वंध्यत्व. (भाग १-प्राथमिक माहिती आणि पुरुषांतील वंध्यत्व)

Submitted by साती on 17 April, 2012 - 02:33

( आज 'गर्भारपण आणि आहार, या धाग्यावर एका मायबोलीकरणीचे प्रश्न वाचून हा लेख लिहित आहे.)

स्वत:चं मूल असणं ही कित्येकांची मानसिक आणि सामाजिक गरज असते. निसर्गानेही पुनरुत्पादन हे सर्व सजीवांचे एक आद्य कर्तव्य ठरवले आहे. ज्यांना कोणतेही वैद्यकीय उपचार न करता मुलं होतात त्यांना निसर्गाने आपल्याला दिलेली ही केवढी मोठी देणगी आहे याचा अंदाज येत नसेल कदाचित. पण सहजीवनानंतर काही वर्षांनंतरही एखादं मूल न होणं ज्यांनी अनुभवलंय त्यांना 'वंध्यत्व' या शब्दात किती दु:ख आणि निराशा सामावली आहे हे माहिती असेल.

१.वंध्यत्व म्हणजे काय?
एखाद्या जोडप्यास एक वर्षांच्या सलग, गर्भनिरोधक साधनांशिवाय केलेल्या शरीरसंबंधांनंतरही गर्भधारणा होणे (गरोदर राहाणे) जमले नसेल तर त्यास वंध्यत्व म्हणतात.
ही झाली शास्त्रीय व्याख्या.पण सामाजिक दृष्ट्या, जोडप्यास गर्भधारणा होऊन जर एखादे जीवंत मूल झाले नसेल तर त्यास वंध्यत्व असे समजले जाते.
प्राथमिक वंध्यत्व -यात जोडप्यास एक वर्षाहून अधिक काळ शरीर संबंध ठेवूनही कधीच गर्भधारणा झालेली नसते.
दुसर्‍या वेळचे वंध्यत्व- यात जोडप्यास एखादे मूल असून दुसर्‍या गर्भधारणेत कमतरता असते.

२. कोणत्या डॉक्टराकडे यासाठी सल्ला घेण्यास जावे?
जरी वंध्यत्वाठी स्त्री आणि पुरूष दोघांतही काही दोष असू शकतो तरी प्राथमिक चिकीत्सा किमान भारताततरी स्त्री रोग तज्ज्ञांकडे (गायनॅककडे)करावी. त्या आपली प्राथमिक तपासणी करून जोडप्यातील स्त्री आणि पुरूष दोघांनाही काही चांचण्या सुचवतील. त्या चांचण्यांच्या अनुषंगाने उपचार करतील किंवा योग्य त्या दुसर्‍या तज्ज्ञांचा(उदा.एंडोक्रिनॉलॉजिस्ट,डायबेटॉलॉजिस्ट,युरॉलॉजिस्ट,सर्जन,फिजिशीयन)सल्ला घेण्यास सांगतील.

३. डॉक्टरांकडिल पहिल्या भेटीत काय अपेक्षित आहे.
बर्‍याच वेळा भारताततरी पेशंट आणि डॉक्टर यांच्यात योग्य तो संवाद होत नाही.लाजेमुळे पेशंट आणि वेळेअभावी डॉक्टर बर्‍याचश्या गोष्टींची चर्चा करत नाहीत.डॉक्टरांशी योग्य चर्चा झालीय किंवा कसे हे तुम्हाला खालील मुद्द्यांवरून कळेल.

अ. 'वंध्यत्वाविषयी स्त्री आणि पुरूष दोघेही जबाबदार असू शकतात म्हणून दोघांच्याही चांचण्या करणे गरजेचे
आहे तसेच वंध्यत्वाचे उपचार ही जोडप्याची संयुक्त जबाबदारी असून केवळ स्त्री किंवा पुरूष यांची वैयक्तिक
जबाबदारी नाही' हे तुमच्या डॉक्टरने तुम्हाला समजावलेय का?

आ.डॉक्टरांनी तुमची सगळी महत्त्वाची वैद्यकीय हिस्टरी विचारलीय का? तसेच एकत्र राहण्याचा वेळ,
शरीरसंबंधांची वारंवारता आणि काळ(पाळीच्या काळाच्या अनुषंगाने)या गोष्टी विचारल्यात का ?

