माझी काशीयात्रा (सचित्र)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हे वाचण्याआधी अतिथि देवो भव (http://www.maayboli.com/node/30467) वाचावे. काशीबद्दलची काहीशे वर्षांपुर्वी लिहिलेली ती एक कथा आहे. खुद्द काशीनगरी मात्र त्यापेक्षा कितीतरी प्राचीन आहे.


शंकराच्या काशीतील पुनरागमनाच्यावेळी जशी आरती केली गेली होती तशीच अजुनही गंगातिरी केली जाते.


गंगेच्या सानिध्यात सुर्यनमस्कारांची मजा काही अौरच.


इथेही अठराव्या शतकाच्या सुरुवातीला जयपुरचे राजे महाराजा सवाई जयसिंग यांनी बांधलेले जंतर-मंतर आहे.


सुरजकुंड


जिकडे-तिकडे मुर्त्या, गायी बांधायला सुद्धा.


आणि जिकडे-तिकडे गायी पण.


काशीत मेलात तर मुक्ति मिळते. जिवंत असतांना सुद्धा सर्वांना मुक्तपणे फिरता येते. बदक, बकरी, बैरागी, घाटावर कुणालाच मज्जाव नाही.


कालमर्दानेश्वर: अशी काही नेहमीपेक्षा वेगळी लिंग असलेली मंदिरे पण इथे आहेत.


विश्वनाथाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अजुन काही मंदिरे. विश्वनाथ मंदिरात फोटो नाही काढता येत. जबरदस्त पोलीस पहारा असतो. अनेक जातीय चकमकी इथेच झाल्या आहेत. येथे असलेली ज्ञानवापी (विहीर) ही गंगेच्याही आधिची आहे. या मंदिराइतकीच गर्दी 'न्यु एज' देवी संतोषीमातेच्या मंदिरातही असते. देवादिकांच्या उत्क्रांतीचा ठोस पुरावा. काशीला भारतमातेचेही एक मंदिर आहे.


भोसले घाट आणि पेशव्यांचा गणेश घाट.


रामलिला वाराणसीत हौसेने केल्या जाते. हे त्यात वापरलेले प्रॉप्स तर नाहीत?


नागकुण्ड - ईथुन पाताळात प्रवेश करता येतो. आम्हाला इथे प्रवेश मिळवायला मात्र त्रास झाला. पुजारी मंदिराला कुलुप लावून गायब झाला होता. इतर अनेक जुन्या मंदिरांप्रमाणेच आजकालच्या यात्रेकरुंना या मंदिराचे महत्व नाही. आमच्या रिक्षेवाल्यालाही हे मंदिर माहीत नव्हते. हे दाट मुस्लीम वस्तीत आहे. दिवोदासाने देवांना जसे स्वर्गात परत पाठवले तसेच नागांना पाताळात पाठवले. दिवोदासाचा विवाह नागराज वासुकिची कन्या अनंगमोहिनी हिच्याशी झाला होता. व्याकरणकार पतंजलिचे घर इथे होते असे म्हंटल्या जाते.


मणिकर्णिका घाटाकडे जाणारी एक चिंचोळी गल्ली.


गल्लीच्या तोंडाशी काशीतील असंख्य लिंगांपैकी काही. मुक्ती मिळालेला एक उंदीर.


मुक्तीची वाट पहात असलेली गाय.


मणिकर्णिका कुंड.


घाटाचे जरा बरे रूप.


महास्मशानाच्या लौकिकाला साजेशी महालाकडे.


शेजारील मसणेश्वर


… व त्याचाकडे निर्वीकार पणे पाहु शकणारी कोंबडी.


इतके पक्षी का? प्रेत तर नाही ना त्या बोटीत? अंत्येष्टि म्हणजे अग्निला शरीर अर्पण करणे. त्याआधी ते गंगेत बुडविण्यात येते. शवाला शिवस्वरुप प्राप्त होते. अखंड जळत असलेल्या आगीतुन चिता पेटवली जाते. कवटी फोडल्यावर आत्मा मुक्त होतो. गंगेतील पाणी उरलेल्या राखेवर टाकण्यात येते व लोक मागे न वळता आनंदात निघुन जातात. आता जर ते उघडपणे रडले तर मृताला त्रास होतो असे म्हणतात.


पिशाचमोचन जवळ पिशाच योनीतुन मुक्तीकरता झाडाला ठोकलेले खिळे.


