AC मध्ये बसून PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी

Submitted by Prasad Chikshe on 24 April, 2012 - 12:55

माझे पहिले लेखण

बीड जिल्ह्या सारख्या अविकसित भागात राहून ही तशा पाहता सर्व चांगल्या सुविधा मला माझ्या आई मुळे लहान पणापासून मिळालेल्या. पाहिजे ते सगळ सगळ मिळाल. त्यामुळे काही नसल्यानी काही सोडावं लागत. असतं त्यात भागवावं लागतं. नसण्याचा स्वीकार करत आपल्या जगण्याचा विजय करण्यासाठी भर तारुण्यातील जीवन काळ्या मातीत मळण्यात व उन्हात तळण्यात घालवण्याची वेळ माझ्या वर कधीच आली नव्हती.
लातूरच्या भूकंपाच्या पुनर्वसनाच्या कामात सहभागी होताना निसर्गाच्या कोपामुळे उद्वस्थ झालेले मनुष्यजीवन जवळून पाहता आले.

गावातले लोक कष्टकरी प्रेमानी सर्वाना आपलेसे करी.
मातीतून सोन पिकवण्याचा त्यांनी घेतला होता ध्यास.
मातेनीच मातृत्वाला आज दिली होती आग ........
काळजाचा ठोकाचुकला आणि गावाचा नक्शाच बदलला
झोपीत होता तो काळ झोपीत गेला.
सुंदर गावाची झाली स्मशानभूमीच आज
आपल्याच माणसांची प्रेत जाळताना दुखत होती त्यांची हात.
आणि माझं आयुष्य पण बदललं.

५ वर्ष विवेकानंद केंद्राचे काम करत असताना अनेक व्यथांनी आणि असुविधानी गांजलेले लोक पाहिले होते.१९९९ मध्ये मी भारत बलशाली राष्ट्र कसे होऊ शकते या डॉक्टर अब्दुल कलामांच्या अभ्यास गटाचे काम करून व ते स्वप्न उराशी बाळगून मी अंबाजोगाईला परतलो. आपल्या तालुक्याचा विकास झाला की आपल्या देशाचाही होतो या भावनेनी. गावातील प्रज्ञावंत मुलं शोधायची व त्यांना नेतृत्व विकसनाच कृतीशील शिक्षण देणे व त्यातून उद्याच उमद नेतृत्व उभ राहील व आपला देश बलशाली होईल ही बौद्धिक दृढता होती. अनुभव अनेक ठिकाणचा घेतला होता तर आपल्या तालुक्याचा फारसा नव्हता त्यातल्या त्यात ग्रामीण अंबाजोगाईचा तर शून्यच........

तीन गावं निवडली .....पोखरी त्यातील एक. माझे अनेक मित्र तेथील माध्यमिक शाळेत शिक्षक होती. बालपणा पासूनची मित्र त्यामुळे काम करणे खुपच सोपे होते. ८ वीचा वर्ग,आठवडयातील एक दिवस,शनिवार आणि २ तास अस ठरलं.

सुरुवात खुपच छान झाली. मुलांशी एकरूप होऊन गेलो की ते आपली होतात जग विसरतात आणि आपली वर्ग खोली त्याचं विश्व बनत व त्यांना शिकवणारा त्याचं दैवत याचा अनुभव मी घेत होतो. आनंदानी चिंब करून टाकणाऱ्या या हृदयी ते त्या हृदयी चा अनुभव घेण्याच्या या प्रक्रियेतुन शिक्षक दुरावतात का? याचा प्रश्न मात्र नकळत निर्माण व्हायचा. अगदी बोटावरची गणिते, सूक्ष्मदर्शीनी आपले रक्त पाहणे मग आपल्या नखातील व तोंडातील घाण पाहणे व त्यातील सूक्ष्मजंतू पाहून मुलं शाररिक स्वच्छते बद्दल जाणते झाले. गावातील गटारातील पाण्याचे निरीक्षण करून “स्वच्छ गावं स्वस्थ गावं” हे अभियान पण राबवले .....मी शनिवारी पोखरीत तर मुल रविवारी अंबाजोगाईत आपल्या खर्चाने, हे प्रवासाचे पैसे कुठून येतात हे मात्र मला त्यावेळी समजले नव्हते किवा त्याचा विचार ही माझ्या मनात कधी आला नव्हता. संगणक शिकणे....चांगले चित्रपट पाहणे ....अंबाजोगाईच्या पंचक्रोशीत खूप भटकंती करणे....... आपल्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या पाखरांन बरोबर खूप विहार करता आला.

