कचरा व्यवस्थापन - एक सामाजिक बांधिलकी.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आपल्याला अजुन प्रकर्षाने जाणवत नसला तरी शहरांमधील कचरा हा एक अतिशय गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्ण बनत चालला आहे, त्या विषयी थोडेसे.

पुर्वी मी एका रिकाम्या कुंडीत ओला कचरा वाळवुन, नंतर झाड लावताना तो मातीत मिसळत असे. नंतर-नंतर झाड लावलेल्या कुंडीतच ओला कचरा टाकु लागले. त्याचा फायदा असा होतो की भुईमुग, कारले, दुधी, टोमॅटो, झेंडु, सिताफळ, रामफळ, पपई, मोसंबी, डाळींब अशी बियांपासुन उतरणारी अनेक रोपे कुंडीतुन डोकवायला लागतात. ती थोडी मोठी करावी आणि ज्यांच्याकडे लावण्या योग्य जागा आहे अशा कुटुंबाला किंवा संस्थेला देउन टाकावी, असा एक छंदच जडला. पण मग अनेक जणांकडुन ऐकले की असा कचरा कुजुन मातीत मिसळायला ६-८ महिने लागतात, कल्चर वपरले तर ही प्रक्रिया २-३ महिन्यांत पुर्ण होते.

मला माहीती असलेले गांडुळ खत तर मला नको होते. [ कुंडीतुन जरी ती बाहेर येत नसली तरी रात्रभर माझ्या स्वप्नात मात्र नक्किच आली असती. Happy ] इतर पर्याय कोणते, त्याचा कालावधी, त्याचे फायदे सगळेच तपशिलवार माहीती करुन घ्यायचे होते. पण या बरोबरच मिळालेली 'करात' मिळणारी ५% सुट ही माहीती माझ्या साठी एक सुखद धक्काच होता.

रवीवारी, १५ फेब ०९, 'निसर्गसेवक', पुणे आयोजित 'कचरा व्यवस्थापन' कार्यशाळेत सहभागी होण्याचा योग आला. मान्यवरांच्या मार्गदर्शना पाठोपाठ २ महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या विषयी थोडे सांगायलाच हवे. त्यातल्या एक घरोघरी साफसफाई ची कामे करतात. एका घरी त्यांनी बघितले की आपल्या मालकीण बाई 'कचरा व्यवस्थापन' करुन त्यापसुन खत तयार करतात. लगेचच त्यांनी इतर घरांमधला ओला कचरा वेगळा काढुन या बाईंना आणुन द्यायला सुरुवात केली. आणि आजही त्या हे काम नियमीत पणे करत आहेत.

दुसर्‍या एक जण होत्या, त्या ज्या परिसरात कामाला जातात त्या संपुर्ण परीसरातील सर्व घरांमधुन टाकण्यात आलेल्या कचर्‍याचे 'ओला' आणि 'सुका' असे विभाजन गेली अनेक वर्षे सातत्याने करतात. घट्ट बांधलेल्या प्लास्टिक पिशव्यांमधुन तो कचरा बाहेर काढणे, त्याची द्रुगंधी सहन करुन त्याची विभागणी करणे आणि हे सगळे एक व्रत म्हणुन, कुठलाही मोबदला न घेता.

सौ. शामला देसाई, 'मॉडेल कॉलनि परिसर सुधारणा समीती' तर्फे गेली ३० वर्षे , डॉ. आनंद कर्वे, 'आरती' संस्थे मार्फत २५ वर्षे, सकाळ एक सदराच्या माध्यमातुन गेली दिड पावणे दोन वर्ष, आणि अजुन कितीतरी लोक या विषयावर जागरुकतेच काम करत आहेत. पण एक गोष्ट मला त्यादिवशी जाणवली की कचरा करणार्‍या लोकांच्या तुलनेत काम करणार्‍यांचे प्रमाण खुपच कमी आहे. थोडक्यात, 'प्रचार' आणि 'प्रसार' आवश्यक आहे. Happy

वेगवेगळ्या संस्था आणि वैयक्तिक पातळीवर अनेक वर्षे काम करणार्‍या तज्ञ लोकांकडुन त्यांचे अनुभव आणि माहीती त्या कार्यशाळेत मिळाली. सामाजिक बांधिलकी मानणार्‍या आणि जपणार्‍या मायबोली परिवारास त्याचा नक्कीच उपयोग होईल असे वाटले म्हणुन 'डायरी' ऐवजी 'रंगीबेरंगी' वर लिहावे असे ठरवले.

सगळ्यात प्रथम ओला कचरा आणि सुका कचरा याचे वर्गिकरण बघुया.

