'आजा' उर्फ आजोबा !

Submitted by Yo.Rocks on 7 June, 2012 - 15:59

'काय रे.. आजुबाजूच्या डोंगरावर जाता की नाही कधी ? ' असे विचारताच लहानग्या उत्तरला, ' हो.. 'आजा'ला जाउन आलोय..'

आम्ही पण नुकतेच 'आजा' वर खाली उतरलो होतो.. हा 'आजा' पर्वत म्हणजेच आ जो बा ! सह्याद्री रांगेतील उंच शिखरापैंकी एक शिखर.. उंची जवळपास ४५०० फूट... हरिश्चंद्रगड, रतनगड वा कुलंगवरून सहज नजरेस पडणारा हा पर्वत.. शहापुरपासून अंदाजे ४२ किमी अंतरावर वसलेला हा महाकाय पर्वत.. इतिहास सांगायचा तर महर्षी वाल्मिकी ऋषींचा आश्रम इथे आहे.. श्रीरामांच्या आज्ञेनुसार सीतामाई नंतर इथेच येउन राहील्या होत्या व इथेच 'लव-कुश' यांचा जन्म झाला असे म्हणतात.. महर्षी वाल्मिकी ऋषींनीच त्यांना प्रशिक्षण दिले.. त्यांचे ते आजोबा म्हणूनच हा पर्वत आजोबा पर्वत ओळखू जाउ लागला..!

इथे यायचे तर डेहणे (आसनगाव -शहापूर-डोळखांब -डेहणे) हे पायथ्याचे गाव गाठायचे.. आमच्या प्लॅनप्रमाणे आम्हाला हा वटपौर्णिमेचे निमित्त साधून शनिवारीच 'नाईट ट्रेक' करायचा होता.. 'आजोबा' करण्याचा मनसुबा मायबोलीकर 'रोहीत.. एक मावळा' चा होता.. नि नेहमीप्रमाणे कोणी जर तो ट्रेक केलेला नसेल तर 'हा नको तो करुया' असा कुठलाही विरोध न करता लगेच दुजोरा देतात.. यावेळीही तसेच झाले.. साहाजिकच गाडी वगैरे सोय करण्याची जबाबदारी मात्र रोमावरच ढकलली.. Proud मोजून चार मायबोलीकर (गिरिविहार, सुन्या, मी व रोमा) आणि रोमाचे तीन मित्र (गोपी, प्रदीप व रोहन) असे सातजण एकदम पक्के होते.. इतरांना पण समस पाठवला गेला व शेवटी सुन्याच्या गँगची भरती झाली आणि गाडी फुल झाली.. या गँगमध्ये सौ. सुन्या, झीनत, विशाल व शफीर असे चारजण.. गाडी पण तशी ऐनवेळेला पक्की करण्यात आली होती.. त्याचे कष्ट रोमा लाच माहीत.. कारण त्यात बरीच फोनाफोनी, गाडीचा शोध, गाडी कॅन्सल, मग दुसरी गाडी, रेट ठरवतानाची घासाघासी इति समाविष्ट !! Proud बरे हे सगळे ज्यारात्री निघायचे त्याच संध्याकाळी ठरले.. !!!

रात्री ९ ची कसारा फास्ट पकडण्यासाठी दादरला पोहोचलो तर प्लॅटफॉर्मवर अपेक्षित अशी तोबा गर्दी.. त्यात ट्रेन १० मिनीटे उशीराने धावत होत्या.. ताबडतोब रोमा ला फोन करुन सांगितले पकडली तर पकडली नाहीतर मग तासभराने येणारी शेवटची गाडी ! त्यातपण नाही जमले तर सरळ घरी ! मुंबईत पश्चिम उपनगरात राहत असाल नि ट्रेकचे व्यसन असेल तर हा सगळा फुकटचा त्रास आहे.. ! गिरी तर म्हणतो बोरिवलीवाल्यांनी ट्रेकचा छंदच लावून घेउ नये.. काय करणार.. नेहमीच्या वेळेत आणखी एक तास वाढवावा लागतो.. ! शेवटी काय तर आमची मस्ती !

ट्रेन आली, पोटाशी सॅकला आवळून त्या भल्या गर्दीत एका दमात चढलो नि हूश्श ! पुन्हा फोनाफोनी करुन सूचना दिली की प्रत्येकाने जमले तसे वेगवेगळ्या डब्यात चढावे.. पुण्याहून येणारे झीनत व विशाल कल्याणला चढणार होते.. आधीच गर्दी आणि त्यात असह्य उकाडा यामुळे ठाणे येइपर्यंत घामानेच अंघोळ झाली.. जल्ला ट्रेकमध्ये निघणारा घामटा परवडला !

