राजगड - दुर्ग रचना...

Submitted by सेनापती... on 4 April, 2012 - 10:40

राजगड म्हणजे गडांचा राजा आणि राजांचा गड ... !

(१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या २५-२६ वर्षांमध्ये...

त्याने पाहिले १६४८ मध्ये शहाजी राजांच्या अटकेची आणि मग सुटकेची बातमी, १२ मावळची व्यवस्था लावताना राजांनी घेतलेले परिश्रम, १६५५ मध्ये जावळी संदर्भामधील बोलणी आणि आरमाराची केलेली सुरवात सुद्धा राजगडाने अनुभवली. १६५९ ला अफझलखान आक्रमण करून आला तेंव्हाची काळजी आणि त्याचवेळी महाराणी सईबाई यांचे निधन राजगडाला सुद्धा वेदना देउन गेले. १६६१ राजे पन्हाळगडावर अडकले असताना मासाहेबांच्या जिवाची घालमेल पाहिली. शाहिस्तेखानाला (१६६३) झालेली शास्त आणि सूरत लुटीसारख्या आनंदी बातम्या राजगडाने ऐकल्या तर त्या मागोमाग लगेच शहाजीराजांच्या अपघाती निधनाची दु:खद बातमी सुद्धा ऐकली. १६६५ मध्ये पुरंदरचा तह करण्यासाठी आणि त्यानंतर आग्रा येथे जाण्यासाठी राजे येथूनच निघाले. सुटून आले ते सुद्धा राजगडावरच. राजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जन्म १६७० मध्ये राजगडावरचं झाला. १६७१ मध्ये मात्र स्वराज्याचा वाढता विस्तार आणि राजगड परिसरात शत्रूचा वाढता धोका पाहून राजांनी १६७१ मध्ये राजधानी 'रायगड' येथे हलवण्याचा निर्णय घेतला. स्वराज्याने बाळसे धरल्यापासून ते वाढेपर्यंत राजगडाने काय-काय नाही पाहिले. अनेक बरे- वाइट प्रसंग. म्हणुन तर तो 'गडांचा राजा आणि राजांचा गड'आहे.

राजगड म्हणजे 'स्वराज्याची पाहिली राजधानी'. खुद्द मासाहेब जिजामाता, शिवाजीराजे आणि त्यांचे कुटुंब यांचे गडावर कायम वास्तव्य. त्यामुळे लश्करीदृष्टया तो अभेद्य असावा अश्या पद्धतीने त्याची बांधणी केली गेली आहे. गडाच्या तिन्ही माच्या स्वतंत्रपणे लढवता येतील अशी तटबंदी प्रत्येक २ माच्यांच्या मध्ये आहे.

प्रत्येक माचीला स्वतंत्र मुख्य दरवाजा आहे. पद्मावती माचीला 'पाली दरवाजा', जो राजगडचा राजमार्ग देखील आहे. संजीवनी माचीला 'अळू दरवाजा' तर सुवेळा माचीला 'गुंजवणे दरवाजा', जो सध्या बंद स्थितिमध्ये आहे. शिवाय प्रत्येक माचीला स्वतंत्र चोर दरवाजे आहेत. पद्मावती माचीचा चोर दरवाजा गुंजवणे गावातून गाठता येतो. पद्मावती माचीचा विस्तार हा इतर दोन्ही माच्यांच्या मानाने कमी लांबीचा पण जास्त रुंद आहे.

पाली दरवाजा -

शिवरायनिर्मित दुर्गरचनेप्रमाणे ह्या महादरवाज्यामध्ये बाहेरच्या बाजूने प्रवेश केल्या-केल्या वाट बरेचदा पूर्ण डावीकड़े वळते. (उदा. रायगड, सुधागड, राजगड) आता आपण आतून बाहेर जातोय त्यामुळे वाट उजवीकड़े वळेल. इकडे समोर देवडया आहेत. तर अलिकड़े उजव्या हाताला महादरवाजावर असणाऱ्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे इकडे खालचा आणि वरचा असे २ मुख्य दरवाजे आहेत. वरच्या दरवाज्याच्या बुरुजावरुन खालचा दरवाजा आणि त्यापुढचा मार्ग पूर्णपणे टप्यात येइल अशी दुर्गरचना येथे आहे. हा राजमार्ग असल्याने ३ मि. म्हणजेच पालखी येइल इतका रुंद आहे.

