ते तिघे...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

राजेश चांगलाच हुशार होता. म्हणजे शाळेत इतर हुशार विद्यार्थी नव्हते असं नाही, पण राजेश हुशार होता. म्हणजे पाचवीत शाळेत आल्यापासून त्याने पहिला नंबर सोडला नाही. कधी सुनिल, कधी विनय यांनाही मार्क मिळायचे पण ती शेवटच्या पाच दहा मार्कांची उडी त्यांना कधी जमलीच नाही. मग कधी सुनिल दुसरा तर कधी विनय. राजेशच्या त्या हुशारीचं यश मात्र काहीतरी वेगळं होतं. दिवसरात्र तो पुस्तक हातात घेऊन बसालेला असायचा, असं त्याच्या शेजारी रहाणारी पोरं सांगायची. त्याचे वडील शाळेत मास्तर होते. त्यांनी कधी राजेशला पकडून अभ्यासाला बसवलं नसावं, पण तरी आपला मुलगा

भरपूर अभ्यास करून पहिला येतो याचा सार्थ अभिमान त्याना होता, हे पुढे घडलेल्या काही घटनावरून नंतर लक्षात आलं.

पण राजेशच्या या अभ्यासूपणामुळे राजेश एकटाच राहिला. एकतर त्याला इतर कुठल्याही विषयात रस वाटला नाही. त्याच्या बरोबरचे सुनिल, विनय हे गॅदरिंगला असायचे, कधी खेळाच्या मैदानावर उड्या मारताना दिसायचे, कधी चित्रकला स्पर्धेत जिंकले नाही तरी भाग घ्यायचे. त्यामुळे शाळेत त्यांचीही वेगळी ओळख होती, पण राजेश नेहमीच पहिला यायचा.

त्याचा दुसरा एक परीणाम असा झाला की राजेशला शाळेत मित्र कधीच मिळाले नाहीत. एकतर तो म्हणे, आठवड्यातून दोन/तीन वेळा डोक्यावर खोबरेल चोळून शाळेत यायचा. दुसरं त्याला पुस्तकाबाहेरचं जग माहीत नव्हतं. शाळेच्या दिवसात त्याला याचा काहीच त्रास झाला नाही. कधी सगळे एकत्र जमले तरी राजेशची चेष्टा, मस्करी करून मास्तरांकडून मार खायची त्यांची तयारी नव्हती. मुळात राजेशपासून आपल्याला कधी त्रास होईल असं त्यांना कधी वाटलंच नाही. तेव्हा कधी भेटले तर 'काय राजेश, काय वाचतोयस?' यापलिकडे संभाषण गेलं नाही हे तितकच खरं.

दहावीची परिक्षा झाली, निकालही आले. अपेक्षेप्रमाणे राजेश १० वीला शाळेत पहिला. सुनिल, विनय त्याच्यामागे म्हणजे दुसरे/तिसरे आले. शाळेने त्यांच्या प्रथेप्रमाणे मुलांचा सत्कार, बक्षिसं वगैरे केली, आणि हे तिघेही ११ वी सायन्सला भरती झाले.

११ वीचं वर्षं मात्र पूर्णपणे वेगळं वाटू लागलं. एकतर अभ्यासक्रम इंग्रजीत होता, दुसरं त्याला प्रॅक्टीकल नामक एक शेपूट होतं, आणि त्याचे वेगळे गूण मिळू लागले. पुस्तक वाचून जरी परीक्षा देता आली तरी प्रॅक्टीकल मधल्या काही गोंधळामुळे राजेशला मार्क कमी पडले. मुळात फरकाची दरी ५/१० मार्कांचीच होती त्यामुळे यावर्षी सुनिल/विनयचा क्रम वरती लागला. आणि राजेश तिसर्‍या नंबरवर पोहोचला.

