"खासबाग" - शंभर वर्षांच्या कुस्तीची परंपरा

Submitted by अशोक. on 23 April, 2012 - 07:04

काल रविवारी सायंकाळी करवीर नगरीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत क्रिडा क्षेत्रातील एका शानदार सोहळ्याचा परंपरेच्या अभिमानाचा सोहळा संपन्न झाला. प्रतिवर्षी देशात विविध ठिकाणी 'हिंदकेसरी' पदासाठी कुस्तीगिरांच्या अटीतटीच्या लढती झडत असतात. पण २०१२ या सालातील या पदाच्या गदेसाठी 'मैदान' एकमुखाने निश्चित झाले होते कोल्हापूरचे 'शाहू खासबाग मैदान' ! कारण हे मैदान चालुवर्षी आपल्या स्थापनेचे १०० वे वर्ष साजरे करणारे होते.

maidan2" title="One">

प्र.चि. १ - स्पर्धेच्यावेळी गर्दीने तुडुंब भरून गेलेले खासबाग मैदान

maidan3" title="Two">

प्र.चि.२ : एरव्ही "शांत हिरवेगार" दिसणारे खासबाग मैदान

१९१२ ते २०१२ ~ शंभर वर्षाचा प्रदीर्घ काळ. या काळात देशातील अनेक लहानमोठ्या शहरांचे रुपडे नित्यनेमाने बदलत गेले, बदलत चालले आहेच. आधुनिक काळाला अनुसरून अगदी विद्युतवेगाने शहरांच्या चेहर्‍यात आमुलाग्र बदल होते गेले. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली, वाढत्या रहदारीच्या प्रश्नामुळे, उपनगरांची बेसुमार झालेली वाढ आदी अनेक कारणानी शंभर वर्षापूर्वीच्या अवाढव्य वास्तू जमिनदोस्त झाल्या, नवनवीन साम्राज्ये उदयाला आली, काही अस्ताला गेली. पण इतक्या प्रपातातही सत्तेवर आलेल्या कोणत्याही घटकाने कोल्हापूरातील कुस्ती परंपरेची अखंड चालत आलेली ही जागा नष्ट होण्याचा वा करण्याचा पुसटसाही विचार केला नाही..आणि त्याच परंपरेत २०१२ हे साल 'खासबाग मैदाना'ची शताब्दी साजरी करीत आहे. त्या निमित्ताने मैदानाची लेखाद्वारे ओळख.

खासबाग कुस्तीचे मैदान म्हटले की साहजिकच कोल्हापूरचे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची आठवण येणे क्रमप्राप्त. त्यानीच या मैदानाची स्थापना केली होती. ते स्वतः अगदी लहानपणापासून निष्णात असे कुस्तीगीर होते. कोल्हापूरचे छत्रपती बाबासाहेब महाराज याना शाहू दत्तक गेले होते आणि १८९४ मध्ये ते करवीर गादीवर "छत्रपती" म्हणून विराजमान झाले. त्यांच्या सामाजिक सुधारणा तसेच बहुजन समाज शिक्षणविचारावर/कारकिर्दीवर इथे काही लिहिणे अप्रस्तुत होईल म्हणून फक्त त्यानी "कुस्ती परंपरा" जपण्यासाठी काय कार्य केले हेच प्रामुख्याने या लेखासाठी विचारात घेतले आहे. त्यांच्या काळात (जवळपास २६-२७ वर्षाचा काळ होता) महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी हा सुवर्णकाळ होता. कोल्हापूरच नव्हे तर सार्‍या राज्यात कुस्तीगिरांच्या तालमींचा हा उत्कर्षाचा काळ होता. त्यानी हिंदुस्थानातील कोल्हापुरात कुस्तीसाठी निमंत्रित केले. काहीजणांना वाड्यावर आणि गावात कायमचा आश्रयही दिला. पैलवानांच्या आहारासाठी [पैलवानी भाषेत 'खुराक'] महाराजांनी लाखो रुपयांची अनुदाने दिली होती.

