डिलीव्हरीसाठी माहेरी जातानाचे क्षण
पाचव्या महिन्यामध्ये निघाली होती ती पित्याघरी
आले होते पिता-माता तिला नेण्यास माहेरी
तिला अवघड ते झालेले, मला सोडून जाण्याचे
राहिले भानही नव्हते काही खाण्याचे पिण्याचे
कधीपासुन बसुन गाडीत पाहती वाट तिची सारी
आले होते पिता-माता तिला नेण्यास माहेरी
*
पहाटे पाचपासूनी तशी जागीच ती होती
कुशीवर या, कुशीवर त्या सारखी होती पालटती
आताही आवरुनी सामान झाली तयार जाण्यास
निघत नव्हता तिचा पाय घराबाहेर निघण्यास
बोलवत होते सर्व ये मुली तू लौकर बाहेरी
आले होते पिता-माता तिला नेण्यास माहेरी
*
मघापासून स्वच्छ केले खूप वेळा ते फर्निचर
स्पर्श मायेने करुनि ठेविली कड-धान्ये जागेवर
नकळत माझ्या ती जाऊन आली दारा-खिडक्यांशी
हात हळुवार फिरवत राहिली त्या सुंदर पडद्यांवर
फेरी मग कितिकदा झाली भेटण्याला शेजारी
आले होते पिता-माता तिला नेण्यास माहेरी
*
कितीतरी जोडली नाती तिने होती या वर्षभरात
जरी निर्जीव नाती ती तरी होती अंत:करणात
तिच्या जाण्याने माझ्याही मनाला कंप सुटलेला
जरी मी एकटा तरी मी ठेविले होते तिजला हृदयात
सहज सहवेदना होती सतत त्या हृदय मंदिरी
आले होते पिता-माता तिला नेण्यास माहेरी
*
पुन:पुन्हा स्पर्शुनी अन ठेवूनी निर्जीव पिशव्यांना
नमस्कारे वंदुनीया देव्हा-यातील देवांना
अखेरीस मलूल ती येउन बसली गाडीत जाण्याला
उघडला आता मजसाठी तिने सुचनांचाही खजिना
सुरू झाली मग ती गाडी आता जाण्या दूरवरी
आले होते पिता-माता तिला नेण्यास माहेरी
*
मी हिरमुसलो तिने की स्पर्शिले त्या निर्जीव वस्तूना
मात्र माझ्या नशिबी आल्या त्या केवळ शिस्तीच्या सूचना
आत जाउन बसलो मी खट्टू मग माझ्या कोचवरी
अचानक ऐकला आवाज आली गाडी माघारी
धावतच आली प्रिय पत्नी माझी मग उतरून गाडीतून
बाहूपाशी बद्ध झाली गळा आला होता दाटून
म्हणाली ’येते मी लौकर घेउनी तुमच्या बाळाला’
आणि मग मुक्त झाले हुंदके जे बसलेले हट्टून
बरसल्या नेत्रांतुन वेगाने एकामागून एक सरी
आले होते पिता-माता तिला नेण्यास माहेरी
*
माझिया बागेतील हिरवळ अधिकच गर्द मज वाटे
फूल तर एकच फुललेले तरी दरवळ कशी दाटे
ती होती कोण असली जादु भरली किमया करणारी
आले होते पिता-माता जिला नेण्यास माहेरी
डिलीव्हरीसाठी माहेरी जातानाचे क्षण
Submitted by pradyumnasantu on 22 January, 2012 - 02:45
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मनात उचंबळून आलेल्या भावना
मनात उचंबळून आलेल्या भावना अगदी मनापासून मांडल्या आहेत.
फारच भावनिक कविता आहे. पण
फारच भावनिक कविता आहे.
पण काय, पेढे की बर्फी देणार?
सुरेख आणि भावपूर्ण कविता.
सुरेख आणि भावपूर्ण कविता.
