वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[४]

Submitted by दामोदरसुत on 11 February, 2012 - 03:56

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[४]

आपण दिलेल्या शास्त्रज्ञानात शिष्याने असे पारंगत व्हावे कि त्या शास्त्रज्ञानात त्याने आपलाच पराभव
( शिकविण्यात यशस्वी ठरल्यामुळे )करावा अशी इच्छा बाळगणारा तो खरा गुरु. हेच तत्व ’शिष्यात इच्छेत पराजयम’! या वचनात अगदी थोडक्यात सांगितले आहे.
म्हणून खर्‍या गुरूसमोरचे ध्येय म्हणजे ’शिष्यात इच्छेत पराजयम’! पण हे तेव्हांच शक्य होईल जेव्हां शिष्यही शिक्षण घेण्यासाठी त्या योग्यतेचा असेल तरच! तसे जर झाले नाही आणि ’अर्थस्य मूढाः खरवद वहन्ति’ (खरा अर्थ जाणून घेतल्याशिवायच गाढवाप्रमाणे तथाकथित ज्ञानाचे निव्वळ ओझेच वाहणारे. ) असले शिष्य वाटयाला आले तर? तर ते गुरूने दिलेल्या ज्ञानाचे तीन तेरा वाजवतात. त्याला अगदी खरेच पराजित (शिकविण्यात अपयशी) करतात. कसे ते पाहू.
शिक्षण पूर्ण करून तीन शिष्य गुरुंचा आशिर्वाद घेऊन आपल्या गावी निघाले. दुपारच्या भुकेच्या वेळी ते राजवाडयाशी पोचले. तेथे वाटसरूंना शेवयांची खीर वाटली जात होती. तिघांनीही द्रोण भरून खीर घेतली आणि सावलीला जाऊन खाण्यास बसले.
खिरीतील लांबच लांब शेवया पाहून त्यांना ’दीर्घसूत्री विनश्यति’ (शब्दार्थ: लांब धागे नाशकारक असतात.) हे गुरुजींनी शिकवलेले वचन आठवले नि खीर तशीच जमिनीवर ठेऊन ते भुकेल्या पोटी पुढे निघाले. सावलीत उभ्या गाढवाने ती खीर खाल्ली आणि अधिक कांही खायला मिळेल या आशेने गाढव त्या तिघांच्या मागे मागे जाऊ लागले.
पुढे एका अन्नछत्रात घावन (दोशासारखा सछिद्र पदार्थ) मिळाले.
पण त्यावरील छिद्रे पाहाताच त्यांना ’छिद्रेषु अनर्था: बहुली भवन्ति’ (शब्दार्थ: छिद्रांमध्ये खूप अनर्थ,संकटे दडलेली असतात) हे गुरुजींनी शिकवलेले वचन आठवले नि त्यांनी घावन त्यांच्या मागे आलेल्या गाढवाला खायला घातले. भुकेल्या पोटी पुढे जातांना त्यांना मुख्य रस्त्याला दोन रस्ते फुटलेले आढळले. भुकेने बुद्धि चालेना. कोणत्या रस्त्याने जावे संभ्रम पडला. तोच एक प्रेतयात्रा आली आणि उजव्या रस्त्याला निघाली .
ते पाहून ’महाजनोः येन गतः सः पन्थः’ (शब्दार्थ: मोठया संख्येने लोक जातात तोच तुमचा रस्ता) हे गुरुजींनी शिकवलेले वचन आठवले नि ते त्यांच्या मागे जात जात गाढवासह स्मशानात पोचले. तेथे खायला काय मिळणार? भुकेने कासावीस झालेल्या त्यांना संकटातून सोडविणारा कोणी बंधू भेटावा असे वाटायला लागले आणि आठवले गुरुजींनी शिकवलेले वचन
’राजद्वारे स्मशानेच यः तिष्ठति सः बान्धवः’ (शब्दार्थः राजवाडयावर आणि स्मशानातही जो आपल्यासोबत असतो तोच आपला खरा बंधू!). ’अरेच्या! हे गाढवच आता आपला खरा तारणहार!’ असे समजून तिघेही गाढवाच्या गळी पडायला गेले. माणसांच्या या अनपेक्षित प्रेमाने गाढव बावचळले आणि तिघांनाही लाथांचा प्रसाद देऊन पळून गेले.
हे सर्व घडण्याचे कारण सुभाषितांचा खरा अर्थ त्यांनी समजावून घेतलाच नव्हता. निव्वळ शब्दार्थ जाणला नि गाढवाच्या लाथा खाऊन गुरूचीही लाज काढली. ही वचने ज्यात आहेत ती संपूर्ण सुभाषिते आणि त्यांचा खरा अर्थ असा :-
[*] अनागत विघाताच प्रत्युत्पन्नमतिः च यः।
द्वौ एव सुखम एधेते, दीर्घसूत्री विनष्यति॥

