शकालाका (Chakalaka) फ़ोटोसह

Submitted by दिनेश. on 22 April, 2012 - 15:11
shakalaka
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) एक मोठा कांदा, बारीक कापून
२) एक मोठी लाल सिमला मिरची, बारीक कापून
३) दोन तीन लाल टॉमेटो, बारीक कापून
४) आवडीप्रमाणे लाल ओल्या मिरच्या, बारीक कापून किंवा वाटून
५) लसणीचा २/३ पाकळ्या, बारीक करुन
६) १ टेबलस्पून तेल
७) चवीप्रमाणे मीठ
८) आवडते कडधान्य शिजवून १ कप किंवा एक टिन (मी टिनमधले बटर बीन्स वापरलेत)
९) करी पावडर (टिप बघा.)

आफ़्रिकन लोकांना खाण्यात लाल रंग खुप आवडतो. त्यामूळे सगळे घटक लालभडक
निवडा.

क्रमवार पाककृती: 

शकालाका (Chakalaka) हा एक दक्षिण आफ़्रिकेतील लोकप्रिय प्रकार आहे.
१) तेल तापवून त्यात लसूण, मिरची, कांदा टाका व जरा परता.
२) फार परतायचे नाही, कांदा मऊ पडला कि टोमॅटो टाका
३) जरा परतून त्यात बाकीचे जिन्नस टाका आणि हवे तेवढे पाणी टाका.
४) २\३ मिनिटे उकळू द्या
५) उगाली (टिप बघा) सोबत खा.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी न्याहारी
अधिक टिपा: 

अ) करी पावडर
करी पावडर हा एक सबगोलंकार प्रकार आहे, बहुदा ब्रिटिशांनी शोधलेला. यातले घटक वेगवेगळे
असू शकतात. पण आपल्याप्रमाणे फार मसाले नसतात आणि ती तिखटही नसते.
हळद, जिरे, धणे असे मोजकेच घटक असतात. (इथे ज्या बाटल्या मिळतात त्यात) तूम्ही आपल्या
आवडीचा मसाला वापरू शकता. इथे मिरची पण तिखट खात नाहीत. नायजेरियात मात्र भरपूर
तिखट खातात. रंगासाठी खुपदा करीपावडर मधेच, अनोटा हा वनस्पतिजन्य रंग असतो.
याची झाडे भारतात पण आहेत. हा रंग सुंदर असतो आणि धोकादायक नाही.

ब) उगाली,
उगाली म्हणजे मक्याच्या पिठाची उकड. हा प्रकार करायला खुपच सोपा. मीठ घातलेले पाणी
उकळून त्यात पांढऱ्या मक्याचा रवा घालतात. घोटून गुठळ्या मोडतात आणि गोळा जमला
कि उतरतात. यात दक्षिण अमेरिकेप्रमाणे कधीही पिवळा मका वापरत नाही. त्यांना तो आवडत
नाही. मक्याच्या जागीम नाचणी, राजगिरा, केळे, रताळे यांची पिठे पण वापरतात. पण कृती
हिच.
केनयन लोक एका वेळेला २ किलो पिठाची उगाली खाऊ शकतात. अर्थात उपलब्ध असेल तरच.
यात पाण्याचेही प्रमाण नाही. खाणारी माणसे जास्त असतील तर पाण्याचे प्रमाण वाढवतात.
ही उगाली हातानेच खातात. त्याचा गोळा करुन त्यात अंगठ्याने खळगा करतात आणि तो
इतर पदार्थात बुडवून खातात.
त्यांच्या पद्धतीने केलेली उगाली, आपल्याला खाणे कठीण जाते. ती आपल्याला खुप कोरडी
वाटू शकते. म्हणून भारतीय लोक तिला तूप जिरे यांची फ़ोडणी देतात आणि दूधात शिजवतात.
तशी शिजवल्यावर मात्र ती खुपच सुंदर लागते.
हे दोन्ही पदार्थ पटकन होतात.
उगालीला अनेक देशात वेगवेगळी नावे आहेत. दक्षिण आफ़्रिकेत पाप म्हणतात तर नायजेरियात
गारी (ती कसाव्याच्या पिठाची असते.)

मसाले वापरायची प्रथा नाही, याचे कारण त्यांना ते आवडत नाहीत. पिक मात्र येते. टांझानिया
खास करुन झांजिबार मधे उत्तम मसाले होतात.
इथिओपियात मात्र मसाले वापरतात. त्यांचे नितेर किबेह, नावाचे मसालेदार तूप (हो लोणकढे
तूप) खुमासदार लागते. पण ते परत कधीतरी..

