जंगल सफारी - क्रुगर नॅशनल पार्क - दक्षिण अफ्रिका - भाग १

Submitted by शापित गंधर्व on 24 November, 2011 - 03:39

दक्षिण अफ्रिकेतील एक नामवंत बँक आमच्या कंपनीची क्लायंट आहे. गेल्या चार वर्षां पासुन आमच्या कंपनीचे ९०-९५ कर्मचारी दक्षिण अफ्रिकेत राहुन या बँकेला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सेवा पुरवतात. जुले॑ २०११ मधे माझी या प्रकल्पावर नियुक्ती झाली आणि मी कुटुंबासह दक्षिण अफ्रिकेत आलो.
आल्या दिवसा पासुन भेटलेला प्रत्येक सहकारी मला एकचं प्रश्न विचारायचा...
काय मग क्रुगरची ट्रिप झाली की नाहि?
नाहि आजुन. इती अस्मादिक
अरे काय हे? साऊथ अफ्रिका आ के क्रुगर नहि देखा तो क्या देखा? हे म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहाल न पहाण्या सारखे आहे. करा करा लवकर करा क्रुगर ची ट्रिप. लाईफटाईम एक्सपिरीन्स आहे तो. मिस नका करु.
थोड्याफार फरकाने साधारण अशीच चर्चा प्रत्येक सहकार्‍याशी व्हायची त्यामुळे क्रुगर बद्दल माझी उत्सुकता फारचं वाढली होती.

३/४ महिने असेचं निघुन गेले. करु करु म्हणत अखेर मागच्या विकांतास तीन दिवसाची क्रुगर ट्रिप करण्याचा योग आला आणि सारे सहकारी याला "लाईफटाईम एक्सपिरीन्स" का म्हणत होते याची प्रचिती आली.

आमच्या या अनोख्या जंगल सफारीचा हा वॄत्तांत.

एकदा जायचं म्हटल्यावर बायकोच्या अंगात एकदम वेगळाच ऊत्साह संचारला. तिने पण तिच्या नविन मे॑त्रींणी कडुन क्रुगर बद्दल बरेच किस्से ऐ॑कले होते. त्यामुळे बाईसाहेब एकदम एक्साइटेड होत्या. रेस्टकँप बुकिंची जबाबदारी तिने स्वातःच्या शिरावर घेतली. गुगलून "साऊथ अफ्रिकन नॅशनल पार्क" चे जोहानसर्ग मधिल ऑफिस शोधुन काढले आणि बुकिंग करुन टाकली. संपुर्ण ट्रिप ३ दिवस आणि २ रात्रिची. १ रात्र स्कुकूझा मधे आणि १ रात्र सतारा मधे.

अरे हो. ते सांगायच राहिलचं. आधी क्रुगर नॅशनल पार्क बद्दल थोडी माहिती देतो म्हणजे स्कुकूझा/सतारा हे काय प्रकरण आहे याची थोडी कल्पना येईल.

१९४८५ वर्ग किलोमीटर ईतके प्रचंड क्षेत्रफळ असलेले क्रुगर नॅशनल पार्क हे दक्षिण अफ्रिकेतील सर्वात मोठे अभयारण्य आहे. अवे॑ध शिकारीला आळा बसावा या उद्देशाने १८९८ मधे "सेबी गेम रिझर्व" ची स्थापना करण्यात आली. १९२६ मधे याचे "क्रुगर नॅशनल पार्क" असे नामांतर करण्यात आले. दक्षिण अफ्रिकेच्या उत्तरपुर्व भागात असलेल्या या नॅशनल पार्कची उत्तर सीमारेषा झिंब्बाब्वे या देशाला तर पुर्व सीमारेषा मोझांबिक या देशाला लागुन आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ९ प्रवेशद्वारांतुन या नॅशनल पार्क मध्ये प्रवेश करता येतो. अभयारण्यात रहायची सोय म्हणुन विवीध ठिकाणी रेस्टकँप ची सोय उपलब्ध आहे. स्कुकूझा आणि सतारा हि त्यापे॑कीच दोन रेस्टकँप ची नावे.

