एक होते कुसुमाग्रज (७): आम्ही शिरवाडकर (कुसुमताई शिरवाडकर)

Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 12:18

(हा लेख कुसुमताईंनी कुसुमाग्रजांच्या ७५व्या वर्षानिमित्त लिहीला होता. या लेखाला खास घरगुती आठवणींचा स्पर्श आहे. आणि जिच्या नावाने तात्यासाहेब कवी म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले ती बहीण कुसुम यांचा हा मनस्पर्शी लेख.)

आम्ही शिरवाडकर

आमचे गाव शिरवाड. निफाड तालुक्यातील पिंपळगांव बसवंतपासून पाच मैल अंतरावर आहे. दोन-चार वाकड्यातिकड्या रेघा माराव्यात तसे दोनचार रस्त्यांचे हे गाव आहे. गावच्या मध्यभागी नारायण मंदिर आहे आणि त्याच्या समोर एक पिंपळपार आहे. या गावात आमची बरीच जमीन होती आणि दोन चौकांचा व दोन मजल्यांचा वाडा होता. दूरच्या अंतरावरुन पाहिले म्हणजे हा वाडा या गावाचा टोप आहे असे वाटायचे. सर्वात मोठा आणि उंच!

या वाड्यात आमच्या पूर्वीच्या अनेक पिढ्या राहिल्या. आमच्या आजोबांचा म्हणजे नागेश गणेश शिरवाडकर यांचा जन्म १८५० च्या सुमाराचा! ब्रिटीशांच्या आगमनानंतर शतकानुशतके निद्रिस्त असलेल्या खेड्यांना जाग आली होती. आमच्या आजोबांनाही असे वाटू लागले या पिंजर्‍यातून बाहेर पडावे व बाहेरचे जग पहावे! वडीलधार्‍या मंडळींची अनुज्ञा घेऊन ते नाशिक शहरात आले. येथेच त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. मॅट्रिक झाल्यावर ते शिक्षण खात्यात नोकरीला लागले. त्यांना दोन मुले दामोदर आणि रंगनाथ, त्या दोघांना शिकवले. मॅट्रिक झाल्यावर दामोदर महसूल खात्यात लागले आणि धाकटे रंगनाथ हायकोर्ट प्लिडरची परीक्षा झाल्यावर जवळच असलेल्या पिंपळगाव बसवंत येथे वकीली करु लागले. ते आमचे वडील. त्यांना सात मुले व एक मुलगी. मुलांची नावे अनुक्रमे पद्माकर(हे वारले), गजानन (म्हणजे कुसुमाग्रज), मनोहर, वसंत, मधुकर, अच्युत नंतर कुसुम(मी) आणि सगळ्यात धाकटा केशव. आमचे वडील पिंपळगाव बसवंत येथे वकील होते. त्यामुळे आमचे बालपण तेथेच व्यतीत झाले.

१९२०-२१ च्या सुमारास आमच्या घरात एक मोठी घटना घडली. ती अशी- आमचे एक भाऊबंद होते. त्यांचे नाव वामनराव! त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नीने आमच्या वडिलांना विनंती केली. 'तुमचा दुसरा मुलगा गजानन मला दत्तक द्या.' वडिलांनी विनंती मान्य केली आणि दत्तक विधान झाले. आमचा तात्या जो गजानन रंगनाथ शिरवाडकर होता तो विष्णू वामन शिरवाडकर झाला.

(सर्वांना तात्यासाहेब म्हणून माहीत असलेल्या आमच्या भावाला आम्ही धाकटे 'तात्या' म्हणतो व यापुढे मी याच नावाने त्याचा उल्लेख करणार आहे.) पण तात्याच्या दत्तक आईचे पुढे लवकरच निधन झाल्याने तात्याला घर मात्र बदलावे लागले नाही. तात्याचे प्राथमिक शिक्षण पिंपळगावामध्येच झाले व माध्यमिक शिक्षणासाठी तो नाशिकला गेला व न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्याचे नाव दाखल झाले.