ओला कचरा - [कुजणारा - निसर्गनिर्मीत]
भाज्यांच्या साली- देठे, चहाचा चोथा, फळांची साले-बिया, बागेतील पाला-पाचोळा, निर्माल्य, केसांचा गुंतोळ, केरसुणीचे फोपटे, वर्तमानपत्राचे तुकडे, खराब झालेल्या भाज्या, शिळे अन्न, नारळाच्या शेंड्या, मक्याचे कणिस-साले, बुरशी-किड लागलेले धान्य, पिठे, ई.

सुका कचरा - [न कुजणारा - मानवनिर्मीत]
काच, प्लास्टिक, धातु , ई.

सुक्या कचर्‍याचा उपयोग एकतर फेर वापर किंवा टाकाउ तुन टिकाउ सारख्या काही वस्तु बनवण्यासाठी होउ शकतो [उदा. डॉ. अरविंद गुप्तांची वैज्ञानीक खेळणी]

ओल्या कचर्‍याचा उपयोग, कंपोस्ट खते, सेंद्रिय खते, गांडुळ खते, जैविक माध्यम, बायो गॅस ई. तयार करण्यासाठी होतो. त्यातल्या सहज शक्य होणार्‍या काही पध्दती आपण बघुया.

१: सौ. उषा कुलकर्णी, कोथरुड, पुणे. [०२० - २५३८२७५७]
आ़जींची पद्धत अगदीच सोपी. एखादी कुंडी घ्या अथवा खालच्या बाजुला छोटी-छोटी छिद्रे पाडुन प्लास्टीक ची पिशवी घ्या. तळाशी नारळाच्या शेंड्या, मक्याची कणासे अथवा पाने ठेवा. त्यावर साधारण २ ईंचाचा मातीचा थर द्या. त्यावर वर्मी कल्चरचा एक पातळ थर द्या. [या कल्चर मुळे जिवाणु तयार होण्यस मदत होते. आणि हे जिवाणु कचरा कुजवण्याचे काम करतात.] त्यात रोप ठेवा, मातीसहीत. उरलेल्या जागेत त्या दिवशीचा ओला कचरा टाका. कचरा टाकताना कुंडी १/३ रिकामी राहील याची काळजी घ्या. हवा खेळती राहण्यासाठी हे आवश्यक आहे. वरुन पाणी घाला. पाण्यात अथवा मातीत चिमुटभर हिंग आणि एक चमचा हळद मिसळा. नंतरही महिन्यातुन एकदा, हळद-हींग पाण्यातुन द्यायला विसरु नका. त्यामुळे कचर्‍याला किडे-मुंग्या लागत नाहीत.

तळाशी टाकलेल्या नारळाच्या शेंड्या ओलावा टिकवतात त्यामुळे रोपे ४ ते ५ दिवस पाण्याशिवाय टवटवीत रहातात. तसेच कल्चर मुळे तयार होणारे जिवाणु अती उष्णता आणि अती पावसा पसुन स्वताचे रक्षण करण्यासाठी या शेंड्यांचाच आधार घेतात.

हीच पद्धत वाफे, मोकळ्या पिशव्या, प्लास्टीक किंवा लोखंडी ड्रम, जुने डबे यामधे राबवता येते.

या प्रक्रियेत कचरा कुजवण्यासाठी वापरले गेलेले कल्चर सौ. उषा कुलकर्णीं यांचे कडे विक्रिस उपलब्ध आहे.

आजींनी स्वयंपाकघरा शेजारील गॅलरीत त्यांची बाग फुलवली आहे. हे त्या आवर्जुन सांगतात. कारण या कचर्‍याचा किंवा तयार होणार्‍या जिवाणुंचा कुठलाही त्रास होत नाही, वास येत नाही. ही बाग बघायला येण्याचे प्रेमळ आमंत्रण त्या सगळ्यांनाच देत होत्या.

त्यांनी दाखवण्या साठी बरोबर आणलेले कचर्‍यातुनच उगवलेले पपईचे झाड त्यांच्या यशस्वी प्रयोगाची साक्ष देत होते.

२: श्री. दांडेकर, माहीम, मुंबई. [०२२-२४४४ ०३९१, ०९८२०७८४२९१]
यांची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यांनी काही विशीष्ठ प्रकारची सयंत्रे बनवली आहेत, ज्याला ते जाळी पिंजरा असे म्हणतात. उंदराच्या पिंजर्‍या सारखाच जाळीदार, आवश्यकते नुसार आकाराने आडवा किंवा उभा असा हा पिंजरा असतो.

