भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!

Submitted by sudhirkale42 on 16 April, 2012 - 16:48

भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!

लेखक: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा "खासगी" भारत दौरा नुकताच आटोपला. ते सुप्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती यांच्या अजमेर येथील दर्ग्यावर प्रार्थना करायला आले होते. पण भारताच्या आणि पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांसाठी प्रेक्षकांकडून उच्चतम मूल्यांकन प्राप्त करून घेण्याची ही एक सुवर्णसंधीच होती. मग ते ती कशी सोडतील?

या दिवशी मी भारतात होतो व या भेटीचे वृत्त देणार्‍या एका भारतीय चित्रवाणीवर हमीद मीर नावाच्या एका सुप्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकाराची घेतली जाणारी मुलाखत पहात होतो. भारतीय वृत्तनिवेदिकेने भारताच्या दृष्टीने महत्वाचा पण मीर यांना अडचणीत टाकणारा एक प्रश्न विचारला. तिने विचारले कीं पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI ही हाफीज महंमद सईद याला गुप्तपणे समर्थन् देवून त्याचा भारताविरुद्धच्या कारवायांत एक शस्त्र म्हणून वापरत आहे हे खरे आहे ना? या प्रश्नाचे थेट "होय" किंवा "नाहीं" असे उत्तर न देता मीरसाहेबांनी नेहमीप्रमाणे अमेरिकेला दोष दिला. "सोविएत संघराज्याने अफगाणिस्तानचा ताबा घेतलेला असताना त्यांना हुसकून काढण्य़ासाठी CIA या अमेरिकन गुप्तचर संघटनेने मुजाहिदीनना (म्हणजेच अतिरेक्यांना) मदत केली होती" अशी कोल्हेकुईच त्यांनी केली!

हे उत्तर ऐकून मी तर थक्कच झालो! लहान मुले घाबरली कीं जशी आईच्या पदराआड लपतात तशी या नामांकित पत्रकाराला अशी CIA च्या "पदरा"आड लपायची काय गरज होती? रेगन यांनी अमेरिकन हितसंबंधांच्या फायद्यासाठी झियांना उद्युक्त केले होतेच, पण झियांना त्यांचे ऐकायची काय गरज होती? आणि झियांनी एकदा पाकिस्तानच्या (किंवा स्वत:च्या वैयक्तिक) हितांसाठी रेगन यांचे ऐकायचे ठरविले असेल तर त्याबद्दल अमेरिकेला आता कशाला दोष द्यायचा? अगदी हुबेहूब अशीच कारवाई ९/११ नंतर मुशर्रफ यांनीही केली होती व आज तेही अमेरिकेलाच दोष देतात. पण अमेरिकेची साथ देण्याचे त्यांच्यावर मुळीच बंधन नव्हते.

अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी मदतीसाठी आणि स्वत:चे खिसे भरण्यासाठी हे पाकिस्तानी नेते डोळे उघडे ठेऊन अमेरिकेच्या कच्छपी लागले मग आता अमेरिकेला दोष कशाला? अशा धोरणामुळे पाकिस्तानने स्वत:ला एकाद्या भाडोत्री गुलामाच्या पातळीवर उतरविले आहे हे नक्की. पकिस्तान आज कुठल्याही सदसद्विवेकबुद्धीच्या टोचणीकडे दुर्लक्ष करून अशी कुणाचीही युद्धे "चार कवड्या खिशात पडाव्यात" म्हणून लढत आहे हेच चित्र डोळ्यासमोर उभे रहाते! खरे तर मीरसाहेबांनी या संधीचा उपयोग करून घेऊन हे खरे पण काळेकुट्ट चित्र लोकांसमोर ठेवायला हवे होते.

पाकिस्तान जोपर्यंत आपला खर्च स्वत: कमावलेल्या पैशातून करत नाहीं आणि जोवर तो अमेरिकेच्या (आणि आता चीनच्याही) मदतीवर अवलंबून रहातो तोपर्यंत तिची परिस्थिती आज आहे तशीच राहील किंवा ती आणखीच बिघडेल.

पाकिस्तानचे मुलकी सरकार जेंव्हां आपले सरकार पूर्णपणे स्वत:च्या हिमतीवर करेल, आपल्या सैन्याला त्यांच्या बराकीत पाठवेल, मुल्ला-मौलवींना मशीदींत किंवा मद्रासांत पाठवेल व त्यांच्या कारवाया धर्मापुरत्याच मर्यादित करेल आणि लष्कराच्या दादागिरीविरुद्ध हिमतीने उभे राहून देशाचा कारभार पाकिस्तानी जनतेच्या हितासाठी आणि भरभराटीसाठी हाकेल तेंव्हांच पाकिस्तानचा उत्कर्ष होईल. भारत अशा बदलाची आशेने वाट पहात आहे आणि हे बदल शक्य व्हावेत म्हणून लागेल ती मदत भारत नक्कीच करेल यात शंका नाहीं.

"जकार्ता पोस्ट" या येथील इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या (http://www.thejakartapost.com/news/2012/04/10/letter-why-hide-behind-cia...) माझ्या याच अर्थाच्या पत्राला फराज आणि पीटर या दोन वाचकांनी दिलेला प्रतिसाद खालील दुव्यावर वाचता येईल.

http://www.thejakartapost.com/news/2012/04/12/letter-on-pakistan-and-ind... .

खरे तर माझ्या पत्राच्या शेवटच्या परिच्छेदातील माझ्या पाकिस्तानबद्दलच्या मित्रत्वाच्या भावना त्यांच्या लक्षातच आलेल्या दिसत नाहींत. भारत व पाकिस्तान हे "स्वाभाविक भाऊ-भाऊ" असून त्यांनी आपापसातले मतभेद मिटवून प्रगतीच्या आणि भरभराटीच्या मार्गाने पुढील प्रवास करावा या माझ्या भावना त्यांना जाणविल्याच नाहींत असे खेदाने म्हणावेसे वाटते. याच भावनेपोटी मी "भारताला शत्रू समजणे पाकिस्तानी जनतेने थांबवावे" या नवाज शरीफ यांच्या वक्तव्याची तरफदारी मी माझ्या "जकार्ता पोस्ट"मधील पत्रात केली होती. (http://www.thejakartapost.com/news/2011/05/27/letter-india-pakistan-have...) सध्याचे मुलकी सरकार भारताशी मैत्रीचे संबंध स्थापण्यास उत्सुक आहे पण ज्या लष्कराची खोटी ऐट भारताबरोबरच्या शत्रुत्वावरच अवलंबून आहे व ज्या लष्कराला (त्याने अद्याप एकही युद्ध जिंकले नसूनही) स्वत:ला "पाकिस्तानचे पालनहार" असे म्हणवून घेताना कसलाच संकोच वाटत नाहीं असे हे पाकिस्तानी लष्कर व त्याची गुप्तचर संघटना (ISI) भारतची आणि पाकिस्तानची मैत्री सद्य परिस्थितीत कदापीही होऊ देणार नाहीं.

