता. अमर आणि बन्या पण एव्हाणा येऊन पोहचले होते. स्वागतने त्यांना अगोदरच इथे बघण्यासारखे काहीही नाही म्हणून सांगत त्यांना त्याच्या बाजूने घेतले होते. किल्ल्यावर राम, काली माता, कृष्ण यांची मंदिरे आहेत. मंदिरात आलेल्या एका कुटुंबाने आम्हा सगळ्यांना प्रसाद म्हणून तिळगुळ दिले. चला जाता जाता तोंड गोड झाल.

किल्ल्यावरून दिसणाऱ्या मातीच्या टेकड्या:
8DSCN2963.JPG8DSCN2978.JPGशेरगढ विषयी थोडेसे:

हा किल्ला राजस्थानच्या अति पूर्वेकडील भागात बांधला गेला आहे. पूर्वी धौलपूर हे धवलगिरी या नावाने ओळखले जात असे नंतर त्याचे धौलगिरी झाले आणि त्यानंतर धौलपूर या नावाने ते ओळखले जाऊ लागले. हे शहर तोमर राजा धवल देवने ११ व्या शतकामध्ये वसवले. छोट्याशा निद्रिस्त वाटणाऱ्या या गावाने बराच हिसंक व अस्थिर इतिहास अनुभवला आहे.

चंबळ नदीच्या उत्तर काठावर आग्र्यापासून ६० किमी वर हा किल्ला बांधला आहे.
ज्या कुणा योद्ध्याला ग्वाल्हेर आणि मालवा प्रांत ताब्यात घ्यायचे असतील त्याला धौलपूर वरूनच जावे लागत असे. इ.स. १४८९ मध्ये बहलोल लोदी जेव्हा ग्वाल्हेरवर स्वारी करायला निघाला होता तेव्हा त्याला धौलपुरच्या फौजांशी सामना करावा लागला होता. इ.स. १५०२ मध्ये सिंकंदर लोदीचे धौलपुरचा राजा विनायक देव बरोबर युद्ध झाले, सुमारे १ वर्षाच्या युद्धानंतर सिंकदर लोदीने कसेबसे धौलपूर स्वतःच्या ताब्यात घेतले.
या सर्वांमुळे उत्तरेच्या राज्यकर्त्यांना धौलपुरचे भौगोलिक महत्व कळून चुकले होते. इ.स. १५०४ मध्ये सर्वात प्रथम सिकंदर लोदीने आपल्या सैनिकी छावण्या आग्रा (जे त्यावेळेस बयानमधील एक छोटेसे गाव होते ) आणि धौलपूर मध्ये उभारायचा निर्णय घेतला, जेणेकरून तो ग्वाल्हेर आणि मालवा प्रांत यशस्वीरीत्या जिंकू शकेल.
किल्ला नक्की बांधला कुणी ?????

आंतरजालावर बरीच उचकापाचक केल्यावर खालील माहिती समोर आली.

सर्वात प्रथम या ठिकाणी किल्ला करौलीचा राजा, धरमपाल याने ११२० मध्ये बांधला असल्याचा उल्लेख आढळतो.
“तरीख-ई-शेरशाही” आणि “बाबरनामा” यानुसार शेरगढच्या बांधकामाचे श्रेय शेर शाह सुरीला (इ.स.१५४०) जाते. प्रत्यक्षात हा किल्ला मात्र इ.स. १५३२ मध्ये राजा मालदेवने बांधल्याचे सांगितले जाते. पूर्वी असलेल्या हिंदू किल्ल्याची शेर शाह सुरीने डागडुजी करून किल्ल्याला शेरगढ असे नाव दिले.

“तरीख-ई-शेरशाही” हा अब्बास खान सर्वाणीने इ.स. १५८० मध्ये शेर शाह सुरीचा इतिहास सांगणारा ग्रंथ लिहिला. अब्बास खान सर्वाणी हा अकबराच्या हाताखाली वकीया नवीस म्हणून काम पाहत होता. शेर शाह सुरी च्या राज्यकारभाराबद्दल अधिक माहिती पुरवण्याच्या हेतूने अकबराने हा ग्रंथ लिहून घेतला. अकबराचे वडील हुमायूनना शेर शाह सुरी कडून पराभव पत्करावा लागला होता.

बाबरनामा – बाबरनामा हे बाबरचे आत्मचरित्र. हे आत्मचरित्र बाबरने चागताई ( तुर्की भाषेचे जुने स्वरूप) या भाषेत लिहिला आहे. चागताई भाषा आता विलुप्त झाली आहे. हि भाषा पूर्वी आंदीजान – तिमुरीड या उझबेकिस्तानच्या प्रांतात वापरली जात असे. आधुनिक उझबेक भाषा हि याच भाषेची वंशज आहे. उझबेक भाषा जाणारे बाबरनामा वाचू शकतात. मात्र फारसी भाषा जाणणारे हा वाचू शकत नाहीत.

बाबर नंतर त्याचा नातू अकबराने तुजुक-ए-बाबरी उर्फ बाबरनामाचा फारसी मध्ये अब्दुरहीम खान-ए-खानां द्वारा हिजरी ९९८ (इ.स.१५८९-९०) मध्ये अनुवाद केला आणि अनेक चित्रांनी बाबरनामा सजवला. आता हा अनेक भाषांमध्ये अनुवादीत झाला आहे. अकबराने इराणवरून मीर सच्चीद अली आणि अब्द-अस-समद या दोन कलाकारांना चित्रे रेखाटण्यासाठी बोलावले होते. या दोन कलाकारांनी स्थानीय चित्रकारांच्या मदतीने बाबरनामा मधील चित्रे रेखाटली. १४५ चित्र समाविष्ट असलेला बाबरनामा इ.स. १५९८ मध्ये बनला. बाबरनामा मधील चित्रांमध्ये मुघलकालीन चित्रकला शैलीची झलक बघावयास मिळते. दौलत, भवानी, मंसूर, सूरदास, मिस्कीन, फारुख़ चोला आणि शंकर यांसारख्या ४७ कलाकारांच्या मदतीने ५ सचित्र बाबरनामा तयार केले गेले.

त्या ५ प्रती सद्यस्थितीत खालील ठिकाणी आहेत :
१. राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली – येथे असलेल्या बाबरनामा मध्ये सगळी मिळून ३७८ पाने आहेत आणि १२२ पानांवर १४४ चित्रे आहेत.
२. British Museum, London, UK
३. State Museum Of Eastern Culture, Mosko, Russia
४. Victoria & Albert Museum, London, UK
५. हि प्रत कुठे आहे हे कुणाला माहीत आहे का ?

पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर (इ.स. १५२६ ) बाबर हिंदुस्थानाचा पहिला मुघल सम्राट बनला, पण त्याला हे राज्य सहजासहजी मिळाले नाही. इब्राहीम लोदीच्या मृत्युनंतर अनेक संस्थानांनी स्वतःला स्वतंत्र जाहीर केले. तलाई खान ग्वाल्हेरचा राजा बनला. मोहम्मद जैफूनने स्वतःला धौलपुरचा राजा म्हणून घोषित केले, बाबरच्या हे कानावर आल्यावर त्याने जुनैद बरलासला धौलपुरला पाठवून, धौलपुरचे बंड मोडून काढत तेथील कारभार स्वतःच्या हातात घेतला. मुघल साम्राज्याच्या वेळी धौलपुरने तिथल्या निसर्गामुळे अनेक शाही शहजादयांना भुरळ पडली होती. “हुमायूननामा” नुसार बाबरचा मुलगा अन्वर मिर्झा याच्या मृत्युनंतर बदल म्हणून बाबर त्याचा सर्व बायकांना आणि सहकाऱ्यांना घेऊन धौलपुरला गेला असल्याचा उल्लेख आढळतो.