५० एक पायऱ्या उतरलो की मार्ग आता उजवीकड़े वळतो आणि पुढे जाउन डावीकड़े वळसा घेउन अजून खाली उतरतो. इकडे आहे खालचा दरवाजा. ह्यावरचा बुरुज मात्र ढासळला आहे. ह्या दरवाजामधून बाहेर पडलो की आपण राजगडाच्या तटबंदीच्या बाहेर असतो. आता वाट उजवी-डावी करत-करत खाली उतरु लागते. नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे हा पूर्ण मार्ग खालच्या दरवाजाच्यावर असणाऱ्या बुरुजाच्या टप्यात आहे. शिवाय बाले किल्ल्यावर असणाऱ्या उत्तरेकडच्या बुरुजावरुन सुद्धा ह्या मार्गावर थेट मारा करता येइल अशी ही वाट आहे. हा गडावर यायचा सर्वात सोपा मार्ग असल्याने ह्याला दुहेरी संरक्षण दिले गेले आहे.

इकडून आपण थेट खाली उतरलो की 'वाजेघर' गाव आहे. (संस्कृतमध्ये वाजिन म्हणजे घोड़ा याशिवाय 'वाजिन' चे अजून काही समानअर्थी शब्द म्हणजे - शुर, धाडसी, योद्धा. शिवरायांचे घोडदळ ज्याठिकाणी असायचे तो भाग म्हणजे 'वाजिनघर' उर्फ़ 'वाजेघर'.) (संदर्भ - आप्पा परब.)

पद्मावती माची -

माची ३ छोट्या टप्यात उतरत असली तरी गडावरील जास्तीतजास्त सपाटी ह्याच माचीवर आहे. सर्वात खालच्या टप्यामध्ये पद्मावती तलाव आणि चोर दरवाजा आहे. मधल्या टप्यामध्ये नव्याने बांधलेले विश्रामगृह, शंकर मंदिर आणि पद्मावती आईचे मंदिर आहे. शिवाय देवळासमोर एक तोफ आणि एक समाधी आहे (ही समाधी राजांची थोरली पत्नी 'महाराणी सईबाई' यांची आहे असे म्हटले जाते. ५ सप्टेंबर १६५९ रोजी त्यांचा राजगडावर किंवा पायथ्याला मृत्यू झाला होता.) देवळासमोरच्या मोकळ्या जागेमध्ये एक स्तंभ आहे. विश्रामगृहापासून डावीकडे म्हणजेच माचीच्या पूर्व भागात गेल्यास अधिक सपाटी आहे. टोकाला तटबंदी असून एक भक्कम बुरुज आहे. येथून पूर्वेला सुवेळामाचीचे तर पश्चिमेला गुंजवणे गावापासून येणाऱ्या वाटेचे सुंदर दर्शन होते. माचीवर सर्वात वरच्या टप्प्यामध्ये राजसदन, राजदरबार, सदर, दारूकोठार, पाण्याचा एक तलाव अशी बांधकामे आहेत. ज्याठिकाणी आता सदर आहे त्याखाली काही वर्षांपूर्वी एक गुप्त खोली सापडली. आधी ते पाण्याचे टाके असावे असे वाटले होते पण तो खलबतखाना निघाला. ७-८ अति महत्वाच्या व्यक्ति आत बसून खलबत करू शकतील इतका तो मोठा आहे. त्या मागे असलेल्या राजसदनामध्ये राजांचे २५-२६ वर्ष वास्तव्य होते.

पद्मावती तलाव...

पद्मावती आईची मूर्ती...

राजसदनावरुन पुढे गेलो की वाट जराशी वर चढते. इथे उजव्या हाताला ढालकाठीचे निशाण आहे. अजून पुढे गेलो की २ वाट लागतात. उजव्या बाजूची वाट बालेकिल्ल्याच्या कड्याखालून संजीवनी माचीकड़े निघते. तर डावीकडची वाट बालेकिल्ला आणि पुढे जाउन सुवेळा माचीकड़े जाते. आपण डाव्याबाजूने निघालो की जसे बालेकिल्ल्याच्या कड्याखाली येतोच की लगेच पद्मावती माची आणि सुवेळा माची यांच्यामध्ये असलेली आडवी तटबंदी लागते. येथील प्रवेशद्वार मात्र पडले आहे. उजव्या हाताला एक झाड़ आहे त्या बाजूने कड्यावर ७०-८० फूट प्रस्तरारोहण करत गेले की एक गुहा आहे.

