स्वारस्याची अभिव्यक्ती

Submitted by नरेंद्र गोळे on 4 August, 2011 - 02:36

वामन आणि मी, आम्ही दोघेही बसमध्ये बसून तासभर कसा काढावा ह्याचा विचार करत असता, ही चर्चा सुरू झाली. आणि मग उत्तरोत्तर रंगतच गेली. तिचाच हा वृत्तांत. हा संवाद कमीअधिक प्रमाणात प्रत्यक्षात असाच घडलेला आहे.

स्वारस्याची अभिव्यक्ती

मीः हे बघा, तुम्हाला ह्यात रुची आहे का?
वामनः छे! हे सगळे गणिताने भरलेले आहे. ह्यात आपल्याला काय ’इंटरेस्ट’ असणार?
मीः ’इंटरेस्ट’? म्हणजे तुम्हाला ’स्वारस्य’ म्हणायचाय काय?
वामनः हो. तेच ते.

मीः तुम्हाला ह्यात स्वारस्य नसेल, तर आपण अधिक सुरस गप्पा करू या! तुम्ही ’instrumentation’ मध्ये एवढी वर्षे काम करताय. मग सांगा बरे ’instrumentation’ ला मराठीत काय म्हणतात?
वामनः साधनशास्त्र.
मीः अहो ते म्हणजे तर ’रिसोर्स सायन्स’ झाले. आठवा ’ह्युमन रिसोर्स’.
वामनः मग ’अवजार’शास्त्र असेल.
मीः अवजार म्हणजे ’टूल’. आता मीच तुम्हाला सांगतो की ’instrument’ म्हणजे ’उपकरण’. तर मग ’instrumentation’ ला मराठीत काय म्हणणार?
वामनः काय?
मीः ’उपकरणन’!
वामनः ’उपकर्णन’?
मीः छे हो. इथे कानाचा काय संबंध? ’उ प क र ण न !’
वामनः ’उ प क र ण न !’

मीः हो. आता बरोबर झालं! आता ह्या विषयात ’रिझोल्यूशन’ म्हणजे काय ते तुम्हाला नक्कीच माहीत असणार.
वामनः हो. ’रिझोल्यूशन’ म्हणजे ’ठराव’!
मीः छे! ही काय सहकारी गृहनिर्माण मंडळाची आमसभा आहे?
वामनः मग ’कमीत कमी मोजदाद’!
मीः ते तुम्ही ’लीस्ट काऊंट’ बद्दल बोलताय.
वामनः मग, काय म्हणतात?
मीः ’सापेक्षपृथकता’! सुट्टे पाहता येतील असे, लहानात लहान भाग मापण्याची क्षमता!!

वामनः हे किती अवघड नाव आहे. असले कठीण कठीण शब्द सुचवाल तर लोक कशाला मराठी शब्द वापरतील?
मीः छे. हे नाव कठीण नाहीच. वापरात नाही हे मात्र खरेच आहे. ’रिझोल्यूशन’ च्या ऐवजी नेहमी वापरू लागलात तर मुळीच कठिण वाटणार नाही.
वामनः कबूल पण मग नुसतीच ’पृथकता’ म्हणता येईल की! ती सापेक्ष असण्याची काय गरज आहे?
मीः समजा मी तुम्हाला ’सुट्टा पाहता येईल असा लहानात लहान भाग’, ’एक इंच आहे’ असे सांगितले तर त्यावरून ’सापेक्षपृथकता’ कळेल का?
वामनः हो. कळेल की.
मीः नाही. कळणार नाही. कारण प्रश्न हा उरेल की एकूण केवढ्या पल्ल्यात ’सुट्टा पाहता येईल असा लहानात लहान भाग’ आहे ’एक इंच’? फुटपट्टीवर मोजत असाल तर बारा इंचात एक इंच म्हणजे १/१२ = ८.३३% ही ’सापेक्षपृथकता’ होईल. मात्र एका मैलात एखादा इंच मोजत असाल तर मैलभरातील ६३,३६० इंचात एक इंच म्हणजे १/६३,३६० = ०.००१५७८ % ही ’सापेक्षपृथकता’ होईल. सुमारे पाच हजार पट फरक आहे ह्या ’सापेक्षपृथकतां’मध्ये. यासाठी पट्टीशी सापेक्ष असते म्हणून सापेक्ष. एरव्ही पृथकताच.

