आकस्मिक अपघातावेळी काय करावे ? - मुलांसाठी सीपीआर (CPR) / बेसिक लाइफ सपोर्ट

Submitted by रुणुझुणू on 12 July, 2012 - 03:26

CPR - Cardio-Pulmonary Resuscitation (कार्डिओपल्मनरी रेससिटेशन)

हा लेख वाचताना बर्‍याच जणांच्या मनात "आम्ही डॉक्टरही नाही आणि नर्सही नाही. मग हे आम्ही कशाला वाचायचं ? " असा प्रश्न येण्याची शक्यता आहे.

पण प्रत्येक व्यक्तीला बेसिक लाइफ सपोर्ट्बद्दल जुजबी माहिती असणं गरजेचं आहे.
वेळ-प्रसंग काही सांगून येत नाही. आणि सीपीआर शिकणं, हे वाटतं तितकं अवघडही नाही.

प्राणवायूचा पुरवठा थांबल्यापासून ४ ते ६ मिनिटांत मेंदूला इजा सुरू होते आणि अवघ्या आठ मिनिटात मृत्यू ओढवू शकतो.
अचानक कोसळलेल्या व्यक्तीला त्वरित सीपीआर मिळाला तर जीव वाचण्याची शक्यता वाढते.

कसलंही वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीने सुद्धा अशा प्रसंगी सीपीआर दिला तरी चालतो.

प्रगत देशांमध्ये प्रत्येक पालकाला, नर्सरी किंवा प्रि-स्कूल चालवणार्‍या शिक्षकांना, पोहणं शिकवणार्‍या शिक्षकांना बेसिक लाइफ सपोर्टचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला जातो.
काहीवेळा असं शिक्षण अनिवार्यही असू शकतं.

ह्याचा कुठेकुठे उपयोग होऊ शकतो ?

१. वीजेच्या उपकरणांमुळे लागणारा शॉक
२. श्वास गुदमरणे - वस्तू गिळल्यामुळे, जेवताना अन्नाचा कण अडकल्याने, औषधाच्या गोळ्या अडकल्याने
३. विषबाधा
४. पाण्यात बुडणे (ड्राउनिंग)
५. एक वर्षाच्या आतील मूल अचानक निश्चल होणे (SIDS-Sudden Infant Death Syndrome)
६. अतिरक्तस्त्राव होऊन मूल बेशुद्ध होणे
७. डोक्याला मार लागून मूल बेशुद्ध होणे
८. तीव्र अ‍ॅलर्जी

(List is not exhaustive)

सीपीआर कधी करू नये?

मूल जर शुद्धीवर असेल, खोकत असेल, श्वास घेत असेल तर सीपीआर करू नये.

नेमकं काय करायचं ?

सीपीआर करतानाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी सोपी पद्धत - CAB

C - Circulation / Compressions - छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब देऊन हृद्याचे कार्य चालू ठेवण्यास मदत करणे

A - Airway - श्वासाचा मार्ग मोकळा आहे ना, ह्याची तपासणी करणे

B - Breathing - कृत्रिम श्वास देणे

बर्‍याचदा अपरिचित व्यक्तींना तोंडाने श्वास देण्यासाठी (Mouth-to-mouth breathing) लोक कचरतात.
जंतुसंसर्गाची भिती, बेशुद्ध व्यक्तीला झालेली उलटी किंवा तोंडातून होणारा रक्तस्त्राव, संकोच अशी अनेक कारणे असू शकतात.

त्यामुळे अमेरिकन हार्ट असोसिएशनने (AHA) आता तोंडाने श्वास न देता 'हॅण्डस ओन्ली सीपीआर' (Hands only CPR) तरी केला जावा म्हणून प्रचार चालू केला आहे.

सीपीआर सुरू करण्यापूर्वी -

१. आजूबाजूच्या धोक्याचा अंदाज घ्या. उदा. - वीजेचा शॉक लागला असेल तर त्या मुलाला हात लावण्यापूर्वी विजेचं उपकरण बंद करा.

२. मूल शुद्धीवर आहे का हे पहा. त्यासाठी मुलाच्या खांद्यावर किंवा पाठीवर हलकेच थोपटून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा.
मुलाला जोरजोरात हलवू नका.
असे केल्यास घशात अडकलेली वस्तू खोलवर जाऊन स्थिती आणखी गंभीर होऊ शकते किंवा जर मणक्याला इजा झालेली असेल तर श्वासोच्छवास पूर्ण थांबू शकतो.

३. मुलाने रिस्पॉन्स न दिल्यास सीपीआर चालू करा.
सोबतच्या व्यक्तीला त्वरित वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी योग्य त्या नंबरवर फोन करण्यास सांगा.

C-Circulation / Compressions - छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब देऊन हृद्याचे कार्य चालू ठेवण्यास मदत करणे.

