एक होते कुसुमाग्रज (४): कुसुमाग्रज आणि त्यांचे समकालीन कवी (नंदन)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 11:49

कुसुमाग्रज आणि त्यांचे समकालीन कवी

final4_mbd.jpg

आधुनिक मराठी कवितेच्या जनकाचा मान निर्विवादपणे केशवसुतांचा. संत-पंत-शाहिरी काव्य ह्या मर्यादेत अडकून पडलेल्या काव्यक्षेत्राला, त्यांच्या 'जुने जाऊद्या मरणालागुनि' ह्या भूमिकेचे रणशिंग फुंकणार्‍या 'तुतारी'ने खडबडून जागे केले. एकोणिसाव्या शतकाच्या सरत्या काळात इंग्रजी साहित्याशी येऊ लागलेला संपर्क, युरोपातील 'रोमँटिसिझम'सारख्या नव्या शैलीशी झालेली ओळख आणि तुरळक प्रमाणात का होईना; पण ह्या नवीन बदलांना अनुकूल प्रतिसाद देणारा वाचकवर्ग ह्यासारखे काही घटक बहुतांशी पारलौकिक सृष्टीभवती घुटमळणार्‍या पारंपरिक कवितेला नवीन वळण देणारे ठरले. गोविंदाग्रजही थोड्याफार फरकाने ह्याच नव्या मनूतले कवी म्हणता येतील.

पुढे रविकिरण मंडळासारखे प्रयोग जरी मराठी कवितेला फारशी निराळी दिशा देऊ शकले नसले तरी ती अधिक लोकप्रिय होण्यात त्यांनी हातभार लावला. त्यानंतरचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल, अशी मर्ढेकर - बोरकर - कुसुमाग्रज ही कवींची त्रयी दोन महायुद्धांमधल्या अस्वस्थ काळात उदयाला आली. वयात जेमतेम काही महिन्यांचे अंतर असणार्‍या ह्या तिघांच्या कवितांची शैली, वर्ण्यविषय आणि दृष्टिकोन जरी निरनिराळे असले तरी त्यांच्या कविता मराठी साहित्याला समृद्ध करून गेल्या, याबद्दल दुमत नसावं.

. . .

कवितेच्या आकृतिबंधात वेगवेगळे प्रयोग करून पाहणार्‍या, विविध विषय समर्थपणे हाताळणार्‍या ह्या तीन कवींना एखादं सोयीस्कर लेबल चिकटवण्याचा प्रयत्न कधी कधी होतो; तो अर्थातच अन्याय्य आहे. निसर्गकविता आणि रमल प्रेमकाव्य लिहिणार्‍या बोरकरांना कधी 'रसलंपट मी तरी मज अवचित गोसावीपण भेटे'चा साक्षात्कार होतो. 'हा इथला मज पुरे फवारा' म्हणणार्‍या मर्ढेकरांना 'जरा असावी मरणाचीही, अमोघ आणिक दुबळी भीती; जरा आतड्यांमधून यावी, अशाश्वताची कळ ओझरती' असं वाटून जातं. तर 'तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा' ही आकांक्षा मनी बाळगणारी कुसुमाग्रजांची काव्यप्रेरणा 'किनार्‍यावर' सारखी तरल प्रेमकविता लिहून जाते.

एरवी 'तरीही येतो वास फुलांना' इतपत आशेची धुगधुगी असणारे मर्ढेकर 'किती चातक-चोचीने प्यावा वर्षाऋतू तरी' म्हणत आषाढ-श्रावणाचं प्रसन्न स्वागत करतात; तर 'मनातले सल रूजून आता, त्याचा झाला मरवा रे' असं 'सरीवर सरीं'चं उत्फुल्ल वर्णन करणारे बोरकर कधी त्या कुंद, पावसाळी हवेचा विरागी मूड 'सुखा नाही चव लव वठलेली आहे, दु:खा नाही भार धार बोथटली आहे' अशा मोजक्या शब्दांत नेमका रेखाटतात. सभ्य, संयत कुसुमाग्रजांना क्वचित 'असे मवाली पाहुनि होतो, मीही काही वेळ मवाली; विडी कुणाची बसतो फुंकित, आडोशास पुलाच्या खाली' असा परकायाप्रवेश करावासा वाटतो.

. . .