बालेकिल्ला आणि सुवेळा माची ...

प्रवेशद्वारावरुन पुढे गेलो की परत २ वाटा लागतात. उजवीकडची वाट वर चढत बालेकिल्ल्याकड़े जाते. तर डावीकडची वाट गुंजवणे दरवाज्यावरुन पुढे सुवेळा माचीकड़े जाते. आता मोर्चा आधी गुंजवणे दरवाज्याकड़े वळवायचा. येथील बरेच बांधकाम पडले आहे तर काही ढासळत्या अवस्थेत आहे. त्यामुळे उतरताना काळजी घ्यावी लागते. पायऱ्या उतरुन खाली गेलो की दरवाजा आहे. दरवाजावरच्या बुरुजावर जाण्यासाठी डाव्या बाजूने वाट आहे. पण शक्यतो जाऊ नये कारण बांधकाम ढासळत्या अवस्थेत आहे. ह्या वाटेने खूप कमी ट्रेकर्स जा ये करतात कारण कारण पुढची वाट बऱ्यापैकी मोडली आहे. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ही वाट वापरत होती हे आप्पा उर्फ़ गो.नी. दांडेकरांच्या 'दुर्ग भ्रमणगाथा' ह्या पुस्तकातून कळते.

राजगडचा बालेकिल्ला -

इकडे आल्यावर कळले की राजगडचा बालेकिल्ला का अभेद्य आहे ते. आधी पूर्ण उभ्या चढाच्या आणि मग उजवीकड़े वळून वर महादरवाजापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या अप्रतिमरित्या खोद्ल्या आहेत. त्या चढायला सोप्या नाहीत. हाताला आधार म्हणुन काही ठिकाणी लोखंडी शिगा रोवल्या आहेत. (आता म्हणे भक्कम पायऱ्या बनवल्या गेल्या आहेत.) अखेर पायऱ्या चढून दरवाज्यापाशी पोचलो. उजव्या-डाव्या बाजूला २ भक्कम बुरुज आहेत. राजगडचा बालेकिल्ला हा अखंड प्रस्तर असून पूर्व बाजुस योग्य ठिकाणी उतार शोधून मार्ग बनवला गेला आहे. काय म्हणावे ह्या दुर्गबांधणीला... निव्वळ अप्रतिम ... !!! महादरवाजासमोर देवीचे मंदिर असून हल्लीच त्या मंदिराचे नुतनीकरण झाले आहे. असे म्हणतात की महादरवाजाच्या डाव्या बाजुच्या कोनाडयामध्ये 'अफझलखानाचे डोके पुरले' गेले आहे. आता पुढे रस्ता उजवीकड़े वर चढतो आणि बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जातो. इकडे उजव्या हाताने गेलो तर 'ब्रम्हर्षीचे मंदिर' आहे. त्याशेजारी अतिशय स्वच्छ अशी पाण्याची २-३ टाकं आहेत. राजगडाचे मुळ नाव 'मुरुमदेवाचा डोंगर'. खरंतर ब्रम्हदेव ... बरुमदेव (गावठी भाषेत) ... आणि मग मुरुमदेव असे नाव अपभ्रंशित होत गेले असावे.

राजगड हे नाव ठेवल शिवाजीराजांनी. बालेकिल्ल्यावर ब्रम्हर्षीचे मंदिर आणि त्याची पत्नी पद्मावती हिचे खाली माचीवर मंदिर हे संयुक्तिक वाटते. उजव्या हाताने बालेकिल्ल्याला फेरी मारायला सुरवात करायची. ब्रम्हर्षीच्या मंदिरासमोर कड्याला लागून जमीनीखाली एक खोली आहे. टाक आहे की गुहा ते काही कळले नाही. तिकडून दक्षिणेकड़े पुढे गेलो की उतार लागतो आणि मग शेवटी आहे बुरुज. त्यावरुन पद्मावती माचीचे सुंदर दृश्य दिसते.

