गारगर्भार

Submitted by pradyumnasantu on 26 February, 2012 - 16:47

वैशाखाचा निष्ठुर वणवा
वसुंधरेला जाळत होता
जिवा-जिवाला छळताछळता
आकाशाला पोळत होता
*
गर्भप्रफुल्लित मेघसुंदरी
वरुणभेटिला उत्सुक झाली
गदगदुनी मग प्रियकराला
प्रीत-हळी ती देऊ लागली
*
’मेघा’ची ती हाक ऐकुनी
वरूणराजा प्रसन्न झाले
वा-यावरुनी भेटिस जाऊन
सावळ्या प्रिये कवे घेतले
*
मेघप्रिया ती नववा महिना
आवेगाचा भार सहेना
लाजत लाजत वरुणा म्हणते
किति आवळता जरा हळू ना
*
समयी त्याच त्या प्रभाकराने
धाडली पृथ्वीवरती किरणे
मेघाला ती धडकुनी गेली
अविचारी बेदरकारीने
*
प्रसुती वेणा सुरू जाहल्या
किरणांच्या धडकाधडकीने
पाठलाग मग वरूण करतो
वेगाने आणि संतापाने
*
किरणे ती मग भिऊन गेली
वसुंधरेवर लपून बसली
वरूणाने थयथयाट करुनी
मुसळधार अस्त्रेहि ओतलि
*
आधीच उष्म्याने व्याकुळली
धरा जी होति सुकून गेली
तिला आणखी भीवविण्याला
गडगडाट आणि वीजही आली
*
भावंडांच्या आडोशाने
मेघाजी मग प्रसूत झाल्या
अगणित कन्या ’गारा’ टपटप
सृष्टीवरती बरसून आल्या
*
सृष्टी ओलाव्याने हर्षित
भूमिपुत्र तर खूष जाहले
गारा वेचुन वेचुन खाता
मुली-मुले ते नाचनाचले
*
वरूण-क्रोध जो शांत जाहला
कन्याप्राप्तीच्या आनंदे
हळूच आली समोर त्याच्या
भास्कर किरणेही सानंदे
*
गारांसमवे तीही नाचली
सुवर्णमंडीत होऊन सजली
मृद्गंधाच्या शिडकाव्याने
बालकवींची अवनी हसली

गुलमोहर: 

प्रीत-हळी ....अशा शब्दकळा मोहवणा-या आह....कवितेत सौंदर्यस्थळे खूप आहेत. ऋतूंचे चक्र चांगले दर्शवले आहे. मात्र लांबी वाढली.

प्रद्युम्न, आपल्या डोईस बालकवींच्या स्मृतीचा तुरा खोवला जावा ही इच्छा झाली कविता वाचून!

किरण, कवीतेची लांबी मोठी की छोटी असावी असा प्रघात नाही. सुरूवातीपासून शेवटापर्यंत अनुभव येण्यासाठी कवीतेची लांबीची आडकाठी कधीही नसावी. म्हणूनच तर कदाचीत खंडकाव्ये, महाकाव्ये जन्माला आलीत.

बालकवींची 'ती फुलराणी' या कवीतेची राहून राहून आठवण आली. या कवितेत काय नाही? प्रतिमा, प्रतिके, निसर्ग, आनंद, गोष्ट, शब्दसंप्पत्तीचे लेणे - अरे सारेच आहे की!

आज मराठी भाषा दिनी असल्या चांगल्या कविता वाचून कोण म्हणेल की मराठीला उतरती कळा लागली म्हणून? अरे काय बिशाद आहे त्याची!

पाषाणभेदजी, आपला प्रतिसाद वाचून डोळे पाणावले, भारावून गेलो. आपल्यासारख्या रसिकापुढे नतमस्तक आहे.

नतमस्तक वैगेरे काही नसतं हो, पण आपण खुपच विनयशील आहात हे जाणवते अन तो वेळोवेळी योग्य ठिकाणी प्रकटतो व योग्य ठिकाणी पोहोचतोदेखील. अन असल्या कविता, गाणी, लेख, शिल्प, चित्र, सौंदर्य किंवा जे जे लालित्यपुर्ण असते त्याचा आस्वाद हा प्रत्येक मनुष्याने घेतलाच पाहीजे. तोच मी घेतोय. तेच तर जीवन आहे, अन त्यामुळे मनुष्य हा प्राणी असूनही इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. पाषाणयुगातल्या लेण्या, त्यातील शिल्प-चित्रकारी, आयुधे हे त्याचे पुरावेच नाहीत काय?

पाभे
आज लिखते रहो. खूप छान लिहीताय..

माझेही दोन शब्द.

कविता वाचतांना रसग्रहण महत्वाचं. रसग्रहण म्हणजे सौंदर्यस्थळं शोधणं होय. तेच आपण करताय. आवडलं.

भावंडांच्या आडोशाने............या कडव्यासारखी कल्पकता फक्त आपणच दाखवू शकता.एकंदरीत मस्त कविता.

कविता आवडलीच

(अवांतर - १६ मात्रांसाठी काही तडजोडी केल्यास सुलभ वाटावे) Happy

(अर्थात, त्याने बिनसत काहीच नाही, पण इतकी शिस्तबद्ध रचना अचूकही असावी असे आपले वाटले)

अभिनंदन

-'बेफिकीर'!

मोहक कल्पना आणि छान शब्दात, वृत्तात लिहिलेली ही कविता खूप आवडली. लांबीबद्दल युरी गागारिन यांची टिप्पणी आणि मात्रांसाठीच्या तडजोडीचे बेफिकीर यांचे मार्गदर्शन रास्त आणि स्तुत्य आहे. शक्यतो अंगिकारावे. अशाच तुमच्या आणखी खूप खूप कविता वाचायला मिळाव्यात.

लांबी वाढली तरी चालेल,
सुंदर्,मन्मोहक,आल्हाददायक कवी कल्पना.

योगुली. बेफिकीर, के. अंजली मनःपूर्वक आभार.
बेफिकीरजी आपल्या सूचना सर आँखोंपर. पाळण्याचा प्रयत्न करत आहे.

pbs_2005 | 27 February, 2012 - 20:57

प्रद्युम्नजी,

फारच सुन्दर कविता.
कोणीही प्रेमात पडावे अशी कविता झाली आहे.>>>>>>>>
नवी कविता सुचली आहे: " मी वाट पाहतो आहे "