वामनः आपल्याला काय म्हणायचाय ते ’प्रिसाईझली’ सांगता यायला हवे. नाही का?
मीः हो. तर मग आता सांगा की ’प्रिसाईझली’ ला मराठीत काय म्हणाल?
वामनः ’एक्झाक्टली’!
मीः पण मराठीत काय म्हणाल ते विचारलय मी!
वामनः मराठीत ना? मराठीत ’एक्झाक्टली’ म्हणजे ’तंतोतंत’.
मीः हो. पण मग ’प्रिसाईझली’ म्हणजे काय?
वामनः ’प्रिसाईझली’ म्हणजे अचूक.
मीः छे! ’अचूक’ला इंग्रजीत ’अक्युरेट’ म्हणतात!
वामनः हो. हो. हा अर्थ मात्र तुम्ही ’नेमका’ सांगता आहात!
मीः बरोब्बर. ’प्रिसाईझली’ म्हणजे ’नेमका’च.
वामनः अरे वा! माझा अर्थ बरोबर निघाला की!

मीः अगदी बरोब्बर. आता तुम्हाला ’रिपिटेबल’ म्हणजेही माहीत असणारच!
वामनः हो तर. ’रिपिटेबल’ म्हणजे ’फ्रिक्वेंट’.
मीः नाही हो. एकतर तुम्ही इंग्रजीतला प्रतिशब्द देताय. दुसरे म्हणजे प्रतिशब्द म्हणूनही योग्य नाही. कारण ’फ्रिक्वेंट’ म्हणजे पुनरावर्ती.
वामनः मग तुम्हीच सांगा ’रिपिटेबल’ म्हणजे काय?
मीः ’रिपिटेबल’ म्हणजे पुन्हपुन्हा मोजले असता एकसारखेच भरणारे मापन!
वामनः तुम्ही काय म्हणत होतात? ’स्वारस्य’च ना! हे बघा ही कशाची जाहिरात आहे?
मीः ’स्वारस्याची अभिव्यक्ती’! अहो म्हणजे ’एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’.

वामनः अहो मग असं शुद्ध मराठीत सांगा की. ’स्वारस्याची अभिव्यक्ती’ म्हटल्यामुळे ही जाहिरातच कुणी वाचणार नाहीत मुळात.
मीः असे म्हणून इंग्रजीला ’वाघिणीचे दूध’ म्हणून गौरवणारे दिवस आता मागे पडलेत. पैसे खर्चुन ’स्वारस्याची अभिव्यक्ती’ विचारणार्‍या जाहिराती लोक करू लागलेत! सांगा जमाना बदला की नाही.
वामनः खरंच हो! असली जाहिरात मी तरी पाहिली नव्हती यापूर्वी कधी.
मीः एकदा का मराठीतच आचार, विचार आणि प्रचार करायचा हे नक्की केले की मग नेहमी काही राज ठाकरेच यायला हवेत असे नाही! आपणही मराठीत सगळे व्यवहार उत्तमरीत्या व्यक्त करू शकतोच की. आजच्या आपल्या बोलण्यातून हे स्पष्टच झालेले आहे.
वामनः खरेच हो. तासभर कसा भुर्रकन उडून गेला पत्तासुद्धा लागला नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूनी, प्रज्ञा९, चिनूक्स, आश्चिग, राजू७६, मामी, झक्कीगुरूजी, दैत्य, सिंडरेला, चंबू, नीधप, candy आणि भाऊ सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

रूनी,
खरच दरवेळी इंग्रजी शब्दाला हवा तसा मराठी प्रतिशब्द चटकन मिळेलच/आठवेलच असे नाही.>>>
म्हणून तर हे सवयापसव्य!

प्रज्ञा९,
स प कॉलेजमधे फिजिक्स=वास्तवशास्त्र. >>> हे तर मलाही नवीनच आहे! तरीही वास्तविक!!

