माझी परदेशवारी

Submitted by प्रदीप वैद्य . on 5 January, 2012 - 13:02

II श्री II
माझी परदेशवारी
प्रत्येक माणसाच्या मनात एकदा तरी परदेशवारी व्हावी असा विचार येत असतो. जरी पुर्वीच्या काळापेक्षा आता परदेशी जाण सोपं झाले आहे ,तरीही अजूनही बहुसंख्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं आहे.
मध्य-पूर्व आशियातील सिंगापूर आणि मलेशिया या दोन देशांच्या भेटीचा योग नुकताच आला. परदेशवारीसाठी लागणाऱ्या बाबींमध्ये मुख्य कागदपत्रे म्हणजे ..पारपत्र (पासपोर्ट )आणि दुसरं म्हणजे ज्या देशात जायचे आहे त्या देशात प्रवेश करण्याची परवानगी (विसा ).त्या देशांमध्ये टुरिस्टना प्राधान्य असल्याने त्या देशांचा विसा मिळण्यास तशी काहीच अडचण पडत नाही. विमानाचे जाण्या-येण्याचे तिकीट , पासपोर्टची कॉपी ,पांढऱ्या पार्श्वभूमीवर ८०% चेहरा दिसणारे फोटोग्राफ्स व अलीकडील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट एवढया कागदपत्रांसह विसा ची फी भरल्यानंतर एक आठवड्याच्या आत विसा मिळतो.
आपल्या भारतासारखेच हवामान असल्याने विशेष अशी काही तयारी करण्याची आवश्यकता नाही.होता होईतो तिकडे आपल्या नेहमी वापरातल्या गोष्टींची खरेदी करायला लागणार नाही एव्हढीच काळजी घ्यायची ..कारण सिंगापूर तसं महागड शहर आहे.आणि खरेदी त्याचं चलन म्हणजे सिंगापूर डॉलर मध्ये (सध्याचा सरासरी दर रु.४०.५० = १ सिंगापूर डॉलर) करावयची असते.
मुंबई- सिंगापूर या जेट ऐअरवेजच्या विमानाने मध्यरात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्टीय विमानतळावरुन उड्डाण केल्यावर ५ १/२ तासांच्या प्रवासानंतर सकाळी ८.३०(सिंगापूर वेळेनुसार) च्या सुमारास सिंगापूरच्या ‘चांगी’ या आंतरराष्टीय विमानतळावर उतरलो.भारतीय प्रमाणवेळ(IST) आणि सिंगापूर वेळ यामध्ये अडीच तासांचे अंतर आहे. ‘चांगी’ विमानतळावर उतरल्या उतरल्या जी गोष्ट जाणवली ती म्हणजे येथील टापटीप आणि कमालीची स्वच्छता... विमानतळावर सहल कंपनीचा माणूस गाडी घेऊन आला होता. त्याच्याबरोबर हॉटेलवर पोहोचलो ,हॉटेल येथील ‘लिटिलइंडिया ‘ या परिसरात होतं.
सहलीच्या पहिल्या दिवशी दुपारच्या वेळेला सिटी टूरचा कार्यक्रम होता, त्यानुसार दुपारी ३ च्या सुमारास स्थळ दर्शनासाठी बाहेर पडलो. दूरवर पसरलेले रस्त्यांचे जाळे,बाजूला उंच च उंच इमारती आणि जिथे इमारती नसतील तिथे व्यवस्थित झाडी ,अश्या मार्गाने सिंगापूरच्या ,(आपल्या गेटवे परिसरासारखा असलेला भाग) ,मर्लिन बे वर येऊन पोहोचलो.येथे सतत तोंडातून पाणी पडणाऱ्या सिंहाचे तोंड आणि शरीर माश्याचे असलेल्या मर्लिन या प्राण्याची प्रतिकृती होती.ह्या परिसरात प्रवासी लोकांचा वावर होता.मोठमोठ्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर,तर कधी समुद्राच्या ,तर कधी मर्लिन या प्राण्याच्या प्रतिकृतीच्या जवळपास वेगवेगळ्या अंगलस् मधून फोटो काढण्याची अहमिका लागली होती. तिथूनच जवळ ‘सिंगापूर आय’ नावाचं एक मोठठ्या गोलाकार आकाराच असं पाळणा चक्र होतं. प्रत्येक वातानुकूलित पाळण्यात साधारण २० माणसे बसू शकतील,वावरू शकतील एव्हढीजागा होती .त्यातून फिरताना पूर्ण सिंगापूर शहराचे दर्शन होत् होते. एका बाजूला अथांग पसरलेला समुद्र ,त्यात नांगरून पडलेली मोठमोठी जहाजे, तर दुसऱ्या बाजूला उंच च उंच नेटक्या इमारती,हिरवीगार झाडी...सुबक आणि सुंदर शहराचे नयनरम्य दर्शन घेत असताना अर्ध्या तासांची फेरी केंव्हा पूर्ण झाली हे कळलेच नाही.