Maidan1" title="Three">

प्र.चि.३ - खासबाग निर्मितीपूर्वी राजवाड्याच्या प्रांगणात उभा केलेल्या तात्पुरत्या मैदानातील कुस्ती

असे असले तरी ह्या कुस्त्या व्हायच्या त्या भवानी मंडपात तात्पुरत्या बांधलेल्या आखाड्यात. पाहाण्यासाठीही विशाल जागेअभावी काही निमंत्रित, सरदार-उमराव-जहागिरदार-इनामदार अशी शेलकी मंडळी व आजुबाजूने जागा मिळेल तितक्यापुरती रयत. तर मंडपाबाहेर "गण्यागंप्यांची' ही गर्दी. पाहायला तर मिळत नव्हते, फक्त आतल्या बाजूने येणार्या जयजयकाराच्या आवाजासाठी ही जनता आतुर असायची. हे महाराजांना कुठेतरी खुपत असायचे. पुढे सन १९०२ मध्ये युरोपात 'रोम' येथील सम्राटच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी शाहू महाराजांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले गेले. तेथील वास्तव्याच्या दरम्यान महाराजांनी आपल्या ज्येष्ठ साथिदारांच्यासमवेत रोममधील गोथिक शैलीतील इमारत बांधकामांची पाहणी केली. खुली नाट्यगृहे तशीच सभागृहेही पाहिली पण त्यांचे मन रमले ते भव्य अशा रोम ऑलिम्पिक कुस्ती स्टेडियमध्ये. अगदी त्याच धर्तीवर आपल्या कोल्हापूरतही असे भव्यदिव्य कुस्तीचे मैदान बांधण्याच्या विचाराने त्यांच्या मनाने उचल घेतली आणि त्याच्या जोडीलाच कोल्हापुरातील कलाकारांसाठी तितकेच भव्य असे एक नाट्यगृहही ["पॅलेस थिएटर...आजचे 'केशवराव भोसले नाट्यगृह] बांधायचे त्यानी प्लॅन्स करवून घेतले. सन १९०६ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. संबंधित इंजिनिअर्सना त्यानी त्यांच्या ओव्हरसीअर्ससह मथुरेतील विविध आखाडे पाहण्यास पाठविले होते [कृष्णाचा मामा 'कंस' हा मल्लविद्येसाठी प्रसिद्ध होता व त्याच्या नावाने आजही मथुरेत कित्येक आखाडे प्रसिद्ध आहेत]. अन्य तज्ज्ञांसमवेत प्राचीन काळातील कुस्ती आखाड्याची वैशिष्ट्ये चर्चेला घेतली. मथुरा आणि तत्सम गावातील मैदान बांधणीची वैशिष्ट्ये, बैठक व्यवस्था नीटपणे तपासल्यावर अंती महाराजांनी उंच आखाड्याऐवजी मैदान म्हणजे हौदा बांधायचा निश्चित केले. मथुरेतील मैदाने सपाट त्यामुळे कुस्ती बघणार्यांना तासनतात उभे राहूनच कुस्त्या पाहाव्या लागत; म्हणून मग रोम धर्तीने उतरत्या शैलीचे 'खासबाग' मैदान बांधण्याचा निर्णय झाला. मैदान पूर्वाभिमुख असून ढाचा त्रिकोणी आहे. तिन्ही बाजूंनी ८० फुटापर्यंत पूर्ण उतरते बांधकाम असल्याने लाखाची गर्दी झाली तरी त्याचे लक्ष थेट तांबड्या मातीकडेच जाणार शिवाय शेवटपर्यंत जमिनीवर बसूनच मल्लांच्या हालचाली टिपता येणार. प्रमुख कुस्तीच्या अगोदर लहानमोठ्या पाचपंचवीस कुस्त्या लागतात, तरीही कुठेही गदारोळ नाही. सर्वच्या सर्व कुस्त्या नजरेच्या एका टप्प्यात येतत अशी देखणी व्यवस्था. मैदानाचा व्यास ६० फूट तर बांधकाम जमिनीपासून तीन फूट उंचीवर. बाजूच्या तटबंदीच्या भिंती २० फूट उंचीच्या. तेथील चौथर्यावर रणभेदीसारखी वाद्ये वाजवित पैलवानांच्या जिद्दीत अंगार फुलविण्याचे काम वाजंत्री करीत. खास निमंत्रितांना बसण्यासाठी मैदानाच्या पूर्वेस आखाडाभिमुख दुमजली इमारत. तर लालमातीत प्रेक्षकांनी घुसखोरी करू नये यासाठी सारा तांबडा हौद लोखंडी सळ्यांनी वेढून टाकण्यात आला आहे.

