मराठी भाषा दिवस २०१२ समारोप

Submitted by संयोजक on 4 March, 2012 - 22:33
palakhi.jpg

नमस्कार !
मराठी भाषा दिवस २०१२ यावर्षी दिनांक २१ फेब्रुवारी पासून हा उपक्रम सुरु होता. विविध स्पर्धांची पारितोषिके लवकरच जाहीर होतील. या उपक्रमात संयोजक म्हणून सहभागी झालेल्या आम्हा सर्वांच्या प्रातिनिधिक मनोगताने या उपक्रमाची सांगता करीत आहोत.

नेहमीप्रमाणेच, यावर्षी 'काहीतरी नवीन' करुया, पण मागच्या दोन्ही वर्षींच्या मराठी भाषा दिवसांची परंपराही मोडायची नाही अशा पिढीजात खानदानी कोड्यात आम्ही अडकलो. इच्छा तेथे मार्ग काढत ज्या कल्पनांना मूर्त स्वरुप आले त्यांमागचे आमचे उद्दिष्ट आणि तुम्ही दिलेले प्रोत्साहन याचा हा गोषवारा.

१. म..म..मराठी, ग..ग..गोष्टी

मुलांनी मराठी बोलावे, लिहावे, वाचावे, ऐकावे एवढाच उद्देश यामागे होता. म्हणूनच फारशा अटी न ठेवता मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा म्हणून 'चित्रावरुन गोष्ट' हा कार्यक्रम ठरवला. तर मुलांना स्वातंत्र्य देऊन मुक्तपणे हवी ती आवडती गोष्ट इतर मित्रांना सांगता यावी म्हणून 'नेहमीच्या गंमतगोष्टी' ठेवल्या. या कार्यक्रमात सर्व मायबोलीकरांनीही छोट्यांच्या भावविश्वात काय काय आहे ते ऐकून तोंडात बोटे घातली. या कार्यक्रमाला छोट्या दोस्तांनी अक्षरश: धो धो प्रतिसाद दिला. एकूण ४७ प्रवेशिका आल्या!!
प्रत्येक मुलाची प्रवेशिका तपासून, पालकांना पोच देऊन त्याचा धागा प्रकाशित करणे हा संपूर्ण उपक्रमाचा एक वेगळा कार्यविभाग झाला. दररोज काही प्रवेशिका प्रकाशित करायच्या असा निर्णय आधी झाला असला तरी उशीराने प्रवेशिका पाठवलेल्या आमच्या छोट्या दोस्तांना, 'कधी येणार माझी गोष्ट?' अशी वाट बघायला लागू नये म्हणून कार्यक्रम पत्रिकेत बदल करुन, बुधवार २९ फेब्रुवारीचा एक संपूर्ण दिवस आम्ही फक्त मुलांच्या सर्व प्रवेशिका प्रकाशित केल्या. आणि अर्थातच यामुळे पुढच्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकात बदल करावे लागले. उदंड प्रतिसादामुळे असे ऐनवेळी करावे लागलेले बदल संयोजक मंडळास नेहमीच अभिमानास्पद आणि स्वागतार्ह असतात! या भरभरुन प्रतिसादाबद्दल छोट्या दोस्तांना आणि पालकांना मनःपूर्वक धन्यवाद!

मंडळी, अजून ऐकल्या/वाचल्या नसतील तर छोट्या दोस्तांच्या प्रवेशिका ऐकायला/वाचायला व त्यांना प्रतिक्रिया द्यायला विसरू नका

२. बीज अंकुरे अंकुरे

आपली मायबोली, पुढील पिढीपर्यंत कितपत पोचली आहे यावर एक मुक्त विचारमंथन व्हावे म्हणून 'बीज अंकुरे अंकुरे' ची घोषणा झाली. हा कार्यक्रम म्हणजे एक आरसेमहालच होता. आपण आपल्याला तर पाहू शकत होतोच शिवाय इतरांकडेही आपण आपल्याला त्यांच्या आरशातून पाहू शकत होतो. काही पटले असेल काही नाही. परंतु निदान कुणीतरी काहीतरी करतंय ही जाणीव, काही नवीन विचार करण्यासारखे यातून मिळाले असेल तर ते नक्कीच या कार्यक्रमाला अपेक्षित यशापलीकडचे आहे.

