नव्या वर्षातला पहिला धक्का अन खरेदी!

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

संथपणे नवीन वर्ष उलगडतय म्हणता म्हणता, गेल्या वीकांताला चांगलाच पचका झाला!! गेला आठवडा तसा शांतच गेला, म्हणजे ऑफिसमधे म्हणतेय मी. कुठलाही सर्वर मोडला नाही, कुठलही सॉफ्टवेअर मोडल नाही..सगळ कस शांततापूर्ण. बर वाटल, कधी नाही ते जरा आराम केला. वर्षाची सुरुवात अशी सुखदायक पाहून अगदी धन्य झाले!!

शनिवारी, इथेच राहणार्‍या मैत्रिणीचा फोन आला, घरी येतेस का रहायला म्हणून , आता हे दोघे नवरा बायको, माझे अगदी चांगले मित्र आहेत, आणि त्यांच पिल्लूही मला बिलगत आत्त्या, आत्त्या करत. आणि मजाच असते यांच्याकडे जायच म्हणजे. खूप गप्पा, एकत्र केलेल जेवण, पाहिलेले सिनेमे, पिल्लूबरोबर केलेली धमाल, हसण, जुन्या आठवणी... तर आलेच, म्हणत धावलेच सगळी आवरा आवर करून त्यांच्या घरी. तसही आम्ही साधारण पंधरा एक मिनिटांच्याच अंतरावरच राहतो.मग काय, एकदा तिथे पोचल्यावर हसण, खाण, सिनेमे पाहण, पिल्लाची चिव चिव, सगळ मजेत नेहमीप्रमाणेच चाललेल. संध्याकाळी फिरायला गेलो, एकूण दिवस मजेत गेला. रविवार आणखीनच मस्तपैकी आळसात गेला, छान जेवलो, सुपारी चघळली, परत सिनेमा पाहिला, संध्याकाळी बाहेर जाऊन आलो, दोन्ही दिवशी गप्पा तर इतक्या केल्या की पुढच्या वीकांतापर्यंतची बेगमी झाली!!! Happy

सोमवारी सकाळी घरी यायला निघाले, आणि घरी पोचल्यावर पर्समधे हात घातला तर किल्ली गायब!!

सहसा मी किल्ली नेहमीच्या एकाच कप्प्यात ठेवते, पण न जाणो कुठे, इथे तिथे ठेवली असेल म्हणून अख्खी पर्स उलटपालट करून शोधल... किल्ली नव्हतीच! तरी अजून सामानाची सॅक बाकी होतीच, ती देखील सामान काढून उलटी पालटी करुन पाहिल, त्यात पण नाही!! आणि हे सगळ, फ्लॅटच्या दारासमोरच!! दुसर काय ऑप्शनच नव्हत! तसाच परत मैत्रिणीच्या घरी फोन ठोकला, ती बिचारी पिल्लाला शाळेत पाठवायच्या तयारीत, तरी तिनेही शोधलेच घरी वेळात वेळ काढून. तोपर्यन्त मी ही परत त्यांच्या घरी जाऊन धडकलेच होते. मी अन मित्र जोडप्याने विचारविनिमय करायचा निष्फळ प्रयत्न केला. त्यातून उत्पन्न काहीच झाले नाही!! शेवटचा उपाय म्हणून पिल्लूलाही विचारले, कारण साहेबांना सवय आहे वस्तू काढून तिच्याशी खेळायची अन आत्त्याची पर्स म्हणजे, त्यावर तर हक्कच ना!! Happy आता आत्त्याच्या लॅपटॉपवर हक्क आहे, तर पर्सच काय एवढ मोठ्ठ?? Happy Happy पण एक मात्र आहे, समजा, एखादी वस्तू आमच्या या पिल्लाने घेतली असेल ना, आणि जर ती सापडत नसेल आणि जर पिल्लूला विचारल की तू घेतली होतीस का? तर आमच हे गोडूल सगळ सांगत, कधी घेतली, ती घेऊन काय काय खेळ केला, कुठे टाकली , घरातून बाहेर टाकली का, पुढच्या गॅलरीतून का मागच्या वगैरे, वगैरे!! आणि हे सगळ, अगदी निष्पाप चेहर्‍याने, मोठे मोठे भोकर डोळे करुन आणि चेहर्‍यावर एक गोडस, कशी जम्मत झाली, ह्या थाटातल हसू घेऊन! तुम्हाला चिडायचा काही स्कोपच नाही!! तर पिल्लानेही मोठ्ठ नाssssही अस सांगून दिल!

