तू मला खूप खूप आवडतोस!

Submitted by अमेलिया on 6 April, 2012 - 09:30

तुझे कुठेतरी गुपचुप उद्योग चाललेले असतात.

मी तुला हळूच येऊन पकडते आणि मोठ्ठा पापा घेऊन म्हणते , "अरे सशा, तुला एक खूप महत्त्वाचं सांगायचं होतं रे.." तुझे मोठे डोळे अजूनच मोठे करत तू म्हणतोस,"काय ग आई?" "अरे , तू मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतोस ..." हे ऐकलं की तू खुश होतोस. तुला माहीत असतं की आई महत्त्वाचं असं काय सांगणार आहे . माझं हे वाक्यही तुला माहीत असतं. पण तरीही तुला ते ऐकायला फार आवडतं आणि मला तुला ते सांगायला...!

तुझ्या अतिशय महत्त्वाच्या उद्योगात कोणी मध्ये मध्ये केलेलं तुला आवडत नाही. मग कुंडीत झाड लावण्याच्या नावाखाली घरभर चिखल करण्याचे मस्त काम असो, किंवा सार्‍या डबे अन् भांड्यांना स्वयंपाकघरातून गाडीत भरून घराची सैर करायचे लोकोपयोगी काम असो, तू ते अतिशय मनापासून करतोस. शेकडो खेळणी असली तरी आजोबांच्या कपाटातून त्यांच्या वस्तुंशी खेळण्यात काय मजा असते ते तुलाच माहीत!

"आदी, आधी तो कॅमरा माझ्याकडे दे. तू अजून लहान आहेस, ही काही लहान मुलांच्या खेळण्याची गोष्ट नाहीय" असा दम मी तुला भरताना तुझे डोळे अजून तिसरीच मजा शोधण्यात गुंतलेले असतात.

दिवसातून कितीतरी वेळा मला तुझ्यावर रागावावं लागतं...कधी खरं खरं सुद्धा!
पण बूंबूंबाचं गाणं ऐकून आपले पिटूकले हात माझ्या गळ्याभोवती टाकून भल्या मोठ्या डोळ्याटली भीती लपवत, जेव्हा तू मला निरागसतेनं विचारतोस,"आई मी खूप खोड्या काढतो का ग? मला बूंबूंबा पकडून नेईल का ग?" तेव्हा मला खूप मजा वाटते. तुला जवळ घेऊन तुझा पापा घेता मी म्हणते "नाही रे माझ्या सशा" मग तुझा जीव भांड्यात पडतो आणि नव्या जोमाने तू तुझ्या उद्योगांना सुरूवात करतोस.

बाबा पेंटिंग करायला बसला की मग मात्र ठरवून ही मी तुला रागाऊ शकत नाही. "मीही बाबासारखा आर्टिस्ट होणार" असं जाहीर करून तूही रंग-रेषांत रमलास की मग तू चितारलेल्या भिंतीही मला कलेचा सुरेख अविष्कार वाटू लागतात.

तुझ्या शाळेतल्या, व्हानमधल्या, मित्रांच्या गमती ऐकून मला असं अनेकदा वाटून जातं, हळूच येऊन लपून तू हे सारं कसं करत असतोस ते बघत राहावं.

"आजी, तुझे पाय दुखतायत का ग?", ..."आजोबा, तुम्ही दमलात का हो? " असं विचारताना तुझ्या डोळ्यात दाटणारी आपुलकी माझ्याही डोळ्यात पाणी आणते.

"मी आता फाईव ईयर्सचा म्होटा झालोय" असं तू म्हणालस की मात्र एरवी 'हा मुलगा कधी स्वतःच्या गोष्टी स्वतः करणार?' असं दिवसातून पाच वेळा म्हणणारी मी एकदम बावरते. मग आत्ता "आई, आपल्या दोघांची टीम आहे हां " असं म्हणणारा, तुझ्या सार्‍या 'महत्त्वाच्या' कामांत मलाही घेणारा, "आई,आज लवकर ये ग, मला तुझ्याशिवाय करमत नाहीये" असं म्हणणारा तू मित्रांच्या, शाळा-कॉलेजच्या वेगळ्या विश्वात रमलेला मला दिसायला लागतोस. क्षणभर हे सारं वाटून जातं.....

तेवढ्यात तू येऊन म्हणतोस, "आई, चल मस्ती करू।" तुझ्याबरोबरच बेडवर उड्या मारताना आणि उशांनी तुला 'धुताना' मी एकदम गंभीर होते. हसता हसता तूही एकदम शांत होतोस. तुला घट्ट धरत मी म्हणते " अरे सशा, पण एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची राहिलीच की रे..." तुझ्या चेहऱ्यावर हळूच हसू फुटतं. ते लपवायचा प्रयत्न करत तू म्हणतोस," काय ग आई?" " अरे, तू मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतोस." माझ्याबरोबर तूही म्हणतोस आणि आपण दोघं धो धो हसत सुटतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलय , खरये आगदी Happy आई ने कितीही रागवाव अन पोराला बापानं विचारलं ना कि आई मारते रागावते तर तुझी नाहीये ना ती तर रडत येउन सुद्धा म्हणेन माझ्झीच आहे , बापाला जरा वेळ घेइल Happy

आमचा ससा आता खरच खूप म्होट्टा झालाय. पण अजुन कधी कधी मला आणि त्यालाही हा डाय्लॉग म्हणायला आणि ऐकाय्ला आवडतो . Happy मस्त लिहिलयस.

Happy

किती गोडंय Happy
माझा लेकाला अर्रे मोठा झालास, दुसर्या खोलीत झोप, सांगता सांगता जेंव्हा आता तो खरंच दुसर्‍या खोलीत झोपायला लागला, तेंव्हा मलाच झोप येईनाशी झालीये Sad मलाच असुरक्षित वाटायला लागंलय !
हे नातंच असं आहे!
ते खूप खूप आवडतोस वालं आमच्याकडे, पिलू, आय लव यु आणि घट्ट्ट्ट्ट्ट्ट मिठी असं आहे Proud

Pages