चिनूक्स,
Instrumentations Department = उपकरणीकरण >>> हे काहीतरी 'करणी' केल्यासारखे वाटतंय!

झक्कीगुरूजी,
आता हे हे शब्द कुठे वापरले तर मराठी लोक तुमचा शब्दकोष उघडून बघतील का?>>> वा! तसे झाले तर मला नक्कीच आनंद होईल!

दैत्य,
' मेकॅनिकल सँडविच इंजिनीयरींग'ला - 'यांत्रिकी वडापाव' म्हणायचा!>>> काय उपमा (शब्द) शोधलीय पण! वा!!

नीधप,
मर्यादा ओळखायची कशी हा खरा प्रश्न आहे. अर्थात ते व्यक्तीनुसार बदलत जाऊ शकते.>>> अगदी खरंय! आणि ही मर्यादा ज्याची त्यानीच ठरवलेली बरी. नाही का?

Candy,
'हा मारूती कांबळे कोण?' सारखच विचारताय 'हा वामन कोण?'. आहे माझा एक मित्र. खराखुरा. आणि हो. हे नावही त्याचे खरेखुरे नावच आहे.

भाऊ,
लेख छानच अहे. अनेक मराठी प्रतिशब्द कळले व ते वापरावे हेही पटलं. पण त्याबाबत टोंकाचा अट्टाहास कांही जण करतात तसंही असूं नये, असंही वाटतं. उदा. 'पेन्शन' हा शब्द मराठीत इतका रुळला आहे तर राहुद्यां कीं तसाच, आपला म्हणून.>>>> नाही हो भाऊ. सेवानिवृत्त हा शब्दही काय वाईट आहे का?

'आयकॉनोग्राफी' आणि 'सेमिऑटिक्स' >>> म्हणजे 'चित्रलिपी' आणि 'संकेतलिपी' म्हणता येऊ शकेल!

मस्त. Happy

शब्दश: मराठी भाषांतराचा हट्ट धरण्यापेक्षा त्या संज्ञेचे सोप्या मराठीतून वर्णन करणे जास्त योग्य ठरेल. >> अगदी अगदी. अनुमोदन. क्लिष्ट मराठी प्रतिशब्द अडगळीत जाण्याचीच जास्त शक्यता. आतापर्यंत हजारो वर्षे हेच होत आले आहे.

जपानी लोकांना ही समस्या आली तेंव्हा चक्क तोच शब्द जपानीकरण करून वापरला .
जसे
टॅक्सी म्हणजे तॅ कू शी
प्लेयर = पुरेया
वर्क शॉप= वाकूशोप्पू
ऑफीसर् =ऑफीसा
एयर्पोर्ट=इयपोत्तो
ट्रेन्=तोरेन
स्टेशन्=सुतेशोन
कूली =कूरि
सुपर्व्हायजर= सुपाबैजा
इन्जिनीयर =इन्जिनिया
ड्रायव्हर्=दैबा
टेलिव्हिजन= टेरिबिजाँ वा तेरिबि
रेडियो=रेजियो
इतर अश्या अनेक संज्ञा जपान मधील मा बो मित्र देतील.
जर इंग्रजी शब्द प्रचलित आहे अन कळायला सोप्पा आहे तर या भानगडी कशाला करायच्या?
जपान मध्ये त्यांची भाषा बोलणारेच आहेत पण इन्ग्रजीचा चपखल अन सुंदर रुपान्तरीत प्रयोगाची उदाहरणे वर दिली आहेत
असे हजारो शब्द आहेत अन यातच आपण करीत असलेले प्रयत्न का हास्यास्पद,निरुपयोगी ,अडगळीत टाकण्याजोगे अथवा कालबाह्य ठरतात याचे उत्तरही आहे.

खंडेराव, रैना, आयडू आणि रेव्यु प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

रैना,
खंडेराव +१ नीरजा +१>>> म्हणजे काय? मूळ लेखावर प्रतिक्रियाच नाही! धन्य आहे.

रेव्यु,
तुमचा मुद्दा पटला. मराठीतही आपण टेबल, पंप, टीव्ही इत्यादी शब्द आत्मसात केलेले आहेतच की.
तरीही पारंपारिक मराठी शब्दकोषात वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेले शब्दच आपण न वापरून विस्मृतीत लोटू लागलो तर, ते काही योग्य होणार नाही. आपण काय म्हणता?