धौलपुरच्या जहागीरदारीवरून शाहजहान आणि नूरजहान यांमध्ये एकदा वाद विकोपाला गेला होता. शाहजहानने सम्राट जहांगीरला धौलपुरचा परगणा त्याच्या ताब्यात द्यावा म्हणून विनंती केली होती आणि शाहजहान अशा समजुतीत होता कि जहांगीर ती मान्य करेल. दुसऱ्या बाजूला नूरजहानने धौलपुरचा परगणा राजपुत्र शहरयारसाठी अगोदरच घेऊन ठेवला होता. तिने शरीफ उल मलिकला परगण्याचा भार सांभाळण्यासाठी ठेवले होते. अशा प्रकारे शाहजहान आणि शरीफ उल मलिक या दोघांमध्ये झालेल्या युद्धात शरीफ उल मलिकच्या डोळ्याला जखम झाली होती तर अनेक सैनिक मृत्युमुखी पडले. या प्रकारच्या आगळीकीबद्दल शाहजहानची चांगलीच कान उघाडणी करण्यात आली आणि त्याच्या फौजा दक्षिणेकडून ताबडतोब आग्र्याला पाठवण्याचे आदेश देण्यात आले.

पूर्वी किल्ल्याच्या तटबंदीवर २५ टण वजन असलेल्या आणि अष्टधातूंपासून बनवलेल्या तोफा ठेवलेल्या असतं. ज्यामधली हनुहुंकार नावाची तोफ इंदिरा पार्क मध्ये ठेवलेली आहे. जिची लांबी १९ फुट आणि परीघ १० फुटाचा आहे. या तोफांवर मुघल शैलीची सुंदर कलाकुसर आढळते.

असा सगळा आहे शेरगढ किल्ल्याचा रंजक इतिहास.

हो नाही म्हणता म्हणता आम्ही शेरगढ ठीक १४०० वाजता सोडला.

आता पुढंच लक्ष्य होतं आग्रा. पहिल्यांदा ताजमहाल बघायचा का पहिल्यांदा आग्र्याचा लाल किल्ला बघायचा का पहिल्यांदा शिव-स्मारक बघायचं यावर काही अजून आमचं एकमत झाल नव्हत. रुपेश-स्नेहल आणि संग्राम-रोहन या लोकांचा पत्ता नव्हता. मोहीम कुठपर्यंत पोहचली आहे हे देखील आम्हाला माहित नव्हतं. वाटेतच एका हॉटेलमध्ये जेवण उरकल. आता इतक्या दिवसांच्या प्रवासानी सगळ्यांना एक चांगली ( कि वाईट ?) सवय लागून गेली होती. कुठेही चहा प्यायला, जेवायला अथवा काही खायला आम्ही थांबलो रे थांबलो कि पहिल्यांदा छायाचित्रण यंत्र, भ्रमण ध्वनी तिथला plug-point शोधून, तिथल्या मालकाला लगेच मस्का मारून charging करायला लावायचो. रात्री झोपताना छायाचित्रण यंत्र, भ्रमण ध्वनी charging करता येईलच याची शाश्वती नसायची.

छायाचित्रण यंत्राने मेमरी फुलचा मेसेज दाखवायला सकाळपासूनच सुरवात केली होती त्यामुळे गाडीवर पाठीमागे बसून नको असलेले फोटो डिलीट करता करता आग्रा कधी आल ते कळलच नाही.
साधारण १५१५ च्या सुमारास आग्र्यामध्ये घुसलो.

आजच्या दिवसाची खासियत म्हणजे सकाळी आम्ही ग्वाल्हेर, मध्य प्रदेश मध्ये होतो. दुपारी धौलपूर, राजस्थान मध्ये होतो तर आता आग्रा, उत्तर प्रदेश मध्ये.
मनातच मी म्हटलं, वा !! एका दिवसात ३ राज्य. आता ३ किल्ले देखील झालेच पाहिजेत. ताजमहाल का लाल किल्ला ?? या पेचाच उत्तर मनानी एका क्षणात दिलं होतं.

लाल किल्ला कुठं आहे ? अस विचारत विचारत आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो.
शेवटी एकदाचा किल्ला सापडला. किल्ल्याच्या बरोबर समोरील बाजूसच वाहने लावता येतात. गाडी पार्क केली. पार्किंगवाल्याला पैसे देऊन आठवणीने त्याच्याकडून पावती घेतली. आपण परत येईपर्यंत गाडी गायब झाली तर जाब कोणाला विचारणार ? अशी एक नको ती शंका मनात चमकून गेली. शेवटी तेथील एका पोलिसाला जाऊन भेटलो, तुम्हाला त्याने पावती दिली आहे ना? पोलिसाने विचारले. पोलीस काकांना मग पावती वगैरे दाखवली. परत एकदा त्याला आम्ही कुठून आलो आहोत, कुठे निघालो आहोत वगैरे सांगितले. पावती उलटी-सुलटी करून बघितल्यानंतर तुम्ही निवांत जावा, काही घाबरू नका, तुमच्या गाडीला काही होणार नाही हे ऐकल्यावर निश्चिंत झालो.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बरोबर समोरच ऐटीत उभा असलेला अश्वारूढ शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बघून मनात ज्या भावना तयार झाल्या त्या शब्दांत सांगता येणं अशक्यच, निव्वळ अशक्य, ते ज्याचे त्यानेच तिथे जाऊन अनुभवावे.

शिव-स्मारक:
8DSCN2984.JPG

अच्छा, हे तर आहे शिव-स्मारक, चला आता लवकरात लवकर किल्ला बघून घेऊ म्हणत मी शिवरायांच्या पुतळ्याचे पटापट २-३ फोटो काढून आम्ही तिकीट खिडकीपाशी निघालो. दुरवर ताजमहाल दिसत होता. भारतीयांबरोबरच भारताबाहेरच्या लोकांची पण चांगलीच वर्दळ होती. लहानपणी फक्त इतिहासाच्या पुस्तकात आपले शिवाजी राजे याच किल्ल्यातून पळाले एवढंच माहिती होत. आज तो किल्ला बघायचा योग आला होता. संपूर्ण किल्ला बघण्यासाठी खुला नाहीये. काही भाग भूदलाच्या ताब्यात आहे. स्वागत तिकीट काढून आला. आम्ही मार्गदर्शक घ्यायच्या भानगडीत पडणार नव्हतो. किल्ल्याची माहिती सांगणार एक उपकरणं मिळत ते कानात घालून ऐकत ऐकत निवांत फिरायचं.

आग्रा किल्ल्याची थोडीफार माहिती:
हा किल्ला लाल किल्ला म्हणून ओळखला जातो. भारतातील महत्त्वपूर्ण किल्यांपैकी हा एक. बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेब हे सारे मुघल राज्यकर्ते इथे राहिले आणि त्यांनी येथूनच देशाचा राज्यकारभार पहिला. या किल्ल्यामध्ये सगळ्यात मोठा खजिना आणि टांकसाळ होती. या किल्ल्यामध्ये विदेशी राजदूत, यात्री आणि इतर अनेक लोक येऊन गेले ज्यांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये मोलाचे योगदान दिले. भारतातल्या दुसऱ्या कुठल्या किल्ल्याला हा मान प्राप्त नाही.

लाल किल्ल्याची भक्कम तटबंदी :
8DSCN2989.JPG

हा एक अतिशय प्राचीन किल्ला असून यमुना नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. हा किल्ला विटा वापरून होता आणि हिंदू राजे सिकरवार ( बहुतेक चौहान ) राजपुतांच्या अधिकाराखाली होता. ह्या किल्ल्याचा सगळ्यात पहिला उल्लेख इ.स. १०८० साली आढळतो जेव्हा गझनीच्या सैनिकांच्या तुकडीने हा जिंकून घेतला. सिकंदर लोदी (१४८८-१५१७) हा दिल्लीचा पहिला सुलतान होता जो आग्र्याला आला आणि या किल्ल्यामध्ये राहिला. इथूनच त्याने त्याचा राज्यकारभार चालवला आणि आग्र्याला दुसऱ्या राजधानीचे महत्व मिळाले. १५१७ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर किल्ला त्याचा मुलगा इब्राहीम लोदी याच्या हातात सुमारे ९ वर्षे राहिला. १५२६ च्या पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये इब्राहीम लोदी हरला आणि मारला गेला. लोदी कालामध्ये किल्ल्यामध्ये महाल, विहिरी आणि एक मशीद बांधली गेली.

पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर १५२६ मध्ये मुघलांनी आग्र्याच्या किल्ल्यावर आणि त्याच्या खजिन्यावर कब्जा केला. या खजिन्यातच एक अमूल्य हिरा होता ज्याला नंतर कोहिनूर हे नाव दिले गेले. बाबर किल्ल्यामध्ये इब्राहिमच्या महालामध्ये राहिला. त्यानेच येथे एक विहीर बनवली. १५३० मधे बाबरचा मृत्यू झाल्यानंतर हुमायूनचा येथेच राज्याभिषेक झाला. १५३६ मध्ये चौसाचे युद्ध हरल्यानंतर हुमायून आग्र्याला परत आला. तिकडे त्याला निजाम पाणाडयाने बुडताना वाचवले होते, या उपकाराचा मोबदला म्हणून त्याने त्याला अर्धा दिवस गादीवर बसवले होते. त्यावेळेस निजामाने चामड्याचा शिक्का सुरु केला. १५४० मध्ये बिलग्रामच्या युद्धात हुमायून हरला. १५ वर्षे हा किल्ला शेर शहा आणि त्याच्या मुलांच्या अधिपत्याखाली होता. १५५५ मध्ये हुमायुनने किल्ला काही काळासाठी परत घेतला. हिंदू राजा “हेम चंद्र विक्रमादित्य” उर्फ हेमू याने हुमायुनला हरवून किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला. अकबराने हेमुला १५५६ च्या पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये हरवले आणि किल्ला स्वतःकडे घेतला. हेमुने किल्ला १५५३ मध्ये आणि १५५६ मध्ये अकबराच्या सैन्याचा पाडाव करून जिंकला होता.
आग्र्याच्या किल्ल्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता अकबराने (१५५६-१६०५) आग्र्याला राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला. १५५८ मध्ये तो आग्र्याला आला. त्याचा इतिहासकार अबुल फजल म्हणतो कि त्यावेळेस किल्ला विटांचा बनला होता आणि “बादलगढ” म्हणून प्रसिद्ध होता. किल्ला त्यावेळेस पडझड झालेल्या स्थितीत होता. अकबराने किल्ला लाल दगडांमध्ये परत बनवण्याचा हुकुम दिला. कुशल कारागिरांनी आत मध्ये विटा आणि बाहेरच्या बाजूला लाल दगडांनी किल्ला परत मजबूत केला. ४००० कारागिरांनी ( विकिपीडिया वर हा उल्लेख १४,४४,००० असा आढळतो पण त्यावेळेसची लोकसंख्या लक्षात घेताहा आकडा चुकीचा वाटतो) रात्रंदिवस काम करून (१५६५ -१५७३ ) ८ वर्षामध्ये किल्ला पूर्ण केला.

जहांगीर महाल :
8DSCN3004.JPG

हा किल्ला अर्धवर्तुळाकार आहे, ज्याचा व्यास नदीला समांतर आहे. किल्ल्याचा विस्तार ९४ एकर (३,८०,००० वर्ग मी ) आहे. याच्या भिंती ७० फुट उंच आहेत. किल्ल्याला चारही बाजूला चार दरवाजे आहेत, ज्यांमधील “खिज्री दरवाजा” नदीच्या बाजूला आहे. जेथे घाट पण बांधले गेले होते.

अबुल फझल लिहितो कि किल्ल्यामध्ये बंगाली आणि गुजरातच्या सुंदर नक्षीकामानी ५०० इमारती बनवल्या गेल्या होत्या. यामधल्या कितीतरी आता अस्तित्वात नाहीत. काही शहाजहानने पडून त्या जागी पांढऱ्या मार्बलचा वापर करून महाल बनवले. पण बहुतांशी इमारती या १८०३ ते १८६२ च्या मध्ये इंग्रजांनी पाडल्या आणि त्यांच्या जागी सैनिकांसाठी छावण्या बनवल्या. फक्त ३० इमारती नदीच्या बाजूला दक्षिण-पूर्व कोपऱ्यात कशाबशा वाचल्या. यांमध्ये दिल्ली दरवाजा, अकबर दरवाजा आणि बंगाली महाल अकबराच्या काळातील आहेत. दिल्ली दरवाजा आग्रा शहराच्या समोर आहे. उचलणाऱ्या पुलाने आणि गोमुखी प्रवेशद्वाराने हा अभेद्य बनवला आहे. पूर्वीच्या काळी आक्रमण करणारे हत्तीच्या धडकेने किल्लाचे प्रवेशद्वार तोडत असत, पण यासाठी हत्ती एका सरळ रेषेत पळत येत असे, गोमुखी रचनेमुळे अशा प्रकारच्या दरवाजांवर हत्तीची धडक बसत नसे. सह्याद्रीमधील किल्ल्यांवर देखील गोमुखी दरवाजे आढळतात. याच्या आतील दरवाजावर माहुतांसहित असलेले दगडांनी बनवलेले दोन हत्ती होते, म्हणून त्या दरवाजाला हाथी पोल म्हणत. मुघल सम्राट याच दरवाजाचा उपयोग करत असत म्हणून दिल्ली दरवाजा भव्य आणि सुंदर बनवला गेला होता. अकबर दरवाजा इंग्रजांच्या काळी अमर सिंह राठोड मुळे, अमर सिंह दरवाजा म्हणून ओळखला जाऊ लागला. हा दरवाजा आणि दिल्ली दरवाजा यांमध्ये बरेच साम्य आहे. दोन्ही दरवाजे लाल दगडांनीच बनवलेले आहेत. बंगाली महाल पण लाल दगडांनीच बांधलेला आहे. आता याचे अकबरी महाल आणि जहांगिरी महाल असे दोन भाग झाले आहेत. दिल्ली दरवाजामधून प्रवेश करण्यास बंदी आहे, आपण अमर सिंह दरवाजामधून किल्ल्यामध्ये प्रवेश करतो.

अमर सिंह दरवाजा:
8DSCN2991.JPG8DSCN2999.JPG

१६०५ मध्ये या किल्ल्यात अकबराचा मृत्यू झाला आणि येथेच जहांगीरचा राज्याभिषेक झाला. जहांगीर खूप वेळा काश्मीर आणि लाहोरमध्येच राहत असे, तरीही तो नियमित आग्र्याला येत असे आणि किल्ल्यामध्ये राहत असे. आग्रा अशाप्रकारे राजधानी म्हणून जहांगीरच्या काळात पण कायम राहिला. १६२८ मध्ये किल्ल्यामध्ये शाहजहानचा राज्याभिषेक झाला. त्याला इमारती बांधण्याचा छंद होता. किल्ल्यामधील पांढऱ्या संगमरवराच्या सर्व इमारती ह्या त्याने बांधलेल्या आहेत. त्याने येथे पांढऱ्या संगमरवराच्या ३ मशिदी बांधल्या, मोती मशीद, नगीना मशीद आणि मीना मशीद.

१६५८ मध्ये समोगढच्या युद्धानंतर औरंगजेबने किल्ल्याला वेढा घातला. किल्ल्यामध्ये पिण्याचे पाणी यमुना नदीचे येत असे. औरंगजेबाने किल्ल्याला जाणारे नदीचे पाणी बंद केले. शाहजहान विहिरीचे पाणी पीत नसे, त्यामुळे शाहजहान शरण आला. औरंगजेबने शाहजहानला, स्वतःच्या वडिलांना याच किल्ल्यामध्ये सुमारे ८ वर्षे कैदेत ठेवले होते. १६६६ मध्ये शाहजहानचा मृत्यू झाला त्याचे ताजमहाल मध्ये दफन करण्यात आले. शाहजहानच्या मृत्यू वेळी त्याची मुलगी राजकन्या जहानरा त्याची काळजी घेत असे. असे म्हणतात कि शाहजहान मुसम्मान मनोऱ्यावर मृत्यू पावला. या मनोऱ्याला संगमरवरी सज्जा असून, येथून ताजमहालाचे विहंगम दृश्य दिसते.