जरदारी आणि नवाज शरीफ हे दोघेही पाकिस्तानचे द्रष्टे नेते आहेत. पण स्वत:ला रोमेल किंवा गुडेरियन[१] समजणार्‍या पाकिस्तानी लष्करशहांना भारताबरोबरचे वैर चालूच ठेवावेसे वाटते. पाकिस्तानी लष्करशहांच्या व अतिरेक्यांच्या हस्ते जरदारींनी खूप सोसले आहे. पाकिस्तानी लष्करशाहांनी जरदारींना अनेक वर्षें कैदेत टाकले होते तर त्यांच्या पत्नी बेनझीर यांचा तर अतिरेक्यांच्या गोळीने मृत्यू घडला. जरदारी हे एक चांगल्या स्वभावाचे गृहस्थ वाटतात. २६/११ च्या "मुंबई शिरकाणा"नंतर जरदारींनी आपल्या ISIच्या मुखियाला त्या शिरकाणाचा नीट तपास करून, त्यामागच्या पाकिस्तानी हस्तकांना वेचून काढून शिक्षा करविण्यासाठी दिल्लीला जायची आज्ञा दिली होती. पण त्याने ही आज्ञा धुडकावून लागली असावी कारण जरदारींना त्याबद्दल मखलाशी करून आपली आज्ञा बदलावी लागली होती. पाकिस्तानमध्ये खरोखर राज्य कोण करतो याची कल्पना मात्र या घटनेवरून सार्‍या जगाला पुन्हा एकदा दिसली.

इतकेच काय पण ISI चे त्यावेळचे मुखिया पाशा यांनी सध्या सुरू असलेल्या कुप्रसिद्ध "मेमोगेट" प्रकरणात आपल्या सांविधानिक बॉस असलेल्या जरदारींचा हात होता हे सिद्ध करण्यासाठी सरकारची परवानगी न घेता लंडनला भरारी मारली होती! जय हो!

पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी मुलकी सरकार किती दिवस टिकेल हे त्यांचा सेनाप्रमुख ठरवतो तर आपल्याकडे आपले संरक्षणमंत्री आपल्याच सेनाप्रमुखाच्या वयाचे भूत विनाकारण उभे करून त्यांना एक वर्ष आधीच सेवानिवृत्त करतात. किती फरक आहे या दोन देशांत!

अमेरिकेच्या CIA संघटनेने अमेरिकेच्या राष्ट्रीय हितापोटी पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने अतिरेकी कारवायांना मदत देऊ करून एक विषवृक्ष लावला यात शंका नाहीं. जुल्फिकार अली भुत्तोंना लुटपुटीच्या खटल्याच्या आधाराने फासावर चढविलेल्या झियाला अख्या जगात कुणीही चाहता उरला नव्हता! म्हणून त्यांने या संधीचा फायदा घेऊन आपली प्रतिमा उजळ करून घेतली व रेगन यांच्या मांडीला मांडी लावून "व्हाईट हाऊस"मध्ये पुख्खाही झोडला! शिवाय स्वत:ची सत्ता बळकट करण्यासाठी झियाने लष्करातील व लष्कराबाहेरील धर्मवेड्या जिहादी वृत्तीच्या अतिरेक्यांना जवळ करून पाकिस्तानी राजकारणात प्रथमच धर्म आणला. यामुळेच आज झिया हे पाकिस्तानातील सर्वात जास्त तिरस्कृत नेते मानले जातात!

आज हेच अतिरेकी आपल्या जन्मदात्या ISI च्या मुख्यालयांवर हल्ला करायला मागे-पुढे पहात नाहींत!

माझ्या "एक्सपोर्ट सरप्लस" या शीर्षकाच्या जकार्ता पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या पत्रात मी हाच मुद्दा अधोरेखित केलेला आहे. (http://www.thejakartapost.com/news/2009/12/15/letters-export-surplus039....) ISIच्या मुख्यालयावरील हल्ला आणि मेहरान नाविक तळावरील अतिरेक्यांचा हल्ला ही याचीच उदाहरणे आहेत!

अफगाणीस्तानातील युद्ध थांबल्यावर मुशर्रफ यांनी याच प्रशिक्षण मिळालेल्या, कडव्या जिहादींना जम्मू-काश्मीर विभागात मोकाट सोडले व आपल्या सैन्याला खूपच हैराण केले. या बद्दलचा वृत्तांत Nuclear Deception या पुस्तकात वाचायला मिळेल. (मी हे पुस्तक कोळून प्यालेलो आहे!)

हाफिज सईद ही आता एक "व्यक्ती" राहिली नसून ती एक "विचारसरणी" झालेली आहे व तिने पाकिस्तानचा संपूर्ण विनाश करण्याआधी पाकिस्तानने स्वत:च त्या विचारसरणीचा कायदेशीर मार्गाने विनाश करायची गरज आहे. त्यासाठी भारताकडे पुरावे मागणे हास्यास्पद आहे. भारताच्या आर्थिक राजधानीवर झालेल्या हल्ल्याचा तो सूत्रधार होता म्हणून जरी भारत त्याला शिक्षा करण्याची मागणी करत असला तरी स्वत:च्या हितासाठी अशा व्यक्तीलाच नव्हे तर या विचारसरणीला मुळापासून उपटून टाकण्याची पाकिस्तानलाच गरज आहे. पण लष्कराचा भक्कम पाठिंबा असलेल्या सईदला बोट लावायचीही हिंमत पाकिस्तानचे मुलकी सरकार दाखवेल असे वाटत नाहीं.

