रोटोरुआ च्या अदभूत दुनियेची पहिली ओळख मला मायबोलीकर भाग्य हिने करुन दिली होती. तिने इथे फोटो पण टाकले होते. त्यानंतर मी नेटवर पण त्याचे फोटो
बघितले होते. माझ्या आधीच्या न्यू झीलंडच्या भेटी नेमक्या ४/५ दिवसांच्या असल्याने,
माझे तिथे जाणे होत नव्हते. (तिथे जायला किमान २ दिवस हवेत.)
यावेळी मात्र माझ्या तिथल्या मित्रमैत्रिणींनी त्याचे दर्शन मला घडवलेच. फोटोत
बघून अजिबात कल्पना येणार नाही अशी ती अनोखी दुनिया आहे. तरीही तूम्हाला
कल्पना यावी म्हणून, शक्य तितके वर्णन करतो आणि फोटो देतोय.
न्यू झीलंडच्या नॉर्थ आयलंडच्या साधारण मध्यभागी रोटोरुआ नावाचे गाव आहे,
पर्यटकांत ते अति लोकप्रिय आहे. ऑकलंडहून इथे जाण्यासाठी साधारण ३/४
तास लागतात. वाटेत हॅमिल्टन हे सुंदर गाव लागते (तिथल्या गार्डनची मी सचित्र
ओळख करुन दिली होती.) त्या गावात न शिरता, केंब्रिज या गावातूनही
इथे जाता येते. (इथूनच, वायटामो केव्हज ना जाता येते. त्या ग्लो वर्मस म्हणजे
चमकत्या माळांचे सापळे तयार करणार्या किटकांसाठी प्रसिद्ध आहेत. पण तिथे
फोटो काढायला परवानगी नाही.)
केंब्रिज गावही सुंदर आहे. तिथे आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. रोटोरुआ
गाव एक मोठ्या सरोवराच्या काठाने वसलेय. बरेच पर्यटक येत असल्याने
गावात खूप मॉटेल्स आहेत. जेवणाची उत्तम सोय आहे (अगदी भारतीय जेवणही
मिळू शकते.) पण जायच्या आधी बूकिंग करणे आवश्यक आहे. सूट्टीच्या दिवशी
आयत्यावेळी हॉटेल / मॉटेल मिळणे जरा कठीण आहे.
गाव खुपच सुंदर आहे. पर्यटकांसाठी उत्तम माहिती केंद्र आहे. गावाच्या आजूबाजूला
काही पार्कस आहेत. एका टेकडीवर पाळण्याने जायची सोय आहे. तिथे मुद्दाम
काही नेचर ट्रेल्स ठेवलेल्या आहेत. त्यावरून चालण्यासारखा आनंद नाही. तिथून
होणारे सरोवराचे आणि गावाचे दर्शनही सुंदर.
एका पार्कमधे वॉटर राईड वगैरे आहे. किवी हा त्यांचा राष्ट्रीय पक्षी असला तरी
त्यांची संख्या आता कमी होतेय. त्याच्या संवर्धनाचे काम आपल्याला तिथे
प्रत्यक्ष बघता येते. हा पक्षी शरीराच्या आकारमानाने सर्वात मोठे अंडे घालतो.
मादीच्या शरीराच्या ७५ % एवढ्या आकाराचे. त्या अंड्यातून पिल्लू बाहेर
यायची प्रक्रिया आपण तिथे प्रत्यक्ष बघू शकतो. पण हा पक्षी निशाचर असल्याने
त्याला अंधारातच ठेवले जाते. (त्याला बघता येते, पण फोटो काढता येत नाहीत.)
तिथे नैसर्गिक झऱ्याचे पाणी चाखायला मिळते (ते त्यांच्या हेल्थ मिनिस्ट्रीने
प्रमाणित केलेले आहे.)
पण लोक रोटोरुआला जातात ते तिथल्या जागृत भूगर्भीय हालचाली बघण्यासाठी.
या जागा रोटोरुआपासून २८ किमीवर आहेत. (वाटेत फारसे दिशादर्शक फलक नाहीत. नकाशा नेणे आवश्यक आहे.) त्यातील महत्वाचे ठिकाण म्हणजे वाय-ओ-टापो. इथे तिकीट जरा महाग आहे, पण प्रत्यक्ष तिथे असणार्या सोयी बघून, ते
अत्यंत वाजवी आहे असे वाटते.
