अशी आमुची इंग्रजी मायबोली

Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2012 - 22:50

गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.

काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.

ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?

काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.

- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -

द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे

daily alarm = रोजचा गजर

'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'

नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे

सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या

दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या

आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी

चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित

गुलमोहर: 

मंदार,

तुझं मराठी पाहून तू इंग्रजी माध्यमातून शाळा शिकला आहेस हे खरं वाटंत नाही. याबद्दल जोरदार अभिनंदन!

तुझा मुद्दा १००% पटला. मी स्वत: बोली आणि लेखी दोन्ही मराठीत बिनधास्त मराठी शब्द वापरतो. समोरच्याला न कळल्यास पुढे इंग्रजी प्रतिशब्द वापरून मुद्दा स्पष्ट करतो. ११ वीला महाशाळेत (कॉलेजात) गेल्यावर लोक उगीच चमकोगिरी करायला इंग्रजी शब्द मराठीत घुसडत. त्याला माझा तीव्र आक्षेप असे आणि आहे. मुद्दाम घुसडलेल्या इंग्रजी शब्दांना मग बाहेर काढणं मुश्कील होतं.

शिवाय या प्रकारामुळे इंग्रजी बिघडतं ते वेगळंच! इंग्रजी चांगलं करायचं असेल तर मराठीतून विचार इंग्रजीत अनुवादित (केवळ भाषांतरित नव्हे) करता आला पाहिजे. याकरिता मराठी शुद्ध बोलणं अत्यावश्यक आहे. आपण मराठीला मायमर्‍हाटी मानतो. ती केवळ बडबडण्याचं माध्यम नाही. अनावश्यक इंग्रजी शब्दांमुळे भाषा धेडगुजरी (creolised) होते. आपलं तसं नाही. आपल्याला दोन्ही भाषा व्यवस्थित यायला हव्यात कीनाय? Happy

इंग्रजीत परभाषिक शब्द किती चपखलपणे बसलेत याचं उदाहरण वर आलंय. पण इंग्रजी ही मुळातून धेडगुजरी भाषा आहे हे आपण विसरता कामा नये. ना धड ब्रिथॉनिक, ना धड जर्मेनिक अशी काहीशी मधल्यामध्ये लटकलेली भाषा आहे.

इंग्रजी जगाचीबिगाची भाषा झाली ते ब्रिटिशांच्या पराक्रमामुळे. भाषिक सामर्थ्यामुळे नव्हे.

त्यातूनही परभाषिक शब्द मराठीत आणायचे झाल्यास निरूक्त नावाचे शास्त्र अनुसरता येते. हे शास्त्र मूळ संस्कृतसाठी आहे. त्याचे योग्य प्रकारे मराठीकरण करता येईल. आपल्या मायमर्‍हाटीची विविधांगे आपणच समृद्ध केली पाहिजेत.

आ.न.,
-गा.पै.

पैलवान तुमच्या संपूर्ण पोस्टला जोरदार टाळ्या...
मंदार - मस्तच लेख रे...आणि मुद्दामून वाकड्यात शिरणार्या लोकांकडे दुर्लक्ष कर...कितीही समजावले तरी त्यांना समजाऊन घेण्याची इच्छाच नाहीये...

महाशाळा- कॉलेज..?

पैलवानमामानी नवीन शब्द काढला वाटतं.. महाविद्यालय ऐकला आहे..

के जी म्हणजे काय? लघुशाळा का? आणि मॉर्निंग लॉ कॉलेज म्हणजे प्रातरविधी महाशाळा का?

मंदार,
१००% सहमत. जसे मराठीत इंग्रजी शब्द वापरणे कमी केले पाहिजे तसे मराठी शब्दांचे बळंच इंग्रजीकरण करणेही मला विचित्र वाटते. उदा. माबो वर सर्रास वापरले जाणारे 'धन्यु' आणि 'धन्स'!