त्यावर,त्याच्या बाबानेही लगेच तू किल्ली दिलीस ना, तर आत्त्या मोठ्ठ चॉकलेट देईल अस आमिष दाखवल (शोभतो की नाही बाबा एचआरचा पाईक!) तरी उत्तर बदलायची तयारी नव्हती, त्यावरून तर स्पष्टच होत सगळ, पण थोड्या वेळातच एका चिमुकल डोक प्रकाशमान झाल आणि भरभर उत्तर यायला लागली!!

"मी माळ्यावर टाकलीये!!... कुठाय चॉकलेट आत्त्या??... " परत एकदा थोड्या वेळाने, " मी ना, मी ती बाथरूममधे ठेवेलीये बेसिन पाशी... आत्त्या, तू मला चॉकलेट देणारे का?? हो ना?" हे अगदी गोड आवाजात अन त्याहून खतर हसून दाखवून!! परत एकदा, आता शाळेत जाता जाता, "आत्त्या, तुझी चावी हरवलीये का?? मग तू इथेच ये आता, मी नी, मी ती फेकून दिलीये बाल्कनीतन.. चॉकलेट आण हां.... टाटा!! " या सगळ्या गोंधळात बाबा मधून मधून निरर्थक वाक्य पेरत होता, "अरे चॉकलेट फक्त चावी शोधून दिलीस तर.." वगैरे, पण नसत्या गोष्टींकडे पिल्लू लक्ष देत नाही!! असो. पिल्लाच्या वागण्यान, थोडफार मनावरचा ताण हलका झाला होता खरा. मग परत एकदा किल्ली शोधून, ती न सापडताही, अस्मादिक सोमवार असल्यान, (आणि हापिसात सोमवारीच उपस्थिती नसल्यास बॉस ताताथैय्या करेल हे ओळखून) ऑफिसला रवाना झाले. कित्ती कर्तव्यपरायणता किनै!! असो.

चेहर्‍यावर ताण दिसत असला पाहिजे, कारण कधी नाही ते बॉसने विचारल काय झालय, आणि कारण सांगितल्यावर, उद्या किल्ली नाही सापडली तर, सगळ कुलूप वगैरे बदलूनच ऑफसला ये, म्हणाला, उशीर झाला तरी चालेल, अशीही परवानगी दिली. कित्ती ग तो माझा गुणाचा बॉस, अस म्हणावस वाटल अगदी!! मग रात्री परत एकदा वरात मित्रघरी. हसत मुखान स्वागत झाल, पिल्लाची मिठी परत एकदा गळ्यात पडली, गप्पा, सिनेमा..परत एकदा छानस हवस वाटणार रुटीन झाल. दुसर्‍या दिवशी मी अन मित्र जाऊन नव कुलूप, नवी किल्ली हे सगळे सोपस्कार करून आलो. हापिसात आल्यावर बॉसनेही सगळ सेफ आहे ना आता, अशी चौकशी केली. फणस आहे तो अगदी.

शनिवारनंतर एकदम मंगळवारी रात्री ऑफिसमधून गेल्यावर घरात परत पाऊल ठेवल. रात्री घरी पोचले नाही तोच पिल्लाचा फोन आला, "आत्त्या, तू का गेली घरी? आली का नाही? आता येते का?" ह्या पिल्लाच्या प्रेमात पडण एकदम सोप्प आहे!! Happy नव्या किल्लीची एक आवृत्ती मित्रघरी पण आहे आता!

असो. परत एकदा नवी किल्ली आणि जुन घर अस नव्या वर्षात रुटीन सुरु झालय. आणि, नवीन वर्षाची हीच ती माझी अक्कलखाती जमा केलेली नवी खरेदीही !! Lol

विषय: 
प्रकार: 

छान लिहिलं आहेस..

माझी मुलगीसुद्धा अशीच वस्तूंशी खेळते पण कुठे काय ठेवले आहे ते नीट सांगते.. कधी कधी उलट होतं वस्तू आमच्याकडूनच इकडे-तिकडे ठेवली जाते आणि ती आम्हाला शोधून देते.. Lol

मस्त जमलाय लेखः-)
एवढीशी चिमुरडी किल्ली, पण हरवली की नानी याद दिलवते. माझी पण अशीच एकदा हरवली होती. रात्री नवाला वरळीहून दादरला जाऊन "घरफोड्या" टॅक्सीनी आणला, डुप्लिकेट किल्ली बनवून घ्यावी लागलीन्!

असो! बापूंचे "फणस आहे तो अगदी." हे वर्णन फार आवडले:-) पण कोणते बापू? देसी की फिरंगी?