औरंगजेबने दोन्ही दरवाजांच्या बाहेर आणि नदीच्या बाजूला सुरक्षिततेसाठी टेहेळणी बुरुज बांधले.
जरी शाहजहानने त्याची राजधानी १६३८ ला दिल्लीला हलवली होती तरी तो याच किल्ल्यामध्ये राहत असे. पण त्याच्या मृत्युनंतर आग्र्याची प्रतिष्ठा जात राहिली. औरंगजेब दक्षिणेच्या समस्यांमध्ये व्यस्त राहिला तरीही तो किल्यामध्ये येऊन राहत आहे आणि दरबार भरवत असे.

१६६६ मध्ये शिवाजी राजे आग्र्याला आले होते आणि औरंगजेबला दिवान-ए-खास मध्ये भेटले. त्यांच्याबरोबर दगाफटका करण्यात आला आणि त्यांना कैदेत ठेवण्यात आले. त्यानंतरची आपल्या धन्याची “गरुडझेप” सगळ्यांनाच माहित आहे.

१७०७ च्या औरंगजेबच्या मृत्युनंतर मुघल साम्राज्यामध्ये अराजकता माजली. १८व्य शतकातील आग्र्याच्या किल्ल्याचा इतिहास हा आक्रमणांचा आणि लुटमारीचा इतिहास आहे. त्यानंतर हा किल्ला जाट आणि मराठ्यांच्या ताब्यात राहिला. शेवटी १८०३ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला त्यांच्या अधिपत्याखाली आणला. त्यांनी किल्ल्याला सैनिक छावणी बनवले आणि येथे तोफखाना ठेवला.

पुरातत्व विभागाच्या ताब्यात आल्यानंतर सुद्धा फक्त महाल असलेला भाग भूदलाने खाली केला, बाकी किल्ला भूदलाच्याच ताब्यात आहे.
UNESCO ने आग्रा किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाचा (World Heritage Site) दर्जा दिलेला आहे. आग्रा किल्ल्यापासून ताजमहालचे पूर्व प्रवेशद्वार ७.१ किमी वर आहे, तर पश्चिम प्रवेशद्वार फक्त १ किमी वर आहे.

किल्ल्यामधील ठिकाणे:
१. अंगूरी (द्राक्ष) बाग : ८५ एकसारखे आकार असलेला बगीचा.
२. दिवान-ए-आम : सामान्य जनतेचा न्यायनिवाडा करण्यासाठी तसेच त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी.
३. दिवान-ए-खास : येथे सरदार आणि इतर राजे लोकांचा दरबार भरत असे.
४. जहांगीर महाल : अकबराने त्याचा मुलगा जहांगीर साठी बांधला.
५. खास महाल : पांढरा संगमरवरी राजवाडा, संगमरवरील चित्रकलेचा अतिशय उत्तम नमुना.
६. मीना मशीद : मुजाहरा द्वारे वापरली जाणारी खाजगी मशीद.
७. मोती मशीद : दरबारातील लोकांसाठी बांधलेली मशीद.

दिवान-ए-आम :
8DSCN3007.JPGदिवान-ए-आम मधील कलाकुसर :
8DSCN3021.JPGदिवान-ए-आम पुढील जॉन रसेल गाल्विन ची समाधी :
8DSCN3025.JPGअतिशय नाजूकपणे केलेले समाधीवरच नक्षीकाम :
8DSCN3026.JPGशिशमहाल ( १६३१-१६४०) –
हा महाल शाहजहानने ग्रीष्म महालाच्या रुपात बनवले होते. या मध्ये दोन छोटे तलाव होते आणि दोन्ही तलावांच्या मधून एक छोटा ओहोळ वाहत असे. त्यामध्ये कारंजे होते आणि एक छोटासा धबधबा होता. येवढा सगळा उपद्व्याप महालाला आग्र्याच्या गर्मीपासून थंड आणि आरामदायक बनवण्यासाठी केला गेला होता. या महालाची खासियत म्हणजे या महालाच्या भिंतींवर आणि छतावर काचेचे लोलक चुन्याचा वापर करून बसवण्यात आले आहेत. काचेच्या या लोलकांमध्ये उच्चतम असे आरशाचे गुण आहेत. या महालाच्या भिंती प्रचंड आहेत. ज्यांमध्ये थोड्याच खिडक्या आहेत. त्यामुळे महालाच्या आतील भागात काहीसे अंधारी वातावरण असते आणि कृत्रिम प्रकाशाची आवश्यकता पडते. दिवे, मेणबत्ती अथवा मशालींचा प्रकाश महालामध्ये लोलकांमुळे विविध अंगानी चमकतो. त्यामुळे महालामध्ये स्वर्गीय वातावरण निर्माण झाल्याची अनुभूती येते.
हे वेगळ्या प्रकारचे लोलक “हलब” ( सध्याच्या सिरीया देशातील अलीपो ) येथून आणले होते. याच कारणामुळे शाहजहानचा इतिहासकार लाहौरीने याचा उल्लेख “शीश-ए-हलबी” असा केला आहे. या मूळ कलेला “बैजनटाइन” कला म्हणतात. शाहजहानने दिल्ली आणि लाहोरमध्ये पण शिशमहाल बनवले पण आग्र्याचा शिशमहाल सर्वोत्कृष्ट आहे.

मीना मशीद : (१६३१-१६४०)
हि छोटीसी मशीद शहाजहान ने स्वतःच्या व्यक्तिगत वापरासाठी बनवली होती. प्रार्थना कक्षाच्या येथे ३ महिरपी कमानी आहेत आणि पुढे मोकळे अंगण आहे. येथे जास्त कलाकुसर आढळत नाही. हि अतिशय साध्या पद्धतीने बांधली आहे. हि उंच उंच भिंतींनी घेरलेली आहे.
असे म्हणतात कि जेव्हा शाहजहान मुसम्मन मनोरयामध्ये, ज्याला आता शाही मनोरा सुद्धा म्हणतात, कैदेत होता (१६५८-१६६६) तेव्हा तो याच मशिदीमध्ये नमाज पढत असे.

