अमेरिकन मुलांना दिलेले भारतीय संगीताचे धडे

Submitted by आशयगुणे on 4 November, 2011 - 16:21

समूहात राहून एका ठराविक साच्यात आयुष्य जगायचे हा माझा स्वभाव नाही. एकतर आपण स्वतःचे व्यक्तिमत्व विसरून जातो आणि दुसरं म्हणजे आपला वैयक्तिक विकास काहीच होत नाही. अमेरिकेत बऱ्याच भारतीय विद्यार्थ्यांचे असेच काहीतरी असते. सोमवार ते शुक्रवार विद्यापीठात काम केले की वीकेंडला पार्टी करायची. फार-फार तर पब्स आणि डिस्को मध्ये जाऊन यायचे आणि उरलेला वेळ आपण जाऊ ती जागा न पाहता त्या जागेत स्वतःचे हवे तेवढे फोटो काढून फेसबुकवर टाकायचे! Wink पब्स आणि डिस्को किव्हा पार्टी करणे ह्याला माझा विरोध अजिबात नाही. आणि का असावा? त्यातसुद्धा एक वेगळीच मजा असते! पण सारख्या ह्याच गोष्टी करून त्यात धन्यता मानण्यात काहीही अर्थ नाही.
हे 'असले' विचार असल्यामुळे मी समूहात राहून सुद्धा माझे स्वतःचे एक अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात होतो. आणि त्यात बऱ्यापैकी यश देखील आले. मी जिथे जातो तिथल्या सामान्य माणसाशी बोलण्यात मला खूप आनंद मिळतो. एकतर त्या जागेची जीवनपद्धती समजते आणि दुसरे म्हणजे 'माणूस' ह्या प्राण्यातले बरेच समान धागे सापडतात. दुसरी मला एक अतिप्रिय असलेली गोष्ट म्हणजे संगीत. ह्या जगात किती भाषा आहेत मला माहिती नाही. परंतु 'सात सुरांची भाषा' अखंड जगात एक असो हाच केवढा मोठा चमत्कार आहे! सामान्य माणसाशी बोलायच्या माझ्या स्वभावामुळे अनेक वल्ली मला भेटल्या. त्यातील काहींबद्दल मी लिहिण्याचा प्रयत्न देखील केला आहे. आणि अजून बऱ्याच लोकांचे चित्रण करणे बाकी आहे. ( पहा : http://relatingtheunrelated.blogspot.com ) संगीताबद्दल मी हेच म्हणीन! अनेक अनुभव आले .....त्यातील एक अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो. भारतीय संगीतासाठी काहीतरी करावे ही इच्छा अमेरिकेत पाउल ठेवले त्यादिवशीपासून होतीच. पण मी ह्युस्टन ह्या शहरी असताना तिथल्या विद्यापीठात संगीत विभाग नव्हता. एक पियानो ठेवलेला असायचा. मी अनेक तास तो वाजवत बसायचो. एक 'उत्कृष्ट वादक' इथपासून ते 'एक विक्षिप्त माणूस' इथपर्यंत माझी ख्याती तेथील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये पसरली होती! पण काही कारणांसाठी मी विद्यापीठ बदलले आणि ' san antonio ' ह्या शहरी बस्तान बसवले. तेथील विद्यापीठात मात्र संगीत विभाग होता!
मी विद्यापीठाच्या 'बुक- स्टोर' मध्ये काम करताना जॉर्ज नावाचा माझा एक मित्र झाला होता. माझे नशीब इतके थोर की तो संगीत शिकणारा विद्यार्थी निघाला. त्यालाच मी गळ घातली....माझी तुमच्या प्रोफेसरांशी भेट घालून दे ना! तोसुद्धा लगेच तयार झाला! आणि एके दिवशी आम्ही आमची वेळ जमवली आणि तो मला संगीत विभागात घेऊन गेला. त्या इमारतीत शिरल्याक्षणी मी जे पाहिले ते मी अजून विसरू शकत नाही! कुणी गिटार वाजवतंय, कुणी जिन्यात बसून संगीताच्या चर्चेत गर्क आहे, कुणी फ्ल्यूटचा रियाझ करतोय. पुढे चालत गेलो तर एक मुलगी मुक्तकंठाने गात होती! बाहेरचे जग आणि आतले हे संगीताचा अभ्यास करणारे जग.....