व्यसन

Submitted by मंदार-जोशी on 3 May, 2011 - 00:28

एक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो.

"ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती?" मागून हाक.

"तीनशे साठ."

"हां बरोब्बर तीनशे साठ. तेवढं लवकर द्यायचं बघा."

"शेट, लक्षात आहे माझ्या, देतो."

"दहा दिवस झाले, हेच सांगतय राव."

"देतो, देतो, दोन दिवसात नक्की देतो."
ओशाळलेला चेहरा घेऊन तो मुलगा त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेला.

लेखाचं नाव बघितल्यानंतर हा संवाद वाचून कदाचित तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. नाही, हा संवाद एखाद्या दारूच्या गुत्त्यावरचा किंवा परमिट रूमबाहेरचा नाही (अर्थात तिथे उधारी चालत असावी असं मला तरी वाटत नाही - अनुभव नाही), किंवा किराणामालाच्या थकलेल्या बिलांबाबतही नाही. हा संवाद आहे एका सायबर कॅफे बाहेरचा. शेजारी एका दवाखान्यात आलो असता कानावर पडलेला. सहज रिसेपशनिस्टला विचारलं तर हे असले प्रेमळ(!) संवाद रोजचेच आहेत असं समजलं. ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थीदशेतील मुलांचे आणि सायबर कॅफेच्या गल्ल्यावर बसलेल्यांचे. "अहो काय सांगू, अनेक वेळा समजावून झालं, पेशंट आहेत त्रास होतो, काहीही परिणाम नाही".

असेल अपवादात्मक ठिकाण म्हणून फार विचार केला नाही. असंच एकदा प्रिंटाआउट काढायला अन्य एका सायबर कॅफे मध्ये जावं लागलं. तिथे शालेय गणवेशातली अनेक मुलं दिसली. ही मुलं करताहेत तरी काय पहावं म्हणून एकाच्या नकळत सहज डोकावलो तर कसलासा ऑनलाईन युद्धाचा गेम तो खेळत होता. शेजारीच त्याचा मित्र त्याला कसं खेळायचं याचं मार्गदर्शन करताना दिसला. माझं काम झाल्यावर सायबर कॅफेच्या मालकाला विचारलं, "काय हो, दोघांना कसं काय बसून देता तुम्ही एका पी.सी. वर?"

"अहो शेट, लय भारी गिर्‍हाईकं आहेत ही. रोज येत्यात. बराच वेळ बसत्यात, लई खेळत्यात. बक्कळ कमाई यांच्यामुळं", मालक उत्तरले.

निराशेने मान हलवून बाहेर पडलो, तर मागोमाग वरच्यासारखाच संवाद कानावर पडला. उधारी बाकी असल्याचा. फक्त ह्या वेळी रक्कम कमी होती.

मित्रमंडळी आणि अन्य काही सायबर कॅफेचे मालक यांच्याशी चर्चा करता समजलं की ही परिस्थिती धक्कादायकरित्या सर्वसामान्य आहे. कोपर्‍याकोपर्‍यावर कुत्र्याच्या छत्रीसारखे उघडलेले सायबर कॅफे यांमुळे घरी इंटरनेटची जोडणी नसलेले किंवा इतर काही कारणांमुळे घरी गेमींग न करू शकणारे यांची चांगलीच सोय झाली आहे. शिवाय नजिकच्या भूतकाळात जितक्या झपाट्याने तुरडाळीचे दर वाढले त्यापेक्षाही वेगाने घसरलेले सर्फिंगचे दर ही ऑनलाईन गेम्सचं वेड फोफावण्यासाठी एक अत्यंत सुपीक जमीन ठरली आहे. दुर्दैवाने अधिकाधिक लोक ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडत आहेत.

vyasan01_cafe.jpgvyasan02.jpg

समुपदेशन करणारे अनेक तज्ञ म्हणतात की इंटरनेट सहज उपलब्ध असणं या व्यतिरिक्त ऑनलाईन खेळ यांचे अतिशय वेगाने लागू शकणारे व्यसन ही प्रामुख्याने चिंतेची बाब आहे. वैयत्तिक/प्रत्यक्ष आयुष्यात छटाकभर सत्ताही नसलेल्यांकडे ऑनलाईन खेळात मोठ्या सैन्याचे अधिपत्य किंवा एका शहराचे नेतृत्व येऊ शकते. इंग्रजीत असलेल्या ''Power corrupts, and absolute power corrupts absolutely' या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे ही नशा ऑनलाईन असली, तरी ही सत्ता मनाचा झपाट्याने ताबा घेते, आणि मग शाळा, शिकवणीची फी, खाऊचे पैसे इत्यादीतला एक मोठा हिस्सा या खेळांवर खर्च होऊ लागतो.