ठाणे आले.. गाडी सुटली.. कल्याण आले.. गाडीतली गर्दी कमी झाली.. नि आम्ही सगळे एकत्र आलो.. पण रोमाचे दोन मित्र चढू शकले नाही सो ठाण्यालाच राहीले हे समजताच मात्र वैतागलो.. जल्ला आधी माहीत असते तर तासभर उशीराने नसतो का निघालो... आसनगावला पोहोचताच नित्यनियमाप्रमाणे आमची भूक खवळली नि ते राहीलेले दोघेजण येईस्तोवर खाउन घेउया म्हणून आमची वरात जवळच असणार्‍या हायवेवरचे हॉटेलकडे निघाली.. दुसरीकडे रोमाने आसनगावला आलेल्या गाडीवाल्याला कळवले की आता निघण्यास तासभर उशीर होईल.. नि तो गाडीवाला कटकट करू लागला.. रोमा टेंशनमध्ये सारखा फोनवर आणि आम्ही निवांत !! Proud आमच्या नेहमीच्या ट्रेकपेशल मेनुची (हे काय असते ते ट्रेकला आल्यावरच कळेल) ऑर्डर गिरीने केली नि पेटपुजा जोरात सुरु झाली.. म्हणतात ना ट्रेकमध्ये पचेल असेच खायचे.. पण आम्ही पचवतो नि ट्रेक करतो.. Proud त्यातच रोमाचा चार दिवसापुर्वी वाढदिवस होउन गेला होता सो ठरल्याप्रमाणे सुन्या ने घेउन आणलेला केक त्याला फक्त दाखवला नि हॉटेलचे बिल रोमाच भरणार यावर आमचे शिक्कामोर्तब झाले.. बिच्चारा आधीच टेंशनमध्ये नि आता आमची ही मस्ती !

अखेरीस रात्री साडेबाराच्या सुमारास आमची पूर्ण टोळी एकत्र आली नि आम्ही आसनगावच्या दिशेने प्रयाण केले.. गोल्डन हिट गाणी ऐकत आम्ही तासभरात जवळपास पोहोचलोच.. पण नक्की कुठे उतरायचे ते कळत नव्हते.. बैलगाडीच्या रस्त्याचा फाटा लागतो तिथून सुरवात करायची हे ठाउक होते.. तसा एक फाटा लागलासुद्धा.. 'खारीपाडा, डेहणे' असा अगदी पुसटसा फलक दिसला.. पण उगीच चुकामूक नको म्हणून आम्ही पुढे जाउन डेहणे गावच गाठले.. तिकडे विचारपूस केली नि आधीच्याच फाटयाने जायचे कळले.. तिथूनच शहापुरसाठी निघणार्‍या शेवटच्या एसटीची वेळ (दुपारी २ वा.) विचारून आम्ही मार्गस्थ झालो..

वाटले गाडीवाला आता त्या फाटयावरच सोडेल.. पण त्याने त्या खडबडी रस्त्यात गाडी घातली सो आम्ही पण जातोय तितके जाउया असे मनाशी पुटपुटत गप्प राहीलो.. Wink पण हा रस्ता गाडीसाठी वाटतच नव्हता.. मोठमोठे दगड नि त्यापेक्षा मोठे चढण.. तरीपण डागडुग करत गाडी पुढे जात होती.. बाहेर अंधार असला तरी वटपौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाचे अस्तित्व जाणवत होते... कुठेतरी शेतजमिनीवरची मशागतीची आग धगधगत होती... नि अंधारात त्या आगीने घेतलेले अगदी नक्षीदार वळण खरच लाजवाब वाटत होते.. त्यातच वाटेत ससे आडवे गेले नि प्रवास अगदीच रंजक ठरला..

जसजशे पुढे जात होतो तसे चढण वाढत गेले.. आम्ही आपले चालायचे अंतर वाचतेय म्हणून खुष होतो.. पण एका वळणावर मनात शंका पुटपुटली की गाडी अशीच मागे तर नाही ना जाणार.. नि काही क्षणात तसे झाले.. पटकन ड्रायवरने ताबा आणत गाडी थांबवली.. आम्ही उतरुन लगेच टायरखाली दगड घातले.. नि म्हटले गाडीप्रवास पुरे आता.. पण झाले काय की त्याचा आता ब्रेक लागेना.. कर्म त्याचे.. आम्ही दोन मोठी चढण पार केली होती नि अशा परिस्थितीत ब्रेक न लागणे खूप धोक्याचे होते.. सो मग आमच्यातले काही गाडीला समोरुन धरत.. तर ऐनवेळी नियंत्रण सुटल्यास संकट टाळण्यासाठी काहीजण हातात मोठे दगड घेत.. असे करत करत गाडीला खाली आणले.. ! जल्ला गाडीला पहिल्यांदाच पुढून धक्का दिला.. Proud