ह्या बुरुजाच्या डाव्या कोपऱ्यातून बाहेर पड़ायला एक चोर दरवाजा आहे. ती वाट बहुदा खालपर्यंत जाते. इथून डावीकड़े सरकलो की आपण बालेकिल्ल्याच्या पश्चिम टोकाला पोचलो. आता समोर दूरवर पसरली होती संजीवनी माची आणि त्या मागे दिसत होता प्रचंड 'जेसाजी कंक जलाशय'. ह्या बुरुजापासून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर यायला पुन्हा थोड़े वर चढावे लागते. ह्या मार्गावर आपल्याला दारूकोठार आणि अजून काही पाण्याची टाकं लागतात. ईकडून वर चढून आलो की वाड्याचे बांधकाम आहे. हा गडाचा सर्वोच्च बिंदू. ह्याठिकाणी सुद्धा राहते वाड्यांचे जोते असून उजव्या कोपऱ्यामध्ये भिंती असलेले बांधकाम शिल्लक आहे. उत्तरेकडच्या भागात तटबंदीच्या काही कमानी शिल्लक असून तेथून सुवेळा माची आणि डूब्याचे सुंदर दृश्य दिसते. आल्या वाटेने बालेकिल्ला उतरायाचा आणि सुवेळा माचीकड़े निघायाचे. इकडे मध्ये एक मारुतीची मूर्ति आहे. आता आपण पोचतो सुवेळा माचीच्या सपाटीवर.

सुवेळा माची - 'संताजी शिळीमकर' यांचा वीरगळ ...

सुवेळा माचीच्या सपाटीवर सुद्धा काही वाड्यांचे जोते असून ही स्वराज्याच्या लष्करी अधिकार्‍यांची घरे होती. तर प्रशासकीय अधिकार्‍यांची घरे पद्मावती माचीवर होती. पुढे वाट निमुळती होत जाते आणि मग समोर एक टेकडी उभी राहते. तिला 'डूबा' म्हणतात. इकडे उजव्या बाजूला खाली 'काळकाईचा बुरुज' आहे. डूब्याला वळसा घालून 'झुंझार बुरुजा'पाशी पोचायचे. अप्रतिम बांधणीचा हा बुरुज सुवेळा माचीला २ भागांमध्ये विभागतो. बुरुजाच्या उजव्या बाजूने माचीच्या दुसऱ्या टप्यामध्ये जाण्यासाठी वाट आहे. म्हणजेच माचीचा टोकाचा भाग पडला तरी हा दरवाजा बंद करून झुंझार बुरुजावरुन शत्रुशी परत २ हात करता येतील अशी दुर्गरचना येथे केली आहे.

थोड पुढे उजव्या हाताला तटबंदीमध्ये एक गणेशमूर्ति आहे. ह्या जागी आधी 'संताजी शिळीमकर' यांचा वीरगळ होता असे म्हणतात. गडाच्या ह्या किल्लेदाराने मुघल फौजेवर असा काही मारा केला होता की मुघल फौजेची दाणादण उडालेली बघून खुद्द औरंगजेब हतबल झाला होता. त्या लढाईमध्ये एक तोफगोळा वर्मी लागुन संताजींचे निधन झाले. ज्या प्रस्तरावर झुंझार बुरुज बांधला आहे त्यास 'हत्ती प्रस्तर' असे म्हटले जाते कारण समोरून पाहिल्यास त्याचा आकार हत्ती सारखा दिसतो. ह्याच ठिकाणी आहे राजगडावरील नैसर्गिक नेढ़ (आरपार दगडामध्ये पडलेले भोक) उर्फ़ 'वाघाचा डोळा'. ह्याठिकाणी कड्याच्या बाजूला मधाची पोळी आहेत त्यामुळे जास्त आरडा-ओरडा करू नये.

माचीच्या टोकाचा भाग दुहेरी तटबंदी आणि शेवटी चिलखती बुरुज असलेला आहे. भक्कम तटबंदीच्या बुरुजावरुन सभोवताली पाहिले तर उजव्या हाताला दुरवर 'बाजी पासलकर जलाशय' दिसतो. आता परत मागे येऊन मोर्चा काळकाई बुरुजाकड़े वळवायचा.

ह्याठिकाणी उतरताना काही पाण्याची टाक आणि त्या शेजारी मूर्ती दिसतात. अगदी टोकाला बुरुज आहे आणि तिकडून खालचे गर्द रान दिसते. उजव्या बाजूला जरा मान वळवून पाहिले तर संजीवनी माचीची लांबी लक्ष्यात येते. इथून थेट संजीवनी माचीकडे जाण्याचा प्रयत्न सहसा करू नये. ढालकाठीच्या बाजूने तेथे जाण्यासाठी योग्य वाट आहे...