6" title="Four">
प्र.चि. ४ : एप्रिल १९१२ 'खासबाग मैदान' उदघाटन सोहळा

अशा विविध विचारांनी आणि आराखड्यांनी १९०६ साली बांधकामास सुरुवात झालेले हे मैदान २० एप्रिल १९१२ मध्ये पूर्ण झाले. त्या दिवशी शाहू महाराजांनीच मैदानातील लालमातीत प्रथम पाऊल उमटविले व मुहूर्ताचा नारळ प्रदान केला. कोल्हापूर तर त्या दिवशी गुढीपाडव्यांनी सजून गेले होते आणि गावातील सारे वातावरण मंगलमय झाले होते. त्या दिवशी संध्याकाळी मुहूर्ताची पहिली कुस्ती म्हणून लाहोरचा जगज्जेचा पहिलवान इमामबक्ष, जो सुप्रसिद्ध गामाचा धाकटा भाऊ होता व त्याच्याविरुद्ध गुलाम मोहिद्दिन पैलवान यांच्यात पहिली सोनेरी कुस्ती लावली गेली. ती केवळ कुस्तीच पाहण्यासाठी नव्हे तर महाराजांनी सार्‍या देशात चर्चेचा विषय केलेले ते 'खासबाग कुस्तीचे मैदान' पाहाण्यासाठी कोल्हापूरच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातून कुस्तीप्रेमी रसिक कोल्हापूरकडे धाव घेत होते. ती पहिलीवहिली कुस्ती. सायंकाळी ५.०० च्या सुमारास महाराज खास बग्गीतून मैदानात आले आणि तोपर्यंत लाल मातीत व्यायामाचा सराव करीत राहिलेले ते दोन अक्राळविक्राळ देहयष्टीचे पैलवान त्यांच्या इशार्‍याचीच वाट पाहात होते. ती कुस्ती आणि मैदान पाहायला आलेल्या लाखो कुस्तीप्रेमींचा उत्साह खवळलेल्या सागरासम होता. शिट्ट्या आणि आरोळ्या यानी मैदानच नव्हे तर आकाशही भरून गेले आणि महाराजांनी दोन्ही पैलवानांचा एकमेकाच्या हातात हात दिला. आणि पुढील दोन तास अक्षरश: जादूमयरित्या कुस्ती झाली आणि अपेक्षेप्रमाणे इमामबक्षने मोहिद्दीनला धूळ चारून १९१२ ची या मैदानातील ती पहिलीवहिली कुस्ती अमर केली. दोन्ही कुस्तिगिरांना महाराजांनी स्वतः मैदानात येऊन रोख रकमेची पारितोषिके दिली आणि सार्या राज्यातून जमलेल्या रसिक क्रीडाप्रेमींनाही अभिवादन केले. दुसर्‍या दिवसापासून 'खासबाग' मैदान जनतेसाठी खुले झाले.

पुढे दरसाली देशातील नामवंत पहिलवान आपल्या कुस्ती कौशल्याच्या कस खासबागच्या मैदानातच लागला पाहिजे या जिद्दीने या गावात येऊन इथल्या स्थानिक मल्लांपुढे रोखठोक आव्हाने ठेवू लागले.

कल्लू गामा आणि गुंगा पहिलवान, स्थानिक मल्लापा तडाखे आणि लाहोरचा जिजा पंजाबी, गोगा, अक्रम, सादिक पंजाबी विरूद्ध मारुती माने, अस्लमविरुद्ध विष्णू नागराळे. ह्या सार्‍या कुस्त्या जणूकाही पंजाब विरूद्ध महाराष्ट्र अशाच होत्या....त्यावेळी "पंजाब" हा अखंड हिंदुस्थानाचा भाग असल्याने या पैलवानांना कुणीही 'पाकिस्तानी' पैलवान म्हणत नव्हते, समजत नव्हते, कारण त्याकाळात पाकिस्तान निर्मितीचा प्रश्नच नव्हता. पुढे मात्र पूर्व पंजाब नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात गेल्यावर तेथील पहिलवानांची, राजकीय अस्थिर वातावरणामुळे, इकडच्या येण्यातील वारंवारीता प्रकर्षाने कमी होऊ लागल्यावर मग महाराष्ट्रातीलच पैलवानांच्या कुस्त्या खासबाग मैदानात घुमू लागल्या आणि गाजूही लागल्या. त्यात सर्वप्रथम नाव येते ते मारुती माने विरूद्ध विष्णू सावर्डे यांच्यातील साडेतीन तास [अंधार पडू लागल्यावर मोठाल्या गॅसबत्त्या आणाव्या लागल्या मैदानात] चाललली आणि तितकीच गाजलेली मारुती मानेच्या विजयाची आरोळी. या एकाच कुस्तीमुळे मारुती माने हे नाव सार्या भारतात गाजले आणि त्या किर्तीमुळे दिल्लीतील हनुमान आखाड्यातील पहिलवानांना 'खासबाग मैदानाचे' व पाठोपाठ कोल्हापूर नगरीचे आकर्षण वाटू लागले.

