भटकंती - औरंगाबाद (लोणार सरोवर)

Submitted by Chintu on 9 June, 2012 - 10:28

भटकंती - औरंगाबाद (अजिंठा) ...मनुष्याने आयुष्यात एकदा तरी पाहावेच अशा अविस्मरणीय स्थळांला भेट देण्याची बुद्धी आणि शक्ती दिल्याबद्दल मनातल्या मनात त्या विधात्याला शतश: धन्यवाद दिले आणि परतीचा प्रवास सुरू केला.
♦♦♦♦♦

बस परत MTDC ला आली. "दोन्त फोरगेत मी. आय अ‍ॅम रितार्यद ओल्द मेन फ्राम पोलंद. आय एम फ्राम पोलंद. आय एम गोईग तु इत. आदिओस." (Don't forget me. I'm retired old man from Poland. I am going to eat. Adios) असं म्हणत सकाळी ओळख झालेले पोलिश बाई, सोबतचा म्हातारा आम्हाला टाटा करुन गेले.

हातात अजुन एक दिवस आहे, उद्या काय करायचं? पैठणचा बेत माझ्या डोक्यात घोळत असतानाच त्याला यथोचित सुरुंग लावायच काम सौ ने केल. तिला लोणार बघायचं होत. मीही नेहमीप्रमाणे सुज्ञ पतीदेवाचा अविर्भाव आणून तिच्या हो मध्ये हो मिळवला. या “हो” मागे ‘पैठणच्या पैठणी मोरांनी माझा मोरू करण्यापेक्षा लोणार चांगला पर्याय’ असं अतिसुज्ञ विचार होता. तर बाहेरच असलेल्या अनेक गाडीवाल्यांपैकी एकाला योग्य त्या भावात पटवलं आणि सकाळी सहा वाजता निघायच ठरवलं.

“लोणार” हा शब्द पहिल्यांदा केव्हा बरं ऐकला? शाळेच्या भूगोल नामक अजून एका सरकारी छळवाद पुस्तकात. “लोणार” म्हटल्यावर माझ्यासमोर डोळ्यासमोर पांढराशुभ्र लोण्याचा गोळा यायचा नेहमी. भूगोलाच्या पेपरात टिपा लिहा या सदराखाली ४ मार्कांसाठी येणारा हमखास प्रश्न आणि त्यासाठी केलेली घोकंपट्टी हा एवढाच काय तो मला वाटणारा जिव्हाळा या सरोवाराबद्द्ल. खरंतर पुस्तकात फक्त चित्र रुपाने भेटणारी ही ठिकाण आपण आयुष्यात खरीखुरी प्रत्यक्षात बघू शकतो हे माझ्या चिमुकल्या डोक्यात कधी यायचं नाही. या गोष्टी फक्त आणि फक्त पाठांतरासाठी असतात हे इतक पक्क मनात बसल होतं.

५० हजार वर्षापुर्वी अशनी पडुन हे विवर तयार झालं. अशाप्रकारे तयार झालेलं जगातलं हे तिसर्‍या क्रमांकाचं विवर बुलडाणा जिल्ह्यात आहे. १८२३ मध्ये जे. ई. अलेक्झांडर या ब्रिटीश अधिकार्‍याने याचा शोध लावला. असं जरी असलं तरी स्कंदपुराणात, पद्मपुराणात आणि आइना-ए-अकबरी यांमध्ये सुद्धा या जागेचा उल्लेख आहे. दंतकथेनुसार भगवान विष्णूने येथे लोणासुर नावाच्या दैत्यावर विजय मिळवला, त्यामुळे ठिकाणाचं नाव लोणार असं पडलं.

View Larger Map

बेसॉल्ट म्हणजेच काळ्या खडकात ६ कि.मी परिघ असलेलं ह्या सरोवराचा आकार गोल, हॉटेल मध्ये सुप पिण्यासाठी खोलगट आकाराची जी वाडगी असतात तसा आहे. एवढया मोठ्या आकाराचा खड्डा, आणि तोही काळ्या कातळात करणारी अशनी किती मोठी असेल याचा आपण फक्त अंदाजच करु शकतो. आजुबाजूला गोड्या पाण्याचे स्रोत असले तरी या सरोवराचं पाणी खारं आहे, आणि नुसतच खारं नाही तर समुद्राच्या पाण्यापेक्षा ६-७ पटिने जास्त खारं.