संजीवनी माची -

ढालकाठीच्या बाजूने पुढे जाउन उजव्या बाजूच्या वाटेने बालेकिल्ल्याच्या कड्याखालून संजीवनी माचीकड़े निघायचे. आता पद्मावती माची आणि संजीवनी माचीमधली तटबंदी लागेल. त्यातले प्रवेशद्वार पार करून पुढे गेले की वाट एकदम दाट झाडीमधून जाते आणि बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या बाजुस निघते. संजीवनी माचीची रुंदी अतिशय कमी असून लांबी प्रचंड आहे. माची एकुण ३ टप्यात विभागली आहे. मध्ये-मध्ये बांधकामाचे अवशेष दिसतात तर उजव्या आणि डाव्या बाजूला उतारावर अनेक ठिकाणी जसे आणि जितके जमेल तितके पाणी जमवण्यासाठी टाक खोदलेली आढळतात. आता पुढे गेलो की एक बुरुज लागतो आणि त्या पुढे जायला उजव्या कोपऱ्यामधून दरवाजा आहे. गंमत म्हणजे ह्या बुरुजाच्या मागे लागुन एक खोली आहे. म्हणजे वरुन उघडी पण चारही बाजूने बंद अशी. आता नेमक प्रयोजन माहीत नाही पण बहुदा पाण्याचे टाके असावे. तोपची (तोफा डागणारे) तोफा डागल्यानंतर त्यात उड्या घेत असतील म्हणुन बुरुजाच्या इतके जवळ ते बांधले गेले असावे.

माचीची पूर्ण उतरती तटबंदी आता आपल्या दोन्ही बाजुस असते. उजवीकडच्या जंग्यामध्ये लक्ष्यपूर्वक बघावे. (जंग्या - शत्रुवर नजर ठेवता यावी, तसेच निशाणा साधता यावा म्हणुन तटबंदीमध्ये असलेली भोके) एका जंग्यामधून खाली थेट दिसतो पुढच्या टप्याचा चोरदरवाजा. म्हणजेच पुढचा भाग जर शत्रुने ताब्यात घेतला तरी बारकूश्या चोरदरवाजा मधून शिरणाऱ्या शत्रुचे जास्तीत-जास्त सैनिक टिपता यावेत अशी दुर्गरचना येथे आहे.

अजून पुढे निघालो की काही वेळातच आपण दुसऱ्या टप्याच्या बुरुजापाशी पोचतो. ह्याला 'व्याघ्रमुख' म्हणतात. येथे सुद्धा पहिल्या टप्यासारखीच दुर्गरचना. फरक इतकाच की तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्यामध्ये जाणारा दरवाजा हा डाव्या बाजूने आहे. ह्या दरवाजापासून लगेच पुढे डाव्या बाजूला आहे संजीवनी माचीचा 'आळू दरवाजा'. इंग्रजी 'S' आकाराप्रमाणे वक्राकार असणाऱ्या तटबंदीमुळे आळू दरवाज्याचा बाहेरचा दरवाजा आतून दिसत नाही तर बाहेरून आतला दरवाजा सुद्धा दिसत नाही. दुर्गबांधणी मधले एक-एक अविष्कार पाहून येथे थक्क व्हायला होते.

'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार' -

संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्यामध्ये आहे 'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार'. दोन्ही बाजुस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकरित्या खाली उतरणारे दोन्ही बाजुस ३-३ असे एकुण ६ दुहेरी बुरुज आणि टोकाला असणारा चिलखती बुरुज. असे अद्वितीय बांधकाम ना कधी कोणी केले.. ना कोणी करू शकेल.. मागे कधी तरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलैंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला 'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला' तर जिब्राल्टरनंतर 'दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट किल्ला' असे पारितोषिक मिळाले होते. मूळात गडाचा हा भाग तसा शत्रूला चढून यायला सर्वात सोपा म्हणुनच या ठिकाणची दुर्गबांधणी अतिशय चपखलपणे केली गेली आहे.