असं असलं, तरी ह्या तिन्ही कवींची काही व्यवच्छेदक लक्षणं ओळखता येतात. साध्या आगगाडीचंच उदाहरण घ्या. कुसुमाग्रजांच्या कवितेत ती जुलमी, उद्दाम सत्तेचे रूपक म्हणून येते ('आगगाडी आणि जमीन'). बोरकरांच्या 'चित्रवीणा' ह्या कवितेतला निवेदक गाडीत बसून आजूबाजूचा निसर्ग न्याहाळतो, दृश्यं आठवणीत साठवून घेतो. गाडीचं ह्या कवितेतलं प्रयोजन केवळ एक साधन म्हणून ('घाटामध्ये शिरली गाडी आणि रात्रीचा पडला पडदा, पण चित्रांची विचित्रवीणा अजून करते दिडदा दिडदा'); तर मर्ढेकरांच्या कवितांतून ती शहरातल्या संवेदना बधीर करणार्‍या गतानुगतिकतेचे प्रतीक म्हणून येते. ('सकाळीं उठोनि | चहा-कॉफी प्यावी | तशीच गाठावी | वीज-गाडी ||)

एकंदरीतच जर या कालखंडातल्या कवितेचं ढोबळमानाने वर्गीकरण करायचं झालं, तर ते आत्माविष्कार करणारी कविता आणि विश्वाविष्काराचा वेध घेणारी कविता, असं करता येईल. 'जे पिंडी ते ब्रह्मांडी' ह्या न्यायाने ही विभागणी काही हवाबंद कप्प्यांसारखी संपूर्ण निराळी किंवा सकृद्दर्शनी वाटते तितकी परस्परविरोधीही नाही. तसं पाहिलं तर, प्रत्येक माणसाचे आयुष्य ही त्याच्यापुरती का होईना - पण छोट्या, छोट्या अनन्यसाधारण घटनांची एक साखळी असते. जितक्या बारकाईने त्या साखळीकडे पहावे, तितक्याच स्पष्टपणे त्यामागचे 'विश्वाचे आर्त' एखाद्या प्रतिभावंताला उलगडत जाते. 'व्हॉट इज मोस्ट पर्सनल, इज मोस्ट युनिव्हर्सल' असं ह्या प्रक्रियेबद्दल म्हणता येईल. कमीअधिक प्रमाणात, ह्या तिन्ही कविवर्यांच्या लेखनात याचा पडताळा येतो.

कवितेच्या मुख्य प्रवाहाच्या दृष्टीने विचार केला, तर मर्ढेकर हे या तिघांतले सर्वाधिक बंडखोर कवी. महायुद्धाच्या विध्वंसात होरपळलेले जग, औद्योगिक क्रांतीमुळे शहरांकडे झुंडीने आलेल्या लोकांचं बेकलाईटी सहनौटरक्तु जगणं ह्यासारखे विषय; 'शतशतकांच्या पायलन्सवर टिंबे देऊन बसलेले कावळे', 'दिव्यांनी पंक्चरलेली रात्र' ह्यासारख्या खास महानगरी प्रतिमा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संदर्भ त्यांनी मराठी कवितेत आणले. 'रोमँटिसिझम'च्या प्रभावाखाली असलेल्या तत्कालीन मराठी कवितेला वास्तववादी आणि विज्ञाननिष्ठेचं परिमाण त्यांच्या कवितांमुळे मिळालं.

'मराठी साहित्याला आजवर इतकी वळणं मिळाली आहेत, की त्याचा मुख्य प्रवाहच हरवून गेला आहे', असं विनोदाने म्हटलं जातं. बोरकरांची कविता ह्या विधानाला अपवाद ठरते. गोव्याचा समृद्ध निसर्ग; संतवाङ्मयाचा आध्यात्मिक वारसा आणि पोर्तुगीज राजवटीमुळे लॅटिन संस्कृतीचे झालेले संस्कार; गांधीवाद; कोकणीची अंगभूत नादमयता; पंचेद्रियांना सुखावणारे अनुभव घेतानाच आयुष्याला उदात्ततेचाही स्पर्श असावा ही लागलेली ओढ - अशा निरनिराळ्या घटकांचा बोरकरांच्या कवितेवर प्रभाव पडलेला दिसतो. ऐहिकता आणि परमार्थ ह्यात पराकोटीचे द्वैत आहे, अशी समजूत प्रचलित असण्याच्या काळात त्यांची कविता 'पार्थिव्यातच व्यास हवा, परि दिव्याचा हव्यास हवा' असं सांगते. ज्या गोव्याच्या भूमीत चांदणं माहेरा येतं, तिथेच 'खोल आरक्त घावांत, शुद्ध वेदनांची गाणी'ही ती गुणगुणते. 'दादाईझम' (http://en.wikipedia.org/wiki/Dada) शी दूरचं नातं सांगणारी मर्ढेकरांची कविता, महानगरी साचेबद्ध जीवन जर 'मी एक मुंगी, हा एक मुंगी' सारख्या ओळींतून प्रकट करत असेल; तर बोरकरांची सौंदर्यलक्ष्यी दृष्टी 'प्रति एक झाडामाडा त्याची त्याची रुपकळा, प्रति एक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा' सांगत आपलं लक्ष वेधून घेते.

