किशोर कदम- हर एक फ्रेन्ड जरूरी होता है!

Submitted by माध्यम_प्रायोजक on 8 November, 2011 - 02:16

’..जैसे हर एक फ्रेन्ड जरूरी होता है!’ ही अ‍ॅड पाहिली असेल टीव्हीवर. प्रत्येकाला आयुष्यात एक फ्रेन्ड, फिलॉसॉफर आणि गाईडची आवश्यकता असते. किंबहुना तो असावाच! पण कसा शोधायचा तो फ्रेन्ड? तो काही पाटी घेऊन येतो का, की बाबा रे हा आलो मी. आजपासून मी तुझा फ्रेन्ड! छे! असं नसतं हो. तो शोध कधी केव्हा कुठे आणि कोणापाशी संपेल ह्याचं उत्तर कोणीच देऊ नाही शकणार! तो एखादा मित्र, मैत्रीण, नवरा, बायको, एक त्रयस्थ माणूस, शिक्षक, गुरू, एखादा लहान मुलगा, नातेवाईक- कोणीही असू शकतो. माझा तर असा विश्वास आहे, की एखादं पुस्तक, एखादी कविता, एखादी कलाकृती, किंवा ते लिहिणारा लेखक, कवी, कलाकारही आपला फ्रेन्ड असू शकतो... आपण त्याला आणि तो आपल्याला ओळखत नसला तरी! तुमची फ्रेन्डची व्याख्या काय आहे आणि कलेचं उद्दिष्ट तुम्ही कुठून 'डिराइव्ह' करता हे महत्त्वाचं!

मी उर्दू गझलांचे कार्यक्रम केल्यामुळे माझ्याकडे हा ’उस्मान सारंगिया’चा रोल आला. ’सारंगी’ हे पारंपरिक वाद्य वाजवणारे तरी किती राहिलेत म्हणा आता? पण उस्मानचं आपल्या सारंगीवर प्रेम आहे, आपल्या कलेवर प्रेम आहे. ह्या वाद्याला तो पुजतो, कारण ती त्याला नुसतीच रोजीरोटी देत नाही, तर त्याला एक समाधान देते. परिस्थितीने गांजलेला तो पोटासाठी रेकॉर्डिंगमध्ये, मैफिलींमध्ये साथ देत असतो. ’जुना काळ’, ’गोल्डन पिरियड’बद्दल आपण बोलतो तो गोल्डन पिरियड जगलेला आहे हा उस्मान. पण डोळ्यासमोर सगळं बदललेलंही त्याने पाहिलं आहे. खूप अनुभव गाठीशी बांधले आहेत! सुरुवातीला असलेला कलाकाराचा भाबडेपणा आणि नंतर सराईत झाल्यानंतर बदललेली वागण्याची पद्धत हे बदल त्याने टिपले आहेत, साठवले आहेत.

KK.jpg

’साऊंड’ जेव्हापासून ’लाईव्ह’पासून ’टेक्निकल’कडे गेला ना, तेव्हापासून ’वादन’ हा भागच झाकोळला गेला आहे. अरे कसे ते लोक एक प्रकारच्या धुंदीत, मस्तीत जगायचे, ते सूर त्यांच्या रक्तामधून वाहायचे! असं वाजवता येईल का? तसं करून बघता येईल का? एका रागामधून दुसर्‍या रागाच्या सुरावटी घेता येतील का?- सतत तीच नशा! आता कोणताही आवाज इलेक्ट्रॉनिकली काढता येतो आणि ट्रॅजेडी काय आहे माहित्ये का- लोकांना तो खराच वाटतो! त्यांना जीव ओरिगिनल साऊंडसाठी तडफडत नाही! असो!

तर असा हा उस्मान, आणि त्याची बायको! ही एकेकाळी हिन्दी इन्डस्ट्रीची हिरोइन! पण आता दोघेही एक दुर्लक्षित आयुष्य जगत आहेत. त्यांचं नातंही इंटरेस्टिंग आहे. नवरा-बायकोपेक्षाही ते एकमेकांचे मित्र आहेत.. मगाशी म्हटलं ना- हर एक फ्रेन्ड... मी असे अनेकनेक लोक खरोखर पाहिले आहेत.. आज त्यांच्याकडे पैसा नाही, गरिबी भेडसावते, पण मनाने एकदम सॅटिसफाईड! हांऽऽ! हे सच्चे कलाकार! हा उस्मान अनंतची (सुबोध भावे) धडपड बघतो. त्याची अनुभवी नजर त्याचा पुढचा प्रवास कसा होणार आहे, हे ओळखते आणि तो आपणहोऊनच त्याला थोडा आधार, मित्रत्वाचा सल्ला वगैरे देतो. अनंतला कोणी गॉडफादर नसतो. त्यालाही उस्मानचा आधार वाटतो. मनातला राग, भीती, इच्छा बोलायला त्याला त्याचं हृदय जाणणारा एक दोस्त मिळतो. परत एकदा- हर एक फ्रेन्ड जरूरी होता है! हा शोध सतत चालू ठेवला पाहिजे! आयुष्य फार श्रीमंत होतं त्यामुळे!

(शब्दांकन- पूनम छत्रे)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच Happy
हर एक फ्रेन्ड जरूरी होता है! हा शोध सतत चालू ठेवला पाहिजे! आयुष्य फार श्रीमंत होतं त्यामुळे!
>> खुप खुप अनुमोदन