दिवान –ए- खास :
हा पांढऱ्या संगमरवराचा राजवाडा मुघल बादशहा शाहजहान याने १६३५ मध्ये बनवला होता. यामध्ये २ मोठे सभागृह आहेत. बाहेरचे सभागृह खांबांवर उभे आहे तर आतील भिंतीवर. दोन्ही सभागृहे एकमेकांना जोडलेली आहेत. दर्शनी भागात नऊ दातेरी ५ महिरपी कमानी आहेत तर मागे डाव्या-उजव्या बाजूला ७-७ दातेरी ३-३ महिरपी कमनी आहेत ज्या दोन खांबांवर स्थित आहेत. खांबांवर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहे. भिंतीवर देखील वेलबुट्टीची नक्षी काढलेली आहे आणि वेलींचे नक्षीकाम केलेले आहे. दक्षिणेकडील भिंतीवर २८ पुष्पे कोरलेली आहेत. याफुलांमधेच एक फारसी शिलालेख लिहिलेला आढळतो. ज्यामध्ये या महालाची आणि बद्शाची प्रशंसा केली गेली आहे व महालाच्या निर्माणाची तारीख हिजरी १०४५ (इ.स. १६३५) लिहिलेली आहे. आतील सभागृहाला इतिहासकार लाहोरीने “ताबीखाना” असे नाव दिलेले आहे. याच्या दोन्ही बाजूला बादशाच्या बसण्यासाठी “शाह नशी” बनवलेले आहेत. दिवान ए खासच्या छतावर सोने आणि चांदीने नक्षी काढलेली होती. हि नक्षी बहुतेक फ्रान्सचा सोनार बोर्डोच्या ऑगस्टिन ने काढलेली होती. दरबार बाहेरच्या सभागृहामध्ये भारत असे. आतील सभागृहामध्ये फक्त गोपनीय खलबते होत. या महालामध्ये फक्त विशिष्ट मंत्री किंवा दूतच येऊ शकत असत. “तख्ते-ताउस” (मोरपंखी राजमुकुट) जो इ.स. १६३४ मध्ये बनवला गेला होता, तो येथेच ठेवला गेलो होता. इ.स. १६४८ मध्ये तो दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या दिवान ए खासमध्ये नेण्यात आला. तेथून इ.स. १७३९ मध्ये नादिर शहाने तो लुटून नेला. दिवान ए खासच्या समोर संगमरवराने बनवलेले अतिशय अलंकारिक असे दालन होते. ते विलियम बैनटीकने (१८२८-१८३५) त्याच्या कालखंडामध्ये उखडून इंग्लंडला पाठवून दिले. हे दालन अजूनही Victoria & Albert Museum, London, UK मध्ये आहे. याच दिवान –ए- खासमध्ये औरंगजेबाला भेटण्यासाठी १६६६ मध्ये शिवाजीराजे आले होते.आग्र्याच्या उकाड्याने त्रस्त होऊन त्यांना मूर्च्छा येऊ लागली होती म्हणून त्यांनी खांबाचा आधार घेतला.( या तिथे लिहिलेल्या ओळी वाचल्यावर मात्र माझ्या अंगाचा तिळपापड झाला.)

दिवान –ए- खास :
8DSCN3041.JPG8DSCN3055.JPG

मन काही काळापुरते १६६६ मध्ये जाऊन पोहचले. राजांचाही हस्तस्पर्श एखाद्या खांबाला झाला असेल असा विचार करून तिथल्या खांबांवर क्षणभर हात फिरवला. तेवढ्यात फोन वाजला. विचारांची तंद्री भंगली. स्नेहल होता, हे लोक देखील आग्र्या मध्ये पोहचले होते. त्याला आम्ही लाल किल्ल्यामध्ये आहोत. आत आला कि फोन करा सांगून फोन बंद केला.

आता दिवान –ए- खास बघून नगीना मशिदीच्या दिशेने निघालो.

नगीना माशिदिविषयी थोडेफार : (इ.स. १६३५ )
हि एक खाजगी मशीद असून शाहजहान ने इ.स. १६३५ मध्ये पांढऱ्या संगमरवराचा वापर करून “हरम” च्या स्त्रियांसाठी हि बांधली होती. मशिदीच्या तीनही बाजूला अंगण असून हि मोकळी आणि हवेशीर आहे. तरीही आतील भाग झाकण्यासाठी हिच्या चारही बाजूला उंच भिंती बनवलेल्या आहेत. प्रार्थना कक्षामध्ये २ आणि समोरील बाजूला ३ महिरपी आहेत, शाहजहानच्या शैलीप्रमाणे या देखील दातेरी आहेत. भक्कम खांबांवर हि मशीद उभी आहे. मधली महिरपी कमान मागच्या महिरपी कमानींपेक्षा मोठी आहे. पूर्वेकडील भिंदीच्या बाजूला एक छोटासा कुंड आणि झरा आहे. जो “वुजू” ( हात-पाय धुण्यासाठी ) साठी बनवलेला आहे. पुढील महिरपिंच्या वरील बाजूस फुल आणि कलश ( आपल्याकडे कलशामध्ये श्रीफळ आणि आंब्याची पाने ठेवल्यावर जसा आकार तयार होतो अगदी तसाच आकार ) कोरलेला आहे. इ.स. १६५८-१६५९ मध्ये बनवलेल्या दिल्लीमधील लाल किल्ल्याच्या मोती मशिदीला सोडले तर सुंदरतेच्या बाबतीत हि मशीद इतर सर्व मशिदींना मागे टाकते.

बाहेरील बाजूने दिसणारी नगीना मशीद:
8DSCN3008.JPGनगीना मशीद:
8DSCN3060.JPGशाही हमाम आणि जलपूर्ती व्यवस्था :
शाही हमाम ज्याला गुसलखाना पण म्हणतात हा सर्वात पहिल्यांदा अकबराने बनवला होता. शाहजहानने याचे नुतनीकरण केले. हा एक विस्तीर्ण महाल आहे, ज्यामध्ये ८ बाजू असलेले सभागृह आणि खोल्या आहेत. सभागृह आणि खोल्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. यमुनेच्या बाजूला असलेल्या काही जाळीदार खिडक्या सोडल्या तर हा सर्व बाजूंनी बंद आहे. पश्चिम दिशेला असलेल्या पायऱ्या एकदम खालीपर्यंत घेऊन जात असत जेथे २ भट्ट्या बनवलेल्या होत्या. बरोबर याच्या वरतीच यांत्रिक कक्ष होता. यांत्रिक कक्षामध्ये भट्ट्याच्या वरती पितळ आणि तांब्याचे २ मोठे रांजण ठेवले होते. या कक्षामधून माती आणि तांब्याचे पाइप, जे भिंतींमध्ये गूढरीत्या बसवलेले आहेत, दुसऱ्या खोल्यांपर्यंत जातात. काही खोल्यांमध्ये भिंतींच्या कोनाड्यामध्ये छोटे जल-कुंड नजरेस ण येतील अशा प्रकारे बनवलेले आहेत. हे सर्व जे काही आहे, त्याचं उत्तर शोधण्यास आज आम्ही मात्र असमर्थ आहोत. याची रचना विटांच्या सहाय्याने केली गेली होती परंतु फरशांवर आणि खांबांवर पांढरे शुभ्र संगमरवर लावले होते. भिंतींवर चुन्याच्या सहाय्याने प्लास्टर करून त्यावर निरनिराळ्या रंगांनी कलाकुसर करण्यात आली होती. सर्व कक्ष, फरशांखाली असलेल्या कोणत्यातरी वातानुकूलित यंत्रणेने समृद्ध होते. प्रत्येक कक्षाच्या वरती घुमटाकार छत आहे, ज्याच्या टोकावर झरोका बनवलेला आहे. या महालाच्या मागील बाजूस शाही उपयोगासाठी मलमूत्र विसर्जन व्यवस्था आहे. हि सर्व व्यवस्था बघितल्यावर असे वाटते कि येथे कुठल्यातरी पद्धतीने वातानुकूलित यंत्रणा कार्यरत असे आणि महालाचा उपयोग ग्रीष्म महाल असा करण्यात येत असावा. विदेशी यात्रेकरूंच्या लिखाणानुसार येथे गोपनीय कामकाज केले जात असे. या हमामाची गणना मुघलांच्या सर्वोत्कृष्ट हमामांमध्ये होते.

शाही हमाम:
8DSCN3038.JPG8DSCN3061.JPG8DSCN3063.JPG

या महालाच्या छतावर ३ खोल तलाव आहेत. रहाटाच्या सहाय्याने यांना नदीच्या पाण्याने भरण्यात येत असे. हे रहाट “खिज्री” अथवा “जल” दरवाजाच्या येथे चालत असत. छतावर असलेल्या या तलावांमधील पाणी माती आणि तांब्यांच्या नळ्यान्द्वारा तसेच खुल्या नाल्यांद्वारा नगीना मशीद, मच्छी भवन, शिशमहाल आणि मुसम्मान मनोऱ्या जवळ असलेले कारंजे, झरे आणि तलावांमध्ये नेण्यात येत असे. मुघल काळामध्ये यमुना नदीचे पाणी पूर्णपणे शुद्ध, स्वच्छ आणि पिण्यायोग्य होते. शाहजहान पण हेच पाणी पीत असे. समोगढच्या युद्धानंतर जेव्हा औरंगजेबाने किल्ल्याला वेढा घातला तेव्हा त्याने किल्ल्याला पाणी पुरवणारी योजना बंड केली. स्वतःचा बाप यमुनेचे पाणी सोडून किल्ल्यावरील विहिरींचे पाणी पीत नाही हे याला अगोदरच माहित होते. त्यामुळे विवश झालेल्या शाहजहानने ८ जून १६५८ ला किल्ला मुलाच्या हवाली केला. यानंतर औरंगजेबाने किल्ल्याच्या सर्व दरवाजांच्या पुढे प्रशस्त मनोरे उभारले.