जामोप्या,

जसं, विद्यालय = शाळा

तसंच, महाविद्यालय = महाशाळा

उरलेला सर्वस्वी आपला कल्पनाविलास आहे. त्यात मी सहभागी होऊ इच्छित नाही. त्याबद्दल क्षमस्व! Happy

आ.न.,
-गा.पै.

मंदार, छान लेख. पटला पण अवघडच आहे. तरी माबोवर आल्यापासुन गेले १.५ वर्षं खुपच प्रयत्न करते आहे मी.

चौकट राजाशी एकदम सहमत. >> जसे मराठीत इंग्रजी शब्द वापरणे कमी केले पाहिजे तसे मराठी शब्दांचे बळंच इंग्रजीकरण करणेही मला विचित्र वाटते. उदा. माबो वर सर्रास वापरले जाणारे 'धन्यु' आणि 'धन्स'!>>> मलाही फार विचित्र वाटतात हे दोन शब्द. अजिबात आवडत नाहीत.

पटला तुमचा मुद्दा.
मराठी शब्दांचे बळंच इंग्रजीकरण करणेही मला विचित्र वाटते. उदा. माबो वर सर्रास वापरले जाणारे 'धन्यु' आणि 'धन्स'!>> +१

मंदार, छान लेख, पटला ..
योगायोगाने मी आजच एक बाफ उघडलाय पण नाईलाजाने त्या कोर्सेस ची नावे (brand म्हणा हवं तर) तशीच आहेत त्यामुळे त्यात बदल नाही करु शकत Sad Happy

श्री.मंदार जोशी यानी एका चांगल्या आणि तितक्याच निकडीच्या विषयाची सोदाहरण केलेली मांडणी मला फार भावली. त्यातही श्री.जोशी आपले शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण झाल्याची कबुली देतात आणि तरीही मराठीवरील प्रेमापोटी अशा थेट मुद्द्याच्या विषयाला चर्चेसाठी समोर आणतात त्याबद्दल तर त्यांचे विशेष अभिनंदन. कारण मी पाहिले आहे की, आपल्या मुलाला/मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले की पालक त्याच्याशी घरी बोलताना - स्वतःला येत नसले तरी - मुद्दाम इंग्रजीतून संवाद साधत असतात. अत्यंत बेगडी वाटते मला त्यांचे तसले वर्तन. मराठीला पिछाडीवर टाकण्यात या अशा सुशिक्षितांचा जितका वाटा आहे तितक्या परराज्यातून येणार्‍यांचाही नसेल.

पुण्यातील "सांगवी"....पिंपरी-चिंचवड हा भाग संपूर्णतः मराठी बोलणार्‍या लोकांचा आहे हे मानलेच पाहिजे. मी परवा मुलाकडे सांगवीत आलो होतो त्यावेळी रात्री भोजन झाल्यावर काटेपुरम चौकातील एका आईस्क्रिमच्या दुकानात आम्ही आलो होतो. तिथे बर्‍यापैकी गर्दी होती. तो विक्रेता आमच्याशी मराठीत संवाद करत होता. त्यावेळी शेजारी एक जोडपे आणि त्यांची दोन मुले आली. मुलगा 'भैय्या मुझे चॉकलेट केक देना" त्यावर बापराव त्या भैय्याला इंग्लिश-हिंदी भाषा ऑर्डर देते झाले, "टू चॉकोलेट केक्स अ‍ॅण्ड वन फॅमिली पॅक और एक लिम्का की बॉटल भी देना".....काऊंटरवरील नोकराने ती ऑर्डर पुरी केली. आम्हीही बाजूलाच बसलो आणि कानावर त्या बापाचा आवाज आला, ते पोरांच्या आईला सांगत होते, "अगं, तू थोड्यावेळाने खा. आईस्क्रिम फारच थंड आहे". मी सर्दच. मराठी भाषाप्रेमी म्हणून मी सहज त्याना विचारले, "माफ करा, पण तुम्ही महाराष्ट्रीयन आहात ना ?"
"हो....मग?" श्रीयुत बाप.
"मग म्हणजे, तो काऊंटरवरील मुलगा आणि मालक दोघेही मराठा आहेत, तुम्हीही आहात हे मी आता ऐकलेच, मग असे असताना तुम्ही ऑर्डर इंग्रजी आणि हिंदीत का दिली ?"
"अहो, त्यात ख्खाय झालं. आजकाल इथे तिच फॅशन आहे. मुलांना इंग्रजी शब्द कळायला नको का ? तुम्ही कुठले ?"
मी कुठला हे त्याला सांगण्यात काय अर्थ नसल्याने, पुण्याच्या उपनगरी छोट्या छोट्या गावातून सार्वजनिक स्थळी मराठी न वापरणे ही 'फॅशन' होत चालली आहे तर खुद्द पुण्याच्या पोटात मराठीचे स्थान किती धोक्यात आले असेल याचे नव्याने ज्ञान झाल्याने तिथून निघणे श्रेयस्कर समजले.