पंढरीची वारी जशी विठ्ठलाच्या दर्शना शिवाय पुर्ण होत नाहि तशीच क्रुगर ची वारी "बिग फाइव्ह" च्या दर्शना शिवाय पुर्ण होत नाहि. सिंह, चित्ता, अफ्रिकन हत्ती, जंगली म्हैस आणि गेंडा (र्‍हायनो) या प्राण्यांचा बिग फाइव्ह मध्ये समावेश होतो. या प्राण्यांना बिग फाइव्ह नाव त्यांच्या आकारामुळे नाही तर ते शिकार करायला सर्वात कठिण आणि धोकादायक प्राणी आहेत म्हणून पडले. म्हणुनचं चित्ता समाविष्ट होतो पण पाणघोडा (हिप्पोपोटोमस) या यादित नाहि.

बिग फाइव्ह चित्र आंतरजालावरुन साभार

गुगल देवाने आणि सहकार्यांनी दिलेल्या महितीच्या आधारे आम्हि (मी, बायको आणि आमचं १० महिन्यांच पिल्लु) आमच्या ट्रिप ची रुपरेषा ठरवली.

१८ नोव्हेंबरला मेलेलेन प्रवेशद्वारातुन पार्क मधे प्रवेश करयचा. दिवसभर पार्कच्या दक्षिण भागात भटकंति. रात्री स्कुकुझा रेस्टकॅंप मधे विश्रांती.
१९ नोव्हेंबरला पहाटेचं भटकंति सुरु करयचि आणि पार्कच्या उत्तर भागा कडे सरकायचं. त्या रात्री सतारा रेस्टकँप मधे विश्रांती.
२० नोव्हेंबरला शक्य तितकी भटकंति आणि मग परतीचा प्रवास.

जोहनसबर्ग ते मेलेलेन प्रवेशद्वार हे एकुण अंतर ४२८ कि.मी. म्हणजे सधारण ६ तासांचा प्रवास. सकाळी ८ वाजता प्रवेश करायचा म्हणजे पहाटे (?) २ वाजता प्रवास सुरु करावा लागणार. खरं तर नवखा देश, अपरिचीत रस्ते आणि सोबत कोण तर बायको आणि १० महिन्याचं पिल्लु या परीस्थीतीत रात्रीचा प्रवास करणे म्हणजे मोठी रीस्क होती. पण इलाज नव्हता. हातात असलेल्या वेळेचा पुरेपुर उपयोग करायचा तर रात्रीचा प्रवास अपरिहार्य होता. समजावुन सांगितल्यावर बायकोला पण ते पटलं.

अखेर ती गूरुवार ची रात्र ऊजाडली (?). आजुबाजूचं जग उत्तर रात्रिची सुखाची झोप चाखत असतांना रात्री सधारण २ वजता मी गाडी चालु केली आणि आम्हि अनोख्या जंगल सफारीला निघालो.

ऑटो टायमर सेट करुन घेतलेलेआमच्या ट्रिपचे पहिले प्रचि

त्या आधी
असु द्या. गरज पडलि तर ऐनवेळी कुठे धावाधाव करणार आहत? जंगलात जातोय आपण हिल स्टेशनला नाहि. आणि पिल्लुला तिन दिवस काय खाऊ घालणार? पिझ्झा की बर्गर? नकोच ते. राहिल पडुन ट्रंक मधे. असे उपदेशाचे डोस पाजत मिक्सर पासुन खोबरं किसणी पर्यंत सगळचं सोबत घेतल बायकोने. इतरवेळी माझ्या पण पोटात काही तरी ढकला म्हणुन रडणारी ती ट्रंक मला तॄप्तीचा ढेकरदेत हसल्या सारखी वाटली.
हे बघा.