सयंत्राच्या तळाशी कल्चर चा एक थर द्यावा. त्यावर ओल्या कचर्‍याचा थर द्यावा आणि थोडे पाणी शिंपडावे. नंतर यंत्र भरे पर्यंत रोजचा कचरा वरुन टाकावा आणि रोजच थोडे पाणी शिंपडावे. या पद्धती मधे गांडुळ खत तयार होत असल्याने, गांडुळाची पैदास वाढण्यासाठी हा कचरा ओलसर रहाणे आवश्यक असते. गांडुळे कचरा खातात आणि विष्ठा मागे टाकतात. त्यांची विष्ठा म्हणजेच गांडुळ खत. दर ४ ते ५ दिवसांनी कचरा वर्-खाली करावा. साधारण ८० ते ९० दिवसांनी अत्यंत उपयुक्त असे 'गांडुळ खत' तयार होते. ते सयंत्रा मधुन काढुन झाडांना घालावे.

सयंत्र जाळीदार असल्यामु़ळे हवा खेळती रहाण्यास मदत होते व कचर्‍याला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही. हे सयंत्र वेगवेगळ्या आकारांमधे मिळत असल्याने गॅलरीत, गच्चीत, खिडकित कुठेही ठेवता येते.

सयंत्र आणि त्यात वापरले जाणारे कल्चर विकत घेण्या साठी फोन वर order स्विकारण्याची आणि तुमच्या पत्त्यावर पोहोचवण्याची सोय श्री. दांडेकर यांनी केली आहे.

ज्यांना शक्य आहे ते सयंत्र न वापरता जमीनीत खड्डा घेउन सुध्दा गांडुळ खत तयार करु शकतात.

३: सौ. शामला देसाई, मॉडेल कॉलनी, पुणे. [०२०-२५६५४१००, shyama_desai@yahoo.co.uk]
यांनी F.C.Road ते S.B. Road या संपुर्ण परिसरात, अनेक सोसायट्यांमधुन सुमारे ३००० लोकांना कचरा व्यवस्थापन करण्यास प्रव्रुत्त केले आहे. यांचा प्रयोग वैयक्तिक पेक्षा सार्वजनीक ठिकाणी जास्त फायदेशीर आहे.

यांनी प्रत्येक सोसायटीत मोकळ्या जागी, कंपाऊंड लगत, कोपर्‍यात किंवा गच्चीवर कडप्प्याची पीटं तयार केली आहेत. कडप्पा वापरल्यामुळे कुठल्याही प्रकारचे बांधकाम करावे लागत नाही. एका ठिकाणाहुन दुसर्‍या ठिकाणी हलवणे पण सहज शक्य होते. शिवाय फार खर्चिक पण नाही.

६ फुट उंच, २.५ फुट लांब आणि २.५ फुट रुंद आकाराचे पिट तयार करावे. पिट तयार करतान योग्य आकाराचे कडप्याचे तुकडे घेउन ते साधारण १/२ फुट जमीनीत रोवावे. बाहेरुन माती लावुन फटी बंद कराव्या. पिट तयार झाल्यावर मातिचा एक थर द्यावा , त्यावर एक शेणाचा थर द्यावा, त्यावर युरीया + सुपर फॉस्फेट चा थर द्यावा, मग त्यात ओला कचरा व पाणी टाकावे. हे मिश्रण सतत ओलसर रहाणे आवश्यक असते. शेण-मातीतील जीवाणूंच्या साह्याने हे खत तयार होते. साधारणपणे ३ महिन्यांनी यात कंपोस्ट खत तयार होते. हे खत सोसायटीत लावलेल्या झाडांसाठी वापरता येते. प्रमाण जास्त असेल तर महानगर पालीकेच्या उद्यानात पण देता येते. या पिटात कुठल्याही प्रकारचे किडे किंवा उंदीर होत नाहीत.

पिट तयार करण्याची अजुन एक पद्ध्त म्हणजे, बागेच्या कुठल्याही कोपर्‍यात तीन बा़जुंनी पक्के विटांचे बांधकाम करावे, चौथी बाजु न बांधता नुसत्याच विटा रचाव्यात. खत तयार झाले की विटा काढुन खत बागेत पसरवणे सोपे जाते.

कुठल्याही प्रकारचे पिट तयार न करता जमीनीत खड्डा घेउन सुध्दा याच पद्धतीने कंपोस्ट खत तयार करता येते.

कचरा व्यवस्थापनाचे फायदा म्हणजे, कचरा जेथे निघतो तेथेच जिरवला तर तो वाहून नेण्यात वाया जाणारे इंधन व लागणारा वेळ यांची बचत होते, पर्यावरणाचा योग्य समतोल राखुन ते एक सामाजिक व मोलाचे कार्यही होते. या बरोबरच अजुन एक फायदा म्हणजे महानगर पालीकेच्या करातुन मिळणारी ५% सुट. Solara System, कचरा व्यवस्थापन, rain water harvesting या तिन्ही पैकी कुठल्याही दोन उपक्रमांत तुमचा, तुमच्या सोसायटीचा सहभाग असेल तर १०% सुट मीळु शकते.