तस लोणार हे ठिकाण काही पिकनीक स्पॉट नाही त्यामुळे ज्यांना खरोखरच काही वेगळ बघायचं आहे अशांनीच इथे यावं. नाहितर क्षितीजा पर्यंत पसरलेल्या सपाट जमिनीवर एक मोठ्ठा खड्डा, खड्ड्यात हिरवं शेवाळं आलेल पाणी, आणि डोक्यावर रणरणतं विदर्भातलं उन याव्यतिरीक्त इथे काही नाही. पिकनीक म्हणुन येत असाल तर स्वत: च्या खाण्यापिण्याची सोय करुनच या. कारण इथे तुम्हाला काहिही मिळणार नाही. नावाला MTDC च हॉटेल आहे पण "भिक नको पण कुत्रा आवर." अशी परिस्थिती. जेवणात अळ्या मिळाल्याचं बरेच जण सांगतात. "वाटेत हवं तर कुठेतरी ढाब्यावर खा. तुम्ही सांगाल तिथे गाडी थांबवतो. इथे खाउ नका." अस ड्रायवरने आम्हाला सांगितलं. त्यामुळे आम्ही हेही नको आणि तेही नको अस करून औरंगाबादला परत आल्यावरच काय ते जेवलो.

औरंगाबादहुन सकाळी ६ ला निघालो. आतापर्यंत फक्त भूगोलाच्या पुस्तकात पाहिलेले जिल्हे प्रत्यक्षात पहात होतो. कोकणातली हिरवीगार झाडी आणि एका नजरेत न भरणारा अथांग समुद्र पहाण्याची सवय असलेल्या माझ्या डोळ्यांना ही रखरखीत गाव नवीनच होती. बातम्यामधून इथल्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याबद्दल नेहमीच ऐकत आलेलो. पण आज प्रत्यक्षात पाहताना मात्र कसंतरीच वाटत होतं. दूरदूरवर पसरलेल्या रखरखीत शेतात एखाददुसरं झाड. वरती उन वाढत होतं आणि खाली रखरखाट. ड्रायवरबरोबर गप्पा ही चालेल्या. त्यावरून इथल्या एकूणच परिस्थितीचा काय तो अंदाज आला.

एकेक करत जिल्हे मागे पडत होते. आम्ही ९ ला १६० कि.मी चा प्रवास करुन लोणारला पोहचलो. सुर्य डोक्यावर येण्या अगोदर जितकं बघाता येईल तितक बघायचं असं ठरवून मी आणि सौ. ने विवर उतरायला चालू केलं. विवर उतरायला खुप कठीण आहे अशी माहिती आम्ही इंटरनेट वर वाचलेली, त्यामुळे मनाची तयारी करुन गेलेलो. पण प्रत्यक्षात मात्र तसं काही नाही. तरी ज्यांना कोणाला विवरात उतरायच असेल त्यांनी कॅनवासचे बुट, भरपुर पाणी, डोक झाकायला टोपी/रुमालं घेउन घालुन यावं. विवरात उतरणं आणि चढणं म्हणजे एक छोट ट्रेकच आहे.

विवर पुर्ण उतरल्यावर पुढची वाट सोपी आहे. सरोवराच्या काठावर काही जुनी देवळं आहेत. वाटेत १-२ पडकी जुनी देवळं दिसतात. आम्हाला अगोदर वाटेत एक रामचं देऊळ लागलं. देवळाच्या बाजुला अजुन एक तसच बांधकाम होत, पण त्याची बरिच पडझड झालेली. वाटेत अजुन एक दगडाचा ढिगारा दिसला. जमिनीवर मोठे मोठे दगडी खांब सांडले होते. बहुदा इथेही पुर्वी देउळ असावं. खांबावरील जुनं कोरिवकाम बघून तसं वाटलं.