सारांश, कितीही पारिभाषिक शब्द मराठीसाठी इथे रुजविण्याचे प्रयत्न शासन आणि मराठीची काळजी बाळगणार्‍यांनी संयुक्तरित्या केले तरी जोपर्यंत अशा मनोवृत्तीच्या पालकवर्गांकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत मराठीची अवहेलना चालू राहणे क्रमप्राप्त आहे असे विषादाने म्हणावे लागत आहे.

जन्माने आपण 'मराठी' आहे म्हणून ही भाषा अथपासून इथपर्यंत आपल्याला अवगत आहे अशी एक सोयिस्कर समजूत आपण करून घेतलेली असते. पण मी अनुभवाने हे म्हणू (म्हणजे इथे लिहू) शकतो की विचारप्रवर्तनाची कुवत असलेली मराठी आपल्याला बोलीभाषेतून नव्हे तर सखोल वाचनामुळेच अवगत होऊ शकते. रोजच्या व्यवहारात इंग्रजीमधून इथे रूढ झालेल्या शब्दांचा वा वाक्य समुदायांचा वापर एकवेळ मान्य करावा असे जरी असले तरी विज्ञानातले गहनतम सिद्धान्त मराठीतून मांडण्याइतके मराठी आपल्या शिक्षकांना/प्राध्यापकांना अवगत नाही ही चिंतेची गोष्ट आहे. विजानाची प्रमेये सिद्धान्त प्रयोगशाळातील घडामोडी ह्या हट्टाने 'इंग्रजी' मधूनच (ग्रामीण भागातील महाविद्यालयातूनही) मांडली जात असल्याने विद्यार्थी आपल्या शंका मराठीतून विचारण्यास कचरतात आणि इंग्रजीमधून त्या प्रभावीरितीने मांडता येत नसल्याने तो व्याख्याता वर्गात काय सांगत होते हे फक्त तो 'श्रवण' करतो. विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे माध्यम 'इंग्रजी' असते हे मान्य, पण वर्गात मुलाने/मुलीने मराठीत शंकानिरसन करण्याविषयी विनंती केली तर खुद्द त्या प्राध्यापकालाच मराठी पर्यायी व्याख्या अवगत नसल्याने मराठीतून विचारलेल्या शंकेची फोड ते इंग्रजीतूनच करतात [हे मी पाहिले आहे.] विद्यार्थीही 'समजले मला' असा असहायतेने आपल्या मुद्रेवर भाव आणतो.

मी असा आग्रह बिलकुल धरणार नाही की प्रत्येकाने व्यवहारातील उपयोगासाठी पर्यायी मराठी शब्द शोधले पाहिजेत. असे असले तरी "मंदार उद्या रेल्वेने दिल्लीला जाणार आहेत" हे वाक्य त्यातील 'रेल्वे' या इंग्रजी नामामुळे अमान्य करावे असे मानू नये. पण त्याऐवजी 'मंदार उद्या एरोप्लेनने दिल्लीला जाणार आहेत' ही वाक्ययोजना खटकेल. कारण इथे 'विमान' हा योग्य आणि सर्वमान्य पर्याय असताना तसे इंग्रजीतील नाम का उपयोगात आणले गेले याचा खेद वाटेल.