हा फायदा घेण्याची पद्धत खालिल प्रमाणे,
. पिट तयार करुन सलग ३ महिने तुम्ही ओला कचरा त्यात टाकत असाल तर महापालीकेत अर्ज करु शकता.

. अर्जा बरोबर कराच्या बिलाची प्रत जोडावी. सोसायटी असेल तर सर्व सभासदांची बिले जोडावी. [ही सुट प्रत्येकी ५% अशी मिळते]

.अर्ज केल्यावर महापालीकेचा कर्मचारी पाहणी करण्यास येतो. त्याने पाहणी केल्यावर त्याच्या कडुन पावती घ्यावी. त्यावर त्याचे नाव, सही, शिक्का, तारीख असा सगळा तपशिल त्यावर असावा.

.पाहणी केल्या नंतर येणार्‍या प्रत्येक बिलावर तुम्हाला ५% सुट मिळते. तसा उल्लेख बिलावर असतो.

.जर सुट मिळाली नाही तर बिल भरते वेळी पाहणी दरम्यान मिळालेली पावती घेउन जावी. ५% रक्कम ताबडतोब बिलातुन कमी केली जाते व कागद-पत्रात आवश्यक ते बदल केले जातात.

मॉडॅल कॉलनी परिसरातील ३००० कुटुंबे य सवलतीचा लाभ घेत आहेत. आपणही घ्यावा Happy

४: मेणवली ऑग्रो प्रॉडक्टस, सदाशिव पेठ, पुणे. [020-66027646, ०९८८१०४५८७९]
ओल्या कचर्‍याचा १ ते १.५ फूटांपर्यत पसरुन थर तयार करावा. त्यावर थोडे पाणी शिंपडून ठेवावे. तयार कल्चर १/२ लीटर पण्यात मिसळून हे मिश्रण त्यावर शिंपडावे. असे दोन ते तीन थर तयार करावेत. एक ते दोन दिवसांनी त्यावर पाणी शिंपडत रहावे. काही दिवसांत सेंद्रिय खत तयार होईल. असे खत तुम्ही बादली, कुंडी, टब अथवा खड्ड्यातही बनवू शकता. तयार खत रोपांसाठी वापरता येते.

हे सेंद्रिय खत तयार करण्यासाठी लागणारे कल्चर, मेणवली ऑग्रो प्रॉडक्टस, सदाशिव पेठ, पुणे येथे विक्रीस ठेवले आहे.

हे कल्चर पाण्यात मिसळुन घालायचे असल्याने, पुर्वी लावलेल्या झाडांना सुध्दा घालता येते. कुंडीतली थोडी माती बाजुला करुन कल्चर चे पाणी घालावे. आतला कचरा कुजण्यास मदत होते.

५: निसर्गसेवक, सदाशिव पेठ, पुणे. [०२० - २४३३३५०८, २४३३१६४८]
स्वयंपाकघरातील ओल्या कचर्‍यापासून खत निर्मीतीसाठी अजुन एक वेगळी पद्धत - 'माठ कंपोस्ट पद्धती'.

.या साठी मातीचा झाकणा सह माठ घ्यावा. घरातला सर्व प्रकारचा ओला कचरा बारीक करुन घ्यावा. यात हिरवे पदार्थ (नायट्रोजनयुक्त पदार्थ - N घटक) व काळे पदार्थ (कार्बनयुक्त पदार्थ - C घटक) समप्रमाणात असावेत.
.माठ कुठेही गळत नाही याची खात्री करुन घ्यावी. माठाच्या तळाशी पातळ मतीचा थर द्या.
.या थरावर घरातील N घटक असलेल्या पदार्थांचे मिश्रण १" ते ३" जाडीच्या थरामध्ये पसरा.
.एक मोठा चमचा ट्रायकोडर्मा पावडरची फवारणी करा.
.सर्व थर खुरप्याने चांगले वरखाली ढवळुन घ्या.
.मिश्रण कोरडे वाटल्यास आसश्यक तेवढेच पाणी फवारुन थर ढवळुन घ्या.
.माठावर घट्ट झाकण लावा.
.२ ते ३ दिवसांनी पुन्हा कचरा भरुन वरीलप्रमाणे क्रुती करा. तसेच संपुर्ण कचरा वर खाली करा. याप्रकारे कचरा हलवल्यामुळे विघटन प्रक्रियेत तयार झालेली उष्ण्ता कमी होते. कचर्‍यात हवा खेळती राहून विघटन क्रियेचा वेग वाढतो.