म्हणूनच, मूळ लेखाबाबतही आपण काही प्रतिसाद नोंदवायला हवा होतात, असे वाटले. असो. आपली मर्जी.

माझा आक्षेप फक्त जिथे समर्पक मराठी शब्द असताना उगाचच इंग्रजी शब्द वापरणे याला. जसे -
भावना व्यक्त करण्या ऐवजी इमोशन्स एक्सप्रेस करणे, निर्णय घेणे कठीण आहे ऐवजी डिसिजन घेणे डिफिकल्ट आहे, परवानगी ऐवजी परमिशन, उशीरा आला ऐवजी लेट आला. गाडी येण्याची वेळ ऐवजी ट्रेनचा अरायव्हल टाईम, इ. इ. उगाचच का?

दुसरे वाईट म्हणजे, धन्स, विकांत, 'फील गूड झाले' ही कसली भाषा?

या गोष्टी उदाहरणार्थ दिल्या आहेत. हेच शब्द महत्वाचे नाहीत, पण तरी माझा आशय लक्षात यावा.
(पण माझे नाव पाहूनच कित्येक लोक लगेच लिहीतील, "मी मागे एकदा परवानगी हाच शब्द वापरला होता. तेंव्हा झक्की उगीचच काहीच्या बाही लिहितो. वगैरे वगैरे)

मी स्वतः आजपासून मराठी बोलताना इन्टरेस्ट, प्रिसाइज ऐवजी स्वारस्य, अचूक हे शब्द वापरणार आहे.
माझी खात्री आहे माझे इथले (माबोकर सोडून बाकीचे) मित्र हसतील. मी उलट त्यांना हसेन नि विचारीन की त्यांचे बाबा नक्की मराठी होते, की तुझ्या आईची कुणा इंग्रजाशी जवळची मैत्री होती????

'आयकॉनोग्राफी' आणि 'सेमिऑटिक्स' >>> म्हणजे 'चित्रलिपी' आणि 'संकेतलिपी' म्हणता येऊ शकेल!<<<
म्हणायला काय मी एक आणि दोन असंही म्हणू शकते. हाच तर प्रॉब्लेम आहे.
हे एक उदाहरण झाले.
लिपी?????? चित्रलिपी आणि संकेतलिपी या शब्दांच्यात या शास्त्रांसंबंधी सांगणारे काहीही नाही. या शास्त्रांची पूर्ण व्याप्ती येऊच शकत नाही. परत या दोन्ही शब्दांनी दिशाभूल होण्याचाच संभव जास्त आहे. चित्रलिपी हे इजिप्शियन पिरॅमिडस मधे सापडलेल्या लिपीला(Hieroglyphs) पण म्हणतात.
असे नगाला नग शब्द तयार करून भाषा समृद्ध होते हे म्हणणं स्वतःला फसवण्यासारखं आहे.
या शास्त्रांचा खरोखर अभ्यास असलेल्या तज्ञांशी बोलल्याशिवाय असेच तुम्हाला वाटतं म्हणून शब्द प्रचलित करायचे की काय?
हा निव्वळ वृथा अट्टाहास आहे.