पुढे तेवढी अडचण वाटत नव्हती म्हणून ते दोन मोठे चढण उतरुन आल्यावर त्याला पैसे देउन रामराम केले.. हुश्श.. इतक्या खटापटीनंतर खरा ट्रेक आता सुरु होणार होता.. चंद्रप्रकाशाने आजुबाजूचे रान नाहुन निघाले होते.. त्यातच आम्हाला एका बाजूस बर्‍यापैंकी मोकळी जागा दिसली.. मग इथेच रोमाच्या वाढदिवसाचा केक कापून ट्रेक सुरु करण्याचे ठरले.. दुधाळ चंद्रप्रकाशात सुटलेला मंद वारा नि आजुबाजूच्या झाडीतून चमकणारे काजवे यांच्या संगतीमध्ये रोमाने केक कापला.. किती नशिबवान तो आमच्यासारखे सवंगडी भेटले ! Proud

प्रचि १:

प्रचि २: रोमा आणि सुन्या

केक खाण्याचा कार्यक्रम आटपला नि आपापल्या सॅक उचलून चालू पडलो.. आ जो बा च्या दिशेने.. ही बैलगाडीची वाट अगदी रुंदच होती.. पुढे तर मोकळाच परिसर लागला.. चंद्राच्या लख्ख प्रकाशात पायाखालचे अगदी स्पष्ट दिसत असल्याने आम्ही टॉर्च सुरुच केली नाही व मुनवॉल्कचा आस्वाद घेउ लागलो.. वीस पंचवीस मिनीटांतच मोकळा परिसर संपला नि आमच्या समोर दाट जंगल उभे राहिले.. साहाजिकच एखाद दुसरी टॉर्च सुरु करावी लागली नि आम्ही चिडीचूप शांततेत जाउ लागलो.. आवाज होता फक्त आमच्या चालण्याचा.. मंद वार्‍याच्या स्पर्शाने सळसळणार्‍या पानांचा.. इथूनच 'आजोबा'ला आम्ही प्रत्यक्षात भिडायला लागलो.. उकाडयाचे दिवस असले तरी कसलाही थकवा नव्हता.. वाटच तशी साधीसोप्पी आहे.. जसजसे पुढे जाउ लागलो तसतसे आंब्याचा सुवास येउ लागला.. नि खरच वाटेत कितीतरी इटुकले पिटुकले आंबे दिसू लागले.. म्हटले उद्या चंगळ आहे आपली परतीच्या प्रवासात.. मध्येच वारा आला की आंबे पडण्याचा आवाज अधुनमधून कानी पडत होता.. लवकरच कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला नि आश्रम जवळ आल्याची खूण कळली..

आश्रमात झोपलेले कुणीतरी दिसत होते.. त्यामुळे आत न शिरता बाजूलाच सारवलेल्या अंगणात आम्ही मुक्काम मांडला.. चंद्रप्रकाशात तो परिसर स्वच्छच भासत होता म्हणून लगेच पेपर पसरवले व ताणून दिली.. खरेतर नेटवर वाचले होते की इथे साप/विंचूपासून सावध रहावे.. आमची वाटचाल ह्या सरपटणार्‍या प्राण्यांच्या 'प्राईम टाईम'मध्येच झाली होती पण कुठेच कसला मागमूस नव्हता.... नि इथे मोकळ्या अंगणात झोपतानाही असली चिंता काही वाटली नाही.. पायथ्यापासून इथवर आरामात पोचण्यास जेमतेस दिडदोन तास पुरेसे आहेत.. आम्हाला इथवर पोहेचेस्तोवर पहाटेचे साडेतीन वाजले होते.. शेवटी आम्ही सगळे आडवे होतो न तोच अंगावर पावसाचे दोन तीन थेंब शिंपडले गेले.. खरच काय मस्त वाटले.. आभाळ भरून आले होते.. वाराही अधुनमधून सुटत आजुबाजूच्या झाडांवरचे आंबे पाडत होता.. हा आवाज मात्र अधुनमधून आम्हाला जागे करण्याचे काम करत होता.. नशिबाने आम्ही झाडांखाली झोपलो नव्हतो नाहीतर आंब्याचा मार खावा लागला असता..

आकाश बघता बघता डोळे कधी मिटले ते कळलेच नाही.. मी आणि रोमा उठलो तेव्हा पहाटेचे साडेपाच वाजले होते..अंधुकश्या उजाडात आश्रमाच्या मागे झाडींच्या फटीतून वरती पाहिले तेव्हा कळले की आम्ही डोंगराच्या कुशीतच झोपलो होतो.. डोंगराच्या शेंडयापाशी ढगांनी उच्छाद मांडलेला दिसत होता.. एव्हाना आश्रमातील दोघे तिघे उठले होते.. मग त्यांनाच विचारून पाणी वगैरे कुठे विचारून घेतले.. आम्ही आणलेले पाणी होतेच पण इथेच जवळपास कुंड असल्याचे कळले..