इ. स्त्रीच्या पाळीसंबंधी खोल विचारणा केलीय का? कधी सुरू झालीय.रेग्युलर आहे का? किती दिवस रक्तस्राव
होतो इ.

ई. पुरूषाच्या आरोग्यासंदर्भात इतिहास विचारलाय का? उदा. बीपी,डायबेटिस,प्रजनन संस्थेसंबंधित संसर्ग,
अपघात इ.
उ. अपेक्षित चांचण्याच्या निदानानंतर ढोबळमानाने काय दोष निघू शकतात व त्यांचे निराकरण कसे करता येऊ
शकेल याची प्राथमिक,जुजबी माहिती दिलीय का?

वंध्यत्वाची कारणे-

गर्भधारणा होण्यासाठी खालील गोष्टींची गरज आहे
१.स्त्री शरीरात बीजांडातून एक(च) बीज/अंडे बाहेर पडणे (ओव्यूलेशन)
२.बीजनलिकेतून ते अंडे गर्भाशयाच्या दिशेने पोचणे.
३.बीजनलिका गर्भाशयाला जिथे मिळते तिथे पुरुषाचा शुक्रजंतू येऊन ते बीज फ़लित होणे.(फ़र्टिलायजेशन)
४. फ़लित बीज गर्भाशयात रुजणे (इंप्लांटेशन)

या चारपैकी एकाही पायरीत अडचण आल्यास गर्भधारणा होत नाही.
मुळात १/३ वेळा दोष पुरूषात असू शकतो, १/३ वेळी स्त्रीमध्ये असू शकतो आणि १/३ वेळी दोघांतही कमी-अधिक प्रमाणात किंवा एकातही नसतो.

एका सर्व्हेनुसार भारतातील विविध राज्यातील पुरूषांमध्ये ८ ते १०% पुरूषांमध्ये वंध्यत्व आढळते.

पुरूषांपुढचा मुख्य प्रश्न - वंध्यत्व की नपुंसकत्व?

पुरूषांमध्ये वंध्यत्व आणि नपुंसकत्व या अगदी टोकाच्या दोन गोष्टी आहेत. वंध्य पुरूषांची समाजात जेव्हा चेष्टा होते तेव्हा त्यांना नपुंसक ठरवले जाते. हा त्याच्या बिचार्‍याच्या पुरुषत्वावरच घाला ठरतो. त्यामुळे सहसा पुरूष वंध्यत्व निवारणासाठी डॉक्टरकडे जायचे टाळतात. माझ्याकडे जनरली एखादी बाई जेव्हा थायरॉईड,हार्मोनल इन्बॆलन्ससारख्या आजारांवर उपचार करण्याकरिता रेफ़र केली जाते तेव्हा तिच्या नवयाची काही तपासणी झालीय का या प्रश्नाचं उत्तर बर्‍याच वेळा नकारार्थी असते.

नपुंसकता म्हणजे पुरूषाला समाधानकरक शरीर संबंध करता येण्याइतपत शिश्नाची ताठरता न येणे किंव लिंग वीर्यस्खलनापूर्वीच लगेच शिथील पडणं.

या नपुंसकतेचा आणि पुरुषाच्या फ़र्टिलीटीचा (म्हणजेच मुलं तयार करण्यासाठी असलेल्या शारिरीक क्षमतेचा संबंध नाही.) पूर्णपणे नपुंसक पुरूष अवंध्य असू शकतो आणि अशा माणसाच्या शुक्राणूना सर्जिकली किंवा इतर प्रकारे मिळवून त्यापासून त्याच्या पत्नीस किंवा इतर कुणाही स्त्रीस गर्भधारणा होऊ शकते. याऊलट शरीर संबंध ठेवण्यास अगदी पात्र असलेला पुरूष (नपुंसक नसलेला)खाली दिलेल्या कारणांमुळे वंध्य असू शकतो.

पुरूषांमध्ये वंध्यत्व आढळण्याची मुख्य कारणे

  • १. शुक्राणू पुरेश्या प्रमाणात तयार न होणे
  • २. तयार शुक्राणूंचा आकार किंवा त्यांचा वेग योग्य नसणे.
  • ३. योग्य आकाराच्या आणि वेगाच्या शुक्राणूंच्या पुरूष शरीरातून बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळे असणे.