पोस्ट, एस.टी., टॅक्सी, गॅस, लाईट, हाय वे.....अशी काही रोजच्या जीवनातील नामे आहेत की ज्यांच्या वापर करणार्‍याला वा ऐकणार्‍याला वावगा वाटत नाही.

अशोक पाटील

मला ते धन्स, कॉलणे,बिझणे, मिसणे वगैरे खटकतात..

नवीन शब्दाची उत्पती अशीच होते वगैरे कोणी तरी भांडेल.. तर भांडो बापडो..
पण काहीतरी कानाला एकायला बरे वाटेल असे तरी निर्माण करा ना शब्द... नाहीतर आहे तेच वापरा.. स्वतःपुरते पण. लोकांसमोर कशाला. Proud

मंदार, अहो टिचकी = क्लिक. तुमच्या लिखाणातील एक शब्द सो सहज वापरात आहे तो सुचवला. Happy

माझेही पुर्ण शिक्षण ईंग्लिश माध्यमातून झाले. पन पुण्यात आले व मराठी शिकले(गुजराती असून).
माझ्यापेक्षा मराठीच लोकं ईंग्रजी बोलतात.

>>कितीही पारिभाषिक शब्द मराठीसाठी इथे रुजविण्याचे प्रयत्न शासन आणि मराठीची काळजी बाळगणार्‍यांनी संयुक्तरित्या केले तरी जोपर्यंत अशा मनोवृत्तीच्या पालकवर्गांकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत मराठीची अवहेलना चालू राहणे क्रमप्राप्त आहे असे विषादाने म्हणावे लागत आह>><<

अहो त्यात काय आपण एखादा दिवस मभादी म्हणून साजरा करू ना. तेव्हा हवे तेवढे मराठी बोलु. Wink

कारण मी पाहिले आहे की, आपल्या मुलाला/मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले की पालक त्याच्याशी घरी बोलताना - स्वतःला येत नसले तरी - मुद्दाम इंग्रजीतून संवाद साधत असतात

Proud

मंदार Happy भाषेवर प्रभुत्त्व असलं की असल्या सरमिसळीचा आधार घ्यावा लागत नाही. पण बरेचदा काही शब्द सुचत किंवा आठवतच नाहीत, मग परक्या भाषेच्या कुबड्या वापराव्या लागतात. बरं परकी भाषाही त्याला अपवाद नाहीच... इंग्लिश असो नाहीतर हिंदी. आपण ही सरमिसळ करतोच. पण तसा अ‍ॅटिट्युड डेव्हलप होता कामा नये.... सॉरी सॉरी.... चुकलं... अशीच सवय अंगवळणी पडता कामा नये. जाणीवपूर्वक सरमिसळविरहित भाषा बोलायचा प्रयत्न करायलाच हवा. अर्थात, काही शब्द आणि संकल्पनांची ओळखच दुसर्‍या भाषेतून होते, तेंव्हा त्याला आपल्या भाषेत बोजड प्रतिशब्द शोधून/ निर्माण करुन तो वापरणेही बरोबर नाही. हास्यास्पद होते मग आपलीच भाषा, नाही का? Happy