आम्ही वाट सोडुन एकदम काठावरुन जाउ लागलो. सरोवरचं शेवाळ आलेल हिरव पाणी. वारा पाण्यावरुन येताना सोबत कुजकट, सडका, विचित्र खारा वास घेउन जोराने वाहत होता. आणि सरोवराकाठची जमीन आणि खडकांवर क्षारांचा पांढरा रंग चढलेला.

देवगड किल्ल्यात रहाणारी लोकं खटवी सुकत घालतात. कोळंबी / चिंगळांचा एक प्रकार. खटवी कोळंबी पेक्षा आकाराने मोठी, साधारण हाताच्या अंगठ्याएवढी जाड असते. ही खात नाहित. सुकवुन, खत बनवण्यासाठी फिश फॅक्टरिंना पाठवतात. असे सुकट पक्षांसाठी मेजवानी. गिधाडं आणि घारी हे सुकट खायला झुंबड करातात. जिकडे हे सुकट वाळत घालतात त्याच्या आसपासची जमिन, झाडंझुडप, पक्षांच्या विश्ठेने चुना लावल्यासारखी पांढरी होतात. खटवी जसजशी सुकायला लागते तसतसा तिला येणारा वास अजुन अजुन तिव्र होत जातो. दुपारी उन्ह चढली की समुद्रावरून वारा भसाभसाकरुन वहायला लगला की समुद्रावरुन येणार्‍या खार्‍या हवेचा वास, सुकलेल्या खटवीचा सडका वास, आणि गिधाडांच्या विश्ठेचा वास एकत्र होउन सगळ्या जागेत भरुन रहातो. सरोवराचा तो वास, रणरणत उन आणि पांढरे झालेले ते दगड बघुन मला क्षणभर देवगडाची आठवण झाली.

थोड्याच अंतरावर झाडांच्या जाळीतुन लाल झेंडा फडकताना दिसला. एक देऊळ दिसल, बरेच लोक येत जात होते. ते कमळजा देवीचं देऊळ होत. येणार्‍या लोकांच कुलदैवत होत ते. काही लोकं देवीला कौल लावत होते तर, म्हातारी माणसं विवर उतरुन आल्याने दमली होती. देवळाच्या जवळ झाडाखाली विश्रांती घेत बसली होती. नुकतच लग्न झालेले देवीच्या पाया पडायला येत होते. सौ मला हळुच म्हणाली "मुलींनी लग्ना अगोदर मुलाची कुलदैवत कुठे आहे हे पण विचारल पाहि़जे. तुझ्या कुलदैवताला असं ट्रेक करुन याव लागलं असत तर मला विचार करावा लागला असता." मी सौला एक चांगली खुन्नस दिली.

देवळाच्या बाजूला एका झाडाखाली सावलीत जरा विसावलो. तिथून सरोवराकडे पाहत असताना नकळतच त्या घटनेचा चित्रपट माझ्या मनात बनू लागाला. हजारो वर्षांपूर्वी एका भला मोठा दगड अवकाशातुन जोराने पृथ्वीच्या दिशेने येतोय. वातावरणाच्या कक्षेत आल्यावर त्याचा एक आगीचा लोळच बनला आणि अधिक वेगाने तो जमिनेकडे झेपावू लागला आणि... धडाम्म्म धुम्म!! जोरदार आवाज करत थडकला. बरीच उलथापालथ झाली असणार. काही जीवसृष्टी नाहीशी झाली असेल तर काही नवीन जन्माला आणि असेल. या घटनेचे नाही पण निदान त्या ठिकाणाचे दर्शन घेण्याच भाग्य आज मला मिळालं. भूगर्भ शास्त्राज्ञांसाठी तर अशी ठिकाण म्हणजे पंढरीच. माझ्यापुरत म्हणायचं तर ४ मार्कांच्या टिपेपेक्षाही माझ्या नजरेत कैक पटीने या ठीकाणाचं मोल वाढलेल होतं.

निळसर हिरव्या लाटांचा आवाज कानात भरत होता. गेली कित्येक वर्ष या लाटा अशाच बनत असतील किनार्‍याला लागून फुटत असतील. या विवराबाहेरच जग ठवूक तरी असेल का त्यांना? प्रचंड उलाथापालथी मधून तयार झालेल्या या लाटा बाहेरील जगाच्या उलथापालथीत किती दिवस टिकून राहतात हा प्रश्नच आहे.