३. कुसुमाग्रजांना समर्पित 'चित्रहार' आणि 'एक होते कुसुमाग्रज'

final7_mbd.jpg
यावर्षी कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीची सांगता असल्याने, कुसुमाग्रजांना आदरांजली वाहण्यासाठी काहीतरी खास दालन आपण ठेवावे असा विचार मनात आला. कुसुमाग्रज म्हणताच डो़ळ्यासमोर येतात कविता! (आमच्या डोळ्यासमोर प्रताधिकारही लगेच आला! ) त्यामुळे सर्व नियमांच्या बंधनात राहून हा कार्यक्रम कसा बरे करता येईल यावर सतत विचारमंथन चालू होते. त्यातूनच चित्रावरुन कविता ओळखणे अशी अभिनव कल्पना सुचली. चित्रे आवर्जून सोपी ठेवायची असे ठरले कारण मूळ उद्देश कुसुमाग्रजांच्या कवितांचे स्मरण होणे हाच होता. आपली प्रकाशचित्रे वापरू दिल्याबद्दल मायबोलीकर छायाचित्रकारांचे (बित्तुबंगा, जिप्सी, जागू, आदित्यबेडेकर) विशेष आभार. तसेच बोधचिन्ह वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल संयुक्ता व्यवस्थापनाचेही आभार. कुसुमाग्रजांच्या साहित्याचा मोजका आढावा घेण्यासाठी काही मायबोलीकरांना लिहिण्यासाठी आम्ही आग्रह केला. त्यांनीही (कर्णिक, अज्ञात, नंदन, बेफिकीर, भरत मयेकर, शैलजा,नीधप) आमचा हट्ट लगेच ऐकून एकापेक्षा एक सुरेख अशी रसग्रहणे, कुसुमाग्रजांवर आधारित लेख लिहून पाठवले.

चित्रहाराचा हळूहळू रत्नहार होत होता. तरीही कुसुमाग्रजांच्या कवितांचा चित्रहार, कवितांचे रसग्रहण आणि कविताच नाहीत, हे काही मनाला पटत नव्हते. इथे कितीही आभार मानले तरी कमीच पडतील असे मोलाचे सहकार्य केले चिनूक्स यांनी. त्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून कुसुमाग्रजांचे फोटो आणि चित्रहारात समाविष्ट केलेल्या काही कवितांसाठी केवळ परवानगीच मिळवून दिली नाही तर साक्षात कुसुमाग्रजांच्या आवाजातील कविताही उपलब्ध करुन दिल्या! अनुदोन यांनीही कविता उपलब्ध करुन दिल्या. चिनूक्स यांनी पु,ल. देशपांडे यांचा 'विशाखाचे दिवस' आणि कुसुमाग्रजांची बहीण कुसुम सोनावणी यांचा 'आम्ही शिरवाडकर' हे दोन्ही लेख परवानगी घेऊन पाठवले. आम्ही भरुन पावलो. आता यात एक छोटीशी अडचण होती ती म्हणजे कुसुमाग्रजांच्या आवाजातील कवितांची ऑडियो फाईल एडिट करण्याची. उत्सव अगदी तोंडावर आला होता आणि संयोजक वेगवेगळ्या टाईमझोनमधे अगदी फेकले गेलेले; अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा अगदी अर्ध्या रात्रीत मदतीला धावून आले ते ’योग’. योग यांनी ती फाईल आम्हाला हवी तशी संपादित करुन दिली नसती तर त्या कविता योग्य वेळी मायबोलीकरांना ऐकवणे खरंच शक्य नव्हते. चिनूक्स, अनुदोन आणि योग तुम्ही केलेली मदत लाखमोलाची आहे. संयोजक मंडळ तुमचे खरोखर ऋणी आहे. अगदी आयत्या वेळी ‘रार’ यांनी स्वत: तयार केलेली ध्वनिचित्रफीत केवळ एका विनंतीखातर मंडळाला देऊन टाकली. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