तिथे जाण्यासाठी सकाळची सव्वा दहाची वेळ पाळावी लागते. त्यासाठी पावणेदहाला
तिथे पोहोचणे आवश्यक आहे. तिकिट काढल्यावर आपल्याला कुठे जायचे ते
सांगण्यात येते. आणि त्या जागी आपण २ मिनिटात पोहोचतो. तिथे आपल्यासमोर
लेडी नॉक्सचा शो सुरु होतो.
सगळे प्रेक्षक स्थानापन्न झाल्यावर आपल्याला समोरच हे वारुळासारखे काहीतरी
दिसते. त्यातून वाफ़ा येत असतात. १० वाजून १० मिनिटांनी तिथला एक जाणकार
माणूस निवेदन करायला सुरवात करतो (इतके सुंदर आणि चपखल निवेदन, फारच
क्वचित ऐकायला मिळते.) हा संपुर्ण भाग, १०० वर्षांपूर्वी निर्जन होता. तिथे एक
तुरुंग सुरु करण्यात आला. त्या कैद्यांना डोंगरावर वृक्षलागवडीचे काम देण्यात आले.
मागील डोंगरावर दिसणारी हिरवाई, त्यांनी केलेल्या लागवडीचे फलित आहे.
ते कपडे घुण्यासाठी म्हणून या डबक्याजवळ येत. (त्यावेळी इथे डबके होते.)
त्यांच्या धुण्याचा साबण या वारुळ सदृष्य विवरात पडला आणि थोड्याच वेळात
त्यातून गरम पाण्याचे कारंजे उसळू लागले.
आपल्यासमोर साबणासारखेच पण पर्यावरणाला अपायकारक नसणारे एक रसायन
त्या विवरात टाकतात आणि त्यातून आधी फ़ेस आणि मग पाणी बाहेर येऊ
लागते. थोड्याच वेळात तिथून उंच कारंजे उसळायला लागते. हा नजारा खरोखर
अविस्मरणीय असतो.
मग आपण परत स्वागतकक्षात येतो. इथे आपल्याला एक नकाशा मिळतो, आणि
अगदी सुबक अश्या पायवाटेने आपण तो भूभाग बघायला निघतो. आपल्या क्षमते
प्रमाणे व वेळेप्रमाणे, हे मार्ग आखलेले आहेत. कमीत कमी अर्धा तास ते जास्तीत
जास्त दोन तास, असे मार्ग आपण निवडू शकतो. (या मार्गांचा नकाशा आपल्याला
तिकिटासोबतच मिळतो.)
त्याभागात अजूनही भूगर्भातील हालचाली होत असतात. जमिनीत जिरलेले पाणी,
जागा मिळेल तिथून वर येत असते आणि येताना अतिऊष्ण तपमानामूळे जमिनीतील
क्षार त्यात विरघळलेले असतात, ते वर घेऊन येते. या पाण्याचे तपमान १५० अंश से.पर्यंत असू शकते.
वर आलेल्या क्षारात अनेक खनिजे पण असतात (हो अगदी सोने, चांदीसुद्धा ) या
क्षारांमूळे तिथल्या पाण्यांला, दगडांना अनेकविध रंग प्राप्त झाले आहेत.
नेहमीच्या गंधकाचा पिवळा तर आहेच, पण पोपटी, केशरी, निळा, जांभळा, निळा, किरमीजी असे अनेक रंग तिथे दिसतात. काही काही खोल विवरे आहेत आणि त्याच्या तळातून वाफा येताना दिसतात.
या सर्व परिसरातून फिरण्यासाठी ज्या सोयी केल्यात त्या लाजबाब आहेत. हि अदभूते
शक्य तितक्या जवळून पण अत्यंत सुरक्षित अशा अंतरावरून बघता येतात. जिथे
फारसा धोका नाही, तिथे संरक्षक कठडा नाही (पण पायवाट आहे.) पायवाट सोडून
बाजूला गेल्यास, काय होऊ शकते याच्या मोजक्या पण चित्रमय सूचना तिथे आहेत.
(पाण्याचे तपमान, जमिन खचण्याची शक्यता.) जागोजाग सचित्र माहितीफलक
आहेतच.