आश्रमाच्या उजव्या बाजूस मोकळे सारवलेले आंगण आहे जिथे आम्ही झोपलो होतो.. तिथेच बाजूला महादेवाची दोन छोटी मंदीरे आहेत.. त्यात एक थोडी जमिनीखाली खोदलेली शिवपिंड आहे.. आश्रमासमोरच काही कोरलेल्या पाषाणाचे अवशेष दिसतात.. आश्रमात वाल्मिकी ऋषींची समाधी आहे.. आश्रमाला लागूनच एक घरदेखील आहे.. परिसर बर्‍यापैंकी स्वच्छ ठेवला आहे.. नि जागाच मुळी इतकी शांत आहे की तुमचे मन रमलेच समजा..

प्रचि ३: महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी

प्रचि ४:

प्रचि ५:

प्रचि ६:

या आश्रमाच्या समोरच मोकळ्या जागेत झाडांभोवती पार खूप छानप्रकारे बांधलेले आहेत.. तर एका बाजूस राहण्यासाठी खोली दिसते.. तिची अवस्था फारशी चांगली नाही असे लांबून तरी वाटले.. इथेच एक वाट अगदी आश्रमाच्या समोर पुढे सरळ खाली जाते.. जिथे पाण्याचा झरा आहे.. नि अगदी मे महिना ओलांडला तरी या झर्‍याचे पाणी अगदी गारवा देणारे.. दोन कुंड आहेत.. एकातले पाणी गढूळ होते मात्र दुसर्‍या कुंडातले पाणी स्वच्छ.. इथेच त्या आश्रमाच्या वास्तव्यास आलेले काही भक्तजन अंघोळीसाठी पाणी घेत होते.. आजुबाजूला चुल मांडलेल्या पण दिसत होत्या.. जेवणाची खरटके पण पडलेली दिसत होती.. नि बाकी राहीले ते आंबे.. हे आंबे मुळात छोटया आकाराचे.. आंबट गोड.. नि काढायचे कष्ट नको.. ते काम वारा करतो.. जागोजागी सडा पडलेला दिसतो या आंब्यांचा..

प्रचि ७:रोमा झर्‍याचे पाणी भरुन घेताना..

प्रचि ८: गर्द झाडींच्य पार्श्वभूमीवर उभा असलेला मी मायबोलीकर - गिरीविहार

प्रचि ९:

आमची सगळी मंडळी उठेस्तोवर आटपेस्तोवर बराच कालावधी गेला.. जागाच इतकी भुरळ पाडणारी होती की सगळे संथपणे सुरु होते.. आता आम्हाला पुढची वाटचाल करायची होती ती सितामाईंच्या पाळण्याच्या दिशेने.. जिथे वरती एक गुहा आहे.. तिथेच लव कुशचा जन्म झाल्याचे ऐकीवात आहे.. तिथे जाण्यासाठी आश्रमाच्या मागून चढावे लागते.. रोमाचे दोन मित्र खालीच थांबणार असल्याने आम्ही सॅक त्यांच्याकडे सोपवल्या.. शिवाय चहा-मॅगीच्या नाश्त्याची जबाबदरी सोपवली..बाकी सर्व आम्ही सकाळी साडेसातच्या सुमारास चालू लागलो.. इथून पुढचा मार्ग हा थेट चढणीचा नि वाट अधुनमधून धबधब्याची असल्याने दमछाक करणारा आहे.. आम्ही चढत असताना हवेचा पण पत्ता नव्हता त्यामुळे चांगलाच घामटा निघाला..

प्रचि १०: और कितना उपर ?

इथे चढताना उजव्या दिशेनेच जावे.. सीतामाईचा पाळणा गाठण्यासाठी एक तास लागतो ऐकून होते.. ही जागा म्हणजेच आजोबाचा मुख्य भाग आणि सुटटा भाग यातली घळ आहे.. नि ह्या घळीत पोहोचेस्तोवर आम्हाला आजोबाच्या शेंडयावर बागडणारे ढग आम्हाला प्रेरित करत होते..

प्रचि ११:

प्रचि १२: झुकलेला हत्ती... !!

पाउणतासातच आम्ही एकदाची घळ गाठली नि तिथे पोचल्यावर वार्‍याने आमचे जे काय स्वागत करत होता त्याला तोड नाही.. एसीची हवा पण मार खाईल इतका थंड नि तितकाच जोरकस वारा.. इथे येईस्तोवर घाम गाळल्याचे फळ मिळाले होते..

प्रचि १३:

आम्ही पोहोचलो तिथे उजवीकडेच अंदाजे दहा फुट वरती गुहा कोरलेली दिसते.. तिथे एक पाळणादेखील टांगून ठेवला आहे.. तर डावीकडे आजोबा अवाढव्य पसरलेला दिसतो..