१. मुलाला जमिनीवर किंवा योग्य अशा सपाट भागावर पाठीवर झोपवावे.

२. मुलाच्या शेजारी गुडघ्यावर बसावे.

३. मुलाच्या छातीच्या मधोमध एक तळवा पालथा ठेवावा. त्यावर दुसरा तळवा ठेवावा. (लहान मुलांमध्ये एकाच हाताचा वापर करणं योग्य)

४. हात (सीपीआर करणार्‍या व्यक्तीचे) कोपरात न वाकवता सरळ ठेवावेत.

५. एका लयीत १,२,३,४,५......३० पर्यंत मोजत, पंप दाबल्याप्रमाणे छातीवर दाब द्यावा.
एका मिनिटात साधारण १०० कम्प्रेशन्स होतील अशा वेगात करावे.

Chest compressions-CPR.jpgA-Airway - अर्थात श्वासाचा मार्ग मोकळा करणे.

१. मुलाची हनुवटी उचलून आणि कपाळ थोडंसं मागे दाबून श्वास घेण्याचा मार्ग मोकळा करण्यास मदत करावी.

२. मुलाच्या छातीच्या हालचालीकडे लक्ष देऊन श्वास चालू आहे का ते पहावे.


B-Breathing - कृत्रिम श्वास देणे

१. मुलाचा श्वास चालू नाही अशी शंका आल्यास मुलाच्या तोंडावर आपले तोंड ठेवावे.

२. मुलाचे नाक चिमटीने बंद करावे.

३. एका सेकंदाला एक अशा पद्धतीने दोन श्वास आत सोडावेत.

Mouth breathing-CPR.jpg

वैद्यकीय मदत मिळेपर्यंत ३० चेस्ट कम्प्रेशन्स - २ श्वास - पुन्हा ३० कम्प्रेशन्स - २ श्वास हे चक्र चालू ठेवावे.

मूल शुद्धीवर आल्यावरही तपासणीसाठी डॉक्टरकडे घेऊन जावे.

एक वर्षाच्या आतील बाळाला सीपीआर देताना करायचे बदल :

अशावेळी बाकी सगळी पद्धत वरच्यासारखीच ठेवायची.
फक्त काही फरक लक्षात ठेवायचे-

१. मूल शुद्धीवर आहे का हे तपासण्यासाठी खांद्यावर थोपटण्याऐवजी तळपायांवर चापट्या माराव्या.

२. छातीवर दाब देताना संपूर्ण तळव्याचा वापर न करता फक्त दोन बोटं वापरावीत आणि फार जोरात दाब देऊ नये.

Infant-chest compressions.jpg

३. श्वासाचा मार्ग मोकळा करताना मानेवर फार जोर देऊ नये. एका हाताने हलकेच कपाळ मागे करावे आणि दुसर्‍या हाताने हनुवटी थोडी उचलावी.

४. काही वेळा अशा बाळांमध्ये चेस्ट कम्प्रेशन्स सुरू करण्यापूर्वीच पाच रेस्क्यु ब्रिद्स (Rescue breaths) देण्यास सांगतात.

********************************************************************************************************************

हा लेख वाचून कृपया कुणी घाबरून जाऊ नका.
ह्याचा उद्देश आवश्यक माहिती देणं इतकाच आहे Happy

लहान मुलांनी नाकातोंडात वस्तू घातल्याने होणारे अपघात ह्या धाग्यावर ह्याविषयी चर्चा झाली आणि अशी माहिती सहज उपलब्ध असावी असं मत आल्याने हा लेख लिहिला आहे.

भारतात असलेल्यांना हे फारच नवीन किंवा त्यांनी शिकण्यासाठी अनावश्यक प्रकरण वाटण्याची शक्यता आहे. पण युके, अमेरिका किंवा इतर प्रगत देशांमध्ये राहणार्‍यांना ही माहिती सतत कानावर पडत असेल.
तिथे शाळेतील मुलांनासुद्धा काहीवेळा सीपीआरचं प्रशिक्षण देतात आणि ते दिलं जावं असं अमेरिकन हार्ट असोसिएशनचे मत आहे.

ब्रिटिश रेड क्रॉस संस्थेचे हे सोप्पे व्हिडिओज.
१. १ ते ८ वर्षे वयातील मुलांसाठी सीपीआर देण्याची पद्धत
२. एक वर्षाच्या आतील बाळांसाठी सीपीआर देण्याची पद्धत

सोप्या भाषेतील आणखी काही लिंक्स :
१. http://www.nlm.nih.gov/medlineplus/ency/article/000012.htm
२. http://kidshealth.org/kid/watch/er/cpr.html?tracking=K_RelatedArticle#
३. http://www.mayoclinic.com/health/first-aid-cpr/FA00061

* सीपीआरचे अधिकृत प्रशिक्षण (जे साधारणपणे २-३ तासांचं असतं) घेणे केव्हाही हितावह.
शक्य असेल त्यांनी असं प्रशिक्षण घ्यावे आणि दर दोन वर्षांनी त्याची उजळणी करण्याचा प्रयत्न करावा.