मंडळी, अजून ऐकल्या नसतील तर चित्रहार धाग्यांवर कुसुमाग्रजांच्या आवाजातील कविता आहेत त्या जरुर ऐका!
४. मर्‍हाटी बोलु कवतुके

मराठी म्हटले की 'प्रमाण मराठी' च का? असा प्रश्न उभा राहतो. या प्रश्नाला छेद द्यायचा तर मुळात प्रमाण मराठी असे काही आहे का? हा प्रतिप्रश्न आहेच. प्रत्येक गावातली बोलीभाषा वेगळी असू शकते. मग तिचाही उत्सव व्हायला हवा. नेमक्या याच विचाराने आम्ही बोलीभाषेला महत्त्व देणारा हा कार्यक्रम आखला. सर्वांच्या प्रतिसादात साधर्म्य असावे जेणेकरुन वाचकांना भाषेभाषेतील वैविध्य आणि सौंदर्य अनुभवता येईल म्हणून केवळ प्रातिनिधिक स्वरुपाचे प्रसंग देऊन लेखण्यांना आव्हान दिले. तुमच्या बोलीभाषेला वाजतगाजत उत्सवात आणण्यासाठी सजवून पाठवलेली पालखीच जणू!

५. मी मराठी

एकूण कार्यक्रमांचे स्वरुप पाहता वैचारिक, भावनिक पातळीवर मायबोलीकरांना हाक देऊन झाली होती. आता काहीतरी चटपटीत, गंमतीशीर सर्वांना खेळता येईल असा खेळ हवा होता. खरंतर प्रत्येक मायबोलीकराने लहानपणी अनेकदा खेळलेला पण आजवर मायबोलीवर एकदाही खेळला गेला नसलेला असा खेळ सुचला तो म्हणजे ‘नावगावफळफूल’. या खेळाच्या रुपाने मनातले मराठीपण उमलून यावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, खेळता खेळता लहान होऊन सवंगड्यांशी लटकी स्पर्धा व्हावी असे छोटे छोटे उद्देश यामागे होते जे सर्वतोपरी सफल झाले. खेळ जाहीर होताच ज्या अहमहमिकेने तेथे पोस्टी पडत होत्या त्यावरुन संयोजकांचे मनुष्यबळ कमी पडणार की काय असे वाटू लागले. अनवधानाने काही चुका झाल्या पण मोठ्या मनाने तुम्ही सर्वांनी सांभाळून घेतले त्याबद्दल मनापासून धन्यवाद!

विशेष आभार :
१. कुसुमाग्रजांची छायाचित्रे आणि ध्वनिमुद्रणे उपलब्ध करून दिल्याबद्दल कुसुमाग्रज प्रतिष्ठान-नाशिक आणि श्री. लोकेश शेवडे (कार्यवाह, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक)
२. स्पर्धांसाठी बक्षिसं प्रायोजित केल्याबद्दल श्री. आशिष पाटकर (मनोविकास प्रकाशन, पुणे) व श्री. श्याम देशपांडे (समकालीन प्रकाशन, पुणे)
३. कुसुमाग्रजांवरील लेख देणारे सर्व निमंत्रित: कर्णिक, अज्ञात, नंदन, बेफिकीर, भरत मयेकर, शैलजा,नीधप)
४, लेखांचे मुद्रितशोधन : भरत मयेकर
५. चित्रहार कार्यक्रमासाठी फोटोंची परवानगी दिलेले मायबोलीकर : बित्तुबंगा, जिप्सी, जागू, आदित्य बेडेकर,संयुक्ता व्यवस्थापन
६. काही जाहिरातींचे मुद्रितशोधन : शैलजा, स्वाती आंबोळे, मेधा.
७. उपक्रमासाठी सर्व भित्तीचित्रे,सजावट : डॅफोडिल्स

सर्व स्पर्धक, त्यांना प्रोत्साहन देणारे, उपक्रमातील धाग्यांवर उदंड प्रतिसाद देणारे अनेक मायबोलीकर वाचक यांच्यामुळेच हा वैभवशाली कार्यक्रम दिमाखात पार पडला.