सुमारे १/२ महिन्यात माठ भरु शकतो (घरातील कचर्‍याच्या प्रमाणावर), काहींचा एक वर्षानेही भरेल. माठ संपुर्ण भरल्यानंतर माठाचे तोंड चिखलमाती वापरुन बंद करावे. २० दिवसानंतर माठातील संपुर्ण कचर्‍याचे खतामध्ये रुपांतर होते. हे खत काढुन झाडांसाठी वापरावे. दरम्यानच्या काळात नवीन माठ कचर्‍याकरिता वापरावा.

नायट्रोजन युक्त पदार्थ - हिरवे पदार्थ :
भाज्यांची साले, देठ, खराब पाने, किडकी फळे, निर्माल्य, पुष्पगुच्छातील फुले, चहाकॉफीचा चोथ-पावडर, भात, भाकरी, चपातीसारखे कोरडे अन्न, झाडांची छाटणी केलेली पाने, रोगट फांद्या वगैरे, खरब धान्य, कडधान्य.

काळे पदार्थ - कार्बनयुक्त पदार्थ :
कार्डबोर्ड, खाद्यपदार्थांची खोकॉ, वाया गेलेले कागद, भेटकार्डे, पत्रिका वगैरे. लाकडाचे तासकाम, अंड्याचे कवच, लाकडाची चुलीतली राख, केस, नखे, चिंध्या - हे पदार्थ जास्तीची ओल कमी करण्यासाठी घालावेत.

माठात न घालण्याचे पदार्थ :
मांस-माशांचे अवशेष, शिजवलेले मसालेदार पदार्थ, कोळसा किंवा कोळशाची राख, मंसाहारी प्राण्यांचे मल-मूत्र, सॅनिटरी नॅपकीन, औषधी गोळ्यांची पाकिटे, शिल्लक औषधे.

६: मल्चींग / आच्छादन
गच्चीतील मोठ्या कुंड्या अथव वाफ्यामधील झाडांच्या बुंध्यापाशी, मातीच्या प्रुष्ठभागावर कचर्‍याचा थर पसरावा. कचर्‍यामध्ये IVEM / डीकंपोस्टींग कल्चर मिसळावे. यास मल्चींग असे म्हणतात. कचर्‍याचा थर २-३ इंचा पेक्षा जास्त असू नये. त्यावर वाळलेला पाचोळा पसरावा. यामुळे झाडांना पाणी कमी द्यावे लागते. कचरा हळू-हळू मातीत मिसळत जातो. त्यामुळे मातीचा कस कायम रहातो.

पाणी आळ्यातुनच द्यावे. आठवड्यातुन दोनदा जसे इतर झाडांना देतो तसेच द्यावे.

थोडक्यात महत्वाचे :
.काही विशिष्ट प्रकारच्या जिवाणू व किटाणूंमुळेच कचर्‍याचे खतात रुपांतर होते. ते सर्व घटक जमिनीकरिता उपयुक्त आहेत. इतर रोगकारक जिवाणू यात जगत नाहीत.

.कचरा हलवण्यासाठी बागकामाचा चिमटा, एवढेच साधन पुरेसे आहे. उंदीर, फळ माश्या किंवा मुंग्या खताकडे आकर्षित होत नाहीत. पण दिसले तर ढीग खुप सुका आहे असे समजावे व ढिगावर पाणी शिंपडून ढिग हलवुन घ्यावा.

.कचरा हाताळणे अत्यंत सुरक्षित आहे, फक्त बागकाम करताना घ्यावयाची काळजी घ्यावी लागते. कचर्‍याचा ढिग गरम होण्याची आवश्यकता नाही.

.कचर्‍याच्या खतामुळे कुठल्याही प्रकारच्या रोग व किडीचा प्रसार होत नाही. कुजण्याच्या प्रक्रियेतील तापमानामुळे व आवश्यक जिवाणूंमुळे रोग व किडी नष्ट होतात.

.खत तयार करताना ओल्या कचर्‍याबरोबर आपण विषारी वनस्पती पण घालू शकतो. खत तयार होताना त्यातील विषारी द्रव्यांचाही नाश होतो.

विषय: 
प्रकार: 

मी गेले ६ महिने कचर घरी कुन्दीमदे कुजविन्यचा प्रयोग कर्तिये. गान्डुळेसुधा आहेत कुन्दीत, पण माशा आणि चिलिटे खुप त्रास देत आहेत. मेणवलि दुकानतुन एक पावडर पण वापरली ह्यवर उपाय म्हनुन पण काही फरक नाही पडला. माझी झादे चान्ग्ली वाधत आहेत, पण माशा आणि चिलते ह्यावर मात्र उपय नाही सापदत.कुनी ह्यावर काही सुचवु शकेल काय?

