एक होते कुसुमाग्रज (३): नटसम्राटाचे साम्राज्य... (नीधप)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 12:18

नाटककार वि.वा.शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचे पान. नटसम्राटच्या भाषेची जादू आणि कुठल्याही कसबी नटाला आव्हान वाटेल अशी आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा आजही अनेकांना आकर्षित करते.

नटसम्राटच्या संहितेचे मूळ शेक्सपिअरच्या ‘किंग लिअर’मध्ये आहे हे सर्वज्ञातच आहे. किंग लिअर ते नटसम्राट या प्रवासाबद्दल शिरवाडकरांनीच काही टिपणे केलेली आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात मनावर ताण आला की, नाट्यप्रयोगात शिरणारा नट अशी व्यक्तिरेखा असलेल्या एका इंग्रजी सिनेमाबद्दल शिरवाडकरांनी ऐकले होते. नानासाहेब फाटकांनी ’किंग लिअर’चे रूपांतर करण्याची विनंती शिरवाडकरांना केली होती. परंतु रूपांतर करताना प्रमुख व्यक्तिरेखा राजा न रहाता रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट त्यांना दिसू लागला. हा सम्राट त्यांना नानासाहेब फाटकांच्याच व्यक्तिरेखेत मिळाला. कधीकाळी ऐकलेली सिनेमातील व्यक्तिरेखा, ’किंग लिअर’च्या कथेचा सांगाडा, नानासाहेब फाटकांचे व्यक्तिमत्व आणि अखेरीस जेव्हा नटसम्राट कागदावर उतरले तेव्हाचे शिरवाडकरांचे वय या सर्व गोष्टींच्या मिश्रणातून नटसम्राट प्रत्यक्षात आले.

२३ डिसेंबर १९७० रोजी संध्याकाळी, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला. गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक मंचावर आणले होते. संस्थेचा सुवर्णमहोत्सवातला हा प्रयोग होता. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी. आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती डॉ. श्रीराम लागू यांनी; तर कावेरी साकारली होती शांता जोग यांनी.

गडकर्‍यांच्या ’एकच प्याला’नंतर जवळजवळ ५० वर्षांनी इतके अभूतपूर्व भाषासौंदर्य घेऊन येणारे नाटक म्हणून तेव्हापासून या नाटकाला लोकांनी डोक्यावर घेतले. नटसम्राट या नाटकाला १९७० सालचा राज्य नाट्य पुरस्कार मिळाला तर या नाटकाच्या लिखाणासाठी शिरवाडकरांना १९७४ सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

नटसम्राटच्या पहिल्या प्रयोगात गणपतराव बेलवलकरांची भूमिका डॉ.श्रीराम लागू यांनी केली होती. नटसम्राटच्या संवादांच्या बाबतीत पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लांबच्या लांब स्वगते. या बाबत डॉ. लागू सांगतात की लहानपणी, सकाळी देवापुढे बसून स्तोत्रे पाठ करण्याची सवय त्यांना उपयोगी पडली. साधारण २८१ प्रयोगानंतर डॉ. लागूंनी प्रकृतीच्या कारणास्तव ही भूमिका करणे थांबवले. त्यांच्यानंतर अनेकांनी ही भूमिका केली. प्रत्येकाने आपापल्या परीने या भूमिकेत रंग भरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला डॉ. लागूंशी केलेल्या तुलनेला तोंड द्यावे लागले.

डॉ. लागूंच्या नंतर ही भूमिका समर्थपणे पेलली दत्ता भट यांनी. दत्ता भटांचा खडा आवाज व भारदस्त व्यक्तिमत्व यामुळे बेलवलकरांच्या व्यक्तिरेखेला वेगळे परिमाण मिळाले. त्यांचा नटसम्राट अपरिमित गाजला. दत्ता भटांनी नटसम्राटचे ४०० प्रयोग केले. त्यांनाही नंतर प्रकृती-अस्वास्थ्यामुळे नटसम्राट करणे थांबवावे लागले. नंतर १९७७च्या दरम्यान सतीश दुभाषींनी नटसम्राटाची भूमिका पेलली. त्यांनी आधीच्या दोघांचा नटसम्राट पाहिला नव्हता. याचमुळे ठराविक साच्यापेक्षा वेगळा नटसम्राट उभा करायचा त्यांनी प्रयत्न केला. १९७९ च्या सुमारास याच संचामधे चंद्रकांत गोखले यांनी नटसम्राट साकारायला सुरुवात केली. याही नटसम्राटाला प्रेक्षक व समीक्षकांची चांगली दाद मिळाली.

