जाग नव्हतीच आली...

Submitted by सुप्रिया जाधव. on 28 May, 2012 - 12:50

किलबिल किलबिल
तीच अंगणात झाली
आज माझ्या घरधन्या
जाग कशी नाही आली?

पहाटेचा गार वारा
झोंबेना का ह्याच्या गाली?
आज माझ्या घरधन्या
जाग कशी नाही आली?

नाही आठी नाही राग
चमकत्या त्याच्या भाळी
आज माझ्या घरधन्या
जाग कशी नाही आली?

शांत-शांतसा चेहरा
मान नव्हती कलली
मग माझ्या घरधन्या
जाग कशी नाही आली?

काल जागलो-बोललो
सुख- दु:खे उगाळली
आज माझ्या घरधन्या
जाग कशी नाही आली?

उठ-उठ रे राजसा !
नको थट्टा ही अवेळी
सांगा माझ्या घरधन्या
जाग कशी नाही आली?

जागवाया झोपेतून
सर वळवाची आली
तरी माझ्या घरधन्या
जाग नाही की हो आली!

जमा झाले गणगोत
कित्ती त्याच्याशी बोलली
तरी माझ्या घरधन्या
जाग कशी नाही आली?

झाल्या बघ तिन्हीसांजा
उन्हे केव्हाची कलली
तरी माझ्या घरधन्या
जाग कशी नाही आली?

बाळ रडेना बोलेना
गेला बाप, जाण आली
तरी माझ्या घरधन्या
जाग नव्हतीच आली...

जाग नव्हतीच आली...

-सुप्रिया.

गुलमोहर: 

धन्यवाद चंद्रगुप्त!

<<<<सगळीकडे शेवटची ओळ जाग नव्हतीच आली, असे ठेवल्यास चालेल का?>>>>

नाही हो ....येथे विभ्रमच अपेक्षित आहे मला.

-सुप्रिया.

सुप्रिया, पाणावले डोळे ओळी ओळीला, इतकंच लिहीते.
(परवा तुझ्याशी चॅट करताना जे वाटलं, तेच, तसंच वाटलं, पुन्हा.
भेटते लवकरच.)

<<<काल जागलो-बोललो
सुख- दु:खे उगाळली
आज माझ्या घरधन्या
जाग कशी नाही आली?
>>>

सुप्रिया

बोचल्या या ओळी हृदयाला Sad

Sad

Sad

सुप्रिया, "हे दु:ख प्रयत्नपुर्वक गिळून टाक आणि आयुष्याला सामोरी जा" हे तुला सांगायची गरज वाटत नाहिये कारण तू सामोरी जातेच आहेस आणि म्हणूनच तू ही कविता लिहू शकलीस. ऑल द बेस्ट !

शीर्षक वाचल्यानंतरच्या अपेक्षा पूर्ण होतात.. उत्तम...!!+१
कवितेच्या पाठीमागे दडलेल्या भावना जाणवल्या.+१

सुप्रिया.. अश्विनी ने माझ्या मनातलंही सांगून टाकलंय तुला..
तुझा स्वतःवरचा भक्कम विश्वास तुझ्या सोबतीला आहेच .

भिडली !