आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे

Submitted by मयुरेश साने on 13 July, 2012 - 15:49

आठवांचा गाव आल्यावर असे चालायचे
आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे

आपले नाते जणू की पान गळतीचा बहर
मी तुला माळायचे अन् तू मला टाळायचे

तान मुरक्या शब्द सारे चांगले असले तरी
फक्त आलापात असते जे खरे सांगायचे

लावला नाहीस तू ओठी जरी प्याला कधी
पण तुझ्या ओठात माझे जन्म फेसाळायचे

साद होती बोलकी पडसाद होता बोलका
पण तरी हातात नव्हते हात हाती घ्यायचे

.... मयुरेश साने

गुलमोहर: 

आपले नाते जणू की पान गळतीचा बहर
मी तुला माळायचे अन् तू मला टाळायचे

लावला नाहीस तू ओठी जरी प्याला कधी
पण तुझ्या ओठात माझे जन्म फेसाळायचे
>>
वाह

वाह! मतला मस्तच आहे! खूप आवडेश Happy

साद होती बोलकी पडसाद होता बोलका >> >> साद होती बोलकी प्रतिसाद होता बोलका.. असे वाचून पाहिले Happy