नाते समुद्राशी भाग ४

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

==================================================

साधारण वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी त्यावेळेला गोव्यामधे होतो. तिथे एका जहाजाचे काम चालू होते. तेवढ्यात मला निरोप आला की माझ्या बॉसचा फोन आला होता. "ताबडतोब रत्नागिरीला निघून ये." इतकाच तो निरोप होता. मला समजेना नक्की काय घडलय. तेव्हा माझ्या मुलाची- योगेशची तब्बेत जरा नाजुक होती. मला आधी वाटलं त्यालाच काहीतरी झालं असावं. हॉटेल रूममधे आलो तर गाडीची सोय झालेली होती. तेव्हा गोव्याहून महाराष्ट्राला ट्रंक कॉल करावा लागे. टेलिफोन आमच्या घरी अजून आला नव्हता. म्हणून आम्ही जिथे राहत होतो त्यांच्यापैकी एकाचा घरी कॉल लावला. तो कॉल काही लागेना. मग तो नाद सोडून मी गाडीत येऊन बसलो आणि आम्ही रत्नागिरीच्या वाटेला लागलो. वाटेमधे कुठे चहासाठी देखील थांबलो नाही. एक दोन एस टी डीमधून घरी फोन करायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. पावसाचे दिवस असल्याने जितके लवकर घर गाठू तितके उत्तम असा विचार केला होता. नशीबाने वाटेत कुठेच पाऊस मिळाला नाही.

तेव्हा आम्ही रत्नागिरीच्या नूतन नगर भागामधे राहत होतो. घरी पोचलो तेव्हा संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. मुले शाळेतून घरी आलेली नव्हती. एकंदरीत मला पाहताच पत्नीचा चेहरा "आठवड्याने येणार म्हणाले होते, इतक्यात लगेच कसे काय परत आले?" असा झाला होता. आनंदी म्हणा किंवा आश्चर्यचकित म्हणा. Happy घरामधे टेन्शनचे तसे काही चिन्ह नव्हते. त्यामुळे निवांत होऊन पत्नीला काहीतरी खायला बनवायची विनंती केली. तिचे कांदाभजी करू की डोसा करू? चहा करू की कॉफी करू टाईप प्रश्न चालूच होते. तितक्यात जी गाडी मला घरी सोडून कंपनीमधे गेली होती त्यामधून माझे बॉस घरी आले.

आता मला इतक्या अर्जंटली बोलावून घ्यायचे कारण समजले. त्यावेळेला कंपनीमधे एक टग बांधून तयार होता. हा टग मुंबई पोर्ट ट्रस्टला डीलीह्वरी करायला न्यायचा होता. सर्व कागदपत्रीय पूर्तता झालेली असल्याने फक्त हा टग नेऊन बीपीटीला लावायचा होता. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत डेडलाईन होती. आदल्या दिवसापर्यंत टगवर काहीतरी काम चालू होते. आणि जो ज्युनिअर डीलीव्हरीसाठी जाणार होता, त्याच्या बायकोचा दात दुखत असल्याने तो जाऊ शकत नव्हता.

हे ऐकल्यावर पत्नीने लगेच "जणू काही हा घरी थांबला तर तिचा दात दुखायचा थांबणार आहे" हे मलाच ऐकवले. दातदुखीचे खरे कारण बाहेर बघितले तर दिसत होते. धुवान्धार पाऊस चालू झाला होता. या पावसातून जहाज घेऊन जाणे म्हणजे लई डेंजर काम. आता ज्युनिअरने या कामातून स्वतःची सुटका करवून घेतल्याने मलाच जावे लागणार होते.