आराम गृह आणि अंगूरी बाग : (इ.स. १६३१-१६४०)
8DSCN3030.JPGआराम गृह :
8DSCN3028.JPG8DSCN3065.JPG

हा बादशहाचा खाजगी महाल असून जो निवासी परिसरामध्ये बांधला आहे. ज्याचा सभोवताली मोकळी छते, पडदे, तलाव, कारंजी, झरे, एक अंतर्गत बनवलेली बाग, राहण्याची व्यवस्था आणि अंगण आहे. इतिहासकार लाहौरीने याला “आरामगाह” म्हणजेच बादशाहाच्या विश्रांतीचे स्थान असे नाव दिलेले आहे. हा महाल क्रमानी ३ उतरत्या बांधकामांनी बनलेला आहे. पहिल्यांदा नदीच्या बाजूला महाल आहे मग मोकळी छते आणि नंतर बाग आहे. अशा प्रकारे हा महाल एका शाही थाटात उभा आहे. शहाजहानच्या वास्तुविशारदाने हि आखणी अतिशय सुंदर पद्धतीने केलेली आहे. मुख्य महालाच्या मध्यभागी एक मोठे सभागृह आहे ज्याच्या दोन्ही बाजूला शाह नशी ( विसाव्यासाठी केलेली व्यवस्था ) आणि खोल्या आहेत. याच्या पुढे एक मोठे दालन आहे. याच्या समोरच बाग आहे. ह्या महालाचे बांधकाम पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरामध्ये करण्यात आले आहे. संगमरवरावर अतिशय सुंदर अशी चित्रे आणि नक्षीकाम करण्यात आले होते. पूर्वी भिंतीवर विविध चित्रे टांगलेली होती. शाहजहानच्या शैलीप्रमाणे येथे देखील दातेरी महिरपी आढळतात, ज्या चोकोनाकृती स्तंभांवर उभ्या आहेत. याच्या समोरच एक सुंदर असे पाण्याचे कुंड आहे. याच्यामध्ये कारंजी लावलेली आहेत, ज्यांमध्ये छतावर असलेल्या तलावांमधून पाणी येत असे. यामधील पाणी एका खोलगट नालीमधून येऊन झऱ्याच्या स्वरुपात पडत राही. ह्या सर्व जल-साधनांमुळे महालामध्ये एक अत्यंत मनमोहक वातावरण निर्माण होत असे. मुख्य महालाच्या दोन्ही बाजूला दंडाकृती सभागृह आहेत, ज्यांचे सज्जे आणि छते गोलाकृती आहेत. लाहौरीने त्याच्या लिखाणामध्ये यांचे वर्णन “बांगला” असे केले आहे. त्याने असे देखील लिहिले आहे कि शहाजहान मुसम्मान मनोरा व्यतिरिक्त उत्तरेकडील देखील सभागृहाचा झरोखा दर्शन म्हणून उपयोग करत असे. हि दोन्ही सभागृहे लाल विटांनी बनलेली असून, बाहेरून पांढऱ्या चुन्याचा लेप दिला असून पॉलिश केलेली आहेत. त्यामुळे ती शुभ्र संगमरवरापासून बनवलेली असल्यासारखी वाटतात. उत्तरेकडील सभागृहाला चौकटी आहेत तर दक्षिणेकडील सभागृहाला दातेरी महिरपी आहेत. उत्तर सभागृह शाहजहानच्या अगोदर बांधलेले असून असे जाणवते कि हे अकबराच्या मूळ महालाचा भाग असावे ज्याची शाहजहानने शुभ्र संगमरवराने पुनर्निर्मिती केली होती.

अंगूरी बाग:
8DSCN3029.JPG

या भवनांना “जहांनारा” आणि “रोशनारा” म्हणतात जे अर्थातच चुकीचे आहे. एक असाधारण गोष्ट अशी कि, जी दिल्लीच्या लाल किल्ल्यातील शाहजहानच्या महालामध्ये पण नाही, ती अशी कि हि सभागृहे मुख्य महालापासून शुभ्र संगमरवरी पडद्यांनी वेगळी करण्यात आली आहेत. हे पडदे ३ लंबाकृती भागांमध्ये विभागलेले असून, प्रत्येकामध्ये ३ दातेरी महिरपी आहेत, अन्यथा हे अतिशय साधे आहेत. अंगूरी बाग महालाच्या पुढे अतिशय सुंदर तऱ्हेने बनवलेली आहे. संगमरवराच्या उंचवट्यांनी हि बाग ४ भागामध्ये विभागलेली आहे. बागेच्या तीन बाजूंना राहण्यासाठी दुमजली सदनिका बनवलेल्या आहेत. या पण लाल विटांनी बनवलेल्या आहेत पण बाहेरून पूर्णपणे चुन्यानी रंगवलेल्या आहेत. हा महाल बंगाली महाल आणि मच्छी भवन या दोघांच्या मध्ये सुरक्षितपणे बांधलेला आहे. हा महाल चारही बाजूंनी सुरक्षित तर आहेच शिवाय हवेशीर देखील आहे शिवाय आतमध्ये एक विस्तीर्ण बाग देखील आहे. अशा प्रकारे हा महाल आदर्श मध्यकालीन शैलीचे उदाहरण आहे.

आराम गृह आणि अंगूरी बाग बघून झाल्यावर मी माझा मोर्चा मुसम्मन बुरुजाकडे वळवला. तेवढ्यात रुपेशचा फोन आला. जोडी लाल किल्ल्याच्या आतमध्येच होती. मी आणि स्वागत आत शिरल्यावर काहीच वेळानंतर वेगवेगळे झालो होतो. दोघेही आपल्या आपल्या तंद्रीत किल्ला बघण्यात व्यस्त होतो. जहांगीर महालाच्या जवळ १७३० ला भेटू म्हणून मी फोन ठेवला आणि मोर्चा मुसम्मान बुरुजाकडे वळवला.

छतावरील कलाकुसर:
8DSCN3056.JPG

मुसम्मन बुरुज ( शाह बुरुज ) आणि झरोका : (इ.स. १६३२ – १६४० )
हा सुंदर महाल नदीच्या बाजूला, पूर्वेच्या दिशेला, किल्ल्याच्या सगळ्यात मोठ्या बुरुजावर बनवलेला आहे. हा मूळ रुपात झरोका दर्शनासाठी अकबराने लाल दगडांमध्ये बनवलेला होता. तो दररोज सूर्योदयाच्या वेळी येथूनच सूर्याची उपासना करत असे. जहांगीरने देखील याचा झरोक्यासारखाच उपयोग केला. इ.स. १६२० मध्ये काढलेल्या एका चित्रामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते. त्याने याच्या दक्षिण दिशेला “अदल ए जंजीर” ( न्याय कि जंजीर ) लावली होती. आठ बाजू असल्या कारणाने याला मुसम्मन बुरुज म्हणत असत. फारसी इतिहासकारांनुसार आणि विदेशी यात्रींच्या वृत्तान्तामध्ये याचा उल्लेख शाह बुरुज (शाही बुरुज अथवा बादशाही बुरुज ) असा येतो. याला जस्मीन मनोरा अथवा सुम्मन बुरुज म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यावेळचा इतिहासकार लाहौरी याच्या म्हणण्यानुसार शाहजहानने इ.स. १६३२ – १६४० मध्ये याची पुनर्बांधणी केली. त्याने देखील याचा उपयोग झरोका दर्शनासाठी केला.