या मुलांनीही मला खूप काही शिकवलं .....कांद्याला फुल येत ......ऊस न कापता कसा खायचा .....बैलगाडी कशी चालवायची .....मी जे शिकलो होतो ते त्यांना शिकवत होतो ....आणि ते जे जगत होते ते मला शिकवत होते......शिक्षण ही प्रक्रिया खरं अशी देण्याघेण्याची का होत नाही ?

सलग दोन वर्ष न चुकता हे चालू होत .......अंबाजोगाईतील प्रज्ञावंत मुलांमधील काम वाढलं व माझ पोखरीला जाण्याच बंद झालं.

पण ग्रामीण भागातील शिक्षणाचा चांगलाच अंदाज आला. १० वर्ष शाळेत अनेक विषयांचा अभ्यास केल्यावर,दर दोन महिन्यांनी एखादी परीक्षा देऊनही त्यात परत ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षाना सामोरे जाऊन विद्यार्थ्याला आपण पुढील शिक्षणासाठी आपल्या क्षमतेस पूरक अशी शाखा व विषय शोधता का येत नसतील ? ही समस्या फक्त ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या मुलांची नाही तर शहरी भागात अनेक विषयांचे शाळेतील व शाळाबाहेरील तज्ञ मार्गदर्शन घेऊन चांगले गुण मिळवणाऱ्या भल्याभल्यांच्या मुलांची पण प्रकर्षानी दिसते. आपल्या भावी आयुष्याची दिशा हि आपल्या क्षमतेनुसार निवडता न येता प्रचलित “धोपट मार्गा सोडू नको” या ठोकताळ्या ने ठरवणे हि आपल्या शिक्षण पद्धतीतील मोठी शोकांतिका नाही का ? डॉक्टर, इंजिनिअर तयार करणाऱ्या शास्त्र शाखेतच हुशार मुलांनी प्रवेश घेतला पाहिजे हा एक प्रस्थापित नियमच आहे. फाजील आत्मविश्वासामुळे अनेकाचे आयुष्य अपयशी होताना मी पहिले आहे पण सार्थ आत्मविश्वास विकसित न झाल्या मुळे आयुष्यात जास्त काळ वैशाख वणवा अनुभवणारे संख्येनी जास्त पहावयास मिळतात. खर तर शिक्षणाचा मूळ उद्देशच हा सार्थ आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे.

१० वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात शेतीला फारसे स्थान नाही. मराठवाड्यातील काय देशातील अनेक लोक १० वी नंतर शेती करतात.थोड फार शेतीला ग्रामीण भागातील शाळेत स्थान दिल तर बरच काही होऊ शकेल अस वाटत.

२००६ मध्ये खोलेश्वर महाविद्यालयातील मुलांचा राष्ट्रीय सेवा योजनेतील १० दिवसांच्या श्रमदानाचे शिबीर प्रबोधिनी च्या भावी कामा साठी घेतलेल्या शेत जमिनीत आयोजित केलं होत. ५०/६० मुल तंबूत राहून शेततळे खोदण्याचे काम करणार होती. २/३ दिवसात्त मुलांची चांगली ओळख झाली.

दुपारच्या जेवणा नंतरच्या विश्रांतीसाठी सर्वजण गेली होती. मी बाभळी च्या झाडाखाली मस्त पहुडलो होतो.....अचानक कुणीतर आल्याची जाणीव झाली व डोळे उघडले ....समोर एक काळासावळा ....गोल चेहऱ्याचा .....मळकट पांढरा सदरा ....पण थोडे आदरयुक्त पण खूप आपुलकीचे भाव .......मी हसलो ....आणि तो पण ....त्याने विचारले, “दादा ओळखल का मला ?” ......नव्हत ओळखता येत मला. तो म्हणाला, “दादा मी, रानबा ...पोखरीचा....तुम्ही येत होतात न आम्हाला शिकवायला.”

अरे किती बदलला आहेस रानबा ....