या चारही नटसम्राटांच्या बरोबर कावेरी साकारणार्‍या एकच अभिनेत्री होत्या त्या म्हणजे शांता जोग. कणखर पण मर्यादशील अश्या त्यांनी साकारलेल्या कावेरीची छाप पुसणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही.

नंतर १९८२ साली अरविंद देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली यशवंत दत्त यांनी बेलवलकर व सुलभा देशपांडे यांनी कावेरी साकारली. स्वतः शिरवाडकरांनी ‘आत्तापर्यंतचा मला सगळ्यात भावलेला नटसम्राट’ अशी पावती या नटसम्राटाला दिली होती. या प्रयोगाचे दिग्दर्शकीय वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील बाकीची पात्रे म्हणजे मुले, सुना व जावई हे सर्व आधीच्या प्रयोगांप्रमाणे खलनायकी ढंगाने न दाखवता परिस्थितीचे गुलाम म्हणून दाखवण्यात आले होते.

नंतर परत एकदा पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी मधुसुदन कोल्हटकर व लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केले. या प्रयोगाचे श्रेयस इतकेच की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमधे नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला. यानंतर नटसम्राटाच्या भूमिकेत राजा गोसावी व कावेरीच्या भूमिकेत उषा नाडकर्णी असाही एक प्रयोग करण्यात आला. उषा नाडकर्णींच्या कावेरीने वाहवा मिळवली पण गोसावींचा नटसम्राट मात्र लोकांना फारसा आवडला नाही.

पहिल्या नटसम्राटानंतर दत्ता भटांपासून राजा गोसावींपर्यंत अनेक अभिनेत्यांनी नटसम्राटाचे आव्हान स्वीकारून झाल्यानंतर १९८६ साली डॉ. लागूंनी पुन्हा एकदा नटसम्राट पेलले. यावेळेला दिग्दर्शक होते माधव वाटवे आणि कावेरी साकारत होत्या सुहास जोशी. या नटसम्राटालाही लोकांची मान्यता मिळाली. सुहास जोशींची थोडी वेगळ्या पद्धतीने उभी केलेली कावेरीही लोकांना आवडली.

यानंतरही अनेकांनी नटसम्राटला हात घालण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यातील विशेष उल्लेखनीय प्रयोग म्हणजे लक्ष्मण देशपांडे व अनुया दळवी यांनी केलेला द्विपात्री नटसम्राटाचा प्रयोग. या प्रयोगाचे दिग्दर्शनही प्राध्यापक लक्षमण देशपांडे यांचेच होते. देशपांड्यांनी नाटक द्विपात्री करून त्याचे रुपडेच बदलून टाकले. यासाठी संशोधन करून संहितेचे पुन्हा संपादन केले. नेपथ्य, नाटकातील स्वगते व पार्श्वसंगीत यांचाही वेगळ्या पद्धतीने विचार केला. गणपतराव बेलवलकर आणि कावेरी या दोन पात्रांव्यतिरिक्त बाकी पात्रे उल्लेखापुरतीच ठेवली. अगदीच गरज पडली तेव्हा त्यांचे संवाद नुसते ऐकवले. हा प्रयोग म्हणून यशस्वी झाला असे समीक्षकांनी मांडले आहे.

मराठी भाषेतून इतर भारतीय भाषांत अनुवादित केल्या गेलेल्या महत्त्वाच्या मराठी नाटकांपैकी नटसम्राट हे एक. या नाटकाचे इंग्रजी, गुजराथी, हिंदी आणि तेलुगू भाषांतील अनुवाद आणि नाट्यप्रयोग दोन्ही भरपूर गाजले.

