भटकंती - औरंगाबाद (अजिंठा)

Submitted by Chintu on 3 June, 2012 - 07:35

भटकंती - औरंगाबाद (औरंगजेबाची कबर + देवगिरीचा किल्ला)
..ड्रायवरचं न ऐकता किल्ला चढायचा निर्णय किती योग्य होता हा विचार करत आम्ही परतीची वाट धरली.
♦♦♦♦♦
देवगिरी करुन परत आलो आणि अजिंठ्याची टुर बुक करायला MTDC च्या Reception मधे गेलो. आम्हाला बघताच टुर बुक करणारी बाई धावत आली. दिवसभरात झालेला प्रकार तिला सांगितल्यावर "ड्रायवर, कोण होता? मी फोन करुन विचारते." असं म्हणुन ती जी बाहेर गेली, ती आत आली तरी आमच्याकडे बघायला तयार होईना. शेजारी असलेल्या ITDC च्या कांउटर कडे जाउन आम्ही अजिंठ्याची टुर बुक केली. अनुभव गाठिशी होताच. यावेळी चांगली कसुन चौकशी केली. एकावेळी १० माणसं असतील तरच गाईड देतात हा नविन नियम समजला, आणि आम्ही पकडुन १२ लोकं होती. त्यामुळे गाईडचा प्रश्न निकालात निघाला.

सकाळी बरोब्बर ८:३० ला ITDC ची बस आली. सोबतीला काही गोरेही होते. त्यातील एका पोलिश बाईने सौ सोबत गट्टी केली. ब्लॅक कॉफीच्या नावाखाली साधी कॉफी पाठवली म्हणुन MTDC च्या नावाने खडे फोडत होती. एकंदरीतच MTDC च्या कारभाराला वैतागलेली वाटत होती. "दक्षिण भारतात कॉफी प्रामुख्याने प्यायली जाते पण महाराष्ट्रात कॉफी फारशी प्रसिद्ध नाही. इथे साधारणपणे चहाच पितात, त्यामुळे त्याला ब्लॅक कॉफी समजलं नसेल. तुम्हाला ब्लॅक कॉफी हवी असेल तर ३ स्टार किंवा ५ स्टार हॉटेल मधे मिळेल." अस सांगुन सौने तिची बोळवण केली. पाहुण्यांसमोर उगाच आपल्याच लोकांना आपण का नावं ठेवा?

बसमध्ये बसुन ३ तास होत आलेले. आत पुढचे ३-४ कि.मी. हे Pollution Free बस जावं लागेल अस गाईड ने सांगितल. वि़जेवर चालणारी चकचकीत काचांवाली Pollution free बस आता येणार म्हणुन मी वाटेकडे डोळे लाउन बस च्या रांगेत उभा रहिलो.

महाराष्ट्र टुरिझम मधे मागे का? याचा साक्षात्कार पुन्हा एकदा झाला. दुपारी १२ च्या चांदण्यात आम्ही रांग लावून उभे होतो. बस काही केल्या येईना. आमच्या गाईडने १-२ फोन करुन माहीती काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन असं समजलं पर्यटकांच्या एवढया गर्दिसाठी फक्त २ बसेस होत्या. तिकडे गोरे मात्र औरंगाबादच्या उन्हाला वैतागलेले. चौकडी करुन त्यांचं चर्चासत्र सुरु झालं. एकुणच चर्चेचा विषय भारतात फिरताना उद्भवणारे प्रश्न असा काहीसा होता आणि चर्चेचा सुर नाराजीचा होता. असो. शेवटी एकदाची बस १२:४५ ला आली. Pollution Free या नावाखाली जी बस आली होती तिच्यात आणि पुणे शहरात चालणार्‍या PCMC च्या खटारा बसेस मध्ये रंग सोडला तर काडीमात्र फरक नव्हता. आता या अशा बस ला Pollution Free का म्हणावं बरं? पैसे उकळण्याचा अजुन एक प्रकार किंवा मग लेणी पहायला येणार्‍या लोकांच्या गाड्या, मग Parking ची व्यवस्था, असे प्रश्न टाळण्यासाठी हे असं केलं असेल. असो.

औरंगाबादहुन १००-१२० कि.मी. अंतरावर असणार्‍या या गुफांमधील पहिली गुफा साधारण ख्रिस्तपुर्व २ र्‍या शतकात (200 B.C) बांधण्यात आली. एकुण ३० गुफांचे काम सुमारे ६०० वर्ष या चालु होतं. यात सुरवातीच्या काळांत ज्या गुफा बांधल्या गेल्यात त्यात फक्त दगडांत केलेल कोरिव काम दिसतं. नंतरच्या काळात बांधण्यात आलेल्या गुफा या एका मोठ्या हॉल सारख्या असुन या गुफांमध्ये कोरिवकाम आणि रंगकाम दोन्ही केलं आहे.

