मुलांना इंग्रजी मुळाक्षरे लिहायला कसे शिकवावे?

Submitted by मनस्वि on 25 April, 2012 - 03:46

इंग्रजी भाषा हल्ली मुलांना प्री - प्रायमरी पासूनच शिकवतात. त्यात सुरुवातीला मुलांना standing लाइन, स्लीपिंग लाइन, अप लाइन, डाऊन लाइन असे करत हळू हळू मुळाक्षरे शिकवतात. अंक काढायला देखील याच मूळ रेषांचा वापर करून शिकवले जाते.

आता समजा A लिहायचा असेल तर मुलांना सांगितले जाते कि आधी एक अप लाइन काढा, नंतर डाऊन लाइन काढा आणि सर्वात शेवटी एक स्लीपिंग लाइन काढा. सगळीच मुळाक्षरे अशाच प्रकारे तुकड्या-तुकड्यात काढायला शिकवले जाते. यात कधी कधी मुले कशी गम्मत करू शकतात ते मला इथे नमूद करावेसे वाटते.
समजा आता Z लिहायचा आहे तर मुले अश्या प्रकारे ते लक्षात ठेवतात. एक स्लीपिंग लाइन, तिला समांतर अशी आणखी एक स्लीपिंग लाइन आणि त्यांना जोडणारी एक डाऊन लाइन. आता जर यात डाऊन लाइन ऐवजी मुलांनी अप लाइन काढली तर Z ची मिरर इमेज तयार होते.

हीच चूक इतर अनेक अक्षरांबाबत संभवते. J मध्ये डावीकडे वळायचे कि उजवीकडे हे विसरलं कि त्याची मिरर इमेज तयार होते. हे झाले capital letters च्या बाबतीत. small letters लिहिताना देखील हाच सगळा गोंधळ होऊ शकतो. कारण ती सुद्धा तुकड्या-तुकड्यात शिकवली जातात. b आणि d मधला गोंधळ तर सर्वश्रुत असेल. p आणि q सुद्धा असे गोंधळात पाडतात.

अर्थात, अश्या पद्धतीने शिकवण्यामागे हा उद्देश असतो कि मुलाला अक्षर कसे तयार होते ते नीट समजावे आणि व्यवस्थित लिहिता यावे. अंक लिहितांना देखील असे होऊ शकते. परिणामी चुकून एखाद्या पालकाला त्याचे मुल dislexic आहे असे वाटू शकते .

मुलांसाठी लिहिणे सोपे करण्याच्या नादात नकळत ते अवघड होवून बसले आहे. हे सगळे जर टाळायचे असेल तर सोपा मार्ग म्हणजे संपूर्ण अक्षर एकदम शिकवणे. जसे मला किंवा तुमच्या पैकी कित्येकांना लहानपणी शिकवले होते. अक्षर गिरवणे वारंवार गिरवणे हि पद्धत जरी ठोकळाछाप वाटत असली तरी त्यात अशी चूक होण्याची शक्यता कमी! कारण या पद्धतीत संपूर्ण अक्षर हि एक picture म्हणून मुलांच्या लक्षात रहाते. शेवटी काय तर जुने ते सोने!!!!

गुलमोहर: 

>>शेवटी काय तर जुने ते सोने
कमाल आहे इंग्रजीच्या शिक्षणाबाबत हे वाक्य कधी येईल असे वाटले नव्हते.
त्यापेक्षा मुलांना आधी मराठी माध्यमात निट व्यवस्थित शिकू द्यावे आणि एकदा पाया पक्का झाला की मग इंग्रजी, जर्मन, फ्रेंच जे काही शिकवायचे आहे ते शिकवावे.

मनस्वि,
अगदी अगदी माझ्या मनातला मुद्दा मांडला आहात.

लेकाचे नुकतेच प्लेग्रूप संपले आहे. आणि प्लेग्रूप मध्ये standing लाइन, स्लीपिंग लाइन, स्मॉल सर्कल, बिग सर्कल इ. शिकविले आहे. तेव्हा मी एकदा टीचरला विचारले होते की इतक्या लहान मुलांना हे सर्व कळते का? कारण माझा असा समज होता की प्लेग्रूप मध्ये मुलांना फक्त खेळवतात. अभ्यास अजिबात नसतो. पण इथे तर एक लहान ड्रॉइंग बुक मेंटेन केली होती प्रत्येक मुला/मुलीची आणि त्यात वर सांगितलेल्या गोष्टींची मुलांकडून प्रॅक्टिस करून घेतलेली दिसत होती.