काही अनुवाद :

o इंग्रजी: द लास्ट सीन - अनु. - वसंत लिमये
o हिंदी: नटसम्राट - अनु. र. श. केळकर.
o तेलुगू :नाटकांतम - अनु. उदयभानू
o गुजराथी: २ अनुवाद
१. बहुत नाच्यो गोपाला - कांती मडीया
२. हमारी दुनिया तमारी दुनिया - प्रवीण सोलंकी

हिंदीमधे ३ - ४ वेगवेगळ्या दिगदर्शकांनी हे नाटक केले आहे.

तेलुगूमधे नाटकांतम - संस्था रंगधारा - जानेवारी १९९८. दिग्दर्शन: प्राध्यापक भास्कर शेवाळकर. प्रमुख भूमिका: चाटला श्रीरामलू

गुजराथीमधे
१. बहुत नाच्यो गोपाला - १९७४ दिग्दर्शन: कांती मडीया. प्रमुख भूमिका: चंद्रकांत भट
२. हमारी दुनिया तमारी दुनिया - १९९५ दिग्दर्शन व प्रमुख भूमिका: सिद्धार्थ रांदेरीया

अजूनही अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक आपापल्या परीने हे धनुष्य पेलायचा प्रयत्न करताना दिसतात.

हा झाला या नाटकाचा इतिहास.

माझ्या पिढीने लहानपणी नटसम्राटचे वादळी वारे ऐकले. किंचित कळत्या वयात दूरदर्शनवर नटसम्राट बघितले. नववी-दहावीच्या काळात हे नाटक वाचले, उतारे पाठ केले आणि चोख भाषेत म्हणून दाखवून सगळ्यांकडून शाबासकी मिळवली. तेव्हापासूनच नटसम्राटच्या संदर्भाने सतत डोक्यात दोन वेगळ्या टोकाची मते येत असत. मराठी शाळेत शिकल्याने आणि वाचनाचा किडा वेळेवर डसल्याने नटसम्राटच्या लिखाणातले भाषासौंदर्य, नाटकाची बांधणी हे प्रचंड आवडत असे आणि त्याच वेळेला अप्पासाहेबांचा भाबडेपणा त्रासदायक होत असे. त्या भाबडेपणाचे, भोळेपणाचे निष्कारण उदात्तीकरण आहे असं वाटत असे. आणि कुठेतरी अप्पासाहेबांच्या दुरवस्थेला तो निष्कारण भाबडेपणाच जबाबदार आहे असे वाटत राही. पुढे पुढे ते अधोरेखित होत गेले. अखेर ठाम मतबीतच बनले!

मग नाटक शिकताना 'लियर' पचवला. त्याचा भाबडेपणा हा त्याच्या काळाला आणि कर्तृत्वाला शोभून दिसतोय हे जाणवलं. तो खटकेच ना. त्याची वाताहात इत्यादी सगळीच ट्रॅजेडी एका प्रकारे रोमॅन्टिसिस्टिक वाटत राहिली. भली मोठी नाट्यमय उंची होती त्या ट्रॅजेडीला. या पार्श्वभूमीवर परत नटसम्राट आठवल्यावर ५० च्या दशकातल्या नटसम्राटाचा भाबडेपणा जाम म्हणजे जामच खटकू लागला. मग नाटक ट्रॅजिक न रहाता मेलोड्रामाच जास्त वाटू लागला.

मधे प्रसारभारतीच्या उपक्रमांतर्गत दूरदर्शनसाठी ६ भागांमधे नटसम्राट करून दिले. त्यावेळेला अभ्यास करताना पुन्हा तेच जाणवत राहिले. मुलगा-सून, मुलगी-जावई हे खलनायक न वाटता परिस्थितीची बाहुली आहेत हे जाणवू लागले. नाटक आशय-विषय-कथेच्या बाबतीत मनातून उतरत गेले. भाषा आणि नाटकाची बांधणी मात्र कायम मोहात पाडते यात वाद नाही.