राजेशच्या वडिलांना याचा खूपच धक्का बसला. त्यानी शाळेतल्या इतर शिक्षकांना धारेवर धरल्याची बातमी आली. शिक्षक काही करू शकत नव्हते, आणि याचं पर्यावसान, राजेशला त्या शाळेतून काढून एका साखरकारखान्याच्या सुप्रसिध्द शाळेत त्याचा वडिलांनी घातलं.

आता राजेश वसतीगॄहावर पोहोचला. ती शाळा म्हणजे गावची छोटी शाळा नव्हती. वसतीगॄहात दहा गावचं पाणी प्यालेली मुलं होती. त्यात हे वासरू लांडग्यांच्या वस्तीत रहायला आलं. परीणाम व्हायचा तोच झाला. डिसेंबरमधे राजेश शाळा सोडून पुन्हा गावामधे दिसू लागला. बारावीचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्याने कला शाखेत प्रवेश घेतला, आणि मार्च पर्यंत अभ्यास करून बारावीही पास झाला.

पुढच्या शिक्षणासाठी राजेश मुंबईला गेला खरा, पण त्यानंतर तो कुणालाच दिसला नाही, अगदी त्याच्या वडिलांना सुध्दा. तो हरवल्याची बातमी आली, वडिलांनी मुंबईत शोध तपास चालवला, पण नक्की काय झालं काही कळलंच नाही....

*******
समेश असाच एक हुशार मुलगा आहे. लहान असताना तो पुण्याला शाळेत होता. फक्त अभ्यासच नाही तर मैदानी खेळातही तो तसाच प्रविण होता. मित्रमंडळही भरपूर असावं. त्याच्या स्वभावावरून हे आपोआप लक्षात येतंच. पण लहानपणीच आईवडिलांच्या लक्षात आलं की समेश हुशार आहे. मग शिकवण्या, अतिरिक्त वाचन, वेगवेगळ्या परिक्षा मागे लागल्या आणि यातून जाता जाता तो इंजिनियर झाला. लगेच MBA ला प्रवेश घेऊन त्याने तेही पूर्ण करून टाकलं.

समेश आता अमेरिकेला असतो.

समेश आता आईवडिलांना टाळतो. कामानिमित्ताने भारतात आणि पुण्याला वर्षातून दोन्/चार वेळा जाणं होतंच. पण पुण्याला गेल्यावरही घरी दोन / तीन तासावर तो राहू शकत नाही. इथे अमेरिकेतही तो आपल्या भावंडाना टाळण्याकडे त्याचा कल असतो. भावाने कधी पार्टीला बोलावलं असेल, तर पार्टी आधी अर्धा तास अचानक प्लॅन बदलल्याचं कळवतो. अगदीच एकाद्या भाच्या/पुतण्याचा वाढदिवस असेल तर आल्या आल्या 'दुसर्‍या ठिकाणी जावं लागणार असल्याचं' जाहीर करतो, आणि १०/१५ मिनिटात निघतो.
समेशचे आईवडिल नेहमीच त्याची वाट बघत बसलेले असतात.

********
९/१० वर्षांचा राजस आता माझ्या शेजारी रहातो. तसा तो एकुलता एक असल्याने घरातले सगळेच मोठे त्याचे भरपूर लाड करतात. त्याने म्हटलेली कुठलीही गोष्ट त्याला लगेच मिळते. लहानपणापासून त्याच्या उलट उत्तर देण्याच्या कसबाला हुशारी म्हणुन जपल्यामुळे तो कुठे काय बोलेल हेही सांगता येत नाही. घरचे कौतूक म्हणून आणि बाहेरचे 'आपलं काय जातंय?' असा विचार करून त्याचं बोलणं मनावर घेत नाहीत.