दंडपाणि भैरव व काळभैरव. काशीला मृत्यु पावलात तर तुम्ही जन्म-मृत्युच्या फेऱ्यातुन मुक्त होता. उठसुठ कुणालाही त्याचा (गैर-)फायदा होणार नाही हे पाहणे हे या दोघांचे काम - थोडक्यात म्हणजे अपात्रांना काशीतून हुलकावून लावणे. दंडपाणि याकरिता संभ्रम ाणि उद्भ्रम नामक सहायकांची मदत घेतो. जेंव्हा हे त्यात मग्न नसतात तेंव्हा हे अन्नपुर्णेला काशीतील सर्वांना अन्न पुरविण्यास मदत करतात. गणेश आणि भैरवाप्रमाणे दंडपाणि काशीचे एक प्रमुख दैवत आहे. मुळात हा एक यक्ष होता व नंतर शिवाच्या घोळक्यात त्याला स्थान द्यावे लागले असावे. तो पण एक गणेश आहे, पण ५६ गणेशांपैकी एक नाही. दंडपाणिला खुष केल्याशिवाय देवांनाही काशीत स्थान नाही मिळु शकत.


लाट/कपाळीभैरव: दाट मुस्लीम वस्तीत एका कुंडाच्या बाजुला एक चौथरा व त्यावर हा भैरव. बाहेर तंबु ठोकुन बसलेला एक पोलीस. या भैरवाला ईथुन हलवण्याचे अनेक असफल प्रयत्न झाले आहेत. मुळात हा दंड ६०-७० फुटांचा होता व मणिकर्णिका घाटावरील महास्मशान स्तंभ असावा. भैरव येथे अपात्रांना भैरवी-यातना द्यायचा.


काशीतील काही टिपीकल दृष्ये?


जवळच असलेल्या सारनाथमधील स्तूप. जपानच्या मदतिने डागडुजी सुरु होती. येथुन जवळच बुद्धाचे पहिले प्रवचन झाले होते.
-----------------------------------------
मूख्य संदर्भ: Diana Eck यांचे City of Light (CUP, 1999)
फोटो माझ्या २००६ नव्हेंबर-डिसेंबर दौऱ्यावेळचे

विषय: 
शब्दखुणा: 

चित्रे पाहताना ओपोराजितो आठवला. आपल्या देशाला स्वच्छतेचे इतके वावडे का आहे या प्रश्नाचे उत्तर मिळेल असे वाटत नाही.

असू शकेल. अरब देशात काय काय ब्लॉक करतील त्याचा नेम नाही. Sad

दक्षिणा, असं कसं म्हणतेस? काहीही झालं तरी 'मेरा भारत महान'च म्हणायचं मग तो कितीही बकाल का असेना. तुझ्या वरच्या वाक्याने धार्मिक भावना दुखावू शकतात.

मला वाटतं एवढा बकालपणा हल्ली काही वर्षांमध्ये आला असावा. तीर्थक्षेत्र असूनही पावित्र्य, स्वच्छता पाळली जात नसावी. काशी वगैरे हे दूरच्या लोकांसाठी एक तीर्थ म्हणून आकर्षण असेल पण तिथल्या लोकांना ते रोजचंच असल्याने व यात्रेकरुंची सततची वर्दळ असल्याने असं झालं असेल. त्या जागोजागी पिंडी, मुर्ती कुणी स्थापन केल्या कुणास ठाऊक. गल्लोगल्ली सार्वजनीक गणपती बसतो तसं वाटतंय. फक्त हे ३६५ दिवस रहात असल्याने एखाद्या पोस्टाच्या पेटी इतकंही महत्व राहिलं नसावं. असो..

वै. म. - ह्या सगळ्या मुर्ती कुणी स्थापन केल्या हे माहित नसेल (बाथरुमला लावतात तशा टाईल्सही लावून ठेवलेल्या दिसतायत) आणि त्याचं काही ऐतिहासिक / पौराणिक महत्व नसेल तर विसर्जन करुन घ्याव्यात आणि ती कुंडं वगैरे गाळ उपसून स्वच्छ करावीत. पुराण काळातील काशी खूप सुंदर, प्रसन्न, पवित्र वाटत असेल कदाचित पण सांभाळता येत नसेल तर एक विश्वेश्वर आणि काही ऐतिहासिक / पौराणिक महत्व असलेली स्थानं सोडून सगळं रिअरेंज करावं.

