पहाडी आलू

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 6 December, 2011 - 05:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उकडलेले बटाटे - मध्यम आकाराचे २ ते ३
भाजलेले पांढरे तीळ - १ टेबलस्पून
चवीप्रमाणे मीठ, तिखट, लिंबाचा रस

फोडणीसाठी

तेल - एक ते दीड टीस्पून
हळद, हिंग, मोहरी, कढीपत्ता, मिरच्या, मेथीदाणे

सजावटीसाठी

धुवून चिरलेली कोथिंबीर (थाईम हर्ब असल्यास कोथिंबिरीऐवजी वापरू शकता)

क्रमवार पाककृती: 

उकडलेल्या बटाट्यांच्या साली काढून त्यांचे चौकोनी काप करावेत व एका मोठ्या भांड्यात ते काढून घ्यावेत. तीळ भरडून त्यावर घालावेत. चवीप्रमाणे मीठ, तिखट, लिंबाचा रस घालून ते मिश्रण बटाट्यांना एकसारखे लागेल असे मिसळावे.

फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी तडतडल्यावर हिंग, मेथीदाणे (जास्त नकोत), हळद, मिरचीचे तुकडे घालावेत व लगेच गॅस बंद करून कढीपत्ता घालावा. ही फोडणी बटाट्यांवर ओतावी व हलक्या हाताने नीट मिसळावी. वरून कोथिंबीर पेरावी. पहाडी आलू तयार!

वाढणी/प्रमाण: 
दोन माणसांसाठी
अधिक टिपा: 

* ही रेसिपी कुमाऊं प्रांतातील आहे, म्हणून नाव 'पहाडी आलू'. Happy

* मूळ पाककृतीत फोडणीत फक्त मेथीदाणे, हळद व मिरची एवढेच पदार्थ होते. मी त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता यांची भर घातली आहे. तसेच मी मोहरीच्या तेलाऐवजी शेंगदाणा तेल वापरले आहे.

* लिंबाच्या रसाऐवजी चिंचेचा कोळ चालेल असेही मूळ पाककृतीत सांगितले आहे.

* नुसते स्नॅक म्हणून किंवा पोळी-भातासोबत तोंडीलावणे म्हणून हा पदार्थ खाता येतो. किंवा ब्रेड / पराठ्यात स्टफिंगप्रमाणे वापरता येतो.

* नेहमीच्या उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसारखीच ही भाजी दिसते, म्हणून वेगळा फोटो दिलेला नाही. मात्र भाजलेले तीळ, मेथीदाणे व वरून घालायच्या फोडणीमुळे वेगळी, खमंग चव येते या भाजीला.

माहितीचा स्रोत: 
आनंदवे संकेतस्थळ व माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आणि सोपी आहे रेसीपी... नक्कीच करून पहायला हवी! या भाजीचं स्टफिंग करून आलू पराठे पण छान होतील... हा ऊगाचचा ज्याला फुकट म्हणतात तो सल्ला Lol

धन्स योगेश, बित्तु, आडो, दक्षिणा, दिनेशदा.

येस आडो, स्टार्टर म्हणून छान होईल हा प्रकार. दक्षिणा, लिंबाच्या रसाचा आंबटपणा पुरतो, पण नुसते स्नॅक म्हणून खाणार असाल तर आमचूर पावडर भुरभुरून आणखी मजा येईल. Happy