माझ्या प्रश्नाला टीचर ने असे उत्तर दिले की घरी मुलाला विचारून बघा येते का ते. मी घरी राजसला कागद्-पेन्सिल/पेन देऊन विचारले तर सगळे बरोबर काढून दाखवलेन्. सर्कल अगदी बरोबर नसते किंवा लाईन्सही अगदी सरळ नसतात. पण कंसेप्ट त्याच्या ध्यानात आलीये हे लक्षात आले. त्यामुळे बरे वाटले.

पुढे टीचर म्हणाली की नंतर जाऊन इंग्रजी कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स शिकवायला ह्या बेसिक गोष्टींचा उपयोग होतो. म्हणून असे तुकड्यात तुकड्यात शिकवायचे. आधी मला ही पद्धत बरी वाटली. इंग्रजी मूळाक्षरे तुकड्या-तुकड्यात शिकविता येईलही या पद्धतीने. पण मग मी आठवू लागले की माझ्या लहनापणी ५ वीला इंग्रजीची ओळख झाली तेव्हा आपण कसे शिकलो होतो? आपल्याला तर असे तुकड्या तुकड्यात कधीच शिकविले गेले नाही. तरीही मिरर इमेज वै. चे घोळ माझ्या किंवा समवयस्कांच्या बाबतीत झाल्याचे कधीच आठवत नाही. मग हे क्लिक झाले की कारण आपण एकच अक्षर परत परत गिरगटवून शिकलो. मनस्वीने म्हटलंय त्याप्रमाणे संपूर्ण अक्षर हि एक picture म्हणून आपल्या मनावर ठसले. त्यामुळे मलाही मनस्वीला अनुमोदन द्यावसं वाटतंय की अक्षर गिरवणे वारंवार गिरवणे हि पद्धत अवलंबल्यास बरे!

बिचारी लहान लेकर, त्यांना आजून नीट पेन्सील पण धरता येत नाही आणि ABCD शिकवतात!!
माझ्या लेकाला फारसं काही नाही फ़क़्त पेन्सील धरायला, खडूने गिरवायला वैगेरे शिकवल आहे, बाकी मग मस्ती, गाणी, रंग, प्राणी वैगेरे वैगेरे

बिचारी लहान लेकर, त्यांना आजून नीट पेन्सील पण धरता येत नाही आणि ABCD शिकवतात!!
>>>
ABCD प्लेग्रूप मध्ये नाही शिकवत. पण नर्सरी पासून आहे असं मी ऐकलंय. आणि पेन्सिल बाबत म्हणाल तर राजस खूप आधीपासून पेन्सिल / पेन व्यवस्थित पकडतोय. पाटी आणि पाटीवरची पेन्सिल आत्ता आत्ता कौतुकाने आणलीये. पण खूप पूर्वीपासून कागद - पेन / पेन्सिल मागून घेऊन काहीतरे गिरगटवत बसणे हा त्याचा प्रचंड आवडीचा उद्योग आहे. आणि स्वतःच सांगतो "आई, आता बघ मी माऊंटन काढतोय. आता झेब्र्याचं तोंड काढतोय. आता ट्रक काढतोय" इ. प्रत्यक्षात नुसत्या पेनाने रेघोट्या ओढणे चाललेले असते.

मी मँगो, कार, माऊंटन, सन, क्लाऊड, घर, ट्री असे ऑब्जेक्ट काढून दाखवले की ओळखू शकतो. इंग्रजी मूळाक्षरांपैकी A काढलेले हल्ली हल्लीच ओळखायला शिकला आहे.

मराठी माध्यमातही आधी असेच शिकवतात.. मराठी सुरेख लेखनासाठी एक पुस्तिका मिळायची. त्यात बोरुने लिहायची पद्धत होती... त्यातही आधी रेषा, चंद्र, गोल.. असे सुरुवातीला असते.. मग अक्षरे, शब्द, वाक्य असे क्रमाक्रमाने एकेका पानावर असते.

पहिली पर्यंत आणि क्वचित दुसरीपर्यंतही बरीच मुलं 'आरसा-प्रतिमा' असलेली अक्षरं काढतात... त्यामुळे त्यावर उपाय शोधण्याची गरज नाही... (ए. फु. स)

मुलांसाठी लिहिणे सोपे करण्याच्या नादात नकळत ते अवघड होवून बसले आहे. हे सगळे जर टाळायचे असेल तर सोपा मार्ग म्हणजे संपूर्ण अक्षर एकदम शिकवणे. जसे मला किंवा तुमच्या पैकी कित्येकांना लहानपणी शिकवले होते.>>> अगदी पटले. आपल्या मराठी मध्ये तर किती आखिव-रेखिव, वळणदार अक्षरे आहेत. त्यामानाने इंग्रजीतील अक्षरे सोपी आहेत.
पाटी, पेन्सिल आणि गिरवणे.. हे उत्तम वाटते.