दिवसभर ऑफिस, संध्याकाळी शेवटच्या क्षणाची खरेदी आणि मग रात्री समानाची बांधाबांध या सगळ्यात झोपायला जरा उशिरचं झाला होता. डोक्यात उद्या काय काय करायचं याच विचारचक्र सुरु होतचं त्या मुळे व्यवस्थीत झोप अशी झालिच नव्हती. पण बायकोची सतत ची बडबड सोबत किशोर कुमारची उडती गाणि पहाटे पहाटे अजित कडकडेची भजनं या सगळ्यात ६ तासांचा प्रवास कसा संपला कळालेच नाहि आणि बरोब्बर ८:३० ला आम्हि मेलेलेन प्रवेशद्वाराशी पोहोचलो.
नाहि म्हणायला कॉफी साठी दोन ठिकाणी थांबलो होतो पण ते फारचं थोडा वेळ.

भल्या पहाटे टिपलेला हा सुर्योदय.
मेलेलेन गेट

बरच वेळ निसर्ग साद घालत होता. पहिले निसर्गाच्या हाकेला ओ दिली आणि तिथल्याच एका रेस्टरुम मधे सकाळचे विधी आटपुन फ्रेश झलो.

मग मोर्चा वळवला गेटवरच्या ऑफिस कडे. पार्कमधे प्रवेश करण्यापुर्वी काहि कागदि सोपास्कार पुर्ण करावे लागले. तिथल्या कर्मच्यार्‍यांनी एक प्रवेश फॉर्म भरुन घेतला. आमचे पासपोर्ट, पार्क रिझर्वेशन, गाडिचे कागदपत्र तपासुन घेतले. पुर्ण खात्री झाल्यावर पार्क मधे फिरण्या विषयी काहि सुचना दिल्या. मग आमचे एन्ट्रि/एक्झिट पासेस आमचा तब्यात दिले आणि "ऑल द बेस्ट" म्हणत आमच्या साठी पार्क चे प्रवेशद्वार खुले केले.

एकदा पार्क मधे प्रवेश केला की आपण कुठेही फिरु शकतो पण रेस्टकँप व्यतिरीक्त कुठेही गाडी खाली उतरायची परवानगी नाही.
संपुर्ण पार्क मधे असे मधे दिशा दर्शक दगड लावलेले आहेत.

दिशा दर्शक दगड

आपल्या वहानामुळे प्राण्यांना अपघात होऊ नये म्हणुन सगळीकडे वेगमर्यादा. डांबरी रस्ता असेल तर ५० किमी आणि मातीचा रस्ता असेल तर ४० किमी प्रतितास. ठिकठिकाणी कॅमेरे बसवलेले आणि फाईन पण जबरद्स्त त्यामुळे आपण कुठेही ओव्हरस्पिड करु शकत नाही. पण खरं तर त्याची गरजच पडली नाही. इथे आम्ही एका मुक्त जंगलात फिरत होतो. झु मध्ये नाही. माकड बघायचे असेल तर हा पिंजरा आणि वाघ बघायचा असेल तर तो पिंजरा हा असला प्रकार इथे नव्ह्ता. अफाट जंगल आणि मुक्त प्राणी. सारेच अपनी मर्जी के मालिक. त्यामुळे अमुक एका ठिकाणी ठराविक प्राणी बघायला मिळेल याची गॅरंटी नाही. सगळा नशिबाचा खेळ. योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण हजर असणे या वर सगळे अवलंबुन. त्यामुळे आरामात हळुहळू आजुबाजूला काही हालचाल दिसते का याची चाहुल घेत आम्हि चाललो होतो आणि अचानक ते समोर दिसले. तिन तिन नर इंपाला. मस्त आपल्याच धुंदित चरत होते पण एका डोळ्याने आमच्यावर लक्ष ठेवत.
९० सेमी उंची आणि ४५ किलो पर्यंत वजन असणारे हे इंपाला नेहमी कळपात रहतात. ताकदवान नराच्या कळपात २५ ते ३० मादि इंपाला असतात. दुसर्‍या नर इंपालांना त्या कळपात प्रवेश नसतो. मग असे बॅचलर नर इंपाला आपला वेगळा कळप बनवतात आणि एखादि मादि मिळे पर्यंत त्या कळपात रहतात. स्वभावाने शांत आणि घाबरट असणारे हे प्राणी वेळ प्रसंगी ३ मिटर उंच आणि ११ मिटर लांब उड्या मारत पळु शकतात. एप्रिल/मे या त्यांच्या प्रजननाच्या काळात नर आपल्या नकाद्वारे विशिष्ट आवाज काढुन मादिला आकर्षित करायचा प्रयत्न करतो.