आभार शब्दात मांडणे खरोखर अवघड आहे. आमच्या अनवधनाने घडलेल्या चुका मायबोलीकरांनी सांभाळून घेतल्या याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. अ‍ॅडमिन आणि वेबमास्तरांच्या वेळोवेळी मिळणार्‍या मदत आणि मार्गदर्शनाशिवाय आमच्या कल्पनेतला मराठी भाषा दिवस साकार होणे अशक्य होते. हे सारे आपल्या मायबोलीचेच कार्य आहे, ही पालखी पुढे नेणारे आम्ही फक्त निमित्तमात्र भोई! या कार्यक्रमाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्यांचे ज्यांचे हात लागले आणि हा जगन्नाथाचा रथ पुढे सरकला त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत! लोभ आहेच, तो वृद्धींगत व्हावा ही विनंती!

मायबोलीकरहो, आम्ही आमच्या परीने हा उपक्रम अधिकाधिक चांगला करण्याचा चुकतमाकत प्रयत्न केला. या उपक्रमाला तुम्ही आपला मानलात यातच आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाली. मात्र तुमचे अभिप्राय केवळ आम्हालाच नाहीत तर आगामी संयोजकांनाही मार्गदर्शक आहेत तेव्हा तुमचा अभिप्राय अवश्य लिहा !

छोट्या शांडिल्यची प्रवेशिका गोष्टी स्पर्धांच्या नियमात बसत नव्हती, पण त्याला उत्तेजन म्हणून आपण मराठी भाषा दिवसाचा हा समारोप शांडिल्यच्या आवाजातील पसायदानाने करूया.


विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार उपक्रम सादर केल्याबद्दल संयोजकांचे आभार. दोन वर्षाच्या मुलांपासून थोरांपर्यंत सहभाग हे ह्या उपक्रमाचं वैशिष्ट्य. स्वतःचा वेळ, कार्यक्रमांच cooridination, आणि वेगळ्या वेगळ्या कल्पना ह्या सगळ्याबद्दलच कौतुक कराव तेवढं थोड आहे.

मुलांच्या पालकांनीपण मुलांकडून तयारी करून घेण्यापासून त्यांना भाग घ्यायला लावून दर्जेदार गोष्टी सादर केल्या त्याबद्दल त्यांचेपण आभार. कितीदा ऐकल्या त्या गोष्टी. अजून काही ऐकायच्या राहिल्या आहेत.

कुसुमाग्रजांबद्दलचे लेखही उत्कॄष्ट. मायबोलीची स्वतःची एक उंची आहेच ती उंचावत नेली आहे एवढ मात्र नक्की.

सर्वांना भाग घेता यावा म्हणून सादर केलेले खेळही खासच.

परत एकदा संयोजक मंडळाचं कौतुक आणि मोठ्ठी शाबासकी.

मैत्रेयी + १.

उत्तम कल्पना सुचणे,ती उत्तमरित्या राबवणे ,अमलात आणणे, उत्तम संयोजन, कल्पक जाहिराती या सर्व गोष्टींसाठी प्रचंड टाळ्या!! >>>> अनुमोदन.

फार सुरेख झाला उपक्रम ह्या वर्षी. 'सर्वसमावेशक' म्हणतात ते ह्यालाच Happy संयोजक मंडळास धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत.

