नाते समुद्राशी (भाग ३)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हा लेख मुद्दाम माझ्या वडलांच्या शब्दामधे लिहित आहे. त्यानी सर्व मुद्दे इंग्रजीतून मला कळवले आहेत. मी भाषांतर करून आणि थोडा मालमसाला घालून लिहिलेले आहे. भावनांचा विचार करून काही ठिकाणी नावांचे उल्लेख केलेले नाहीत.
===============================================

ही घटना साधारण वर्षापूर्वीची. आमचं एक जहाज काही अंडर वॉटर रीपेअरसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ड्राय डॉकला गेले होते. म्हणजे जहाज पाण्यात लाँचिंग केलं तरी नंतर कधी कधी काही कामे पुन्हा करावी लागतात, त्यासाठी जहाज ओढून जमिनीवर आणावं लागतं. हा उलटा व्यायाम भयंकर डोकेदुखीचा असतो.

पूर्वी आपल्याकडे ड्राय डॉकचे काम फक्त मुंबई पोर्ट ट्रस्टला व्हायचे. (त्याला पूर्वी बॉम्बे पोर्ट ट्रस्ट बीपीटी म्हणत. मग त्याचे नाव एम बी पी टी असे केले. कारण तेव्हा मद्रास् पोर्ट ट्रास्टला एम पी टी म्हणत, मग त्यानी स्वतःचे नाव चेन्नई पोर्ट ट्रस्ट (सी पी टी )केले, त्यानंतर सीपीटीने (कॅलकटा पोर्ट ट्रस्टने) स्वतःचे नाव कोलकाता पोर्ट ट्रस्ट (के पी टी) केले. अजून बाराखडी शिल्लक असल्याने बर्‍याच पोर्टची नावे बदलत आहेतच) तर हे ड्राय डॉकचे काम झाल्यावर जहाज परत नेऊन भाऊच्या धक्क्याला लावायचे होते. भाऊचा धक्का म्हणजे फेरी व्हार्फ. इथून अजूनही अलिबाग, रेवस, मांडवा, उरणला वगैरे जायला बोटी सुटतात. सकाळी लवकर गेलात तर एकदम ट्रॅडिशनल ड्रेसम्धल्या कोळीणीकडून मासे विकत घेता येतात. तेही एकदम ताजे ताजे.

तर हे जहाज ड्राय डॉकमधूनपरत पाण्यात बाहेर काढल्यानंतर आम्ही सर्वजण भाऊच्या धक्क्याकडे निघत होतो. हे डेड शिप होते. म्हणजे सेल्फ प्रोपेल्ड शिप नव्हते, अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणजे जहाज स्वतःच्या स्वतः कुठेही जाऊ शकत नव्हते. म्हणून या जहाजाला ओढायला एक दुसरा टगमास्टर आणलेला होता. या ओढण्याला टोइंग म्हणतात, नो पार्किंगमधली गाडी कशी ओढून नेतात. अगदी तस्संच दोन भल्या मोठ्या रोप्सच्या सहाय्याने हे प्रचंड धूड ओढून नेतात. फक्त रस्त्यावर नव्हे तर समुद्रामधे. लक्षात घ्या, एक तीन हजार टनाचं जहाज त्यावरची माणसं हे सर्व ओढायचं. ओढणारा स्वत: पाण्यात. ओढून घेणारा पण पाण्यात. फिजिक्स जाणणार्‍याना यामधे असणारी रिस्क व्यवस्थित समजावून सांगता येइल. प्रॅक्टिकली मी काम करताना जहाजाला मिळणार्‍या झटक्यावरून हे टोइंग व्यवस्थित होत आहे की नाही हे सांगू शकतो. त्यामागचे शास्त्रीय कारणं मात्र मला माहित नाहीत.

अर्थात यामधे धोका म्हणजे प्राणघातक वगैरे शक्यतो नसतो. पण तरी दैव कुणाला चुकलेले आहे?