साहित्य व संस्कृतीपेक्षा जास्त प्रमाणात विज्ञान, उद्योगधंद्यातल्या पद्धती या सुद्धा परकीयांकडून आलेल्या आहेत. आम्ही शाळेत असताना नत्राम्ल (नायट्रिक अ‍ॅसिड) वगैरे शब्द वापरायचो. पण कॉलेजात इंग्रजी माध्यम झाले, नि बरेच नवीन शब्द प्रथमच कानावर पडले, तेंव्हापासून त्याच शब्दांची सवय झाली आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले शब्द? उगाच अट्टाहासाने त्याचे मराठीकरण केले तरी ते अंगवळणी पडणे कठीण. कारण भारतासारख्या देशात, परप्रांतीयांनी जर बिहारी, तमीळ शब्द वापरले तर किती जणांना कळतील? तसेच मराठी तरी किती जणांना कळेल?
महाविद्यालयातले विषय - मेकॅनिकल, मेटॅलर्जिकल, कार्डिओ, पेडिअ‍ॅट्रिक्स, फार्मसी इ. अनेक शब्द आपण खरे तर पाश्चात्य पद्धतीप्रमाणे उचलले. आता जरी त्याचे मराठीकरण केले तरी उपयोग काय? ते शिकायला इंग्रजी पुस्तकेच वाचावी लागतील ना?
लिमिटेड कंपनी, मार्केटिंग, या संकल्पना कुणाकडून उचलल्या आपण? मेडिकल सेल्समन?
एक धार्मिक विधी सोडले तर आजकालच्या रोजच्या जीवनातले काय आपण इतरांकडून घेतलेले नाही??
कॅप्रि पँटी, टी शर्ट, फर कॅप?

जागतिकीकरणाच्या काळात एकाच भाषेचा आग्रह धरणे कठीण आहे.

खरे तर आजकाल जगातले लोक जपानी, चिनी इ. भाषा शिकतातच, कारण त्या लोकांशी संबंध येतो म्हणून, त्यांच्याशी चांगले संबंध जुळावेत म्हणून.

तशी मराठी एक सुंदर भाषा आहे, ज्यांना साहित्य प्रकारात स्वारस्य आहे अश्या लोकांनी जरूर अभ्यास करावा, मराठी वाचावे, लिहावे. आजकाल म्हणे मराठीत चांगल्या कविता होतच नाहीत असे इथल्याच एका सन्मानित झालेल्या साहित्यिकाचे मत आहे, म्हणून त्यांनी उर्दू का फारशी कवितांबद्दल लिहीले होते!
हे मराठी साहित्यिकांचे मराठीवरील प्रेम व ज्ञान!

नीधप,

या शास्त्रांचा खरोखर अभ्यास असलेल्या तज्ञांशी बोलल्याशिवाय असेच तुम्हाला वाटतं म्हणून शब्द प्रचलित करायचे की काय? हा निव्वळ वृथा अट्टाहास आहे.>>>>>

तुम्ही जे शब्द लिहीलेत त्यांच्याशी संबंधित शास्त्रांचा माझा अभ्यास नाही.

मी काही लिहीले की, तो प्रयत्न म्हणजे शब्द प्रचलित करण्याचा निव्वळ वृथा अट्टाहासच होतो असेही नाही.

कदाचित त्या शब्दांना समर्पक शब्द तुम्ही स्वतःच शोधून देऊ शकाल.

तुम्हाला 'इलेक्ट्रॉनिक्स' शब्दाला मराठी प्रतिशब्द माहीत आहे काय?
खरे तर electronics हा शब्द इंग्रजीतही पूर्वी नव्हताच की. ज्या उत्पत्ती-विषयक-तर्काने तो इंग्रजीत निर्माण झाला, त्याच तर्काने तो मराठीतही निर्माण होऊ शकतो. जसे की:

विजेचा कण म्हणजे (विज +कण)=विजक आणि विजकाचे शास्त्र म्हणून विजक-शास्त्र किंवा विजक-विद्या. तेव्हा इलेक्ट्रॉनिक्सला मी 'विजकविद्या' हा शब्द सुचवतो आहे.

तुम्ही स्वीकाराल काय?

की हा नव्याने घडवलेला मनघडन शब्द मराठीस नवा असून इलेक्ट्रॉनिक्स हाच मराठीत रुळलेला शब्द आहे असे म्हणाल?

नाही स्वीकारणार. कारण तो स्वीकारण्यामागे केवळ मराठी शब्द तयार केलाय यापलिकडे काहीही लॉजिक नाही. मला खरंच हा वृथा अट्टाहास वाटतोय. याने मराठीचे संवर्धन होते?