कुसुमाग्रजांच्या कवितेकडे ह्या दोन्ही काव्यप्रवाहांशी नातं जोडून असणारी आणि तरीही स्वतःची अशी खास वैशिष्ट्यं जपणारी, म्हणून पाहता येईल. मर्ढेकरांच्या कवितेप्रमाणे ती पारंपरिक सौंदर्यवादी कवितेहून पूर्ण निराळा मार्ग निवडत नाही आणि बोरकरांच्या तरल, 'लिरिकल' कवितांइतका व्यक्तिगत भावनांचा वेधही घेत नाही. याचा अर्थ त्यांनी प्रेमकविता लिहिल्या नाहीत; किंवा ज्या लिहिल्या त्या कोरडेपणाने लिहिल्या आहेत, असं नाही. पण अशा बहुतांश कवितांवर एक जाणत्या, दूरस्थपणाची छाप आहे. वैयक्तिक भावनांचा म्हणा किंवा संवेदनशील मनाच्या व्यक्तीच्या प्रतिक्रियांचा म्हणा - आपल्या आजूबाजूच्या समाजात किंवा राष्ट्रीय/जागतिक स्तरावर होणार्‍या घडामोडींशी एक सामाजिक संवाद ते आपल्या कवितेतून साधतात. परिणामी 'होते म्हणू स्वप्न एक, एक रात्र पाहिलेले; होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले' ह्यासारख्या ओळी मग निव्वळ कवीच्या राहत नाहीत. शिवाय ह्यामागे चतुर कारागिरी किंवा अभिनिवेशी भूमिका नाही. आपल्या प्रकृतिधर्माप्रमाणे निवडलेला मार्ग संयत ठामपणे चोखाळत रहावा, तशी तिची वाटचाल आहे.

कुसुमाग्रजांच्या चतुरस्र साहित्यिक कारकीर्दीत, वाचकांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व 'विशाखा'ला असण्यामागचे हे एक कारण असू शकेल. १९४२ सारख्या अस्वस्थ वर्षात प्रसिद्ध झालेला हा कवितासंग्रह. 'चले जाव'चे आंदोलन, क्रांतिकारकांचे बलिदान, दुसर्‍या महायुद्धाचा उडालेला भडका, स्वातंत्र्याची चाहूल लागलेली असली तरीही समाजात असलेली विषमता इ. अनेक गोष्टींचे पडसाद त्यात उमटले आहेत. पण त्याचबरोबर निसर्गकविता आणि प्रेमकविताही आहेत. 'कोलंबसाचे गर्वगीत'मधला दुर्दम्य आशावाद आणि 'मातीची दर्पोक्ती' व 'पाचोळा'मधली चक्रनेमिक्रमेणची अटळ जाणीव; सैगलच्या सुरांना मानवता जागवण्यासाठी घातलेली साद आणि 'पृथ्वीच्या प्रेमगीता'तली तेजाची उत्कट ओढ; केशवसुतांच्या प्रतिमांना मानवंदना द्यावी तशा आलेल्या 'हा काठोकाठ कटाह भरा!' आणि 'काळोखावर तेजाची लेणी खोदीत बसलेला देवदूत' ह्या ओळी; अहि-नकुलातले नाट्य आणि 'गोदाकाठचा संधिकाल'मधली चित्रदर्शी शैली; 'क्रांतीचा जयजयकार'मधली चेतना आणि 'लिलाव' कवितेतली विखारी हतबलता; प्रतापराव गुजरांच्या आवेशी पण आत्मघातकी हल्ल्याचे रचलेले स्तोत्र आणि बाजीप्रभूंसारख्या लढवय्याच्या मनातही अखेरच्या क्षणी 'सरणार कधी रण' हा डोकावून गेलेला प्रश्न -- वरवर व्याघाती, परस्परविरोधी वाटतील अशा विषयांवरच्या कविता आपल्या समर्थ शब्दकळेने आणि समर्पक प्रतिमांनी वाचकांसमोर मांडणारे फार कमी कवितासंग्रह असावेत. अलेक्झांडर पोपचे शब्द उसने घेऊन सांगायचं झालं तर 'What oft was thought, but ne'er so well express'd' हा निकष जर कवितांना लावायचा झाला; तर त्यात 'विशाखा'चे स्थान फार वरचे असेल.