पण राजस हुशार आहे. हे त्याच्या आईला कळलेलं आहे. सकाळी ६:३० ला राजस घराबाहेर पडून शिकवणीला जातो. १० वाजता घरी आला की स्कॉलरशिपची शिकवणी शेजारीच असते. दुपारी शाळा होऊन तो संध्याकाळी घरी आला की आई त्याचा अभ्यास घ्यायला बसते. राजसला गॄहपाठ, चाचण्यांची तयारी, स्कॉलरशिपचा अभ्यास, इतर Talent परीक्षांची तयारी करून झोपायला रात्री ११ वाजतात.

मला राजसमधे राजेश दिसतो, कधी समेशही दिसतो. नक्की कळत नाहीय की राजसचा मार्ग असाच काहीतरी असेल की वेगळा असेल?

(समाप्त)..

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Sad साधारण एक असच उदाहरण अगदी चांगल्या ओळखीच्या घरात बघितलं आहे. पण सगळीच मुलं पुढे अशी होत नसावीत (अशी आशा). कारण आपलं पोर 'हुश्शार' आहे अशी जाणीव होणारे खूप पालक असतात.

त्यांच्या आईबाबांनी हे वाचले का ?
पुस्तकात बुडून जाण्यापेक्षाही अभ्यासाची काही इतर तंत्रे आहेत. मार्क्स मिळवायचा हेतू त्या उपायांनी नक्कीच साधतो.

आईवडिलांची महत्त्वाकांक्षा.

यापेक्षा वाईट प्रकार पाहिले आहेत. ५०/५५ टक्के मार्क्स मिळवू शकणार्‍या मुलाला आय आय टी एन्ट्रन्स साठीच्या क्लासला घालतात आणि मग ती पुलं दबावाखाली येऊन आजारी पडतात. कोणाला सांगायचं?

खूप विचार करायला लावणारा लेख आणि नि:शब्द......व्यक्ती तितक्या प्रकृती पण त्या दोघांसारखं आयुष्यात झालेली उदा. असणार हे नक्की....
काहीवेळा आई-बाबा खरंच आपल्या मुलाचा बुद्ध्यांक न ओळखता असं करतात. ती वर सांगितलेली आय आय टी एंट्रंसवाली एक केस मलाही माहीत आहे..इतके क्लासेस करून त्या मुलाला बारावी कशीबशी पास होता आली तरी मग पैसे भरून कुठल्यातरी नव्या निघालेल्या इंजि. कॉलेजलाही घातलं.....होईल रडतखडत कधी तरी इंजि. पण....

अतिरिक्त (कि अतिरेकी) अभ्यास केल्याने (किंवा करायला लावल्याने) मुलं आईवडीलांपासून दूरावतात किंवा स्वतःच्या आयुष्याचे नुकसान करतात असा काही मतितार्थ आहे का ह्या तीन उदाहरणांचा?

अतिरिक्त (कि अतिरेकी) अभ्यास केल्याने (किंवा करायला लावल्याने) मुलं आईवडीलांपासून दूरावतात किंवा स्वतःच्या आयुष्याचे नुकसान करतात असा काही मतितार्थ आहे का ह्या तीन उदाहरणांचा?>>>
दुरावतात कि दुरावत नाही.. तो भाग वेगळा .. मी जितक्या केसेस बघितल्या आहेत तिथे फार कनेक्शन नाहीये.. मुद्दा तो नाहीये.. मुळात बालपण कसं कविते सारखं असावं.. तो काळ कधीच परत मिळत नाही.. त्यात हि तुम्ही न हुंदडता अभ्यास करत बसला छे.. मजा नाही.. मोठं झाल्यावर बालपणात रमायला काय मज्जा असते.. तुम्ही ती मज्जा मिस केली असेल तर कशात रमवाल स्वतःला..

ही गोष्ट 'फॉर्म्युला काकू' आणि कुमॉन मधून निर्माण झालीये का? (त्यावरुन तुम्हांला लिहायचा सुचली का?)

हो.. कुमॉनवर झालेल्या चर्चेतून अचानक ही माणसं आठवली (माणसं खरी आहेत, काही नांवे खरी नाहीत).