दुहेरी तटबंदीमधली आतली तटबंदी मीटरभर जाड आहे. मध्ये एक माणूस उभा आत जाइल इतकी किंवा त्यापेक्षा थोडी मोठी जागा सोडली की बाहेरची तटबंदी आहे. बाहेरची तटबंदी सुद्धा मीटरभर जाड आहे. तिसऱ्या टप्यामधली ही दुहेरी तटबंदी शेवटपर्यंत इंग्रजी 'S' आकाराप्रमाणे वक्राकार आहे. ह्यात टप्याटप्यावर खाली उतरणारे दुहेरी बुरुज आहेत. म्हणजे दुहेरी तटबंदीवर एक बुरुज आणि त्याखालच्या दरवाजा मधून तीव्र उताराच्या २०-२५ पायऱ्या उतरून गेल की खालचा बुरुज.

खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायर्‍यांसाठी दरवाजामधून प्रवेश केला की डाव्या-उजव्या बाजूला बघावे. दुहेरी तटबंदी मधल्या वक्राकर मोकळ्या जागेमध्ये येथून प्रवेश करता येतो. इतकी वर्ष साफ-सफाई न झाल्यामुळे आता आतमध्ये रान माजले आहे. खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायऱ्या अक्षरशः सरळसोट खाली उतरतात. आता झाडी वाढल्यामुळे आत अंधार असतो त्यामुळे आत घुसायचे तर टॉर्च घेउन जावे. उतरताना लक्ष्यात येते की पायऱ्या सरळ रेषेत नाही आहेत. त्यासुद्धा वक्राकर. जेंव्हा पूर्ण खाली उतरून गेलो तेंव्हा खालच्या बुरुजाकड़े बाहेर निघणारा दरवाजा दिसला. तो जेमतेम फुट-दिडफुट उंचीचा होता. म्हणजे बाहेर निघायचे तर पूर्णपणे झोपून घसपटत-घसपटत जावे लागते. तिकडून बाहेर पडलो की आपण खालच्या बुरुजावर निघतो. भन्नाट दुर्गरचना आहे ही...

'शत्रुने जर हल्ला करून खालचा बुरुज जिंकला तरी आत घुसताना शत्रूला झोपून घसपटत-घसपटत आत यावे लागणार. त्यात ते काय शस्त्र चालवणार आणि काय लढणार. अगदी आत आलेच तरी लगेच पुढे वक्राकर आणि सरळसोट वर चढणाऱ्या पायऱ्या. बरे तिकडून सुद्धा शत्रु पुढे आलाच तर दुहेरी तटबंदीमधल्या आतल्या तटबंदीचा दरवाजा बंद करून घेतला की शत्रु सैन्याला पर्याय राहतो तो फ़क्त उजवीकड़े किंवा डावीकड़े जाण्याचा म्हणजेच दुहेरी तटबंदीमधल्या मोकळ्या वक्राकर जागेमध्ये शिरायचा. आता ह्यात शिरणे म्हणजे जिवंत सुटणे नाही. कारण एकतर वर चढून येणे शक्य नाही आणि वरुन आपण गरम तेल, पाणी, बाण, भाले अश्या कशाने सुद्धा शत्रूला लक्ष्य करू शकतो. ह्या संपूर्ण मालिकेतून शत्रूला विजय मिळणे शक्य नाही. मिळेल तर तो मृत्युच.

पुन्हा पायऱ्या चढून आत आलो आणि शेवटच्या बुरुजाकड़े निघालो की अध्ये-मध्ये काही पाण्याच्या टाक्या आहेत. टोकाला चिलखती बुरुज आहे. उजव्या बाजूला प्रचंडगड उर्फ तोरणा तर मागे दूरवर राजगडाचा बालेकिल्ला आणि पद्मावती माची दिसत होती. ..... खरच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी राजगडला यावे आणि असे भरभरून बघावे...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेनापती _______________________/\________________________

त्रिवार मुजरा. सगळं डोळ्यासमोर आलं. मला पण अफाट आवडतो राजगड.

तोरणा - राजगड एकत्र करण्याचा अनुभव पण भारी होता.

व्वा छान माहीती! आणि सगळे फोटोही, विशेत: संजीवनी आणी सुवेळा माचीचे एक वेगळ्या कोनातून (अँगल) घेतलेले फोटो आवडले.