पहिले बाळंतपण, घरी वडीलधारे
पहिले बाळंतपण, घरी वडीलधारे कोणी नसताना एकट्याने राहिलेली जोडी सर्वच बाबतीत अनभिज्ञ असते. एखाद्या मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जाण्याइतकीच भितीही मनात दाटलेली असते. बाळासह सुखरूप परत येइन ना? गेल्या वर्षभरात मी ज्यांच्याशी ममत्व केले ते माझे एकाकीपणातील सौंगडी घरातील देव, देवता, धान्य-धुन्य, वस्तू, बागेतील फुले, झाडे, मीच शिवलेले दारांचे पडदे, हे सर्व मला परत भेटतील ना? पुन्हापुन्हा त्यांना स्पर्शून ती ही मायाच दाखवून देते. या प्रश्नांनी ती हैराण व व्याकुळ होते. इतकी की क्षणभर पतीचा निरोप घेण्याचाही विसर पडतो. परत गाडी वळवायला लावून ती त्याच्याकडे येते. आणि मग खट्टू झालेल्या हळव्या पतीच्याही चित्तवृत्ती उचंबळून येतात. बागेत एकच फूल राहिले आहे,(दुसरे आता माहेरी निघाले आहे) असे असतानाही सुगंध दाटून येतो. तुमच्या बाळाला सुखरूप घेउन येइन या सांगण्याने तो पूर्णतः आश्वासित होतो.
अशा प्रसंगी भावनाशील होणे साहजिकच नाही का?
उल्हासजी, एम्.कर्णिक,
उल्हासजी, एम्.कर्णिक, पाषाणभेदजी आभार.
पाषाणभेदजी: जमल्यास पेढेबर्फी.
मी हिरमुसलो तिने की स्पर्शिले
मी हिरमुसलो तिने की स्पर्शिले त्या निर्जीव वस्तूना
मात्र माझ्या नशिबी आल्या त्या केवळ शिस्तीच्या सूचना>>>>>या वाक्याने मन गलबललं.
आत जाउन बसलो मी खट्टू मग माझ्या कोचवरी
अचानक ऐकला आवाज आली गाडी माघारी
धावतच आली प्रिय पत्नी माझी मग उतरून गाडीतून
बाहूपाशी बद्ध झाली गळा आला होता दाटून
म्हणाली ’येते मी लौकर घेउनी तुमच्या बाळाला’>>>>बरं वाटलं
आणि मग मुक्त झाले हुंदके जे बसलेले हट्टून
बरसल्या नेत्रांतुन वेगाने एकामागून एक सरी
आले होते पिता-माता तिला नेण्यास माहेरी<<<<<<<<<<<<सुंदर कविता.
सर्व विषय संपंन्न कविराजांस मानाचा मुजरा!!!!
विभाग्रजजी: आपभी कमाल करते
विभाग्रजजी: आपभी कमाल करते है. मुजरा तर तुमच्यासारख्या रसिकराजाला करायला हवा. तो मी करीत आहे.
खूप छान आहे. बेस्ट लक फ्रॉम
खूप छान आहे. बेस्ट लक फ्रॉम मामी आजी
कविता वाचतानाच मन हळवं
कविता वाचतानाच मन हळवं होतं.प्रतिसाद काय देउ?पामराचं तुमच्या चरणी वंदन.
आवडली
आवडली
तुमच्या भावना फार प्रामाणिक
तुमच्या भावना फार प्रामाणिक आहेत.
सुंदरच....
सुंदरच....
अश्विनीमामी, फालकोर, वर्षा_म,
अश्विनीमामी, फालकोर, वर्षा_म, डॉ. कैलास, श्रध्दादिनेश प्रेमळ प्रतिसाद पोचले. मनःपूर्वक आभार.,
आवडली !
आवडली !
आवडली
आवडली
आवडली!!!अत्यंत सुन्दर...
आवडली!!!अत्यंत सुन्दर...
बाळंतपणासाठी जात असणार्या
बाळंतपणासाठी जात असणार्या पत्नीच्या मनाची होणारी घालमेल, पत्नीच्या दुराव्याने पतीला आलेला हळवेपणा,कवितेत ह्या भावना खूप छान व्यक्त झाल्या आहेत.
पेढा किंवा बर्फी. दोन्हीचाही गोडवा सुखदच नाही का?.
कित्ति सुंदर लिहिलय!!मला
कित्ति सुंदर लिहिलय!!मला माझ्या वेळचा प्रत्येक क्षण आठवला!!खूप छान!!
प्रतिसादांतून रसिकांना ही
प्रतिसादांतून रसिकांना ही कविता किती आवडली ते कळले. आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम.
खुप छान
खुप छान