रस्त्यांवर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक नवनवीन मॉडेलच्या गाड्या होत्या. सिग्नलला गाडी उभी करतांना दोन गाडयांमध्ये कमीत कमी ६ फूटाचे अंतर राहिल याची काळजी काटेकोरपणे घेतली जात होती. सिंगापूर हे बंदराचे व्यापारी शहर आहे. त्यामुळे जगातील मोठ्या बँकांची कार्यालये ,शिपिंग कंपन्यांची कार्यालये,इम्पोर्ट /एक्स्पोर्ट धंद्यांची कार्यालये आहेत. पूर्ण शहरातही कमालीची स्वच्छता जाणवत होती. सर्व कसं निट नेटके आणि आखीव रेखीव होतं....सहलीबरोबारच्या सिटी टूर वरून परतल्यावर ,जेवायला आणखी दोन तास अवकाश असल्याने आपले आपण सिंगापूरमधील एखादं स्थळ पहावं असं मनात आल्यावरून तेथील सुप्रसिद्ध पाण्याचे कारंजे, जें ओर्चीड रोडवर होते तिकडे निघालो. सिंगापूरमधील मेट्रोचा ..खरतरं मेट्रोच्या पहिल्या प्रवासाचा, अनुभव घेत त्या कारंज्याजवळ पोहोचलो.त्या परिसरात अर्धा तास थांबून कॅबने हॉटेलवर आलो.
दुसऱ्या दिवशी नाश्त्या नंतर ९ वाजता सिंगापूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या जुरांग बर्ड पार्कला भेट देण्यासाठी निघालो . औद्योगिक वसाहत असूनही कुठेही प्रदूषणाचा मागमूस नव्हता.जुरांग बर्ड पार्कमध्ये विविध रंगांच्या /प्रकारच्या पक्षांची रेलचेल होती.बरेचसे पक्षी पिंजऱ्यात नव्हते ,तर मोकळेपणाने आपल्या जवळपास उडत होते.तेथील अम्पीथियेटर मध्ये पक्षांचा एक छानसा कार्यक्रम आयोजित होता...तो अनुभव निश्चितच वेगळा असा होता. त्याच दिवशी दुपारी ‘सेंटोसा’ या स्वप्ननगरीला भेट होती. सेंटोसा मध्ये Images of Singapore या नावाचे प्रदर्शन वजा दालन होते. तिथे सिंगापूरच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या परिस्थितीचा आढावा होता, सिंगापूरच्या संस्कृतीचे दर्शन होते. तिथेच UNDER WATER WORLD चे मोठ्ठे दालन होते. विविध रंगांचे /प्रकारचे मासे,समुद्रप्राणी मोठमोठ्या काचेच्या गोलाकार खोल्यांमध्ये फिरत होते. त्याच दिवशी संध्याकाळी मुख्य कार्यक्रम म्हणजे ‘SONG OF THE SEA’…समुद्र किनाऱ्यावर प्रकाश आणि ध्वनी यांच्या तालावर वेगवेगळया पद्धतीने उडणाऱ्या पाण्याच्या फवारया द्वारे गोष्टीरूप कथन अश्या स्वरूपाचा शो होता. अतिशय नेत्रसुखद आणि विलोभनीय असा अनुभव होता.
तिसरा दिवस हा UNIVERSAL STUDIO च्या भेटीसाठी राखून ठेवला होता.सकाळी १० वाजता स्टुडीओकडे प्रयाण केले. अलीकडच्याच काळात स्थापन झालेल्या आणि अजूनही काम चालू असलेल्या स्टुडीओचे आवर खुपच भव्य होते.तिथेच सिंगापूरमधील कसिनो असल्याने गाड्या व बसेसची वर्दळ होती.पार्किंग साठी एव्हढी जागा आणि सोय मी आतापर्यंत पाहिलीच नव्हती.पाश्चात्य संस्कुतीशी जवळीक असलेले.सामिष आहाराचे विविध पर्याय उपलब्ध,मनोरंजनाचे व धाडसी खेळांचे विविध प्रकार असलेल्या
युनिव्हर्रसल स्टुडीओची सैर करतांना वेळ कधी संपला हे कळलेच नाही.परततांना सिंगापूरच्या कसिनो मध्ये शिरून आलो. तेथील वातावरण एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखं होतं .