खरंच सगळं डोळ्यासमोर उभे राहिले.
आणि सध्या जिथे बसून तू हे लिहिले असशील त्याची कल्पना केली,
तर तूझ्या भक्तीला वंदनच करावेसे वाटते.

रोहन मस्तच लिखाण आणी फोटो पण...

प्रत्येक ॠतूत निराळ्याच भासणार्‍या राजगडवर भरभरुन प्रेम करावे असे बरच काही आहे.... कितीही वेळा राजगडला गेलो तरी पुन्हा पुन्हा जाण्याची ईच्छा काही कमी होणार नाही....

उजव्या बाजूला जरा मान वळवून पाहिले तर संजीवनी माचीची लांबी लक्ष्यात येते. इथून थेट संजीवनी माचीकडे जाण्याचा प्रयत्न सहसा करू नये>>>> ह्या वाटेने दोन वेळा गेलोय आणी वाटेत गच्च रान आणी झाडी आहे. अंगावर ओरखडे काढीतच आम्हाला जावे लागले. काळेश्वरी/डुबा ते संजिवनी पर्यंत फुट दिड फुट जाडीची सलग तटबंदी आहे ज्यावरून खाली उतरायला मध्ये पायर्‍या आहेत. वाटेत शिबंदीची बरीच जोती आणी पाण्याच्या टाक्या आहेत आणी चुकत नसेन तर तटबंदीत एखादा दरवाजा पण आहे..

मागे कधी तरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलैंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला 'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला' तर जिब्राल्टरनंतर 'दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट किल्ला' असे पारितोषिक मिळाले होते.>>>>> होय १९८७ मध्येच स्वित्झर्लंडच्या ल्युसेर्नमध्ये ते प्रदर्शन भरले होते आणी भारतातील इतक्या किल्ल्यांमधून फक्त एका राजगडची निवड झाली होती... मी ल्युसेर्नला गेलो असताना चौकशी केली होती पण तिथे आता त्या प्रदर्शनाची काही माहीती उपलब्ध नाही...

राजगड चढणार्‍या ५ वाटांपैकी ३ झाल्यात आता काळेश्वरी बुरुजाची मळे गावात उतरणारी आणी गुंजवणी दरवाज्याची गुंजवणीत उतरणारी वाट राहीलेय.. बघू कधी जमते ते..:)

तरी राजगडावरील तानाजी मालुसरे आणी इतरांच्या घरांबद्दल आणी घेरा राजगडाच्या मेटांबद्दल नाही लिहीलेस Happy

तरी राजगडावरील तानाजी मालुसरे आणी इतरांच्या घरांबद्दल आणी घेरा राजगडाच्या मेटांबद्दल नाही लिहीलेस
>>> त्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही.. तुझ्याकडे आहे का? इथे प्रतिक्रियेत दे ना..

गुंजवणे दरवाजावरील शिल्प आणि पाली दरवाजाजवळ असलेला मराठी शिलालेख... नेमकी माहिती आठवत नाहीये. मी प्रथम गेलो होतो तेव्हा गुंजवणे दरवाजात उतरुन व्यवस्थित पाहिला होता. एकटाच गेलो होतो आणि वाजेघरहून चढायला सुरुवात करतांना एक भोसलेवाडी म्हणून होती. तिथल्या एका आजोबांनी तासभर मला माहिती ऐकवली होती. गडावरची कुठली तरी व्यवस्था त्यांच्याकडे होती..त्याबद्दल त्यांना तनखा हल्लीपर्यंत मिळत असे. भोर संस्थान असेपर्यंत सदरेवर झाडलोट असायची..वगैरे.
दुर्गभ्रमणगाथामधील निम्म्याहून अधिक पाने राजगडावर आहेत. याच पुस्तकामुळे राजगड या दुर्गभुताने मला झपाटलं.. किल्ला असा असू शकतो! किल्ला असा पहायचा असतो!! किल्ल्यांवर असं प्रेम करायचं असतं ही सगळी जाणीव अप्पांनी साकारलेल्या या शब्दचित्रांमुळे अधिक दृढ झाली. अप्पांच्या आठवणी सांगणारे आजही वाजेघरांत आहेत.
छान लेख व माहिती. माझीही मळ्याची नि गुंजवण्याची वाट राहिलीये.