किती फरक! वास्तविक हे सारे त्यांना काही नवीन नाही....संगीताचा विभाग म्हणजे संगीताचाच अभ्यास झाला पाहिजे ना! परंतु, माझ्या देशातील पुस्तकांना वाहिलेले विद्यापीठ इतके दिवस मनात. डोक्यात 'आपलेच संगीत श्रेष्ठ' अशी समजूत करून ठेवलेले आपल्याकडचे प्राध्यापक मुलांना सुरांच्या 'विहिरीत' पोहायला लावतात! आणि मग जेव्हा त्या पोराला सागरात पोहायची वेळ येते तेव्हा त्याला तेथील मुक्ततेचे असे नवल वाटते! असो, आपण जीवनात 'खुलेपण' केव्हा आणू हा वेगळा विषय झाला!
" How can I help you ?" चेहऱ्यावर नैसर्गिक हास्य आणून तिथल्या 'receptionist ' ने आम्हाला विचारले. पुढचे काम जॉर्जने केले. " हा माझा मित्र आशय. हा संगीत विभागाचा विद्यार्थी नाही. परंतु हा त्याच्या देशात, म्हणजे भारतात शास्त्रीय संगीत वाजवतो आणि ह्याला आपल्या विभागासाठी काहीतरी करायचे आहे. ह्याला काही मदत मिळू शकेल का?" " व्ह्य नॉट!" ती उद्गारली. " आम्ही आमच्या विभागात नेहमी काहीतरी नवीन विचार आणण्याचा प्रयत्न करीत असतो. तू जर तुझ्याकडचे ज्ञान देणार असशील तर आम्हाला आनंदच आहे. थांब मी तुला डॉ. ब्रील चा e -mail देते. ते 'world music ' शिकवतात. ते तुला नक्कीच मदत करतील." आणि दोन वाक्यात माझे काम झाले. पुढे ब्रील साहेबांना e - mail केलं आणि त्यांचे ही लगेच उत्तर आले. मला एका बुधवारी दुपारी १ ला भेटायला बोलावले. त्यंच्या ऑफिस चे वातावरण सुद्धा विलक्षण! मंद प्रकाश पसरलेला. टेबलवर काही मोजकेच कागद. ( सहीसाठी तंगवून न ठेवण्याचे लक्षण! Wink ) आणि वातावरणाला साजेसे संगीत! अमेरिकन लोकं मेहनती अश्यामुळे असतील कदाचित.....अश्या वातावरणात काम करायला कुणाला नाही आवडणार! " ये, बस...", दाढीदीक्षित डॉ. ब्रील म्हणाले. मी माझी ओळख करून दिली. "मी भारतातून बायो शिकायला जरी आलो असलो तरी ते माझ्या मिळकतीसाठी....माझ्या आयुष्यात अव्वल स्थान हे संगीतालाच आहे." त्यांना माझे म्हणणे पटले. " तू असं कर... आमच्या वर्गात नवेंबर महिन्यात आम्ही भारतीय संगीत शिकवणार आहोत. एक अक्खा आठवडा आहे. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी माझे क्लासेस होतात. तर तू बुधवारी लेक्चर दे. एवढंच काय, तू आमच्या वर्गात इतर वेळेला पण येऊ शकतोस...मुलांशी गप्पा मारू शकतोस. आम्ही एक रेकॉर्ड ऐकतो आणि नंतर त्यावर चर्चा करतो.....तू काहीतरी वाजव आणि आपण त्याच्यावर चर्चा करू!" हे सगळे मला अनपेक्षित होते. पहिल्याच भेटीत हा एवढा प्रतिसाद! ' बघूया.... काहीतरी करू....जमवुया...." ही भाषाच नाही कुठे. कुठला मी भारतातून आलेला मुलगा....आणि कुठले हे प्रोफेसर. पण अमेरिकेत ' talent ' ला कदर आहे ती अशी! नंतर मी त्यांच्यापुढे विद्यापीठात एक 'म्युसिक क्लब' काढायचा प्रस्ताव मांडला. त्याला देखील " अरे तू फक्त प्रस्ताव घेऊन ये....मी लेगच सही देतो", असे आश्वासन दिले!