अशा या प्रचिन गुफांचा शोध ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याला १८१९ मध्ये अनपेक्षितरित्या लागला. जंगलात शिकारीला गेला असता अचानकच या गुफा त्याच्या नजरेस पड्ल्या. त्यानंतर त्यांची साफसफाई करण्यात आली. अनेक वर्ष पाऊसपाण्याचा मार खाऊन यातील बर्‍याच चित्रांचे रंग उडाले आहेत. चित्रात पांढरा, पिवळा, लाल, आणि निळा असे रंग वापरले आहेत. त्यातला निळा हा खास पर्शियावरुन मागवला असं म्हणतात. ३० गुफांपैकी ३,५,८,२३-२५,२८ या अपुर्ण आहेत तर गुफा १ आणि २ यातिल चित्रं चांगल्या स्थितीत आहेत. गुफा क्रमांक १२ व १३ ह्या बौदध विहार आहेत. बर्‍याचश्या चित्रांत जातक कथा रेखाटल्या आहेत. यातिल बराचश्या गुफा अंधार्‍या आहेत. असं म्हणतात की कलाकारांनी आरशाच्या सहाय्याने प्रकाश परावर्तीत करुन सुर्यप्रकाश गुफेत पोहोचवला. ज्या गुफेत चित्रे रेखाटली आहेत त्या गुफांमधे फ्लॅश फोटोग्राफी करण्यास मनाई आहे. गाईडबरोबर आम्ही गुफा बघायला सुरवात केल्या.

गुफां क्र. १ मधिल धम्मचक्र प्रर्वतन मुद्रेतील बुद्ध.

वज्रपाणि

पद्मपाणि

गुफा क्र २ मधिल पांढरा हत्ती. जातक कथे नुसार राणी मायाने हा हत्ती स्वप्नात पाहिला. राजज्योतिष्याने या स्वप्नाचा अर्थ असा काढला की तिच्या पोटी एक महान अवतार जन्माला येणार आहे.

ही अजुन काही भित्तीचित्रे

आम्ही शेवटच्या गुफेकडे आलो. घडयाळात बरोब्बर २ वाजून ५ मिनिटे झालेली. गाईडने आम्हाला ३ वाजेपर्यंतचा वेळ उरलेल्या गुंफा बघायला आणि जेवण्यांसाठी दिला. त्यानंतर परतीचा प्रवास सुरु होणार होता. आम्ही पोटातल्या कावळ्यांकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. शेवटच्या म्हणजेच २६ व्या गुंफेकडे आलो. मघाशी गाईडने दाखवलेला तोच तो पहुडलेला बुद्ध. शांत पण चेहऱ्यावरचे भाव मुळीच गंभीर नाहीत. महानिर्वाणाचा क्षण. खाली त्याचे अनुयायी शोक करतायत आणि वरती आकाशात मोद भरला आहे. आजूबाजूला केलेली दिव्यांची संयत रोषणाई . अगदी वातावरणाला साजेशी. जमतील तितके फोटो काढून भारावलेल्या मनाने बाहेर आलो.

एक-एक करत उरलेल्या गुंफा पहायाला सुरवात केली. मगाशी गाईडने जे दाखवलं, सांगितलं त्याचा ताळमेळ समोरचा चित्रांकडे बघून लावत होतो. काही जोड्या जुळत होत्या काही नव्हत्या. मनात आधी गुंफा बघताना नियोजलेले फोटो काढत होतो. सरते शेवटी गुंफा क्रमांक १ मध्ये आलो. हीच ती निसर्गाला समर्थपणे तोंड देऊन आजही आपलं सौंदर्य जपलेली गुंफा. एक अनामिक भारावलेपण आहे या गुंफेत. डोळ्यात आणि मनात एक एक भित्तीचित्र साठवत होतो. हा वज्रपाणि, हा गौतम बुद्ध धम्मचक्र प्रवार्तानाच्या मुद्रेत. एक ना अनेक बुद्धाच्या मुद्रा, चेहऱ्यावरचे हावभाव टिपून घेत होतो. आणि अचानक परत एकदा समोर आला पद्मपाणि. मघाशी त्याला जरा वरवर पाहून घेतलेला. आता सावकाश जवळून बघत होतो. तसा तो मला पाहिल्यांदा भेटला सहावीच्या इतिहासाच्या मुखपृष्ठावर. पण त्या सनावळी आणि लढायांच्या नको तितक्या तपशिलाने भरलेल्या जडजंजाळ सरकारी पुस्तकाने नेहमीच माझ्या मनात इतिहासाबद्दल तिटकारा निर्माण केलेला. मला कधी त्याच नावही जाणून घ्यायची इच्छा झाली नाही. आणि आज अचानक तो जुनी ओळख दाखवत माझ्यापुठे उभा होता. तीच ती शांत , विनम्र मुद्रा, अर्धोन्मीलित नेत्र, एका हातात कमळ. पायाशी लोळत असणारी सर्व सुखांचा त्याग करताना त्याला काय बर वाटल असेल? काही क्षण मी त्याला फक्त निरखत होतो. मी त्याला आधी पाहिलं होत पण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मनात त्याच्या निर्मात्याला मनमुराद दाद देत होतो. काही क्षण फक्त काही क्षणांकरता मागे जाता आला तर? या कलाकृती बनवणाऱ्या त्या अनामिक हातांना आणि अजोड बुद्धीला मन:पूर्वक धन्यवाद देण्याचा प्रयत्न करेन. मी बापडा याउपर करूतरी काय शकतो. भारावलेले क्षण ओसरल्यावर पुन्हा एकदा त्याला माझ्या कॅमेरात बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. सौ. ने हळूचं खांद्यावर हात ठेऊन घडाळ्यात २:५५ झाल्याचे सांगितलं. पुन्हा एकदा सगळीकडे एक नजर फिरवून जड पावलांनी पद्मपाणिचा निरोप घेतला. हो पण निरोप देताना परत भेटायचं वचन द्यायचं मात्र विसरलो नाही.