माझा एक प्रोग्रामर मित्र ऑनलाईन खेळ बनवतो. त्याने काही महत्त्वाची माहिती सांगितली. ऑनलाईन खेळ बनवणारे मानसशास्त्राचा उत्तमरित्या उपयोग करुन घेतात. प्रत्यक्ष आयुष्यात नैराश्याचे किंवा मानसिक कणखरतेची कसोटी प्रसंग पाहणारे प्रसंग आले की अशा ऑनलाईन खेळांच्या नादी लागलेल्या लोकांना खेळातल्या विजयाचे प्रसंग आठवून त्यांची पाऊले आपोआप गेमिंगकडे वळतात. मानसशास्त्रात हा प्रकार 'क्लासिकल कंडिशनिंग' या नावाने ओळखला जातो.

हे खेळ काही वेळ खेळून सोडून देण्यासारखे निश्चित नाहीत. ते खेळायचे असतील तर बराच वेळ द्यावा लागतो. खेळात एखाद्या जागी माघार घ्यावी लागणं आणि एखाद्या प्रसंगी जिंकणं यात अशा प्रकारे समतोल साधला जातो की खेळणार्‍यापुढे जिंकण्याचं गाजर सतत नाचवलं गेल्याने त्याला पुढे खेळत राहण्याशिवाय पर्याय नसतो. खेळताना आपण नक्की कधी जिंकणार हे सांगता येत नाही. विजय हा अगदी पुढच्या क्षणाला मिळू शकतो, पुढच्या तासात तुम्ही जिंकू शकता, किंवा जिंकायला अगदी दिवसभरही लागू शकतो. पण बराच वेळ हरतोय म्हणून आपण खेळ खेळणं थांबवलं तर तो जिंकण्याचा क्षण गमावू ह्या भीतीने खेळणारे अमर्याद काळ खेळतच राहतात. सतत अनेक तास असे खेळ खेळल्याने ताणामुळे काहींनी आपला जीव गमावल्याचीही उदाहरणं आहेत.

किशोरावस्थेत असलेल्या मुलांत या व्यसनाचा प्रामुख्याने प्रादुर्भाव असला तरी लहान मुलेही याला अपवाद नाहीत. माझ्या एका मित्राची प्राथमिक शाळेत जाणारी लहान मुलगी त्यांच्या घरातल्या संगणकावर बार्बी हा खेळ खेळते. त्याबद्दल हटकलं असता चिडचिडी होते आणि हट्टीपणा करते. जी मुले बंदुका, तोफा आणि तत्सम गोष्टी असणारे खेळ खेळतात त्यांना राग लवकर येतो आणि अशी मुले हिंसक होण्याची शक्यता असतेच असते.

vyasan03.jpg

ही बाब आता फक्त ऑनलाईन खेळांपुरती मर्यादित नाही तर अश्लील मजकूर, चित्रे आणि चलतचित्रे असलेली संकेतस्थळे, चॅटींग आणि सोशल नेटवर्किंग यांनीही या व्यसनाचा मोठा भाग व्यापला आहे. आंतरजालीय जुगार, समभाग खरेदी-विक्री, पोर्नोग्राफी, आणि सेक्स चॅट हे या ई-व्यसनाचे काही घटक.