शेवटी राहिला पाकिस्तानने भारताला "सर्वात जास्त प्राधान्य असलेला देश (Most Favoured Nation or MFN)" हा दर्जा देण्याबाबतचा करार. हा दर्जा भारताने पाकिस्तानला १९९६ सालीच देऊ केलेला आहे! पण पाकिस्तानला आतापर्यंत तो स्वीकारायचा धीर होत नव्हता कारण त्यांना पाकिस्तानी बाजारपेठ भारतीय मालाने भरून जाईल व पाकिस्तानच्या उद्योगावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल अशी भीती वाटत होती. पण आज या दोन देशातील चलनाच्या (१ डॉलरला ९१ पाकिस्तानी रुपये विरुद्ध ५१ भारतीय रुपये) विनिमयाच्या दरातील फरक पहाता हा करार स्वीकारण्यात पाकिस्तानचाच जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. मग त्यात पाकिस्तानने तोरा मिरविण्याचे काय कारण?

आता पीटरसाहेबांच्या मुद्द्यांकडे वळू या. काश्मीरच्या बाबतीत मी एवढेच म्हणेन कीं तिथल्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याच्या गीलानीसारख्या फुटीरवादी नेत्यांच्या आवाहनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून काश्मिरी जनता प्रत्येक निवडणुकीत हिरीरीने भाग घेत आलेली आहे. तिथल्या अगदी अलीकडील मतदानाच्या टक्केवारीचे प्रमाण भारताच्या इतर प्रांतातील टक्केवारीच्या दीडपट असलेले दिसून आलेले आहे. आता काश्मिरी जनतेच्या इच्छा काय आहेत याबाबत आणखी काय आणि कशाला बोलायचे? खरे तर पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI ने जर काश्मीरमध्ये लुडबुड करणे सोडून दिले तर दोन्ही देशांत शांतता नांदेल. पण मग पाकिस्तानी लष्कराचा "पाकिस्तानचा पालनहार" म्हणवून घ्यायची ऐटच संपेल व स्वत:चे असे अवमूल्यन झालेले पाकिस्तानी लष्कर स्वीकारेल काय?

मी तर फराज आणि पीटर यांना कामरान शफी व आयाज अमीर यांचे लेखन आणि "न्यूक्लियर डिसेप्शन" हे पुस्तक वाचायचा सल्ला देईन.

आपण आदर्श लोकशाही राबवतो असा दावा भारताने कधीच केलेला नाहीं. पण स्वातंत्र्य मिळाल्यापासून-इंदिरा गांधींनी दीड-एक वर्षांसाठी लादलेली आणीबाणी वगळता-भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणून राहिला आहे याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे आणि पाकिस्तानही एक लोकशाही राष्ट्र म्हणून अभिमानाने उभे राहील आणि भारताबरोबर मैत्रीचे संबंध ठेवील अशी आशाही आहे. भारताने लोकशाही राबविली आहे फक्त ६० वर्षांसाठी. भारत अजूनही लोकशाही मार्गाने सरकार कसे सुसूत्रपणे चालवायचे हे शिकतोच आहे. म्हणून भारताच्या लोकशाहीची अमेरिका किंवा इंग्लंडच्या लोकशाहीशी तूलना करणे अयोग्यच ठरेल.

भारताची राज्यघटना भारतीय न्यायसंस्थेला संपूर्ण स्वातंत्र्य देते हे पीटरसाहेबांना माहीत असेल अशी मला आशा आहे. आम्हाला या गोष्टीचा अभिमानही आहे. पाकिस्तानचे सध्याचे सरन्यायाधीश चौधरी यांनी मुशर्रफ यांच्या हुकुमशाहीविरुद्ध दाखविलेल्या धैर्याचे आम्हाला नक्कीच कौतुक आहे, पण त्यांच्यासमोर ज़रदारींच्या स्विस बॅंकेतील पैशावरून पंतप्रधान गिलानींविरुद्ध चाललेला खटला किंवा ’मेमोगेट’ खटला हे तर त्या न्यायसंस्थेचे वाभाडेच आहेत.

शेवटी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते! जरदारींनी अजमेरच्या दर्ग्याला पाच कोटी (पाकिस्तानी) रुपयांची देणगी जाहीर केली. ही संपत्ती त्यांनी आपल्या लागोपाठ दोन वर्षे "न भूतो न भविष्यति" अशा पुराने ग्रस्त झालेल्या आपल्या जनतेच्या कल्याणार्थ वापरायला हवी होती असे मला वाटते. अजमेरचा दर्गा घातपाती कारवायात नक्कीच सामील नसेल, पण परोपकारार्थ (charity) जमा केले गेलेले पैसे अतिरेकी कारवायांसाठी वापरण्याची प्रथाच पाकिस्तान, अफगाणिस्तान य देशांत रूढ झालेली आहे! त्या पार्श्वभूमीवर या पैशांचा विनियोग नको त्या कामात होणार नाहीं ना अशा शंकेची पाल प्रत्येक भारतीयाच्या मनात नक्कीच चुकचुकेल!

-----------------------------------------------------

[१] रोमेल व गुडेरियन हे दुसर्‍या जागतिक महायुद्धात गाजलेले जर्मन सेनानी! या सुप्रसिद्ध सेनानींचे नांव देऊन पाकिस्तानी लष्करशहांची अशी रेवडी माझे आवडते पाकिस्तानी स्तंभलेखक कामरान शफी अनेकदा करतात.

-----------------------------------------------------

गुलमोहर: 

पण परोपकारार्थ (charity) जमा केले गेलेले पैसे अतिरेकी कारवायांसाठी वापरण्याची प्रथाच पाकिस्तान, अफगाणिस्तान य देशांत रूढ झालेली आहे!
ज्याला बरेच लोक 'अतिरेकी' कारवाया म्हणतात त्याला ते लोक धर्म संरक्षणासाठी केलेला 'जिहाद' समजतात!

अशा धोरणामुळे पाकिस्तानने स्वत:ला एकाद्या भाडोत्री गुलामाच्या पातळीवर उतरविले आहे हे नक्की. खरे पण काळेकुट्ट चित्र

या तुमच्या मतांशी बरेच लोक सहमत होतीलहि, पण खुद्द पाकीस्तान याला 'आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी' म्हणत असेल तर?