धन्यवाद आरती,
'जुन्या ओढण्या' ची idea एकदम मस्त आहे. शिवाय आहेर म्हणुन आलेल्या साड्या, ब्लाउज पिस पण सतकर्मि लागतिल.

manuswini,
कल्चर नाही मिळाले तर कंपोस्ट खताचा पर्याय वापरता येतो का बघ ना ...

Saee,
धन्यवाद , अधिक माहिती दिल्याबद्दल.

arc,
वर लिहिल्या प्रमाणे कचरा कोरडा असेल म्हणुन माश्या येतात.

.

itsme, खुप छान लेख. माझी आई देखील भारतात असे 'कचरा व्यवस्थापन' करते. या संकलीत महितीचा खुप उपयोग होइल.

मनु, यु ट्युब वर compost वर search केल्यास बरेच दुवे मिळतील. इथे अमेरिकेत mail order करुन
culture / worms मागवता येतात. just google it.

http://www.youtube.com/watch?v=mzxe85glg4Q
http://www.youtube.com/watch?v=aofLB_PCXM0

गांडुळ्खत घरी कसे कर्ता येइल (worm composting ) :

worm composting in apartment :
http://www.youtube.com/watch?v=gbjX2tt-oQw

http://www.youtube.com/watch?v=JjjuYNilM60

माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार.

मनू,
तुमच्या टाऊन हॉलला चौकशी कर. तिथे कंपोस्ट खताच्या बीन्स मिळतात. आणि प्रोजेक्टविषयीपण कसे करायचे इ. सगळी माहिती मिळते. अत्यंत वाजवी दरात देतात.

आरती,
खूपच सुंदर लेख. सहज मांडणी आणि उपयुक्त माहिती.

अतिशय सुरे़ख लेख !! माझा एक मित्र मुकुंद शेरेकर, नागपुरात पण असं काम करतोय....गांडुळ खताचं. तो घरोघरी जाऊन प्रात्यक्षिकं देतो आणि मदत करतो.

फार चांगली माहिती... हा नविन प्रयोग करुन बघायला हवा..

uma, rajkashana, ashwini,jayavi, satyajit,
सगळ्यांचे मनापासुन आभार Happy

सत्यजित,
त्या दिवशी डॉ.भवाळकर पण आले होते. त्यांच्याशी बरीच सविस्तर चर्चा पण केली. त्यांचे एक पुस्तक विकत घेतले आहे. पण ते वाचुन न झाल्यामुळे त्यांच्या बद्दल काही लिहीले नाही. मायबोली वर त्यांचे contact details देण्यासाठी त्यांची परवानगी घेतली आहे. Happy

आनंदाची गोष्ट म्ह्णजे त्यांना मायबोली माहिती आहे. 'खुप चांगले काम केले आहे ज्यांनी केले आहे त्यांनी' असा अभिप्राय पण त्यांनी दिला. Happy

itsme, अश्वीनी नी उमा थॅक्स.
मी त्या सर्व लिन्क्स वाचून काढल्या. मी पन फक्त फळ्,भाजी,सुकलेली पाने,सुका बागेतला कचरा टाकूनच बनवायचा विचार करतेय. ..

आरती
अतिशय सुरेख माहिती.

मनु
इथे कुठल्याही बेटर होम्स अ‍ॅन्ड गार्डन्स टाइप साइट वर बघितलंस तर कॉम्पोस्टिंग ची माहिती मिळेल.
मी गेली बारा तेरा वर्षे बागेतली सुकी पाने, पडलेल्या फांद्या हे सगळं घरामागच्या नो मॅन्स लॅन्ड मधे टाकते आहे. माझे शेजारी पण तेच करतात. दरवर्षी जरा वेगळ्या ठिकाणी ढीग लावायचा. वर्षा दोन वर्षाने मस्त ऑर्गॅनिक कॉम्पोस्ट तय्यार. अगदी चकटफु!
बर्‍याच टाउनशिप मधे फॉल मधे सुकी पानं वगैरे गोळा करुन त्याचं मल्च किंवा कॉम्पोस्ट करतात. अन ते तिथल्या रहिवाशांना फुकट वाटतात. बॅगा वगैरे भरुन देत नाहीत पण गाडीत खाली कागद आंथरून त्यावर पुठ्ठ्याच्या खोक्यात किंवा रिसायकल ट्रॅश चे जे खोके असतात त्यात भरुन आणता येतं. तू फोन करून पहा.

आर्च
कॉम्पोस्ट बिन मधे जर दोन प्रकार्च्या कचर्‍याचं प्रमाण बरोबर असेल तर वास येत नाही. माझ्या एक दोन मैत्रिणींकडे आहे - डेकच्या बाजूलाच आहेत पण अजिबात वास येत नाही.

अवांतर - कॉफी ग्राउंडस सुद्धा कॉम्पोस्ट बिन मधे घालता येतात. बर्‍याच स्टारबक्स मधे बाहेर एका मोठ्या बालदीत ग्राउंडस घालून ठेवतात. ज्यांना हवी त्यांनी घेउन जावी.