इंटरनेट उर्फ आंतरजालाचे व्यसन ह्या गोष्टीने आता इतके गंभीर स्वरूप धारण केले आहे की पुण्यातल्या मुक्तांगण या व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या संस्थेत आता दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन याबरोबरच इंटरनेट व्यसनमुक्ती ही एक वेगळी उपचारपद्धती विकसित करण्यात आली आहे. संस्थेत या नवीन व्याधीवर उपचार घेणार्‍यांमधे बहुतांश शाळा आणि महाविद्यालयात शिकणारी तरुण मुले आहेत. उपरोल्लेखित अनेक समस्यांबरोबरच 'सायबर रिलेशनशिप अ‍ॅडिक्शन' हा एक अत्यंत धोकादायक प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग, आंतरजालावरचे मित्र अशा गोष्टींमुळे वेळ-काळाचे भान न राहिल्याने घरी पालकांशी आणि इतर घरच्यांशी अगदी तुटक किंवा उद्धटपणे संभाषण करणे, प्रत्यक्ष आयुष्यातील नातेसंबंधांकडे होणारे दुर्लक्ष, वाचन-लेखन-मनन आणि मैदानी खेळ खेळण्यास अनुत्सुक असणे यासारख्या बाबींकडे घरातल्या मोठ्यांचे एक तर वेळेवर लक्ष जात नाही, किंवा अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. शेवटी सहामाही/वार्षिक परीक्षेत दिवे लागल्यावर प्रगती पुस्तकात दिसणारी अधोगती हा पालकांसाठी एक मोठा धक्का असतो. मग सुरवातीला आपली मुलं संगणक लिलया हाताळतात हा अभिमान गळून पडतो आणि पालकांच्या जीवाला नवीन घोर लागतो. इतर व्यसनग्रस्तांप्रामाणेच आपल्याला व्यसन आहे हेच मुळात या मुलांच्या गावी नसते. मुक्तांगण संस्थेतले समुपदेशक अशा मुलांना हीच गोष्ट आधी पटवून देतात.

उपचारांच्या दुसर्‍या टप्प्यात मग त्यांच्या भावी प्रगती बाबत बोलून त्यांना प्रोत्साहित केले जाते. समुपदेशनाबरोबरच ध्यानधारणा, वाचनास उद्युक्त करणे, वेगवेगळे मैदानी आणि घरगुती खेळ खेळायला लावणे, अशा विविध प्रकारे 'बरे' केले जाते. अडनिडं वय आणि या आजाराचे विचित्र स्वरूप यामुळे या मुलांना ई-व्यसनमुक्त करण्यासाठी घेतली जाणारी मेहनत आणि लागणारा वेळ हा अर्थातच इतर व्यसनाधीन लोकांपेक्षा अधिक असतो. मुलांबरोबरच पालकांचंही समुपदेशन केलं जातं. कारण फक्त मुलांचंच नव्हे तर संपूर्ण घराचं सौख्य आणि शांती अशा गोष्टींमुळे हिरावली जाते. मुलं संगणक वापरत असताना त्यांना विचित्र वाटणार नाही अशा प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवावे असा सल्ला पालकांना दिला जातो.

सद्ध्या मुक्तांगणमधे ई-व्यसनांवर उपचार घेणार्‍यांमधे मुलं आणि तरुणांचे प्रमाण जास्त असलं तरी भविष्यात संस्थेत उपचारासाठी दाखल होणार्‍यांमधे मोठ्यांची संख्या वाढू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. ऑनलाईन नात्यांमधे गुंतल्याने प्रत्यक्ष आयुष्यातल्या नात्यांवर परिणाम होण्याबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातल्या असमाधानकारक नात्यांमुळे अनेक जण ऑनलाईन नात्यांमधे गुंतण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. आर्थिक नुकसान, दैनंदिन वेळेचा अपव्यय याबरोबरच ऑफिसमधल्या कामावर परिणाम होणे याही गोष्टी लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. यापायी अनेकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्याचीही उदारहणे आहेत. समविचारी लोकांशी संपर्कात राहणे आणि स्वतःला रचनात्मक पद्धतीने व्यक्त करणे या उद्देशाने आपण अनेक सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळांचे सभासदत्व घेतो खरे, पण मग त्याच बरोबर अनेक अनावश्यक गोष्टींमधे आपला सहभाग वाढतो आणि इतर अनेक अनावश्यक गोष्टी आपल्या मेंदूत प्रवेश करतात. आंतरजाल हे साधन आहे, साध्य नव्हे याचा वेगाने विसर पडतो.