सिंगापूर शहराचे/देशाचे वैशिष्ट्य म्हणजे लांबीत सुमारे ४६ कि.मी. व रुंदीत २३ कि.मी एव्हढेच क्षेत्रफळ असलेला चिमुकला देश आहे.स्वतःचे असे शेतीमालाचे काहीही उत्पादन नाही. परंतु जागतिक नकाश्यावर असलेल्या त्याच्या मध्यवर्ती स्थानामुळे हे बंदर अतिशय भरभराटीला आले आहे...आणि आंतरराष्टीय आर्थिक व्यवहारांच्या उलाढालीत वरच्या नंबरवर असणारे आहे. भ्रष्टाचाराचे अत्यल्प प्रमाण,तेथील लोकांची उद्यमशीलता आणि देशाविषयी अभिमान व समर्पणाची भावना यामुळेच सिंगापूर सारखे शहर जागतिक स्तरावर डौलाने मिरवत आहे.....
चौथ्या दिवशी सिंगापूरहून मलेशियाला बसमार्गाने जाण्यास निघालो. मलेशिया देशात प्रवेश करायच्यावेळी इमिग्रेशनचे सर्व सोपस्कार पार पाडून ३५० कि.मी.चा प्रवास ५ तासात पुरा करून मलेशियाच्या राजधानीच्या शहरात ‘कौलालंपूर’ येथे दाखल झालो. वाटेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाम तसेच सागाची हिरवीगार झाडी होती. तेथील भारतीय उपहारगृहात दुपारचे जेवण करून लगेचच ‘जेंटींग हायलंड’ कडे रवाना झालो.
‘जेंटींग हायलंड’ हे आपल्याकडील महाबळेश्वर एव्हढे उंचीवर आहे. परंतु अतिशय दाट आणि गर्द झाडीमुळे हवामान थंड आहे. ह्या हायलंडच वैशिष्ठ्य म्हणजे हा पूर्ण परिसर एकट्याच्या खाजगी मालकीचा आहे. आणि येथे मनोरंजनाची आणि सुखोपभोगाची असंख्य साधने उपलब्ध आहेत. आमचा मुक्काम ‘फर्स्ट वर्ल्ड हॉटेल ‘या जगप्रसिद्ध हॉटेलमध्ये,जें सर्वात जास्त म्हणजे ६११८ खोल्या (रुम्स) असलेलं हॉटेल आहे, त्या हॉटेलातील २४ व्या मजल्यावरील खोलीत एक दिवसाचं वास्तव्य होतं. ह्या हॉटेलमधील प्रत्येक गोष्ट भव्य होती.येथील Dining Hall एव्हढा मोठा होता कि एकावेळी २/२I हजार लोकं सहजपणे बसून जेवण करू शकतील. व्हेज /नॉनव्हेज (जरा जास्तच व्हरायटी ) खाद्यपदार्थांची नुसती रेलचेल होती.
त्यादिवशी रात्री येथील कसिनो ला भेट दिली.२१ वर्षावरील व्यक्तीस प्रवेश ,फक्त फॉर्मल ड्रेसकोड आवश्यक. आम्ही त्यांच्या दृष्टीने परदेशी असल्याने आम्हाला निशुल्क प्रवेश होता..१० रिंगीट (मलेशियन चलन )पासून स्टेकची सुरवात होती. जुगाराचे विविध प्रकार उपलब्ध होते. वेगवेगळ्या जाती/धर्माची/वयाची माणसं होती.बायकांची संख्या पुरुषान इतकीच होती. दोन तास जुगारखान्यात घालवून १०० रिंगीटची कमाई..? करूनच मध्यरात्री रुमवर परतलो.
नंतरच्या दिवशी हॉटेल परिसरात असलेल्या Indoor Theme Park आणि Outdoor Theme Park मध्ये पूर्ण दिवस घालवला. विविध प्रकारचे खेळ.संथ पाण्यातील मोटर राईड, उंच जायंट व्हील ,फिरणांरे चक्र/पाळणे अश्या प्रकारांचा मनसोक्त आनंद घेऊन कौलालंपूरकडे रवाना झालो. जेंटींग हायलंड’मधील एक दिवसाचे वास्तव्य म्हणजे अक्षरशः पृथ्वीतलावरील स्वर्गीय आनंद होता.