गर्ली, तो 'फणस' एक आवडलाच.
मस्तच झालाय लेख. चिशेषता त्या पिल्लाचं वर्णन... अगदी चपखल.

मी पण प्रेमात पडले त्या पिल्लाच्या!
छान. लिहिण्याची शैली मस्त.

आहेस.
चावी हरवली आहे अस कळाल्यावर दारातच घाम फुटतो काय कराव सुचत नाही माणुस भांबावुन जातो.
स्वानुभव. Happy

छानच लिहिल आहे. यावरून माझा एक किस्सा आठवला. मी नवी मुम्बई मध्ये मित्रांबरोबर रहायचो तेव्हाची गोष्ट. आमचे एक प्रशिक्षक श्री राव, आमच्याशी अगदी मित्राप्रमाणे वागत. आमच्या अपार्टमेन्ट मध्ये येऊन गप्पा वगैरे मारणे हेही होत असे. ते आणि एक मित्र एकदा आमच्याकडे संध्याकाळी आले आणि खूप वेळ गप्पा झाल्या. अगदी रात्रीचे अकरा वाजले तेव्हा ते निघाले. मी आणि माझा पंजाबी रूम मेट त्यांना निरोप द्यायला लिफ्टपर्यंत आलो आणि लक्षात यायच्या आत घराचं दार बंद झालं ... मी घरातल्या एका बर्म्युडा, टी शर्ट आणि हवाई चप्पलवर होतो. माझ्या लेन्सेस सुद्धा झोपायची वेळ असल्याने काढून ठेवलेल्या..
सर्वांनी आत कुठे किल्ली ठेवलेली असेल तर ती काढता येईल का याचे प्रयत्न करून झाले. शेवटी राव यांच्याबरोबर त्यांच्या बेलापूरच्या घरी जाण्याचे ठरले. मी तसाच गेलो त्यांच्याबरोबर. अगदी कससच वाटत होतं... सुदैवाने त्यांचं कुटुम्ब माहेरी गेलेलं होतं..
दुसर्या दिवशी सकाळी त्यांचाच एक ड्रेस घालून ट्रेनने नेरूळला आलो. डुप्लिकेट किल्लीवाला मिळायच्या आधी काही तार वगैरे वापरून दरवाजा उघडेल का हे पहायला गेलो. सहज बेल दाबली तर अहो आश्चर्यम!! आतून माझ्या केरळी रूममेटने दार उघडले... तो आणखी दोन दिवसांनंतर येणार होता गावाहून, पण काही कारणांनी लवकरच आला होता.. तो पहाटेच आला होता आणि आम्ही कुठे गेलो याचा विचार करत होता. त्यावेळी कुणाकडे मोबाईल फोनही नव्हते... तर अशी झाली आमची धमाल्ल!!

शैलजा, माझी पण हीच अवस्था झालिये आणि भरीस भर म्हणून त्याच की चेन मध्ये स्टील च्या कपाटाची किल्ली आहे. सध्या भागवून घेते आहे कुटुम्बियांच्या किल्लीवर पण लवकरच निर्णय घ्यायला लागेल की सर्व कुलुपे बदलायची का? अश्या वेळी एकत्र कुटुम्बपद्ध्तीच खर महत्व कळत.आमच्या घरी घराला कुलुप फक्त ३-४ वेळा लागल.घरच्या मुन्जी लग्नप्रसन्गी फक्त सगळी बाहेर जात एरवी आजी नाहीतर एखादा जुना नोकर कायम घरात असे.तेव्हा असे पुट् कन स्वत:च्या किल्लिने दरवाजा उघडून घरात शिरणार्‍या मैत्रिणींचा हेवा वाटे. आता नाही वाटत.
तुझे लेख आणि अनुदिनी वाचते आहे. मला फार आवडली तुझी लेखनशैली. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
अन्जलि

अजून थोडं खुलायला पाहिजे होतं का गं ??????? Happy

बाकी फणस मस्तच ....... Happy
--
अरूण

आता जरा स्वतःच्या वस्तू नीट सांभाळत जा हो.. तंद्रीत फिरू नकोस कुठेही जाताना... Happy

मस्त लिवलाय आणभव. ते पिल्लू तर अगदी उचलून घ्यावं.
नसत्या गोष्टींकडे पिल्लू लक्ष देत नाही Happy अगदी अगदी. फिल्टरच बसवलेला असतो कानाला. त्यातनं हवं तेच बरोबर आत पोचतं.