पाकीस्तान अत्यंत गरीब आहे, तिथे उद्योगधंद्यांची, नोकर्‍यांची बोंब आहे, स्वत:च्या जोरावर ते उभे राहू शकतच नाहीत. भाडोत्री गुलामगिरीशिवाय दुसरा धंदाच नाही!! भिकार्‍याला कितीहि शिव्या दिल्या तरी बिचारा लोचटपणे भीक मागतच असतो.

जोपर्यंत अमेरिकेला, मनात येईल तेंव्हा, एकतर्फी हल्ला करून पाकीस्तानात घुसता येते, तोपर्यंत अमेरिकेला पाकीस्तानची काळजी नाही. अफगाणिस्तान, पाकीस्तान मधून मध्यपूर्वेतील तेल रशिया, चीन यांना मिळू नये, किंवा रशीया, चीन यांच्या कक्षात मध्यपूर्वेतील देश, अफगाणिस्तान, पाकीस्तान येऊ नयेत यात अमेरिकेचे हित आहे,

(खरे तर फक्त अमेरिकेतले ऑटोमोबिल नि तेल धंद्यातल्या लोकांचे हित आहे. सर्वसाधारण जनता, तेला ऐवजी इतर प्रकारे उर्जा मिळत असेल तर घ्यायला एका पायावर तयार आहे. पण अमेरिकेतली लोकशाही ही लोकांच्या मतानुसार चालत नसून, जे पैसे देतील त्यांच्या मतानुसार चालते, हे तुम्हाला ठाऊक असेलच. त्यामुळे बँका, इंशुरन्स, तेल, ऑटोमोबिल या धंद्यातले लोक म्हणतील तसे कायदे होतात. शिवाय जरी अमेरिका उर्जेच्या बाबतीत स्वतंत्र झाली तरी त्यांचा माल खपवायला, त्यांना इतर देशांना दबावात ठेवायला पाहिजे.)

छान माहिती... पण किचकट आणि गुंतागुंतीचा विषय आहे. झरदारींचा दौरा आय एस आय च्या परवानगी आणि आशिर्वादा शिवाय पुर्ण झालेला नाही असे मला वाटते. लष्कर आणि आय एस आय त्यांच्या आस्तित्वासाठीच मुखवटा असलेली (झरदारी - गिलानी) व्यावस्था जिवंत ठेवत आहे.

चान्गले लिहीलय, एकसलग वाचून काढले. Happy
झक्कीन्चा शेवटचे दोन परिच्छेद वाचून मात्र बर्‍याच जणान्ना (मला नव्हे) सूर्य पश्चिमेला उगवल्याचा भास झाला असेल्/होईल. Wink Proud

काळेसर लेख नंतर पूर्ण वाचतो.

"सोविएत संघराज्याने अफगाणिस्तानचा ताबा घेतलेला असताना त्यांना हुसकून काढण्य़ासाठी CIA या अमेरिकन गुप्तचर संघटनेने मुजाहिदीनना (म्हणजेच अतिरेक्यांना) मदत केली होती" अशी कोल्हेकुईच त्यांनी केली!

यात चुकीचे काय आहे ? तालिबान आणि अल कायदा देखील अमेरिकेनेच उभे केलेले आहेत. तशी कागदपत्रे आता उपलब्ध असताना ते नाकारण्यात काय अर्थ आहे ? पुढे या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हीच दिलेले आहे. पाकिस्तानने स्वतःचा वापर होऊ दिला.

का होऊ दिला हे ही ध्यानात येतं. भारताने रशियाशी वाढवलेली जवळीक, पाकिस्तानची बॉर्डर उत्तरेका शेअर करणारा तेव्हाचा अखंडित रशिया पश्चिमेस अफगाणिस्तानात घुसल्यावर पाकच्या गोटात काळजीचे वातावरण निर्माण झाले नसेल का ? रशिया भारताचा मित्र हे तर जाहीर असताना पूर्वेस भारत आणि पश्चिम आणि उत्तरेस रशिया हे धडकी भरवणारं चित्र होतं. पाकच्या या अस्वस्थतेचा लाभ अमेरिकेने घेतला. कारण रशिया इतका जवळ आलेला त्यांनाही नकोच होतं. अफगाणच्या पाठोपाठ पाकला लगाम लावून रशिया अरबी समुद्रापर्यंत जाता येईल इतका रस्ता मिळणे हे देखील अमेरिकेला सामरिक दृष्ट्या धोक्याचं वाटत होतं.

पण उघडपणे युद्ध पुकारता येत नसल्याने अमेरिकेनेच मुस्लिम दहशतवाद उभा केला हे सत्यच आहे.

चांगला लेख.
पण झक्की म्हणताहेत त्याप्रमाणे पाकिस्तान स्वतःच्या बळावर काही करु शकेल, एवढी
क्षमताच नाही, त्यांच्याकडे.

