रोटोरुआ (वायटापो थर्मल वंडरलँड ) न्यू झीलंड

Submitted by दिनेश. on 24 February, 2012 - 00:32

रोटोरुआ च्या अदभूत दुनियेची पहिली ओळख मला मायबोलीकर भाग्य हिने करुन दिली होती. तिने इथे फोटो पण टाकले होते. त्यानंतर मी नेटवर पण त्याचे फोटो
बघितले होते. माझ्या आधीच्या न्यू झीलंडच्या भेटी नेमक्या ४/५ दिवसांच्या असल्याने,
माझे तिथे जाणे होत नव्हते. (तिथे जायला किमान २ दिवस हवेत.)

यावेळी मात्र माझ्या तिथल्या मित्रमैत्रिणींनी त्याचे दर्शन मला घडवलेच. फोटोत
बघून अजिबात कल्पना येणार नाही अशी ती अनोखी दुनिया आहे. तरीही तूम्हाला
कल्पना यावी म्हणून, शक्य तितके वर्णन करतो आणि फोटो देतोय.

न्यू झीलंडच्या नॉर्थ आयलंडच्या साधारण मध्यभागी रोटोरुआ नावाचे गाव आहे,
पर्यटकांत ते अति लोकप्रिय आहे. ऑकलंडहून इथे जाण्यासाठी साधारण ३/४
तास लागतात. वाटेत हॅमिल्टन हे सुंदर गाव लागते (तिथल्या गार्डनची मी सचित्र
ओळख करुन दिली होती.) त्या गावात न शिरता, केंब्रिज या गावातूनही
इथे जाता येते. (इथूनच, वायटामो केव्हज ना जाता येते. त्या ग्लो वर्मस म्हणजे
चमकत्या माळांचे सापळे तयार करणार्‍या किटकांसाठी प्रसिद्ध आहेत. पण तिथे
फोटो काढायला परवानगी नाही.)

केंब्रिज गावही सुंदर आहे. तिथे आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. रोटोरुआ
गाव एक मोठ्या सरोवराच्या काठाने वसलेय. बरेच पर्यटक येत असल्याने
गावात खूप मॉटेल्स आहेत. जेवणाची उत्तम सोय आहे (अगदी भारतीय जेवणही
मिळू शकते.) पण जायच्या आधी बूकिंग करणे आवश्यक आहे. सूट्टीच्या दिवशी
आयत्यावेळी हॉटेल / मॉटेल मिळणे जरा कठीण आहे.

गाव खुपच सुंदर आहे. पर्यटकांसाठी उत्तम माहिती केंद्र आहे. गावाच्या आजूबाजूला
काही पार्कस आहेत. एका टेकडीवर पाळण्याने जायची सोय आहे. तिथे मुद्दाम
काही नेचर ट्रेल्स ठेवलेल्या आहेत. त्यावरून चालण्यासारखा आनंद नाही. तिथून
होणारे सरोवराचे आणि गावाचे दर्शनही सुंदर.

एका पार्कमधे वॉटर राईड वगैरे आहे. किवी हा त्यांचा राष्ट्रीय पक्षी असला तरी
त्यांची संख्या आता कमी होतेय. त्याच्या संवर्धनाचे काम आपल्याला तिथे
प्रत्यक्ष बघता येते. हा पक्षी शरीराच्या आकारमानाने सर्वात मोठे अंडे घालतो.
मादीच्या शरीराच्या ७५ % एवढ्या आकाराचे. त्या अंड्यातून पिल्लू बाहेर
यायची प्रक्रिया आपण तिथे प्रत्यक्ष बघू शकतो. पण हा पक्षी निशाचर असल्याने
त्याला अंधारातच ठेवले जाते. (त्याला बघता येते, पण फोटो काढता येत नाहीत.)