आता वरिल बाबींची कारणे बघू-

  • १. वेरिकोसील -वृषणाभोवती असलेल्या रक्तवाहिन्यांचा आकार वाढून वृषणांचे तापमान वाढते ज्यामुळे शुक्राणूंच्या वाढीस अडथळा येतो. (शुक्राणूच्या वाढीसाठी शरीराच्या तापमानापेक्षा थोडे कमी तापमान आवश्यक असते. म्हणूनच निसर्गाने वृषणांची रचना स्त्रीबिजांडाप्रमाणे उदरपोकळीत न करता मांड्यांच्यामध्ये थोडी बाहेर अशी थंड जागी केली आहे.
  • २. संसर्ग- गालगुंड(मंप्स),देवी, टिबी,लेप्रसी इ.
  • ३. शरीरसंबंधातून पसरणारे सिफ़िलिस आदी संसर्गजन्य रोग.
  • ४. अपघात/इजा –उदा. कंबरेखालील नाजूक भागास मार बसणे, भाजणे, मूत्र मार्गावरील काही शस्त्रक्रीया इ. किंवा रेडिओथेरपी, किमोथेरपी वातावरणातील विषारी द्रव्ये, अंमली पदार्थ यामुळे होणारे नुकसान
  • ५. उदर्पोकळीतच राहिलेली बिजांडे(क्रिप्टॉरकिडीजम)
  • ६. अवरोध- शुक्रनलिका जन्मत: बंद असणे किंवा संसर्ग/शस्त्रक्रीया यांमुळे बंद होणे.
  • ७. इतर आजार जसे किडनी किंवा लिव्हर संबंधीत आजार
  • ८. मज्जासंस्थेचे(न्यूरॊलॊजिकल)आजार
  • ९. जनुकीय /डेव्हलप्मेंटल आजार-सिस्टिक फ़ायब्रोसिस,क्लाईन्फ़ेल्टर इ.
  • १०. आंतर्स्त्राविक ग्रंथींचे (एंडोक्रिनॉलॉजिक) आजार-थायरॉईड, डायबेटिस इत्यादींशी संबंधीत
  • ११. इतर आजारांवरील औषधांचे (उदा बीपी) साईड इफ़ेक्टस.
  • १२. आजारच न सापडणे- काही ट्क्के (५-६%) पुरूषांमध्ये कुठलाही आजार नसतानासुद्धा वंध्यत्व असू शकते

माझ्या प्रॅक्टिसमध्ये जंतूसंसर्गामुळे शुक्रवाहिन्या ब्लॉक होणे, शुक्रजंतूंची संख्या वृषणाला झालेल्या संसर्गामुळे कमी असणे, व्यसनाधिनता ,बीपीच्या औषधांचे साईड इफ़ेक्टस आणि अपघात ही पुरुष वंध्यत्वाची तसेच नपुंसकत्वाची मुख्य कारणे पाहिली आहेत. परंतु नुसत्या नपुंसकत्वाचा विचार केला तर मानसिक कारणे- कामाचा ताण,डिप्रेशन इ. जास्त आहेत.
एक अगदी दुर्मिळ उदाहरण म्हणजे एका शेतकर्‍याचा तान्हा मुलगा शेतात ठेवलेला असताना भटक्या कुत्र्यांनी शेजारचे खरकटे खाताना त्याच्या नाजूक अवयवांचेही लचके तोडले. नंतर शस्त्रक्रियेने तो बरा तर झाला पण वृषण काढून टाकावे लागले. मोठा झाल्यावर पुरूष संप्रेरकांअभावी त्याचे बाह्यांग स्त्रीप्रमाणे दिसू लागले. त्यात बिचार्‍याचा बालविवाह झाल्याने पत्नी १४ व्या वर्षापासून घरात राहण्यास आली. हा पेशंट सध्या पुरुष संप्रेरकांचे(टेस्टेस्टेरॊन) बाहेरून इंजेक्शन्स घेत आहे. आता तो पुरुषी दिसतो, बायकोशी शरीर संबंधही ठेवू शकतो. मात्र जर त्याला मूल पाहिजे असेल तर पत्नीकरता वीर्यबँकेबतून दुसर्‍याचे वीर्य घेऊ वीर्यारोपण करावे लागेल.