गडबडीने निघायची तयारी सुरू केली. दोन तीन दिवस सहज लागले असते. नाहीतरी गोव्यावरून आणलेली बॅग तयारच होती. त्यातले धुवायचे कपडे काढले. पत्नीने ईस्त्री केलेले कपडे तयार ठेवलेच होते. बॅग भरली. तितक्यात मुले शाळेतून आली. नंदिनीने माझी अख्खी बॅग उपसून बघितली. काहीही गिफ्ट अथवा खाऊ न आणल्याने ती थोडीशी नाराज झाली. ती मागच्या जन्मी सरकारी ऑफिसर अथवा जकात कारकून असावी. घरात आलं की आधी तिच्यासाठी काहीतरी घेऊन यावं लागतं हा आजवरचा नियम आहे. पप्पा गोव्यावरून आलेत आणि मुंबईला लगेच निघालेत हे समजल्यावर ती अजूनच नाराज झाली. योगेश तसा लहान होता त्यामुळे त्याला पप्पा घरी आलेत हे बघूनच आनंद झाला होता. तो घरभर फिरत होता. मुलं लहान असतानाच जास्त चांगली असतात. असो.

तितक्यात पत्नीने पोळीभाजीचा डबा तयार केला. मी म्हटलं "कशाला उगाच?" तर तिने लगेच "माझ्या सासूबाईचा उपदेश आहे" असे उत्तर दिले.

हे मात्र खरे. माझ्या आईचे एक तत्त्व होते. प्रवासाला बाहेर पडताना किमान एक वेळेला सर्वाना पुरेल इतके जेवण घऊन मगच बाहेर पडायचे, कधी गरज लागेल सांगता येत नाही. सासूसुनेचे नाते अगदी घनिष्ट नसले तरी माझ्या आईचे जितके चांगले गुण घेता येणे शक्य आहे तितके माझ्या पत्नीने घेतले आहे. तिने ताबडतोब पाच पोळ्या आ़णि गरमागरम कांद्याची भाजी तयार केली. शिवाय एका काचेच्या बाटलीत विरजण लावलेले दही. घरातून् बाहेर पडताना थोडासा दहीभात खाल्ला.

हे सर्व होइस्तोवर सात वाजले होते. कंपनीमधे गेलो आणि सर्व कंडिशन बघितली. पाऊस अजून पडतच होता. मी, एक कॅप्टनसाहेब आणि दोन वर्कर एवढेच जण जाणार होतो. टग तसा लहान होता. बावीस मीटरचा. पण पाऊस खूप असल्याने समुद्र उसळलेला होता. अशा समुद्रामधे मोठी जहाजे घेऊन जाणे एकवेळ सोपे पडते पण लहान बोटी म्हणजे जीवावरचे काम. आम्हाला निघायला उशीर होत होता. थोडीफार शिल्लक असलेली कामे पूर्ण करून वर्कर खाली उतरत होते.

कॅप्टनसाहेब एकदम दिलखुलास माणूस होता. आल्याआल्या त्यानी आणि मी सिगरेट शिलगावली. तेव्हा मी स्मोक करायचो. नंतर सोडली. पहाटेपर्यंत मुंबई गाठायलाच हवे होते. जहाज अँकरवर उभे होतेच. फेरीमधून जहाजाजवळ गेलो. तर आम्ही लगेच हवमानाची व समुद्राची चर्चा केली. भरती ओहोटीचे टायमिंग काय आहे ते चेक केले आणि जहाजावर चढलो. दूरवर जेटी आणि त्यावरचे लोक दिसत होते.

रत्नागिरी ते मुंबई हे अंतर जवळ जवळ १३० नॉटिकल माईल्स आहे. ( १ नॉटिकल माईल म्हणजे १.८५ किमी) हे अंतर पार करायला आम्हाला साताठ तास सहज लागले असते. त्यात परत पाऊस जोरात असेल तर हळू जावे लागले असते. कॅप्टन साहेब आणि मी व्हील हाऊसमधे चढलो. दोघानी गणपती बाप्पा मोरया चा पुकारा केला आणि निघालो.

जेटीवरून आमचे बरेचसे ऑफिसर्स आम्हाला जोरजोरात हात हलवून टाटा बाय बाय करताना दिसत होते. म्हटलं ही नविन पद्धत आहे. आजवर असा टाटा आम्हाला कधी कुणी केला नव्हता. (साधारण दोन तासानंतर त्यांच्या टाटाचे रहस्य आम्हाला समजले.)