मी या जहाजावर माझ्या काही ज्युनिअर्स सोबत तब्बल चार महिने मुंबईत होतो. आमची सर्वाची रहायची सोय डॉकयार्ड रोडवरच्या एका चांगल्या हॉटेलात केलेली असते. इथे आमच्या कंपनीचे लोक महिनोन्महिने मुक्काम ठोकून असतात. आणि इथला आजूबाजूचा परिसर चांगल्याच परिचयाचा झाला आहे. एका अर्थाने हे आमचं सेकंड होम झालेले आहे, तर माझा एक ज्युनिअर आदल्या दिवशी संध्याकाळी माझ्या रूमवर आला. त्याच्या वडलांचा कर्नाटकातील एका शहरामधे लाकडाचा बिझिनेस होता. मुलगा हुशार म्हणून डिग्री इंजीनीअर झाला. शिक्षणानंतर वडलानी आता तू बिझिनेस सांभाळ असे सांगितले त्यावर तो खूप चिडला. बिझनेसच् करायचा होता तर दहावीनंतर पण केला असता, इतका शिकलो तर त्याचा काहीतरी उपयोग करेन म्हणत तो आमच्या कंपनीमधे नोकरीला आला.

हा ज्युनिअर मला म्हणाला की मी गेल्या कित्येक महिन्यात घरी गेलेलो नाही. मला चार दिवसाची सुट्टी द्या. सुट्टी न देण्यासाठी माझ्याकडे काही विशेष कारण नव्हतं. जहाज भाऊच्या धक्क्यावरून निघून रत्नागिरीला जाणारच होते. त्यादरम्यान तो गावी जाऊन मग परत रत्नागिरीला येऊ शकला असता. त्यामुळे त्याला व्यवस्थित आठ दिवसाची सुट्टी दिली. म्हटलं निवांतपणे जाऊन ये. नंतर आपल्याला परत भरपूर काम आहेच आहे.

दुसर्‍या दिवशी ड्राय डॉकजवळ टोइंगचे काम चालू झाले, तितक्यात एका फेरीमधून हा ज्युनिअर आला. म्हटलं "काय रे? घरी जाणार होतास ना?" तर म्हणाला "ट्रेन दुपारनंतरची आहे. क्रॉफर्ड मार्केटला थोडी खरेदी करेन पण उरलेला वेळ हॉटेलवर बसून काय करू? म्हणून आलो इथे" मग त्याच्या इतर मित्रानी त्याला हॉटेलवर बसून काय काय उद्योग करता येतील किंवा काय काय करावे यावर गमतीजमती चालू केल्या. माझे मात्र तिकडे कुठेच लक्ष नव्हते. टोइन्गचे दोन्ही रोप व्यवस्थित बसले आहेत की नाहीत ते मी स्वत: तपासले आणि बाजूला झालो. दुसर्‍या जहाजाशी माझा संपर्क वॉकीटॉकीवरून चालू होता. आता मोबाईल्स आले आहेत, त्यावरून बोलणे सोपे जाते. या वॉकीटॉकीवरून बोलायचे म्हणजे बेंबीच्या देठापासून कोकलायचे. त्यात परत जहाजावरच्या लोकांची भाषा म्हणजे काय. अतिशय शिव्यासपंन्न. आम्ही ए बी सी डी शिकतच नाही. डायरेक्ट एफ पासून सुरूवात करतो. मराठी मीडीयमवाले भ पासून.

तर माझा हा आरडाओरडा चालू झाला होता, तरी त्यातही मी माझे सर्व ज्युनिअर्स (इंजीनीअर्स पण आणि इतर क्रूदेखील) कुठे आहेत ते पाहून घेतले. "रस्सीच्या आसपास कुणीसुद्धा थांबू नका" हे चारपाचदा ओरडून सांगितले. टोईंगला सुरूवात झाली. अर्थात काहीतरी गडबड झाली आणि आमचे जहाज पूर्णपणे साठ अंशात फिरले. ते इतक्या फोर्सने फिरले की त्याबरोबर जहाज खेचणारी ती भली मोठी रस्सी तुटली. मी ज्या ठिकाणी उभा होतो तिथून पुढे फॉरवर्डकडे धावलो. नक्की काय घडले याचा अंदाज घेण्यासाठी. मात्र धावताना मी कमरेमधे वाकलो होतो. कारण रस्सी जोरात भिरभिरत आली असती असा अंदाज मला आला.

