भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!

Submitted by sudhirkale42 on 16 April, 2012 - 16:48

भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!

लेखक: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा "खासगी" भारत दौरा नुकताच आटोपला. ते सुप्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती यांच्या अजमेर येथील दर्ग्यावर प्रार्थना करायला आले होते. पण भारताच्या आणि पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांसाठी प्रेक्षकांकडून उच्चतम मूल्यांकन प्राप्त करून घेण्याची ही एक सुवर्णसंधीच होती. मग ते ती कशी सोडतील?

या दिवशी मी भारतात होतो व या भेटीचे वृत्त देणार्‍या एका भारतीय चित्रवाणीवर हमीद मीर नावाच्या एका सुप्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकाराची घेतली जाणारी मुलाखत पहात होतो. भारतीय वृत्तनिवेदिकेने भारताच्या दृष्टीने महत्वाचा पण मीर यांना अडचणीत टाकणारा एक प्रश्न विचारला. तिने विचारले कीं पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI ही हाफीज महंमद सईद याला गुप्तपणे समर्थन् देवून त्याचा भारताविरुद्धच्या कारवायांत एक शस्त्र म्हणून वापरत आहे हे खरे आहे ना? या प्रश्नाचे थेट "होय" किंवा "नाहीं" असे उत्तर न देता मीरसाहेबांनी नेहमीप्रमाणे अमेरिकेला दोष दिला. "सोविएत संघराज्याने अफगाणिस्तानचा ताबा घेतलेला असताना त्यांना हुसकून काढण्य़ासाठी CIA या अमेरिकन गुप्तचर संघटनेने मुजाहिदीनना (म्हणजेच अतिरेक्यांना) मदत केली होती" अशी कोल्हेकुईच त्यांनी केली!

हे उत्तर ऐकून मी तर थक्कच झालो! लहान मुले घाबरली कीं जशी आईच्या पदराआड लपतात तशी या नामांकित पत्रकाराला अशी CIA च्या "पदरा"आड लपायची काय गरज होती? रेगन यांनी अमेरिकन हितसंबंधांच्या फायद्यासाठी झियांना उद्युक्त केले होतेच, पण झियांना त्यांचे ऐकायची काय गरज होती? आणि झियांनी एकदा पाकिस्तानच्या (किंवा स्वत:च्या वैयक्तिक) हितांसाठी रेगन यांचे ऐकायचे ठरविले असेल तर त्याबद्दल अमेरिकेला आता कशाला दोष द्यायचा? अगदी हुबेहूब अशीच कारवाई ९/११ नंतर मुशर्रफ यांनीही केली होती व आज तेही अमेरिकेलाच दोष देतात. पण अमेरिकेची साथ देण्याचे त्यांच्यावर मुळीच बंधन नव्हते.

अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी मदतीसाठी आणि स्वत:चे खिसे भरण्यासाठी हे पाकिस्तानी नेते डोळे उघडे ठेऊन अमेरिकेच्या कच्छपी लागले मग आता अमेरिकेला दोष कशाला? अशा धोरणामुळे पाकिस्तानने स्वत:ला एकाद्या भाडोत्री गुलामाच्या पातळीवर उतरविले आहे हे नक्की. पकिस्तान आज कुठल्याही सदसद्विवेकबुद्धीच्या टोचणीकडे दुर्लक्ष करून अशी कुणाचीही युद्धे "चार कवड्या खिशात पडाव्यात" म्हणून लढत आहे हेच चित्र डोळ्यासमोर उभे रहाते! खरे तर मीरसाहेबांनी या संधीचा उपयोग करून घेऊन हे खरे पण काळेकुट्ट चित्र लोकांसमोर ठेवायला हवे होते.

पाकिस्तान जोपर्यंत आपला खर्च स्वत: कमावलेल्या पैशातून करत नाहीं आणि जोवर तो अमेरिकेच्या (आणि आता चीनच्याही) मदतीवर अवलंबून रहातो तोपर्यंत तिची परिस्थिती आज आहे तशीच राहील किंवा ती आणखीच बिघडेल.

पाकिस्तानचे मुलकी सरकार जेंव्हां आपले सरकार पूर्णपणे स्वत:च्या हिमतीवर करेल, आपल्या सैन्याला त्यांच्या बराकीत पाठवेल, मुल्ला-मौलवींना मशीदींत किंवा मद्रासांत पाठवेल व त्यांच्या कारवाया धर्मापुरत्याच मर्यादित करेल आणि लष्कराच्या दादागिरीविरुद्ध हिमतीने उभे राहून देशाचा कारभार पाकिस्तानी जनतेच्या हितासाठी आणि भरभराटीसाठी हाकेल तेंव्हांच पाकिस्तानचा उत्कर्ष होईल. भारत अशा बदलाची आशेने वाट पहात आहे आणि हे बदल शक्य व्हावेत म्हणून लागेल ती मदत भारत नक्कीच करेल यात शंका नाहीं.

"जकार्ता पोस्ट" या येथील इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या (http://www.thejakartapost.com/news/2012/04/10/letter-why-hide-behind-cia...) माझ्या याच अर्थाच्या पत्राला फराज आणि पीटर या दोन वाचकांनी दिलेला प्रतिसाद खालील दुव्यावर वाचता येईल.

http://www.thejakartapost.com/news/2012/04/12/letter-on-pakistan-and-ind... .

खरे तर माझ्या पत्राच्या शेवटच्या परिच्छेदातील माझ्या पाकिस्तानबद्दलच्या मित्रत्वाच्या भावना त्यांच्या लक्षातच आलेल्या दिसत नाहींत. भारत व पाकिस्तान हे "स्वाभाविक भाऊ-भाऊ" असून त्यांनी आपापसातले मतभेद मिटवून प्रगतीच्या आणि भरभराटीच्या मार्गाने पुढील प्रवास करावा या माझ्या भावना त्यांना जाणविल्याच नाहींत असे खेदाने म्हणावेसे वाटते. याच भावनेपोटी मी "भारताला शत्रू समजणे पाकिस्तानी जनतेने थांबवावे" या नवाज शरीफ यांच्या वक्तव्याची तरफदारी मी माझ्या "जकार्ता पोस्ट"मधील पत्रात केली होती. (http://www.thejakartapost.com/news/2011/05/27/letter-india-pakistan-have...) सध्याचे मुलकी सरकार भारताशी मैत्रीचे संबंध स्थापण्यास उत्सुक आहे पण ज्या लष्कराची खोटी ऐट भारताबरोबरच्या शत्रुत्वावरच अवलंबून आहे व ज्या लष्कराला (त्याने अद्याप एकही युद्ध जिंकले नसूनही) स्वत:ला "पाकिस्तानचे पालनहार" असे म्हणवून घेताना कसलाच संकोच वाटत नाहीं असे हे पाकिस्तानी लष्कर व त्याची गुप्तचर संघटना (ISI) भारतची आणि पाकिस्तानची मैत्री सद्य परिस्थितीत कदापीही होऊ देणार नाहीं.