आपल्या मराठी मध्ये तर किती आखिव-रेखिव, वळणदार अक्षरे आहेत. त्यामानाने इंग्रजीतील अक्षरे सोपी आहेत.

अगदी अगदी सोनाली....माझ्या पोराला इंग्रजी अक्षरे बर्यापैकी जमायला लागली आहेत. पण मराठी अक्षरे शिकवताना मी हैराण झालो आहे. ड काढला की म्हणतो हा एस असा का काढलाय...
मराठी अक्षरांसाठी पूर्वी त्या गिरवायच्या पाट्या मिळायच्या...हल्लीपण मिळतात का त्या....

मराठी अक्षरांसाठी पूर्वी त्या गिरवायच्या पाट्या मिळायच्या...हल्लीपण मिळतात का त्या...>>> माहित नाही...मी नाही वापरल्या अश्या पट्ट्या. एकदा का छान अक्षर ओळख झाली कि ..रोज कित्तालेखन...मग रोज शुद्धलेखन याशिवाय काहिच पर्याय नव्हता आम्हाला.

>>मराठी अक्षरांसाठी पूर्वी त्या गिरवायच्या पाट्या मिळायच्या...हल्लीपण मिळतात का त्या....
हो मिळतात ! पुण्यात असाल तर अ.ब.चौकात मिळेल.

मराठी अक्षरांसाठी पूर्वी त्या गिरवायच्या पाट्या मिळायच्या...हल्लीपण मिळतात का त्या....
>> हो. सुरेखा बर्गे पाटी म्हणतात त्याला. इंग्रजी पण आहे. पुण्यात अ ब चौकात मिळतील.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.

महेश, तुमचे म्हणणे अगदी मान्य आहे. पण मराठी माध्यमाच्या उत्तम शाळा घरापासून बर्‍यापैकी लांब आहेत. त्यामुळे नाइलाज होतो.

निंबुडा, मोट्ठया प्रतिसादाबद्दल आभार. इतक्या लहान मुलांना अक्षरे गिरवणे शिकवावे का? अगं, माझ्या मुलाचा J च्या बाबतीतला गोंधळ अजूनही चालूच आहे. ह्या पद्धतीने शिकवल्याने तो अंकांच्या सुद्धा mirror images काढतो कधी कधी. आधी आम्हाला वाटले कि तो गम्मत म्हणून काढून बघत असेल. नंतर वेगळीच शंका यायला लागली. पण लक्षात आले कि तो असे नेहेमी करत नाही. म्हणजे त्याला अक्षर कसे काढायचे आहे हे विसरायला होते. सगळ्याचे analysis केल्यानंतर घोळ नेमका कुठे आहे ते कळले.

मिरर इमेजेस काढणे हे डिसलेक्सिआचे एक लक्षण आहे. (उदा.मी स्वतः आणि माझा मुलगाही!)
माझ्या मुलाच्या शाळेत संपूर्ण अक्षरच शिकवले आहे, तुकड्यातुकड्याने नाही; तरीही मिरर इमेजेसचा प्रकार मधेच होतो.

इतक्या लहान मुलांना अक्षरे गिरवणे शिकवावे का?>>>
नक्की कोणत्या वयापासून मुलांना अक्षरे गिरवायला शिकावे याबाबत सर्वांची मते वेगवेगळीच येणार. आता आपली इच्छा नसली तरी नर्सरी मध्ये अक्षरे गिरवायला शिकवणार आहे असे कळले तर काय पाल्यास नर्सरीला घालायचेच नाही का? माझ्यासाठी राजसला प्लेग्रूप / नर्सरीला घालण्याचा सध्या तरी मेन उद्देश त्याने त्याच्या वयाच्या मुलांबरोबर रमणे, वस्तु/ खाऊ शेअर करायला शिकणे इतकाच आहे. त्याव्यतिरिक्त टीचरने शिकविलेले तो जे जे आत्मसात करतोय ते माझ्यासाठी बोनस आहे.