- नंदन होडावडेकर

प्रकाशचित्रे प्रताधिकार आणि मनःपूर्वक आभार- कुसुमाग्रज प्रतिष्ठान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदन, तुझे लेख म्हणजे एक मेजवानीच! लेख फार छान जमला आहे. ती लिंक छान आहे. फोटोंचा कोलाजही आवडला.

खूप छान लेख नंदन !!
कधीचा "विशाखा" हा काव्यसंग्रह घ्यायचाय......तुझ्या लेखामुळे अधिक तीव्रतेने वाटतंय !!

अप्रतिम लेख नंदन.
माफ करणे पण मला
सहनौटरक्तु
या शब्दाचा अर्थ आणि संदर्भ दोन्ही समजले नाही.
(पार्डन माय इग्नोरन्स याअर्थी मराठीत जे असेल ते!)

नंदन,
तुझ्यापुढे तमाम प्राध्यापकांना लायनीने उभे करावे बघ!
_/\_

आपल्या प्रकृतिधर्माप्रमाणे निवडलेला मार्ग संयत ठामपणे चोखाळत रहावा, तशी तिची वाटचाल आहे.>> तेच तेच. अगदी खरे सांगायचे तर कधी कुसुमाग्रजांच्या कवितेने मला म्याड केले नाही फारसे.
किती संयत, किती संयत.

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद, मंडळी Happy

@ नीरजा -
कठोपनिषदातला एक श्लोक - ॐ सहनाववतु सहनौभुनक्तु सहवीर्यं करवावहै - हा मूळ संदर्भ. ढोबळ अर्थ - आपण सारे एकत्र राहू, जेवू, शक्तीची उपासना करू असा आहे. जनरीतीच्या विरुद्ध काही करण्याच्या भीतीला उद्देशून एका कवितेत त्यांनी या श्लोकाचं 'सह नौ टरक्तु, सहवीर्यं डरवावहै' असं विडंबन केलं आहे.

मर्ढेकरांच्या कवितेतली अजून उदाहरणं म्हणजे -

घनःश्याम सुंदरा श्रीधरा, गिरणोदय झाला
उठी लवकरी, दिनपाळी

किंवा

सर्वे जन्तु: रुटिना: | सर्वे जन्तु: निराशया: |
सर्वे छिद्राणि पंचन्तु | मा कश्चित् दु:ख-लॉग भरेत् ||

सुरेख लेख, नंदन!

>> तुझ्यापुढे तमाम प्राध्यापकांना लायनीने उभे करावे बघ! + १

मस्त !

नंदन, सुरेख लेख.

तेवढं
>> 'पार्थिव्यांतच व्यास हवा, परि दिव्याचा हव्यास हवा'
हे ''पार्थिव्यातच वास हवा, परि दिव्याचा हव्यास हवा'
असं सुधारतोस?

'What oft was thought, but ne'er so well express'd' हा निकष जर कवितांना लावायचा झाला; तर त्यात 'विशाखा'चे स्थान फार वरचे असेल. >> साष्टांग दंडवत तुला ह्या वाक्याबद्दल !!! कसले चपखल couplet शोधलेस. ह्याहून अचूक नसते सांगता आले विशाखाबद्दल.

खुपच छान लेख. एरवी कुठे चांगली कविता आहे असं इथल्या मित्रांकडून कळले की वाचन होते पण तुमच्या लेखामुळे आता मुद्दाम एखादा कवितासंग्रह (वर दिलेल्या तिघांपैकी कोणाचातरी) वाचायला घ्यावा अशी आतून इच्छा झाली. Happy
एक वाक्यात अगदी मोजक्या शब्दात पुर्ण वातवरण उभं करतात ही कवि मंडळी ह्याचे विलक्षण आश्चर्य वाटते.

Pages