पुरुष वंध्यत्वासंबंधीच्या चाचण्या –

  • 1. बाह्यांग तपासणी- खरे तर ही अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे. जंतूसंसर्ग, हायड्रोसील, वेरिकोसील, हायपोस्पॆडिऎस इ. महत्वाच्या बाबी केवळ बाह्यांग तपासणीद्वारे कळू शकतात.पण बरेचदा भारतात इनफ़र्टिलीटीचे उपचार गायनॆकॉलॉजिस्ट करत असल्याने पुरुषांची बाह्यांग तपासणी सहसा सुरूवातीला होत नाही आणि सिमेन अ‍ॅनालिसीस झाल्यावर,सोनोग्राफ़ी झाल्यावर मग काही शंका असल्यास पुरूषाला सर्जन लिंवा युरॊलॉजिस्टकडे बाह्यांगतपासणी आणि इतर निदानासाठी पाठवले जाते. अँड्रॉलॉजिस्टची (पुरुषांच्या लैंगिक आणि वंध्यत्वावरिल आजारांचे तज्ज्ञ)संकल्पना भारतात अजूनही तितकीशी रूळलेली नाही.
  • 2. वीर्यपरीक्षा- ही अत्यंत कमी खर्चाची आणि सुलभ चाचणी आहे. कित्येकदा तर एखाद्या जोडप्याची वंध्यत्वासंबंधित इतर कुठलिही चाचणी करण्याअगोदर ही चाचणी करा असे डॉक्टर सुचवतात. या चाचणीविषयी आपण नंतर थोडे खुलासेवार बघू.
  • 3. वीर्यपरीक्षेत काही दोष आढळल्यास त्या अनुशंगाने अँटीस्पर्म अँटीबॊडी, पेल्विक अल्ट्रासाउंड,हार्मोन्स तपासणी, इ. चाचण्या सुचविल्या जाऊ शकतात.
  • 4. अगदी दुर्मिळप्रसंगी कॆरीओटायपिंग हि जनुकीय चाचणी सुचवली जाते.

वीर्यपरीक्षण.(semen analysis)

या परीक्षणाकरिता पुरुषाचे वीर्य हस्तमैथूनाद्वारे (स्वस्खलन) मिळवले जाते.एका मोठ्या तोंडाच्या बाटलीत हे जमवले जाते आणि एका तासाच्या आत त्याच्यावर विविध चाचण्या केल्या जातात. त्यामुळे शक्यतो लॅबमध्ये जाऊनच वीर्य नमुना द्यायला हवा. या चाचणी अगोदर किमान २ ते ५ दिवस शारिरीक संबंध किंवा हस्तमैथून (थोडक्यात कोणत्याही प्रकारे वीर्यपात) टाळण्यास सांगण्यात येते. क्वचितप्रसंगी पोस्टकॉईटल सँपल मिळवण्याकरिता विशेष प्रकारचे कंडोम जोडप्यास शरीरसंबंधांच्यावेळी वापरण्यास सांगून त्यामधून वीर्याचा नमुना मिळवण्यात येतो.
जर पहिली वीर्यचाचणी नॉर्मल असेल तर शक्यतो परत परत तपासणी करत नाहीत.
मात्र पहिल्या वेळी काही दोष असेल तर पुढिल ३ महिन्यांच्या काळात अजून २-३ वेळा ही तपासणी केली जाते.

जागतिक आरोग्य समितिने(WHO) मान्य केलेले वीर्यपरीक्षणाचे सामान्य पैलु(नॉर्मल वॅल्यू) याप्रमाणे

  • १.आकारमान-२मिली हून जास्त
  • २.पी.एच.-७.२-७.८
  • ३.प्रमाण-शुक्राणू संख्या २०*१००००००/मिली
  • ४.हालचाल-५०% जास्त शुक्राणूंच गती आणि हालचाल सामान्य
  • ५.बाह्यरूप(मॉर्फॉलॉजी)-३०%पेक्षा जास्त शुक्राणू दिसायला नॉर्मल हवेत.

तरिही वीर्यपरीक्षण नॉर्मल आले म्हणजे पुरूष निर्दोष असे नव्हे. अशाप्रकारे नॉर्मल वीर्यपरीक्षण असणार्‍या ३०% पुरूषांमध्ये शुक्राणूंचे कार्य दोषपूर्ण असू शकते.
त्यासाठी काही खास तपासण्या आहेत.गरज असल्यास त्यासंबंधीची माहिती आपल्या डॉक्टरांकडून घेता येईल.