पुराणांप्रमाणे त्या मुर्ती प्राचीन आहेत, देवादिकांनीच स्थापन केलेल्या आहेत. वर म्हंटल्याप्रमाणे उत्क्रांतीमुळे नवी मंदिरे पुढे येताहेत, पण जुन्या मंदिरांचे पुजारी आपली मंदिरे कशी सोडणार? बरीचशी घाण बाहेरून आलेल्या यात्रेकरुंमुळे होते त्याचप्रमाणे पंचक्रोशीतुन आणल्या जाणार्या प्रेतांमुळेपण होते. बरीचशी घाण कोणत्याही मध्यम आकाराच्या भारतीय शहराला साजेशीच आहे.

पण!

पौराणीक गॉगल्स घालुन तिथे हिंडलात तर अनेक गोष्टींकडे कानाडोळा करुन ती रहस्ये आत्मसात, आत्मगत करत जाता येतात. मी ती दिव्य दृष्टी घेऊन गेलो होतो. घाण इज इन द आय ऑफ द बिहोल्डर वगैरे. पाणी मात्र बाहेरचे कटाक्षाने टाळले तरीही तिसर्या दिवशी आजारी पडलो आणि दीड दिवस बुडाला. लोक मात्र आरामात गंगेत डुबक्या मारतात.

दुरदूर पसरलेली व आता खूप लोक जात नसलेली मंदिरे एकेकाळी खूप महत्वाची होती. ६४ योगीनी, १२ आदित्य, ५६ गणेश सगळे आहेत तिथे. मला पुन्हा जायला आवडेल. आजकाल भडक रंग असलेली, संगमरवरी टाईल्स लावलेली मंदिरे असतात त्यापेक्षा येथील मंदिरे चांगली आहेत. आत सहसा घाण नसते.

इत्क्यात अनेक कथांमधुन काशी पुन्हा वर येते आहे.

इयन मॅकडोनल्डचे रिव्हर ऑफ गॉड्स वगैरे.

चेतन भगतच्याही इतक्यातील एका पुस्तकात काशी आहे

बरीचशी घाण बाहेरून आलेल्या यात्रेकरुंमुळे होते त्याचप्रमाणे पंचक्रोशीतुन आणल्या जाणार्या प्रेतांमुळेपण होते.>>> ह्म्म्म. प्राण निघून गेल्यावर उरलेलं शरीर नदीत सडण्यासाठी किंवा माश्यांनी खाण्यासाठी सोडण्याच्या मागे काय कारण असतं? गंगा मैली होणारच ना? आणि तिथलंच पाणी गडूत सील करुन आपण घरी आणायचं शेवटच्या क्षणी मुखात गंगोदक पडावं म्हणून. अर्धमेले झालेले असू तर पूर्णच मरु इतक्या दुषित पाण्यामुळे.

पौराणीक गॉगल्स घालुन तिथे हिंडलात तर अनेक गोष्टींकडे कानाडोळा करुन ती रहस्ये आत्मसात, आत्मगत करत जाता येतात. मी ती दिव्य दृष्टी घेऊन गेलो होतो.>>> त्या अतिथी देवो भव मधले गॉगल्स इथेही चित्रांच्या वर किंवा खाली लटकव म्हणजे आम्हालाही कथेची आणि त्या परिसराची लिंक लागेल.

घाण इज इन द आय ऑफ द बिहोल्डर वगैरे.>>> तरी ज्याला आपण तीर्थक्षेत्र मानतो ते स्वच्छ राखलं पाहिजे असं वाटतं. त्या पायरीजवळच्या शिवलिंगांच्या शिळेला चुकून पायही लागत असेल कुणाचा.

आपल्या देशाला स्वच्छतेचे इतके वावडे का आहे या प्रश्नाचे उत्तर मिळेल असे वाटत नाही. >>> नाहीच मिळणार. कारण आपण चलता है, जाऊ दे ना यार, अशा मनोवृत्तीचे आहोत. अजून १०० वर्षांनी देखील भारत असाच राहिल. एकीकडे ग्लोबलायझेशन मुळे भारतीय पगार वाढतील, नौकर्‍या मिळतील, लोक बाहेर जातील, पण तसेच रस्ते, तशीच वीज आणि पाणी ह्यांची अवस्था व तसाच भ्रष्टाचार असेन. ह्या बाबत मला आता इथे राहून काही शंका उरली नाही.