मी आत्ता ज्या आस्थापनात काम करतो तिथे एकेकाळी कर्मचार्‍यांना आंतरजाल मुक्तपणे उपलब्ध होतं. जीमेल, याहू, ऑर्कुट, फेसबुक, विविध चॅट संकेतस्थळे, युट्युब आणि इतर सगळ्या संकेतस्थळांवर दिवसातल्या कुठल्याही वेळी सगळयांचा मुक्त वावर असायचा. पण प्रमाणाबाहेर वापर वाढला आणि कामावर परिणाम होऊ लागला तसा हा वेळ नियमबद्ध करुन फक्त दिवसातला अर्धा तास असा केला गेला. आम्हाला निदान सलग अर्धातास मिळतो. अनेक आस्थापनांत हाच वेळ एक तास असला तरी एका वेळी फक्त दहा मिनिटं अशा प्रकारे तो वापरावा लागतो. याचाच अर्थ आंतरजालाचा वापर कसा आणि किती करावा यासंबंधात मोठ्यांनीही आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

इतर काही नाही म्हणून करमणुकीसाठी आंतरजालावर फेरफटका मारायचा याला काही अर्थ नाही. आंतरजाल की करमणुकीची जागा आहे हा समज निखालस चुकीचा आहे. कारण आंतरजाल हे टीव्ही सारखं इडीअट बॉक्स नव्हे. नेटवर बसल्यावर सतत माणसाचा मेंदू जागृत असतो, त्याला आराम मिळत नाही. सतत 'अ‍ॅलर्ट' रहावं लागत असल्याने मग थकवा येणं हे ओघाने आलंच.

vyasan04.jpg

मुळात आपल्याला आंतरजालाचे व्यसन लागले आहे ह्याची जाणीव होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. एखादे महत्वाचे काम करण्यासाठी आपण लॉग-इन केले, आणि काही क्षणांच्या कामासाठी आलेलो असताना आपण अर्धा-एक तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ ऑनलाईन आहोत असे लक्षात आले आहे का कधी? आंतरजालावर सोशल नेटवर्किंगमधे किंवा इतर गोष्टींमधे गुंतल्याने ऑफिसची काही अर्थातच महत्वाची असलेली पण बिनतातडीची कामे पुढे ढकलायची सवय लागली आहे का? वैयत्तिक आयुष्यातले वैफल्य किंवा ते निर्माण करणार्‍या समस्या सहन होत नसल्याने त्यापासून पळण्यासाठी तुम्ही आंतरजालावर येता का? या आणि तत्सम अनेक प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर "हो" असले तरी सावध व्हा. एखाद्या संस्थेत जाऊन ई-व्यसनमुक्ती कार्यक्रमात सहभागी व्हायला कमीपणा वाटत असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवा. 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हेच सूत्र इथेही उपयोगी पडते. एकदा निग्रह करा, मग वास्तवाशी सामना करणे ही बाब ई-व्यसनांच्या विस्तवाशी खेळ करण्यापेक्षा नक्कीच सोपे वाटू लागेल.

मग करताय ना निश्चय?
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित

सर्व छायाचित्रे: स्वतः काढायला आवडली असती पण सायबर कॅफेत परवानगी मिळाली नाही त्यामुळे नाईलाजास्तव आंतरजालावरून साभार.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गुलमोहर: 

मला आपले लेख नेहमीच आवडतात.

मला शाळे बाहेरच्या शाळा ह्या लेखातले हे आठवले - ............पण आता ग्राऊंड घेणारे काका सहसा सापडत नाहीत. सभेत कसे बोलावे हे शिकवणारे आजोबा स्वतःच वृद्धाश्रमात दाखल आहेत. वेगवेगळे छंद व कला शिकवणारी काकु – का कु करायला लागली आहे. तिला दुरदर्शन वर दिसणा-या ‘सास बहु’ मालिकांमधुन उसंत मिळत नाही. वाचनालये आता गेम्स व ईंटरनेट पार्लर्स मध्ये बदलली आहेत त्यात मुले, नाही नाही ते ज्ञान सर्रास मिळवतात. आपल्या सभोवारचे निरिक्षण करायचे सोडुन स्वतःच्या मोबाइलवर तासनतास बटनं दाबत तल्लीन झालेली मुले आपण हमखास पाहतो. अशाने आपल्या भोवतीची एक प्रकारची जागरुकता असायला हवी ती कमी कमी होऊ लागली आहे. हल्ली आपले काँप्युटर मित्र फार व आसपासच्या ख-या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे. मुले फुटबॉल व इतर मैदानी खेळ खेळतात पण पि एस् ३ वर! अशाने जिवाभावाचे मित्रगण व नेत्रुत्व गुण विकसात होण्या पेक्षा मुलांमध्ये माणुसघाणी व विकृत मनोवृत्ती आणि पुढे नैराष्यवादी मनोदशा तयार होते. एवढेच काय पण गणकयंत्रावरच्या काही खेळ सारखे खेळल्याने मुलांमध्ये चुक झाल्यावरच्या पश्चातापाची नैसर्गिक भावना असते ती बोथट होते व चुक होऊन सुद्धा पश्चाताप होईनासा होतो. मुल बिघडण्यामागचे हमखास कारण म्हणजे त्यांच्यातली पश्चातापाची नैसर्गिक भावना नाहिशी होणे...........