हा संपूर्ण भूभाग एखाद्या स्वप्ननगरीसारखाच आहे. त्या जागांचे जे फोटो मी इथे
देतोय ते सर्व रंग नैसर्गिकच आहेत.
माझ्यासोबत माझी छोटी दोस्तमंडळी असल्याने आम्ही छोटा मार्ग घेतला. पण
यापेक्षाही तिथे बघण्यासारखे खूप आहे. शेवटी एक धबधबाही लागतो.
या परिसरापलिकडे दिसणारे डोंगर हिरवेगार आहेत. खुद्द त्या परिसरात देखील
बरीच हिरवाई आहे. इतकेच नव्हे तर स्वॉलो सारखे पक्षी तर त्या विवरातदेखील
उडताना दिसतात. त्यांची घरटीदेखील तिथे आहेत. अंडी उबवण्यासाठी इथल्या
गरम हवामानाचा, त्यांना फायदाच होतो.
न्यू झीलंडमधे जागोजाग मनुकाऊ हि बारीक पानांची झाडे दिसतात. (त्यांचा तो
चहा ) याला सुंदर गुलबट पांढरी फुले येतात. या फुलांपासून मधमाश्यांनी तयार
केलेला मध, तिकडे फारच लोकप्रिय आहे.
या भागाच्या आजूबाजूला काही गरम मड पूल्स आहेत. करड्या रंगाचा चिखल, तिथे
पिठल्यासारखा खदखदत असतो. तिथे काही गरम व गार पाण्यांची कुंडे देखील
आहेत आणि त्यात आपल्याला उतरता येते.
हा पार्क वर्षभर, अगदी ख्रिसमसच्या दिवशीदेखील उघडा असतो. आणखी एक नवल
म्हणजे अशा ठिकाणी येणारा, गंधकाचा तीव्र वास इथे अजिबात येत नाही. त्यामूळे
नाकाला रुमाल लावावा लागत नाही.
तर चला, या स्वप्ननगरीची सैर करु या...
(एकंदर ११५ फोटोंपैक मोजकेच ३२ इथे देतोय. बाकिचे माझ्या फेसबुक पेजवर आहेत. Dinesh Shinde ) अवश्य बघा.
2 बदक
3 रोटोरुआ पार्क (इथेच नैसर्गिक झरा आहे, ज्याचे पाणी पिता येते.)
26 नैसर्गिक पॅरट ग्रीन (हा रंग शेवाळ्याने नव्हे तर गंधकाच्या संयुगाने आलाय)
व्वा!!...मस्तच जागा
व्वा!!...मस्तच जागा दिसतिये....सर्वच फोटो अप्रतिम! थन्क्स दिनेशदा.
थोडे अवांतर.......न्युझीलंड्च्या साउथ वेस्टला सामोआ नावाचे आईलंड आहे.....तिथे मस्त ब्लो होल्स बघायला मिळतात्...ती १०० वर्षापूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या कातळातून बनली आहेत्...त्यातून समुद्राचे पाणी खूप जोरात वर उडते......पण तिथे हा रंगांचा नजारा नाही
हो फुलराणी, तसे सलालाहला पण
हो फुलराणी, तसे सलालाहला पण आहे.
साऊथला पुढच्या वेळी.
दिनेश, हे आजच बघितले. मस्तच
दिनेश, हे आजच बघितले. मस्तच आहेत सगळे फोटो. बदकाचा तर अप्रतिम आला आहे. माहिती नेहमीप्रमाणेच उपयोगी पडणारी
फेअसबुकवरचा तो दुसर्या भागातला गुलाबी फुलाशेजारचा कसला फोटो आहे? अगदी नेच्यासारखी रचना वाटतेय त्या झाडाची - महाकाय नेचा
हो त्यांचा राष्ट्र्वृक्ष आहे
हो त्यांचा राष्ट्र्वृक्ष आहे तो. नेचाच असतो पण नारळाच्या झाडासारखा वाढतो.
त्यांच्या खेळाडूंच्या ड्रेसवर पण तो त्यांच्या देशाचे प्रतीक म्हणून असतो तो.
वॉव !!!!!!!!!!!! किती अदभुत
वॉव !!!!!!!!!!!! किती अदभुत आहे हे
Pages