मुलं मोठी झाली की आपण त्यांना विसरतो ते आपल्याला नाही याचा अनेकदा अनुभव मला येतो .....

“दादा, BA च्या ३ ऱ्या वर्षाला आहे मी” रानबा म्हणाला.

जवळ पास तास भर आम्ही त्या जुन्या विश्वात वावरत होतो. रानबा सोडून सर्वांनी शिक्षण सोडलं ...सर्व जण काम करायला लागले ....वर्गातील अनेक मुलींचे लग्न झाले व काहीना मुलं पण ....एक खूप हुशार मुलगी तेवढी राहिली, एक छोटा पांढरा दाग होता शरीरावर म्हणून .....

“रानबा, तू खूप चांगल करतोयेस शिक्षण घेतोस .....चांगल वाटलं” मी रानबा ला म्हणालो, रानबा पण अभिमानाने हसला.

त्याशिबिरात सर्वात चांगला सहभाग व सर्वात चांगले काम करण्याचा पुरस्कार सर्व मुलांनी एक मतांनी रानबाला दिला. खूप छान वाटलं.

रानबाशी आत्ता चांगली मैत्री झाली. तो नियमित भेटीला येत होता. त्याला MA करायचं होत मग B Ed व त्या नंतर शिक्षक ....एक सुंदरस स्वप्न होत त्याच. त्याला मी म्हणाली अंबाजोगाईतच रहा मी करतो तुझ्या राहण्याची सोय कारण तो सध्या सायकली वरून दररोज १६ किमी जाणयेण करत होता.

मी थोडा आग्रह पण करत होतो. रानबा त्या दिवशी जो गेला तो परत महिना भर भेटलाच नाही.
महिन्यांनी तो परत आला ...मी थोडं रागानेच त्याला म्हणालो, “रानबा,शिक्षक व्हायचं आहे न ? कॉलेज का करत नाहीस ?”

“दादा, घरी आता कुणाला तरी एकाला रहावच लागत. बा रानात जातात आई ६० रुपये रोजानी जाते .....घरच भागात नाही म्हणून छोटा भाऊ किन्नर म्हणून गेला आहे ट्रक वर .....घरच पाणी भराव लागतं,पाण्याला लई मोठी रांग असते. एक घागर हात पंपा वरून मिळायला बारीत अर्धा तास जातो. पाण्याशिवाय कसं चालणार दिवस भर पाणी भरण्यातच जातो. आत्ता पर्यंत भाऊ करायचा कारण त्यान शिक्षण सोडल होत. पण तो कामावर गेल्या पासून मला रहाव लागतं घरी” रानबा बोलत होता.

दिवाळीच्या फराळाच निमंत्रण देऊन तो निघून गेला. हे निमंत्रण मी स्वीकारले कारण मला रानबाचे घर पहायचे होते त्याच्या कुटुंबियांना भेटायचे होते. दिवाळीत मी पोखरीला निघालो रानबाच्या घरी.

देवळाच्या बाजूच्या बोळीतून थोडं पुढ गेलं की उजव्या हाताला रानबाचे घर होते. तसा तो पारावरच माझी येण्याची वाट पहात होता. घर मातीच ....गेल्याबरोबर मोकळी जागा. एक बाजूला तुराठ्यांचा आडोसा करून तयार केलेल स्वयंपाक घर .....दोन पत्र्याच्या खोल्या, दगड माती ने बांधलेल्या. अंगणात एक विजेचा बल्ब लटकत होता.

“आई, दादा आले”, रानबा ने आई ला आवाज दिला.

आई लगबगी ने पाणी घेऊन आली हात पाय धुण्यासाठी. सहावार,काठापदराची पण थोडी जुनी झालेली साडी..... रानबा सारखाच रंग व चहेरा...४५ च्या आसपास वय असावं....

“या दादा लई ऐकल रानबा कडून तुमच्या इशई.....बर झाल आलात.ये रानबा अंथर की पोत बसायला” रानबाची आई खुपच आस्थेनी बोलत होत्या.

रानबा लगेच बाहेर गेला त्यांनी पोहे आणले. आई नी चूल पेटून भांड ठेवल ....कांदे, कोथिंबीर कापली ....शेंगदाणे, तेल....मस्त वास येत होता ... रानबानी पोहे भिजवले ....या दरम्यान माझे रानबाच्या आईला प्रश्न विचारने सुरु झाले. “दिवाळीत रोजंदारीच काम नसेल न ?”