आई आणि वडील

सगळ्यात धाकटा भाऊ केशव याचा जन्म झाला. तेव्हापासून आमची आई अंथरुणाला खिळली होती. वडिलांनी सर्व प्रयत्न केले. मुंबईला डॉ. भडकमकरांना दाखवले. पण काही उपयोग झाला नाही. १९२९ साली तिने जगाचा निरोप घेतला. मला तो प्रसंग आठवतो. आई अंथरुणावर होती. तात्या मॅट्रीक पास झाल्याचे तिला सांगण्यात आले. तिच्या निस्तेज तोंडावर उत्कट समाधानाची लहर चमकून गेली. पण ते, तो आनंद आणि समाधान शेवटचे ठरले. आई गेल्यानंतर वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावले. त्याकाळात सात मुलांचे शिक्षण सोपे नव्हते. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या प्रयत्नामुळेच आमचे सगळ्यांचे बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. लढता लढता सैनिक रणांगणावर पडावा त्याप्रमाणे मुलांच्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध झुंजणार्‍या आमच्या वडिलांचे १९४१ साली पिंपळगाव येथे दु:खद निधन झाले.

तात्यात बदल

वडील असताना तात्या घरापासून तुटक राहत असे. घरात असून नसल्यासारखा! परंतु वडिलांच्या निधनानंतर तात्या पूर्णपणे बदलला. त्याने ओळखले दादा (वडील) नंतर धाकट्या भावंडांची सर्व जबाबदारी आपणावरच आहे. आमचे सर्वात वडील भाऊ पद्माकर यांचेही निधन झाल्याने तात्यावरची जबाबदारी अधिकच वाढली. माझे इतर भाऊ आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या पायावर उभे राहिले. मनोहर, वसंत सरकारी नोकरीत चांगल्या पदावर आरुढ झाले. मधुकर याने नाशिकच्या वृत्तपत्र व्यवसायात चांगली प्रगती केली व अच्युत 'कुमार'चा (मुलांचे मासिक) संपादक आणि मालक आहे. धाकटा केशव पुणे विद्यापीठात प्राध्यापक आहे. सर्वजण आपापल्या संसारात सुखी आहेत. सांगण्यासारखी गोष्ट अशी की, सगळ्यांचा साहित्याशी जवळचा संबंध आहे. मनोहर यांची दोन नाटके व एक कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. वसंत हा 'किशोर'चा संपादक होता व अभ्यासू समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहे. धाकटा केशव याच्या शेक्सपियर व मार्क्सवरील पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाला आहे. 'साहित्य' सगळ्यांच्या रक्तात आहे म्ह्टले तर ते चुकीचे होणार नाही.

युद्धपर्व

तात्याला आजचे स्थान सहजासहजी मिळाले, असा कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. तात्या साहित्याकडे का वळला, याची अनेक कारणे आहेत. आमच्या वडिलांनाही साहित्याचे चांगलेच आकर्षण होते. त्यामुळे त्याकाळात आमच्या घरात केसरी, नवाकाळ, आनंद येत असत. घरात बरीच पुस्तकेही यायची. त्यामुळे तात्यामध्ये वाचनाची आवड निर्माण झाली. आमचे मामा राजाराम वा. जानोरकर हे कादंबरीकार होते व धाकटे मामा गंगाधर वा. जानोरकर हे कवी होते. यांच्याकडून स्फूर्ती घेऊन तात्या कविता लिहू लागला. त्याच्या सुरुवातीच्या कविता प्रसिद्ध करण्याचे श्रेय 'बालबोधमेवा' या मासिकाचे संपादक श्री. देवदत्त नारायण टिळक यांना द्यावे लागेल.