लोभ आहेच

रणजित, उत्तम विश्लेषण. लिखाण आवडत्या दहात नोंदवण्याची सोय असते तशीच सोय प्रतिसादांबाबत असती तर तुमचा प्रतिसाद नक्कीच आवडत्या दहाच्या यादीत गेला असता.

मंदार, लेख खूपच आवडला. हे असही काही असू शकतं हे माझ्या डोक्यातही आलं नव्हतं.. कारण तेवढा विचार मी केलाच नव्हता.

मीही काही दिवसापूर्वी एका सायबर कॅफेतून येणारा आरडाओरडा ऐकला होता. तिथे बरीच कॉलेज मधील मुलं येत जात होती. टू व्हीलर्स वरून मित्र-मैत्रिणींसोबत येऊन बाहेर गप्पा चालू होत्या. मी लेकाला हातात घेऊन उभी होते त्यामुळे माझ्याकडे फार कोणाचे लक्ष नव्हते. पण एका मुलाने चक्क त्याच्या आईला तो 'दळण' आणायला गेला असल्याची थाप मारलेलीही मी ऐकली.

पालकांच्या 'एकुलता एक' असल्याने होणार्‍या आपल्या चिरंजिवांच्या (लेकीही ह्याला अपवाद नाहीत.) अ-वाजवी लाडामुळे शेवटी मुलंच त्यांनाच थापा मारून भुलवू शकतात हे भयंकर आहे. हातात पैसा, ढुंगणाखाली टू-व्हीलर्स, हातात मोबाईल्स ह्यांच्या वयात आमच्याकडे कधीच नव्हते. पण त्यामुळे काहीच बिघडत नव्हतं असं मला तरी वाटतं. आज माझ्या ओळखीतल्या जेमतेम पाचवी-सहावीत शिकणार्‍या काही मुलांच्या फेसबुकवर प्रोफाईल्स आहेत. पहिल्यांदा मला त्यात काहीच वावगं वाटलं नाही. पण एका मुलीच्या प्रोफाइलवर तिचा जन्म चक्क १९९२ पाहिल्यावर मी सरभरले.. नवर्‍याला तसे म्हणताच तो म्हणाला '१८ च्या वर वय लागतं ना फेसबुक वर यायला तर खोटं वय लिहितात गं पोरं ! तू आहेस कुठे ?' (खरीच भोट हो मी.)

उद्याची पिढी धन्यच म्हणायची.. आणि त्यांना घडवणारी (!) आजचीही ! आता माझ्या लेकाला कुठली कुठली हवा लागू द्यायची नाही हे आत्ताच डोक्यात ठसवायला हवं. आणखी काय बोलणार ? मंदार, विचार करायला लावल्याबद्दल धन्यवाद !

एकंदरीत इथल्या पालकांचे प्रतिसाद पाहता त्यांना ह्या व्यसनाबद्दल फारशी माहिती दिसत नाही.
आणि आपली मुले लहानपणी आपण कसे होतो तशी नाहीत म्हणून जे काही आता आहे तो सरसकट बिघाड आहे ह्या विचाराकडे कललेला दृष्टीकोन दिसतोय.
साधी गोष्ट आहे हो ... आजच्या पालकांची पिढी जेंव्हा लहान होती, व्यापार वैगेरे खेळ असायचे तेंव्हा त्या काळच्या काही पालकांना तो जुगाराचा एक प्रकार वाटायचा. आणि ही पिढी वाया गेली असाही काहींचा सूर असायचा.
"क्रिकेट हा खेळ ह्या देशाला बुडवणार !" असे विधान मी कित्तेक देशी खेळ प्रेमी आजोबांकडून ऐकलेय. तसेच आज कोणी मुलगा / मुलगी जर म्हणत असेल कि मी गेमर होणार तर तोच जुना सूर आजचेही पालक लावणार.
कारण गेमिंग इंडस्ट्री आज बूमिंग आहे हे काही लोकांना माहित नाही आणि काही लोकांना माहित असल्यास आवडत नाही ("क्रिकेट हा खेळ ह्या देशाला बुडवणार !" वाला सूर )

मी सुद्धा जेंव्हा रात्र रात्र कॉम्पुटर समोर घालवायचो तेंव्हा माझ्या आईला अशीच काहीतरी भीती असायची. त्या भीतीला, काळजीला माझा विरोध नव्हताच मुळी, पण मी नेमके काय करतोय हे जाणून घेण्याची (माझ्याकडून) इच्छाही नव्हती.
मी काही सांगायला / दाखवायला गेलो तर "मला मेलीला त्यातलं काय कळतंय !" असे काहीसे उत्तर.
ओळखीतल्या लोकांना, नातेवाईकांना काळजी बोलून दाखवायची. मग कोणीतरी असेच सांगणार की इंटरनेट कित्ती कित्ती वाईट्ट असते ते! एकदा माझ्याशी संवाद साधायला काय हरकत होती ? शुद्ध अविश्वास !!
शेवटी मी hacking करतोय म्हटल्यावर तर कॉम्पुटर बाहेर फेकणे फक्त बाकी होते. मी प्रयत्न करत होतोच सांगायचा की मी काही चोरी करत नाहीये. कुणाचे वाईटही करत नाहीये. ह्यामध्ये चांगले आणि सन्मानीय करियर असते म्हणून. पण ऐकणार कोण ?

येथील पालकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांवर असा सरळ अविश्वास दाखवू नका. तुमची भीती वाजवी आहे पण ती सत्यात उतरेलच असे काही नाही ना.
वाटल्यास एकदा मुलांच्या बरोबर ते गेम्स खेळून पहा. तो / ती जर गेमर नसेल तर कॉम्पुटरवर काय करतो / करते ते पहा. समजावून घेण्याचा प्रयत्न करा.
कदाचित ते खरेच काही तरी चांगले करीत असतील. त्यात त्यांना उद्या चांगला मान मिळणार असेल... चांगले काम मिळणार असेल.
"मला मेलीला त्यातलं काय कळतंय !" टाईप वागू नका. अविश्वासाने मुले दुरावतात एवढे लक्षात ठेवा,

पहा विचार करून ... पटले तर ठीक ... नाही पटले तर तुमचे विचार ऐकायला मी उत्सुक आहे.

निळूभाऊ, पोस्ट आवडली.

मूळात लोचा आहे तो कुठलीही गोष्ट करिअर म्हणून करायची ठरवली की कष्ट करावे लागतात आणि बरेच जण सातत्याने कष्ट करायला तयार नसतात. गल्ली क्रिकेट खेळत टाईमपास करणारी मुलेच पहा. रोज पहाटे उठून सराव करायला त्यातले फार थोडे तयार होतात. मुळात क्रिकेट वाईट नाही आणि इंटरनेट्/गेम्स हे देखील वाईट नाही. तुम्ही या गोष्टी कशा वापरता यावर सगळे अवलंबून आहे.

मंदार लेख आवडला. सध्या हा ज्वलंत विषय आहे. Happy
ऑनलाईन गेमींग आणि कन्सोल गेमींग हा काही बिलियन डॉलर्सचा उद्योग आहे. वी, सोनी, एक्स बॉक्स, EA स्पोर्टस ह्यांचे रेव्हेन्यु पाहिले की चक्कर येईल. इकडे मुले कायम कायम डी एस आय किंवा पिएसपीला चिकटवलेली पाहिली आहेत. अर्थात सर्वच पालक असे करू देत नाहीत, पण मेजॉरिटी मुलं मी अशीच पाहिली. व्यसनाधीन! हळू हळू हेच लोन भारतात येत आहे, आता तिथेही काही वर्षात मध्यमवर्गीय मुलं पण डी एस आय ला चिकटलेली दिसणार ह्यात वाद नाही.

