मराठी भाषा दिवस २०१२ समारोप

Submitted by संयोजक on 4 March, 2012 - 22:33
palakhi.jpg

नमस्कार !
मराठी भाषा दिवस २०१२ यावर्षी दिनांक २१ फेब्रुवारी पासून हा उपक्रम सुरु होता. विविध स्पर्धांची पारितोषिके लवकरच जाहीर होतील. या उपक्रमात संयोजक म्हणून सहभागी झालेल्या आम्हा सर्वांच्या प्रातिनिधिक मनोगताने या उपक्रमाची सांगता करीत आहोत.

नेहमीप्रमाणेच, यावर्षी 'काहीतरी नवीन' करुया, पण मागच्या दोन्ही वर्षींच्या मराठी भाषा दिवसांची परंपराही मोडायची नाही अशा पिढीजात खानदानी कोड्यात आम्ही अडकलो. इच्छा तेथे मार्ग काढत ज्या कल्पनांना मूर्त स्वरुप आले त्यांमागचे आमचे उद्दिष्ट आणि तुम्ही दिलेले प्रोत्साहन याचा हा गोषवारा.

१. म..म..मराठी, ग..ग..गोष्टी

मुलांनी मराठी बोलावे, लिहावे, वाचावे, ऐकावे एवढाच उद्देश यामागे होता. म्हणूनच फारशा अटी न ठेवता मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा म्हणून 'चित्रावरुन गोष्ट' हा कार्यक्रम ठरवला. तर मुलांना स्वातंत्र्य देऊन मुक्तपणे हवी ती आवडती गोष्ट इतर मित्रांना सांगता यावी म्हणून 'नेहमीच्या गंमतगोष्टी' ठेवल्या. या कार्यक्रमात सर्व मायबोलीकरांनीही छोट्यांच्या भावविश्वात काय काय आहे ते ऐकून तोंडात बोटे घातली. या कार्यक्रमाला छोट्या दोस्तांनी अक्षरश: धो धो प्रतिसाद दिला. एकूण ४७ प्रवेशिका आल्या!!
प्रत्येक मुलाची प्रवेशिका तपासून, पालकांना पोच देऊन त्याचा धागा प्रकाशित करणे हा संपूर्ण उपक्रमाचा एक वेगळा कार्यविभाग झाला. दररोज काही प्रवेशिका प्रकाशित करायच्या असा निर्णय आधी झाला असला तरी उशीराने प्रवेशिका पाठवलेल्या आमच्या छोट्या दोस्तांना, 'कधी येणार माझी गोष्ट?' अशी वाट बघायला लागू नये म्हणून कार्यक्रम पत्रिकेत बदल करुन, बुधवार २९ फेब्रुवारीचा एक संपूर्ण दिवस आम्ही फक्त मुलांच्या सर्व प्रवेशिका प्रकाशित केल्या. आणि अर्थातच यामुळे पुढच्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकात बदल करावे लागले. उदंड प्रतिसादामुळे असे ऐनवेळी करावे लागलेले बदल संयोजक मंडळास नेहमीच अभिमानास्पद आणि स्वागतार्ह असतात! या भरभरुन प्रतिसादाबद्दल छोट्या दोस्तांना आणि पालकांना मनःपूर्वक धन्यवाद!

मंडळी, अजून ऐकल्या/वाचल्या नसतील तर छोट्या दोस्तांच्या प्रवेशिका ऐकायला/वाचायला व त्यांना प्रतिक्रिया द्यायला विसरू नका

२. बीज अंकुरे अंकुरे

आपली मायबोली, पुढील पिढीपर्यंत कितपत पोचली आहे यावर एक मुक्त विचारमंथन व्हावे म्हणून 'बीज अंकुरे अंकुरे' ची घोषणा झाली. हा कार्यक्रम म्हणजे एक आरसेमहालच होता. आपण आपल्याला तर पाहू शकत होतोच शिवाय इतरांकडेही आपण आपल्याला त्यांच्या आरशातून पाहू शकत होतो. काही पटले असेल काही नाही. परंतु निदान कुणीतरी काहीतरी करतंय ही जाणीव, काही नवीन विचार करण्यासारखे यातून मिळाले असेल तर ते नक्कीच या कार्यक्रमाला अपेक्षित यशापलीकडचे आहे.