मंदार,
मराठी भाषेबद्दल कळकळ समजली, मान्य आहे. हे असे धागे खरे तर "मायबोली" पुरते याही पूर्वी येवून गेले आहेत. मात्र हा धागा एकंदर मराठी भाषा असा व्यापक आहे एव्हडेच. तुझे म्हणणे पटले तरी अनेक मुद्द्यांची सरमिसळ होत आहे असे वाटते, जसे- बोली भाषा, लिखीत भाषा, रोजच्या व्यवहारातील भाषा, एकंदरीत भाषेचे रूप, वगैरे..
सर्वाच्या मुळाशी मराठी बद्दल आत्मीयता असली तरी प्रत्त्येक संदर्भात भाषेचे प्रकटीकरण निश्चीतच वेगळे असायला वाव आहे. आजच्या समस, फेसबुक (चेहेरा पुस्तक), ट्विटर (वटवट?), व एकंदर तंत्रज्ञाच्या माध्यमातून अगदी जवळ आलेल्या युगात आता संस्कृती देखिल "मोबाईल" होवू पहाते आहे. त्यात गैर काहीच नाही. त्यामूळे अनवधानाने वा अंगवळणी पडल्याने म्हणा आता अनेक "ऊपरे" शब्द मराठीत आपले होवून आले आहेत. भाषेचा मूळ उद्देश दुसर्‍यापर्यंत आपले म्हणणे पोचावे एव्हडाच (हाच मुख्य) असेल तर आणि त्यातूनही बहुभाषिक समाजात वावरत असू तर ईतर शब्दांचा वापर (ऑफीस, मोबाईल, ट्रेन, रिझर्वेशन, फ्लाईट, ईत्यादी) जे सर्वांना समजतात ते मराठीत वापरले तर फार काही बिघडणार नाही. आता त्यामूळे भाषेचा र्‍हास होईल ती भ्रष्ट वगैरे होईल का हे फारच सापेक्ष व व्यापक चर्चेचे मुद्दे आहेत.
काही गोष्टि मात्र ज्या निश्चीत खटकतात त्या सुधारता येतील-
मराठी वाहिन्यांवरील अनेक कार्यक्रमातून देखिल सर्रासपणे वापरले जाणारे हिंदी, ईंग्रजी शब्दांचा वापर..
मराठी माणसे एकत्र भेटतात, बोलतात तेव्हा केलेला ईतर भाषेतील (ईंग्रजी, हिंदी) शब्दांचा वापर..
घरातील सर्व लोकांनी एकमेकांशी बोलताना केलेला ईतर भाषेतील शब्दांचा वापर..
छापील व ईलेक्ट्रॉनिक मराठी मिडीयात देखिल वापरले जाणारे ईतर अमराठी शब्द..
महाराष्ट्रातील दुकान, कार्यालये ई, मधील अमराठी पाट्या..

तेव्हा अनेक गोष्टी आहेत... प्रत्त्येकाची कारणमिमांसा, संदर्भ, व गरजा वेगळे असतील..

पण जसे काही दाक्षिणात्य प्रांतात हिंदी वा ईंग्रजी (येत असूनही) न बोलण्याचा हेकेखोरपणा वा ऊद्दामपणा जितका ईतरांसाठी गैरसोयीचा ठरतो तसेच आपल्या भाषेचा अभिमान वा वापर हा मात्र ईतरांसाठी गैरसोयीचा होणार नाही हे पहाणे मला तरी आजच्या काळात महत्वाचे वाटते. त्यासाठी आपल्याच भाषेचे डाऊनग्रेडींग (अवमूल्यन) वा संमिश्रण करणे गरजेचे नसले तरी, आपली भाषा सर्वसमावेशक असावी असे मात्र वाटते. त्यामूळे भाषेचा वापर, भाषेतून होणारे व्यवहार हे "सुलभ" व्हावे असा हेतू असावा. त्यामूळे अट्टहास हा "सुसंवाद" साधण्यासाठी असावा त्या अनुशंगाने भाषा देखिल लवचिक असली तर काही नुकसान होईल असे वाटत नाही.

हां आता लिखाणात किमान दर वेळी शुध्द मराठीच वापरावे असा आग्रह अनाठायी वाटत नाही. बोली भाषेत वा दैनंदीन व्यवहारात ते कितपत ऊतरेल हे सांगणे अवघड आहे. वर अशोक यांनी स्पष्ट केले तसे आपणच आपल्या भाषेच्या जतन व समृध्दी साठी प्रथम झटणे गरजेचे आहेच. पण ते करताना आपली भाषिक ओळख निव्वळ ईतर भाषेतील शब्दांच्या रोजच्या वापराने पुसली जाणार नाही ही काळजी घेतली तरी एकंदर भाषेचे अस्तित्व, भविष्य, दर्जा ईत्यादीबद्दलच्या अनेक शंका ऊगाच बाऊ वाटणार नाहीत.