बी.ए. झाल्यावर पुढील दहा पंधरा वर्षे त्याच्या जीवनात युद्धपर्वच होते. सरकारी नोकरी करावयाची नाही हे ठरविल्यावर 'काय करणार' असा यक्ष प्रश्न त्याच्यापुढे उभा होता. सिनेमात काहीतरी करावे असे त्याला वाटत असे. त्यासाठी तो मुंबईला जाऊन आला. पण पंजाबी, पारशी आणि गुजराथी लोकांच्या हातात असलेल्या या व्यवसायात त्याला कोणी तेथे पायही देऊ दिला नाही. पुढे पुण्याला जाऊन प्रभातचा दरवाजा ठोठावून पाहिला. पण प्रतिसाद न मिळाल्याने परत नाशिक शहरात आला. याचवेळी येथे कै. फाळके यांचे शिष्य कै.शिंदे यांनी गोदावरी सिनेटोन सुरु केली होती. तीत त्याला काम मिळाले. परंतु ही कंपनीही फार काळ टिकली नाही. सिनेमाला रामराम ठोकून तात्या मुंबईला गेला. लाखो माणसे असलेल्या या शहरात तो एकटा होता. पैसे नव्हते, आसरा नव्हता. कोणाची ओळख नव्हती. नोकरीच्या शोधात वणवण फिरावे आणि कुठेतरी आसरा घ्यावा अशी परिस्थिती होती! याच काळात सामान्य माणसाच्या जीवनात किती आग असते याची त्याला कल्पना आली. त्याच्या काव्यामधून दुर्बलांबद्दलची सहानुभूती ठायीठायी दिसते. याचे कारण हे मुंबईतले सुरुवातीचे जीवन!

नंतर त्याला धनुर्धारीत नोकरी मिळाली. दादरमध्ये राहावयाला खोली मिळाली. आता थोडे स्थैर्य मिळाले. 'विशाखा' मधील अनेक कविता त्याने याचवेळी लिहील्या. आणि 'विशाखा' काव्यसंग्रह तेव्हाच प्रसिद्ध झाला. तो नाटकाकडे वळला, याचे कारण कै. डॉ. भालेराव! त्यांनी विनंती केल्यामुळेच त्याने 'दूरचे दिवे' हे नाटक लिहिले व डॉक्टरांनीच ते रंगभूमीवर आणले.त्यानंतर लिहिलेली सर्व नाटके वाचकांना परिचित असल्याने त्या सर्वांची नावे येथे देण्याची आवश्यकता नाही, सत्तेच्या राजकारणाचे त्याला आकर्षण नाही. परंतु अन्याय प्रतिकारार्थ होणार्‍या आंदोलनात तो नेहमीच भाग घेतो. स्वातंत्र्य-संघर्ष, संयुक्त-महाराष्ट्र आणि गोवामुक्ती आंदोलनाशी त्याचा निकटचा संबंध होता.

आवडी निवडी
तात्या दर दिवाळीत आणि मे महिन्यात पुण्याला येतो. तात्या आला म्हणजे दिवाळी नसली तरी दिवाळीचा आनंद आमच्या घरात ओसंडतो. पुण्यात असलेले माझे दोन भाऊ मनोहर व अच्युत हे ही सायंकाळी माझ्या घरी येतात. गप्पा रंगतात. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. बालवयात आम्ही आमच्या पिंपळगावच्या घरात जमत असू. त्याची त्यावेळी तीव्रतेने आठवण येते. आता आम्हा सगळ्यांच्या जीवनात संध्याकाळ सुरु झाली आहे. पण तात्या आला म्हणजे संध्याछाया दूर होतात आणि प्रभातसमयीच्या प्रकाशाची सभोवार पखरण झाली आहे, असा भास होतो!

तात्याला प्रवासाची फार आवड आहे. दर सुट्टीला आम्ही सर्वजण दूरदूरच्या प्रवासाला जातो. कधी कोकणात पुळ्याच्या गणपतीला तर कधी मध्यप्रदेशातील मंडूगडला. प्रवासाची पद्धत ठरलेली असते. मेटॅडोअर भाड्याने घ्यायची. रस्त्यातले मुक्काम डाकबंगल्यातच करायचे. हे बंगले किती सुंदर असतात! उंच डोंगरावर दाट वनात नाहीतर नदीच्या किनार्‍यावर. बंगल्याच्या सभोवार मोठमोठे वृक्ष असतात. असंख्य फुलझाडे असतात आणि विविध प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी किलबिलाट करीत असतात.