तिथे नैसर्गिक झऱ्याचे पाणी चाखायला मिळते (ते त्यांच्या हेल्थ मिनिस्ट्रीने
प्रमाणित केलेले आहे.)
पण लोक रोटोरुआला जातात ते तिथल्या जागृत भूगर्भीय हालचाली बघण्यासाठी.
या जागा रोटोरुआपासून २८ किमीवर आहेत. (वाटेत फारसे दिशादर्शक फलक नाहीत. नकाशा नेणे आवश्यक आहे.) त्यातील महत्वाचे ठिकाण म्हणजे वाय-ओ-टापो. इथे तिकीट जरा महाग आहे, पण प्रत्यक्ष तिथे असणार्‍या सोयी बघून, ते
अत्यंत वाजवी आहे असे वाटते.

तिथे जाण्यासाठी सकाळची सव्वा दहाची वेळ पाळावी लागते. त्यासाठी पावणेदहाला
तिथे पोहोचणे आवश्यक आहे. तिकिट काढल्यावर आपल्याला कुठे जायचे ते
सांगण्यात येते. आणि त्या जागी आपण २ मिनिटात पोहोचतो. तिथे आपल्यासमोर
लेडी नॉक्सचा शो सुरु होतो.

सगळे प्रेक्षक स्थानापन्न झाल्यावर आपल्याला समोरच हे वारुळासारखे काहीतरी
दिसते. त्यातून वाफ़ा येत असतात. १० वाजून १० मिनिटांनी तिथला एक जाणकार
माणूस निवेदन करायला सुरवात करतो (इतके सुंदर आणि चपखल निवेदन, फारच
क्वचित ऐकायला मिळते.) हा संपुर्ण भाग, १०० वर्षांपूर्वी निर्जन होता. तिथे एक
तुरुंग सुरु करण्यात आला. त्या कैद्यांना डोंगरावर वृक्षलागवडीचे काम देण्यात आले.
मागील डोंगरावर दिसणारी हिरवाई, त्यांनी केलेल्या लागवडीचे फलित आहे.
ते कपडे घुण्यासाठी म्हणून या डबक्याजवळ येत. (त्यावेळी इथे डबके होते.)
त्यांच्या धुण्याचा साबण या वारुळ सदृष्य विवरात पडला आणि थोड्याच वेळात
त्यातून गरम पाण्याचे कारंजे उसळू लागले.

आपल्यासमोर साबणासारखेच पण पर्यावरणाला अपायकारक नसणारे एक रसायन
त्या विवरात टाकतात आणि त्यातून आधी फ़ेस आणि मग पाणी बाहेर येऊ
लागते. थोड्याच वेळात तिथून उंच कारंजे उसळायला लागते. हा नजारा खरोखर
अविस्मरणीय असतो.

मग आपण परत स्वागतकक्षात येतो. इथे आपल्याला एक नकाशा मिळतो, आणि
अगदी सुबक अश्या पायवाटेने आपण तो भूभाग बघायला निघतो. आपल्या क्षमते
प्रमाणे व वेळेप्रमाणे, हे मार्ग आखलेले आहेत. कमीत कमी अर्धा तास ते जास्तीत
जास्त दोन तास, असे मार्ग आपण निवडू शकतो. (या मार्गांचा नकाशा आपल्याला
तिकिटासोबतच मिळतो.)

त्याभागात अजूनही भूगर्भातील हालचाली होत असतात. जमिनीत जिरलेले पाणी,
जागा मिळेल तिथून वर येत असते आणि येताना अतिऊष्ण तपमानामूळे जमिनीतील
क्षार त्यात विरघळलेले असतात, ते वर घेऊन येते. या पाण्याचे तपमान १५० अंश से.पर्यंत असू शकते.
वर आलेल्या क्षारात अनेक खनिजे पण असतात (हो अगदी सोने, चांदीसुद्धा ) या
क्षारांमूळे तिथल्या पाण्यांला, दगडांना अनेकविध रंग प्राप्त झाले आहेत.
नेहमीच्या गंधकाचा पिवळा तर आहेच, पण पोपटी, केशरी, निळा, जांभळा, निळा, किरमीजी असे अनेक रंग तिथे दिसतात. काही काही खोल विवरे आहेत आणि त्याच्या तळातून वाफा येताना दिसतात.