जरदारी आणि नवाज शरीफ हे दोघेही पाकिस्तानचे द्रष्टे नेते आहेत. पण स्वत:ला रोमेल किंवा गुडेरियन[१] समजणार्‍या पाकिस्तानी लष्करशहांना भारताबरोबरचे वैर चालूच ठेवावेसे वाटते. पाकिस्तानी लष्करशहांच्या व अतिरेक्यांच्या हस्ते जरदारींनी खूप सोसले आहे. पाकिस्तानी लष्करशाहांनी जरदारींना अनेक वर्षें कैदेत टाकले होते तर त्यांच्या पत्नी बेनझीर यांचा तर अतिरेक्यांच्या गोळीने मृत्यू घडला. जरदारी हे एक चांगल्या स्वभावाचे गृहस्थ वाटतात. २६/११ च्या "मुंबई शिरकाणा"नंतर जरदारींनी आपल्या ISIच्या मुखियाला त्या शिरकाणाचा नीट तपास करून, त्यामागच्या पाकिस्तानी हस्तकांना वेचून काढून शिक्षा करविण्यासाठी दिल्लीला जायची आज्ञा दिली होती. पण त्याने ही आज्ञा धुडकावून लागली असावी कारण जरदारींना त्याबद्दल मखलाशी करून आपली आज्ञा बदलावी लागली होती. पाकिस्तानमध्ये खरोखर राज्य कोण करतो याची कल्पना मात्र या घटनेवरून सार्‍या जगाला पुन्हा एकदा दिसली.

इतकेच काय पण ISI चे त्यावेळचे मुखिया पाशा यांनी सध्या सुरू असलेल्या कुप्रसिद्ध "मेमोगेट" प्रकरणात आपल्या सांविधानिक बॉस असलेल्या जरदारींचा हात होता हे सिद्ध करण्यासाठी सरकारची परवानगी न घेता लंडनला भरारी मारली होती! जय हो!

पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी मुलकी सरकार किती दिवस टिकेल हे त्यांचा सेनाप्रमुख ठरवतो तर आपल्याकडे आपले संरक्षणमंत्री आपल्याच सेनाप्रमुखाच्या वयाचे भूत विनाकारण उभे करून त्यांना एक वर्ष आधीच सेवानिवृत्त करतात. किती फरक आहे या दोन देशांत!

अमेरिकेच्या CIA संघटनेने अमेरिकेच्या राष्ट्रीय हितापोटी पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने अतिरेकी कारवायांना मदत देऊ करून एक विषवृक्ष लावला यात शंका नाहीं. जुल्फिकार अली भुत्तोंना लुटपुटीच्या खटल्याच्या आधाराने फासावर चढविलेल्या झियाला अख्या जगात कुणीही चाहता उरला नव्हता! म्हणून त्यांने या संधीचा फायदा घेऊन आपली प्रतिमा उजळ करून घेतली व रेगन यांच्या मांडीला मांडी लावून "व्हाईट हाऊस"मध्ये पुख्खाही झोडला! शिवाय स्वत:ची सत्ता बळकट करण्यासाठी झियाने लष्करातील व लष्कराबाहेरील धर्मवेड्या जिहादी वृत्तीच्या अतिरेक्यांना जवळ करून पाकिस्तानी राजकारणात प्रथमच धर्म आणला. यामुळेच आज झिया हे पाकिस्तानातील सर्वात जास्त तिरस्कृत नेते मानले जातात!

आज हेच अतिरेकी आपल्या जन्मदात्या ISI च्या मुख्यालयांवर हल्ला करायला मागे-पुढे पहात नाहींत!

माझ्या "एक्सपोर्ट सरप्लस" या शीर्षकाच्या जकार्ता पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या पत्रात मी हाच मुद्दा अधोरेखित केलेला आहे. (http://www.thejakartapost.com/news/2009/12/15/letters-export-surplus039....) ISIच्या मुख्यालयावरील हल्ला आणि मेहरान नाविक तळावरील अतिरेक्यांचा हल्ला ही याचीच उदाहरणे आहेत!

अफगाणीस्तानातील युद्ध थांबल्यावर मुशर्रफ यांनी याच प्रशिक्षण मिळालेल्या, कडव्या जिहादींना जम्मू-काश्मीर विभागात मोकाट सोडले व आपल्या सैन्याला खूपच हैराण केले. या बद्दलचा वृत्तांत Nuclear Deception या पुस्तकात वाचायला मिळेल. (मी हे पुस्तक कोळून प्यालेलो आहे!)

हाफिज सईद ही आता एक "व्यक्ती" राहिली नसून ती एक "विचारसरणी" झालेली आहे व तिने पाकिस्तानचा संपूर्ण विनाश करण्याआधी पाकिस्तानने स्वत:च त्या विचारसरणीचा कायदेशीर मार्गाने विनाश करायची गरज आहे. त्यासाठी भारताकडे पुरावे मागणे हास्यास्पद आहे. भारताच्या आर्थिक राजधानीवर झालेल्या हल्ल्याचा तो सूत्रधार होता म्हणून जरी भारत त्याला शिक्षा करण्याची मागणी करत असला तरी स्वत:च्या हितासाठी अशा व्यक्तीलाच नव्हे तर या विचारसरणीला मुळापासून उपटून टाकण्याची पाकिस्तानलाच गरज आहे. पण लष्कराचा भक्कम पाठिंबा असलेल्या सईदला बोट लावायचीही हिंमत पाकिस्तानचे मुलकी सरकार दाखवेल असे वाटत नाहीं.