प्रवासात गाड्या बिघडतात, पेट्रोल संपते, रस्ते चुकतात. परंतु अशा अडचणींनीही प्रवासाची गंमत वाढते. जेवणाच्या बाबतीत तात्याच्या खास आवडीनिवडी नाहीत. ताटात लोणचे आणि दोन तीन चटण्या असल्या की तात्याला इतर फारसे काही लागत नाही. घरात टीव्ही असला तर तात्याला फक्त दोन कार्यक्रमात रस असतो. क्रिकेटची मॅच आणि बातम्या. इतर कार्यक्रम तो सहसा पाहत नाही.

तात्याच्या स्वभावाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य हे की तो साहित्यासंबंधी कधीही काहीही बोलत नाही. त्याच्या सहवासात तो मोठा साहित्यिक आहे, हे कोणास जाणवतही नाही. तो अतिशय उदार आहे आणि त्याचा अनेकांनी फायदा घेतला हे खरे आहे. पण फसगत करणार्‍यावरही तो रागवत नाही. परिस्थितीमुळे असे त्यांना करावे लागले असेल अशी तो मनाची समजूत करुन घेतो. म्हणून आम्हाला नेहमी वाटते उच्च पातळीचे त्याचे वेगळे अंग आहे. या व्यवहारी जगातला तो नाहीच!

वहिनींचे निधन झाल्याने तो अधिकच एकाकी झाला आहे. माणसे येतात, भेटतात, बोलतात हेच त्याचे जीवन झाले आहे. त्याचे मित्र आपला वडील भाऊ मानून त्याची काळजी घेतात ही सद्भाग्याची गोष्ट आहे. त्यात डॉ. वसंतराव गुप्ते हे सर्वप्रमुख आहेत.

असमान्य असून तो सामान्यासारखा राहतो, यातच त्याचे श्रेष्ठत्व समाविष्ट झाले आहे, असे मला वाटते. देवतातुल्य, सर्वांना हवासा वाटणारा, आपल्यापेक्षा इतरांची चिंता वाहणारा असा भाऊ आम्हाला लाभला हे आमचे परमभाग्य आहे असे मी मानते.

- कुसुम (शिरवाडकर) सुनावणी

हा लेख पुनर्मुद्रित करण्याची परवानगी दिल्याबद्दल जीवन विकास केंद्र ग्रंथसंग्रहालय, मुंबई व श्री. सदानंद दणाईत यांचे मन:पूर्वक आभार.

final5_mbd.jpg
कुसुमाग्रज आणि मंगेशकर

final6_mbd.jpg
बासु भट्टाचार्य, अभिनेता अनिल कपूर आणि आर के लक्ष्मण यांच्या समवेत.

final7_mbd.jpg
अण्णा हजारे आणि श्रीयुत बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत.

प्रकाशचित्रे प्रताधिकार आणि मनःपूर्वक आभार- कुसुमाग्रज प्रतिष्ठान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अद्भुत वाटलं वाचताना. जिच्या नावाने आपण त्यांना ओळखतो, साक्षात त्या कुसुमताईंचा लेख !!

अद्भुत अनुभव ...!!!!

कित्ती माहिती मिळाली!
विशाखामधल्या कवितांच्या लेखनकालात शिरवाडकर स्वतः धडपडत होते (इथे त्या काळाला युद्धपर्व म्हटले आहे); तरीही विशाखातल्या कवितांमध्ये समाजमनाचा हुंकारच दिसून येतो.

हा लेख पुनर्मुद्रित करण्याची परवानगी दिल्याबद्दल जीवन विकास केंद्र ग्रंथसंग्रहालय, मुंबई व श्री. सदानंद दणाईत यांचे मन:पूर्वक आभार. >>>> संपूर्ण अनुमोदन.

माहितीपूर्ण लेखन.... आवडलं.