वाटेमध्ये थोडा प्रवास रोप वे मार्गाने होता.गर्द हिरव्या दाट झाडीवरून बंद पाळण्यातून (गोंडोला ) केलेला प्रवास कधी कधी जीव मुठीत धरायला लावणारा, पण थ्रिलिंग वाटणारा होता.
संध्याकाळी कौलालंपूरला पोहोचलो.तेथील मे-फेअर या २८ मजली अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था होती.या हॉटेलमधील २७ व्या मजल्यावर आमची खोली होती,जी सर्व सोयींनी परिपूर्ण होती.हॉटेलच्या ८ व्या मजल्यावर पोहण्याचा तलाव होता,मात्र त्याचं वापर करण्याचा योग आला नाही.
नंतरच्या दिवशी सिटी दर्शनाचा कार्यक्रम होता.शाही नास्ता करून सर्वप्रथम जवळच असलेल्या बाटू केव्हस ला गेलो.सुमारे ३५० पायऱ्या चढून वरती गेलो .जुन्या काळातील नैसर्गिक गुहा असून येथे कार्तिकेयनाची सर्वात उंच मूर्ती/पुतळा आहे. तिथूनच वाटेत सुलतानाचा प्रासाद बाहेरूनच बघायला मिळाला.नंतर येथील Independence Square—मेर्डेका स्क्वेअर ला भेट दिली.याचं एक वैशिष्ट्य म्हणजे जो ध्वजस्तंभ (Flag Post) हा अतिशय उंच आहे. शहरातून फिरताना उत्तुंग आणि गगनचुंबी इमारतींचे दर्शन होत होते.तिकडूनच के एल टॉवर ला गेलो,जो ४२१ मीटर उंचीचा जगातील चौथ्या क्रमांकाचा दूरसंचार टॉवर आहे.त्या टॉवरवर अर्ध्याहून अधिक उंचीवर असलेली Viewing Gallery आहे.म्हणजे सुमारे २५० मीटर उंचीवर असलेल्या या Gallery मध्ये लिफ्टने एक मिनिटात पोहोचता येते. तिथून कौलालंपूर शहराचे पूर्ण,नयनरम्य आणि विहंगम दृश्य पाहायला मिळाले.
मलेशिया वरही इंग्रजांनी राज्य केले...त्यामुळे ब्रिटीश कालीन विशिष्ठ प्रकारच्या मोठ् मोठ्या इमारती आहेत ,ज्या अजूनही दिमाखाने मिरवीत आहेत. मलेशियाची मुख्य ताकद म्हणजे त्याच्या जवळील पेट्रोलियमचा साठा, दुसरं म्हणजे पामोलीन तेलाचे उत्पादन .जागतिक स्तरावर पामोलीन तेलाच्या निर्यातीमध्ये मलेशियाचा पहिला नंबर लागतो.तसेच विपुल प्रमाणात असल्रेली जंगलसंपत्ती हीही तेथील मोठी ताकद आहे. येथे लोकशाही पद्धतीची राजवट असून देशाचा प्रमुख सुलतान (आपल्याकडील राष्ट्रपती पद )असून त्याची निवड ५ वर्षांकरता केली जाते.
त्याच दिवशी रात्री मलेशियाची शान येथील ट्वीन टॉवर (पेट्रो-नास) ला भेट दिली. ८८ मजली बाजू बाजूला असलेले ट्वीन टॉवर आता जगातील १ नंबरचे ट्वीन टॉवर्स आहेत.याचा बाहेरील भाग पूर्णपणे स्टीलचा असून त्याची पुसापूस व सफाई रोज होत असते. त्यामुळे रात्रीच्या लाइट्स मधे तो नुसता लखलखत असतो. टॉवरच्या खाली १० मजले पार्किंगसाठी असून पहिल्या ६ मजल्यांवर भली मोठी डिपार्टमेंट स्टोअर्स आहेत.

मलेशिया मुस्लीम देश असूनही त्यावर युरोपियन पद्धतीचा प्रभाव जाणवतो. येथे साप्ताहिक सुट्टी शुक्रवारी नसून पाच दिवसांचा आठवडा आहे. बऱ्याच ठिकाणी मुली/स्त्रिया नोकरी करताना आढळतात.
नंतरच्या दिवस सकाळी आराम करून, थोडा बाजारात फेर फटका मारून घालवला. संध्याकाळी कौलालंपूरच्या विमानतळाकडे रवाना झालो. आणि रात्रीच्या विमानाने चेन्नईला प्रयाण केले.

गुलमोहर: