पुस्तक परिचय- 'पारधः आईशमनचा चित्तथरारक पाठलाग..' लेखकः अशोक जैन

Submitted by हेम on 2 June, 2012 - 10:03

पुस्तक: पारध-आईशमनचा चित्तथरारक पाठलाग
लेखकः अशोक जैन
प्रकाशनः मे २००८, राजहंस प्रकाशन
पृष्ठे: १९६
किंमतः १५० रुपये
************************************************************
दुसर्‍या महायुद्धाच्या काळांत हिटलरच्या नाझी राजवटीत युरोपमधील ६० लाख निरपराध ज्यू धर्मियांची कत्तल करण्यात आली. जर्मनीत व जर्मनीने व्यापलेल्या भूभागांत उभारण्यात आलेल्या ऑख्शविट्श, कुल्पहाफ, लुब्लिन, बेल्झिक, स्पेबिबोर आणि ट्रेबालिन्का या सहा छळछावण्यांमध्ये बेल्जिअम, फ्रान्स, हॉलंड व ग्रिस येथून आगगाड्या भरभरून ज्यू आणले जात. गाडी एका खास फलाटावर उभी केली जाई. प्रवाशांचं सामान काढून घेतलं जाई. जे कैदी काम करण्यास लायक असतील अशा कैद्यांना विविध छावण्यांत पाठवलं जाई आणि ज्यांना ठार मारायचं त्यांना विषारी वायूच्या नव्या स्मशानगृहांत पाठवलं जाई. ऑख्शविट्श येथे भूमिगत मोठं न्हाणीघर होतं. त्याला लागूनच गॅसचेंबर्स होत्या. न्हाणीघरांत सर्वांना आपापले कपडे कुठे टांगून ठेवले आहेत हे नीट लक्षात ठेवा असं सांगितलं जाई. अर्थात ते दिशाभूल करण्यासाठीच असे. कारण ते पुन्हा त्या दालनांत आणले जाणारच नव्हते. मग त्यांची रवानगी गॅसचेंबरमध्ये केली जाई. बायका आपल्या चिमुकल्या बाळांना झग्याच्या आड लपवत पण सुरक्षा पोलीस बायकांचे कपडेही तपासत व लपवलेल्या बाळांना बाहेर खेचून अलग करीत व कैद्यांबरोबर त्यांनाही गॅसचेंबरमध्ये कोंबत. तिथं नव्यानं सुधारित गॅस चेंबर्स होत्या. चेंबरचं दार घट्ट लावून विषारी वायू आत सोडला जाई. अर्ध्या तासांत सारा खेळ संपे. प्रेतं बाहेर काढतांना त्यांची तपासणी होई. प्रत्येकाचं तोंड उचकटलं जाई व जर कोणी सोन्याचा दात बसवला असेल तर तो उपटून काढला जाई. बायकांच्या कानातील ईअररिंग कानाची पाळी कापून काढली जाई, नंतर प्रेतं विद्युतदाहिनींमध्ये फेकली जात.

नंतर कैद्यांच्या सामानसुमानाची वर्गवारी केली जाई. मौल्यवान वस्तू दरमहा बर्लिनच्या राईश बँकेकडे पाठवल्या जात, सोन्याचे दात वितळवून ते एसएसच्या मेडिकल विभागाकडे रवाना केले जात. कैद्यांचे कपडे स्वच्छ करून लष्करी कारखान्यांकडे गुलाम म्हणून असलेल्या कामगारांना वापरण्यासाठी पाठवले जात.

ऑख्शविट्श येथील छळछावणीत डिसेंबर १९४३ मध्येदेखील हा भयंकर नरसंहार सुरु होता. तिथे एकूण ३० लाख ज्यूंना ठार करण्यात आलं. पैकी २५ लाख जण गॅसचेंबरमध्ये कोंबून मारले गेले. या छावणीला मृत्यूची छावणी असंच नांव पडलं....या नरसंहाराला 'हॉलोकास्ट' म्हणतात.

***********************************
या भीषण संहाराला हिटलरच्या बरोबरीने जबाबदार होता तो नाझी नेता अ‍ॅडॉल्फ आईशमन व त्याचे साथीदार. आईशमान हा क्रूरकर्माच होता. नाझी तर त्याला ' फायनल सोल्युशन ऑफ ज्युईश प्रॉब्लेम' म्हणत.
महायुद्धानंतर आईशमान पळून गेला आणि अर्जेंटिनामध्ये नांव बदलून लपून राहिला. परंतू तब्बल १४ वर्षांनंतर इस्त्रायलच्या 'मोसाद' या गुप्तहेर संघटनेने महत्प्रयासाने त्याला शोधून काढले व त्याला विमानांत बसवून मोठ्या शिताफीने, इस्त्रायलला पळवून आणलं. त्याच्यावर इस्त्रायलमध्ये खटला भरण्यात आला व त्याला त्याच्या ५६ व्या वर्षी, ३१ मे १९६२ रोजी रामलेह तुरुंगात फाशी देण्यात आली.

हा सर्व अपहरणाचा इतिहास अत्यंत चित्तथरारक व नाट्यपूर्ण आहे. आईशमनला पकडण्याच्या या मोहिमेचे नेतृत्व त्यावेळचा 'मोसाद' गुप्तहेर संघटनेचा प्रमुख इस्सेर हॅरेल याने केले.

त्याने ' द हाऊस ऑन गॅरिबाल्डी स्ट्रीट' या पुस्तकांत संपूर्ण शोध मोहिमेचा तपशीलवार वृत्तांत लिहिलेला आहे.

हॅरेलच्या या पुस्तकातील अधिकृत वृत्तांताचा आधार घेऊनच श्री. अशोक जैन यांनी 'पारधः क्रूरकर्मा आईशमनचा चित्तथरारक पाठलाग..' हे पुस्तक लिहिलं आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशीत केलेलं हे पुस्तक अत्यंत गतिमान, रोमांचकारी व खिळवून ठेवणारं आहे.
.. . मी परवाच हे पुस्तक वाचून संपवलं तेव्हा एक विचित्र योग लक्षात आला, की पुस्तक संपवलं त्या दिवशी ३१ मे तारीख होती आणि क्रूरकर्मा आईशमनला फाशी देण्याच्या घटनेला परवा बरोब्बर ५० वर्षे पूर्ण झाली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद या पु प बद्दल...

राजहंस प्रकाशन म्हटल्यावर चांगलं असणारच हा विश्वास आहेच.

हेम,

आईशमनने अर्जेंटिनातल्या वास्तव्यात आपलं आडनाव बदललं होतं. पण बायकापोरांची आडनावं बदलली नव्हती. असं का केलं याचा उलगडा होत नाही. कुटुंबियांच्या नावामुळे त्याचा पत्ता लागला.

या बाबीवत पुस्तकात काही प्रकाश पाडला गेला आहे का?

आ.न.,
-गा.पै.

हेम, धन्यवाद. पुस्तक नक्कीच वाचनीय असणार.

नुकताच याचा आणि कोलंबियन ड्रग लॉर्ड पाब्लो इस्कोबारचा संदर्भ लादेनच्या पुस्तकात वाचला. या फरारी/लपलेल्या लोकांच्या केसेसचा अभ्यास केला गेला होता. कुटुंबियांमुळे कधीकधी हे लोक सापडतात.
आइशमनच्या बाबतीत असं झालं की त्याचा मुलगा त्याच्या गर्लफ्रेन्डला आपल्या वडिलांच्या नाझी भूतकाळाबद्दल काहीतरी बोलला. त्या मुलीने आपल्या वडलांना सांगितले आणि त्यांनी इतरांशी संपर्क साधला आणि शेवटी मोसाद आणि त्याला किडनॅप केले इ. थोडक्यात उल्लेख आहे.

या प्रकरणावर आधारित एका पुस्तकाची (तुम्ही म्हणताय तेच आहे का हे आठवत नाही) संक्षिप्त आवृत्ती रीडर्स डायजेस्टमध्ये वाचली होती. फारच सुरस आहे. हे पुस्तकही वाचायला आवडेल.

या प्रकरणावर आधारित एका पुस्तकाची (तुम्ही म्हणताय तेच आहे का हे आठवत नाही) संक्षिप्त आवृत्ती रीडर्स डायजेस्टमध्ये वाचली होती

हो, मीही ते वाचलेले.

छान पुस्तक परिचय - धन्यवाद.
या (गॅस चेंबर्स) वरुन एक सिनेमा आठवला - दी बॉय इन दी स्ट्रीप्ड पायजमा - फारच हृदयस्पर्शी आहे.