प्रचि १४:

या गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी झाडाची एक मोठी फांदी लावून ठेवली होती.. तरीपण चढणे थोडे अवघडच भासत होते.. कारण वरच्या बाजूस पकडायला होल्डस मिळताना नाकेनौ येत होते..आमच्यातला एकजण (शफीर) त्याच्यातले रॉक क्लायमिंबचे गुण आमजवून बघत होता.. हा इथे धडपडत मरत मरत चढायच्या प्रयत्नात असताना आपला रोमा मात्र त्या फांदीच्या आधारे चढून पण गेला.. Proud

प्रचि १५: बर्थडे बॉय चढाई करताना..

प्रचि १६: रोमा वरती.. क्लायंबर खालती..

त्याच्यामागोमाग मग सुन्या, झीनत, विशाल व रॉक क्लायमिंबवाला पण तिकडूनच चढून गेले..

प्रचि १७ :

मी पहिल्या प्रयत्नात वरती जाण्याच्या संभ्रमात अडकलो.. आत्मविश्वास खालावल्यामुळे शिस्तीत खाली उतरलो.. पण गुहा तर बघायची होती म्हणून डावीकडे थोडे वरच्या बाजूस चढलो.. इथे चढायला पण सोप्पे आणि गुहा पण कुठलेही कष्ट न करता दिसू शकते..

प्रचि १८:

सो तो पॅच न चढणारी मंडळी (सौ.सुन्या, गिरी व रोहन) इथेच येउन बसली.. इथूनही नजारा छानच दिसत होता.. पण वातावरण मळकट झाल्याने दुरवरची डोंगररांग फारच अस्पष्ट दिसत होती..

प्रचि १९:

आम्ही बसलो होतो तिथून मला एक आमच्या ट्रेकनियमाप्रमाणे उडीसाठी चांगला स्पॉट दिसला.. पण त्यासाठी तो पॅच सर करणे मस्ट होते.. सो म्हटले पुन्हा एक प्रयत्न.. नि यशस्वी झालो.. पण खाली उतरताना थोडी बोंब होणार हे निश्चीत होते..

ही जागा तशी पावसाळ्यात धोकादायकच.. इथे गेल्या दोन तीन वर्षात दोनजण दगावल्याचे ऐकून आहे.. मुळात गुहाच खूप अरुंद आहे.. कडयात कोरलेली असल्याने पावसाळ्यात इथे घसरुन पडण्याचीच शक्यता फार.. शिवाय माकड-वानरसेना जर असली तर अजुनच अडचण.. आम्ही आलो तेव्हा ती सेना गायब होती..

या गुहेत ज्या दोन पादुका कोरलेल्या दिसतात त्या 'लव-कुश' यांच्याच.. गुहेला लागुनच अगदी छोटे पाण्याचे टाके आहे.. रिकामेच होते..

प्रचि २०:

(डावीकडे गुहा, वरती येण्यासाठी फांदीचा आधार नि उजवीकडे पाण्याचे रिकामे टाके )

प्रचि २१:

हे टाके पार करुन पुढे वळसा मारुन वाट पुढे जाते नि तिथेच थांबते.. इथून दुरवरचा परिसर छान दिसतो..
प्रचि २२:

हरिश्चंद्रगडाचेदेखील ढगांच्या धुक्यात धुसर दर्शन झाले.. त्या वळणावरच बर्‍यापैंकी जागा होती तिथेच मग आमचे उडी प्रयोग झाले..

प्रचि २३ : रोमा उडाला..

प्रचि २४ : माझी ट्रेकमार्क उडी

(वरील फोटो गिरीविहार ने टिपलाय)

प्रचि २५: घळीच्या डाव्या बाजूच्या चढणीवर बसलेले.. इथूनच गिरीने वरील फोटो टिपला..

प्रचि २६ : घळीच्या ह्याच डाव्या बाजूच्या डोंगरावर काही अंतरावर कोरलेल्या दोन टाक्या.. पण इथवर पोचणे खूपच अवघड..

वाटले होते पावसाची एक तरी सर येइल नि भिजवून जाईल.. पण तसे काही झाले नाही.. पावसाळी ढगांनी बस्तान हलवले होते.. आजोबा ट्रेक हा ह्या गुहेपर्यंत आल्यावर संपतो सो आता माघारी फिरायचे होते.. उतरताना थोडी कसरत होती..

प्रचि २७ :

प्रचि २८: गुहेच्या बाजुस असणार्‍या ह्या वाटेवरच काळजी घेणे आवश्यक..