नर इंपाला

म्हटलं चला. पहिल्या पाच मिनीटात एका प्राण्याच दर्शन झाल म्हणजे सुरुवात तर चांगली झाली असं म्हणत थोड पुढे सरकलो तर आणखी एक कळप. परत थोड्यावेळाने आणखी एक. जिकडे बघावं तिकडे इंपाला दिसत होते. थोड्याच वेळात जिकडे तिकडे दिसणार्या इंपाला बद्दल अप्रुप वाटेनासं झालं. आता दुसरा कुठला तरी प्राणी दिसावा असं वाटत होत तेव्ह्ड्यात बायको चा आवाज....
अहो! अहो!! थांबा! थांबा!!
मागे घ्या.. आजुन मागे...ते बघा...तिकडे झाडित... आणि आम्हाला तो दिसला. बिग फाईव्ह मधला पहिला प्राणि... बिग बिग काळा गेंडा. आमच्या कडे लक्ष न देता आपल्याच मस्तीत चरतं होता.

क्रुगर नॅशनल पार्क मधे काळे आणि पांढरे असे दोन्ही प्रकारचे गेंडे आहेत. पांढरे गेंडे काळ्या गेंड्यां पेक्षा आकाराने व वजनाने थोडे मोठे असतात. काळ्या गेंड्यांची उंची १.५ ते २ मीटर आणि वजन ८०० ते ११०० किलो तर पांढर्‍या गेंड्यांची उंची १.८ ते २.२ मीटर आणि वजन १६०० ते २३०० किलो असते. काळ्या गेंड्याचे शिंग १ मीटर तर पांढर्‍या गेंड्याचे शिंग १.५ मीटर पर्यंत वाढतात. लहान आकार आणि कमी वजनामुळे काळे गेंडे पांढर्‍या गेंड्यापेक्षा जास्त चपळ आसतात.

पाच दहा मिनीट तिथे थांबुन त्याचे भरपुर प्रचि घेतले आणि पुढे सरकलो.

काळा गेंडा

सकाळचे साडे दहाच वाजले होते. पण उन खुप जाणवत होतं. थोडं पुढे गेल्यावर एका झाडाखाली विश्रांती घेत असलेला वाईल्ड बिस्टचा एक कळप दिसला. पण खुप आंत लांबवर होता तो.
त्यांच्याच बाजुला एक नर इंपाला झाडाच्या सावली खाली बसला होता.

वाईल्ड बिस्टचा एक कळप
झाडाच्या सावलीत बसलेला नर इंपाला

पुढे थोड्याचं अंतरावर एक ब्रेकाआउट पाँईट दिसला आणि पोटातल्या भुकेची जाणीव झाली. मग थोड्या वेळ तिथे थांबुन पोटपुजा केली आणि पुढच्या प्रवासला निघालो.

पाच दहा किलोमीटर अंतर पार केलं पण इंपाला व्यतिरीक्त कुठल्याचं प्राण्याचं दर्शन होत नव्हतं. हळुहळू इकडे तिकडे शोधत पुढे सरकत होतो आणि दुरवर ते दिसले. बिग फईव्ह मधला दुसरा प्राणी, अफ्रिकन हत्ती. दोन होते पण खुप दुर दाट झाडित. प्रचि काढायचा प्रयत्न केला पण व्यवस्थित काहि दिसत नव्हतं.
तिथेच थोड्या अलिकडे एक नर नायला (Nyala) बसला होता.
नर आणि मादि नायला मधे खुप फरक असतो. नर मादि पेक्षा आकाराने आणि वजनाने जवळ जवळ दुप्पट असतो. नराचे वजन सधारण ११० किलो तर मादिचे ६० किलो असते. त्यांचे रंग पण वेगवेगळे. नर रंगाने थोडासा लालसर असतो तर मादि पिवळसर. मानेवर रुळणार्‍या दाढीमुळे नर एकदम रुबाबदार दिसतो.