काशीला खूप लोक या ना त्या कारणाने भेट देत असतात त्यामुळे बहुतेक तिथे स्वच्छता टापटिप करण्यावर मर्यादा आल्या असतील. करून करून किती करणार?

आडो, लोकांच्या धार्मिकतेचा अवमान करण्याचा हेतू नव्हता माझा. उलट असं म्हणायचं होतं की, इतक्या बकाल वातावरणात आपल्या जवळच्या व्यक्तीला अग्नी देणं किंवा इतर कोणतेही होम हवन करून मुक्ती वगैरे मिळवण लोकांना कसं काय पटू शकतं? अशा कामांसाठी जागा पवित्र आणि स्वच्छ हवी.

आवडले फोटो आणि वर्णने. हिंदू धर्मात केवढी रहस्ये सामावलेली आहेत काही कळत नाही. कदाचित ज्यांचा अभ्यास आहे त्यांना नीट कळू शकत असेल. पण तो पहिला फोटो, कालमर्दानेश्वर, नागकुंडाचं वर्णन वाचताना त्यातलं गूढ कळता कळत नाही. स्वर्ग, पाताळ, नागकुळ या संकल्पना नक्की काय होत्या, त्या नागकुंडातून पाताळात जाता येतं म्हणजे काय? कोणाला शोध नाही का घ्यावासा वाटला? तो न घेताच कशामुळे लोकांचा इतका विश्वास तेव्हा होता (अजूनही असतो) समजत नाही. उज्जैनच्या कालभैरवाच्या मंदिरातही खूप गूढ वाटतं.

पौराणीक गॉगल्स घालुन तिथे हिंडलात तर अनेक गोष्टींकडे कानाडोळा करुन ती रहस्ये आत्मसात, आत्मगत करत जाता येतात. मी ती दिव्य दृष्टी घेऊन गेलो होतो. घाण इज इन द आय ऑफ द बिहोल्डर वगैरे. >> हे आवडलं.

राजकाशाना- हो ओपोराजितोची अनेकदा आठवण आली फोटो बघताना. विशेषतः तो चिंचोळ्या गल्लीचा आणि पक्षांचा.

स्वर्ग, पाताळ, नागकुळ या संकल्पना नक्की काय होत्या, त्या नागकुंडातून पाताळात जाता येतं म्हणजे काय >>>

ती कल्पना. पण स्वर्ग म्हणजे आर्यावर्ताच्या उत्तरेचा व हिमायलाचा भाग, जिथे देवलोक नावाची जमात राहत होती. नागकुळ पण अशीच एक जमात. बेसिकली मला हे आजही गाववाले लोक, वरचा अंगाला जा, खाल्ल्याअंगाला जा असे म्हणून दिशा दर्शवतात तसे वाटते. स्वर्गाच्या बाहेर पृथ्वी आणि त्याही खाली ( जसे आपल्या महाराष्टाच्यात देखील काही जुन्या संस्कृती सापडत आहेत) ते म्हणजे पाताळ असावे. किंवा पाताळ म्हणजे तो देश जिथे देवांचे काही दुश्मन जसे दस्यु, दास आणि पणी लोक राहत ती जागा. (इथे खाली म्हणजे इस्ट टू वेस्ट असे पण धरावे लागेल कारण सरस्वती / हाक्रा संस्कृती ही (जी वेदपूर्व होती असे मानायला जागा आहे) ती हिमालय ते उत्तर अफगाण (ज्याचे नाव वेदांमध्ये वाल्हिक प्रदेश आहे) व्हाया राजस्थान आणि आजचे पाक) अशी पसरली होती. कदाचित त्यालचा भाग म्हणजे देखील पाताळ होईल.

तिन्ही लोक म्हणजे खरोखरी पृथ्वीच्या गाभ्यात पाताळ, स्वर्ग म्हणजे पृथ्वीबाहेर असे जे आपण समजतो (आज) तसे ते तेंव्हा नक्कीच नव्हते. पुढे कालौघात लोकांनी हे पृथ्वीबाहेरचे केले कारण मग त्याचे महत्व कसे वाढणार?

(इती अनेक पुस्तकातुन वाचलेले)

फोटो / वर्णन आवडले. त्या कथेचे संदर्भ इथे फोटोंना देता आले तर अजुन चांगले होईल.