शेवटी राहिला पाकिस्तानने भारताला "सर्वात जास्त प्राधान्य असलेला देश (Most Favoured Nation or MFN)" हा दर्जा देण्याबाबतचा करार. हा दर्जा भारताने पाकिस्तानला १९९६ सालीच देऊ केलेला आहे! पण पाकिस्तानला आतापर्यंत तो स्वीकारायचा धीर होत नव्हता कारण त्यांना पाकिस्तानी बाजारपेठ भारतीय मालाने भरून जाईल व पाकिस्तानच्या उद्योगावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल अशी भीती वाटत होती. पण आज या दोन देशातील चलनाच्या (१ डॉलरला ९१ पाकिस्तानी रुपये विरुद्ध ५१ भारतीय रुपये) विनिमयाच्या दरातील फरक पहाता हा करार स्वीकारण्यात पाकिस्तानचाच जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. मग त्यात पाकिस्तानने तोरा मिरविण्याचे काय कारण?

आता पीटरसाहेबांच्या मुद्द्यांकडे वळू या. काश्मीरच्या बाबतीत मी एवढेच म्हणेन कीं तिथल्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याच्या गीलानीसारख्या फुटीरवादी नेत्यांच्या आवाहनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून काश्मिरी जनता प्रत्येक निवडणुकीत हिरीरीने भाग घेत आलेली आहे. तिथल्या अगदी अलीकडील मतदानाच्या टक्केवारीचे प्रमाण भारताच्या इतर प्रांतातील टक्केवारीच्या दीडपट असलेले दिसून आलेले आहे. आता काश्मिरी जनतेच्या इच्छा काय आहेत याबाबत आणखी काय आणि कशाला बोलायचे? खरे तर पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI ने जर काश्मीरमध्ये लुडबुड करणे सोडून दिले तर दोन्ही देशांत शांतता नांदेल. पण मग पाकिस्तानी लष्कराचा "पाकिस्तानचा पालनहार" म्हणवून घ्यायची ऐटच संपेल व स्वत:चे असे अवमूल्यन झालेले पाकिस्तानी लष्कर स्वीकारेल काय?

मी तर फराज आणि पीटर यांना कामरान शफी व आयाज अमीर यांचे लेखन आणि "न्यूक्लियर डिसेप्शन" हे पुस्तक वाचायचा सल्ला देईन.

आपण आदर्श लोकशाही राबवतो असा दावा भारताने कधीच केलेला नाहीं. पण स्वातंत्र्य मिळाल्यापासून-इंदिरा गांधींनी दीड-एक वर्षांसाठी लादलेली आणीबाणी वगळता-भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणून राहिला आहे याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे आणि पाकिस्तानही एक लोकशाही राष्ट्र म्हणून अभिमानाने उभे राहील आणि भारताबरोबर मैत्रीचे संबंध ठेवील अशी आशाही आहे. भारताने लोकशाही राबविली आहे फक्त ६० वर्षांसाठी. भारत अजूनही लोकशाही मार्गाने सरकार कसे सुसूत्रपणे चालवायचे हे शिकतोच आहे. म्हणून भारताच्या लोकशाहीची अमेरिका किंवा इंग्लंडच्या लोकशाहीशी तूलना करणे अयोग्यच ठरेल.

भारताची राज्यघटना भारतीय न्यायसंस्थेला संपूर्ण स्वातंत्र्य देते हे पीटरसाहेबांना माहीत असेल अशी मला आशा आहे. आम्हाला या गोष्टीचा अभिमानही आहे. पाकिस्तानचे सध्याचे सरन्यायाधीश चौधरी यांनी मुशर्रफ यांच्या हुकुमशाहीविरुद्ध दाखविलेल्या धैर्याचे आम्हाला नक्कीच कौतुक आहे, पण त्यांच्यासमोर ज़रदारींच्या स्विस बॅंकेतील पैशावरून पंतप्रधान गिलानींविरुद्ध चाललेला खटला किंवा ’मेमोगेट’ खटला हे तर त्या न्यायसंस्थेचे वाभाडेच आहेत.

शेवटी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते! जरदारींनी अजमेरच्या दर्ग्याला पाच कोटी (पाकिस्तानी) रुपयांची देणगी जाहीर केली. ही संपत्ती त्यांनी आपल्या लागोपाठ दोन वर्षे "न भूतो न भविष्यति" अशा पुराने ग्रस्त झालेल्या आपल्या जनतेच्या कल्याणार्थ वापरायला हवी होती असे मला वाटते. अजमेरचा दर्गा घातपाती कारवायात नक्कीच सामील नसेल, पण परोपकारार्थ (charity) जमा केले गेलेले पैसे अतिरेकी कारवायांसाठी वापरण्याची प्रथाच पाकिस्तान, अफगाणिस्तान य देशांत रूढ झालेली आहे! त्या पार्श्वभूमीवर या पैशांचा विनियोग नको त्या कामात होणार नाहीं ना अशा शंकेची पाल प्रत्येक भारतीयाच्या मनात नक्कीच चुकचुकेल!

-----------------------------------------------------

[१] रोमेल व गुडेरियन हे दुसर्‍या जागतिक महायुद्धात गाजलेले जर्मन सेनानी! या सुप्रसिद्ध सेनानींचे नांव देऊन पाकिस्तानी लष्करशहांची अशी रेवडी माझे आवडते पाकिस्तानी स्तंभलेखक कामरान शफी अनेकदा करतात.

-----------------------------------------------------

गुलमोहर: 

भारताने प्रत्येक युद्धात पराभव केलेला असल्याने रशिया आणि भारत ही कात्री त्यांना अस्वस्थ करणारी होती ज्याचा फायदा अमेरिकेने घेतला. त्यात पाकिस्तान चुकीचे वागले असे म्हणता येत नाही.
------ भारताने प्रत्येक युद्धात पराभव केला होता... पण भारताने ४८, ६५, ७१ कुठल्याही युद्धाचे आमंत्रण दिलेले नव्हते ना? पुढे कारगिल मधे पण कुरापत काढली... आता ७१ चा पराभव त्यांच्या लष्कराच्या वर्मी लागला होता (म्हणुन कारगिल झाले) असे सांगण्यात येते पण ४८, ६५ मधे कुठला घाव वर्मी लागला होता म्हणुन आधी कुरापत काढली गेली?

कुरापत कुणी काढली हा एक वेगळा विषय होईल. त्याचा रशिया - भारत कात्रीशी संबंध आहे असं वाटतंय का ? अमेरिका पाक मैत्रीची कारणे आणि त्याचे परिणाम इतकंच बोलूयात.