पुढचे काही दिवस मी हवेत होतो! आपल्याला आपल्या आवडत्या क्षेत्रात काहीतरी करायला मिळतंय हा आनंद माझ्या मनात संचारला होता. आणि मी काय पेश करायचे हा विचार करू लागलो.
आणि तो दिवस उजाडला. त्या दिवसाआधी शनिवारी मी ह्युस्टनला उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचा तबला ऐकला होता आणि त्यांच्याबरोबर फोटो देखील काढला होता. त्यामुळे कदाचित, आत्मविश्वास दुप्पट होता आणि एकदम अनोळखी लोकांसमोर कसे बोलावे ह्याचे दडपण वाटत नव्हते. खुद्द झाकीर ने अमेरिकेत घेतलेल्या workshops आणि दिलेले interviews मी त्यादिवसात पाहून घेतले. आणि ह्या अमेरिकन लोकांसमोर कसे बोलायचे ह्याचा अंदाज मनात करून घेतला. आणि बरोबर २ वाजता लेक्चर द्यायला पोचलो. डॉ ब्रीलने माझी ओळख करून दिली. " सोमवारी आपण भारतीय संगीताबद्दल ओळख करून घेतली. आज आपल्याकडे भारतातून इकडे शिकायला आलेला एक मुलगा आहे. त्याचे नाव आशय. तो आपल्याला पियानोवर वाजवून दाखवेल आणि नंतर अजून आपली थोडी ओळख वाढवेल." सर्व मुलांनी माझे टाळ्या वाजवून स्वागत केले. आणि मी पियानो वाजवायला सुरुवात केली.
" आमच्या संगीतात आम्ही काही ठराविक सूर वापरून राग मांडतो. त्याच्या पलीकडे कुठले सूर वापरले तर ती एक घोर चूक मानली जाते. हे म्हणजे ५-६ रंगांनीच चित्र रंगवल्या सारखे आहे. सुरुवातीला मर्यादा वाटतात पण एकदा बढत करायला घेतली तर त्याच्यासारखी मजा नाही", मी सांगू लागलो. पहिल्या रांगेत बसलेल्या २-३ मुली अगदी आश्चर्याने ऐकत होत्या. त्यांच्यासाठी हे अगदीच नवीन होते. आणि मी 'राग शुद्ध सारंग' सुरु केला. सुरुवातीला हळुवार लयीत सूर छेडले, व नंतर हळू हळू लय वाढवीत गेलो. नोम-तोम चे आलाप झाले, छोट्या ताना झाल्या आणि वादन संपवलं तेव्हा २० मिनिटे उलटून गेली होती! टाळ्यांचा कडकडाट झाला. एवढ्या उत्साहाने भारतातसुद्धा कुणी टाळ्या वाजवल्या नव्हत्या.....तो क्षण काही औरच होता! Happy आणि मी उठलो आणि व्यासपीठावर जाऊन पोचलो. आता मला लेक्चर सुरु करायचे होते.
सुरुवातीला शेहनाईचा विडीओ दाखवला. बिस्मिल्लाखान ह्यांनी वाजवलेल्या राग मुलतानी ने वातावरण सूरमय झाले!
http://www.youtube.com/watch?v=R9_Fkbg7QBY
माझ्या वाजवण्याने जो काही संगीताचा अपमान झाला असेल तो भरून निघाला! आणि हळू हळू पोरांचे चेहरे कुतूहल दर्शवू लागले. कुठले आहे हे वाद्य? कोण आहे हा वाद्य-फुंकणारा माणूस? शेवटी मी स्वतः त्यांना कलाकाराचे नाव सांगितले आणि म्हणालो - " he is the pied-piper of India". वर्गात हशा झाला. त्यानंतर बासरी सुरु झाली. हरिप्रसाद चौरासियांनी वाजवलेला 'राग हंसध्वनी' मी त्यांना दाखवला.
http://www.youtube.com/watch?v=R5w7ToxsrUw
त्या वर्गात, उत्कृष्ट ध्वनी-योजनेत बासरीने लगेच रंग भरला. पोरांचे हात ताल धरू लागले! माना हलू लागल्या. काही मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य प्रकट झाले. मी हे सारे आनंदाने पाहत होतो.
नंतर मी पोरांना सारंगी आणि वायोलिन च्या दोन चित्रफिती दाखवल्या. सारंगीवर उस्ताद सुलतान खान ह्याने वाजवलेले हे लोकगीत होते -