३. कुसुमाग्रजांना समर्पित 'चित्रहार' आणि 'एक होते कुसुमाग्रज'

final7_mbd.jpg
यावर्षी कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीची सांगता असल्याने, कुसुमाग्रजांना आदरांजली वाहण्यासाठी काहीतरी खास दालन आपण ठेवावे असा विचार मनात आला. कुसुमाग्रज म्हणताच डो़ळ्यासमोर येतात कविता! (आमच्या डोळ्यासमोर प्रताधिकारही लगेच आला! ) त्यामुळे सर्व नियमांच्या बंधनात राहून हा कार्यक्रम कसा बरे करता येईल यावर सतत विचारमंथन चालू होते. त्यातूनच चित्रावरुन कविता ओळखणे अशी अभिनव कल्पना सुचली. चित्रे आवर्जून सोपी ठेवायची असे ठरले कारण मूळ उद्देश कुसुमाग्रजांच्या कवितांचे स्मरण होणे हाच होता. आपली प्रकाशचित्रे वापरू दिल्याबद्दल मायबोलीकर छायाचित्रकारांचे (बित्तुबंगा, जिप्सी, जागू, आदित्यबेडेकर) विशेष आभार. तसेच बोधचिन्ह वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल संयुक्ता व्यवस्थापनाचेही आभार. कुसुमाग्रजांच्या साहित्याचा मोजका आढावा घेण्यासाठी काही मायबोलीकरांना लिहिण्यासाठी आम्ही आग्रह केला. त्यांनीही (कर्णिक, अज्ञात, नंदन, बेफिकीर, भरत मयेकर, शैलजा,नीधप) आमचा हट्ट लगेच ऐकून एकापेक्षा एक सुरेख अशी रसग्रहणे, कुसुमाग्रजांवर आधारित लेख लिहून पाठवले.

चित्रहाराचा हळूहळू रत्नहार होत होता. तरीही कुसुमाग्रजांच्या कवितांचा चित्रहार, कवितांचे रसग्रहण आणि कविताच नाहीत, हे काही मनाला पटत नव्हते. इथे कितीही आभार मानले तरी कमीच पडतील असे मोलाचे सहकार्य केले चिनूक्स यांनी. त्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून कुसुमाग्रजांचे फोटो आणि चित्रहारात समाविष्ट केलेल्या काही कवितांसाठी केवळ परवानगीच मिळवून दिली नाही तर साक्षात कुसुमाग्रजांच्या आवाजातील कविताही उपलब्ध करुन दिल्या! अनुदोन यांनीही कविता उपलब्ध करुन दिल्या. चिनूक्स यांनी पु,ल. देशपांडे यांचा 'विशाखाचे दिवस' आणि कुसुमाग्रजांची बहीण कुसुम सोनावणी यांचा 'आम्ही शिरवाडकर' हे दोन्ही लेख परवानगी घेऊन पाठवले. आम्ही भरुन पावलो. आता यात एक छोटीशी अडचण होती ती म्हणजे कुसुमाग्रजांच्या आवाजातील कवितांची ऑडियो फाईल एडिट करण्याची. उत्सव अगदी तोंडावर आला होता आणि संयोजक वेगवेगळ्या टाईमझोनमधे अगदी फेकले गेलेले; अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा अगदी अर्ध्या रात्रीत मदतीला धावून आले ते ’योग’. योग यांनी ती फाईल आम्हाला हवी तशी संपादित करुन दिली नसती तर त्या कविता योग्य वेळी मायबोलीकरांना ऐकवणे खरंच शक्य नव्हते. चिनूक्स, अनुदोन आणि योग तुम्ही केलेली मदत लाखमोलाची आहे. संयोजक मंडळ तुमचे खरोखर ऋणी आहे. अगदी आयत्या वेळी ‘रार’ यांनी स्वत: तयार केलेली ध्वनिचित्रफीत केवळ एका विनंतीखातर मंडळाला देऊन टाकली. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

मंडळी, अजून ऐकल्या नसतील तर चित्रहार धाग्यांवर कुसुमाग्रजांच्या आवाजातील कविता आहेत त्या जरुर ऐका!
४. मर्‍हाटी बोलु कवतुके