>>भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!<<
थोडक्यात भारताविरोधी 'दहशतवादी' कारवायांचे समूळ उच्चाटनाची गरज. सहमत.
पण मुळात 'हाफिज सईद- "विचारसरणी आणि पाकिस्तान वेगळे असल्याचे कशाला भासवताय?
पाकिस्तान निर्मिती त्वरित व्हावी यासाठी त्याकाळी कुप्रसिद्ध "डायरेक्ट अ‍ॅक्शन" या दहशतवादी पद्धतीतून त्याची निर्मिती झाली ते विसरलात कि काय?

पुन्हा तेच भाबडेपण! पाकिस्तानी लष्कर तेथील जनतेतूनच येते ना? कि अमेरिका वा चीनमधून?जीनांनंतर जनतेचा पाठिंबा आहे म्हणूनच लष्कर सर्व सत्ताधीश आहे. जशी प्रजा तसा त्यांचा राजा.
उदाहर्णार्थ : दहशदवादाच्या इतक्या जखमा सोसुनही अफजलगुरु आणि कसाब यांना जिवंत ठेवण्यास वा काष्मिरातील हिंदुंना निर्वासित होऊ देण्यास आपल्या येथील जनतेचा फारसा विरोध आहे असे दिसत नाही असाच निष्कर्ष निघतो. विरोध असता तर कांद्याच्या भावावरून सरकार पाडणार्‍या जनतेने या हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या या प्रश्नांवरून सरकार खाली खेचले नसते का? आपल्याकडेही जशी प्रजा तसा राजा हाच नियम आहे. दोन्हीकडे नियम तोच!
>>जरदारी आणि नवाज शरीफ हे दोघेही पाकिस्तानचे द्रष्टे नेते आहेत. पण स्वत:ला रोमेल किंवा गुडेरियन[१] समजणार्‍या पाकिस्तानी लष्करशहांना भारताबरोबरचे वैर चालूच ठेवावेसे वाटते.<<
रोमेल वा गुडेरियन हे हितलरचे फक्त सेनापती होते. हिटलरची आज्ञा त्यांना मानावीच लागे. त्याकाळात जर्मन लोकांचा , कशा का प्रकारचा असेना, पाठिंबा होता म्हणूनच हिटलर सत्तेवर आला.
उपयोग काय भारताला या तथाकथित द्रष्ट्यांचा, कि जे निव्वळ बुजगावणी आहेत?
गेली साठ वर्षांपासून (पकिस्तानी लष्कर + आयेसाय) हिटलरप्रमाणे सर्वसत्ताधीश असते. झरदारींना फक्त त्यांचे क्रिकेटर्स, गायक वगैरे कलाकार, त्यांचे उत्पादन यासाठी भारतीय बाजारपेठ मिळवून त्यांची पोटे भरण्याची तरतूद करण्यासाठी पाठवलेले असतात. त्यात ते बहुतांश यशस्वीपण होतात. दहशतवादी कारवाया चालूच राहातात. अजमेरला चादर चढवण्याचा कार्यक्रम 'सौ चूहे खाके बिल्ली चली हाजको' प्रकारात मोडतो.
>>भारताने बोलणी करावी पण ज्यांच्याकडे काहीच अधिकार नाही अशा कढपुतळींशी का? ते साधे निर्णय घेण्यास समर्थ नाही आहे>>
उदय यांचेशी १०००% सहमत!

>>> भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!

एकट्या हाफिज सईदला नष्ट करून काय होणार? तिथे सगळेच हाफिज सईद आहेत. त्यामुळे भारत्-पाक मैत्री ही अशक्य आहे. भारत व पाकिस्तान मित्र होऊ शकतील हा भाबडा विचार आहे. तो कधीही प्रत्यक्षात येऊ शकणार नाही.

पाकिस्तान हा देश जगाच्या नकाशावरुन नष्ट करणे हा एकमेव उपाय आहे.
म्हणजे नक्की काय करायचे? तिथले सर्व लोक मारून टाकायचे? की त्यांना भारतात सामावून घ्यायचे?

अरे देवा!! आहेत ते अल्पसंख्य मुसलमान नीट सांभाळता येत नाहीत, त्यात हे जन्मभर भारतविरोधी असलेले, भारतावर राज्य मिळवू पहाणारे लोक भारतात येऊन भारताचे कायदे पाळतील? अहो खुद्द भारतीय लोकांना साधे वहातुकीचे कायदे पाळता येत नाहीत, त्यांची अंमलबजावणी करता येत नाही, तिथे सूडाने भारलेले हे लोक कसले कायदे पाळणार नि त्यांना शिक्षा कोण करणार? (मुलायम सिंघ, अरुंधति रॉय हे तर देश बुडवायलाच निघाले आहेत, त्यांना सशस्त्र मदत!!) सबंध देशाची वाट लावतील!! स्वतःचे भले काय हेच ज्यांना कळत नाही, त्यांना स्वर्गात पाठवले तर ते स्वर्गाचाहि नरक करतील!

त्यापेक्षा आपल्या सीमा सुरक्षित ठेवा, त्यांच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवा, पण त्यांना तिथेच राहू दे.

अमेरिकेने (म्हणजे फक्त चेनी, इ. लोकांनी ) regime change नावाची, मध्यपूर्व देशांना लोकशाही बनवण्याची कल्पना काढली होती, त्याचे काय वाट्टोळे झाले, नि अमेरिकन जनतेचे काय हाल झाले ते पहाता आहात ना?
तुम्ही तसले करू नका, जमेल तेव्हढी मदत करा! कदाचित खायला प्यायला मिळाल्यावर त्यांना काही उद्योगधंदे सुरु करण्याचे सुचेल. भारतात नाही का, थोडे पैसे आल्यावर लगेच केव्हढी तरी प्रगति झाली!

प्रिय सुधीरजी,
आपला मूळ मुद्दा -
हाफिज सईद ही आता एक "व्यक्ती" राहिली नसून ती एक "विचारसरणी" झालेली आहे व तिने पाकिस्तानचा संपूर्ण विनाश करण्याआधी पाकिस्तानने स्वत:च त्या विचारसरणीचा कायदेशीर मार्गाने विनाश करायची गरज आहे. त्यासाठी भारताकडे पुरावे मागणे हास्यास्पद आहे. भारताच्या आर्थिक राजधानीवर झालेल्या हल्ल्याचा तो सूत्रधार होता म्हणून जरी भारत त्याला शिक्षा करण्याची मागणी करत असला तरी स्वत:च्या हितासाठी अशा व्यक्तीलाच नव्हे तर या विचारसरणीला मुळापासून उपटून टाकण्याची पाकिस्तानलाच गरज आहे. पण लष्कराचा भक्कम पाठिंबा असलेल्या सईदला बोट लावायचीही हिंमत पाकिस्तानचे मुलकी सरकार दाखवेल असे वाटत नाहीं. .
ज्या राष्ट्राचा उदय धर्माधिष्ठित भारत द्वेषावरील संकल्पनेतून झाला आहे त्या राष्ट्राच्या विचारसरणीतला हा सईद सध्याची कडी आहे. म्हणून आपल्या कथनावर जिओ-पोलिटिकल पवित्रे त्या त्या काळी का व कसे चूक वा बरोबर याचा पुनःपुन्हा उच्चार ही वाळली चर्चा ठरते.
जे निर्मूलन कदापीही शक्य नाही ते स्वतः पाकिस्तानने करावे अशी अपेक्षा बाळगून आपण म्हणजे ते सोडून अन्य जग वागत आहोत, आता आपल्या म्हणजे फक्त भारत नव्हे सर्वराष्ट्रांनी त्यातल्या त्यात इझराईल अमेरिका व भारत या तीन धर्मपंथांच्या प्रमुक राष्ट्रे वेळीच आपापल्या विचारसरणीत योग्य तो बदल घडवणार कि नाही हा कळीचा मुद्दा आहे.
मुस्लिम जनमताचा कानोसा म्हणून बीबीसीने तयार केलेली 'पाकिस्तानचे डबल स्टँडर्ड ही" चित्र फित युट्युबवर पाहिली. तेथे प्रत्येक मुस्लिम आणि त्यातल्यात्यात पाकिस्तानी विचारवंतांनी(?) तोडलेले तारे वाचून सामान्य पाकिस्तान्यांना भारताबरोबर संबंध सामान्य करायची 'प्यास' लागली आहे आदि वक्तव्ये किती तकलादू आहेत याची कल्पना येते. अमेरिकन व युरोप - मुस्लिम लोकांनी ही त्यांच्या प्रतिसादात अल्ला धार्जिणी वक्तव्ये करून 'हम भी कुछ कम नहीं' असे दाखवून दिले. शिवाय अर्वाच्च व शिवराळ भाषेतील शिवीगाळ तर विचारायलाच नको.
अवांतर - आपल्या पुणे भेटीत गाठ घेता आली तर आवडेल.

>>पाकिस्तान हा देश जगाच्या नकाशावरुन नष्ट करणे हा एकमेव उपाय आहे.
म्हणजे नक्की काय करायचे? तिथले सर्व लोक मारून टाकायचे?

हो झक्की. तिथले सर्व लोक मारून टाकायचे. सर्वनाश करायचा. खल्लास!!

>>पाकिस्तान हा देश जगाच्या नकाशावरुन नष्ट करणे हा एकमेव उपाय आहे.
म्हणजे नक्की काय करायचे? तिथले सर्व लोक मारून टाकायचे?

हो झक्की. तिथले सर्व लोक मारून टाकायचे. सर्वनाश करायचा. खल्लास!!
------ असे म्हणणे योग्य नाही... Sad

जर सर्वनाश केला तर मग मैत्री कुणाशी करणार ? भारत - पाक मैत्री हा बाफचा विषय आहे, कितीही नाकारले तरी ते आपले शेजारी आहेत हे सत्य कुणी बदलू शकत नाही.

व्यक्ती तितकी मते हे तर खरंच पण भारताबरोबर मैत्री करण्याखेरीज पाकिस्तानला गत्यंतरच नाहीं असे मला वाटते. पण तिथल्या कांहीं लोकांना, खास करून खाकी गणवेषातल्या, अशी जवळीक पसंतच नाहीं. कारण मग त्यांचे महत्व कमी होईल ना? जरा कुठे संबंध सुधारू लागले कीं या लोकांचा पोटशूळ बळावतो! लगेच एकादा लोकसभेवरील हल्ला किंवा २६/११ चा नरसंहार घडवून आणला जातो आणि त्या मैत्रीत खोड निर्माण करायचे प्रयत्न केले जातात! आपणही अशा कटांना बळी पडतो!!
पण दूरदृष्टीने विचार केल्यास आता जरा वेगळी कृती करायची, वेगळे डावपेच आखायची वेळ आली आहे असे मला वाटते. पण यासाठी आपल्या सर्व राजकीय पक्षांना एकसंध होऊन त्यांच्यात मतैक्य होण्याची गरज आहे. शिवाय मतांसाठी अल्पसंख्यांकांचा अनुनय करण्याचे धोरणही सर्व राजकीय पक्षांनी एकमताने सोडले पाहिजे, पण अशी परिपक्वता आपल्या राजकीय नेतृत्वात आहे काय? आज तरी असे वाटत नाहीं!
बाकी कांहींही असो, पण पाकिस्तानबरोबर लढणे थांबवून तो पैसा विकासकार्यात खर्च करायची गरज दोन्ही बाजूंना जाणवू लागली आहे व त्यातूनच मैत्रीचे पुढील पाऊल पडेल यात शंका नाहीं.
हळूहळू अर्थकारण राजकारणावर कुरघोडी करत आहे!

ओकसाहेब,
हळूहळू अर्थकारण राजकारणावर कुरघोडी करत आहे!
पुण्यात आलो कीं जरूर भेटू या. मलाही आवडेल. मी ७८आणि ८ जूनला पुण्यात आहे. बघू कसा वेळ मिळतो ते!

किंवा २६/११ चा नरसंहार घडवून आणला जातो आणि त्या मैत्रीत खोड निर्माण करायचे प्रयत्न केले जातात! आपणही अशा कटांना बळी पडतो!!
----- आपण अशा कटांना बळी पडतो म्हणजे नक्की काय ? असे कितीही हल्ले झाले तरी मैत्री संबंधांवर त्याचा काडीचाही परिणाम होणार नाही असे २६-११ नंतर जाहिर करायचे होते आणि तसे वागायचे होते का ? हद्द म्हणजे तत्कालीन पाक राजकीय नेतृत्वाने कसाब हा पाकचा नागरिक आहे हे अनेक महिने मान्य केले नव्हते. आम्हाला पुरावे द्या, पुरावेच दिले नाहीत, देलेले पुरावे अपुरे आहेत असे एक नाही शंभर अडमुठ्या आणि संपुर्ण नकारात्मक चाली खेळणे सुरु ठेवले होते. तपास कामात मदत करण्यासाठी पाशा यांना पाठवतो असे म्हणणार्‍या पाक पंतप्रधानांना २४ तासांत माघार घ्यावी लागली होती.