एक माहिती असलेली केस -

सचिन नावाचा ८ वीतला मुलगा. पुण्यात एका राष्ट्रीय शाळेत जातो (सर्व राज्यात या शाळेच्या शाखा आहेत). शाळा घरापासून सुमारे १६ किमी अंतरावर आहे. शाळा सकाळी ७.१५ की ७:३० ला सुरू होते. याच्या घरापाशी शाळेची बस पहाटे ५:५० ला येते (म्हणजे हा उशीरात उशीरा ५:१५ पर्यंत उठत असावा). शाळा दुपारी अडीचच्या सुमाराला सुटते. एकूण रोजचा प्रवास = ३२ किमी, एकूण प्रवासाचा वेळ = अडीच ते पावणेतीन तास प्रतिदिन

आठवड्यातले ३ दिवस संध्याकाळी २ तास सचिन अ‍ॅडव्हान्स्ड सायन्सच्या शिकवणीला जातो. शिकवणीचे ठिकाण त्याच्या घरापासून ५-६ किमी आहे. एकूण प्रवास = १०-१२ किमी, एकूण प्रवासाचा वेळ = ३०-४० मिनिटे प्रतिदिन (आठवड्यातले ३ दिवस)

आठवड्यातले ४ दिवस तो एका विशिष्ट खेळाच्या सरावाला जातो. या खेळात त्याने जिल्ह्यात प्रावीण्य मिळविले आहे व त्यामुळे तो महाराष्ट्र राज्याच्या संघात निवडला गेला आहे.

दर रविवारी तो २ तास तबला शिकतो.

दर सोमवारी शाळा एका विषयाची ५० गुणांची परीक्षा घेते. यातले गुण हे एकूण गुणात धरले जातात.

१५ ऑगस्टला शाळेत होणार्‍या एका नाटकात सचिनला घेतले आहे. त्याच्या सरावासाठी त्याला काही दिवस द्यावे लागतात.

सचिन काही महिन्यांपूर्वी गंभीर आजारी पडला. तीव्र पोटदुखीने त्याला २ आठवडे शाळेत जाता आले नाही. डॉक्टरांनी तीव्र आम्लपित्ताचे निदान केले आहे. तो त्यासाठी अ‍ॅलोपथी व आयुर्वेदिक अशा २ डॉक्टरांची औषधे घेतो.

पोटदुखीच्या काळात तो फक्त सोमवारी परीक्षेसाठी शाळेत जात होता इतर काही दिवस नाटकाच्या सरावासाठी जात होता. जर त्याने नाटकाचा सराव बुडवला तर त्याला नाटकातून काढून टाकतील. त्यामुळे नाटकाचा सराव बुडवून चालणार नाही.

आता सचिनने व त्याच्या पालकांनी नक्की काय करावे?

(ही सत्य घटना आहे. फक्त नाव बदलले आहे.)

मास्तुरे, त्या सचिनचे सगळे क्लास आधी बंद करा म्हणावं. झोप पुरी होत नसल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होतोय. बिचार्‍याला पूर्ण झोप मिळेल एवढं पाहिलं पाहिजे. त्यातून मुलांना जास्त झोप आवश्यक असते. त्याला ज्या गोष्टीत मनापासून रस असेल त्या करू देत आणि नावाजलेली शाळा यात खरं तर काही अर्थ नसतो. जवळच्या म्युनिसिपल शाळेत घातलं म्हणून काही फरक पडत नाही. मुलाची कपॅसिटी असेल तितकंच तो शिकणार!