निळूभाऊ, तुम्ही व्यक्त केलेली मते रास्त आहेत, पण अशी तासनतास आणि रात्र रात्र कॉम्पुटरसमोर गेम्स खेळण्यात घालवणारी किती मुलं त्याचं पुढे करिअरमधे रूपांतर करतात? शिवाय गेम्स बनवून पुढे त्याचे व्यसनच होणार असेल इतर मुलांसाठी तर त्याचा उपयोग काय? शिवाय वायफळ सोशल नेटवर्किंग आणि झपाटल्यासारखं निरुद्देश सर्फिंग करुन काय साधणार हा प्रश्न उरतोच.

वर केदार यांच्या पोस्ट मधे म्हटल्याप्रमाणे "इकडे मुले कायम कायम डी एस आय किंवा पिएसपीला चिकटवलेली पाहिली आहेत." आणि पुढे केदार म्हणतात की " हळू हळू हेच लोन भारतात येत आहे" - येत आहे नव्हे आलेलं आहे. श्रीमंत घरात हे दिसतंच आहे, फक्त गल्लीबोळात पसरणं बाकी आहे. निळूभाऊ, जे डोळ्यादेखत दिसतंय तेच मी मांडलं आहे.

गेमिंग एक मोठी इंडस्ट्री आहे असे तुम्ही म्हणता, पण मग आज तंबाखू (यात विडी पासून सिगारेटपर्यंत आणि थेट क्युबन सिगार पर्यंत) आणि दारू (आठवा, विजय मल्ल्या) ह्या सुद्धा मोठ्या इंडस्ट्रीज आहेतच की. फक्त ती व्यसने लागलेली लवकर समजतात, हे तितक्या लवकर समजत नाही इतकंच आणि कळलं तरी वळत नाही हे ही तितकंच खरं.

आजकाल टिव्ही वर तंत्रज्ञानविषयक कार्यक्रमांमुळे आणि अद्ययावत मोबाईल्समुळे सगळ्या पालकांना गेमिंग, अ‍ॅप्स, इत्यादी बद्दल बरीच माहिती असते. थोडक्यात मुले असलेली आई-बाप पिढी ही माहिती-तंत्रज्ञानाच्या बाबतीत दुधखुळी राहिलेली नाही. म्हणूनच "मला मेलीला त्यातलं काय कळतंय!" टाईप वाक्य किंवा वृत्ती (अ‍ॅटिट्युड) हे गेमिंगच्या किंवा सर्फिंगच्या बाबतीत गैरलागू आहे, कारण आजच्या पालकांना यातले बारकावे माहित आहेत. फक्त धोके ओळखावे हाच हेतू.

पालकांनी मुलांवर सरसकट अविश्वास दाखवू नये हे खरेच, पण नियंत्रण हे हवंच. गेमिंग हे सर्वस्व नव्हे. एखाद्या मुलाला फोटोग्राफीचं आकर्षण असेल तर त्यात जरूर 'ढकलावं', किंवा एखाद्याला जेवण बनवण्यात रस असेल तर त्याला संजीव कपूरचं उदाहरण देऊन प्रोत्साहन द्यावं. अगदी सिनेमाचं आकर्षण असल्यास तो कसा बघावा, त्यातले बारकावे यातलं वाचन, चिंतन, मनन किंवा शिक्षणही घ्यायला प्रवृत्त करावं. पण मुलगा गेम खेळतोय तर""काही वेळ खेळूदे मजा म्हणून" असं म्हणावं - त्यात फार रस घेऊन अस्थानी प्रोत्साहन देणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर किंवा चूड दाखवून वाघ घरात घेण्यासारखा प्रकार आहे.

निळूभाऊ, तुम्ही एक हॅकिंग मधे देखिल चांगली करीअर करून दा़खवलीत हो, पण शाळेला दांडी मारून दिवसरात्र क्रिकेट खेळणारा प्रत्येक दिवटा सचिन तेंडूलकर होतो का?.. इथे व्यक्त झालेली बेसिक चिंता रास्त आहे. पण,

गेमिंग, सोशल नेटवर्किंग, पोर्न साईट्स पहाण्याचं व्यसन फक्त सायबर कॅफेमधे जाणार्‍या मुलांनाच आहे? की पालकांना देखिल?