क्रिकेट सामन्याच्या वेळी पाक पंतप्रधान भारतात आले होते.... चांगला रंगतदार सामना झाला (सामना फिक्स होता हा भाग वेगळा :स्मित:) सामना संपल्यावर सायंकाळी पाकच्या कर्णधाराने भारताची, येथील आदरतिथ्याची तोंड भरुन स्तुती केली... पण हेच मत दुसर्‍या दिवशी पाक मधे गेल्यावर संपुर्ण पणे बदलले होते.... you tube वर दोन्ही वक्तव्यांची चित्र फित आहे. सुत्रधार कोण आहे?

मैत्री व्हावी हे दोन्ही बाजूंना वाटायला हवे असते.... निव्वळ भारताला तसे वाटुन काय उपयोग? भारत भलेही गिलानी -झरदारी यांच्यावर १०० % विश्वास ठेवेल, पण त्यांच्या देलेले आश्वासन पुर्ण करण्याच्या क्षमते बद्दल त्यांना स्वत: लाच खात्री देता येत नसेल तर उपयोग काय ?

भारताबरोबर मैत्री करण्याखेरीज पाकिस्तानला गत्यंतरच नाहीं असे मला वाटते.
मलाहि.
पण पाकीस्तान्यांना कळत नाही ना!
नि त्याचा त्रास भारताला सहन करावा लागतो. म्हणून आता भारतानेच काही पावले उचलली पाहिजेत.
पण तिथल्या सगळ्या लोकांना मारून टाकावे असल्या बोलण्यात काही अर्थ नाही असे हि मला वाटते.
भारतातले लोक हुषार आहेत, त्यांना उच्च संस्कृतीचा वारसा लाभला आहे, जगाला योग्य दिशेने वाटचाल करायची दिशा भारतच दाखवू शकेल.

उदय-जी आणि झक्की-जी,
असे कितीही हल्ले झाले तरी मैत्री संबंधांवर त्याचा काडीचाही परिणाम होणार नाही असे २६-११ नंतर जाहिर करायचे होते आणि तसे वागायचे होते का ?
एक जुनी घटना आठवली.
पूर्वी फ्रांस्वा मितराँ (फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष) ऑस्ट्रेलियाला गेलेले असताना पॅरीसमध्ये अनेक ठिकाणी बाँबहल्ले घडवून आणण्यात आले. साहाजीकच मितराँनी त्यावेळच्या पंतप्रधानांबरोबर (नाव आठवत नाहीं) या घटनेची चौकशी केली व "मी ताबडतोब परतू काय?" असे विचारले. त्याला उत्तर देताना पंतप्रधानांनी त्याना असे न करण्याचा सल्ला दिला कारण ते म्हणाले कीं असे केल्यास दहशतवाद्यांचा विजय झाल्यासारखे होईल व तेच तर दहशतवाद्यांन हवे आहे. त्यानुसार मितराँनी आपला दौरा अर्ध्यावर न सोडता तो ठरल्याप्रमाणे पूर्ण केला.
असे ठामपणे सांगून जर आपण वाटाघाटी चालू ठेवल्या तर एक नवा अध्याय लिहिल्यासारखे होईल व त्याचा चांगलाच परिणाम होईल. कांहीं लोक आरडा-ओरडा करतील, पुटपुटतील, पण तिकडे लक्ष न देता जर आपला मार्ग ठामपणे चालू ठेवला तर ते पाऊल म्हणजे ISIच्या 'कानाखाली वाजविल्यासारखे'च ठरेल.
माझ्या मते उघडपणे कारण सांगून असे केले तर एक नवे पान उलटल्यासारखे होईल.
पण त्याचबरोबर अफजल गुरूसारख्यांना ताबडतोब फाशी देणे, कसाबवरचा खटला fast track court मध्ये चालविणे अशी आपल्या पूर्णपणे हातात असलेली पावले टाकली पाहिजेत.

सुधिर साहेब मला तुमचे म्हणणे समजत आहे, पण त्याला साथ द्यायला समर्थशाली, आणि भारता बद्दल सहानभुती किंवा मित्रत्वाची ओढ असणारी राजकीय व्यावस्था पाकमधे असायला हवी.

जेव्हा काही महिने कसाब आमचा नागरिकच नाही हे पालपुद आणि त्याच वेळी त्याच्या रहात्या गावाला कडक लष्कराचा वेढा, पत्रकरांना जायची मुभा नाही हे कशासाठी. भारताला हवा असलेला दाउद कराची मधे असतो, थाटामाटात वाजत गाजत त्याच्या घरांत लग्न होते.... पण अशी व्यक्ती आमच्या कडे नाही हे पर-राष्ट्रव्यावहार मंत्र्यांच्या पातळीवर बोलण्यांत होते.

मला कसाब मधे खुप काही interest नाही आहे, त्याने मिळालेल्या आदेशाचे पालन केले. पण हे आदेश आलेच कुठुन ? जो पर्यंत आदेश देणारी व्यावस्था जिवंत आहे, सशक्त आहे, तो पर्यंत असे कसाब रुपी हैवान बघायचे धैर्य भारताने ठेवायचे का ? कशासाठी ? त्याचा बोलावता धनी पाशा किंवा लष्करी अधिकारी ज्यांनी २६-११ ची आखणी केली त्यांना पाक अटक करुन शिक्षा करेल काय ? या मधे मला उत्सुकता आहे.

आदेश देणार्‍या यंत्रणेला खायचे फाके पडतांत तेव्हाच झरदारी (अजमेर भेट) किंवा कधी गिलानी (क्रिकेट सामना) यांना झोळी घेऊन बाहेर जाण्याची परवानगी दिली जाते किंवा मिळते.

उदय-जी,
याच लेखाच्या आणखी एका संस्थळावरील एका वाचकाने खालील माहिती लिहिली आहे. "अमेरिका आणि कॅनडा ह्यांच्यामध्येही पूर्वी निकराच्या लढाया झालेल्या आहेत आणि सुरुवातीच्या दिवसात कॅनडाचा प्रदेश ताब्यात घेण्याचे प्रयत्नहि नवनिर्मित अमेरिकेत करण्यात आले होते. जसजसे दिवस गेले तसतसे दोघांनाही जाणवायला लागले की आपली भाषा एक, संस्कृति एक, नद्या-पाणी अशी आर्थिक बलस्थाने समान. अशा परिस्थितीत आपण एकमेकांशी सहकार्याने वागणे दोघांच्याहि हिताचे आहे."
ते पुढे लिहितात, "भारत आणि पाकिस्तानची अगदी अशीच स्थिति आहे. मी वर म्हटल्यानुसार भाषा, रीतिरिवाज, अन्न, संगीत, इतिहास, हवामान, ऋतु हे सर्व सारखे आहे. इकडच्याच नद्या तिकडे जातात. दोघांनी शान्ततेत राहण्याचे ठरविले तर त्याच्या आड येऊ शकेल असे कोठलेच कारण नाही. भारत सर्व धर्मांच्या लोकांना सारखीच सुरक्षितता देतो हा गेल्या साठ वर्षांचा इतिहास आहे तेव्हा 'इस्लाम खतरेमे' हीहि भीति नाही. अशा शान्ततेचे अपरिमित लाभ दोन्ही राष्ट्रांना मिळतील. ते सर्वपरिचित आहेत."
त्यांना मी लिहिले कीं "मी जकार्तास्थित एका पाकिस्तानी गृहस्थाबरोबर बोलत होतो. त्याने माझे नवाज शरीफ यांच्या भाषणाचे स्वागत करणारे पत्र वाचले होते व ते त्याला आवडले होते. मी त्याला म्हटले कीं वातावरण सुधारते आहे ही चांगली गोष्ट आहे. तो उत्तरला कीं हळूहळू दोन्ही देशांच्या लोकांच्या लक्षात एक गोष्ट येऊ लागली आहे कीं आपण शेजारी आहोत व काहींही झाले तरी शेजारीच रहाणार आहोत! मग प्रेमाने का राहू नये?"
मला एक गोष्ट जाणवते कीं जोपर्यंत पाकिस्तानच्या लष्कराचे खच्चीकरण होत आहीं तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाहीं. म्हणून आपण पाकिस्तानी मुलकी सरकारांना पाठिंबा देऊन त्यांची इज्जत वाढवली पाहिजे जेणेकरून ते लष्कराला धीटपणाने तोंड देऊ शकतील व त्यानंतरच मैत्रीची खरी सुरुवात होईल. म्हणूनच मी झिया आणि मुशर्रफ यांच्याविरुद्ध खूप लिहितो पण मुलकी सरकारांबद्दल चांगलेच लिहितो.
हा नक्कीच द्राविडी प्रणायाम आहे. पण तो करायलाच हवा!

>>> अमेरिकेने (म्हणजे फक्त चेनी, इ. लोकांनी ) regime change नावाची, मध्यपूर्व देशांना लोकशाही बनवण्याची कल्पना काढली होती, त्याचे काय वाट्टोळे झाले, नि अमेरिकन जनतेचे काय हाल झाले ते पहाता आहात ना? <<<
"मध्यपूर्व देशांना" असे वाचल्यावर ह्यारीपॉटर सिनेमामालिकेत असा तो सैतान "ज्याचे नाव घेतले जात नाही", ते आठवले. सैतानाच्या जागी इथे धर्म शब्द वापरा की लगेच उलगडा होईल. Proud

परदेसाई, मी तसाच काहिसा अर्थ लावत होतो, (धन्यवाद);
की दर काही काळानन्तर आधी धरलेले उद्दीष्ट, त्यादिशेचा प्रवास याबाबत द्विधा परिस्थिती होऊन, शेवटी वर कुणीस म्हणल तस मूळ धर्माधिष्ठीत फाळणी आधारेचा द्वेष हा एकमेव मुद्दा तेवढा, अन तेवढाच केवळ शिल्लक राहुन आजवरची वाटचाल त्याच दिशेने झाली आहे. किम्बहुना धार्मिक अन्गानेदेखिल काफरान्चा सफाया हीच शिकवण असल्याने पाकिस्तान तसेच वागत रहाणार यात नवल ते काय?
फक्त उगीचच पाश्चात्यान्च्या नादाला लागुन आपण सत्य ते स्पष्ट माण्डणे राहूदेच, स्वतः पासून देखिल वेगवेगळ्या शब्दच्छलात गुन्डाळून ठेवू लागलो, अन उगीचच त्यास सहिष्णुता वगैरे ठरवुन आपले आपणच हिन्साअहिन्सेच्या चौरस्त्यावर (crossroad वर) कायमच ठाण मान्डून बसलोत. वरील लोकशाही शिकविणेबाबतचा "मध्यपूर्व देश" असा उल्लेख एकुणच पाश्चात्य व अमेरिकनान्च्या सवईचा/राजकारणाचा भाग आहे. त्यात विशेष नाही. विशेष ते असे की भारतीय राज्यकर्ते याउल्लेखामागिल सत्यदेखिल डोळ्याआड करतात अन पुन्हा पुन्हा येनकेनप्रकारेण तिकडे "चाटत" जातात अन ही सवय काही आजची नाही, मूळात याची सुरवात "खिलापत चळवळी" पासूनच झाली आहे अन देशान्तर्गत मतान्च्या राजकारणापोटी कसेही करुन सत्तेवर येण्याचे अभिलाषेपोटी त्या विषवल्लीचा वृक्ष बनला आहे. असो. मूळ बीबीचा विषय थोडा वेगळा आहे.
चर्चा छान चालू आहे, वाचतोय.

>>जर सर्वनाश केला तर मग मैत्री कुणाशी करणार ? भारत - पाक मैत्री हा बाफचा विषय आहे, कितीही नाकारले तरी ते आपले शेजारी आहेत हे सत्य कुणी बदलू शकत नाही.

पाकिस्तानशी मैत्री करायचे कमी प्रयत्न झालेत का? शक्य नाहीते. मैत्री करायला इतर राष्ट्रे आहेत. तेव्हा पाकिस्तानचा सर्वनाशच भारतासाठी इष्ट आहे.

आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात "मैत्री" हा फार जुनाट शब्द आहे. अमेरिकेकडून शिकावं भारताने काहीतरी. "हितसंबंध" महत्वाचे, आपण बलिष्ठ झाल्यावर "मैत्री" वगैरे शौक परवडतील कदाचित. अमेरिका बलिष्ठ असूनही मैत्री करत नाही, फक्त हितसंबंध जपते.

आणि आपण काय पाकिस्तानच्या गप्पा मारतोय. देशातल्या देशात माओवाद्यांनी थैमान घातलंय ते चिरडता येत नाही आपल्याला.........आपण काय पाकिस्तानला नष्ट करणार डोंबल?!!

सुधीरसर
तुम्ही बहुतेक सर्व मुद्यांचा परामर्श घेतलेला आहे. व्यक्ती तितकी मते या न्यायाने अशा विषयांवर उलटसुलट चर्चा होत राहणारच. विशेषतः भारत - पाक संबंध हा विषय याच प्रकारातला आहे. सामान्य नागरिकांची मते ही वातावरणनिर्मिती, माहितीचं केलं गेलेलं प्रसारण आणि प्रसारमाध्यमांचा रोल यावर ठरत असतं. वाजपेयी प्रधानमंत्री झाले तेव्हां सर्वत्र भारत पाक मैत्रीचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. दोन्हीकडची सांस्कृतिक, बुद्धीजीवी पथकं एकमेकांच्या देशात येऊन गेली. क्रिकेत डिप्लोमसी केली गेली.

त्या दरम्यान भारतातील लोकांना असं सांगण्यात आलं होतं कि पाकिस्तानमधील सर्वसामान्य माणसाला भारताशी मैत्री हवी आहे. तिथं गेलेले पत्रकार म्हणे कराचीतल्या गल्ल्यांत फिरले, विक्रेते, रस्त्यावरचे पादचारी आणि कितीतरी लोकांशी बोलले. असंही सांगण्यात आलं होतं कि भारतातून आलोय म्हटल्यावर पैसेही घेत नव्हते तिथले लोक. त्यांचं म्हणणं होतं कि राजकारण्यांमुळे दोन्ही देशात मैत्री होत नाही.

भारतातल्या सर्वसामान्य लोकांबद्दल तिथं असंच छापून येत होतं.

आता इथं काही जणांच्या प्रतिक्रिया वाचल्यावर त्यांचं म्हणणं ग्राह्य धरलं तर ती सगळी बनवाबनवी होती कि काय अशी शंका येऊ लागते. माझ्यासारख्याला पाकिस्तानच्या जनतेच्या मनात काय आहे हे इथं बसून कधीही सांगता येत नाही. वाजपेयींच्या काळात केली गेलेली ती डिप्लोमसी हा वातारवणनिर्मितीचा भाग असू शकेल, पण मग वास्तवापासून ते कोसो दूर होतं असं म्हणायचं का ?

>>पाकिस्तानमधील सर्वसामान्य माणसाला भारताशी मैत्री हवी आहे.
किरण, हा सगळ्यात मोठा विनोद आहे. तसं असतं तर ही मैत्री कधीच झाली असती.
त्यांना आधी म्हणावं पाकव्याप्त काश्मिर परत करा आणि काश्मीरवर भारताचा हक्क आहे हे मान्य करा म्हणावं. झेपणार आहे का त्यांना ते? उगाच हे पत्रकार लोक काहीच्या काही छापत असतात.

ही मैत्री खरंच करायची असेल तर फाळणीपूर्वीचा भारत अस्तित्वात आणावा लागेल—आहे का तयारी तिथल्या लोकांची? तिथे आता इतकी घाण निर्माण झाली आहे की नको ते एकत्रीकरण असं झालं आहे. तेव्हा पाकिस्तानचा सर्वनाश करुन मगच एकत्रीकरण करता येईल.

किरण, हा सगळ्यात मोठा विनोद आहे.

हा विनोद मी केलेला नाही.

तेव्हा पाकिस्तानचा सर्वनाश करुन मगच एकत्रीकरण करता येईल.

लालकृष्ण अडवाणी ग्रूहमंत्री होण्याच्या आधी छापामार थिअरी बद्दल बोलायचे. गुरिल्ला किंवा गनिमी काव्यातून प्रेरणा घेतलेल्या युद्धनीती प्रमाणे पाकिस्तानात छापे मारून तिथले अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त कसे करता येतील यावर त्यांचं चिंतन ऐकण्यासारखं होतं. दुर्दैवाने सत्ता मिळाल्यावर हे सगळं हवेत विरून गेलं आणि आपल्याला इतिहास बदलता येतो पण भूगोल नाही अशी वक्तव्यं ऐकायला मिळाली. छापामार च्या ऐवजी सद्भावना बस आणि ट्रेन सुरू झाली. त्या ट्रेनमधून कोण कोण आलं काही कल्पना नाही. पण आजच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिलेल्या कुठल्याही राष्ट्रावर हल्ला करणे हे लष्करीदृष्ट्या जरी शक्य असले तरीही आंतरराष्ट्रीय कारवाईला तोंड देणारे ठरेल हे याच अडवाणींनी पत्रकारांना सांगितले होते.

तेंव्हा आडवानींच्या सैन्यात जोशीबुवा नव्हते.. आडवानीना पुन्हा सत्तेवर बसवा आणि मंदार जोशीना सैन्यात पाठवून तर बघा.. दुसर्‍या दिवशी पाकिस्तानच कशाला अफगाणिस्तानही भारतात येईल. हो कि नाही हो जोशीबुवा?

मंदार

एखाद्याचं चारित्र्य तपासून पहायचं असेल तर त्याला सत्ता द्या असं म्हटलं जातं. त्याच धर्तीवर एखाद्याचा दावा तपासून पहायचा असेल तर त्याला एक संधी द्या असं म्हणावंसं वाटतंय. Happy

खरेच आता दोन्ही देशांना बळकट पंतप्रधानांची गरज आहे. खुप दळण दळून झालेय
आजवर.
पूर्व आफ्रिकेतही युनियन करुन अनेक देश एकत्र आलेत. तसे त्यांच्यात वैर नव्हते आणि भाषाही एकच आहे, त्यामूळे प्रकिया सोपी आहे.
इथले देश आफ्रिकेतील बाकीच्या देशांना खास दर्जा देऊन असतात. त्या देशातून आयात केलेल्या मालावर, जकात लागू पडत नाही.

Pages