मराठी म्हटले की 'प्रमाण मराठी' च का? असा प्रश्न उभा राहतो. या प्रश्नाला छेद द्यायचा तर मुळात प्रमाण मराठी असे काही आहे का? हा प्रतिप्रश्न आहेच. प्रत्येक गावातली बोलीभाषा वेगळी असू शकते. मग तिचाही उत्सव व्हायला हवा. नेमक्या याच विचाराने आम्ही बोलीभाषेला महत्त्व देणारा हा कार्यक्रम आखला. सर्वांच्या प्रतिसादात साधर्म्य असावे जेणेकरुन वाचकांना भाषेभाषेतील वैविध्य आणि सौंदर्य अनुभवता येईल म्हणून केवळ प्रातिनिधिक स्वरुपाचे प्रसंग देऊन लेखण्यांना आव्हान दिले. तुमच्या बोलीभाषेला वाजतगाजत उत्सवात आणण्यासाठी सजवून पाठवलेली पालखीच जणू!

५. मी मराठी

एकूण कार्यक्रमांचे स्वरुप पाहता वैचारिक, भावनिक पातळीवर मायबोलीकरांना हाक देऊन झाली होती. आता काहीतरी चटपटीत, गंमतीशीर सर्वांना खेळता येईल असा खेळ हवा होता. खरंतर प्रत्येक मायबोलीकराने लहानपणी अनेकदा खेळलेला पण आजवर मायबोलीवर एकदाही खेळला गेला नसलेला असा खेळ सुचला तो म्हणजे ‘नावगावफळफूल’. या खेळाच्या रुपाने मनातले मराठीपण उमलून यावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, खेळता खेळता लहान होऊन सवंगड्यांशी लटकी स्पर्धा व्हावी असे छोटे छोटे उद्देश यामागे होते जे सर्वतोपरी सफल झाले. खेळ जाहीर होताच ज्या अहमहमिकेने तेथे पोस्टी पडत होत्या त्यावरुन संयोजकांचे मनुष्यबळ कमी पडणार की काय असे वाटू लागले. अनवधानाने काही चुका झाल्या पण मोठ्या मनाने तुम्ही सर्वांनी सांभाळून घेतले त्याबद्दल मनापासून धन्यवाद!

विशेष आभार :
१. कुसुमाग्रजांची छायाचित्रे आणि ध्वनिमुद्रणे उपलब्ध करून दिल्याबद्दल कुसुमाग्रज प्रतिष्ठान-नाशिक आणि श्री. लोकेश शेवडे (कार्यवाह, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक)
२. स्पर्धांसाठी बक्षिसं प्रायोजित केल्याबद्दल श्री. आशिष पाटकर (मनोविकास प्रकाशन, पुणे) व श्री. श्याम देशपांडे (समकालीन प्रकाशन, पुणे)
३. कुसुमाग्रजांवरील लेख देणारे सर्व निमंत्रित: कर्णिक, अज्ञात, नंदन, बेफिकीर, भरत मयेकर, शैलजा,नीधप)
४, लेखांचे मुद्रितशोधन : भरत मयेकर
५. चित्रहार कार्यक्रमासाठी फोटोंची परवानगी दिलेले मायबोलीकर : बित्तुबंगा, जिप्सी, जागू, आदित्य बेडेकर,संयुक्ता व्यवस्थापन
६. काही जाहिरातींचे मुद्रितशोधन : शैलजा, स्वाती आंबोळे, मेधा.
७. उपक्रमासाठी सर्व भित्तीचित्रे,सजावट : डॅफोडिल्स

सर्व स्पर्धक, त्यांना प्रोत्साहन देणारे, उपक्रमातील धाग्यांवर उदंड प्रतिसाद देणारे अनेक मायबोलीकर वाचक यांच्यामुळेच हा वैभवशाली कार्यक्रम दिमाखात पार पडला.

आभार शब्दात मांडणे खरोखर अवघड आहे. आमच्या अनवधनाने घडलेल्या चुका मायबोलीकरांनी सांभाळून घेतल्या याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. अ‍ॅडमिन आणि वेबमास्तरांच्या वेळोवेळी मिळणार्‍या मदत आणि मार्गदर्शनाशिवाय आमच्या कल्पनेतला मराठी भाषा दिवस साकार होणे अशक्य होते. हे सारे आपल्या मायबोलीचेच कार्य आहे, ही पालखी पुढे नेणारे आम्ही फक्त निमित्तमात्र भोई! या कार्यक्रमाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्यांचे ज्यांचे हात लागले आणि हा जगन्नाथाचा रथ पुढे सरकला त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत! लोभ आहेच, तो वृद्धींगत व्हावा ही विनंती!

