अशी आमुची इंग्रजी मायबोली

Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2012 - 22:50

गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.

काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.

ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?

काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.

- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -

द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे

daily alarm = रोजचा गजर

'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'

नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे

सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या

दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या

आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी

चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित

गुलमोहर: 

तसं नाही उदय त्यांचं म्हणणं असं आहे की ग्राम्य मराठीला हसू नये. पण पुणेरी मराठी म्हणजेच प्रमाण मराठी असं काही नाही. वर कुणीतरी लिंक दिली आहे ती पहावी.

तो मुद्दा इथे गैरलागू आहे.

अच्छा असे आहे काय............ "पुणेरी मराठी" हे शब्द मला तरी खटकले..... ग्राम मराठी हे आपल्या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे... दर गावागावात भाषेचा लहेजा बदलत जातो...त्याचे उच्चार ही बदलत जातात.. त्याच प्रमाने अर्थ देखील.......

अजून एक नमूद करावेसे वाटते की जे पुण्यामुंबई बाहेरून आले आहेत आणि ज्यांचे मराठी 'पुणेरी' नाहिए अशा लोकांच्या मराठीला हसू/ हिणवू नये..>>>>पुर्ण सहमत Happy पण थोडे अवघड आहे अस वागण Happy

@उदय, पाटील.. पुणेरी मराठी म्हणजेच प्रमाण मराठी असं तर अजिबातच नाहिए.. पण बरेचदा (पुण्यात)असे होते की एखाद्याच्या 'न' 'ण' 'पाणि पिले' ई ई वर नाके मुरडली जातात ते करू नये एवढेच..

@ उदय.. 'पुणेरी मराठी' हे शब्द का खटकले? ग्रामीण मराठी प्रमाणे 'पुणेरी मराठी' हा प्रकार आहेच की.

ज्यांचे मराठी 'पुणेरी' नाहिए अशा लोकांच्या मराठीला हसू/ हिणवू नये.. कारण अशाने न्यूनगंड येऊ शकतो >>>> याचा अर्थ काय होतो.....? जरा सोप्या भाषेत सांगाल.... Happy

अनुमोदन.
तसच आजकाल मायबोलीवर " धन्स,टाईपणे,कॉलणे," असे मिंग्लिश बरेच शब्द सर्रास वापरले जातायत. : राग :
मराठीबद्दलचं प्रेम जर्मनीत आल्यानंतर जास्त उफाळुन आलं Happy जेव्हा जर्मन भाषा शिकताना,बोलताना, प्रत्येक शब्द जर्मनमधूनच बोलावा लागला तेव्हा जाणवलं कि हि लोकं किती कट्टर आहेत आपल्या भाषेबद्दल.तसच आता जवळपास सगळ्या तरुणां/णींना ईंग्रजीपण येतं पण त्याचा गर्व अजिबात नसतो. आणि आपण मात्र उगाच ईंग्रजी वापरतो.
अजुन एक जाणवलं कि ईंग्रजी ,हिंदी बोलताना मध्ये मराठी शब्द वापरणं म्हणजे हास्यास्पद ठरतं मग मराठी बोलताना मध्ये ईंग्रजी शब्द वापरणंपण तर हास्यास्पदच ना?
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी मराठी बोलताना संपूर्ण मराठी बोलायचा मनापासून प्रयत्न करते. अर्थात काहि ईंग्रजी शब्द अपरीहार्य आहेत पण तरी जिथे मला जमेल,आठवेल तसं मराठी बोलते. मलाच फार छान वाटतं.:)

@ उदय ...<<याचा अर्थ काय होतो.....? जरा सोप्या भाषेत सांगाल....>> वाक्य पूर्ण वाचा, अर्थबोध होत नसेल तर जाऊद्या..

वाक्य पूर्ण वाचा, अर्थबोध होत नसेल तर जाऊद्या..>>>> जौद्या तर जौद्या......... बाकी वाक्य पुर्णच आहे कि अजुन बाकी आहे त्यात काही ? Uhoh

उदय आणि लंपन. आपण विपूत / ईमेल मधून चर्चा कराल का कृपया?
हा धागा अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर टाळावा यावर चर्चा करण्यासाठी आहे.

<<पुण्यामुंबई बाहेरून आले आहेत आणि ज्यांचे मराठी 'पुणेरी' नाहिए अशा लोकांच्या मराठीला हसू/ हिणवू नये >> पूर्ण वाक्य असे आहे. आणि काय करू नये हे समजले ना तुम्हाला मग झाले तर Happy

@मंदार ... अत्यंत दिलगीर आहे पण मी चांगल्या अर्थाने काही तरी लिहिले त्याचा ईतका विपर्यास आणि ऊहापोह कशाला? असो क्षमस्व. माझ्याकडून चर्चेला पूर्णविराम.

सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

सिनेमा शब्द राहिलाच गुरुजी.. चलच्चित्र किंवा चित्रपट

जामोप्या, लेख नीट वाचा परत. Happy
सहज मराठी प्रतिशब्द उपलब्ध असताना इंग्रजी वापरू नये या अर्थाचा लेख आहे.
पॅटिस आणि आइस्क्रीमला मराठीत रुढ असलेला शब्द आहे का? नाही ना? मग वापरा की इंग्रजी/हिंदी शब्द.
उदय, तीच गोष्ट मिक्सर या शब्दाबाबत लागू.

>>सहज मराठी प्रतिशब्द उपलब्ध असताना इंग्रजी वापरू नये या अर्थाचा लेख आहे.
मंदार +१०००
अर्थाचा अनर्थ करू नका रे, जेवढे जास्त प्रतिशब्द (की जे सोपे असतील, आणि लोक सहज वापरू शकतील) तेवढे सांगा.

जिथे सहज प्रतिशब्द उपलब्ध आहेत तिथे इंग्रजीचा अनावश्यक वापर नको >>> पटले. उदाहरणे योग्य दिली आहेत.

मी लिहायला आले ते वर भान यांनी लिहिलय. इथे माबोवर प्रतिसादात असलेले इन्ग्रजी 'मेकप' मधले शब्द पण टाळता येतील.

अर्थाचा अनर्थ करू नका रे, जेवढे जास्त प्रतिशब्द (की जे सोपे असतील, आणि लोक सहज वापरू शकतील) तेवढे सांगा.>>>>>>>> बरोबर Happy

लेख पटला.
जिथे सहज प्रतिशब्द उपलब्ध आहेत तिथे इंग्रजीचा अनावश्यक वापर नको >>> हे अगदी!
अगदी मनातलं बोललात.
म्हणजे अगदी साधे साधे शब्द सुद्धा उगाचच इन्ग्रजीमध्ये बोलायची जिभेलाही सवय झाली असते असं वाटतं. कधी
स्वतः हेच करायचा प्रयत्न करते. अगदी लेकीशी (वय पवणे२) बोलतांनाही साधे सोप्पे मराठीच बोलायचा प्रयन्त असतो. जेणेकरून तिचं बोलणं म्हणजे भाषांची विचित्र सरमिसळ होऊ नये. काही शब्दांबाबत अपरिहार्यता आहेच पण चालायचेच.

या लेखाला (पुणेरी)पाटी लावली आहे ...
" ईथे ईंग्लिश शब्दांचे प्रति मराठी शब्द विचारु नयेत "
" विचारल्यास अपमान केला जाईल "
" आणि जो कोणी प्रतिशब्द सांगेल त्याला ....... "

Pages