महमद हनिफ, गणपत आंदळकर, दिनकर दह्यारी, मारुती वडार, श्रीपती खंचनाळे, चंबा मुत्नाळ, लक्ष्मण काकती, चंदगीराम, लक्ष्मण वडार, युवराज पाटील आदी अनेक मल्लांनी इथली तांबडी माती आपल्या अंगाखांद्याला लागल्याशिवाय आपल्या कुस्तीचे सार्थक झाले नाही असेच मानले. पुढे ऑलिम्पिक कुस्तीत "मॅट" आले आणि नवीन पिढीतील पैलवानांनी तिकडे आपल्या कलेचे लक्ष स्वाभाविकपणे केन्द्रीत केले असले तरी त्यानाही 'खासबाग'ची भुरळ होतीच.

त्यामुळेच ज्यावेळी जीन पॅण्ट व टॉप घालून एक खाली मान घातलेला विशीतील नवी दिल्लीचा एक गोरापान युवक आपल्या गुरुसमवेत मैदानात आला आणि बाहेरील पाहुण्यांसाठी केलेल्या वेगळ्या बैठक व्यवस्थेतील शेवटच्या खुर्चीच्या मागे जाऊन उभा राहिला आणि मैदानात सुरू असलेल्या पाचसहा कुस्त्यांकडे अनिमिष नेत्रांनी पाहू लागला त्यावेळी 'मी इथल्या करवीरकरांच्या गळ्यातील ताईत होईन'...असे स्वप्नही त्याच्या मनी आले नसेल...कोल्हापूरकरांनीही या कॉलेजकुमार पैलवानाकडे '...आला आहे असाच एक दिल्लीतून कोल्हापूर बघायला' अशा नजरेनेच पाहिले.

हा युवा पैलवान होता - "सतपाल".

वर्ष होते १९७७-७८ आणि 'रुस्तमे-हिंद' किताबासाठी लढत देणार्‍यांमध्ये देशातील नामवंत बलदंड पहिलवानांनी एकच गर्दी केली होती कोल्हापुरात. तर २१ दिवस चालणार्‍या या भव्य मैदानातील कुस्त्या पाहण्यासाठी मैदानाबाहेर तिकिटांसाठी उसळलेली रसिक क्रीडाप्रेमींची तोबा गर्दी. तिसर्‍या दिवशी 'सतपाल' युवीने आपल्या अंगवरील टॉप आणि जीन बाजूला काढली आणि लांगेवरच आपले गुरु हनुमान याना नमस्कार केला आणि कसलीही घोषणा न करता शांतपणे मैदानात येऊन आपल्या प्रतिस्पर्ध्याची वाट पाहू लागला. पंचांनी शाहूपूरी तालमीच्या त्याच्याविरुद्धच्या पहिलवानाला पुकारून पाचारण केले आणि त्याच्या मित्रांनी त्याच्याबाजूने एकच गिल्ला केला...तसा इथला प्रघात आहेच. सतपालने नम्रपणे सलामी दिली आणि पंचाने दोघांना हस्तांदोलन करायला लावून कुस्ती सुरूचा इशारा दिला...इशारा देऊन एकच सेकंद झाला असेल नसेल आणि ठासून भरलेल्या मैदानातील सुमारे पन्नास हजार प्रेक्षकांनी पाहिले की शाहूपुरीचा तो लाडका नंबरी पैलवान चारीमुंड्या चीत होऊन आकाशाकडे डोळे विस्फारून पडला आहे. तर दुसरीकडे विजयी सतपाल...ज्याच्या अंगाला अजून चिमुटभरही माती लागलेली नाही; तो परत एकदा प्रेक्षकांकडे पाहात लवून नमस्कार करीत आपल्या गुरुच्या खुर्चीकडे वंदनेसाठी निघालाय.