तोपर्यंत मी आणि कॅप्टनसाहेब मस्त गप्पा मारत बसलो होतो. ते आधी मर्चंट नेव्हीमधे होते. मोठीमोठी मदर शिप्स त्यानी कसल्याही हवामानामधून काढली होती. त्यामानाने हा टग अगदीच कुक्कुलं बाळ होता. वर्कर्स बिचारे आतमधे कुठेतरी जाऊन बसले होते.

या टगवर जीपीएस सिस्टीम वगैरे प्रकार नव्हता. कॅप्टनसाहेब तीस वर्षाहून जास्त काळ समुद्रात असल्याने नक्षत्र तार्‍यावरून त्याना रूट समजला असता. पण पावसाने सर्वच आकाश काळं दिसत होतं. एरवी रात्री काळं दिसणारं आकाश आणि पावसाळ्याच्या रात्री काळं दिसणारं आकाश यात फरक असतो. समुद्रातून फिरताना तर हे फार जाणवतं. एरवीच्या लुकलुकणार्‍या चांदण्या आणि तारे बघताना कोणीतरी सोबत आहे अशी जाणीव सतत होत असते. पावसामधे आपण एखाद्या अंधार्‍या काळ्या गुहेमधे अडकून बसलोय असं सतत वाटायला लागतं. जिकडे बघावं तिकडे अंधार आणि पाऊस. अशा वेळेला मला इंग्रजी चित्रपटातला "पाण्यात प्रेत ढकलायचा सीन" असतो त्याची आठवण हमखास येते. त्यामधे हीरो-व्हिलन जो कोण असतो त्याने काळा रेनकोट घातलेला असतो. आम्ही मात्र आमचा जगप्रसिइध गणवेषामधे होतो. बॉयलरसूट. कॅप्टनसाहेब त्यांच्या काळातल्या काही काही गमतीजमती सांगत होते.

अंधारामधे वाट चुकू नये म्हणून आम्ही पूर्वकाळजी म्हणून जमिनीवर गावांचे लाईट दिसत असतात ते बघत बघत चाललो होतो. कारण जहाज सोडल्या सोडल्या कॅप्टनसाहेबानी आम्हाला एक आनंदाची बातमी दिली होती की कंपासचे कॅलिबरेशन झालेले नाही. ही पहिली आनंदाची बातमी.

जवळ जवळ दीड दोन तासानी मी एका वर्करला हाक मारली "चहा बनव" म्हणून. वर्कर किचनमधे गेला आणि भूत बघितल्यासारखा चेहरा करून आला.

"साब, कुछ सामान नही है"

मला काहीच समजेना. तरीपण मी व्हील हाऊसमधून उतरून खाली गेलो. किचन सर्व धुवून पुसून चकचकीत. टगची डीलीव्हरी असल्याने हे काम कसं व्यवस्थित केलं गेलं होतं. वर्करला परत हाक मारली. इकडे तिकडे शोध. सामानाचं पोतं जेटीवर आणलं होतं. ते कुठे ठेवलय ते बघ. असं दोघानाही बजावून सांगितलं..

बिचारे शोधून शोधून दमले. अचानक एखादा भला मोठा शोध लागावा तसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. सामानाचे पोते.. आमचे रात्रीचे जेवण.. चहा.. साखर.. दूध.. सर्व काही जेटीवरच राहिले होते. आता कुठे मला ते टाटा करणारे ऑफिसर्स "थांबा थांबा" म्हणताना दिसायला लागले. डोळ्यासमोर तारे चम़कणे म्हणजे काय ते समजलं. त्यातही अंधारी रात्र असल्याने तारे जास्तच जोरात चमकले.

वर्कर बिचारे काकुळतीला आल्यासारखे बसले. मी परत वर येऊन कॅप्टनसाहेबाना परिस्थिती सांगितली.