>>> का होऊ दिला हे ही ध्यानात येतं. भारताने रशियाशी वाढवलेली जवळीक, पाकिस्तानची बॉर्डर उत्तरेका शेअर करणारा तेव्हाचा अखंडित रशिया पश्चिमेस अफगाणिस्तानात घुसल्यावर पाकच्या गोटात काळजीचे वातावरण निर्माण झाले नसेल का ? रशिया भारताचा मित्र हे तर जाहीर असताना पूर्वेस भारत आणि पश्चिम आणि उत्तरेस रशिया हे धडकी भरवणारं चित्र होतं. पाकच्या या अस्वस्थतेचा लाभ अमेरिकेने घेतला. कारण रशिया इतका जवळ आलेला त्यांनाही नकोच होतं. अफगाणच्या पाठोपाठ पाकला लगाम लावून रशिया अरबी समुद्रापर्यंत जाता येईल इतका रस्ता मिळणे हे देखील अमेरिकेला सामरिक दृष्ट्या धोक्याचं वाटत होतं. <<<<
वर वर वाचल्यावर मी यास अनुमोदनच देणार होतो किरण Happy अन बर्‍याच अंशी, वस्तुस्थिती, जी प्रत्यक्ष दिसते ती तशीच तुम्ही मान्डलि असल्याने या नि:ष्कर्षास प्रतिवाद होणे अशक्य, पण तरीही...
मूळात रशिया "अरबी समुद्रावर स्वामित्व वा तत्सम हक्काकरिता" अफगाणिस्तानात घुसला हे गृहितकच चूक, व अमेरिकेने "सामरिकदृष्ट्या(?)" तशी भिती बाळगुन काही केले हे मानणेही चूक. रशियाच्या पोलादी पडद्या आड किती काय गन्जत होते ते कुर्झकिस्तान (हा उच्चार बरोबरे? अन्य तुकड्यान्ची नावे काय?) वगैरे मुस्लिमबहुल वा अन्यवन्शिकबहुल प्रान्त नन्तरच्या काळात रशियापासून फुटून वेगळे झाले यावरुन दिसलेच, फक्त सदरचा गन्ज काढण्याकरता तर रशियाने तेव्हा अफगाणिस्तानात सैन्य घुसविले नसेल ना ही शन्का शिल्लक रहातेच रहाते. अन अमेरिकेबाबत बोलाल, तर अमेरिका तेव्हाही अन आत्ताही कितीही बिगब्रदरचा आव आणत असली तरी त्यान्ची एकन्दरीत निर्णय घेणारी व अम्मलात आणणारी सिस्टिम आठदहा वर्षाच्या बालकापेक्षा जास्त अक्कलेची नाही हे माझे ठाम मत. एखाद्या हेकेखोर, हेकट, हावरट, केवळ स्वतःला काय हवे याचाच विचार करणारे व ते मिळविण्याकरता रडण्याभेकण्यासहित सर्व मार्ग अवलम्बिणारे, चिडक्या, रडक्या लहान पोराचे जे अन जसे हट्ट अस्तात, अन ते पुरवुन घेताना ते बालक जितक्या प्रकारे आक्रस्ताळेपणा करु शकते तसेच व तितकेच राजकीय चातुर्य आजवर अमेरिकेने दाखविले आहे.
अन तरीही मूळ प्रश्न शिल्लक रहातोच की अमेरिका वा रशिया, त्यान्च्या त्यान्च्या अक्कलेप्रमाणे काही वागली, तरी पाकिस्तानने स्वतःची अक्कल अमेरिकाचरणी (व सध्या चीनचे चरणी) गहाण का टाकली? असे कोणते तत्कालिक फायदे तेथिल राज्यकर्त्यान्ना भुलवित होते? भारतद्वेषाच्या किम्बहुना हिन्दू/काफिरद्वेषाच्याच बाळकडूतुन तयार झालेल्या पाकिस्तानातील जनतेला कितीकाळ त्याच बाळकडूच्या गुन्गीत ठेवायचे, व त्याचवेळेस, अमेरिकादिक बड्या राष्ट्रान्ना कसल्या मोहापायी आपल्या देशान्तर्गत बाबीत ढवळाढवळ करु द्यायची याचे भान पाकिस्तानातील राज्यकर्त्यान्ना राहिले नाही हे एक सत्य, व सदैव भारतद्वेषाच्या गुन्गीत असल्याने तेथिल जन्तेला राज्यकर्त्यान्चे "उपद्व्याप" लक्षातच आले नाहीत, व लक्षात येऊनही ते काही करू शकले नाहीत हे देखिल एक वास्तवच.

अर्थात, माझ्यामते, पाकिस्तानात काय किती होते हे बघतानाच, भारतात पाकिस्तानसारखे लष्करशहान्च्या हातात हात घालुन चालणारे सत्ताधारी नसले तरी "भ्रष्टाचाराचा भस्मासुर" अन्गी बाणवुन त्याप्रमाणे खा खा करीत वागणारे सत्ताधारी मुबलक आहेत, अन ते देशाला किती धोकादायक खड्यात घालणारे ठरलेत/ठरू शकतात हा आजच्या घडीचा आ वासून उभा असलेला प्रश्न आहे. Happy

अमेरिका वा रशिया, त्यान्च्या त्यान्च्या अक्कलेप्रमाणे काही वागली, तरी पाकिस्तानने स्वतःची अक्कल अमेरिकाचरणी (व सध्या चीनचे चरणी) गहाण का टाकली? असे कोणते तत्कालिक फायदे तेथिल राज्यकर्त्यान्ना भुलवित होते? भारतद्वेषाच्या किम्बहुना हिन्दू/काफिरद्वेषाच्याच बाळकडूतुन तयार झालेल्या पाकिस्तानातील जनतेला कितीकाळ त्याच बाळकडूच्या गुन्गीत ठेवायचे, व त्याचवेळेस, अमेरिकादिक बड्या राष्ट्रान्ना कसल्या मोहापायी आपल्या देशान्तर्गत बाबीत ढवळाढवळ करु द्यायची याचे भान पाकिस्तानातील राज्यकर्त्यान्ना राहिले नाही हे एक सत्य, व सदैव भारतद्वेषाच्या गुन्गीत असल्याने तेथिल जन्तेला राज्यकर्त्यान्चे "उपद्व्याप" लक्षातच आले नाहीत, व लक्षात येऊनही ते काही करू शकले नाहीत हे देखिल एक वास्तवच.
मी हेच म्हटले आहे. झिया व मुशर्रफ यांनी केवळ स्वार्थापायी अमेरिकेची कास धरली इथेच सारे चुकले. पण झियाच्या मूर्खपणाला ३५ वर्षे होऊन गेली (आणि मुशर्रफच्या ११) तरी अक्कल आलेली दिसत नाहींच!
आणि पाकिस्तानी जनताही हे सारे मुकाट्याने सहन करत आहे हेही आश्चर्यच!

दिनेशदा,
आपण स्वतंत्र झालो तेंव्हां आपल्याकडे तरी कुठे होती? पण आपण स्वाभिमानाने ती शक्ती आणली. त्यात आमच्या पिढीला खूप अडचणी सोसाव्या लागल्या. तांदूळ नाहींत तर कण्या खाणे, हलक्या प्रतीचा अमेरिकन गहू खाणे, कांहींही परदेशी वस्तू न मिळणे, कारखान्यांना स्पेअर पार्टसच्या आयातींसाठी अर्ज करायला लागणे, मग स्वतःच त्या तयार करणे अशा किती तरी गोष्टी सांगता येतील.
पाकिस्तानला सगळे आयते मिळण्याची सवय लागली तीच आजच्या परिस्थितीला कारणीभूत आहे व ती बदलायला आतूनच उर्मी आणणारे नेतृत्व त्यांच्यात निर्माण व्हायला हवे. पण हे् अवघडच दिसते.