प्रचि २९:

एकदाचे सगळे गुहेवरुन खाली उतरले नि परतीचा रस्ता धरला.. चढताना लागणार्‍या वेळेपेक्षा खूप कमी वेळ उतरताना लागतो.. मार्गच तसा आहे.. खाली गेल्यावर तय्यार चहा व मॅगी मिळेल या आशेवर होतो पण फोनद्वारे संपर्क साधले असता कळले की ते दोघे वानरसेनेला सांभाळत बसलेत.. !! जल्ला मग काय.. खाली येउन मग चहाची तय्यारी..

प्रचि ३०:

आम्हाला कसेही करुन दुपारी दोनची एसटी बघायची होती सो मॅगी करण्याचा प्रश्णच उरला नाही.. खादाडपट्टी आटपून आम्ही लगेच कुंडाच्या दिशेने गेलो.. तिथेच बाटल्या भरुन घेतल्या.. या कुंडांच्या डाव्याबाजूने एक वाट जाताना दिसली तीसुद्धा डेहणे गावातच जाते असे कळले.. सो तोच मार्ग पत्करला..

ही वाट तर खूपच आनंद देणारी.. वरती झाडीचे छप्पर... वाटेत मिळणारे आंबे... नि बेस्ट म्हणजे भरगच्च करवंदांनी भरुन गेलेल्या करवंदाच्या जाळी.. मग काय आमचा सॉल्लिड टिपी झाला.. पाण्याची कमतरता भासलीच नाही कुठे.. इतके आंबे, करवंदे बघून तर उद्याच्या वटपौर्णिमेला सौ. रॉक्ससाठी घेउन जाण्याचा विचार आला.. पण वाटेतच संपतील म्हणून त्या फंद्यात पडलोच नाही.. Proud

प्रचि ३१ :

(फोटो : गिरिविहार)

एकंदर उकाडयात ट्रेक करत असतानादेखील गरमीचा त्रास झालाच नाही.. पुढे जंगल संपले नि मोकळे पठार लागले.. इथून मागे वळून आजोबा कडे पाहिले तर 'अबबब' करण्यापलिकडे सोय नव्हती..

प्रचि ३२:

(अगदी उजवीकडे दिसणार्‍या सुटया भाग व डावीकडील मुख्य भाग यामधल्या घळीत 'सीतामाईचा पाळणा' म्हणजेच गुहा आहे )

याचवेळी आम्हाला कळून चुकले की आम्ही मुख्या आजोबाला हातच नव्हता घातला.. 'आजोबा' च्या सुटया भागावर खेळून आलो होतो.. थोडक्यात आजोबांच्या पाया पडून आलो होतो.. मुळ उंची तर गगनालाच भिडताना भासत होती.. असे ऐकले आहे की आजोबाच्या शिखरापर्यंत फारसे कोणी चढाई केलेली नाही.. जाणकरांनी अधिक माहिती द्यावी..

प्रचि ३३ :

या पठारावरुन सभोवतालची रांग पण सहहीच भासत होती.. दुरवर अलंग,मदन व कुलंग चे त्रिकुट, त्याच्या अलिकडे घाटगर डॅमजवळचा डोंगर, रतनगड, कात्राबाईचा डोंगर.. सारे काही मस्त मस्त.. फक्त धुसर वातावरणामुळे कॅमेर्‍यात काही नीटसे टिपता आले नाही..

प्रचि ३४:

(रतनगड, कात्रज डोंगररांग)

प्रचि ३५:

(डावीकडे धुसर दिसतेय ती कुलंग, अलंग, मदन ची डोंगररांग.. )

तासभरातच आम्ही डेहणे गावात पोहोचलो... बोअरिंगच्या पंपावर हातपाय धुऊन एका घराच्या अंगणात तात्पुरता मुक्काम ठोकला.. कारण एसटी येण्यास वीसेक मिनीटे बाकी होती.. वाट बघेस्तोवर तिथेच चील्लर पार्टी गोटया खेळत होती.. मग काय आम्हीपण लहान बनून त्यांच्यात सामिल झालो..
प्रचि ३६:

प्रचि ३७:

विशाल आणि मी त्या पोरांसमोर आपले कौशल्य आमजावून पाहू लागलो.. राजा-राणीचा खेळ खेळताना फुलटू धम्माल झाली.. पोरांचे नेम भारी त्यामुळे आम्हाला नेम मारुन फुटवला की सगळे ट्रेकच्या भाषेत ' याला कुलंग ला पाठव' ' कळसूबाईला पोचव' बोलत होते... Lol एकंदर आमच्या कल्लोळात चिल्लर पार्टी ज्याम खुष झाली.. अगदी एकरुपयाची पेप्सी त्या लहानग्यांसोबत खातानाचा अनुभव पण मस्तच.. त्यांना विचारले की 'काय रे.. आजुबाजूच्या डोंगरावर जाता की नाही कधी ? ' असे विचारताच लहानग्या उत्तरला, ' हो.. 'आजा'ला जाउन आलोय..'