http://www.youtube.com/watch?v=1tc7xUEiisE
आणि वायोलिन वर वी. जी जोग ह्यांची ही चित्रफित:
http://www.youtube.com/watch?v=EXnEj0ceuHU
ह्याच्यात झाकीरने केलेल्या तबल्याच्या साथीला साऱ्यांनी माना डोलावल्या. पण मला त्यांना वायोलिन दाखवायचे होते म्हणून मी तबल्याकडे थोडावेळ दुर्लक्ष केलं. पण पुढील १० मिनिटात झाकीर काय मजा करणार आहे ह्याची मला तेव्हा कल्पना नव्हती! ह्यानंतर तार- वाद्य दाखवायची वेळ आली. रवी शंकर आणि अली अकबर खान ह्यांच्यामुळे ही वाद्य अमेरिकेत लोकप्रिय देखील आहेत. त्यात मी अली अकबर खान ह्यांचे हे वादन दाखवले-
http://www.youtube.com/watch?v=qzDx7vgluq0
अली अकबर ह्यांच्या कॅलिफोर्निया मधल्या कॉलेज बद्दल सुद्धा मी त्यांना माहिती दिली. आणि नंतर विलायत खान ह्यांची सतार ऐकवली. ह्या सतारीवर तिथले लोक मात्र कमालीचे फिदा झाले! तार एवढ्या अलगद कशी काय छेडली जाऊ शकते ह्याचे आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते! काही काही मागे बसलेले उत्साही तरुण हवेत सतार वाजवावी अश्या रीतीने बोटे फिरवत होती. सात-समुद्र पार असलेले संगीत, केवळ सुराच्या ताकदीमुळे काय चमत्कार घडवू शकते हे मी आनंदाने पाहत होतो!
http://www.youtube.com/watch?v=YojJ7JC5zNk
त्यानंतर मी शिवकुमार शर्मांची संतूर वर एक पहाडी धून ऐकवली. त्याला देखील प्रचंड दाद मिळाली!
http://www.youtube.com/watch?v=83K7FZD9qgM
आणि नंतर आला तबला. ताल-वाद्य म्हणून मी पखवाज सुद्धा दाखवला. पण खरी मजा आणली झाकीर हुसैन ने! त्याची ही चित्रफित मी दाखवली तेव्हा समोर बसलेल्या लोकांच्या माना, हात, पाय आणि नंतर एकूण शरीर तालमय होऊन गेलं! ही मुलं तो तालाचा अविष्कार पाहून बाक वाजवू लागले. एकमेकांकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहू लागले. आनंद share करू लागले! झाकीरने सामान्य लोकांपर्यंत तबला पोचवला ह्याचे अजून कुठले उदाहरण मी देऊ? कोण कुठली ही अमेरिकन लोकं आणि कुठलं हे दूर-देशातील संगीत!
http://www.youtube.com/watch?v=As1OMMcHXFs
शेवटच्या चित्रफितीने मात्र ह्या साऱ्यावर कळस चढवला! बासरी आणि तबला ह्यांच्यातील बातचीत त्यात दिसते. हे त्या पोरांना इतके आवडले की त्यांनी टाळ्यांचा कडकडात केला!
http://www.youtube.com/watch?v=_WLwoQSIKv4
३ वाजले होते. वेळेत माझे लेक्चर संपले. माझ्या आयुष्यातला कधीही न विसरणारा तो एक तास! ७ सुरांनी माझे मन आणि त्या अमेरिकन अनोळखी मुलांचे मन जोडणारा तो एक तास! एक भारतीय म्हणून मनात गर्व वाटणारा तो एक तास. आणि त्या अमेरिकन लोकांची दाद देण्याची प्रवृत्ती दाखवून देणारा तो एक तास.
पुढे कधी संगीत विभागाच्या जवळून गेलो तर मुलं विचारायची, " तूच न तो ज्याने आम्हाला त्या दिवशी भारतीय संगीताबद्दल सांगितले. इट वॉज टू गुड!" आणि माझा दिवस पुढे आनंदात जायचा!
आज ४ नवेम्बर २०११. एकदम लक्षात आले की ह्या घटनेला एक वर्ष झाले. म्हणून लिहावेसे वाटले!