मायबोलीकरहो, आम्ही आमच्या परीने हा उपक्रम अधिकाधिक चांगला करण्याचा चुकतमाकत प्रयत्न केला. या उपक्रमाला तुम्ही आपला मानलात यातच आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाली. मात्र तुमचे अभिप्राय केवळ आम्हालाच नाहीत तर आगामी संयोजकांनाही मार्गदर्शक आहेत तेव्हा तुमचा अभिप्राय अवश्य लिहा !

छोट्या शांडिल्यची प्रवेशिका गोष्टी स्पर्धांच्या नियमात बसत नव्हती, पण त्याला उत्तेजन म्हणून आपण मराठी भाषा दिवसाचा हा समारोप शांडिल्यच्या आवाजातील पसायदानाने करूया.


विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा अतिशय सुंदर आढावा आहे, सर्व संबंधितांचे मनःपुर्वक अभिनंदन

मराठी साहित्याला वाहिलेल्या संकेतस्थळावर याहून अधिक चांगले काय होऊ शकणार?

चिनूक्स यांच्याबद्दल काय लिहावे समजत नाही, त्यांचा वाटा नेहमीच मोलाचा किंबहुना अमूल्य ठरतो

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आखणी, योग्य प्रमाणात जाहिरात, उत्तम कार्यक्रम, मायबोलीकरांच्या लहानग्यांनाही समाविष्ट करण्याचे औदार्य व कल्पकता आणि दर्जेदार मॅटर याने नटलेला हा संपूर्ण उपक्रम कोठेही अभिमानाने मिरवण्यासारखा वाटला.

(माझ्या लेखाला यात उदारपणे स्थान दिल्याबद्दल आभार मानतोच)

(तसेच, यापुढील उपक्रमांसाठी हक्काने काम सांगावे अशी विनंतीही करतो)

लहान पिढीला मायबोली मराठीचे प्रेम निर्माण व्हावे यासाठी केलेला कार्यक्रम (गोष्टी व बीज अंकुरे) हे दोन्ही मराठी भाषेसाठी अतिशय महत्वाचे ठरावेत.

सर्वांचे पुनश्च अभिनंदन

-'बेफिकीर'!

सगळेच कार्यक्रम छान आणि वेगळे होते... याकरता अपार कष्ट घेतलेल्या संयोजकांना खूप खूप धन्यवाद.. आणि यात भाग घेवुन आम्हाला बरंच काही उत्कृष्ट वाचायला दिल्याबद्दल सहभागी माबोकरांचेही आभार... लहान मुलांनी सांगितलेल्या गोष्टींकरता त्यांचे खूप खूप कौतुक Happy एकदम अभिनव कल्पना होत्या सगळ्या...

अजून खूप खूप वाचायचे आहे.. Happy

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आखणी, योग्य प्रमाणात जाहिरात, उत्तम कार्यक्रम, मायबोलीकरांच्या लहानग्यांनाही समाविष्ट करण्याचे औदार्य व कल्पकता आणि दर्जेदार मॅटर याने नटलेला हा संपूर्ण उपक्रम कोठेही अभिमानाने मिरवण्यासारखा वाटला.

बेफिकीर यांना अनुमोदन.. Happy

शासन दरबारीही असे कित्येक 'दिन' त्या पातळीवर साजरे होतात आणि सूर्य मावळल्यानंतर त्याची मागमूसही उरत नाही. तथापि 'मायबोली' संयोजकांने ज्या कल्पकतेने पूर्ण आठवडा 'मराठी दिन' वेगवेगळ्या उपक्रमांनी गजबजता ठेवला ते पाहता खर्‍या अर्थाने मराठी भाषा संवर्धनाचे मोलाचे कार्य तुम्ही आणि इथे उल्लेख असलेल्यी/नसलेल्या पडद्यासमोरील तसेच पडद्यामागील व्यक्तीं यानी सर्वर्थाने संपन्न केले आहे असे मी म्हणतो.

संबंधित सर्व धाग्यांचे एकत्रीकरण करून शासन मुखपत्र 'लोकराज्य' कडे पाठवून देण्याविषयी संयोजकांनी जरूर विचार करावा.