पुरुषांच्या वंध्यत्वनिवारणासाठीचे उपचार

वरिल सर्व चांचण्या केल्यानंतर ज्याप्रकारचे रोगनिदान झाले आहे त्याप्रमाणे खालील उपचार शक्यतो सुचविले जातात.

  • १.औषधोपचार- वीर्यातील शुक्राणूंची संख्या,वेग वाढविण्यासाठी काही प्रकारची संप्रेरके दिली जातात. संसर्गाकरिता प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) दिली जातात.
  • २.शस्त्रक्रीया-वेरिकोसील, हायड्रोसील,बंद शुक्रनलिका यांवर शस्त्रक्रीयेद्वारा उपचार करता येतात. अगदी नसबंदीचं ऑपरेशन करून घेतलेल्यानाही शस्त्रक्रीयेद्वारा शुक्रनलिका चालू करवून घेता येतात.
  • ३.वरिल उपचार लागू पडत नसतील तर ’असिस्टेड रिप्रोडक्शन टेक्निक’या प्रकारांनी वंध्यत्व दूर करण्याचा मार्ग अवलंबला जातो. काही वेळा पुरूषाचे वीर्य जमा करून सिमेन वॉशिंग,स्पर्म काँसंट्रेशन अश्या प्रक्रीया त्यावर करून योग्य वेळेस ते स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते. किंवा आय. वी.एफ़. म्हणजे इन विट्रो फर्टिलायजेशद्वारा प्रयोगशाळेत स्त्री आणि पुंबीजाचा मिलाप घडवून तयार भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात.
  • त्याविषयी आपण स्त्री वंध्यत्वाविषयी चर्चा करून मग अधिक जाणून घेऊ.

एक गोष्ट मात्र नक्की ल़क्षात ठेवावी लागेल की काही वेळा असे कुठलेही उपचार करूनही वंध्यत्व निवारण करता येत नाही. अशा वेळेस दोनच मार्ग उरतात.

  • १.पत्नीची संमती असल्यास वीर्य बँकेतून अनामिक दात्याचे वीर्य आर्टिफ़िशीयल इनसेमिनेशन्द्वारे स्त्री गर्भाशयात सोडणे. या प्रक्रियेत अत्यंत गुप्तता राखली जाते. मात्र असे करण्यापूर्वी पती-पत्नी दोघांचेही योग्य ते समोपदेशन झालेले असले पाहिजे.
  • २.दत्तक – दत्तक घेणे हा वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना अपत्यप्राप्ती करून देणारा एक आनंदमार्ग आहे.
  • याविषयीही आपण नंतर चर्चा करू.

मूल नसलेल्या स्त्रीवर समाज खूपच अन्याय करतो. तिचं जीवन नकोसं करतो. नवरा तिला सोडून दुसरं लग्न करतो. हे कितीही खरं असलं तरी बर्‍याच वेळेला तिला समाजाकडून सहानुभुतीही मिळते.
पुरुषाच्या बाबतीत मात्र जर त्याच्यात दोष आहे असे समजले तर समाजातले लोक भयानक कुत्सित नजरांनी बघतात. कुजकट शेर्‍यांनी बेजार करतात. त्यामुळे असे दोष लपवून, अपत्य नसण्याचा दोष बायकोवर टाकून दुसरे लग्न करणारे महाभाग समाजात दिसतात. किंवा मग बायकोवर वैद्यकीय उपचार करण्याचे चालू ठेवून हे लोक वैदू,बुवा यांच्या नादाला लागतात. वंध्यत्व आणि नपुंसकत्व यातील फरक समजत नसल्याने स्वतःचे पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी वेश्यागमन, अंमली पदार्थाचे सेवन,विवाहबाह्य संबंध असे मार्ग अवलंबितात.
म्हणूनच पुरुषी वंध्यत्व आणि नपुंसकत्व याबद्दल समाजात अजू खूप जागृती होणे आवश्यक आहे. आमच्यासारख्या या क्षेत्रात काम करणार्‍या डॉक्टरांची अशी जागृती करणं ही जबाबदारी आहे.