- नीरजा पटवर्धन

तळटीप: वरील लेखातील सर्व संदर्भ एन सी पी ए, मुंबई येथील ग्रंथालयातील 'नटसम्राट'च्या संदर्भ संग्रहातून घेतले आहेत.

final2_mbd.jpg

प्रकाशचित्रांचे प्रताधिकार आणि मनःपूर्वक आभार- कुसुमाग्रज प्रतिष्ठान.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< त्या भाबडेपणाचे, भोळेपणाचे निष्कारण उदात्तीकरण आहे असं वाटत असे. आणि कुठेतरी अप्पासाहेबांच्या दुरवस्थेला तो निष्कारण भाबडेपणाच जबाबदार आहे असे वाटत राही. पुढे पुढे ते अधोरेखित होत गेले. अखेर ठाम मतबीतच बनले...भाषा आणि नाटकाची बांधणी मात्र कायम मोहात पाडते यात वाद नाही.!>> नी, तू माझी सख्खी मैत्रीण शोभतेस. माझं तंतोतंत हेच मत आहे.

नीधप, तूमच्या प्रयोगाबद्दल (संदीप / अश्विनी ) नाही लिहिले !
माझ्या आठवणीप्रमाणे डॉ. भुताडीया यांनी पण काही प्रयोग केले.
मी स्वतः डॉ. लागू आणि शांता जोग, यांचा प्रयोग बघितला आहे.
पण हे खरे आहे, काहि काळानंतर हे नाटक खटकू लागले. माझ्या मनात हे नाटक
आणि कानेटकरांचे, हिमालयाची सावली याची तुलना होत राहते. मुख्य कलाकार
तेच होते.

नटसम्राट हे या उपक्रमाच्या निमीत्ताने पाहिले आणि संहिता विकत घेतली. लाजिरवाणी गोष्ट आहे.
तोपर्यंत स्वगते माहित होती फक्त.

किंग लियर मात्र लई आवडते. एकदा तरी रॉयल शेक्सपियर कंपनीचे पहायचेच आहे.

हा आढावा आवडला नीरजा. यातली बरीचशी माहिती नव्हती.

एकदा तरी रॉयल शेक्सपियर कंपनीचे पहायचेच आहे.<<<
मी पाह्यलेय. अगदी रिकन्स्ट्रक्टेड 'द ग्लोब' मधे. कॉमनरसारखे उभे राहून Happy

दिनेश,
नंतर इतरांनी अनेक प्रयोग त्यातला आमचा एक. प्रसारभारतीसाठी केला होता याचा उल्लेख आहे की. त्याहून जास्त प्रयोगाबद्दल या लेखात सांगणे औचित्याला धरून वाटले नाही. Happy

तसं नाही, मूळात हेच नाटक का करावेसे वाटले ? (का प्रसारभारतीची तशी मागणी होती ?) आधीच्या प्रयोगांपेक्षा काही वेगळा विचार केला होता का ? ते वाचायचे होते. (प्रारभारतीच्या अनुभवाचा त्रासदायक भाग अर्थातच नको.)

प्रसारभारती दर वर्षी क्लासिक्स निवडते आणि दिग्दर्शक निवडते. क्लासिक्स आणि दिग्दर्शकांच्या जोड्याही प्रसारभारतीच लावते आणि मग दिग्दर्शकाला विचारते. तिथे चॉइस नसतो.

वेगळा विचार म्हणजे जेव्हा प्रत्येकी २३ मिनिटाचे असे ६ एपिसोडस करायचे असतात आणि ते कॅमेर्‍यात बंदीस्त करायचे असतात तेव्हा माध्यमबदल(रंगभूमी ते छोटा पडदा) म्हणून बराच वेगळा विचार करावा लागतोच. पण तरी ते क्लासिक म्हणून करून द्यायचे असल्याने आशय-विषय-कथावस्तू याबाबतीत काहीही वेगळा प्रयोग करायचे नाही एवढे मात्र नक्की ठरवले होते.

असो. आता हे संभाषण अवांतर होतेय Happy

उत्तम लेख, अतिशय आवडला. नाटकाची बांधणी, भाषासौंदर्य आणि मेलोड्रामा याबद्दल पूर्ण सहमत.

आवडला लेख!

मुले, सुना व जावई हे सर्व आधीच्या प्रयोगांप्रमाणे खलनायकी ढंगाने न दाखवता परिस्थितीचे गुलाम म्हणून दाखवण्यात आले होते.>>> हे चांगले केले.