- आशय गुणे

गुलमोहर: 

तुझ्या सर्व लेखांमधे नक्कीच वाचनीय, श्रवणीय असे काहीतरी असतेच, त्यामुळे कुठल्याही लेखापुढे "आशयगुणे" नाव दिसले की तो लेख न वाचता पुढे जाणे माझ्याच्याने तरी अशक्यच.......
पु ले शु......

आज रविवार...घरी सुट्टीची मजा घेता-घेता आपल्याला प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद देतो! मी नक्कीच लिहिणार आहे....भरपूर अनुभव share करायचे आहेत! Happy

पुरंदरे शशांक: ह्या साऱ्या 'उस्तादांमुळेच' माझ्या लेखाची नसलेली उंची वाढली आहे! Happy Happy

दिनेशदा: मी गात नाही! मी आधी हार्मोनियम वाजवायचो.....त्याचे रुपांतर आता पियानो मध्ये केले आहे. ह्या क्षेत्रात काहीतरी करायची इच्छा आहे.... म्हणून माझ्या चित्रफिती येथे उपलोड केल्या आहेत! अशा करतो आपल्याला आवडतील! Happy

http://www.youtube.com/user/agune1987

बापरे, अमेरिकेत जाऊन तिथल्या प्रोफेसर ला पट्वून तिकडच्या पोरांना लेक्चर दिले?

अ‍ॅचिव्हमेंट अनलॉक्ड .. वे टू गो Happy

धन्यवाद! सहज म्हणून सांगतो. मी 'भारतीय संगीतात' काहीतरी केले ( खूप असे नाही, परंतु एक प्रयत्न )असूनसुद्धा मला माझ्या अमेरिकेतील भारतीय मित्रांकडून काहीच प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत. अमेरिकन मित्र वारंवार माझे अभिनंदन करीत होते. आपल्याशी हे अनुभव 'share ' करून आणि आपल्या प्रतिक्रिया वाचून एक वेगळाच आनंद मिळाला! शेवटी मनुष्याला काहीतरी सांगावेसे वाटतेच ना....ते मायबोलीमुळे मिळते आहे! पुन्हा एकदा धन्यवाद! Happy

तुझ्या सर्व लेखांमधे नक्कीच वाचनीय, श्रवणीय असे काहीतरी असतेच, त्यामुळे कुठल्याही लेखापुढे "आशयगुणे" नाव दिसले की तो लेख न वाचता पुढे जाणे माझ्याच्याने तरी अशक्यच.......
पु ले शु......>>>> प्रचंड अनुमोदन Happy

आशय , नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर.
तू दिलेली यु -ट्यूब वरची क्लीप पाहीली/ऐकली आणि थक्क झाले.
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी(मी चुकत नसेन तर), तू मायमराठीतून इतक्या सुंदर रीतीने व्यक्त होतो आहेस की काय म्हणू तुला. तुझे प्रचंड कौतुक.
असाच लिहित रहा.:)

वाह ! निवांत वेळात तुम्ही दिलेल्या लिंक्स आणि तुमचे वादनही जरूर ऐकेन.
पियानोवर राग शुद्ध सारंग कसा वाटेल याची कल्पना करतो आहे. अदनान सामीने पियानोवर वाजवलेला राग दुर्गा ऐकलाय त्यामुळे शुद्ध सारंगही मस्तच वाटेल यात शंका नाही.
तुम्हाला तुमच्या कामात सुयश लाभो !!

-चैतन्य.

हा अनुभव आवडला. काही गोष्टींशी वैयक्तिक अनुभवांमुळे रिलेट करता आले ते असो.

छान Happy

सर्वांना धन्यवाद!
विशेष धन्यवाद : सुजा , चैतन्य दीक्षित , कौशी, आगाऊ
चैतन्य: अदनानचे वादन आहेच उत्कृष्ट! Happy

Pages