अशोक पाटील

मराठी भाषा दिवसाचा हा समारोप शांडिल्यच्या आवाजातील पसायदानाने करूया.>>>>>>>>>> हे अतिशय चांगलं केलय Happy इतकं मोठं पसायदान छान म्हटलय शांडिल्यने... Happy

अतिशय सुरेख आढावा. Happy

मराठी साहित्याला वाहिलेल्या संकेतस्थळावर याहून अधिक चांगले काय होऊ शकणार?
चिनूक्स यांच्याबद्दल काय लिहावे समजत नाही, त्यांचा वाटा नेहमीच मोलाचा किंबहुना अमूल्य ठरतो>>>>>>+१

"माझ्या मराठीची बोल कौतुके ! परी अमृतासही पैजा जिंके" -- असे म्हणणार्‍या माऊलीच्या थोर पसायदानानी झालेली सांगता पाहून मला खूपच उचंबळून येत आहे. आत्ताच मी बाले खान ह्यांची भैरवी ऐकली नंतर शांडिल्यनी म्हंटलेले 'पसायदान' ऐकले. लताबाईंनी गायलेले आपले 'पसायदान' हे भैरवी रागातलेच आहे. ते 'दृष्टादृष्ट विजये । होआवे जी । येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥' ह्या ओळी ऐकून मला उचंबळून आले..माझं अंतःकरण द्रवल!

मला मायबोलीवरचा आतापर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला उपक्रम होता हा! मर्‍हाटी बोलू कौतुके तर प्रचंड अभिनव व अप्रतिम कल्पना! छोट्यांच्या गोष्टी तर मी अजुनही वाचत/ऐकते आहे.
उत्तम कल्पना सुचणे,ती उत्तमरित्या राबवणे ,अमलात आणणे, उत्तम संयोजन, कल्पक जाहिराती या सर्व गोष्टींसाठी प्रचंड टाळ्या!! Happy असे उपक्रम नेहेमी होत राहावेत! आठवडाभर उत्सवाचे वातावरण वाटले अगदी! Happy

मराठी भाषा दिन आणि कुसुमाग्रज जन्मशताब्दीनिमित्तच्या कार्यक्रमाच्या सुरेख आयोजनाबद्दल संयोजकांचे आभार आणि अभिनंदन.
संयोजक, सहकुटुंब सहभागी मायबोलीकरांच्या उत्साह आणि उर्जेपुढे वाचक/श्रोता म्हणून 'अनंत हस्ते कमलावराने....' अशीच अवस्था झाली (आहे).
यानिमित्ताने शिरवाडकरांचे नाट्य/काव्य याखेरीज अन्य लेखन वाचायचा योग आला; हे संयोजकांच्या सांगण्यामुळेच होऊ शकले.
चित्रहाराच्या निमित्ताने कुसुमाग्रजांच्या काव्यहारातील अनेक मौक्तिकांची झळाळी पुन्हा अनुभवली. 'मी मराठी' या खेळात लहान मुलांच्या हिरीरीने भाग घेताना सगळ्या कामांचा विसर पडला.
बीज अंकुरे अंकुरे मधील प्रामाणिक नोंदी नक्कीच पथदर्शक ठरतील.
मर्‍हाटी बोलू कवतुके हा बोलीभगिनींचा मेळावा मस्त गजबजलाय.
पु.ल. आणि कुसुमताईंचे लेख म्हणजे मेजवानीतले राजेशाही पदार्थ.
पुन्हा एकदा आभार.

मभादिचे अतिशय कल्पक आणि यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्रशासक/संयोजकांचे अभिनंदन आणि आभार!
सुंदर भित्तीचित्रे आणि जाहिरातींसाठी डॅफोडिल्सचे अभिनंदन!
शांडिल्यचे पसायदान खूप छान! Happy

संयोजकांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन.
अतिशय सुरेख, कल्पक, माहितीपूर्ण आणि मनोरंजक होता यंदाचा मराठी भाषा दिवस.
आठवडाभर एक उत्साहाचं वातावरण होतं, मराठी दिवस अतिशय उत्साहात पार पडू शकला तुमच्या संयोजनामुळे. धन्यवाद!

खूप सुंदर साजरा झाला मराठी भाषा दिवस Happy या उपक्रमातलं अजून बरंच वाचायचंय, ऐकायचंय. तरी एकंदर फॉर्मॅट पाहूनच 'नंबर १ झालाय' अशी प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावत नाहिये.

मस्त होता यंदाचा एकूण कार्यक्रम. माझं निम्मं वाचून झालंय, निम्मं व्हायचंय. बच्चेकंपनीच्या प्रवेशिका एका मागोमाग एक अशा सलग ऐकायच्या आहेत. सवड काढून त्या ऐकणार.