त्या क्षणापासून सतपाल कोल्हापूरकरांच्या मनात असा काही बसला, भरला की ज्याचे नाव ते. पुढील प्रत्येक कुस्ती सतपालने त्याच आविर्भावात जिंकली आणि दोनेक आठवड्यानंतर झालेली अंतिम लढत : सतपाल दिल्ली विरूध्द दादू चौगुले कोल्हापूर. ह्या कुस्तीच्यावेळी प्रथमच सतपालच्या अंगाला विरूध्द बाजूच्या पैलवानाकडून अंगाला थोडी का होईना पण माती लागली. तितकेच, कारण वीस मिनिटाच्या आत सतपालने दादू चौगुलेसारख्या हत्तीएवढ्या पहिलवानाला असे काही मेटाकुटीला आणले की दादूने पराभवानंतर जवळपास पहिलवानकी सोडलीच. विजयी सतपालला खासबाग मैदानातच चांदीची गदा आणि लाख रुपयाचे पारितोषिक तर दिले गेलेच शिवाय त्याची महाराजांच्या वाड्यावरील 'बर्चीबहाद्दर' या हत्तीवरून कोल्हापूरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. खासबागेतील या कुस्तीतील विजयामुळे पैलवान सतपालचे नाव सार्‍या देशात तर झालेच शिवाय पुढे त्याला कोल्हापूर आपलेच वाटू लागले. अनेकवेळी इथे त्याच्या कुस्त्या झाल्या...अनेकाना त्याने इथे व अन्यत्र धूळ चारली. पण तो पराभूत झाला तो खासबागेत युवराज पाटील आणि पुढे मुंबईत हरिश्चंद्र बिराजदार या इथल्या [मूळ गाव लातूर] पैलवानाकडूनच.

खासबाग मैदान....मॅट ग्रीको रोमन आदी अनेक प्रकारच्या नवनवीन प्रकारांना पुरून उरले आहे ते काल संपलेल्या हिंदकेसरी २०१२ च्या मैदानावरून सर्वांना दिसलेच....पुढील अगणित वर्षे शहराच्या जडणघडणीत विविध रुपाने आपले रंग दाखवितील, पण करवीरकर शंभर वर्षांची दिव्य परंपरा असलेल्या या मैदानाला कसलीही ढाळ लागू देणार नाहीत हेही तितकेच खरे.

[लेखातील मैदानाची नवीजुनी चित्रे जालावरून साभार]

गुलमोहर: 

धन्यवाद अशोक जी......... सुंदर लेख आहे.......... झणझणीत मिसळ , तांबडा पांढरा रस्सा, आणि खासबागेतील कुस्ती.......... Happy

व्वा! मामा, लई भारी.

परवा नाशिक लोकमतलाही खास खासबागवर एक लेख आला होता त्यात 'गामा पैलवान' 'आंदळकर' ह्या जुन्या पैलवानांच्या कुस्त्यांचे उल्लेख होते. बहुचर्चित युवराज पाटील आणि सत्पाल ह्या कुस्तीचे मात्र वर्णन त्यात नव्हते. आम्ही लहान असताना ही कुस्ती खूप गाजली होती.

व्वा व्वा! अशोकराव, पार खुळं करुन टाकलं की राव या लेखानं.. आता आणखी वैशिष्ट्य पण येउन द्यात कोल्हापूरची.. रंकाळा.. धोब्याच्या चाव्या वगैरे!! छान माहितीपर मालिकाच तयार होईल.

धन्यवाद भाचे-भाची मंडळी. मला नक्की माहीत होते की तुम्हाला 'करवीरनगरी'चे हे वैशिष्ठ्य भावणारच.....पूर्वीही ही लेख दिला असता, पण शताब्दीनिमित्य आयोजित केलेली 'हिंदकेसरी दंगल' झाल्यावरच द्यावे असे मनी आले. ते औचित्याचेही झाले.

दक्षिणा ~ "साठमारी" ची माझ्याकडे छान जुनी चित्रे आहेत. पण 'कुस्ती' संदर्भात ती इथे देणे अप्रस्तुत दिसले असते, म्हणून टाळली. पण थोडा वेळ थांब, इथेच प्रतिसाद रुपात ती देतो.