शांतपणे गुंफेबाहेर पडलो. मघाशी चढतानाचा उत्साह केव्हाच ओसरला होता. त्याची जागा एका अनामिक शांततेने घेतली होती. ही शांतता भंग करण्याची आमच्या दोघांच्याही मनात नव्हती, काहीतरी अदभूत, अविस्मरणीय पाहिल्याचा आनंद होत होता. बराच काही बघूनही बरच काही निसटल्याची हुरहूर मनात दाटून राहिली होती. मनुष्याने आयुष्यात एकदा तरी पाहावेच अशा अविस्मरणीय स्थळांला भेट देण्याची बुद्धी आणि शक्ती दिल्याबद्दल मनातल्या मनात त्या विधात्याला शतश: धन्यवाद दिले आणि परतीचा प्रवास सुरू केला.

क्रमशः

गुलमोहर: 

@Kiran: नक्की जा. MTDC मध्ये दोन बुकिंग काउंटर आहेत. दोन्हीकडे एक सारखेच पैसे लागतात. पण ITDC ची टुर जास्त खात्रीलायक वाटली. देवगिरी किल्ला बघायचं विसरू नका. अधिक माहिती, खर्चाचा तपशिल हवा असल्यास कळवा.

@जिप्सी: धन्यवाद Happy फ्लॅश फोटोग्राफीस मनाई असल्याने, बरेचसे फोटो नीट काढाता नाही आले.

तसा तो मला पाहिल्यांदा भेटला सहावीच्या इतिहासाच्या मुखपृष्ठावर. पण त्या सनावळी आणि लढायांच्या नको तितक्या तपशिलाने भरलेल्या जडजंजाळ सरकारी पुस्तकाने नेहमीच माझ्या मनात इतिहासाबद्दल तिटकारा निर्माण केलेला. मला कधी त्याच नावही जाणून घ्यायची इच्छा झाली नाही. आणि आज अचानक तो जुनी ओळख दाखवत माझ्यापुठे उभा होता. >>> चिंटु प्रचि पाहुन मलाही त्या पुस्तकातल्या लेखाची आठवण आली. Happy
छान लेख आणि सुंदर प्रचि Happy

बरेच नुकसान झालेले दिसतेय चित्रांचे. निदान कुणी चित्रकाराने ती नव्याने (स्वतंत्ररित्या) चितारायला हवीत.

सुंदर माहिती

निदान कुणी चित्रकाराने ती नव्याने (स्वतंत्ररित्या) चितारायला हवीत. >> दिनेशदा... आम्ही ५ वर्षापुर्वी गेलो होतो तेव्हा काही गुहां मधे chemical conservationचे काम सुरू होते.

छान माहिती आणि फोटो चिंटू. औरंगाबादला ८ वर्षे राहूनही अजिंठ्याला भेट द्यायचा मुहुर्त लागला नाही. वेरुळ आणि देवगिरीला भेटी नेहेमी व्हायच्या. आता वेळ काढून अजिंठ्याला जायचे आहे.

छान.

@ किरण : हो, स्टेशनजवळ बरीच खाजगी हॉटेल्स आहेत. थोडी घासाघीस केलीत तर बर्‍यापैकी रेट कमी करतात.

@ दिनेशदा : २ मुलं एका गुफेत बसून मापं घेत होती. आम्ही चौकशी केल्यावर समजलं की पायथ्याशी अशाच प्रकारचा सेट उप उभा करतायत L & T च्या मदतीने. त्यासाठी ती मुलं मापं घ्यायचं काम करीत होती. Ajanta Visitor Centre and the Exhibition Centre असं ती मुलं म्हणाली. जिथे पर्यट्कांना माहीती देण्यात येइल.