सुधिर साहेब,

नेहेमी प्रमाणेच चांगला लेख.

पाकिस्तान प्रत्येक दशकाच्या सुरुवातीला क्रॉसरोड वर आलेला दिसतो.

म्हणजे तसा तो पुढे सरकतच नाही.

इतक्या वर्षात पाकिस्तानातून निर्यात झालेल्या वस्तूही फारशा दिसत नाहीत.
बासमती तांदूळ, आंबे, शान चे मसाले, काही रेडी मिक्सेस (यात बॉम्बे हलवा असतो), थोडे कपडे, सरबत
(रुह आफजा, चंदन) यापेक्षा जास्त काही नाही. पर्यटनाच्या जाहिराती पण दिसत नाहीत.
तिथल्या टिव्हीवर बँक, मोबाईल, बिस्किट्स, साबण.. अशाच जाहिराती दिसतात.
मग परकिय चलन मिळवायचे कसे ? त्यासाठी देशच विकायला काढलाय.

बासमती तांदूळ, आंबे, शान चे मसाले, काही रेडी मिक्सेस (यात बॉम्बे हलवा असतो), थोडे कपडे, सरबत
(रुह आफजा, चंदन) <<<< परदेशी रहाणार्‍या भारतीयानी मनात आणले तर हे ही बंद करू शकतात.. किंबहुना भारतावर हल्ला झाला २६/११ चा तेव्हा पासून बर्‍याच भारतीयांनी त्या देशाच्या वस्तूंवर स्वत: पुरती बंदी घालून घेतली आहे..

भारतावर हल्ला झाला २६/११ चा तेव्हा पासून बर्‍याच भारतीयांनी त्या देशाच्या वस्तूंवर स्वत: पुरती बंदी घालून घेतली आहे..
----- हे खरे आहे पण अशा बंदीचा काय फायदा ? वड्याचे तेल वांग्यावर असे तर होत नाही आहे ना ? ते पोटा पाण्यासाठी धंदा करत आहेत. त्या धंद्यामधे होणार्‍या फायद्याचा काही हिस्सा अशा कारवायांसाठी जातो आहे का ? तसे असेल तर बंदीला अर्थ आहे.

दिनेशदा

१०० % अनुमोदन !!

ईथे दबईतील पाकीस्तानी हॉटेलातून एकदा गुलाब जामून आणले होते. ते बनवताना वापरलेल्या प्राणीज तूपा
( Animal Fats) मुळे तोंडात घालता आले नाहीत. टाकून द्यावे लागले.

एकदा रुह अफझा ( खस) घेउन आलो, ते सुद्धा त्याच्या अती वासा मू ळे टाकून द्यावे लागले.

त्या धंद्यामधे होणार्‍या फायद्याचा काही हिस्सा अशा कारवायांसाठी जातो आहे का <<< आपण पाठवलेल्या पैशाचा नक्की काय उपयोग होतो ते अमेरिकेलाही कळायला वर्ष जावी लागली. Happy
देशाच्या विशिष्ट व्यक्तींना शोधून त्यांना आपले पैसे जाऊ नयेत एवढी शोधाशोध 'छोले मसाला' विकत घेणार्‍या व्यक्तीकडून अपेक्षित नसावी. तेव्हा सरसकट बहिष्कार हे एकमेव शस्त्र त्याच्या हाती उरते..

एकदम सही! इंडोनेशियात पाकिस्तानी माल मिळतच नाहीं. पण अमेरिकेतील "इंडियन" स्टोअर्स मध्ये मिळतो! पण मी कटाक्षाने घ्यायचे टाळतो.

किरण-जी,
मुत्सद्दीपणात पाक आपल्यापेक्षा सरसच धोरणे आखत आलेला आहे. पण जर स्वहितासाठी (मुशर्रफच्या शब्दात ground-realities बदलल्यामुळे) अमेरिकेला मदत केलेली असेल तर आज त्यासाठी अमेरिकेला पाक नेते कां दोष देतात? मुद्दा इतकाच आहे!
आपण अलिप्ततेचे धोरण राबविले व आपला कुणीच मित्र राहिला नाहीं. तर पाकिस्तान उघडपणे अमेरिकेच्या तबेल्यात उभा राहिला. पण अमेरिकेला व चीनला एकमेकांविरुद्ध खेळवत ठेवून आज तो दोघांशी उघडपणे शय्यासोबत करताना दिसत आहे!

एकन्दरीत निर्णय घेणारी व अम्मलात आणणारी सिस्टिम आठदहा वर्षाच्या बालकापेक्षा जास्त अक्कलेची नाही हे माझे ठाम मत. एखाद्या हेकेखोर, हेकट, हावरट, केवळ स्वतःला काय हवे याचाच विचार करणारे व ते मिळविण्याकरता रडण्याभेकण्यासहित सर्व मार्ग अवलम्बिणारे, चिडक्या, रडक्या लहान पोराचे जे अन जसे हट्ट अस्तात, अन ते पुरवुन घेताना ते बालक जितक्या प्रकारे आक्रस्ताळेपणा करु शकते तसेच व तितकेच राजकीय चातुर्य आजवर अमेरिकेने दाखविले आहे.

व्वा! Proud
चिडक्या, रडक्या लहान पोराचे
या ऐवजी गल्लीतल्या माजलेल्या दादासारखे म्हणा! अमेरिकेचे लोक स्वतःच्या जीवावर काय वाट्टेल ते करतात, जग नुसतेच रडणे चिडणे करत बसते, कारण कमालीच्या बाहेर दुर्बळ!!
तेंव्हा जग कितीहि बोंबलले, की अमेरिका करते ते चुकीचे आहे, तरी अमेरिकेला फरक पडत नाही!!

पण इथे प्रश्न पाकीस्तानचा आहे, अमेरिकेचा नाहीच.

देव करो नि पाकीस्तानी लोकांना सद्बुद्धि मिळो की भारताशी शत्रुत्व करण्यात अर्थ नाही. पाकीस्तान एक स्वतंत्र, स्वावलंबी राष्ट्र व्हावे यातच भारताचे हित आहे. हे भारताला माहित आहे, नि म्हणून ते मदत करतीलच. चीन नि अमेरिका केवळ स्वत:च्या करमणुकीसाठी पाकीस्तानशी खेळतात!