[च्यामारी.....आजारी आहेस म्हणतेस आणि इकडे जालावर कशी काय भटकतेस ? बोर्नव्हिटा पितेस का घडीघडीला ?]

भारी लेख.. अगदी योग्य वेळेवर टाकलाय. Happy
युवराज पाटील वरुन आठवलं.. त्यांच्या नावावरुन खूप लोकांनी आपल्या मुलाचं नाव युवराज ठेवलं.. असे ३-४ तरी युवराज नात्यातच आहेत. Happy

सुंदर ओळख. त्याकाळातले कोल्हापूरातले कुस्तीचे वातावरण मी बघितलेय. प्रत्यक्ष
कुस्ती बघितल्याची आठवण मात्र आता खुपच धुसर झालीय.

मस्त लेख. अशोक साहेब.:स्मित:
आणि त्या जुन्या प्रकाशचित्रांनी तर आणखी जिवंतपणा आणलाय लेखात!

दिनेश ~

१०० वर्षाच्या या निमित्ताने अगदी तुम्ही म्हणता तसे पक्के कोल्हापुरी कुस्तीमय वातावरण शहरात निर्माण झाले होते आणि ते पाहणे खरोखरी आल्हाददायक होते. आखाड्यात यंदाच्या विजयीवीराला हिंदकेसरीची गदा देताना खुद्द मुख्यमंत्रीच त्या फेट्यामुळे अगदी पैलवानच वाटत होत. फार छान वाटले जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे.

@ चिंगी ~ होय अगदी १००% सत्य आहे ही 'युवराज' नावाची परंपरा आणि ते घडले निव्वळ त्याने 'सतपाल' सारख्या दिग्गजाला हरविल्यामुळे [मी पाहिली होती ती कुस्ती]. पण दुर्दैवाने युवराजने या विजयानंतर कुस्ती सोडलीच. [चार वर्षापूवी पुणे-दिघी रस्त्यावर कार अपघातात त्यांचा हृदयद्रावक मृत्यू झाला त्यावेळी या जुन्या आठवणी लोकांनी काढल्याचे स्मरते.]

छान लेख आहे अशोकजी, धन्यवाद.
कालच सामनापुरवणी पान क्र. ३ वर मंदिर एका पैलवानाच हा लेख वाचला मिरजमध्ये छोटुसिंग पैलवानाच मंदिरच उभारण्यात आल आहे यातुनच कुस्तीची लोकप्रियता ध्यानी येते.

@ विजय आंग्रे ~

तशी ती जुनी चित्र खूप आहेत माझ्या संग्रही. पण विषयाला अनुसरूनच देणे गरजेच आहे म्हणून त्यातील दोन दिली.

शिवाय मी काही कॉम्प्युटर मास्टर नसल्याने अशी चित्रे ती इथे देता येतात इतपतच माहिती आहे; पण देताना ती योग्य त्या 'साईझ' मध्ये कशी द्यावी याचे ज्ञान माझ्याकडे नसल्याते चारही फोटो एकाच गाळणीतून झरलेले नाहीत हे तुम्हाला जाणवले असेलच.

साईझबाबत कुणीतरी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा.

@ ईनमीनतीन ~ अरेच्या ही माहिती मला नवीनच आहे. वास्तविक मिरजेला या ना त्या निमित्ताने मी जात असतो पण कधीही तिथल्या स्थानिकाकडून या मंदिराचा उल्लेख झाला नाही. जरूर पाठपुरावा करतो.

अशोक पाटील

हो, मला पण कुस्ती खेळायची होती खासबागेत. पण मी नेहमी धाकल्यालाच (इमामला) पुढे करायचो. कारण कोणी यायचंच नाही हो माझ्याशी लढायला! इमामही मस्त पैलवान होता. त्याने मला चांगलं कव्हर पुरवलं.

शिवाय मी गुदस्ताच (इ.स.१९११) रहीमबक्ष सुलतानीवाल्याला पार चुरडून टाकलं होतं. म्हणून म्हंटलं की इमामलाच पुढे होऊदे. Happy

पण कोल्हापूरचे कुस्तीशौकीन एकदम खासंच हां! जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल, अशोकजी, आपल्याला लाख लाख शुकरिया!