या सर्व परिसरातून फिरण्यासाठी ज्या सोयी केल्यात त्या लाजबाब आहेत. हि अदभूते
शक्य तितक्या जवळून पण अत्यंत सुरक्षित अशा अंतरावरून बघता येतात. जिथे
फारसा धोका नाही, तिथे संरक्षक कठडा नाही (पण पायवाट आहे.) पायवाट सोडून
बाजूला गेल्यास, काय होऊ शकते याच्या मोजक्या पण चित्रमय सूचना तिथे आहेत.
(पाण्याचे तपमान, जमिन खचण्याची शक्यता.) जागोजाग सचित्र माहितीफलक
आहेतच.

हा संपूर्ण भूभाग एखाद्या स्वप्ननगरीसारखाच आहे. त्या जागांचे जे फोटो मी इथे
देतोय ते सर्व रंग नैसर्गिकच आहेत.
माझ्यासोबत माझी छोटी दोस्तमंडळी असल्याने आम्ही छोटा मार्ग घेतला. पण
यापेक्षाही तिथे बघण्यासारखे खूप आहे. शेवटी एक धबधबाही लागतो.

या परिसरापलिकडे दिसणारे डोंगर हिरवेगार आहेत. खुद्द त्या परिसरात देखील
बरीच हिरवाई आहे. इतकेच नव्हे तर स्वॉलो सारखे पक्षी तर त्या विवरातदेखील
उडताना दिसतात. त्यांची घरटीदेखील तिथे आहेत. अंडी उबवण्यासाठी इथल्या
गरम हवामानाचा, त्यांना फायदाच होतो.

न्यू झीलंडमधे जागोजाग मनुकाऊ हि बारीक पानांची झाडे दिसतात. (त्यांचा तो
चहा ) याला सुंदर गुलबट पांढरी फुले येतात. या फुलांपासून मधमाश्यांनी तयार
केलेला मध, तिकडे फारच लोकप्रिय आहे.

या भागाच्या आजूबाजूला काही गरम मड पूल्स आहेत. करड्या रंगाचा चिखल, तिथे
पिठल्यासारखा खदखदत असतो. तिथे काही गरम व गार पाण्यांची कुंडे देखील
आहेत आणि त्यात आपल्याला उतरता येते.

हा पार्क वर्षभर, अगदी ख्रिसमसच्या दिवशीदेखील उघडा असतो. आणखी एक नवल
म्हणजे अशा ठिकाणी येणारा, गंधकाचा तीव्र वास इथे अजिबात येत नाही. त्यामूळे
नाकाला रुमाल लावावा लागत नाही.

तर चला, या स्वप्ननगरीची सैर करु या...
(एकंदर ११५ फोटोंपैक मोजकेच ३२ इथे देतोय. बाकिचे माझ्या फेसबुक पेजवर आहेत. Dinesh Shinde ) अवश्य बघा.

1 केंब्रिज टाऊन हॉल

2 बदक

3 रोटोरुआ पार्क (इथेच नैसर्गिक झरा आहे, ज्याचे पाणी पिता येते.)

4 रस्ता दुभाजक (रोटोरुआ गाव)

5 खेड्यामधले घर !

6 लेडी नॉक्स १

7 लेडी नॉक्स २

8 लेडी नॉक्स ३

9 किरमिजी

10 शॅंपेन पूल १

11 शॅंपेन पूल २

12 प्रतिबिंब

13 पिवळा

14 मोरपिशी

15 निळा

16 शेवाळी

17 दूरदृष्य

18 सोनेरी

19 सर्व रंग

20 हिरवा

21 परत सोनेरी

22 माहितीफलक

23 दूरचे डोंगर

24 करडा निळा

25 पाऊलवाट !