सुधिरजी - झियांच्या काळांतील परिस्थिती बद्दल मला जास्त माहिती नाही पण मुशर्रफ यांनी अमेरिकेला सोबत दिली त्याला ९-११ ची पार्श्वभुमी कारण आहे. बुशने मुठा दंडुकाच उगारला होता 'तुम्ही आमच्या सोबत आहात अथवा अतिरेक्यांसोबत' पर्यात तुम्ही निवडा.... वर रिचर्ड आर्मगेट यांनी आम्हाला मदत नाही केल्यास तुमच्या देशाला स्टोन एज ढकलले जाईल सुप्रसिद्ध धमकी दिलेली होती.

मुशर्र्फ यांना काही पर्याय शिल्लक ठेवलेला नव्हता. अर्थात त्यांनी किती साथ दिली हे जगाला माहित आहेच. ज्याच्या शोधासाठी बिलीयन डॉलर्स खर्च होत होते त्याला अगदी सुरक्षीत स्थळी लपवले होते. अनेक वर्षे तोरा-बोरा, स्वात आणि परिसरावर उच्च तंत्रज्ञान असलेले डोळे (सॅटेलाईटस) लावले होते... आणि ओसामा लष्करी मुख्यालयाच्या अगदी जवळ अनेक वर्षे पाहुणचार झोडत होता.... अनेक वर्षे. मी मुशर्र्फना दोष देणार नाही, त्यांनी फार मोठा मुत्संद्दी, चतुर पणा दाखवला आहे.

भारताने पाकिस्तान ला
Most Favoured Nation !! चा स्टेट्स दिलाच !

हल्ली प्रसिद्द झालेली बातमी ,

भारत सरकारच्या नवरत्न कंपनी GAIL पाकिस्तानसाठी नविन PROPOSAL दिलय !!

आपली दहेज- भटींडा गॉस पाईप लाईन पाकिस्तान पर्यंत नेणे. त्या पाईपलाई न द्वारे
पाकिस्तानला भारताने विकत घेतलेला अतिरीक्त Compressed Natural Gas (CNG) कमी किंमतीत
विकाणे

२०१६ सालात पाकिस्तान मध्ये गॉसची तिव्र टंचाई जा णवणार आहे असा पाकिस्तान सेंट्रल बाँकेचा अंदाज
आहे. पाकिस्तान मध्ये बोटीने आलेला विकत घेतलेला गॉस उतरवून घेणारी व्यवस्था सुद्धा नाही. याचा
जर पाकिस्तानला गॉस घ्यायचा असेल तर तो पाईप लाईननेच घ्यावा लागेल.

ईतके असून ही पाकिस्तानने हा PROPOSAL स्विकरला अस नाही.

भारताला ह्या उदारतेतुन काय साधायच आहे ?

माहिती स्त्रोतः
http://www.pakistantoday.com.pk/2012/03/22/news/profit/need-gas/?printTy...

उत्कृष्ठ लेख.

भारत पाकिस्तान मैत्री होणे शक्य नाही. कारण हाफिज सईद हा माणूस आणि वृत्ती संपली तरी पा़किस्तानातली इतर मंडळी तशी मैत्री होऊ देणार नाही. वाजपेयी बस मधून गेले होते तेव्हा आमच्यासारख्या अनेकांना भाबडे स्वप्न पडले होते की 'अहाहा!! आता शांतताच शांतता नांदणार!!! किती सुंदर!!!!" पण शेवटी काय झाले तो इतिहास आहे.

तेव्हा पाकिस्तान हा देश जगाच्या नकाशावरुन नष्ट करणे हा एकमेव उपाय आहे.

लेखाचा उद्देश लक्षात घेता आपल्याला पाकिस्तानची बाजू घेण्याची गरज नाही तसच त्या राष्ट्राचा तिरस्कार करूनही चालणार नाही. हल्लीचं जग अमेरिका केंद्रीत आहे. अमेरिका जशी विचार करते तसच जगाने विचार केला पाहीजे हे अमेरिकेचं धोरण आहे. त्यांचा विचार अर्थातच स्वार्थाचा आहे. अमेरिकेच्या दृष्टीने जे योग्य तेच योग्य हा खाक्या त्यांचा आहे. जोवर रशिया होता तोपर्यंत ती चूप होती. आपण अलिप्त राष्ट्राचम धोरण स्विकारलं हा एक स्वतंत्र विषय होईल. या विषयात तरी त्याने फारसा फरक पडणार नाही कारण रशियाशी आपली मैत्री होती.

मी मागच्या पोस्टमधे दाखवून दिलेय ज्याला आता कागदपत्रांचा आधार आहे, कि पाकिस्तानची ती लस्।करी दृष्ट्या गरज होती. भारताने प्रत्येक युद्धात पराभव केलेला असल्याने रशिया आणि भारत ही कात्री त्यांना अस्वस्थ करणारी होती ज्याचा फायदा अमेरिकेने घेतला. त्यात पाकिस्तान चुकीचे वागले असे म्हणता येत नाही. बांग्लादेश युद्धात अमेरिकन आरमार भारतावर हल्ला करण्यासाठी निघाले होते तेव्हां भारतानेही रशियाची मदत घेतली होती आणि बाका प्रसंग टळला होता. इथं अक्कल गहाण टाकणे वगैरे मुद्दे गैरलागू होतात. अमेरिका किंवा रशिया या बलाढ्य राष्ट्रासंमोर तेव्हां चीनसहीत कुणाचीही डाळ शिजली नसती.

आज जगातल्या जेव्हढ्या समस्या आहेत त्याच्या मुळाशी या दोन महासत्ताच आहेत. इराण - इराक संघर्षाला अमेरिका जबाबदार आहे. सद्दाम हुसेनला उभा अमेरिकेनेच केला आणि संपवलाही. संपवताना दिलेली कारणंही चुकीची आणि धादांत खोटी होती हे अमेरिकेतच लिहीलं गेलंय. तालिबान आणि अल कायदा ही अपत्येही अमेरिकेचीच आहेत.