>>> महाविद्यालयातले विषय - मेकॅनिकल, मेटॅलर्जिकल, कार्डिओ, पेडिअ‍ॅट्रिक्स, फार्मसी इ. अनेक शब्द आपण खरे तर पाश्चात्य पद्धतीप्रमाणे उचलले. आता जरी त्याचे मराठीकरण केले तरी उपयोग काय? ते शिकायला इंग्रजी पुस्तकेच वाचावी लागतील ना?<<<
हे झक्कींनी कदाचित उपरोधाने लिहिले असेल कदाचित नाही. कल्पना नाही. पण उपरोधाने न घेता हा मुद्दा पटण्यासारखा आहे.

कॅप्रि पँटी, टी शर्ट, फर कॅप? <<<
या वस्तूच त्यांच्या घेतल्या तर शब्द आपले हा अट्टाहास का? ते धोतराला, साडीला, नथीला, पोहेहाराला इंग्रजी शब्द नाही शोधत. (झक्कींनी उपरोध, चेष्टा किंवा अजून कशा अर्थाने म्हणलेय मला माहित नाही. मी सरळसोट अर्थांबद्दलच बोलतेय.)

मूळ लेखातल्या मराठीकरण केलेल्या शब्दांशी माझा आजतागायत संबध आलेला नाही आणि यायची शक्यता नाही. चुकून आलाच कधी संबंध तेव्हा मी गोंधळ टाळण्यासाठी माझ्यापेक्षा त्या क्षेत्रातलं ज्याला माहितीये त्याचे म्हणणे मान्य करेन.

मराठीत किंबहुना उपकरणनशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात परंपरेने वापरात असलेलेच ते शब्द आहेत.

केवळ आपल्याला माहीत नाहीत म्हणून,
instrumentation ला 'उपकरणन' न म्हणणे हाच खरे तर मला वृथा अट्टाहास वाटतो आहे.

त्यातून भर पुण्यात 'उपकरणीकरण' असा वाक्प्रचार निर्मिणारे लोकही आहेतच.

आता, 'असतात एकेकाची मते' म्हणून सोडून द्या झाले!

instrumentation ला 'उपकरणन' न म्हणणे <<<
हे कुठे म्हणाले मी?
ज्यावेळेला माझा या विषयाशी चुकून संबंध येईल त्यावेळेला जो माझ्यासमोर माझ्यापेक्षा जास्त माहिती असलेला असेल त्याचे म्हणणे मान्य करेन असं लिहिलंय याचा अर्थ तुम्हाला समजत नाहीये का?

instrumentation ला 'उपकरणन' न म्हणणे <<<
हे कुठे म्हणाले मी?>>>>> मीही तसा दावा केलेला नाही.

तुमच्या म्हणण्याचा अर्थ मला कळला. पण मग समोरचा जाणता तुम्हाला 'उपकरणिकरण' सांगेल तर तुम्ही तो शब्द प्रमाण मानाल असेच तुम्हाला म्हणायचे आहे ना? तसे असेल तर ते योग्य ठरेल का? तुम्हीच विचार करा.

संशोधन नंतर करता येते. आधी शोधच घ्यायला लागतो. आपल्या मातृभाषेत असलेल्या शब्दांचा.

तो शोधच अपुरा असेल तर आपण मातृभाषेपेक्षा इंग्रजीस जास्त प्रयत्नपूर्वक शिकतो असे नाइलाजाने म्हणावे लागेल.

गोळेसाहेब, तुमची कळकळ मला समजते, पण तुम्ही म्हणता तसे करणे फारसे उपयोगी नाही असे माझे मत आहे. मर्यादित प्रमाणात स्वारस्य, अचूक असे शब्द वापरात आणणे सोपे आहे. पण इंग्रज बाईला नऊवारी नेसवून, नाकात नथ घालून नि पोहेहार (म्हणजे काय असते, देव जाणे) दिले तरी ती मराठी होईल का?

झक्कींनी उपरोध, चेष्टा किंवा अजून कशा अर्थाने म्हणलेय मला माहित नाही.
नाही हो. ते आमच्या बा. रा. बा. फ. वर चालते.
या असल्या धाग्यांवर तसले काही लिहायचे नाही असे ठरवले आहे. बघू कितपत जमते.