26 नैसर्गिक पॅरट ग्रीन (हा रंग शेवाळ्याने नव्हे तर गंधकाच्या संयुगाने आलाय)

27 मड पूल १

28 मड पूल २

29 मड पूल ३

30 मड पूल ४

31 नेचर ट्रेल

32 लेक रोटोरुआ

गुलमोहर: 

आह्हा... फारच छान माहिती आणी फोटो... सीप थ्रू व्हायला दोन तीन वेळा वाचायला आणी फोटो पाहायला लागणारे Happy

दिनेशदा,
फारच छान माहिती व फोटोज्...
प्रचि ३० चा कॅप्चर तर खासच...
नितांत सुंदर देश आहे हा असे ऐकले आहे.
Lord of the rings trilogy पाहिल्यापासुन ह्या देशाला भेट देण्याची फार ईच्छा आहे. पाहुया कधी योग येतो ते.
फोटोज् शेअर केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

अतिशय सुंदर फोटो.दिनेशदा,इतके सुंदर वर्णन आणी फोटो.तुस्सि ग्रेट हो.रस्त्यावरच्या डिव्हायडवरची
सुंदर फुले पाहून मला आपल्या इकडची फुले ओरबाडलेली केविलवाणी झाडे आठवली.

आभार दोस्तांनो, पण ती जागा प्रत्यक्षच अनुभवण्यासारखी. (माझे शब्द, कॅमेरा सगळेच तोकडे आहे )
खुप लांब आहे तो देश, एवढेच. पण मस्त आहे. कधी कुणाला जायचे असेल तर
ट्रॅव्हल टीप्स साठी मी कधीही उपलब्ध असेनच.
या दिवसात तिथे उन्हाळा तर मे मधे थंडी असते. दोन्ही तसे तीव्रच असतात. जाण्यासाठी सप्टेंबर चांगला.

अजून मला बरेच फोटो टाकायचे आहेत इथे.

फोटोत बघून अजिबात कल्पना येणार नाही अशी ती अनोखी दुनिया आहे>>> १००% अनुमोदन
खुपच मस्त माहिती आणि फोटो.

अनोखी सफर घडवल्या बद्दल धन्यवाद दिनेशदा!!!

वा रंगांची दुनिया आणि निसर्गाची किमया अद्भुतच Happy मस्तच दा Happy
बदकाचा प्रचि झकास.....

मागे एकदा लोकसत्ताच्या पुरवणीत असा लेख वाचला होता.. पण हे फोटो बघून खरच आस्वाद घेता आला.. सहीये एकदम.. थँक्स शेअर केल्याबद्दल Happy

याचा उल्लेख मी मूळ लेखात केला नाही पण केल्याशिवाय रहावतही नाही. या संपूर्ण पूलच्या कडेने जाण्यासाठी एक लाकडी पायवाट आहे, त्याला कठडा नाही (कारण तिथे पाण्याचे तपमान तेवढे जास्त नाही.) तर त्या वाटेवरुन जाताना माझ्या सोबतच्या सर्वात लहान मूलाला, त्या पाण्यात हात घालायची इच्छा झाली.
मी काही बोलणार, इतक्यातच त्याच्या थोरल्या भावाने त्याला जोरदार टपली मारली.
हि जबाबदारीची जाणीव मी तिथे लहान मूलांतही बघितली. स्वतः कुठे कचरा करणार
नाहीतच पण चुकून रस्त्यावर काही कचरा पडला असेल तर सहजपणे, उचलून योग्य
जागी टाकतात.
या एवढ्या मोठ्या भागात, कुठेही, कसलाही कचरा दिसला नाही.

भन्नाट आहेत फोटो! अद्भुतरम्यच! भुगर्भातल्या हालचाली, मड पूल सगळच विलक्षण!

दिनेशदा,
हे फोटो पाहुन अनोखी आणि अदभुत सफर केल्यासारख वाटलं...
यातले मडपुल आणि लेडी नॉक्स चे फोटो पाहुन वाटलं, कि हे सगळं कृर्त्रिमपणे (तेही सोपं नाहीच) तयार तरी केल नसेल ?

Pages