इतक्यात हा सुट्टी घेतलेला ज्युनिअर धावत माझ्या पाठून आला. त्याला वाटले की मला रस्सी लागली, आणि मी जिथे उभा होतो, तिथेच तो बरोबर आला.... आणि रस्सी जोरात येऊन त्याच्या छातीवर बसली. चोवीस्-पंचवीस वर्षाचा तो तरूण... जागच्याजागी कोसळला. एव्हाना सर्वाना अंदाज आलाच होता. काहीतरी भयानक घडले आहे याचा. मी वॉकीटॉकीवरून जहाज थांबवायला सांगितले. सर्वानी आधी त्याला उचलून घेतले. खूप उशीर झालाय हे माहित होतं तरीपण ताबडतोब त्याला फेरीमधून किनार्‍यावर आणले. गाडीत घातले आणि जेजे हॉस्पिटलला नेले. हे सर्व मी आता सांगतोय हे खरं, मात्र त्यावेळेला मी पूर्णपणे हतबुद्ध झालो होतो, मृत्यू बघण्याची ही माझ्या आयुष्यातली काही पहिलीच वेळ नाही, अपघात बघण्याचीपण की पहिली वेळ नाही. पण तरी मी सर्द झालो होतो. अवघ्या काही सेकंदात घडलेला हा खेळ. का घडला?

तो गावी जाणार होता, तसा त्याने घरी फोन पण केला होता. त्याच्या घरचे त्याची वाट बघत असतील. कदाचित त्याच्या आईने त्याच्यासाठी काहीतरी गोडाधोडाचे आवडीचे केले असेल. आता त्याना मी काय उत्तर देणार? मी या जहाजासाठी जबाबदार होतो. हे सगळे ज्युनिअर्स माझ्यावर विश्वास टाकून रात्री-अपरात्री काम करत होते. सगळ्यानाच घरी जायचं होतं. सर्वानाच घर होतं. घरातले होते. त्याच्यासारखेच. तो तर आईवडलांचा एकुलता एक मुलगा. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला. फक्त मला स्वतःच्या जबाबदारीवर रहायला शिकायचय म्हणून इतक्या लांब आलेला. एकटा रूम करून, खाणावळीचे जेवत आनंदाने जगणारा. त्याचं जगणंच संपून गेलं. का आला तो आज जहाजावर? सुट्टी घेतली होती ना? मग तरी का आला? कुणी बोलावलं तिथे त्याला? आणि जेव्हा रस्सी तुटली तेव्हा काय गरज होती त्याला माझ्यापाठून धावायची? माझं काही बरं वाईट झालं असतं तर.......

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, ही म्हण माझ्याबाबतीत कित्येकदा खरी ठरली आहे. पण आज माझी नाही तर दुसर्‍या कुणाची तरी वेळ आली होती...

जेजेला आम्ही पोचलो तिथे पोलिसानी त्रास द्यायला सुरूवात केली. मी धक्क्यावरूनच डायरेक्टरना फोन केलेला होता. ते पण तिथे ताबडतोब पोचले. त्यानी पुढील कार्यवाहीला सुरूवात केली. त्यांच्या येण्यामुळे सर्व ऑफीशीअल जबाबदारी त्यांच्याकडे गेली होती. तरी माझ्या मनावर आलेले ओझे अद्याप उतरलेले नाही.

हा प्रसंग आठवला तरी मला कसेतरी होते. ज्या ठिकाणी मी पाच सेकंदापूर्वी उभा होत्तो तिथेच नेमका तो आला, त्याच्याऐवजी त्या दिवशी माझं नाव असतं तर... माझ्यामागे कॉलेजात शिकणारी एक मुलगी, एक शाळकरी मुलगा आणि एक बायको. त्यांचं काय झालं असतं?

मी नंतर कधीच त्याच्या घरी जाऊ शकलो नाही. आपला तरूण मुलगा गमावण्याचं दु:ख सोसलेल्या आईवडलांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याइतकी हिंमत माझ्यात नाही.