पण सर्वात मोठा _____/\______ 'मर्‍हाटी बोलू कवतुके'साठी. भन्नाट आहे ती कल्पना. Happy

मराठी भाषा दिनाचे सर्वच कार्यक्रम भन्नाट! संयोजकांचे मनापासुन आभार! Happy
छोट्यांच्या प्रवेशिका इथे ऐकु शकत नसल्याने घरी एकेक करुन ऐकणार आहे. पण
'मर्‍हाटी बोलु कवतुके' ने खरच मजा आणली. असेच कार्यक्रम उत्तरोत्तर राबवावेत ही अपेक्षा.

संयोजक, इतका सुंदर उपक्रम राबवल्याबद्दल तुमचं अभिनंदन. सगळेच कार्यक्रम एकापेक्षा एक सुंदर आहेत. अजून सगळं वाचलं आणि ऐकलं नाहीये. जे वाचलंय त्यावरही प्रतिक्रिया द्यायच्यात. आधी अधाश्यासारखं नुसतं वाचूनच घेतेय.
इतक्या छान कार्यक्रमासाठी खूप खूप आभार.

आणि हो, सगळ्या छोट्या छोट्या पिल्लांना आणि त्यांच्या आई-बाबांना शाबासकी. Happy

यंदाचा मभादि उपक्रम फारच जोरदार झालेला आहे... सहभागी सर्वांचे हार्दिक अभिनंदन... लहान मुलांनी पण मस्त मजा केली आहे... हा उपक्रम असाच वृद्धींगत होवो...

अप्रतिम झाला हा सोहळा.......... अजून बरंच वाचायचं आहे.
संबंधितांचे मनापासून आभार Happy
सगळ्या कल्पना अतिशय नवीन होत्या........ धम्माल आली Happy

अप्रतिम झाला हा उपक्रम!! सर्व संयोजकांचे, सहभाग घेणार्‍यांचे व भरभरून प्रतिसाद देणार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन!! Happy छोट्या शांडिल्यचे पसायदान अतिशय गोड!! Happy

अजून ऐकते, वाचतेच आहे.
एकदम जोरदार झालाय हा उपक्रम>> सगळ्यांना अनुमोदन.

मराठी भाषा दिवसाचा हा समारोप शांडिल्यच्या आवाजातील पसायदानाने करूया.>>>>>>>>>> संयोजक मंडळाला मन:पुर्वक धन्यवाद.

इतकं मोठं पसायदान छान म्हटलय शांडिल्यने... >>> मधे मधे, हं आता पुढे म्हणावे लागत होते Happy

संयोजकांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन. एकसे एक उपक्रम होते. या सर्व लेखांना संकलित करता येईल का? तसेच ध्वनिमुद्रिकेंनाही?

मायबोलीवरचा आतापर्यंतचा अजुन एक आवडलेला उपक्रम!!
मर्‍हाटी बोलू कौतुके ने तर धमाल आणली.. !
छोट्यांच्या गोष्टी तर खुपच सुंदर, सगळ्या बच्चे कंपनी आणि त्यांच्या पालकांच खुप कौतुक.
कुसुमाग्रजां बद्दल चे लेख तर पर्वणीच !!
'मी मराठी' ने परत लहान झाल्या सारखे वाटले..

इतका दर्जेदार आणि निखळ आनंदाचा कार्यक्रम दिल्या बद्द्ल संयोजकांचे, मायबोली चे शतःश आभार
हा आणि असे येणारे बरेच उपक्रम वृद्धींगत होवोत आणि होतीलच! !!

संयोजकांचे आणि मदत केलेल्या इतर सर्वांचे खरोखर कौतुक आहे. या निमित्ताने इतकं सुंदर डॉक्युमेंटेशन मायबोलीवर उपलब्ध झाल्यामुळे मायबोली आणि आम्ही सगळे श्रीमंत झालो आहोत.

अजून भरपूर वाचायचं आहे.

या वर्षी मराठी भाषा दिवस हा उपक्रम अतिशय अप्रतिम झाला !! अगदी मायबोलीच्या इतिहासातले मानाचे पान ठरावा असा साजरा झाला !! संयोजकांच्या कल्पकतेला दाद द्यावी तितकी कमी आहे! खूप खूप अभिनंदन!!

Pages