या वर द हाऊस ऑन द ग्यारिबाल्डी स्ट्रीट नावाची छोटी फिल्मही आहे. फिल्म फारशी खास नाही मात्र त्यात चक्क 'इली वॅलेस ' आहे. हे पुस्तक मात्र भन्नाट आहे.

या पुस्तकावर आधारित रॉबर्ट डुवाल ने आईशमनची भूमिका साकारलेला चित्रपट 'द मॅन हू कॅप्चर्ड आईकमन' नावाचा सिनेमा पाहिल्याचं आठवतंय.

मी रिडर्स डायजेस्ट मध्ये Yes, I killed Eichmann. नावाची लेखमाला वाचली होती. फ़ार वर्षापूर्वी.हा बहुदा त्याचाच अनुवाद असावा. वाचन हा चित्तथरारक अनुभव होता.
आईकमनला विमानातून चोरून गुंगीच्या अवस्थेत परत ईस्त्रायलला आणणे वैगेरे! हे
मोसादच करू जाणे.

मी पण आत्ता हे पुस्तक वाचायला घेतले आहे...फारच मस्त वेगवान आहे...पण भाषा मात्र खटकली...वाक्यरचना इतकी काहीतरी चमत्कारीक आहे.. अशोक जैन यांनी एकतर शब्दश भाषांतर केले आहे...त्यामुळे ते काहीसे कृत्रिम झाले आहे....काही शब्दही अमराठी माणूस मराठी बोलताना करेल असे घेतले आहेत...
अन्यथा पुस्तक छानच आहे

धन्यवाद.. नुकतेच मोसाद हे पुस्तक वाचले होते. त्यात अ‍ॅडॉल्फ आईशमन याचे प्रकरण होते. ते वाचल्यावर याबद्दल अधिक काही वाचायला मिळते का याचा शोध सुरू होता आणि या पुस्तकाबद्दल माहिती मिळाली.

मी देखील `मोसाद' पुस्तकाबद्दलच लिहायला आले होते. ते पुस्तकही छान आहे.

मी नुकतेच राइज अँड फॉल ऑफ थर्ड राइक ऐकून संपवले. टोटल जवळ जव ल ५८ तासांचे ऐकायला आहे. अतिशय वेल रीसर्च्ड व डीटेल वारी पुस्तक आहे. ह्यातील ज्यू लोकांच्या संहारा संबंधाचा चॅप्टर अ न्यू ऑर्डर हा आहे. ऐकवत नाही. अनेक वेळा पॉज करून ढसा ढसा रडायला आले. व अनेक वेळा छातीत दुखायचा ,श्वास कोंडायचा त्रास झाला. हॉरिबल आहे ते सर्व. सदसदविवेक बुद्धी इतकी कशी नश्ट होउ शकते असा प्रश्न पडतो.
पुढील चॅप्टर मुसोलिनीचा सुरू झाल्यावर हुश्श झाले. काही काही चॅप्टर समजायला दोन तीन दा ऐकले बरोबरीने
वर्ल्ड वॉर २ इन कलर व हिटलरस सर्कल ऑफ इव्हिल हे दोन नेटफ्लिक्स वर बघितले. जर्म नी युद्धात हरला नसता तर त्यांचे अजूनही भयंकर प्लान होते पोलंड मधील व रशियातील नागरिकांना लेबर म्हणून वापरायचे. त्यांच्यातील बुद्धिजीवी वर्ग पूर्ण नष्ट करायचा. फक्त शेती व फॅक्टरीत लेबर म्हणूण ही लोकं वापरायची त्यांना फक्त जगायला पुरेल इतकेच अन्न धान्य ठेवून बाकी सगळे जर्म न समाजासाठी ठेवायचे. लेबेन स्रॉम म्हणून कन्सेप्ट आहे म्हणजे जगायला जागा ती फक्त जर्मन समाजा साठी सुरक्षित ठेवायची अशी आयडिया होती.

ह्याला काँप्लिमेंट म्हणून आत मोसाद चे ऑडिओ बुक घ्याय चे लिस्टीत आहे.

मोसाद' पुस्तकाबद्दल आणखी माहिती द्याल का (लेखक, प्रकाशन, भाषा इ.) ?
>>> गजा, मी वाचलेले पुस्तक धाग्यावर मी आज 'मोसाद'बद्दल लिहिलंय, बघ