आधी शोधच घ्यायला लागतो.
हे असे शोध हजार वर्षांपूर्वी घेतले होते. ते सगळे मुसलमान, इंग्रजांच्या मुळे आपणच विसरलो! आता जगायचे तर इलेक्ट्रॉनिक्स ला उगाच विजकविद्या म्हणून फारसा उपयोग नाही.
काही तरी नवीन कधीतरी निर्माण करा, त्याला मराठी नाव द्या नि मग बाकीचे लोक मराठी नावे स्वीकारतील. एखादी धमाल लोकप्रिय साईट करा इंटरनेटवर, त्याला मराठी नाव द्या, नि मग बघा लोक ती नावे वापरतील की नाही. असे उत्तम साहित्य, सिनेमे, नाटके तयार करा की त्यासाठी लोकांना वाटले पाहिजे की आपण मराठी शिकावे. जसे लोक बंगाली शिकले, इंग्रजी शिकले.

माझ्या अमेरिकन जावयाला आजकाल बरेच मराठी शब्द माहित झाले आहेत व तो ते वापरतो. जसे भाजी, पुरी, 'मंगलसूत्र'!

(खास स्त्रीस्वातंत्रवाल्या स्त्रियांना सूचना: माझी मुलगी किंवा सौ मंगळसूत्राला गुलामगिरीचे द्योतक न समजता, कधी कधी ते चांगले दिसते म्हणून वापरतात! चांगले म्हणजे नुसतेच कपड्यांना शोभून दिसेल या अर्थाने नव्हे तर कधी काळी काही धार्मिक समारंभाला तसे करणे उचित ठरते म्हणून. आवडत नसेल तर धार्मिक समारंभाला जाणार नाहीत, पण गेल्या तर नीट वागतील. नको तिथे नको त्या गोष्टी आणण्यात काही स्वारस्य नाही! )

>>> केवळ आपल्याला माहीत नाहीत म्हणून,
instrumentation ला 'उपकरणन' न म्हणणे हाच खरे तर मला वृथा अट्टाहास वाटतो आहे.

मीही तसा दावा केलेला नाही.

तुमच्या म्हणण्याचा अर्थ मला कळला. पण मग समोरचा जाणता तुम्हाला 'उपकरणिकरण' सांगेल तर तुम्ही तो शब्द प्रमाण मानाल असेच तुम्हाला म्हणायचे आहे ना? तसे असेल तर ते योग्य ठरेल का? तुम्हीच विचार करा. <<<

गंमतच्चेय.

असो. हे बघा मी एक अतिसामान्य वेशसंकल्पक आहे. इंजिनियरींगच्या कुठल्याही विषयाचा माझा काय संबंध की मी त्यातल्या मराठी प्रतिशब्दांसाठी संशोधन करण्यात माझे डोके आणि वेळ वाया घालवावा? तेव्हा अश्या वेळेला त्या क्षेत्राची माहिती असलेल्यावर विश्वास ठेवावा पुढे जावे. असा माझा सामान्य दृष्टीकोन आहे.

आता महाकंटाळा आला. तुम्ही हा धागा विरंगुळा विभागात काढलायत याचा योग्य तो अर्थ घेईन आता मी.

नरेंद्र गोळे, लेख चांगला आहे.
नेहेमीच मराठी वापरणे कदाचित शक्य होणार नाही मलातरी, पण कुणी वापरत असेल तर खरच चांगले आहे.

इथे मुद्दम रेव्यु यांच्या पोस्ट साठी उत्तर देतेय.
रेव्यु यांनी दिलेले शब्द अशा प्रकारे उच्चारले जातात कारण जपानी मधे इंग्रजीमधे असलेले सगळे उच्चार करताच येत नाहीत. मग त्यातल्या त्यात जवळचे वाटेल असे हे उच्चार घेतले आहेत. पण... जपानी मधे बहुतेक सर्व शब्दांना खास जपानी शब्द आहेत. नुसता शब्दच नाही तर कांजी म्हणजे त्यांची चित्रलिपी वापरुन ते लिहिताही येतात. सर्व नविन वैज्ञानिक संज्ञा पुर्णपणे जपानीमधे लिहीता येऊ शकतात. विज्ञानात नविन आलेल्या इंग्रजी शब्दांना योग्य जपानी शब्दही असतो ( कोण ठरवतं ते माहित नाही ) पण माझ्या अतिसिमित ज्ञानानुसार ते उत्पत्ती विषयक तर्काने बनवले आहेत असे म्हणायला वाव आहे. यातुनही काही शब्द परभाषेतले वापरले जातात, नाही असे नाही.