आपला नम्र,
गामा पैलवान

छान लेख, Happy दुर्मिळ फोटो.
७७-७८ मध्ये बर्चिबहाद्दर होता? हे नीट आठवत नाही. बिराजदार लातूरचा की उस्मानाबादचा?

>>कोल्हापूरचे छत्रपती बाबासाहेब महाराज याना शाहू दत्तक गेले होते आणि १८९४ मध्ये ते करवीर गादीवर "छत्रपती" म्हणून विराजमान झाले. त्यांच्या सामाजिक सुधारणा तसेच बहुजन समाज शिक्षणविचारावर/कारकिर्दीवर इथे काही लिहिणे अप्रस्तुत होईल

वेगळ्या लेखात जरूर लिहा.

नाद खुळा ओ मामा!!!
फक्त 'सार्या' लिहिण्यासाठी sARyA असे लिहा म्हणजे ते 'सार्‍या' होईल.

जबर्‍या लेख अशोक! Happy
माझ्या शाळेसमोरच हे मैदान असल्याने शाळेनंतर खेळायला बरेचदा तिथे जायचो. Proud

>> रोम धर्तीने उतरत्या शैलीचे 'खासबाग' मैदान
मस्तच बांधलं आहे हे मैदान!
तिथे पूर्वी "वारणा बालवाद्यवृंद" असा एक कार्यक्रम होत असे, तो ऐकायला गेलो होतो. कुस्ती कधी बघायला नाही मिळाली... Sad

खुप छान माहीती.. Happy
मागे एकदा करवीर दर्शनासाठी गेलो असता.. हॉटेलवाल्याला 'खासबाग' बद्दल विचारले तर तो उत्तरला की ते एक कुस्तिचे मैदान आहे..आणि आता तिथे बघण्यासारखे काही नाही म्हणुन ..:(

@ गामा पैलवान ~

खरंय अगदी 'गामा' बाबत. कोल्हापूरातील मोतीबाग, शाहुपूरी, ऋणमुक्तेश्वर, तटाकडील, पाटाकडील, आदी अनेक प्रसिद्ध तालमीची अशी एक परंपरा की आखाड्यात हनुमानाच्या मूर्तीसोबत शेजारील भिंतीवर अनेक नामवंत पैलवानांचे तसविरी लटकत असलेल्या दिसतात. या फोटोतील पैलवानात आदरानुसार बदल होत जातील, पण प्रत्येक ठिकाणी 'गामा' आणि 'भोला' पंजाबी हे दोन बिग बॉस असणारच. फार भक्ती होती (आहे) गामावर कोल्हापुरकरांची.

@ लोला ~
होय. ती हत्तीवरीलच मिरवणूक होती. मी स्वतः ती मिरवणूक पाहिली आहे. [मीच काय पण मिरवणूक मार्गावरील प्रत्येक घर आणि तेथील रहिवाशी उत्सुकतेने 'सतपाल' या युवकाला पाहाण्यासाठी दाटीवाटीने दुतर्फा थांबले होते. सतपालने 'पहिलवान' ही व्याख्याच बदलून टाकली. स्पोर्टस जर्सी आणि जीन घालणारा पहिलवान हे चित्रच त्या काळी अनोखे होते. आज वयाच्या ५७ व्या वर्षीही सतपाल अशीच तब्येत राखून आहेत....दिल्लीत.

प्रकाशचित्रे दिसली नाहीत, पण वर्णन पुरेसे ठरले Happy
छान लिहीलंय. हा सोहळा प्रत्यक्षात बघायला मिळण्याचे भाग्य मिळो कधीतरी.

अरेच्या मंदार ! काय हे ??? असं कसं बुवा !

इथल्या प्रत्येक प्रतिसादकाला सारीच चित्रे दिसत आहेत आणि ते त्यांचे कौतुकही करीत आहेत. तुम्ही तर इथले बुजूर्ग सदस्य, याचाच अर्थ तुमच्याकडील इन्फ्रास्ट्र्क्चर त्या चित्रांना परफेक्टच असणार.

एनीवे, मी हीच चित्रे तुम्हाला वि.पू. त पाठवितो.....प्लीज तिथे पाहा आणि कळवा.

मामा, आमच्याकडे काही संकेतस्थळे बंदी असलेली आहेत त्यामुळे दिसत नाहीत. मी घरी जाऊन पाहेन Happy

Pages