<काशीला खूप लोक या ना त्या कारणाने भेट देत असतात त्यामुळे बहुतेक तिथे स्वच्छता टापटिप करण्यावर मर्यादा आल्या असतील. करून करून किती करणार?> मुळात स्वच्छता हि स्वत: पाळायची गोष्ट नसुन आपल्यानंतर दुसर्‍यांनी करायची कृती आहे असे लोक जो पर्यंत मानतात स्वच्छ होणे कठीणच आहे.

<अर्धमेले झालेले असू तर पूर्णच मरु इतक्या दुषित पाण्यामुळे.> Lol
अभारतीय लोक जेव्हा प्रेमाने गंगा, काशी बघायला जातात आणि हि घाण आणि प्रेते पाण्यात टाकणे बघुन त्याबद्दल भारतीयांना प्रश्न विचारतात तेव्हा अगदी कानकोंडं व्हायला होते.

केदार धन्यवाद! तु म्हणतो आहेस त्या दृष्टीने पाहीलं तर बर्‍याच रहस्यमय वगैरे गोष्टी साध्यासुध्या वाटायला लागतात (आणि पटणार्‍या) पण ग्लॅमर कमी झाल्यासारख्या Proud माझ्या डोक्यातल्या कधीतरी वाचलेल्या पुस्तकातल्या 'देव म्हणजे परग्रहावरचे कोणीतरी' या संकल्पनांना गूढतेचं कसं छान वलय होतं बाकी :प

सहीयेत फोटो आणि समालोचनही.

लोक्स,
काय राव घाण घाण करता.. आबादी किती? सरकार कुठेकुठे पुरे पडणार. इ.इ. पुढची वाक्य स्वत:च म्हणावीत.
या वाक्याने मला एवढा पुळका आला आहे म्हणजे मी नक्की सध्या भारताबाहेर असणार असा कयास असला तर तो बरोबरच. Proud

भारतीय देव असे का आहेत याचे एक कारण म्हणजे या भुमितील लोकांनी आत्मसात केलेले नवे विचार, नवे देव. ही विचारही सर्व दिशांनी झालेले. उदा. कुणाचे वाईट का होते याकरता कारण शोधले जाते. ते कारण पुर्ण पटले नाही तर त्यातील त्रुटी भरुन काढण्याकरता दूसरे. असे होत होत पूर्ण सिस्टीम तयार होते.

एखाद्या गणितातील अग्झीओमॅटीक सिस्टीम प्रमाणेच याच्या अनेक उपशाखा बनु शकतात. थोडेफार तरी गोडीगुलाबीने रहायच्या प्रयत्नांमुळे एक सिस्टीम दूसर्याच्या अधिपत्याखाली येते. त्या गोष्टी हेच रहस्य आहे

> अजून १०० वर्षांनी देखील भारत असाच राहिल.
आपणही म्हंटले तर खचितच राहील. पण १०० वर्षे हा खूप मोठा कालावधी आहे (टेक्नॉलॉजी च्या दृष्टीने). आता आपली उत्क्रांती आपल्या शरीराबाहेरच होते आहे. मॅक्डोनाल्ड्चे वर उल्लेख केलेले पुस्तक २०४७ चे आहे. भारताचा कारभार काशीतुन चालतो आहे. ब्रह्मा, शिव, विष्णु यांच्या कार्यांप्रमाणे काम करणार्या टेक्नॉलॉजीज आहेत व अजुनही समाज दोन भागात विभागलेला आहे. प्रॉब्लेम्स आहेत, पण अगदीच वेगळ्या प्रकारचे.

सध्या जे सोल्युशन्स हवे आहेत ते लिनीअर नाही - आउट ऑफ द बॉक्स ची गरज आहे.
निर्माण नी बनविलेली 'द रामलीला प्रॉजेक्ट' ची Children Playing Gods ही वाराणसितील डॉक्युमेंटरी तिची डायरेक्टर इर्फाना मुजुमदारनी US दौर्याच्या वेळी कॅलटेकला आणली होती. असे मुलांना (पुढच्या पिढ्यांना) टारगेट करणारे अजुन प्रॉजेक्ट्स हवे.
http://www.nirman.info/new/ramlila

व्वा! छान सफर झाली काशिची Happy प्रत्यक्ष जाऊन देखिल बघितले गेले नसते ते बघायला मिळाले, धन्यवाद.
लिम्बी अन पोरीन्ची काशीयात्र केव्हाच झालिये, मी मात्र महाराष्ट्राच्या बाहेर पडलो नाहीये अजुन! असो.