दुर झाडित दिसलेले हत्ती
नर नायला

थोडं पुढे गेल्यावर एक वाईल्ड बिस्ट आणि गेंड्याची जोडी दिसली. पण गेंडे महरजांनी चेहरा दखवला नाही. बराच वेळ वाट बघितली पण गेंडा झाडाआडून पुढे आलाच नाही.

वाईल्ड बिस्ट आणि झाडाआड लपलेला गेंडा

मग त्यांना तिथेच सोडुन पुढे निघालो तर एक रानडुक्कर आमच्या गाडिसमोरुन पळत जाऊन रस्त्याच्या दुसर्‍या बाजुला उभा राहिला. अशा अविर्भावात आमच्याकडे बघत होता जणु आम्हाला विचारत होता "तुम्हि माझ्या घरात काय करता आहात?"

रानडुक्कर

साधारण ७० सेमी उंची असणार्या या रानडुकरांचे वजन ६० ते १०० किलो पर्यंत असते. नर डुकराचे सुळे १२ सेमी तर मादिचे ३ सेमी पर्यंत वाढतात. यांची दॄष्टी फार अधु असते त्यामुळे ते तुमच्या फार जवळ येऊ शकतात.
थोड्यावेळ तो आमच्याकडे बघत बसला आणि मग शेपटी वर करुन पळुन गेला. मग आम्हि पण पुढे सरकलो.

थोडं अंतर पार केल्यावर आम्हाला एक नर स्टिनबॉक दिसला. हरीण जातीतला हा छोटासा प्राणि खुप सुंदर दिसतो. त्याच्या लांब कान आणि विटकरी रंगाच्या कातडिमुळे तो सहज ओळखता येतो. प्रजनन काळा व्यतिरीक्त तो एकटाच रहाणे पसंत करतो. त्यच्या डोळ्याजवळ जे काळे डाग दिसतात त्या प्रत्यक्ष ग्रंथी आहेत. त्यातुन पाझरणारा रस ते झाडांवर घासुन आपला प्रभाग अंकीत करतात.

स्टिनबॉक

हळुहळू आम्हि स्कुकुझा रेस्टकँप कडे सरकत होतो. वाटेत आधिच बघितलेले प्रणि परत परत दिसत होते. साधारण सव्वाबारा वाजता आम्हि स्कुकुझा रेस्टकँपला पोहोचलो. पण चेकइन टाईम दोन वाजताचा असल्यामुळे आम्हाला आमच्या कॉटेजची चावी मिळु शकली नाही.
आजुन दिड्-दोन तास हातात होते. इथे थांबण्यापेक्षा परत जंगलात परत जायचे ठरवले. प्रत्येक रेस्टकँप वर एक "अ‍ॅनिमल अ‍ॅक्टिव्हीटी मॅप" असतो जो वेळोवेळी अपडेट केला जातो. काल आणि आज जंगलाच्या कोणत्या भागात कोणते प्राणी दिसले होते ते या मॅप वरुन कळते. त्यावरुन आपण जंगलाच्या कोणत्या भागात फिरल्यास ठराविक प्राणि दिसेल याचा अंदाज बांधुन त्या भागात जाऊ शकतो. त्या मॅप वर नजर टाकुन आम्हि आमचा पुढचा विभाग ठरवला आणि परत जंगलात निघालो.

स्कुकूझा गेट
अ‍ॅनिमल अ‍ॅक्टिव्हीटी मॅप
क्रमशः...

गुलमोहर: 

डिस्कव्हरीमुळे कृगर पार्क, अँबोसिली वगैरे नावं एकदम परिचयाची झालीयेत.

एका माबोकराकडून तिथले फोटो पाहून फार छान वाटलं... Happy

पु.फो.शु. Happy

फार छान!!!. मस्त फोटो आले आहेत. वर्णन पण चान्गले सविस्तर आहे. पुढचा भाग लौकर लिहा.