भाग-२.स्त्रीयांमधले वंध्यत्व आणि मासिकपाळीचे सामान्य चक्र.
*****************************************************************************************************

१.इतका किचकट भाग सोप्या भाषेत समजावून सांगायच्या प्रयत्नात माझी फॅफॅ उडालेली आहे तरी कुणाला समजण्यात काही अडथळा असेल तर कळवावे, पुन्हा एकदा प्रयत्न करेन.
२. हा भाग समजल्याखेरिज पुढच्या असंख्य चाचण्या आणि उपचार कळणे शक्य नाही त्यामुळे थोडंफार डिटेलात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
३. शक्यतो मुख्य इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत. त्यामुळे भाषांतर उगाच पुस्तकी किंवा क्लिष्ट होणार नाही. तसेच आपल्या डॉक्टरशी चर्चा करताना आपल्याला भाषेचा/शब्दांचा अडथळा येणार नाही. तसेच नेटवरून इंग्रजी संकेतस्थळावर संदर्भ शोधणे सोप्पे होईल.
४.माझ्या ज्ञानाला मर्यादा आहेत किंवा मला जे माहिती आहे ते सगळेच इथे लिहिणे शक्य नाही तेव्हा योग्य संदर्भ मिळवून सखोल माहिती पाहिजे असल्यास ती मिळवायला हे प्राथमिक ज्ञान म्हणून उपयोगी पडेल. बाकी बाबतीत आपले डॉक्टर आपल्याला मदत करतीलच.
५. माझी ही माहिती पुरवायची धडपड आणि कष्ट लक्षात घेता कुणी ही माहिती कॉपी पेस्ट करुन वापरल्यास/ फॉर्वर्ड केल्यास कृपया "मायबोलीवरिल डॉ. साती " या आयडीला थोडंसं क्रेडिट द्यायला विसरु नका.
६. कृपया मुद्रितशोधनातील चुका कळवा, मला वेळ मिळताच योय तो बदल करेन.

*****************************************************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शंकानिरसनासाठी वेगळा बाफ, शेवटी उघडावा,>>>>>>>> अनुमोदन.......... त्यामुळॅ सगळ्यांच्या शंका प्रश्न एकाच बाफ वर पडातील आणि योग्य ते उत्तर वेळेत सुध्दा मिळेल

साती, तुमचा लेख अगदी पहील्यापासून वाचत आहे.. अतिशय उपयुक्त असा अप्रतिम लेख..
माझ्या परीचयातील सिने सृष्टीतील नामंकीत असे जोडपे आहे, लग्नाला ५ वर्ष होऊन देखील अजून मूल नाही..
यात पत्नीची प्रकृती अगदी ठण ठणीत आहे, पाळी नियमित आहे, ओव्हल्युशन चांगले आहे, फॉलीकल्सची वाढ योग्य आहे.
याउलट नवर्‍यात स्पर्म काऊंट कमी आहे, तो अल्कोहोलीक आहे, चेन स्मोकर आहे, त्याला पँकरीयाचा देखील प्रॉब्लेम होता..
(दोष त्याच्यात आहेत हेच मान्य करायला ३ वर्ष लावली, तोपर्यंत तीच ट्रीट्मेंट घेत होती, हा हिरो वेळ मिळत नाही या सबबीवर उपचार घ्यायचे टाळत होता.)
मुंबईत लोक ओळखतात म्हणून तो मुंबईतही ट्रीट्मेंट घ्यायचे टाळतो..
लोकांमधे 'माझ्यात काही दोष नाही', "सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, असे गैरसमज असतात.. एकदा यावरही प्रकाश टाकाल का..?
त्यात त्यांना एका ज्योतिषाने आयव्हीएफ करू नका तुम्हाला जरा उशीरा पण मूल नक्की होईल असा सल्ला दिलाय..
दोघांची वाढती वयं पाहाता कसं होईल देवास ठाऊक..
पु.ले.शु.
सारीका Happy

माझी एक मैत्रिण आहे तिच्या लग्नाला १८ वर्षे झाली.... पण मुल नाही......... घरी सगळी सुख सुविधा आहे... पण ही नेहमी नाराज असते... सगळ्या टेस्ट झाल्या ...नॉर्मल आहे असे सांगितले... पण अजुन काही तिला प्रेगन्सी राहिली नाही............काय प्रॉब्लेम असु शकेल .......... मुलं दत्तक घ्यायला घरचे नाही म्हणातात... ..