मुसम्मन बुरुज:
8DSCN3045.JPGमुसम्मन बुरुजाच्या डावीकडील भाग, दुरवर ताजमहाल दिसतोय:
8DSCN3066.JPG

हि एक आठ बाजू असलेली इमारत असून हिच्या बाहेरच्या पाच बाजू सभागृहाच्या रुपाने नदीच्या दिशेला आहेत. पूर्वेकडील बाजू थोडी बाहेर निघालेली आहे आणि तिच्यावरच शाही झरोका बनवलेला आहे. या महालाच्या पश्चिमेला अजून एक मोठे दालन आहे येथे शाह नशी ( विसाव्यासाठी केलेली व्यवस्था ) बनवलेले आहेत. याच्या फरशांमध्ये एक कुंड बनवलेला आहे. त्या कुंडावरची कलाकुसर बघण्यासारखी आहे. या दालनाच्या नंतर एक अंगण आहे आणि त्याच्या उत्तरेला एक जाळीदार बांधकाम केलेले आहे. पश्चिमेला शिशमहालापर्यंत कक्ष आहेत. तर दक्षिणेला एका कक्षासहित खांबांवर उभे असलेले एक दालन आहे. अशा प्रकारे हा एक भव्य परिसर असून, जो पूर्णपणे शुभ्र संगमरवरामध्ये बनवलेला आहे. भिंतींमध्ये कोनाड्या असल्या कारणाने त्या रिकाम्या आणि साध्या वाटत नाहीत. हा महाल शाहजहानच्या सर्वाधिक अलंकृत इमारतींपैकी एक आहे. हा दिवान ए खास, शिशमहाल, खास महाल आणि इतर महालांशी थेट जोडलेला होता आणि बादशहा येथूनच साऱ्या देशाचा राज्यकारभार बघत असे. येथूनच ताजमहालचे पूर्ण दृश्य दिसते. शाहजहानने आपल्या बंदिवासामधील ८ वर्षे (१६५८-१६६६) येथेच काढली आणि येथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवाला होडी मधून ताजमहालात घेऊन जाण्यात आले आणि तेथेच त्याचे दफन करण्यात आले.

मुसम्मन बुरुजावरून दिसणारी किल्ल्याची भक्कम तटबंदी :
8DSCN3070.JPGमुसम्मन बुरुजावरुन दिसणारा ताजमहाल:
8DSCN3043.JPG

जहांगीरची न्यायाची साखळी ( जंजीर ए अदल ) : (इ.स. १६०५)
हि ती जागा आहे जिथे मुघल बादशहा जहांगीरने १६०५ मध्ये न्यायाची साखळी ( जंजीर ए अदल ) ची स्थापना केली होती. जहांगीरच्या बाबतीत असे लिहिले आहे कि राज्याभिषेकानंतर जहांगीरचा पहिला हुकुम असा होता कि “ न्यायाची एक साखळी लावली जावी, जर न्याय देणाऱ्या लोकांनी न्याय प्रक्रियेत उशीर अथवा दुष्टपणा केला तर पिडीत व्यक्ती योग्य न्याय मिळवण्यासाठी येथे येऊन हि न्यायाची साखळी हलवू शकेल, जिच्या आवाजामुळे माझे लक्ष तिकडे आकर्षिले जाईल.” हि साखळी शुद्ध सोन्याची बनवलेली होती. हिची लांबी ८० फुट होती आणि त्यामध्ये ६० घंटा ओवल्या होत्या. तिचे वजन १ क्विंटल होते. हिची एक बाजू मुसम्मन बुरुजाला आणि दुसरी बाजू नदी किनाऱ्यावरील एका दगडाच्या खांबाला बांधली गेली होती. हि साखळीची कथा कल्पनेतील नव्हती, विल्यम होकीन्स सारख्या समकालीन विदेशी यात्रीने साखळी स्वतः बघितली होती. इ.स. १६२० मध्ये काढलेल्या एका चित्रामध्ये हिचे चित्रण देखील झाले आहे.

8DSCN3072.JPG

लोकांचा त्रास दूर व्हावा यासाठी हा अनोखा प्रयोग करण्यात आला होता. कोणत्याही भयं, शुल्क अथवा औपचारिकता न पाळता जनता थेट मुघल बादशहा पर्यंत ( जो न्याय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्थानी होता) पोहचू शकत असे आणि जनतेला तत्काळ न्याय मिळू शकत असे. या व्यवस्थेमध्ये जाती, धर्म अथवा श्रीमंत, गरीब असा भेद नव्हता. आधुनिक न्याय व्यवस्थेसाठी तर हे एक स्वप्न तर आहेच शिवाय एक चांगली शिकवण सुद्धा आहे. जहांगीरची हि अदभुत न्याय व्यवस्था भारतीय इतिहासात एक उदाहरण बनून राहिली.

छायाचित्रण यंत्राने परत एकदा मेमरी फुलचा मेसेज दाखवायला सुरवात केली होती आता मेमरी कार्ड काढून यंत्राच्या मेमरी मध्ये जेवढे फोटो मावतील तेवढे काढून घेत होतो. स्नेहल-रुपेश मला अंगूरी बाग मध्ये फिरताना दिसले. १७४५ वाजले होते. स्वागतला पण फोन करून तिकडे बोलवून घेतले. आत सुरक्षा रक्षकांनी सर्वाना बाहेर काढण्यास सुरवात केली होती. शेवटी परत एकदा आम्ही आमचा इतिहास कायम ठेवत जवळपास सर्वांच्या शेवटी, साधारण संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास लाल किल्ला सोडला.

( किल्ल्याची सर्व माहिती तिथे असलेल्या हिंदी आणि इंग्रजी फलकांवरील आहे. ती मी फक्त मराठीमध्ये अनुवादीत केली आहे. तसेच काही काही ठिकाणी आंतरजालावर सापडलेल्या माहितीची भर घातली आहे. माझं हिंदी हे “ धावता धावता धपकन पड्या आणि पोहता पोहता बुड्या” तर इंग्रजी “ I is BA” या category मधील आहे. तरी चूक-भूल दे.घे. )

बाहेर आल्यावर दुचाकी व्यवस्थित आहे हे बघितल्यावर जीवात जीव आला. आता भूक पण चांगलीच लागली होती. मोहीम आग्र्याला पोहचली होती. वातावरणात गारवा वाढायला लागला होता. वाटेत जय दादा पण भेटला. मग सगळ्यांनी मिळून लाल किल्ल्यासमोरच असलेल्या ठेल्यावर छोले-भटोरयावर मस्तपैकी ताव मारला. आता आग्र्यामध्ये आलोच आहोत तर पेठा न घेता कसे जायचे? मग तिथल्याच एकाला सर्वात चांगला पेठा कुठं मिळतो विचारले? त्याने ब्रिजवासी का असेच काहीतरी नाव सांगितले. मग रस्ता विचारात विचारात पेठेवाल्याकडे निघालो. असेच जाता जाता वाटेत एका दुचाकीस्वाराला पत्ता विचारला असता तो देखील त्याचं बाजूला निघाला होता, त्या सदगृहस्थाने अगदी दुकानाच्या दारात आणून सोडले. मग किलोच्या भावात खरेदी झाल्यावर, अरे मोहिमेतल्यांसाठी पेठा घ्यायचा राहिलाच हे लक्षात आले. मग मोहिमेसाठी पण पेठा खरेदी झाली. एव्हाना ८ वाजून गेले होते. आजचा मुक्काम गुरुद्वारा श्रीगुरु तेगबहादूर साहिब, गुरु का ताल, आग्रा या ठिकाणी होता. मुक्कामाच्या दिशेने जाताना रस्ता शक्य तेवढा लक्षात ठेवायचा प्रयत्न केला करण उद्या ताजमहाल बघायला ह्याच रस्त्याने जायचे होते.