>>>अभारतीय लोक जेव्हा प्रेमाने गंगा, काशी बघायला जातात आणि हि घाण आणि प्रेते पाण्यात टाकणे बघुन त्याबद्दल भारतीयांना प्रश्न विचारतात तेव्हा अगदी कानकोंडं व्हायला होते. <<<

एकतर मला असल्या कशाने कानकोन्ड वगैरे व्हायला होत नाही! त्यातुन माझा काय या विषयात संबन्ध नै बोलायचा, पण हे वाक्य वाचले अन सहज आठवला मागल्याच पन्धरवड्यातला प्रसंग.
झाल काय की लिम्बी अन पोरी कोकणात गेलेल्या, समुद्रकिनारी असलेल्या आमच्या गावी देखिल गेल्या, अर्थात समुद्रकिनारी गेल्यावर माझ्याकरता त्यान्नी जशी समुद्राची वाळू अन पाणि घेऊन आल्या, तसेच तेथे अफाट सन्ख्येने उपलब्ध असलेले शन्ख/शिम्पले देखिल आणले, चान्गले पिशवी भरुन आणले, त्यातच कधी नाही ती एक कवडी देखिल मिळाली, या किनार्‍याला कवड्या मिळत नाहीत. घरी परतल्यावर तो ढिग जमिनीवर ओतुन बघत बसली, त्यातच, तिला शिम्पल्यान्च्या दोनचार पेट्या देखिल मिळालेल्या, कौतुकाने दाखवायला लागली तेव्हा तत्क्षणी तिला सान्गितले की अग या पेटीत जिवन्त वा मृत कीडा असू शकतो, उघडून बघितले तिने तर विशिष्ट समुद्री जीवान्च्या वासासहीत होताही, तिने ई ई ई करुन किन्चाळून वगैरे झाले.
मग तिला सान्गितले, की अग हे जे काय तू गोळा करुन आणलेस, ते सर्व मृत समुद्री जीवान्चे "सान्गाडे" आहेत!
तात्पर्य? हे आख्खे जग असन्ख्य मृत जीवान्च्या सान्गाड्यान्नीच भरलेले आहे. असन्ख्य जीवान्च्या उच्छ्वासाने भरलेले आहे. असन्ख्य जीवान्च्या उत्सर्जित द्रव्याने भरलेले आहे. अन्तर्बाह्य लडबडलेले आहे. अन एकदा हे ज्याला उमगलेले असेल, त्याला काय कशाने कानकोन्डे व्हायला होणार?
असो, तुमचे चालुद्यात Happy मी वाचतोय मधुन मधुन

काशीयात्रा आणि अश्चिग हे काँबो वाचूनच भारी वाटले!
फोटो आणि समालोचनापेक्षा त्यावर सुरु झालेली चर्चा जास्त रंगतदार आहे.
थोडेफार तरी गोडीगुलाबीने रहायच्या प्रयत्नांमुळे एक सिस्टीम दूसर्याच्या अधिपत्याखाली येते.>>> देव आणि त्यांची वाहने हे या प्रक्रियेचे उत्तम उदाहरण असावे.

काशीयात्रा आणि अश्चिग हे काँबो वाचूनच भारी वाटले!>>>> अगदी अगदी!
आधीचा लेख (काशीची कथा) पण मस्त. माहितीच नव्हती. पण मला फोटो दिसत नाहीयेत. आडो म्हणते ते बरोबरे. इकडे काय ब्लॉक करतील सांगता येत नाही.
अश्चिग मला तुझा अ‍ॅप्रोच खूप आवडला. चर्चा छान चाल्लीय. वाचतेय.

छान लेख. २ र्‍या फोटोत केवढा एरिया कव्हर झाला आहे!
पौराणीक गॉगल्स शिवाय तिथे जाण मात्र केवळ अशक्य वाट्तय.

शर्मिला, इरावती कर्वेंचे युगांत पुस्तक आहे त्यात नागलोकांबद्दल त्यांनी खूप छान सांगितले आहे. ते एक मोठे प्रकरणचं आहे. ते पुस्तक तू पुन्हा वाच म्हणजे माहिती मिळेल.

आशिष, चित्र छान आहेत. तुला मोक्षप्राप्ती मिळो!

Pages