माझा भाचा पण माझ्या चप्पल लपवुन ठेवायचा. Happy

सही लिहीलेस...
Happy
पण तुझ्याकडे जुन्या कुलुपाची एकच किल्ली कशी काय होती?
दुसरी किल्ली ही हरवली होती का?

अभि: ह्या लोकांचही असच होत कधी कधी Happy
अभिजितः देसीच की!! फिरंग्याला फणसाच कसल आलय कवतिक!! Happy
दाद: तू 'दाद' दिलय, आणि काय व्हया? Happy
चिन्नू: अगदी, अगदी ग Happy
झकासः खरय रे, चांगलीच सटपटली होती माझी!!
आफताबः धमाल किस्सा!! Happy
केदारः धन्स रे.
अंजू: काय केलस शेवटी, बदलली का कुलुपं? आणि धन्स ग शुभेच्छांसाठी Happy
अरुणः धन्स, बाकी तुला मी सांगितलेच आहे Happy
काट्या उर्फ मयुरेशः चूप ए!! आणि गप ए!! :):)
संघमित्रा: अनुमोदन अगदी Happy
दिव्या: Happy
गोबू: समझा करो ना!! सगळया चाव्या एकत्रच होत्या :p

शैलु,
तुझे पिल्लाच वर्णन मस्तच. ते वाचुन अश्यातच ऐकलेले संदिप खरे आणि सलील कुलकर्णीचे गाण आठवले. हे त्यांनी आ.बो.का. मध्ये गायल होते.
तुझ्या पिल्लासाठी एकदम फिट्ट.

ईल्लु ईल्लु पिल्लु गं, अजुssन भलत टिल्लु गं.
नाक छोटं तोरा मोठा, गाल रुसुन फुल्लु गं
गाल गुबगुब गोले गं, डोले लुकलुक तारे गं
हिलवा फ्लॉक लिबिन लाल, गाली छोटे डुल्लु गं

अल्बमः अग्गोबाईss ढग्गोबाईsss

अग रुनी कसल गोड गाणं ग!! Happy
लोपा धन्स Happy

शैलु
वा तुझी लिहीण्याची शैली मस्तच
या पिल्लुच्या प्रेमातच पडलो बुवा अपुन Happy
किती छान गो.न्डस वाटत तुझ्या लिखाणातुन .
लहानपण गेल आठवुन

पिल्लु मस्तच..... माझं पिल्लुहि असंच आहे. अगदी झोप उडवुन टाकतं. एकदा तर बाबाचा मोबाईल डब्यात आणि डबा फ्रिजमध्ये!!!
घरभर शोधला. तसं पिल्लुनी सांगितलं की फोन डब्यात आहे , पण डबा फ्रिजमध्ये हे कोणाच्या डोक्यात येणार?????
दुसरे दिवशी फ्रिज साफ करताना सापडला. २० मिस्ड कॉल्स होते माझे.

काय मस्त लिहिलस!!! आता ह्यापुढे किल्लि जिवापाड जपणार का?
पुढच्या लिखाणाला शुभेच्छा.

खर तर किल्ली हरवणे हा घायकुतीला आणणारा प्रसन्ग, पण ती घायकुती वगळुन सर्व काही लिहिलेस यातच लिखाणाचे यश सामावले आहे!
(एकदा माझया कारची किल्ली देखिल अशीच चोरीला गेलेली,, लिहिली पाहिजे ती गोष्ट)

अथकगुरुजी, प्राची, सुहास्य, लिंबूदा थॅन्क्स Happy

अरे मी जवळ जवळ १ महीन्या नंतर हे सगळ वाचलं आज, खूप छान वाटलं.

अश्या सगळ्या हरवणार्‍या वस्तूंना मोबाईलसारखी रिन्ग देता यायला हवी,किमान घरात असूनही सापडत नसल्यास उपयोग तरी होईल! माझ्या अनेक वस्तू हरवण्याच्या आणि विसरण्यावर एकदा बसमध्ये एका आजोबांनी 'बायको विसरून जऊ नकोस' म्हणुन टोला दिला होता.

छान लिहिले आहेस!

संदीप, गिरिराज धन्यवाद.
आणि, रिंगटोन द्यायचे साधन कुठेतरी हरवले तर काय करायचे गिरिराज?:)
सल्ला देणारे आजोबा पुण्यातले होते का?? Lol

giriraj
एक गोश्त विसर्लात !! विसरलेलि वस्तु परत मिलत नाहि आनि तिला आवाजहि नसतो. पन बायको विसरलात तर थनाना ओरदत ती घरी येइल आनि नन्तर तुमचि काय अवस्था होइल ते चित्र दोल्यासमोर कधि आनले आहे का?