“अस कसं होईल जावच लागतं ......आज तुम्ही येणार म्हणून नाही गेले.( “म्हणजे ६० रुपयाचे नुकसान”, मी मनातच म्हणालो.) याचे बा ला जाव लागल सालगडी ह्ययंत न ते ....धार काढायला गेलेत ....ये रानबा, बोलून आन त्यांली ....आज काल या लाईटच बी काही खरं नाही बघा दिस भर नसती आणि राती येते .....मग यांली रातच्याला उसाला पाणी दयायला जाव लागतं. आता बघा न आम्ही बिल नाही भरल. येण सणात कापली आमची लाईन ......अंधारातच दिवाळी झाली ....पैसे लई लागायलेत .किती राबल तरी भागत नाही. या आमच्या रानबाला शिकायची लई इच्छा ......अव दर इतवारी हा तुरी बडवायला जायचा ...कापूस काढाय जायचा ...त्यात मग फिया भरायचा लई कष्ट केले यान ....पण आत्ता काय करणार घरी बसूनच अभ्यास चालू हाय त्याचा ....मास्तर व्हायचं म्हणे .....या ईळीस नंबर नाही लागला ....त्या प्राईवेट काय असत्या त्याच्या फिया म्हंजे आमची सम्द्यांची सालाची कमाई....गरिबाला शिक्षण नाई,पाणी नाई, इज नाई.......पण गडी धीराच हाय लई अभ्यास करतंय.......आत्ता बघाकी या कालच्या अवकाळी पावसानी घराच लई नुकसान केलं आधीच इनमीन दोन घोल्या त्यातील एक ढासळली. माती दगड काढायला बी येळ मिळत नव्हता. सणासुदीला आवराव म्हणून हात घातला अन् एक भलं मोठ जनावर फणा काढूनच अंगावर आल. अंगात कापरच भरलं.जी पळत सुटले ते थेट पाराजवळ. अंग घामानी सरदुन गेलं. एक बाई दिसली सरळ गच्च पकडल तिला. काही बी कळणं. शेवटी जवळच्या बायांनी पाणी पाजल,कांदा लावला नाकाला. थोडं भानावर आले. दिसभर घरा बाहेरच काढला. रानबा चे बा येईस्तोर हिम्मत झाली नाही. आजकाल रात्री बेरात्री लई भ्याव वाटत.”

रानबाच्या आई चे बोलणे मी फक्त सुन्न होऊन ऐकत होतो.

इतक्यात रानबा आपल्या वडिलांना घेऊन आला. पांढरी टोपी, सदरा, धोतर, चांगला रापलेला रंग, प्रचंड काम करणाऱ्या शरीरावर ज्या काही खुणा असतात त्या सगळ्या. राम राम करत वडील खाली बसले. गरम गरम पोहे, चुरमुऱ्याचा चिवडा, शेव व नुक्ती चा चांगलाच पाहुणचार मी घेतला.

जवळची एक काडी घेऊन वडील आपले तळपाय खाजवत होते. मी पाहिलं तर त्यांच्या हाताला व पायाला चांगल्याच भेगा पडल्या होत्या थोडं रक्त पण येत होत.

“काय झाल काका ?” ,मी विचारले

“खात टाकून टाकून झालं हो .....चुना लावला पण बर काही होईना दवाखान्यात जायला येळच नाही भेटला.”
मन सुन्न झाल.

“थोडा वेळ काढावा काका स्वतः साठी” माझ्यातील समुपदेशक बोलला .

“हो न जायलाच लागल. अव आपली दोन एक्कर हाय त्यात भागत नाही म्हणून सालगडी म्हणून हायएका कड. सकाळी आपल्या रानात घंटे दोन घंटे नंतर दिस बर मालकाच्या रानात. दिस कधी जातंय समजतच नाय. रात्री दुखायल की ध्यानात येत.” रानबाचे वडील सांगत होते.