ह्या सुरेख उपक्रमाला ज्यांचे ज्यांचे हातभार लागले त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद Happy
संयोजकांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते.
छान छान गोष्टी सांगणार्‍या / लिहिणार्‍या सगळ्याच पिल्लांचं आणि शांडिल्यचं खूप कौतुक Happy

यावेळेसचे सर्वच कार्यक्रम मस्त आणि आगळेवेगळे होते. लेख ही सुंदर, वाचतेय.
संयोजकांचे आणि मराठी भाषा टीम चे खूप खूप धन्यवाद!

शांडिल्यहीही खूप कौतुक.

खरच सिंडी म्हणते आहे तसा सर्वसमावेशक होता उपक्रम. मंडळाचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
आठवडा खूप मजेत गेला.

यावर्षीचा म भा दि सगळ्यात मस्त.
सगळेच उपक्रम भन्नाट आणि कल्पक.
त्याबद्दल खास 'उभे राहून जोरदार टाळ्या' आणि टोपलीभरून क्याडबर्‍या Happy

या उपक्रमात सामील करून घेतल्याबद्दल संयोजक मंडळाचे आभार.

या वर्षीचा कार्यक्रम मायबोलीच्या परंपरेप्रमाणे खरोखर अत्यंत कल्पक आणि सगळ्यांना समावून घेणारा झाला. संयोजकांचं, त्यांना हा कार्यक्रम इतक्या उत्तम रित्या यशस्वी व्हावा म्हणून हातभार लावणार्‍यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!

वाचायला, बघायला आणि ऐकायला इतकी भरपूर मेजवानी आहे की घाईघाईत सगळं संपवता येणार नाही.

लहान मुलांच्या कार्यक्रमांनी बहार आणली.

संयोजक मंडळाचे अभिनंदन!
कल्पक, सर्वांना भाग घेता येतील असे दर्जेदार कार्यक्रम आखल्याबद्दल धन्यवाद!

मैत्रेयीला अनुमोदन.
सगळेच उपक्रम छान होते. चित्रहार आणि मराठी बोलु कवतुके तर एकदमच हटके. संयोजकांच्या कल्पकतेचं कौतुक करावं तेवढं थोडंच. यंदा मुलांचा सहभागही लक्षणीय होता.
अभिनंदन.

संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार! अजून बरेच काही वाचायचे/ऐकायचे आहे. अप्रतिम उपक्रम!
शांडिल्यच्या पसायदानाने सांगताही खूप गोड झाली.

फार सुरेख झाला उपक्रम ह्या वर्षी. 'सर्वसमावेशक' म्हणतात ते ह्यालाच >>>> अनुमोदन Happy
संयोजन संयुक्ता बाहेर खुले झाल्यानंतरचा हा पहिलाच मराठी भाषा दिवस. यंदाचा मराठी भाषा दिवस सगळ्यांत मस्त झाला! बर्‍याच गोष्टी वाचून / ऐकून व्हायच्या आहेत पण संयोजकांच्या कल्पकतेला आणि नेटक्या आयोजनाला द्यावी तेव्हडी दाद थोडीच आहे. सगळेच कार्यक्रम उत्तम होते. मी मराठी, बोलु कवतुकेच्या कल्पना भारी होत्या !
अजून एक गोष्ट नमुद कराविशी वाटते ती म्हणजे संयोजकांचा कार्यक्रमांच्या आधी तसेच दरम्यानचा मायबोलीवरचा संवाद. साधारणपणे संयोजक/संपादक ह्या आयडींकडून टाकल्या जाणार्‍या पोस्टी बर्‍यापैकी औपचारीक भाषेतल्या आणि औपचारीक स्वरूपाच्या असतात पण यंदा "संयोजक" आयडी आपल्यातलेच एक होऊन (रैना... ओला मजकूर :P) बोलत होते (उदा. मी मराठी/चित्रहार धाग्यांवर सहभागींना प्रोत्साहन देणे/कॅडबर्‍या वाटणे, कार्यक्रमांच्या जाहिराती कराताना वगैरे) आणि ते छान वाटले. संयोजकांनी छापिल मराठी न वापरता बोली भाषा वापरलेली आवडली. (इतकी की एकदा तर संयोजकांनी पार्ल्यात मेन्यू सुद्धा टाकला होता.. Wink )

ह्या उपक्रमाच्या संयोजनात भाग घेणार्‍या सर्वांचे आभार !