हे असं व्हायला नको हवं होतं. पण घडलं होतं हे मात्र खरं.

आयुष्यातले काही क्षण घडूच नयेत असं वाटतं. त्यातलेच हे काही क्षण.

विषय: 
प्रकार: 

छान लेख!

मृत्यु कसा त्याचे सावज नेमक्या वेळेला नेमक्या ठिकाणी ओढुन नेतो, याचा त्याने प्रत्यय दिला.

नंदिनी
बापरे .. Sad
खरच , काळ आला होता ...पण वेळ , ती पण ठरलेली असते बहुतेक .
नेमका त्याचवेळी तो तिथे पोचणे ..नियतीचाच खेळ .
असेच का घडावे? आपल्याकडे उत्तरच नसते.

मृत्यु कसा त्याचे सावज नेमक्या वेळेला नेमक्या ठिकाणी ओढुन नेतो, याचा त्याने प्रत्यय दिला.> +१.

>>मृत्यु कसा त्याचे सावज नेमक्या वेळेला नेमक्या ठिकाणी ओढुन नेतो, याचा त्याने प्रत्यय दिला.<<

अशीच घटना कनेरी द्विपसमुहामधील टेनरिफ बेटावर झालेल्या विमान अपघातात घडली होती. KLM 4805 ह्या डच विमानातील चार प्रवाशी विमानतळावर मागे राहीले होते. KLM च्या क्रु ने त्यांना विमानतळावरून शोधुन आणून पुन्हा विमानात बसवले. आणि नंतर रनवेवर PANAM 1736 ह्या अमेरिकन कंपनीच्या विमाना बरोबर झालेल्या समोरासमोरील टकरीत सर्वच्या सर्व २८२ प्रवाशी मृत्युमुखी पडले होते. अर्थात फक्त KLM विमानातील. PANAM चा आकडा वेगळा आहे.

बापरे! Uhoh

दिमाखात पहिल्याच सफरीवर निघालेल्या 'टायटॅनिक"च्या शोकांतिकेसारखीच या बाणेदार युवकाची ही शोकांतिका !! Sad

कोणाची घटका केव्हा भरेल ते सांगता येत नाही! Sad

मी शाळेत असतांनाची गोष्ट आहे. आमच्या एक इयत्ता वरचा वर्ग (ठाण्याजवळच्या) येऊरला डोंगरावर वर्षासहलीला गेला होता. महापालिकेच्या परिवहनसेवेने जाण्याचे सगळ्यांचे ठरले होते. उशीरा आल्याने एका मुलाची बस चुकली. तर त्याने रिक्षा केली आणि वर्गबंधूंना येऊरच्या पायथ्याशी गाठले. सर्वजण पुढे धबधब्यावर गेले. तो खतरनाक म्हणून बदनाम होता. जमेल तेव्हढी काळजी घेऊन लोक मजा लुटत होते. काय झाले कोणास ठाऊक, पण या मुलाचा पाय धबधब्याखालच्या डोहातल्या कपारीत सापडला. आणि तो भीतीच्या धक्क्याने मरण पावला. शिक्षकांच्या काळजाचे पाणीपाणी झाले. हे सारे घडले सकाळी १००० च्या आत. मात्र त्याचं प्रेत वर काढायला अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले इतका तो डोह (किंवा ती कपार) खोल होता. त्यामुळे मृतदेह रात्री उशीरा हाती आला. विच्छेदन केल्यावर फुफ्फुसांत पाणी सापडलं नाही. तेव्हा कळलं की तो भीतीने गतप्राण झाला ते.
Sad

सर्वाना धन्यवाद.

या पुढचा लेख तयार आहे. आजा उद्या प्रकाशित करेन. तो लेख इतक्या दु:खद अनुभवाबद्दल नाही.

अवघ्या काही सेकंदात घडलेला हा खेळ.

>> खरय... १ क्षण पुरे असतो आणि चूक होऊन बसते.. Sad मी गेल्या ५ वर्षात काही अपघात पाहिले आहेत. आणि १ मृत्यू देखील पाहिला जवळून.. Sad