आरती, खूप छान माहिती दिलीस.. मी एखाद दिवसा आड चहाचा चोथा वगैरे तसाच एक एक कुंडीतल्या झाडात टाकते.. पण तो पिशवीत टाकून कुजवल्यास त्यात अळ्या होण्याची शक्यता वाटते आणि बाकी कसली भीति नाही वाटली तरी मला अळ्यांची खूप भीति आणि कीळस वाटते.:( गांडूळेही बाळगणे नको वाटते..
सोसायटीत खड्डा खणता येतो का बघते. Happy

आरती खुपच छान माहिती दिलीस. कचरा व्यवस्थापन हे पुण्यामधे खरेच गरजेचे आहे.

मी स्वत: महापलिकेमधे उपायुक्त असल्यामुळे सदर लेखाचे महत्व काय आहे मला माहिती आहे छान लेख धन्यवाद

नमस्कार,
पुण्यात सौ. निर्मला लाठी (०२०-२४४५४६६९ / ०२०-२४४७४१०७) यांच्याकडे कल्चर मिळते. हे कल्चर वापरून मी गेली १० वर्षे घरातला ओला कचरा झाडांसाठीच वापरेतय. जुन्या घरी ग्रिलमध्ये अनेक कुंड्यामधून कचरा जिरवून त्यात झाडे वाढवली होती. मध्यंतरी घर बदलले तेव्हा सगळ्या कुंड्यांमधलं कल्चर पोत्यात भरून नव्या घरी आणलं. नव्या घरी (गेली ४ वर्ष) बाल्कनीमध्ये विटांची मोकळी (un plastered) रचना करून वाफ़ा बनवला. त्या वाफ़्यात चार मोठी झाडे कचर्‍यामध्ये डौलाने वाढताहेत. निर्मलाताईंकडचं कल्चर (विरजण) १० वर्षांपूर्वी फ़क्त पहिलं वर्षभरच वापरावं लागलं होतं. आता आपोआपच कचरा जिरतो.
महत्त्वाचं म्हणजे मोठ्या झाडांना फ़रशीच्या वर, कचर्‍यामध्येच सगळा ‘खाऊ’ मिळत असल्याने झाडं कितीही मोठी झाली तरी त्यांची मुळं बांधकामात घुसत नाहीत.
http://www.indiatogether.org/2004/mar/env-garbage.htm

गांडूळ खताच्या खड्ड्यात तिखट, आंबट वगैरे वाया गेलेले पदार्थ टाकता येत नाहीत. पण वर्मिकल्चर मध्ये अक्षरश: ‘काहीही’ जिरवता येतं - वाया गेलेलं लोणचं सुद्धा!

‘‘निसर्गसेवक’ च्या माहितीमध्ये -
माठात न घालण्याचे पदार्थ :
मांस-माशांचे अवशेष, शिजवलेले मसालेदार पदार्थ, कोळसा किंवा कोळशाची राख, मंसाहारी प्राण्यांचे मल-मूत्र, सॅनिटरी नॅपकीन, औषधी गोळ्यांची पाकिटे, शिल्लक औषधे.
हे सर्व पदार्थ वर्मिकल्चरमध्ये विनासायास जिरतात. शिवाय गांडूळं-अळ्या यांची ज्यांना किळस वाटते त्यांच्यासाठीही वर्मिकल्चर एकदम बेस्ट पर्याय आहे.

पुणे महानगर पालिका, मॉडेल कॉलनी मध्ये मॉ. कॉ. परीसर सुधार समिती, पुणे. आणि म.न.पा. यांच्या संयुक्त प्रयत्नांने ओल्या कचर्‍यापासुन बायोगॅस प्रकल्प राबवणार आहे. निर्माण होणार गॅस स्वंयपाकासाठी वापरता येऊ शकेल अथवा त्यापासुन वीज निर्मीती करता येईल. इथे ती रस्त्यावरील दिव्यांकरीता वापरली जाणार आहे. सदरचा प्रक्ल्प एक खाजगी कंपनी तयार करणार असुन तो पुढील पांच वर्ष चालवण्याची हमी तिने दिली आहे. त्या कामाला नुक्तीच सुरवात झाली असुन येत्या ६ म.त प्रकल्प कार्यान्वीत होईल. रोज ५ टन कचर्‍याची विल्हेवाट अशाप्रकारे लागेल. त्यामुळे अनेक फायदे अपे़क्षीत आहेत.खर्च वजा जाता २ ते ३ वर्षांत प्रकल्प फायद्यात येईल, प्रदु्षण टळेल,कचरा वाहण्याचा खर्च वाचेल, इत्यादी. म.न.पा. ह एक पथदर्शक प्रकल्प म्हणुन चालवणार आहे. या कंपनीने हिरानंदानी कॉम्प्लेक्स, मुंबई, सावंतवाडी व अन्य ठीकाणी गेले काहीं वर्षे यशस्वीरित्या चालवला आहे. विद्यमान नगरसविका सौ.ज्योस्नाताई सरदेशपांडे , प.सु.समितीचे पदाधिकारी आणि पालिकेचे संबंधीत अभियंता(माफ करा, नांव विसरलो) यांनी अथक परीश्रम घेऊन हे घडवुन आणले. पालिकेचे याबाबत खरं तर हार्दिक अभिनंदन! सगळेच काहीं वाईट घडत नाही ही किती आश्वासक गोष्ट आहे नाही ?