अतिशय सुंदर झाला या वर्षीचा म.भा.दिन, अगदी आदर्श मराठी दिवस (आठवडा) साजरा झाला इथे .
सगळ्या मराठी न्युज चॅनल्स, न्युज पेपर्स , इतर मिडिया मधून महत्त्वाची बातमी म्हणून अजुनखूप प्रसिध्द्दी मिळायला ह्वी या उपक्रमाला.
संयोजकांनी या धाग्याला थोडे संपादित करून यतून एक 'मराठी भाषा' अंक जरुर बनवावा, बाजारातल्या कुठल्याही लिडिंग मासिकां पेक्षा उजवाच ठरेल.
संयोजकांचे, या उपक्रमात मदत केलेल्या आणि सहभागी झालेल्या सगळ्यांचे अभिनंदन !

वि.दि.पा., बी. बिल्वा.डॅफो,रैना ,भिडे काका, आशुडी तुम्हा सर्वांच कौतुक कराव तेवढं कमीच आहे. अति उत्तम कल्पना, त्या राबविण्यासाठी अतिशय प्रोफेशनल परंतु अनौपचारीक अ‍ॅपरोच हे अगदी महत्वाचे हायलाईट्स होते यंदाच्या प्रोग्रॅमचे.
डॅफो, अजिब्बात क्लिष्ट नसलेल्या पण क्षणात क्लिक होणार्‍या तु केलेल्या जाहीराती खुप आवडल्या. बर्‍याचदा जाहीराती वाचु पर्यंतच इतका कंटाळा येतो. पण तु केलेल्या सुट्सुटीत आणि मजकुर पटकन पोहोचविणार्‍या होत्या.

आशुडी , बिल्वा, रैना , वि.दि.पा., भिडे काका तुम्ही मायबोलीकरांना सतत आपाआपल्या बाफंवरुन संयोजकाच्या झग्यात न जाता प्रोत्साहन देत होता. मस्त पद्धत एकदम. आवडली.

बी , मर्‍हाटी कवतुकेची तु इतकी उत्तम सुरुवात केलीस कि बाकीच्यांना आपोआपच हुरुप आला लिहिण्याचा.

संयोजक मंडळाचे आणि त्यांना मदत करणार्‍या सर्वांचेच मनापासून आभार. एकुणच अस वाटल कि जितका ओपन संवाद संयोजक आणि मायबोलीकरांच्यात राहिल तितका प्रोग्रॅम यशस्वी होईल. Happy

सुरेख पसायदान शांडिल्य. लहान मुलांच्या गोष्टी निम्म्याच ऐकुन झाल्या आहेत म्हणुन कुणालाच अजुन प्रतिक्रिया लिहिली नाही.

इतका सुंदर उपक्रम राबवल्याबद्दल संयोजक , प्रशासक आणि सहभागी मायबोलीकरांचं खुप कौतुक आणि अभिनंदन.
कीप ईट अप !

अतिशय दर्जेदार,मनोरंजक,माहितीपूर्ण कार्यक्रम होते या उपक्रमाचे!!खूप खूप कौतुक संयोजकांचं आणि मायबोलीकरांचं !!!

खूपच छान झाला यंदाचा मराठी भाषा दिन. अजून पूर्ण वाचून-ऐकून व्हायचे आहे. सगळ्या लहान मुलांचेही जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.
शांडिल्यचे पसायदानही सुंदर आहे. दरवर्षीचा हा उपक्रम इतका छान पार पाडल्याबद्दल संयोजक मंडळ आणि इतर संबंधित मायबोलीकरांचे कौतुक आणि अभिनंदन.

Pages