रच्याकने: लिंगनिरपेक्षता संबंधीत बाफ वरील संपूर्ण चर्चा वाचल्यावर अजूनही आपल्याच भाषेच्या अर्थ, वापर ईत्यादीबद्दल किती गोंधळ आहे हे जाणवले. Happy तीच फूटपट्टी ईथे लावायची तर भाषेच्या वापरात जे सहज, नैसर्गिक आहे ते राहू द्यावे ऊगाच ओढून ताणून वा कृत्रिम वापराने गोंधळात भर पडण्या पलिकडे विशेष काही साधले जात नाही.

सारांश,
>>आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.

असे काही होत आहे असे वाटत नाही.

अगदी बरोबर आहे. आणि आजकाल तर ते स्टार माझा वैगेरेवर मिंग्लीश बातम्यांचा कहरच करतात (ईकडे TV Channel ला पर्यायी सुचल नाही म्हणुन त्याचा उल्लेखच टाळला Sad

>> मराठी वाहिन्यांवरील अनेक कार्यक्रमातून देखिल सर्रासपणे वापरले जाणारे हिंदी, ईंग्रजी शब्दांचा वापर >>
ते ऐकून तर मनाला यातना होतात. संवादामधे अजिबात गरज नसताना केवळ 'हटकेपणा' दाखवण्यासठी किंवा ओढूनताणून विनोद निर्माण करण्यासाठी जेव्हा इंग्रजी शब्द घुसडले जातात तेव्हा संवाद लेखकाची कीव येते.

@लंपन,
>>>शुद्ध मराठीत बोलले की लोक एकदम विचित्र नजरेने पहातात.. २-४ विंग्रजी शब्दांची पेरणी केली की मग तुम्ही त्यांच्यातलेच एक होऊन जाता.. >>>>>> १००% पटलं. इथे मुंबै-पुणे वाद घालायचा नाहीये पण माझ्या अनेक मैत्रिणी ज्या या दोन गावातल्या आहेत त्यांना साधं, सोपं मराठी कळत नाही. मग त्यांच्यातलेच एक होऊन जाण्यासाठी पर्यायी शब्द वापरलेच जातात. Sad
पण जाणीवपूर्वक प्रयत्न केलाच पाहिजे.

लेखकाशी बर्‍याच प्रमाणात सहमत आहे. सोपे, सुटसुटीत मराठी शब्द वापरायला काहीच हरकत नाही.

या निमित्ताने मला बरेच दिवस छळणारा एक प्रश्न आठवला. खालील वाक्ये पहा.

स्वतंत्र block अगदी tiny आहे.
असल्या अनुभवाने माणूस wiser होत असला तरी त्याचवेळी त्याने sadder व्हावे लागते ही त्या wisdom ची अटळ किंमत असते.

या वाक्यांमध्ये फारसं आश्चर्यकारक काही नाही. वर प्रतिसादांमध्ये विनोदी ढंगाने अशी बरीच वाक्ये आली आहेत. फरक इतकाच की ही वाक्ये लिहीली आहेत जी. ए. कुलकर्णी यांनी आणि तीही ग्रेस यांना लिहीलेल्या पत्रांमध्ये. आणि एक दोनदा नाही तर १५-२० वर्षांच्या कालावधीमध्ये जीए नियमितपणे इंग्रजी शब्द वापरतात.

जीएंनी असं का केलं असेल हे कोडं मला उलगडत नाही.

जीएंना प्रतिशब्द माहीत नसतील हे शक्य नाही. एक उत्कृष्ट दर्जाचा साहित्यिक शब्द निष्काळजीपणे वापरू शकेल हे ही अशक्य.

मला एकच शक्यता वाटते. त्या क्षणाला, त्यांना जे व्यक्त करायचं होतं त्यासाठी तोच शब्द त्यांना योग्य वाटला असावा.

आणखी कोणती शक्यता असेल तर जाणून घ्यायला उत्सुक आहे.

Pages