जवळच्या म्युनिसिपल शाळेत घातलं म्हणून काही फरक पडत नाही. मुलाची कपॅसिटी असेल तितकंच तो शिकणार!<<<
ज्योतीताई, हे वाचून काय बरं वाटलंय मला. Happy

हे वाचून काय बरं वाटलंय मला. >>> अगदी अगदी मला पण Happy पुण्यातील अडीच-तीन वर्षांच्या मुलांच्या शाळाप्रवेशाचे भयाण(माझ्यादॄष्टीने) वास्तव इतकं जवळून पाहिल्यामुळे हे अगदी पटतं.सुदैवाने मुलांच्या कलाने घेणारी,त्यांच्या pace नेच पुढे जाणारी,उत्तम शिक्षक असलेली माँटेसरी मिळाली होती. घरापासून थोडी लांब पण सोयीची जाण्यायेण्याच्या दॄष्टीने अशी होती.सतत लोकांना मी या शाळेत का घातलंय मुलाला हे सांगून सांगून कंटाळायचे Happy ' मुलांना त्यांच्या वयाला साजेशा स्पीडने पुढे जाउ द्यायचं नंतर ते एकदम boost होतात वेळेवर स्वतःच्या क्षमतेप्रमाणे' या विचारामुळं अनेकांचे तु.क. झेलले आहेत Happy

माझ्या मुलाचे काही मित्र, सातवी पासुन IIT च्या प्रवेशपरिक्षेच्या पुर्वतयारीच्या क्लास् मधे प्रवेश मिळवण्याच्या क्लास ला जातात Uhoh
हे अती होतय नाही का? आणि माझ्या कामासन्दर्भात एका iit च्या डायरेक्टरांशी बोलताना ते म्हणाले, की मुल अशा प्रकारे अभ्यास करुन येतात पण प्रवेश मिळाल्यावर तिथे पुस्तकी आणि केवळ परिक्षा तन्त्र अवगत असलेली मुल मागे पडतात. आत्महत्या करण्याच प्रमाणही मोठ आहे.
आपली मुल ह्या सगळ्यात शिकण्याचा आनन्दच हरवतायत. Sad

१> आम्ही खूप ज्यूनीयर असल्यामुळे, 'राजेश'ची केस पूर्ण-पणे माहीत होती/ आहे...

२> 'राजस' पूर्ण माहितीतला आहे. 'राजस'च्या हुषारी बद्दल (सगळ्या प्रकारच्या हुषारी बद्दल) दुमत नाही. 'राजस'ची केस त्याची आई स्वतःच पूर्ण-पणे हाताळत असते. राजसच्या 'बाबा'चं म्हणणं, 'त्याला जे काही करावं असं वाटतंय, ते करु दे. आपण फक्त त्याच्या शिक्षणावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे'. राजसच्या आईला ही गोष्ट पटत नाही. तिचं म्हणणं 'सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपला मुलगा मागे राहता नये. त्याला स्पर्धेची सवय व्हायला हवी...' दोघांचेही दृष्टीकोन आपल्याला पटतात. पण जेव्हां थोडंसं खोलात, आणी आड-मार्गाने राजसच्या आई बरोबर चर्चा केली, तेव्हां लक्षात आलं, राजस बाबतची तिची तळमळ योग्य आहेच, पण... सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आईला आपल्या ऑफिसातल्या सहकार्‍यां सोबत 'स्पर्धा' जिवंत ठेवायची आहे. राजस च्या आईने, पदवी धारण करताना आपल्या आवडिच्या विषयात अक्षरशः जीव जाई पर्यन्त अभ्यास करून 'फर्स्ट क्लास' मिळवलेला होता. आणी नंतर येणे प्रमाणे Financial Sector मधे नोकरी करायला सुरुवात केली. पण... आज खरी परीस्थीती अशी आहे, आईच्या आवडिच्या विषयातली अगदी Basic शंका जर 'राजस'ने विचारली तर, आईला त्या शंकेचं निरसन करता येत नाही... आणी त्या साठी 'राजस'ला Tution Class वरच अवलंबून रहावं लागतंय... आईच्या ऑफिसमधल्या एका सहकार्‍याची मुलगी तीन वर्षां पूर्वी बारावीची Board Rank मिळवून यशस्वी झाली... राजसच्या शेजारीच रहाणार्‍या आईच्या दुसर्‍या सहकार्‍याची मुलगी दोन वर्षां पूर्वी दहावीच्या परीक्षेची Board Rank मिळवून यशस्वी झालेली आहे.... आणी म्हणूनच 'राजस'ची आई सध्या अक्षरशः 'पेटून उठलेली' आहे...