कागद- पेन्सिल - रंग यात स्वतःच रमतो. त्यामुळे त्याच्यासोबत बसून तो जे सांगेल ते ड्रॉ करून दाखवायचे, स्पेसिफिकली शिकवायचे नाही किंवा हेच ड्रॉ कर, ते अक्षर आले पाहिजे असा अट्टाहास नको - हे धोरण सध्या तरी अवलंबले आहे.

मिरर इमेजेस काढणे हे डिसलेक्सिआचे एक लक्षण आहे>> पण मिरर इमेजेस काढणे प्रत्येक केस मधे डिस्लेक्सियाच असेल हे पण नाहिये.

http://answers.yahoo.com/question/index?qid=20080915100414AAitqyj

आधी आकार घटवणे यात तुकडा शिकणे, हा उद्देश नसतो. तर तो तुकडा कुठून कुठे काढावा... वरुन खाली- डावा ते उजवा-- असे शिकणे अपेक्षित असते. तुकडा गिरवणे यापेक्षा दिशेचे ज्ञान महत्वाचे असते.. नंतर अक्षर सलगच शिकवतात, तेंव्हा हे दिशेचे ज्ञान उपयोगी पडते.

मिरर इमेजेस काढणे हे डिसलेक्सिआचे एक लक्षण आहे. >> पण मिरर इमेजेस काढणे प्रत्येक केस मधे डिस्लेक्सियाच असेल हे पण नाहिये. >> अनेक लहान मुले अक्षरे, अंक लिहायला शिकताना त्याच्या मिरर इमेजेस काढतात. मी लहान असताना आईने पाटीवर माझा हात पाटीच्या डाव्या बाजूला ठेवला तर व्यवस्थित अंक लिहायचे, आणि चुकून जर ती माझा हात डावीकडे ठेवायला विसरली तर तेच १ ते १०० आकडे मी उजव्या बाजूने परफेक्ट मिरर इमेजमध्ये काढायचे. Happy

खरे तर हा मिरर इमेजेसचा कन्स्पेट लहान वयात मेंदूत कसा असतो, कोणत्याही लिखित गोष्टीला आपला मेंदू त्या वयात मिरर इमेजमध्ये पाहू शकतो का, वगैरे विषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. (नंतर आपण शिस्तीच्या बडग्याखाली मेंदूची ही क्षमता आवळून टाकतो बहुधा!)

पहिली पर्यंत आणि क्वचित दुसरीपर्यंतही बरीच मुलं 'आरसा-प्रतिमा' असलेली अक्षरं काढतात... त्यामुळे त्यावर उपाय शोधण्याची गरज नाही... >>> +१

पहिली पर्यंत आणि क्वचित दुसरीपर्यंतही बरीच मुलं 'आरसा-प्रतिमा' असलेली अक्षरं काढतात... त्यामुळे त्यावर उपाय शोधण्याची गरज नाही... >>> +१

हा मिरर रायटिंग व त्याच्या गुणसूत्रांशी तसेच मेंदूच्या रचनेशी असलेल्या संबंधाबद्दल प्रकाशित झालेला एक जुना लेख.

पहिली पर्यंत आणि क्वचित दुसरीपर्यंतही बरीच मुलं 'आरसा-प्रतिमा' असलेली अक्षरं काढतात... त्यामुळे त्यावर उपाय शोधण्याची गरज नाही... >>
मला वाटतंय मनस्वीला उपाय सुचविणे पेक्षा असे होऊच नये म्हणून अक्षरे गिरवून काढायला मुलांना शिकवावीत यावर भर द्यायचा आहे.

इथे मला एक शंका येते आहे. मला स्वत:ला मिरर इमेजेस वाला प्रॉब्लेम कधीच नव्हता. माझ्या पालकांकडून कधी माझ्या लहानपणीची अशी तक्रार मी ऐकलेली नाही. किंवा जवळच्या ओळखीतही माझ्या समवयस्कांमध्ये ऐकली नाही. जुन्या पद्धतीनुसार अक्षरे गिरवून काढायची शिकवलेले असूनही हा मिरर इमेज वाला प्रॉब्लेम होऊ शकतो का मुलांच्या बाबतीत?

<< जुन्या पद्धतीनुसार अक्षरे गिरवून काढायची शिकवलेले असूनही हा मिरर इमेज वाला प्रॉब्लेम होऊ शकतो का मुलांच्या बाबतीत >>

स्वानुभवावरुन (माझ्या मुलीच्या उदाहरणावरून) हो. तीला "up./down line, circle" असे काही अक्षरे काढताना माहीत नाही.

देवनागरी प्रतिमाक्षरे मात्र ती काढत नाही.