छान आढावा घेतलायस. मस्त लेख. Happy

>>>>> मग नाटक शिकताना 'लियर' पचवला. त्याचा भाबडेपणा हा त्याच्या काळाला आणि कर्तृत्वाला शोभून दिसतोय हे जाणवलं. तो खटकेच ना. त्याची वाताहात इत्यादी सगळीच ट्रॅजेडी एका प्रकारे रोमॅन्टिसिस्टिक वाटत राहिली. भली मोठी नाट्यमय उंची होती त्या ट्रॅजेडीला. या पार्श्वभूमीवर परत नटसम्राट आठवल्यावर ५० च्या दशकातल्या नटसम्राटाचा भाबडेपणा जाम म्हणजे जामच खटकू लागला. मग नाटक ट्रॅजिक न रहाता मेलोड्रामाच जास्त वाटू लागला. >>> पटलं. Happy

आवडला लेख.

मी नाटक पाहिले आहे. त्याकाळी अशी माणसे, व्यक्तिरेखा होत्या समाजात. माझे दत्तक आईवडील त्याच वयोगटातील. ते नाटक पाहून मन इतके भारावले होते कि बाकीच्या आयुष्याचे काहीही झाले तरी चालेल पण आईवडीलांना अंतर द्यायचे नाही हे घट्ट ठरविले होते. हा त्या भाषेचाच परीणाम. मुलांची पण बाजू पटते. आता तसा भाबडे पणा राहिला नाहीये कुठेच. लिअर चे एक्स्पोजर नाही. कबतोबी पढेंगे.

परवा डॉ. हू च्या एका एपिसोड मध्ये ते ग्लोब थिएटर व शेक्स्पीअर दाखविले होते. ह्या जागी मॅजिक आहे असा एक डायलॉग आहे व तो फार पटला.

सुंदर, अगदी चित्रमय, लेख.

"नटसम्राट" कोल्हापूर इथे पाहायला मिळाले नाही, पण ते पणजी येथे पाहिले आणि त्या प्रयोगाला हजर असलेले अमराठी भाषिक गोवानीज प्रेक्षकही 'बेलवलकरां' च्या स्वगताने कसे भारावून गेले तेही अनुभवले होते.

वि.वा.शिरवाडकरांच्या लेखणीने उधळलेले भाषावैभव फक्त एकाच नाटकात पाहण्याची इच्छा झाली तर बिनदिक्कत 'नटसम्राट' हाती घ्यावे. रंगदेवतेला अभिवादन करून या क्षेत्रात नाव मिळविण्याची मनिषा धरणार्‍या प्रत्येक कलाकाराला या भूमिकेची जबरदस्त मोहिनी आहे. नीरजा पटवर्धन यानी डॉ.लागू यांच्यानंतर हे धनुष्य पेललेल्या कलाकारांची नावे दिली आहेत ती पाहतानाच लक्षात येते की किती दिग्गजांना या भूमिकेचे आव्हान पेलावे असे वाटत असे.

'सरकार' झालेल्या शांता जोग यांच्याविषयीचा उल्लेख भावला. कामेरी, कराड जवळ झालेल्या त्या १९८० च्या भीषण अपघातात शांता जोग यांचा अंत झाला. तोपर्यंत त्यांचीतील 'कावेरी' सातत्याने नटसम्राटाच्या प्रयोगांशी समरस झाली होती. 'अप्पा' बदलत गेले तरी.

अरे वा! किती छान लेख! Happy कुसुमाग्रजांच्या लेखनाचे किती वेगवेगळे पैलू सर्वांनी मांडले आहेत. Happy

कुठेतरी अप्पासाहेबांच्या दुरवस्थेला तो निष्कारण भाबडेपणाच जबाबदार आहे असे वाटत राही. >>> खरंय... कुणी घर देता का घर? असं विचारणारे अप्पा पहावायचे नाहीत. त्यांच्या ह्या अवस्थेला त्यांचा भाबडेपणाच जबाबदार आहे, हे जाणवायचे. माणसाने नम्र असावे, प्रेमळ असावे पण ठाम आणि व्यावहारिकही असावे, असं नेहमी वाटायचं. कुसुमाग्रजांनी का असा भाबडा नायक बनवून आपल्याला रडवले, असं वाटत रहायचं.... पण मग जाणवायचं, ह्यातून आपल्याला मोठी शिकवणच दिली आहे त्यांनी. जे शिकतील, त्यांचे मावळतीचे आयुष्य सुसह्य होईल. Happy

Pages