शेवटी एकदाचे साधारण २०२० च्या सुमारास मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो. मोहीम नुकतीच आली होती. सर्वानी झोपायच्या जागा अगोदरच पकडून ठेवल्या होत्या. गुरुजींशी बोलन झाल तेव्हा अजून एक मोठी खोली ते लोक देणार असल्याच कळल. सर्व ठिकाणाचे plug point , mobile आणि camera नी भरलेले होते. आता काहीतरी डोक लावावं लागणार होतं. दुसऱ्या खोलीची चावी आणायला ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी एक plug point असल्याच लक्षात आलं. ते एक प्रकारच नोंदणी कार्यालय होते त्यामुळे ते रात्रभर उघडे असायचे. तिथे असलेल्या सरदारला विनंती केली.

“ही काळजी करू नका, बिनधास्त लावा चार्जिंगला आणि रात्री कधीही लागला तर घेऊन जा” सरदाराच्या या वाक्याने, परत एकदा बाहेरील लोकांची माणुसकी अनुभवायला मिळाली.

मोबाईल आणि कॅमेरा चार्जिंगला लावून जेवण उरकले. जेवण करून खोलीमध्ये येऊन बघतो तर निम्म्याहून जास्त जण निद्रादेवीच्या अधीन झाले होते. बाहेर थोडा आरडाओरडा ऐकायला आल्यामुळे बाहेर आलो, बघतो तर , ट्रक मधील समान बाहेर काढा म्हणून महिला वर्ग आणि अजून ४-५ कार्यकर्ते गुरुजींच्या मागे लागले होते. अस देखील आम्हाला आमचे पेठे ठेवायला आमचं सामान बाहेर काढावच लागणार होतं, त्यामुळे “ स्वार्थातुन परमार्थ” या उक्तीला अनुसरून आम्ही ७-८ जण समान बाहेर काढायला लागलो. आमच्या सारख्या मोहिमेतील कितीतरी फकीरांना खर तर सामानाची गरज जास्त अशी लागलीच नाही. एकतर हाड गोठवणारी थंडी, त्यात दिवसभर जाडभरड जाकीट अंगावर असायचंच. मोहिमेत तर कितीतरी दिवस आम्ही कुणी कुठल्या रंगाचा शर्ट घातलाय ते पण बघितलं नव्हत. सगळ्यांच्याच अंगावर जर्किन असायची.

माझ्या जर्किनच्या आत मी अजून एक छोट जाकीट घालायचो. ज्यात ब्रश, टूथपेस्ट, mobiles, Camera Chargers, पाकीट आणि इतर सटरफटर वस्तू असायच्या. त्यामुळे सामान बाहेर आल काय आणि नाही आल काय, मला तरी काहीच फरक पडायचा नाही. आमच आपल विंचवाच बिऱ्हाड पाठीवर असायचं.

शेवटी एकदाची आम्ही ६-७ जणांनी ट्रक मधून सामान बाहेर काढायची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. परत एकदा आम्ही त्या मुंबई-लंडन, मुंबई-शिकागो, मुंबई-मॉस्को अशा लांबच्या प्रवासाला निघाल्याच्या थाटात भरलेल्या जड बॅगा बाहेर काढल्या. सर्व बॅगा बाहेर काढून होईपर्यंत इतक्या थंडीत सुद्धा आमचा चांगलाच घाम निघाला होता.

हे सगळ मार्गी लागल्यावर नीलमला शोधल आणि तिच्या laptop च्या सहाय्याने कॅमेरयामधील आणि मेमरी कार्ड मधील सर्व फोटो माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये घेतले. आमच्या मोहिमेच सगळ video recording रघू करत होता. त्याचे मेमरी कार्ड तर २-३ दिवसांनी खाली कराव लागायचं.

नीलमने पण काहीच का-कु न करता सर्व डाटा व्यवस्थित tranfer करून दिला. रात्रीचे २ वाजले होते. शेवटी मी नोंदणी कार्यालयामधून माझे mobiles घेतले. बिचाऱ्या सरदारला रात्री उठवावं लागल याच फार वाईट वाटलं पण पर्याय नव्हता करण सकाळी ५ लाच ताजमहाल बघायला प्रस्थान करायचं होत. त्याची साखरझोप मोडू नये हा उद्देश.

आजचा दिवस फारच दगदगीचा गेला होता तरीही आज बरंच काही बघितलं होत. मी आणि रघू परत आलो तर सगळेजण गाढ झोपेत होते.
चला उद्या जगामधील सर्वोत्कृष्ट मानवनिर्मित आश्चर्य बघायला जायचं हा विचार करतच झोपी गेलो. आज घरी फोन पण करायचा राहून गेला होता.

आजचा प्रवास : १३५ किमी
उद्याचा प्रवास: आग्रा – मथुरा – दिल्ली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मित्रा, एवढी सर्व माहिती तू लक्षात ठेउन लिहितोस म्हणजे तुला भारतात काय जगातल्या कुठल्याही विश्वविद्यापीठात इतिहास तज्ज्ञ किंवा इतिहासप्रमुख म्हणून नक्कीच घेतील......
ही सगळी माहिती एका दमात वाचणे माझ्याच्याने तरी शक्य नाही - हळुहळू, नीट वाचत, आस्वाद घेत पूर्ण करणार आहे.
तुझ्या या सर्व खटाटोपाने (फोटो व संपूर्ण माहिती) मी केवळ स्तिमीत झालो आहे.
अशीच माहिती व फोटो देत रहा, आम्ही सर्व वाचक तुझे अतिशय आभारी आहोत - (हे आभार खरं तर शब्दात मांडता येत नाहीयेत...)

आम्ही सर्व वाचक तुझे अतिशय आभारी आहोत - (हे आभार खरं तर शब्दात मांडता येत नाहीयेत...)
<< +१
प्रत्येक स्थळाचा इतिहास अगदि विस्ताराने लिहलाय. मस्त, प्रकाशचित्रे ही सुंदर

पु.भा. प्र.

शशांक दा, विजय दा आणि मीरा सर्वाना मनापासून धन्यवाद
मीरा >> पुढचे भाग पण लौकर टाक....>>>> खरतरं मी खूप प्रयत्न करतोय, पण काही ठिकाणांची माहिती इतकी विस्तृत आहे कि लिहायला वेळ लागत आहे, शक्य तेवढ्या लवकर पुढील भाग पोस्टतो
शशांक दा >>>> तुला भारतात काय जगातल्या कुठल्याही विश्वविद्यापीठात इतिहास तज्ज्ञ किंवा इतिहासप्रमुख म्हणून नक्कीच घेतील......>>>>>>> तेवढी आपली योग्यता कुठली रे, लहानपणी शिवाजी महाराजांचा आणि हिटलरचा इतिहास सोडला तर बाकी इतिहास कधीच आवडला नाही. हि जी माहिती मिळाली ती थोड इकडचं तिकडचं वाचून रे, अर्थात मला फक्त माहितीच आहे, ज्ञान नाहीच. Happy

सारंग .. कॉपी पेस्ट चालुच आहे... लवकर पुधेचे भाग येउ द्यात... जमलतर वर्षाविहारला जरुर या ... २२ जुलै २०१२ . पानिपतावर जाउन आलेले म्हणे़जे महान तिर्थ क्षेत्रांचे पुण्य लाभलेले... भेटायला नक्की आवडेल

वा सारन्ग खुप छान लेख सुंदर प्रचि अप्रतिम, आग्राचा किल्ला ५ वर्षांपुर्वी पाहीला होता आठ्वणींना उजाळा भेटला Happy

घारुआण्णा, झकासराव व ईनमीन तीन सर्वाना मनापासून धन्यवाद.
घारुआण्णा अगोदर सांगितल्याप्रमाणे ववि ला यायला जमणारच नव्हते. पुढच्या वेळेस नक्की.