* सर्व प्रचि जालावरून साभार.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख म्हणजे सीपीआरचे अधिकृत प्रशिक्षण (जे साधारणपणे २-३ तासांचं असतं) घेण्याला पर्याय नाही.
शक्य असेल त्यांनी असं प्रशिक्षण घ्यावे आणि दर दोन वर्षांनी त्याची उजळणी करण्याचा प्रयत्न करावा.
>>> हे वाक्य एडीट करायला हवंय. "हा लेख म्हणजे..." च्या पुढचा भाग आला नाहीये.

छान माहिती. एक प्रश्न म्हणजे अशा वेळेस हे करण्याची पद्धत थोडीफार चुकली तर त्या व्यक्तीचे जास्त नुकसान होऊ शकते का? म्हणजे अगदी अचूक जमणार नसेल तर न केलेले बरे की जेवढे जमेल तेवढे करणे योग्य?

अधिकृत प्रशिक्षणात हे सांगत असतीलच. पण ज्यांनी ते घेतलेले नाही अशांनी काय करावे?

तू अत्यंत उपयुक्त माहिती इतक्या सोप्या भाषेत देतेस ना, की एकदा वाचताच कायमस्वरूपी लक्षात रहावं!
खूप आभार तुझे!

मला दिसत आहेत ही वाक्ये >>>
वाक्य नीट दिसतंत म्हणजे मला म्हणायचंय की वाक्य वाचताना नीट अर्थ लागत नाही आहे. 'सीपीआरचे अधिकृत प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही.' हे एक पूर्ण अर्थाचे वाक्य आहे. पण 'हा लेख म्हणजे' ह्या सुरुवातीच्या शब्दांचा त्या वाक्याशी संदर्भ लागत नाहीये.

फारएण्ड,
<< म्हणजे अगदी अचूक जमणार नसेल तर न केलेले बरे की जेवढे जमेल तेवढे करणे योग्य? >>

जेवढे जमेल तेवढे केलेले योग्य.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या प्रोमोमधील ही वाक्ये :

Hands-Only™ CPR Can Save Lives.
Most people who experience cardiac arrest at home, work or in a public location die because they don't receive immediate CPR from someone on the scene.
As a bystander, don't be afraid. Your actions can only help.

बागेश्री, तसं होत असेल तर उद्देश सफल झाला Happy

निंबुडा, ओक्के. बदल करते.

धन्स, रुणु.
हा लेख आणि नाका-तोंडात वस्तु जाऊन होणारे अपघात हे २ लेख विपत्रातून पाठवले तर चालेल का? (अर्थात लेखनकर्तीचे नाव retain करून!) आजुबाजुचे ओळखीचे असे लोक ज्यांची मुले या वयोगटात येतात आणि जे मायबोली वाचक नाहीत त्यांना हे २ लेख पाठवायचे आहेत.

ग्रेट! धन्स रूणु Happy

अत्यंत उपयुक्त माहिती.

याचे आणि नाक-तोंड अपघात या दोन्हीचे प्रिंटस काढुन फ्रिजवर/ घरच्या नोटिस बोर्डावर लावुन ठेवायला हवेत.

चांगली माहिती. सीपीआरचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याची आठवण झाली. आता एकदा उजळणी वर्ग करायला हवा. Happy

खुप छान आणि सोप्या शब्दात माहिती.. किती कळकळीने सांगतीयेस गं सगळं Happy

धन्यवाद हा शब्द पण कमी पडेल आता

याचे आणि नाक-तोंड अपघात या दोन्हीचे प्रिंटस काढुन फ्रिजवर/ घरच्या नोटिस बोर्डावर लावुन ठेवायला हवेत.>>> लाजो +१११

अमेरिकेत डिलिव्हरीच्या वेळी बर्^याच हॉस्पिटलमध्ये हे शिकवायची सोय असते. (मोफत जेव्हा तुम्ही तिथे दाखल असता त्या कालखंडात तरी) ..आपण ज्या हॉस्पिटलला जाणार आहोत तिथे चौकशी करून ठेवल्यास त्यांचं स्केड्युल, आपलं तिथे असणं याप्रमाणे हा कोर्स करता येतो.... बाळ निक्युमध्ये असताना मी केला होता...
तिथे एका बाहुलीवर हे कसं करायचं ते दाखवतात आणि आपल्याकडूनही करून घेतलं जातं.....ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर लाभ घ्यावा.... Happy
रुणुझुणू नेहमीप्रमाणे उत्तम माहिती.... Happy