"आरेम, टेन्शन नय. सुबहतक बॉम्बे" घड्याळात बघितलं तर अवघे नऊ साडेनऊ झाले होते. कॅप्टन निवांत होते. म्हटलं, त्याना जहाज हाकायचं आहे, तरी काळजी नाही मग मी तरी का काळजी करू? साताठ तासाचा तर प्रश्न आहे. अस्सा वेळ निघून जाईल.

भुकेची एक गंमत असते. जेव्हा सर्व काही सुरळीत चालू असतं तेव्हा भुकेची जाणीव इतकी तीव्र होत नाही. पण असं काही घडलं की मग "आपल्याला भूक लागली आहे" ही भावना सतत पाठलाग करत राहते.

तरीपण एक सहारा होता. मी घरून डबा आणलाच होता. पण तो फक्त माझ्यापुरताच होता. आधी माहित असतं तर पत्नीने अजून पोळ्या बांधून दिल्या असत्या. आता चार माणसामधे मिळून जेवायचं म्हणजे कुणालाच पोटभर झालं नसतं. मनात म्हटलं राहू दे आता डबा तसाच. अगदीच कुणाला भूक अनावर झालीतर तो डबा त्याला देता येइल असा विचार करून गप राहिलो.

तितक्यात एक वर्कर परत आला. "साब, किचन मे चाय का पॅकेट मिला." हे सांगत.

चहापावडर मिळाली. पण पाण्याचे काय? परत थोडा वेळ शोधाशोध करून त्याला बिसलेरीची एक बाटली मिळाली. आजूबाजूला अथांग समुद्र पसरलेला असताना पाणी पाणी करत फिरावे लागते त्या वेळेला "नशिब" म्हणजे काय ते समजतं.

कॅप्टन, मी आणि वर्करनी त्या पाण्याचे दोन तीन घोट घेतले. तितक्यात दुसर्‍याला किचनमधे शोध घेऊन चहा पावडरसोबत एक अर्धवट वापरलेले मिल्क पावडरचे पॅकेट मिळाले. ते त्याने मला दाखवून "खराब तो नही हो गया क्या देखो" विचारले.

खराब झालेले असते तरी चालले असते.... पण ते पॅकेट जास्त जुने नव्हते. वर्करने ताबडतोब गॅस लावून चहा बनवला. अडीच कप इतका चहा आम्ही चारजण प्यायलो. जराबरं वाटलं.

किचनमधे अजून काही मिळतं का त्याची आम्ही शोध घेत होतो. कॅप्टनसाहेब व्हील हाऊसमधून हाका मारायला लागले.

"आरेम... आरेम.. आरेम.. " मी धावत वर गेलो.

"क्या हुआ?"

"लाईट नही है" मी व्हील हाऊसच्या बाहेर नजर टाकली. चारीबाजूला अंधार. आम्हाला दूरवर कुठल्यातरी गावाचे मधाशी लाईट दिसत होते. ते आता दिसेनासे झाले होते.

आमचे जहाज भरकटले होते. पायाखालचा समुद्रच सरकला. नक्की कुठे आलोय, कुठे निघालोय, किती भरकटलोय तेच समजेना.

कॅप्टन साहेब तसे शांत होते. मी म्हटलं एक काम करा.. जहाज नव्वद अंशामधे वळवा आणि सरळ जाऊ द्या. पंधरा मिनीटे बघू या.

पंधरावीस मिनिटानी पण लाईट्स दिसेनात. मग जहाज एकशे अंशी कोनात वळवलं आणि सरळ रेषेमधे अर्धातास गेलो. लाईट्स दिसायला लागले. तसा जीव भांड्यात पडला.

कॅप्टनसाहेब तोपर्यन्त अगदी गंभीर दिसत होते. मधेच एकदा त्यानी नक्षत्र चांदण्या बघून घेतल्या.

रस्ता बरोबर आहे हे समजल्यावर परत एकदम खुशीत आले. परत गप्पा मारायला लागले. मला मात्र डोळ्यासमोर अजूनही जहाज भरकटलं असतं तर काय झालं असतं तेच दिसत होतं.