साती,
मला डॉक्टरांनी सोनोग्राफि , ब्ल्ड टेस्ट, आणि दुबिणिद्वारे कुठे ब्लुकेज आहेत का ते बघायला सजेस्ट केले आहे . आणि जर हवे आसेल तर (IVI, IVF) करुन घेण्यबद्द्ल सान्गितले आहे.
पण मला सान्गा तुम्हाला बरोबर वाट्ते का ? आणि ह्यच्यात किति ट्क्के गरोदर राहाण्याचे चान्स आहेत प्लिज सान्गु शकाल का?

भाग्यश्री आय वि एफ फार पुढची गोष्ट आहे. त्याची गरज आहे का हे बघण्यासाठी सोनोग्राफी,ब्लड टेस्ट आणि मग गरज पडल्यास दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपिक हिस्टरोसाल्फिंगोग्राफी)करायला सांगतात. अर्थात या दोष काय आहे हे शोधण्यासाठीच्या टेस्ट आहेत. यांनी गर्भधारणा होत नाही.
आयवीएफ ही गर्भधारणेची एक कृत्रिम पद्धत असून प्रत्येक खेपेस (ट्रायला) ३० ते ४० टक्के इतका तिचा सक्सेस रेट आहे.
प्रथम तुम्ही मनावरचा ताण काढा आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या प्राथमिक तपासण्या करवुन घ्या.

धन्यवाद डॉ.कैलास.
बाकी प्रतिसादकांनाही धन्यवाद.
ज्यांनी संपर्कातुन मेल केली आहे त्यांना मी यथा मम ज्ञान मार्गदर्शन केले आहे.
काहींना संपर्कातून फोन नं दिला आहे. मी महाराष्ट्रात राहात नसल्याने कुणाला पर्सनली भेटणे शक्य नाही. Happy

जगभरात स्पर्म काउंट कमी होत चालला आहे अशा आवया उठत असतात त्यात काही तथ्य आहे का? की केवळ जास्त टेस्टींगमुळे जास्त डेटा आता उपलब्ध आहे म्हणून हा निष्कर्ष काढला जातो आहे?

साती, प्रश्नोत्तरे आणि शंकानिरसन, प्लीज वेगळे ठेवणार का ? इथे प्रतिसादात, ते हरवून जाईल.

खात्रीलायक कन्सिव्ह करण्यासाठी बेस्ट प्रॅक्टिसेस कोणत्या ?
किती महिने प्रयत्नांना यश आले नाही तर डॉक्टर कडे जावे ?
व्यसनांचा परिणाम होतो हे महीत आहे पण तो टेंपररीच असतो ना ?

साती, एक सूचना.
तू विपू मधून, ईमेल मधून, व फोन नंबर दिला आहेस असे म्हणालीस म्हणून फोन वरुन जी प्रश्नोत्तरे झाली ती ज्यांनी विचारले प्रश्न त्यांची नावे वगळून प्रकाशित करशील का (एका वेगळ्या धाग्याच्या स्वरूपात)?

धन्यवाद
डॉ.साती,
माझ्या सोनोग्राफी,ब्लड टेस्ट झाल्या आणि आता दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपिक हिस्टरोसाल्फिंगोग्राफी)करायला सांगितले आहे. येत्या शनिवारि टेस्ट आहे.
तुम्हि दिलेल्या माहितिमुळे लवकर योग्य उपचार होत आहे.
पुढे कळवेन धन्यवाद
तुमचा फोन नंबर मिळेल का?
माझा ईमेल आय डि:-mapping@in.imshealth.com

नमस्कार साती,
गेल्या शनिवारि माझे फिलोपिन ट्युबचे ऑपरेशन झाले. तुम्हि सागितल्यामुळे लवकरात लवकर योग्य उपयोग झाला. आता माला एक मदत करा मला सान्गा कि आता नोर्मल ट्राय करु कि IUI करुन घेवु.
माला तुम्च्य्या उत्तराचि गरज आहे

हाय साती,
तुझ्या या लेखाची लिंक मैत्रिणीला दिली आहे.
मैत्रिणीला आयव्हीएफ करवुन घ्यायला सांगितली आहे.
त्यात काही त्रास होतो का ? भारतात - पुण्यात कुणी आयव्हीएफ स्पेशालिस्ट आहेत का?
आयव्हीएफ ने झालेली प्रेग्नंसी नॅचरल प्रेग्नंसी प्रमाणेच असते का? म्हणजे थोडाफार प्रवास वगैरे करता येतो का? जास्त दगदगीचा नसलेला जॉब कंटीन्यु करता येतो का?

.

Pages