मला एक प्रश्न आहे-
माझ्या घरी खुप मुन्गळे आहेत. (आवळ्याचे झाड आहे बागेत, म्हणुन) ड्ब्यात ठेवलेल्या कचरयाला सुद्द्दा खुप मुन्गळे येतात. हळद आणि हिन्गाचा उपयोग होइल काय???

aru,
पालिकेचे याबाबत खरं तर हार्दिक अभिनंदन! सगळेच काहीं वाईट घडत नाही ही किती आश्वासक गोष्ट आहे नाही ? >>
५% सुट ही देऊन प्रोत्साहन देते आहे पालीका याचे म्हणुनच मला खुप आश्चर्य वाटले होते. Happy

Nootan,
अधिक माहीती बद्दल धन्यवाद ...

Shruti,
हळद हिंग तर टाकच पण कचर्‍याच्या डब्याभोवती मुंग्यांची पावडर टाक.

इथे बरेच लोक महापलिकेशी निगदित आहेत बघुन मी हे पोस्तत आहेत्.
मझ्या office (midc )मधे रोज १००० किलो ओला कचरा तयर होतो.मी बायोगस सथी प्रस्तव मान्दल होता पण officene काही technical reasons देउन अमान्य केला.
कुणाला ह्या ओल्या कचर्‍याचा commercial वापर करयचा असेल तर क्रुपया माझ्याशी इमेल वर सम्पर्क साधा.हिन्जवदी भगातील शेतकरी,NGO,बचत गट अथ्वा इतर कुणी ,असा वेगळा केलेला ओला कचरा हवा असेल तर मी coordinate करायला तयार आहे.

आरती खूप महत्त्वाचा विषय आहे. अतिशय उपयोगी माहिती मिळाली धन्मिळेल.मी पण मेलमधुन इतरांना कळवले.
~~~~~~~~~

Shruti_J
मुंगळ्यांसाठी - कचरा नुसताच न ठेवता वर्मिक्ल्चरमध्ये ठेवला तर मुंगळेसुद्धा येणार नाहीत, आधीच असलेले मुंगळे वर्मिकल्चरच्या प्रक्रियेत जिरून जातील (नाईलाज आहे), नवीन मुंगळे कचर्‍याकडे फ़िरकणार नाहीत. फ़क्त कचरा सतत नीट कुजत राहिला पाहिजे. ओलसरपणा आणि कल्चर योग्य प्रमाणात राहिले पाहिजे.

अ‍ॅग्रिकल्चर कॉलेज्मध्ये रु.२०/- ला कल्चरची १ कि.ची पिशवी मिळ्ते. आठ्वडयातुन दोन/तीनवेळा अंदाजे १ मुठ कल्चर ओल्या कचर्‍यावर पसरायचे. कचरा नीट हलवून वर थोडे पाणी शिंपडायचे. दोनएक महीन्यांत चांगले दाणेदार खत मिळते. चाळुन घ्यावे. गेल्या सव्वा वर्षांत आम्ही एवढासुध्दा ओला कचरा बाहेर टाकला नाही. शिवाय ५/६ कि. खत मिळाले.

इथे कुणाला डॉ. भवाळकर यांच्या Biosanitizer बद्दल माहिती आहे का ?
नुकतीच Google videos वर डॉ. उदय भवाळकर यांचि E TV वर 'संवाद' या कार्यक्रमात झालेली Biosanitizer या विषयावर मुलाखत पहिली. (Link - http://video.google.com/videoplay?docid=6346155366615249580&ei=KhFfSbH4C... )आणि अगदी भारवुनच गेले. मुलाखत फार जुनी आहे. २००७ मधली. पण माझ्या प्रथमच पहाण्यात आली.
कचरा व्यवस्थापनासाठी त्यांचे हे Biosanitizer फारच सहज , सुलभ आणि प्रभावी वाटले. कोणि प्रत्यक्षात वापरले असल्यास जरुर अनुभव सांगा.

Pages