समाप्त.

गुलमोहर: 

छान.

>>प्रचंड उलाथापालथी मधून तयार झालेल्या या लाटा बाहेरील जगाच्या उलथापालथीत किती दिवस टिकून राहतात हा प्रश्नच आहे -- खरंय!!
(जवळपास असंच मला प्रत्येक वेळी कोकणातून येताना वाटतं !)

सुंदर फोटो, अजून हवे होते.
मला खुप इच्छा आहे इथे जायची, अजून जमलेले नाही. हे पाणी खारट असले तरी तो खारटपणा मीठामूळे आलेला नाही, असे वाचले होते. एकदा हे सरोवर बरेच आटले होते त्यावेळी तो क्षार, मीठ म्हणून लोकांनी खपवायचा प्रयत्न केला होता, असे पण वाचले होते.

या सरोवरातले शैवाल पण वेगळेच आहे, असेही वाचले होते.

धन्यवाद चिंटू!
वर्णन सुरेखच केलेत.
मी ८ वर्षांपूर्वी गेले होते आणि कायम स्मरणात राहिलेले अत्यंत मनोरम निसर्गस्थान आहे हे!
फोटो पाहून आठवणी पुन्हा ताज्या झाल्या..
आभारी आहे Happy

छान..

छान.

सुंदर वर्णन आणि प्रचि

पैठणचा बेत माझ्या डोक्यात घोळत असतानाच त्याला यथोचित सुरुंग लावायच काम सौ ने केल. >> नशिबवान आहात... आमच नेमकं उलटं झाल होतं :p

@आशिगो:
>>प्रचंड उलाथापालथी मधून तयार झालेल्या या लाटा बाहेरील जगाच्या उलथापालथीत किती दिवस टिकून राहतात हा प्रश्नच आहे -- खरंय!!
(जवळपास असंच मला प्रत्येक वेळी कोकणातून येताना वाटतं !)>>

खरं आहे. अगदी मागचे २-३ वर्षापर्यंत गांव बरा होता. मागल्या गणपतीला गावी गेलेलो. येणार्‍या जाणार्‍या पर्यटकांनी अगदी उकिरडा करुन टाकला आहे गावाचा. इतके वर्ष मी कधी गावातल्या रस्त्यांवर कचरा बघितला नव्ह्ता. आता अगदी पावलो पावली, वेर्फसची पाकिटं, पाण्याच्या, दारुच्या बाटल्या पडलेल्या.

पर्यटकाना फिरण्यासाठी सरकारने समुद्रकिन्यार्‍यावरुन मातीचा रस्ता केलाय. एकेकाळी वाळु दुधासारखी पांढरी होती. (यात अतिशयोक्ती अजिबात नाही). आज गाड्या थेट समुद्रावर जातात. डिजेल, पेट्रोल, ग्रिस पडुन सगळच घाण झालय.

पाण्याची पातळी वाढते म्हणजे नक्की काय हे तिकडे रहुन समजतं. मी लहान असताना गावापासुन समुद्र १-१.५ कि.मी आत होता, आता अगदिच ५०० मिटर अंतर उरलं आहे. दर पावसाळ्यात देवबाग / तारकर्लीतील कितीतरी घर समुद्र गिळुन टाकतो.

गांव किती दिवस राहील हे माहित नाही.

अर्रे जबरदस्तच!
कित्येक वर्षापासून लोणार पहायची तीव्र इच्छा आहे. नगरात राहूनही अजून जमलेलं नाही........बघूया कधी जमतंय!

छान वर्णन आणि प्रचिपण! झोपलेल्या मारुतिच्या देवळात गेले नव्हते का? बुगदाणी सर तिथल्या विकासासाठी बरंच काम करतात तसेच त्यांनी बराच अभ्यास केला आहे.

मस्त प्रचि आणि सुंदर माहिती...
मस्कतमधल्या अशनी विवराचा झब्बू द्यायची इच्छा होत आहे Happy

Pages