हे सर्व करताना स्थानिक मदत कशी मिळेल हे त्यांनी पाहीलं. पाकिस्तानचं भौगोलिक महत्व जसं अमेरिकेने ओळखलं तसंच पाकिस्तानच्या लष्करानेही. त्यांनी रशिया भारत युतीला शह देण्यासाठी अमेरिकेला जवळ केलं. याचा मोबदला अंतर्गत प्रश्न दडपण्यासाठी आणि काश्मीरमधे फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी पुरेपूर वसुल केला. अमेरिका पाकला चुचकारत राहीली पण पाक अमेरिकेकडून काय वसूल करता येईल या विचारात राहीले. चीनचा लष्करी ताकद म्हणून उदय होतोय हे ध्यानात येताच त्यांनी पाक आणि चीनला एकाच वेळी खेळवत शह आणि काटशहाचे राजकारण केले. चीनशी विशेष जुळवून घेत त्यांना अरबी समुद्रापर्यंत रस्ता आ़खून दिला. आज चीनच माल थेट पाकिस्तानच्या बंदरात दाखल होतो.

रशियाला अरबी समुद्रावर वर्चस्व गाजवायचे होते असा उल्लेख माझ्या पोस्टमधे नाही. तसा त्याचा अर्थही नाही. जर रशिया ला अरबी समुद्रापर्यंतचा रस्ता मिळाला तर अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का पोहोचेल असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे.

जुन्या जेन्स डिफेन्स वीकली आणि वॉशिंग्टन पोस्टमधे यातली बरीचशी माहिती मिळी शकेल. नेमके अंक सांगण्यास मी असमर्थ आहे हे ही पोस्ट वाचताना लक्षात घ्यावे ही विनंती.

लेख चांगला आहेच, त्यानिमित्ताने चांगली चर्चा होते आहे.. !

>>> पाकिस्तान प्रत्येक दशकाच्या सुरुवातीला क्रॉसरोड वर आलेला दिसतो. <<<
हा वाक्प्रचार आवडला, पण अर्थच कळला नाही Proud (तरीही आवडला)
थोडसं अधिक विश्लेषण कराल का?

लिंबूकाका,
At the crossroads याला मला मराठी प्रतिशब्द/मराठी वाक्प्रचार आत्ता आठवला होता पण विसरलो Sad

काळे, अविनाश बिनीवाले यांच्या एका पुस्तकात त्यांनी एक विचार मांडलाय.
ब्रिटिशांनी ज्या कृत्रिम सीमारेषा आखल्यात, त्या पुसल्या तर पाकिस्तान, म्यानमारसकट भारत एकसंध भूभाग आहे.
त्यांनी नोंदवलेली एक साधी गोष्ट. या संपुर्ण भूभागात अन्न पुर्ण शिजवून खायची प्रथा
आहे. तसेच तांदळापासून लाह्या, कुरमुरे, पोहे हे प्रकार पूर्वाचल पासून म्यानमार मधे
पण आहेत. पण त्यापुढच्या थायलंड मधे मात्र नाहीत.
या कृत्रिम रेषांमुळे पूर्वभागातली जलवाहतूक गोत्यात आली व नंतर नष्टच झाली. कारण नदीचा एक तीर भारतात तर समोरचा परदेशात !
जर असे एकत्रीकरणाचे प्रयत्न झाले तर खरेच या भागाचा विकास होईल का ?
याची सुरवात झालेली नाही, पण तसा विचारही कुणी करत नाहीत. जगभरात एकीकरणाचे (जर्मनी) आणि अलग होण्याचे (रशिया) असे दोन्ही प्रयोग झालेले आहेत.

भारताने प्रत्येक युद्धात पराभव केलेला असल्याने रशिया आणि भारत ही कात्री त्यांना अस्वस्थ करणारी होती ज्याचा फायदा अमेरिकेने घेतला. त्यात पाकिस्तान चुकीचे वागले असे म्हणता येत नाही.
------ भारताने प्रत्येक युद्धात पराभव केला होता... पण भारताने ४८, ६५, ७१ कुठल्याही युद्धाचे आमंत्रण दिलेले नव्हते ना? पुढे कारगिल मधे पण कुरापत काढली... आता ७१ चा पराभव त्यांच्या लष्कराच्या वर्मी लागला होता (म्हणुन कारगिल झाले) असे सांगण्यात येते पण ४८, ६५ मधे कुठला घाव वर्मी लागला होता म्हणुन आधी कुरापत काढली गेली?

थोडे शहाण पणाने घेतले असते तर भारताचा मैत्रीचा हात नेहेमी आणि सदैव पुढे होता, एक बाजू तर हमखास शांत ठेवता आली असती...

आज परिस्थिती अशी आहे... भारत-पाक अनिच्छेने किंवा जगाच्या दडपणाने का असेना थोडे जवळ यायला लागले तर बाकीच्या अनेक शक्ती कार्यान्वित होतात आणि २६-११ सारख्या दुर्दैवी घटना घडतात, जेणे करुन दोन देशांत अविश्वास कायम राहिल. अटलबिहारी वाजपायी यांनी मैत्रीचा हात पुढे केला होता - ते पाक्-दौरा करत असतांनाच त्यांचे सैन्य कारगिलची मोहिम आखत होता... मैत्रीचे खोटे नाटक रंगवतांना भावी काळांत त्याची मोठी किंमत भारताला चुकती करावी लागते. थोडे जवळ येत आहेत नाही तोच २६-११ मग पुन्हा चर्चेला खिळ...

भारताने बोलणी करावी पण ज्यांच्याकडे काहीच अधिकार नाही अशा कढपुतळींशी का? ते साधे निर्णय घेण्यास समर्थ नाही आहेत. राजकीय व्यावस्थेने घेतलेले निर्णय २४ तासांत त्यांनाच फिरवावे लागतांत. मग अशा काहीच अधिकार नसलेल्या राजकीय व्यावस्थेशी चर्चेचे गुर्हाळ घालण्याचा भारताला उपयोग काय? (आम्ही मनापासुन चर्चा करु - तुम्ही कारगिल किंवा २६-११ सारख्या योजना आखता) चर्चाच करायची तर ज्यांच्या कडे सर्व सत्ता सुत्रे आहेत अशा आय एस आय आणि पाक लष्कराशी करावी.

Pages