बारा वाजून गेले होते. दोन्ही वर्कर्स पाप बिचारे सकाळी ड्युटीवर आले होते. दमून दमून त्यांचे डोळे पेंगायला लागले होते. त्याना माझ्या डब्यातली पोळीभाजी खायला दिली.

"साब, आपसे पहले कैसे खाये?" हा त्यांचा प्रश्न.
मला खरंतर भूक लागलीच होती. म्हणून आम्ही चौघानी एक एक पोळी थोडी भाजी आणि वाटीमधे दही असं खाऊन घेतलं.

खरंतर मला खूप राग आला होता. ही सर्व कामे माझी नव्हती. खरंतर मला जहाज घेऊन जाताना त्यामधे सर्व कामे पूर्ण झाली आहेत की नाहीत हे चेक करायला हवे होते. तसे चेक केले नसेल तर मला तेवढा वेळ द्यायला हवा होता. पुढच्या मीटिंगमधे या सर्व बाबी बोलून दाखवल्या असत्याच. पण तोपर्यंत काय करायचे हा यक्षप्रश्न होता.

वेळ घालवण्यासाठी कॅप्टन आणि मी गप्पा मारत बसलो. पहाटे पहाटे कॅप्टनसाहेबानी अजून एक धक्का दिला. थोडंसं उजाडलं होतं आणि मुंबई जवळ आलं होतं.

डीझेल टँक. आता मात्र मी टरकलो.

मुंबई पोर्ट ट्रस्टला नेऊन जहाज लावलं आणि सर्वात आधी तोंडावर गार पाण्याचा हबका मारला. आमच्या डीझेल टॅन्कमधे फक्त ४०० लिटर डीझेल शिल्लक होतं आणि तितक्या डीझेलवर आम्ही तास दीडतास वेळ जहाज चालवू शकलो असतो.

सुदैवाने तसे काही व्हायच्या आत आम्ही पोर्टला लागलो. गरम गरम चहा आणि कांदाभजी खाल्ली. पोर्टवरच्या कागदी कारवाया पूर्ण केल्या आणि हॉटेलवर येऊन जेवलो. नंतर झोपलो, तेव्हा दुपारचे बारा वाजले होते.

विषय: 
प्रकार: 

मस्त अनुभव.. आता काय आधुनिक उपकरणे आहेत.. तेंव्हा मात्र काय कस लागत असेल असे रात्रीचे जहाज हाकायचे म्हणजे... Happy

छान

मस्त एकसे एक थरारक गोष्टी आहेत. Happy

>>>> बिचारे शोधून शोधून दमले. अचानक एखादा भला मोठा शोध लागावा तसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. सामानाचे पोते.. आमचे रात्रीचे जेवण.. चहा.. साखर.. दूध.. सर्व काही जेटीवरच राहिले होते. आता कुठे मला ते टाटा करणारे ऑफिसर्स "थांबा थांबा" म्हणताना दिसायला लागले. >>>>> टाटा बाय बाय ... Lol

>>>> डोळ्यासमोर तारे चम़कणे म्हणजे काय ते समजलं. त्यातही अंधारी रात्र असल्याने तारे जास्तच जोरात चमकले. >>>> Biggrin

साहसी अनुभव्.दिशादर्शक साधनं नसताना जहाज हाकणं.अनुभव्,कार्यकुशलता आणि नशीबाची साथ असेच म्हणावेसे वाटते आहे.पायाखालचा समुद्र सरकला.>वाचुनच थरार अनुभवला.खुपच मस्त लिहीले आहे.

वाचताना मजा आली... आपण त्या 'टग'वर नव्हतो म्हणून ! छान.
<< तेव्हा गोव्याहून महाराष्ट्राला ट्रंक कॉल करावा लागे...... तो कॉल काही लागेना. मग तो नाद सोडून मी गाडीत येऊन बसलो आणि .. >> टेलीकम्युनिकेश सुधारल्यामुळे आतां कल्पनाही नाही येत किती मानसिक तणाव असायचा तेंव्हा घरापासून लांबच्या प्रवासात ! [धन्यवाद सॅम पिट्रोडा ] !!