बऱ्याच गप्पा झाल्या. रानबाच्या कुटुंबाची चांगलीच ओळख होत चालली होती. AC मध्ये बसून PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी होतो. पंचतारांकित व्यवस्थेत बसून देशाला बलशाली बनवण्याचे नियोजन करणाऱ्यातला मी. विचारांची चक्र भरभर फिरत होती. अश्या अनेक रानबानां शिक्षण सोडून देत पाणी भराव लागतं. तुरी बडवाव्या लागतात, कापूस वेचावा लागतो,ऊस तोडावे लागतात आणि मग आमच्या सारखे लोक विनासायास चांगल विद्यावेतन घेत चांगल्या महाविद्यालयात जाऊन उच्चविद्या विभूषित होतो......
त्याचं जीवन मी कसं समृद्ध करू हा विचार तिथे करत त्यांच्या दैनंदिन कामातील अडथळा आणण्या सारखे होते ....बराच वेळ घेतला होता.

जाण्यासाठी निघालो आई, वडिलांच्या पाया पडलो आणि टावेल टोपीचा आहेर पण घेतला ........
पारापर्यंत आलो तेच रानबाच्या आईचा आवाज आला.ती आम्हाला बोलावत होती. आम्ही परत घरात गेलो आईच्या हातात रंगीत करदोडा होता. तिने तो मला दिला मी तिला विचारल , “ हे कश्यासाठी ?”

आई म्हणाली, “दिवाळीच्या दिवशी आपल्या घरातील मोठयापोराला कंबरेला करदोडा बांधण्याची रीत हाय कसली इजा बिजा येवूनाये म्हणून. आत्ता रानबा तुम्हाला दादा म्हणतो मग तुम्ही माझ थोरलं पोर की आता तुम्हालाच द्यावा लागणार. फक्त या रानबा जरा थोडं समजून सांगत जा आम्हाला ते काय म्हणताय ते काय बी समजत नाही”

रानबाच्या आईच्या त्या शब्दान मध्ये व कृतीत मला सापडलं काय आपला भारत या जगाला देऊ शकतो ....आणि काय शिकऊ शकतो.

मी डोळे घट्ट मिटले व माउलीचे पाय धरले.........

गुलमोहर: 

विजय केडियांविषयी rural jal yodha मधुन साभार...
Vijay Kedia
'Where there is a will there is a way', goes a popular saying, which perfectly applies to Vijay Kedia, an Aurangabad-based mechanical engineer/builder. While working on his family farm, his improved his understanding of water and its various facets. Further, the knowledge of raditional rainwater harvesting systems of Rajasthan encouraged him to innovatively modify the existing techniques to suit the local context. The Dewas roof water filter, Kedia-farm pattern bandhara (an earthen dam, commonly found in Maharashtra) and a rain gauge are the result of eight years of exploration. The potential of these low cost structures in eradicating ecological and economic poverty has been widely acknowledged. A Kedia bandhara costs only Rs 5,000 and can capture 70 - 80 per cent of the monsoon runoff, while keeping the soil moist for next five to six months. It is constructed by digging a two feet wide and eight to ten feet deep trench before the bandhara, and refilling it with soil after vertically lining it with a PVC sheet. The trench acts as a vertical aquifer. The PVC sheet stops the water from percolating outside. In his farm, following the seventh century model at Ghadasisar in Jaisalmer, the bhandaras are constructed in a series - thus, preventing the runoff going waste. The wells are constructed in the bottom of the bhandara - ensuring a sustained availability of water.

These days he is actively spreading the knowledge around with one message - "Sai jitna dee jiye, wame kutumb samaye" (the rain god is giving us enough water, it has to be managed intelligently), which Kedia believes can sustainably solve the water scarcity.

He has also designed a simple rain gauge, which costs only Rs 2, with a two-litre plastic bottle.

For details:
72, Pannalal Nagar
Aurangabad 431 005
Maharashtra
Tel: 0240-2337974 / 2339934

डोळ्यात अंजन घालणारा लेख..
प्रसाद, तुमच्या कामात माझी काही मदत होवू शकत असेल तर नक्की सांगा. माझ्या विपुत संदेश द्या. आपण बोलु.

प्रसाद ~

जितके सुन्न करून टाकणारे लेखन तितकेच तुमच्यासारखे काही हाडाचे कार्यकर्ते त्या रखरखत्या वातावरणातही तनमन आणि प्रसंगी धनही अर्पण करून एका विशिष्ठ ध्येयाने पछाडून जाऊन अहर्निश कार्य करीत आहेत हे पाहून अजूनही म्हणावे लागते की 'देअर इज स्टिल समथिंग व्हायटल अमंग अस..!"