दुर्गभ्रमणगाथामधील निम्म्याहून अधिक पाने राजगडावर आहेत. याच पुस्तकामुळे राजगड या दुर्गभुताने मला झपाटलं.. किल्ला असा असू शकतो! किल्ला असा पहायचा असतो!! किल्ल्यांवर असं प्रेम करायचं असतं ही सगळी जाणीव अप्पांनी साकारलेल्या या शब्दचित्रांमुळे अधिक दृढ झाली. अप्पांच्या आठवणी सांगणारे आजही वाजेघरांत आहेत.

>>> अगदी खरे हेम... मी तर ते पुस्तक राजगडावर जाऊन वाचले आहे. वाघरू सुद्धा... विलक्षण अनुभव.. Happy

मस्त माहिती आणि प्रचि.
मी इतक्या खोलात शिरुन कुठल्या किल्ल्याचा अभ्यास केलाच नाही कधी Sad

धन्यवाद.. भुंगा, आंग्रे, दिनेशदा, शापीत, ज्योती ताई, मनोज आणि हेम...

दिनेशदा.. मी कुठेही असलो तरी विचार तिथेच म्हणजे सह्याद्रीत फिरत असतात.. Happy

>>> आणि सध्या जिथे बसून तू हे लिहिले असशील त्याची कल्पना केली,
तर तूझ्या भक्तीला वंदनच करावेसे वाटते. <<<<
दिनेशदान्ना अनुमोदन. Happy

(नेहेमीप्रमाणेच, मला फोटु दिसत नाहीत Sad )

झक्क्कास!!

चलो राजगड - नाईट ट्रेक व्हाया चोर दरवाजा... आणि मग तिथूनच डोंगरधारेवरून तोरण्याला जाऊ.. पहिला पाऊस पडण्याच्या आसपास करू...
काय म्हणता?

मित्रांनो... राजगडावरील तटबंदीमधील शौचालय व्यवस्था ह्यावर खरेतर मला ह्या धाग्यात लिखाण करायचे होते पण त्यावर पुरेशी माहिती अजूनही उपलब्ध नसल्याने आणि तिथे जाऊन काही फोटो घ्यायचे असल्याने इथे त्याबद्दल काहीही लिहिले नाही.

पुढे त्यावर एक छोटे का होईना पण स्वतंत्र लिखाण करायचा प्रयत्न करीन.. Happy

mast Senapati ! yaa Rajgadabaddal kitihi bolale tari kamich.. Vishay nighala ki sampurn Rajgad dolyasamor ubhaa rahto..

ह्या संपूर्ण मालिकेतून शत्रूला विजय मिळणे शक्य नाही. मिळेल तर तो मृत्युच.>>> राजांना मानाचा मुजरा!!

सेनापती,
अरे किती सविस्तर आणि माहितीपूर्ण लिखाण आहे हे! हॅट्स ऑफ टू यू सर!
हा गड बघायचा कायम मनात आहे, हा लेख वाचून ती इच्छा फार फार दृढ झाली.

प्रत्येक ॠतूत निराळ्याच भासणार्‍या राजगडवर भरभरुन प्रेम करावे असे बरच काही आहे..सही आहे.. कितीही वेळा राजगडला गेलो तरी पुन्हा पुन्हा जाण्याची ईच्छा काही कमी होणार नाही......................................................

झक्क्कास!

व्वा मस्तच सेनापती... Happy
मागच्या वर्षी तोरण्याहुन राजगडावर भ्रंमती केली होती त्याची आठवण झाली.

सेनापती उत्तम लेख , प्र.ची. अप्रतीम Happy
विचार तिथेच म्हणजे सह्याद्रीत फिरत असतात.>>>>> + १००० सह्याद्री च देणं फिटणे नाही या जन्मी तरी

रोहन मस्त,डिसेंबरच्या आठवणी परत ताज्या झाल्या.जाताना भोसलेवादीतुन पाली दरवाजा , सरळ वाट पण लै दम काढते.येताना पद्मावतीच्या चोर दरवाजा, दरवाजा कसला खिडकी फारतर ... डोक वाकुन उतराव लागत आणी उतरताना समोर दरी दिसतेना पार लागते.
चोर दरवाज्याचा फोटो दिसला नाही रे.

बालेकिल्ल्यावरून पद्मावती माची, काळकाई बुरुज आणि पाली दरवाजा असे ३ फोटो नव्याने समाविष्ट केले आहेत.. Happy

Pages