एक बाळबोध कुतूहल - कोकण लाईनच्या बोटी पूर्वी मुंबई - रत्नागिरी प्रवासाला साधारण ९ तास घेत असं आठवतं [ ताशीं १२- १५ नॉटिकल मैल वेग असावा ]. टग त्याहूनही वेगाने जातात का ? कीं टगना बोटींसारखं समुद्रात फार आंत जावं लागत नाही म्हणून अंतर वांचतं ?

सर्वाना धन्यवाद.

आज १४ फेब्रूवारीला पप्पाना ही कंपनी जॉइन करून (आणि आमचं नातं समुद्राशी जुळून) चोवीस वर्षे पूर्ण झाली. Happy

टेलीकम्युनिकेशन सुधारले हे खरंच बरं झालय. आधी हे लोक वॉकीटॉकी घेऊन ओरडत फिरायचे. आता मोबाईल घेऊन ओरडत फिरतात. Happy शिवाय कोण कुठे आहे तेही बरोबर समजतं. जीपीएस मुळे रस्ता चुकायचीपण भिती नाही.

भाऊ, तुमची अंतराची शंका फॉरवर्ड केली आहे. साधारणपणे रत्नागिरीवरून मुंबईला साताठ तास लागतातच. तरीपण माझ्यामते, पावसाळा असल्याने आणि वाटेत रस्ता चुकल्याने या लोकाना जास्त वेळ लागला असावा.

टग् रिकामेच जात असतील तर ताशी दहा बारा नॉटिकल मैल वेगाने जातात. टोइंग करून (दुसरे जहाज ओढून नेत असतील तर) अजून वेळ कमी होतो.

<< आज १४ फेब्रूवारीला पप्पाना ही कंपनी जॉइन करून (आणि आमचं नातं समुद्राशी जुळून) चोवीस वर्षे पूर्ण झाली. >> तुमच्या पप्पांचं खास अभिनंदन व त्याना मनःपूर्वक शुभेच्छा !
[ 'व्हॅलेन्टीन्स डे'चा मुहूर्त मुद्दाम शोधला होता का तेंव्हां हें सुंदर नातं जोडायला ! Wink ]

भाऊ, शुभेच्छासाठी आभार.

आम्ही पप्पाना खूप चिडवतो यावरून पण तेव्हा "आमच्या वेळेला असलं काही नव्हतं." हे सांगतात. Happy

<< तुमची सिरीज संपली की मी सुरू करीन म्हणतो... >> पण कराच ! खरं तर, आमच्यासारख्या 'भूमि'पुत्राना [ Landlubbers ] कोलंबस व वास्को-ड -गामा दोन्ही सफरी जरा जडच जातील एकदम वाचायलाही ! Wink

सेनापती, तुम्ही पण लिहायला चालू करा.

माझी सीरीज संपायची वाट बघितलीत तर कन्याकुमारीसारखी परिस्थिती होइल. Proud

नक्की लिहेन.. Happy पण जरा काही दिवसांनी.. माबोच्या काळजाचे नाहीतर एकदम पाणी-पाणी होईल.. Lol

तसेही इतर ठिकाणी लढाई देखील सुरू आहेच... Wink

समुद्रावरचं विश्वच वेगळं !! >>> अगदी

कॅप्टन आणि आरेमना सलाम.

त्यावेळी HSSE नियम कश्या प्रकारे राबवले जात?

त्यावेळी HSSE नियम कश्या प्रकारे राबवले जात?

खरच ह्याबद्दल लिहा... मी सध्याचे नियम याबद्दल लिहू शकीन.. Happy

त्यावेळी HSSE नियम कश्या प्रकारे राबवले जात?
>>> म्हणजे काय? :हा प्रश्न अत्यंत बावळट आहे हे माहित आहे. पण मला खरंच माहित नाही:

Health, Safety, Security & Enviroment.
ह्या बद्दल आता खूपच जागरूकता आलेली आहे. त्याबद्दल म्हणतोय आम्ही. तेंव्हा कसे होते हे सर्व?

Pages