हे पान वाहतं झालंय का? त्याचा धागा करता येईल का? वर लिहिलेले रूनीचे, माझे, इतरही काही होते ते प्रतिसाद दिसत नाहीत.

सहसा आयकॉनोग्राफी ही सर्वसाधारणपणे प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाशी (भारतीय संदर्भात बोलतेय) निगडीत असल्याने त्याला मराठी/ हिंदी प्रतिशब्द आहे... मूर्तीशास्त्र. हाच शब्द अधिकृतरीत्या वापरला जातो. आणि जास्तच साधारणपणे वापरायचा असेल तर त्याला प्रतिमाशास्त्र म्हणता येईल. चित्रलिपी आणि याचा काहीही संबंध नाही. चित्रलिपीचा इंग्लिश अनुवाद/ प्रतिशब्द पिक्टोग्राफ असा आहे.

सेमिऑटिक्स ला सुद्धा भाषाशास्त्रात नक्कीच अधिकृत प्रतिशब्द असणार.. इतकी वर्षे मराठी विद्वान या विषयांमधे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताहेत. तेव्हा त्यांनी वापरलेले शब्द जास्त बरोबर असणार.

खंडेराव, +१

जागतिक दृश्य कला संदर्भाने घ्यायचे तर मूर्तिशास्त्र हा शब्द पण कमी पडतो ना मग वरदा.
असो मुद्दा ह्या अट्टाहासाबद्दल आहे.

अनुमोदन नी. दोन्ही मुद्यांबाबत.
मुळातच कुठल्याही भाषिक अट्टाहासाने काही साध्य होतं असं मला वाटत नाही. आणि मुळात भाषा प्रवाहित राहिली नाही, बाहेरचे प्रभाव आत्मसात करून पुढे जाऊ शकली नाही तर ती कशी जिवंत रहाणार? इंग्लिश भाषा अगदी उत्तम उदाहरण आहे...
आणि शेवटी 'मूळ' म्हणून नक्की काय भाषा वापरणार? संस्कृत? ती आर्ष की अभिजात की मध्ययुगीन? की प्राकृत? त्या ६ आहेत - त्यातली कुठली? कुठल्या कालखंडातली? बरं या सगळ्यात आसपासच्या भाषा/ बोलींमधून शब्दांची आयात झाली आहे असं भाषाशास्त्रज्ञ म्हणतात... Uhoh

एकदम 'सॉलिड' चर्चा चालुये Wink ... विरंगुळा मधे!!
>> काही तरी नवीन कधीतरी निर्माण करा, त्याला मराठी नाव द्या नि मग बाकीचे लोक मराठी नावे स्वीकारतील.
झक्कींना अनुमोदन! नाहितर उगाच व्हिटीच सिएस्टी करुन काय होणार!

खंडेराव, +१
नी +१
वरदा +१.

उगाच शब्दकोषामधे आहे म्हणून क्लिष्ट (किंवा वापरायला सोपे नसलेले) शब्द प्रचारात आणायचा प्रयत्न केला तर ते शासकिय मराठीसारखे होईल.

सावली
मित्सुबिशीमध्ये मी साधारण आठ वर्षे नोकरी केली व त्या अनुषंगाने जपानी मित्रांशी संपर्क आला.मी लिहिलेले शब्द (त्यांना मी विचारल्यावर त्याचे जपानी समानार्थी शब्द कोणते व त्यांचे उच्चार) मी लिहिल्याप्रमाणे आहेत व ते मी इथे लिहिलेले आहेत्.माझ्या मते ते अपभ्रंश नसून त्याच प्रकारे प्रचलित होते व माझ्याशी बोलताना वा एकमेकांशी जपानी भाषेत बोलतना वापरले गेले हे माझ्या निरिक्षणात आले.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे आणखी काही अस्खलित जपानी शब्द ही या शब्दांना समानार्थी असतिलही.

छान