जे संकट आलेले नाही त्यावर मात करण्याची तयारी करून ठेवणारे आणि ज्याला आयत्या वेळीदेखील मार्ग सुचतो असे समयसूचक हेच सुखी राहातात. (मार्ग काढण्यात) चेंगटपणा करणारा नाश पावतो.
[*] क्षते प्रहाराः निपतन्ति अभिक्ष्णं धनक्षये दीप्यति जठराग्निः।
आपत्सु वैराणि समुल्लसन्ति, छिद्रेषु अनर्था: बहुली भवन्ति॥

म्हणजे जखमेवरच प्रहार होतात, पैसा गेला कि भूक पेटते, शत्रूंचे वैरभाव उफाळून येतात. अशा रितीने आपले कोठे कांही उणे असेल तर त्याचा फायदा घेऊन पुष्कळजण आपल्यावर संकटाचा मारा करतात.
[*] ’महाजनोः येन गतः सः पन्थः’ या वचनाच्या पूर्ण सुभाषिताचा शोध चालू आहे. पण या वचनाचा समजून घेण्याचा अर्थ असा की कर्तृत्ववान थोर लोकांनी पत्करल्या मार्गाने जाणे श्रेयस्कर होय.
[*] उत्सवे व्यसनेचैव दुर्भिक्षे राष्ट्रविप्लवे।
राजद्वारे स्मशानेच यः तिष्ठति सः बान्धवः॥
म्हणजे आनंदोत्सवात वा दुःखात, दुष्काळात वा राष्ट्रावरील आपत्तीत, थोडक्यात राजवाड्यावरच्या वैभवात वा स्मशानातील दु:खातही जो आपल्या मागे ठामपणे उभा राहातो तो आपला खरा बांधव!
पहा सुभाषितांचा खरा अर्थ काय नि शब्दार्थ काय? शिष्यांनी किती वरवर शिकावे? गुरु काय करणार अशांच्यापुढे? तो पराजितच होणार, पण शिकविण्यात अपयशी या अर्थाने!

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[१] http://www.maayboli.com/node/32396
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[२] http://www.maayboli.com/node/32495
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[३] http://www.maayboli.com/node/32548

गुलमोहर: 

दामोदरसुत, किती सुंदर लेखमाला लिहिता आहात. मी आवर्जून वाचते आहे. अर्थं उलगडून दाखवण्याची हातोटी केवळ अप्रतिम.
असेच अजून येऊदेत.

दामोदरसुत,
अत्यंत सुंदर रीतीने आपण संस्कृत सुभाषितांचा अर्थ उलगडून सांगता आहात आणि ती अजरामर असल्यामुळे सद्यस्थितीलाही कशी लागू पडतात तेही खूप चांगल्या प्रकारे दाखवून देत आहात. खरोखर हा आपला उपक्रम नितांत सुंदर आणि स्तुत्य आहे. मी मायबोलीच्या इतर विभागांकडे (विशेषतः गद्य) फारसा फिरकत नसलयामुळे आपली ही लेखमालिका माझ्या वाचनात यापूर्वी आली नव्हती याचा खेद होतोय. आपण माझ्या उपक्रमावरील प्रतिसादामध्ये त्यांचे दुवे दिल्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. आजवरचे सारे भाग बसल्या बैठकीत वाचले. मनापासून आवडले. आपले पुढचे भाग जसजसे प्रकाशित होतील त्या त्या वेळी माझ्या विपुमधे सूचित कराल का म्हणजे यापुढे नियमितपणे आपल्या लिखाणाचा आस्वाद मला घेता येईल. धन्यवाद आणि शुभेच्छाही.
-मुकुंद कर्णिक

-मुकुंद कर्णिक >> हो अगदि . . .

मला सुद्धा हेच खूप आश्च्रय आहे कि एवढा काळ लोटून सुद्धा सगळी वचने खास 'आत्ता' साठी लिहिलियेत असे वाटते ....

पहिले ३ भाग मी लगेच वाचले होते, पण हे नंतरचे भाग वाचनातून कसे सुटले ?
उशीर झालाय, पण आता वाचतेय, हा भाग खूपच छान आहे.