फार वर्षापूर्वी व्यंकटेश माडगूळकरांच्या एका व्यक्तीचित्रात '......आणि मग गावातील लोक जगण्यासाठी बाहेर पडले' वाचले आणि ग्रंथालयात पंख्याखाली बसलो असतानाही दुष्काळाची अस्सल झळ जाणवली. तुमचा लेख आणि त्यातील शब्दबद्ध केलेले रानबाच्या आईचे चित्र....[जिच्या दिवसाच्या कमाईचे ६० रुपये बुडाले म्हणून तुम्ही व्यक्त केलेली खंत] हे खरे तर सार्‍या ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र असणे क्रमप्राप्त आहे. रानबा बी.ए. होवो वा ना होवो, तो प्रश्न त्या माऊलीपुढे निदान आजतरी महत्वाचा नाही, जितका आहे तिच्या नवर्‍याच्या पायातील भेगांचा. अंगावर सर्रदिशी काटा आला ते वर्णन वाचून.

इथे शहरात 'आमच्या राजूला बिसलेरीच हवी' असा हॉटेलमध्ये हट्ट धरणारी अंगावरून पोतभर चरबी वाहून जाणारे डॅडी मम्मी आणि त्यांची तसलीच मस्तवाल पोरे पाहिली की वाटते हे या देशाचे सुखनैव चित्र नव्हेच. पण या टीव्ही चॅनेल्स संस्कृतीने हीच सूज रात्रंदिवस समोर ठेवून ठेवून एक देशाच्या भौतिक प्रगतीविषयी एक फसवे चित्र तयार केले आहे. त्याना दाखविले पाहिजे तुमचे हे अंबेजोगाईचे कार्यक्षेत्र.....पण दाखविले तरी स्क्रीनवर ते कोण बघणार हाही एक नवाच प्रश्न.

शिक्षणाच्या अवस्थेविषयी तुम्ही म्हणता तसे डॉक्टर, इंजिनिअर तयार करणार्‍या शास्त्र शाखेतच हुशार मुलांनी प्रवेश घेतला पाहिजे हा एक प्रस्थापित नियमच आहे; जो शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातूनही रुढ होत चालला आहे. "माझ्या मुलाला त्यासाठी मी इतकी रक्कम डोनेशन म्हणून दिली होती...." हे वाक्य हमखास लग्नाच्या बोलाचालीत ऐकायला मिळते. म्हणजेच पोरावरील गुंतवणूक आपण होणार्‍या सूनेच्या घरातून वसूल करून घेणारच ही एक नवा आर्थिक फंडा या समाजात रुजला आहे. इमारती व साधने वाढली असतील, पण शिक्षणात गुणात्मक फरक पडलेला नाही ही वस्तुस्थिती असल्याने पदवीधर युवकाला [यात युवतीही आल्याच] 'सुख म्हणजे गलेलठ्ठ पगाराची, ए.सी.मधील नोकरी....नंतर एनआरआय कसे व्हायचे' याचीच स्वप्ने पडतात. त्यामुळे नवनिर्माण करू पाहणार्‍या क्रांतिकारक प्रवृत्तीची जाणीवपूर्वक जोपासना आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आजचा शिक्षकच करू शकत नाही ही जरी असली दुर्दैवाची बाब तरी ती अपरिहार्यतेमुळे निर्माण झाली आहे.

तुमच्यासारखे मूठभर विचारी तरुण खरेतर या समाजव्यवस्थेत 'मिसफिट्स' आहेत. पण तसे पाहिले तर फुले, आगरकर, केशवसुत, भाऊराव पाटीलदेखील असेच मिसफिट्स होते म्हणून तर निदान बोट दाखविण्यासाठी का होईना 'अमुक एका गावात तमुक एक चांगले कार्य चालले आहे' असे म्हणता येते.

तुम्ही जे करीत आहात ते याच यादीतील काम आहे.

अशोक पाटील

अशोक पाटील खुपच मनकवडे विवेचन केले आहे आपण .....सुखावलो ......खूप खूप धन्यवाद. इस्तके सविस्तर विचार माडणारे लोक मायबोलीवर आहेत धन्योस......

Pages