पण या विरुद्धचं एक उदाहरण मी स्वतः बघीतलेलं आहे, ते लिहितोयः- सिंधुदूर्गातल्या कुडाळ सारख्या खेडे-वजा-गाव-कम-शहर अशा ठिकाणी 'बाल-रोग-तज्ञ' म्हणून Practice करणार्‍या एक डॉक्टरबाई. ३५ वर्षां पूर्वी पुण्याच्या B J Medical कॉलेज मधून Pediatrics ह्या विषयात सुवर्णपदकासह 'निष्णात' पदवी धारण करून बाई कुडाळात आल्या. 'Brilliancee हा शाप' ठरलेलं उदाहरण, म्हणजे या डॉक्टरबाई. त्यामुळे 'नीट'पणे 'संसार' कधी घडलाच नाही. कुडाळातल्याच एका अती-तल्लख बुद्धी-मत्ता असलेल्या वकीलाच्या संपर्कात या बाई आल्या. वकील देखील अती-तल्लख पणाच्या ताणाखाली येऊन पूर्ण-पणे 'दारू'च्या आहारी गेलेला. त्यामुळे दोघांचं जास्त दिवस काही पटलं नाही, पण जे काही दिवस पटलं त्यातून बाईनी एका 'मुली'ला जन्म दिला. मुलीला ओळख दिली वकीलाची, आणी पालकत्व आपण स्विकारलं. काही काळाने 'वकील' महाशय 'स्वर्गवासी' झाले. मुलगी मोठी होऊन दहावीत दाखल झाली, आणि तिने जाहीर केलं 'मला कॉलेज जीवन खरंखुरं अनुभवायचं आहे'... बाईनी मुलीला पूर्ण परवानगी दिली. दहावी नंतर मुलीने ARTSला प्रवेश घेतला. ११वी ते B.A.चं शेवटचं वर्ष मुलीने कॉलेज अक्षरशः अनुभवलं. Psychology हा विषय घेऊन मुलीने M.A. पूर्ण केलं. मधल्या काळात मुलीने वडिलांच्या कायद्याच्या पुस्तकां वरची धूळ झटकून अभ्यास केला. आज हीच मुलगी Labor Law आणी Industrial Psychology या दोन विषयांची सांगड घालून पुण्यातल्या Industrial Belt मधे Industrial Psychology Consultant म्हणून यशस्वी पणे काम करत आहे... पालकांनी योग्य तर्‍हेने मार्ग-दर्शन केलं आणी मुलांना 'निर्णय' घेण्याची सवय लावली, तर अशा चांगल्या गोष्टी देखिल घडू शकतात... गरज आहे, 'पालकांनी स्वतः सु-शिक्षीत होण्याची'...

लेख वाचून असा विचार आला की, पालकांचे उद्बोधन वर्ग घेण्याची गरज आहे. स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्यांना घोड्याच्या शर्यतीत धावायला लावणार्‍या पालकांना आवरले पाहिजे. पोरांना नीट वळण लावले नाही तर पोरं पुढे बिघडतील अशा विचारानं धास्तावलेले पालक आपल्या आजूबाजूला दिसतील. मुलं मोकळी जगू द्या...!

असो, चांगल्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्स ज्यो-का.........!