मस्त! इंपाला आणि स्टिनबॉक किती सुरेख दिसत आहेत! आणि मोठे मोठे डोळे. Happy
आमच्या अ‍ॅब्साची झायरात पण दिसते आहे! Proud

मस्त फोटो व वर्णन. तुम्ही एकट्याने गाडी चालविलीत व छोटे बाळ पण बरोबर आहे म्हणून खूप कौतूक. Happy
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

खल्लास फोटो आणि सुरेख वर्णन Happy

डिस्कव्हरीमुळे कृगर पार्क, अँबोसिली वगैरे नावं एकदम परिचयाची झालीयेत.
एका माबोकराकडून तिथले फोटो पाहून फार छान वाटलं... >>>>>> +१

पुढील भागाच्या प्रतीक्षेत. Happy

अतिशय सुंदर फोटो आणि वर्णन .... अप्रतिम .:)
१० महिन्याच्या पिल्लाला घेऊन ईतका प्रवास करणे ख्ररंच खुपच कौतुकास्पद आहे.. मस्त च...:)

अप्रतिम फोटो, सुर्रेख वर्णन.......
ते अ‍ॅनिअमल अ‍ॅक्टिव्हिटी मॅप प्रकार एकदम भारी - फारच प्रोफेशनल मंडळी दिसतात ही.........

खल्लास फोटो आणि सुरेख वर्णन >>>> जिप्सी तुला स्पेशल धन्स. फोटोला बॉर्डर कशी देतात ते शिकवल्या बद्दल Happy

जब्बरदस्त. कसलं सही आहे! गेंडा, बीस्ट, नायला, इंपाला सगळ्यांचे फोटो फार भारी आणि अभयारण्य आहे हे जाणवतं, कसले निवांत वावरतायत. रानडुक्कराचा फोटू पहिल्यांदा पाहिला, कसला भयानक आहे.
सूर्योदयाचा फोटो पण जबरदस्त. Happy
पुढचे भाग लवकर येऊ देत!!

मस्त फोटो व वर्णन. हातात अल्बम आहे व तुम्हि समोर बसुन वर्णन करताय इतक छान लिहिले आहे.

खल्लास फोटो....सूर्योदयाचा तर कातिल फोटो आहे....
बाकी प्राण्यांचे पण फारच क्रिस्टल क्लिअर फोटो आलेत...
कुठला कॅमेरा वापरता....
दुरवर झाडीतले हत्तीपण स्पष्ट आलेत....
आणि रानडुक्कराचा प्रोफाईल तर केवळ लाजवाब

जंगल सफारी एकदम झक्कास चाललिये Happy सुंदर प्र.ची. छोट बाळ घेउन ३ दिवसभटकंती म्हणजे कौतुक आहे पिल्लु चं Happy . सौ. ना मी आस काही विचारलं तर घर डोक्यावर अन मी पायाभरनीत नक्की Happy

लवकर येऊ द्या पुढले भाग! रानडुकराचा फोटो आवडला. कसलं तोर्‍यात उभं आहे! बेष्ट!

हे असे प्राणी बघण्यात खरी मजा! नायतर मागं एका झूमध्ये एक बिबट्या बिचारा कलिंगडाशी खेळताना पाहिला तेव्हा फार वाईट वाटलं होतं नि तेव्हाच ठरवलं झूमध्ये पुन्हा पाय ठेवायचा नाही.. जायचं तर क्रुगर, मारा वगैरेतच!

आणि रानडुक्कराचा प्रोफाईल तर केवळ लाजवाब
रानडुकराचा फोटो आवडला. कसलं तोर्‍यात उभं आहे! बेष्ट
हे असे प्राणी बघण्यात खरी मजा !>>>>>आशु, देवचार +१ Happy

सौ. ना मी आस काही विचारलं तर घर डोक्यावर अन मी पायाभरनीत नक्की>>>>:खोखो:

मस्त वर्णन आणि फोटो ही छान आहेत.
प्राण्यांना असे मोकळे पिंजर्‍याशिवाय बघायला छान वाटत असेल खरच.

Pages