प्रचि ३८: मला कधी 'आजा'ला जाता येणार ??

आमचा एसटीची वाट बघण्याचा वेळ चांगलाच सत्कारणी लागला होता.. पण एसटी काही येत नव्हती.. शेवटी त्या घरात मॅगी करुन घेण्याचा विचार केला.. आधी एसटी येइल म्हणून न बनवण्याचे ठरले होते.. पण काहीवेळाने मॅगी करायला घेतली की नक्कीच एसटी येइल असा विचार करुन चूलीवर पाणी ठेवले.. नि दुरुन एसटीचा आवाज कानी पडला.. Happy

मग तर मॅगी त्या घरच्यांना कशी करायचे ते समजवून आम्ही एसटीत जागा पकडली नि शहापुरच्या दिशेने प्रयाण केले.. पुढे रिक्षा पकडून आसनगाव रेल्वेस्टेशन गाठले.. 'आजोबा' ट्रेक अगदीच आरामदायी झाला होता पण सारेकाही वेळेत झाले होते..

थोडक्यात 'आजा'चे टोक जरी गाठले नाही तरी त्या आश्रमाचा परिसरच खूप आल्हाददायक.. मन एकदम प्रसन्न.. हा आजोबा पर्वत अगदी नावाला साजेसा आहे.. पण आश्रमापर्यंतचा ट्रेक हा सहजगत्या करण्यासारखा आहे.. नि ट्रेकमध्ये घाम गाळायचा असेल तर मग पुढला सीतामाईच्या पाळण्याकडे जाणारी वाट पकडावी.. एका दिवसात ट्रेक सहज होतो.. पण रात्रीचा चांदण्यात ट्रेक करून या जागेचा वेगळा अनुभव जरुर घ्यावा जो नक्कीच मनाला भुरळ पाडणारा असेल.. ऐकून होतो साप, विंचू भरपूर.. पण घाबरण्यासारखे काही नाही.. पाण्याचादेखील तिथे प्रश्ण नाही.. शक्यतो थंडीत हा ट्रेक केला जातो पण आतापर्यंत जे काही लिहीलेय ते वाचून सरत्या उन्हाळ्यात ट्रेक करण्यास तुम्हाला काहीच हरकत नसेल.. Happy

गँग ऑफ आजोबा ट्रेक :

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुहेतील वाट ड्यान्जर Happy

पिवळे धम्मल आंबे पाहुन जीव लयीच जळला राव.
१५-२० असले आंबे सहज हाडडलेस तरी त्रास होत नाही..

मस्त, आवडले - वर्णन आणि फोटो सहीत लेखनही Happy

सीतेच्या पाळण्याकडच्या शेवटच्या पॅचसाठी लोखंडी शिडी होती Sad आता कुठे आहे? मी तिथे भर पावसात गेले होते ---- पण शिडी मुळे फार काही वाट्ले नाही --- आता मात्र भिती वाटतेय -- शिडी नसती तर ???

vaah !!

एका दिवसात ट्रेक सहज होतो.. पण रात्रीचा चांदण्यात ट्रेक करून या जागेचा वेगळा अनुभव जरुर घ्यावा जो नक्कीच मनाला भुरळ पाडणारा असेल.. ऐकून होतो साप, विंचू भरपूर.. पण घाबरण्यासारखे काही नाही.. पाण्याचादेखील तिथे प्रश्ण नाही.. शक्यतो थंडीत हा ट्रेक केला जातो पण आतापर्यंत जे काही लिहीलेय ते वाचून सरत्या उन्हाळ्यात ट्रेक करण्यास तुम्हाला काहीच हरकत नसेल.. >>>>

काय डेंजर रे! नुसतं वाचताना आणि फोटो बघतानाच आम्ही टरकतोय....... आणि तु आम्हांला घाबरण्यासारखे काही नाही असं सांगतोयस. बाबा योग्या, आमच्या सारख्या येर्‍यागबाळ्यांना ह्या जन्मात हे जमायचं नाही रे. आणि म्हणुन माझ्याकडुन कडक सलाम तुमच्यासारख्या साहसवीरांना आणि सौ. सुन्यासारख्या साहसवीरांगनांना!!!!!!!!!!!!!!! Happy

वा योगेश - मस्त वर्णन केलंस अग्दी...... फोटो, उड्या सगळंच भारी....
तुम्हाला भिऊन ते साप-विंचू बाहेर आले नाहीत...... कोणाच्या कसं लक्षात येत नाही हे ???........

सो एकंदर धमालच........

रोमा टेंशनमध्ये सारखा फोनवर आणि आम्ही निवांत !! >> बिच्चारा रोमा Proud

जल्ला गाडीला पहिल्यांदाच पुढून धक्का दिला.. >>> Lol
जबरा ट्रेक , मस्त व्रुतांत सुंदर प्रचि Happy
बड्डे बॉयला (उशिरा) वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy

तुम्हाला भिऊन ते साप-विंचू बाहेर आले नाहीत...... >>> कंटाळले असतील ते बिच्चारे साप, विंचू... म्हणाले असतील, 'रात्री अपरात्री येतात झोपमोड करायला... ह्या भटक्यांना काय कामधंदा नसेल पण आम्हाला आहे की' :p

असे ऐकले आहे की आजोबाच्या शिखरापर्यंत फारसे कोणी चढाई केलेली नाही.. >>> बरुबराय... शेवटी आजा हाय तो... एकदाव खांद्यावर बशविल... पर डोईवर थोडीच घेईल Wink

ब्रेक नंतर जोरदार आगमन झालेले आहे. पुट्रेशु Happy

धन्यवाद मंडळी Happy

१५-२० असले आंबे सहज हाडडलेस तरी त्रास होत नाही.. >> झक्या.. माझा आकडा ६-७ पर्यंतच गेला..
सुरश.. शिडी नव्हती तिथे..
जिप्स्या.. प्रचि २७ ची आयडीया रो.मा ची... Happy
वनराई.. आश्रमापर्यंत खरच साधीसोप्पी वाट आहे..

शेवटी आजा हाय तो... एकदाव खांद्यावर बशविल... पर डोईवर थोडीच घेईल >> Happy

सह्ह्ह्ही लेख अन् प्रचि. Happy
आजोबाचा कडा ठाण्याच्या प्रदिप केळकरांनी ८० च्या दशकांत सर केला आहे.

आम्ही मागच्या वर्षी पावसात हा केला होता.
माबोकर कविता विथ फॅमिली आणि कॅप्टन सोनटक्केंबरोबर...
पाऊस असल्यामुळे त्या पाळण्यापर्यंत चढण्याची इच्छा आवरावी लागली होती...

मॉरल ऑफ द स्टॉरी -
यो रॉक्स इज बॅक आफ्टर अ ब्रेक! Happy

यो,

छान वृत्तांत! प्रचि वेधक आलीयेत. २७ तर खासंच!! २८ आणि २९ बघून वाटतं की शेकडो फूट खोल दरी खाली असेल. Happy

प्रचि ३ मध्ये वाल्मिकींची समाधी आहे, तिच्यावर निळा झोत कसला पडलाय? उन्हाची तिरीप?

आ.न.,
-गा.पै.

मस्तच रे यो..

आजोबा टॉपला जाता येते... वाट पलीकडील कुमशेत गावावरून आहे.. एक वाट कुमशेत वरून डायरेक्ट वाल्मीकी आश्रमापर्यंत पण येते.

धन्यवाद..

आजोबाचा कडा ठाण्याच्या प्रदिप केळकरांनी ८० च्या दशकांत सर केला आहे. >> हेम, ती व्यक्ती पहिली नि शेवटचीच का.. म्हणे बर्‍याच जणांनी प्रयत्न केलेत पण कोण्या एका व्यक्तीनेच सर केला आहे.. ते हेच का ?

शापिता.. १दम पक्का !!

गा.पै... होय ती उन्हाचीच तिरीप Happy

आनंदयात्री Happy

वाट पलीकडील कुमशेत गावावरून आहे >> हो. .पण तिथूनच म्हणे टॉपला गाठणे बर्‍याचजणांना जमले नाहीये.. अजुन माहिती दिलीत तर उत्तम

रामकृष्णहरी! अरे माणसं आहात की भूतं ? अबबबबबबबब! नजर फिरत नाही तिथे तुम्ही लोक जाऊन येता, निसर्गाला भिडता. कौतुक कराव तेवढ थोडं. साष्टांग नमस्कार तुम्हाला.

मस्त रे यो ... फोटु जबरी ..
खरच भन्नाट ट्रेक झाला.. मजा आली अन धन्यवाद सर्व संवगडयांना ... Happy

आजोबा टॉपला जाता येते... वाट पलीकडील कुमशेत गावावरून आहे.. एक वाट कुमशेत वरून डायरेक्ट वाल्मीकी आश्रमापर्यंत पण येते >> अरे व्वा सही परत एकदा त्या परिसरात जायला आवडेल ...( पण आता थंडित )

ज ब र द स्त !!!

सगळ्यात आवडलेले प्रचि:- सीतामाईचा पाळणा आणि लवकुश यांच्या पादुका Happy

प्रची २७ तर कड्क आणि ३८ पण मस्त जमलाय....

वर्णन नेहमीप्रमाणे मस्तच रे.....

रोमा - वाढदिवसाच्या विलंबित शुभेच्छा

Pages