माझा मुलगा टीव्ही/कॉम्प्यूटर फार पहातो अशी तक्रार करणार्‍या आई/बापाला मी नेहेमी विचारतो,
"बाई/बाबा गं/रे, केबल चं किंवा नेट चं बिल कोण भरतं? बेबीसिटर म्हणून टीव्ही कोण वापरतं? वरून ३-४ वर्षे वयाच्या मुलांना मोबाईल हातात कोण देतं?" यावर पालकांची इरसाल उत्तरं मिळून एक वेगळा बाफ होईल.. असो. हे सगळं सध्याच्या भ्रष्टाचार निर्मूलना सारखं आहे. 'त्यांचा' बन्द करा.. पक्षी मुलांना व्यसन लागते म्हणजे काय?.. मस्त म्हण आहे मराठीत एक. 'आपण हसे लोकाला.......'

अतिशय सुंदर लेख..
या खेळात एवढे गुंतवून ठेवणारे काय असते तेच मला कधी कळले नाही. घे बंदूक आणि मार गोळी. असे करुन प्रत्यक्ष गोळी मारायची वेळ आली, तर यांचे हात थरथरणार नाहीत, अशी भिती वाटते.........

अगदी पटले... आणि उलट असे ही वाटले, गोळी मारताना हात थरथरणार नाहीत पण उद्या उलट वेळ आली तर, म्हणजे कोणाकडुन पराभव पत्करावा लागला तर कितपत तयारी असेल ह्या मुलांची? दुसर्यांचे श्रेष्ठत्च मानणे जे अ‍ॅट टाइम्स अटळ असते ... त्याची ह्या मुलांना जाणीव तरी होईल का? कारण जिंकेपर्यंत असे गेम्स खेळलेले....

ही सत्य परीस्थिती आहे. सुंदर लेखन. या वरच्या उपायांवर ही चर्चा व्हायला हवी. आपल्या सर्वांचीच मुलं यातून जाणार आहेत.

अतिशय सुरेख आणि विचार करायला लावणारा लेख आहे मंदार... Happy

जे लिहिले आहेस तसेच चित्र आज समाजात जागोजागी दिसत आहे. यावर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या
आवडी निवडी लक्षात घेउन त्यावर उपाय / नियंत्रण ठेवले पाहिजे. आणि मुलांबरोबर खुप संवाद साधला पाहिजे.
असे वाटते.

खूप छान लेख मंदार.
चीन मधे एका मुलास डिअ‍ॅडिक्षन सेंटर वर पाठविले व त्यांच्या जबरदस्तीत त्याचा मृत्यू झाला. ही माहिती रीडर्स डायजेस्ट मध्ये आली होती. मध्ये तैवान मध्ये पण एक मुलगा खेळता खेळता मेला तरीही बाजूचे लोक खेळतच राहिले होते.

मंदार खुप सुंदर लेख लिहिलास......मागे कुणीतरी....“पुण्यातल्या मुक्तांगण या व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या संस्थेत आता दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन याबरोबरच इंटरनेट व्यसनमुक्ती ही एक वेगळी उपचारपद्धती विकसित करण्यात आली आहे…………..”
हे लिहिले...तेव्हा मला खरंच वाटले नाही ..... असे काही असते का?.कुणी तरी कुणाचीतरि मजा केली असावि असे वाटले.... .....पण आता हे वाचल्यावर ते खरेच होते हे समजले........
माझ्यामते यात पालकाचीच चुक आहे....... आमची मुले किति हुषार आहेत... computer शिवाय त्यांचे चालतच नाहि.... किति पटकन गोष्टी Pick-up करतात.... आपल्यावेळी हे असे नव्ह्तेच्.....आताची मुले खुपच smart....हे कौतुक पालकच करतात. त्यामुळे मुलांना कितिवेळ computer वर बसवुन द्यावे हे जो पर्यत पालकांना कळत नाही ,तो पर्यंत हे असेच चालु राहणार..........हा लेख अशा पालकांसाठी उपयुक्त आहे.

हा लेख संपूर्ण विसरून गेलो होतो. परवा एक मित्र म्हणाला इंटरनेट हा एक मानसिक आजार आहे म्हणून पुन्हा विचारचक्र सुरू झाले. आपण इथं बरीच चर्चा केली होती कि.. माझी विस्मरणशक्ती दांडगी होत चाललीये Biggrin

Pages