-दिलीप बिरुटे

>>> माझ्या मुलाचे काही मित्र, सातवी पासुन IIT च्या प्रवेशपरिक्षेच्या पुर्वतयारीच्या क्लास् मधे प्रवेश मिळवण्याच्या क्लास ला जातात

IIT फाऊंडेशनच्या शिकवण्या ८ वी पासून सुरू होतात. IIT परिक्षा अत्यंत कठीण असल्याने, त्याच्या पूर्वतयारीसाठी, IIT चे प्रशिक्षण देणार्‍या बहुतेक सर्व नावाजलेल्या प्रशिक्षण संस्था IIT साठी ८ वी ते १० वी या ३ वर्षांत मूलभूत तयारी करून घेतात. नंतर ११ वी व १२ वीत प्रत्यक्ष IIT चे प्रशिक्षण देतात. या विद्यार्थ्यांना - स्पर्धात्मक परीक्षा, अत्यंत अवघड असलेले वस्तुनिष्ठ प्रश्न कमी वेळात सोडविणे, निगेटीव्ह गुण - यांचा सराव होण्यासाठी फाऊंडेशन प्रशिक्षण आवश्यक आहे. थेट ११ वीतच IIT ची तयारी सुरू करून IIT त पहिल्या ९ हजारात (अंदाजे ५ लाख विद्यार्थ्यांमध्ये) स्थान मिळविणारे अगदी थोडे असतात. ११ वीत सुरूवात केली तर बहुतेकांना IIT चा अभ्यासक्रम अत्यंत अवघड जातो. पण ८ वी पासून सुरूवात केली तर IIT ची परीक्षा तुलनेने कमी अवघड जाते.

Sad

त्या सचिनच्या बाबतीत मला सगळ्यात खटकलेली गोष्ट म्हणजे त्याचा खेळाचे कोच, सायन्स आणि तबल्याच्या क्लासचे शिक्षक, नाटक बसवणारे वगैरे कुणालाच त्याचे स्केड्युल खटकले कसे नाही. आई-वडील मूर्खासारखे पोराला रेसच्या घोड्यासारखे धावायला लावतात पण निदान कोचने तरी मुलाशी संवाद साधून आईवडिलाना वेळीच समज द्यायला हवी होती. बाकी या राज्यपातळीवर खेळणार्‍या मुलाला स्वतःला नक्की काय ह्वय?

त्या मुलाच्या आईशी मी बोललो होतो. त्याची लांबची शाळा बदलून घराजवळची शाळा निवडा किंवा तुम्ही त्याच्या शाळेजवळ घर घ्या असे मी सुचवले होते. तसेच त्याचा तीव्र आम्लपित्ताचा आजार अल्सरमध्ये बदलू शकतो हा देखील इशारा दिला होता. त्यावेळी त्याच्या आईने त्याच्या सर्व गोष्टींचे समर्थन करताना, त्याच्या मोठ्या भावाचे देखील हेच स्केड्यूल होते व ते त्याने समर्थपणे निभावले होते असे सांगितले होते. काही दिवसांनी त्याने "अ‍ॅड्व्हान्स सायन्स" ची शिकवणी बंद केली. पण इतर गोष्टीत काही बदल केला का नाही याची कल्पना नाही.

मला अजून एक केस माहिती आहे. या ९ वी तल्या मुलाला शाळेव्यतिरिक्त प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या क्लास साठी एकूण १३ वेळा शिकवणीला जावे लागत होते (३ दिवस तबला, २ दिवस चित्रकला, ३ दिवस गाणे शिकणे, २ दिवस उच्च गणित इ.). त्याला जर एखाद्या विषयात कमी गुण मिळाले तर त्याचे पिताश्री त्याच्याशी २-३ दिवस बोलणेच बंद करायचे. ९ वीत उच्च गणिताच्या शिकवणीच्या (हा IIT फाऊंडेशनचा क्लास होता) परीक्षेत खूप कमी गुण मिळाल्याने त्याला १० वी साठी प्रवेश दिला नाही. त्यावेळी त्याने आपल्या डोक्यावरचा आठवड्यातल्या १३ सेशन्सपैकी निदान २ सेशन्सचा तरी भार कमी झाला, यामुळे त्याने सुटकेचा निश्वास टाकला होता.

Pages