माहितीचा स्रोत: 
इथली स्थानिक मासिके.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे भारीच आहे आणि प्रयोगांना सुद्धा भरपूर वाव आहे. मस्त.
आपल्याकडची जी कांदे टोमॅटोची ग्रेव्ही असते ती राणी नूरजहॉं ने सुरू केली असे म्हणतात.
पाककृतींचा/ पाकप्रयोगांचा इतिहास एकत्रितरित्या कुठे वाचायला मिळेल? मध्यंतरी मोहसिना मुकादमांच्या काही लेखांत असेच उल्लेख असायचे..

पदार्थाचे नावच मजेदार आहे.
लाल रंगाचा पदार्थ व बरोबर असलेली पांढर्‍या रंगाची उकड ही आधी उपम्यासारखी वाटली.
फोटो छान आलाय.

मी हे सर्व प्रकार शमिला दाखवत असतो.. Lol

पाककृतींचा/ पाकप्रयोगांचा इतिहास एकत्रितरित्या कुठे वाचायला मिळेल?
>>>>
इथे बरीच माहिती आहे की... Happy

वाह..! छान दिसतोय की, एखादा संध्याकाळचा नाश्ता म्हणून करता येईल..
भिजून उकडून घेतलेल्या राजमा चालेल का..?

Happy हा पदार्थ तिखट नाही?? Uhoh रंग मात्र फार अ‍ॅपिटायजिंग आहे..

उगाली.. आपल्या बाटी वरून तर सुचला नाही हा प्रकार त्यांना?? Happy

नेक्स्ट टायमाला माझ्याकरता तिकडल्या तिख्ख्ट जाळ मिर्च्या घेऊन या बर्का!!! Happy
शकालाका बेबी.. असं एक हिन्दी सिनेमातलं गाणं ऐकलं होतं..

सारिका, अगदी चालेल.
वर्षू, तो रंग अनोटाचा. नायजेरियात तिखटजाळ मिरच्या मिळतात. इथिओपियातही
मिळतात. त्या आणीन.
अगदी प्राथमिक आणि साधेसुधे पदार्थ असतात यांचे. पण मूळात भाज्याच ताज्या
(मांसाचे काय सांगू ?) असल्याने चव छान येते.
हेम,
शालिनी होळकरांचे एक पुस्तक आहे. मोहसिना मुकादम यांची पण आहेत. पुर्वी
फ़्रेनी वर्मा लिहित असत.

अनोटा.. कसं दिसतं बरं?? फोटो टाकू शकाल का एखादा..
लहानपणी एम पी मधे 'रतनज्योत' नावाचा एक फुलाचा का कसला तरी प्रकार मिळायचा.. बराचसा केशरी रंगाच्या एका मसाल्यासारखा( नावच आठवत नाहीये त्याचं.. वाळक्या ,लहानश्या ऑक्टोपस सारखा दिसतो हामसाला,पंजाबी गरम मसाला करताना हमखास वापरला जातो) दिसायचा.

तर हे रतनज्योत ,केशरा सारखं खलून तयार ग्रेवीत अ‍ॅड केलं की लालभडक रंग येई..

अनोटाच्या बारीक त्रिकोणी शंकूसारख्या बिया असतात, पण बाजारात ते पावडर रुपातच मिळते. पावडर कुंकवासारखी दिसते आणि भारतात त्याला कुंकवाचे झाड म्हणतात.
पाने पिंपळासारखी असतात. फुले पांढरी किंवा जांभळी असतात. फळ किरमिजी रंगाचे
त्रिकोणी, केसाळ असते. आत या बिया असतात. हा रंग बर्‍याच उत्पादनात वापरतात.
फिलीपीन्स, इंडोनेशिया मधे पण वापरतात. या बियासुद्धा तेलात परतून घेतल्या तरी
चालतात. (परवा जिप्सीच्या प्रदर्शनाच्या फोटोमधल्या एका फोटोत हा फोटो होता.)
रतनज्योत, पातळ दालचिनी सारखे दिसते. दोन्ही रंग उष्णतेने काळपट पडत नाहीत.

सेनापती, आधी चिनुक्स आणि मग तुला खूप धन्यवाद.. अजून कांय कांय राहीलंय वाचायचं या मायबोलीवरील समृद्ध सागरात??? हवी असलेली प्रचंड माहिती आहे त्या मालिकेत.
धन्यवाद दिनेशदा.

शकालाका बूम बूम असं पण कुठलंसं गाणं आठवलं!!
मस्त वाटतोय हा पण प्रकार. नक्की करून बघीन. (अजून किती प्रकार करून बघायचे पेंडिंग आहेत माझे!!)