कचरा व्यवस्थापन - एक सामाजिक बांधिलकी.

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आपल्याला अजुन प्रकर्षाने जाणवत नसला तरी शहरांमधील कचरा हा एक अतिशय गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्ण बनत चालला आहे, त्या विषयी थोडेसे.

पुर्वी मी एका रिकाम्या कुंडीत ओला कचरा वाळवुन, नंतर झाड लावताना तो मातीत मिसळत असे. नंतर-नंतर झाड लावलेल्या कुंडीतच ओला कचरा टाकु लागले. त्याचा फायदा असा होतो की भुईमुग, कारले, दुधी, टोमॅटो, झेंडु, सिताफळ, रामफळ, पपई, मोसंबी, डाळींब अशी बियांपासुन उतरणारी अनेक रोपे कुंडीतुन डोकवायला लागतात. ती थोडी मोठी करावी आणि ज्यांच्याकडे लावण्या योग्य जागा आहे अशा कुटुंबाला किंवा संस्थेला देउन टाकावी, असा एक छंदच जडला. पण मग अनेक जणांकडुन ऐकले की असा कचरा कुजुन मातीत मिसळायला ६-८ महिने लागतात, कल्चर वपरले तर ही प्रक्रिया २-३ महिन्यांत पुर्ण होते.

मला माहीती असलेले गांडुळ खत तर मला नको होते. [ कुंडीतुन जरी ती बाहेर येत नसली तरी रात्रभर माझ्या स्वप्नात मात्र नक्किच आली असती. Happy ] इतर पर्याय कोणते, त्याचा कालावधी, त्याचे फायदे सगळेच तपशिलवार माहीती करुन घ्यायचे होते. पण या बरोबरच मिळालेली 'करात' मिळणारी ५% सुट ही माहीती माझ्या साठी एक सुखद धक्काच होता.

रवीवारी, १५ फेब ०९, 'निसर्गसेवक', पुणे आयोजित 'कचरा व्यवस्थापन' कार्यशाळेत सहभागी होण्याचा योग आला. मान्यवरांच्या मार्गदर्शना पाठोपाठ २ महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या विषयी थोडे सांगायलाच हवे. त्यातल्या एक घरोघरी साफसफाई ची कामे करतात. एका घरी त्यांनी बघितले की आपल्या मालकीण बाई 'कचरा व्यवस्थापन' करुन त्यापसुन खत तयार करतात. लगेचच त्यांनी इतर घरांमधला ओला कचरा वेगळा काढुन या बाईंना आणुन द्यायला सुरुवात केली. आणि आजही त्या हे काम नियमीत पणे करत आहेत.

दुसर्‍या एक जण होत्या, त्या ज्या परिसरात कामाला जातात त्या संपुर्ण परीसरातील सर्व घरांमधुन टाकण्यात आलेल्या कचर्‍याचे 'ओला' आणि 'सुका' असे विभाजन गेली अनेक वर्षे सातत्याने करतात. घट्ट बांधलेल्या प्लास्टिक पिशव्यांमधुन तो कचरा बाहेर काढणे, त्याची द्रुगंधी सहन करुन त्याची विभागणी करणे आणि हे सगळे एक व्रत म्हणुन, कुठलाही मोबदला न घेता.

सौ. शामला देसाई, 'मॉडेल कॉलनि परिसर सुधारणा समीती' तर्फे गेली ३० वर्षे , डॉ. आनंद कर्वे, 'आरती' संस्थे मार्फत २५ वर्षे, सकाळ एक सदराच्या माध्यमातुन गेली दिड पावणे दोन वर्ष, आणि अजुन कितीतरी लोक या विषयावर जागरुकतेच काम करत आहेत. पण एक गोष्ट मला त्यादिवशी जाणवली की कचरा करणार्‍या लोकांच्या तुलनेत काम करणार्‍यांचे प्रमाण खुपच कमी आहे. थोडक्यात, 'प्रचार' आणि 'प्रसार' आवश्यक आहे. Happy

वेगवेगळ्या संस्था आणि वैयक्तिक पातळीवर अनेक वर्षे काम करणार्‍या तज्ञ लोकांकडुन त्यांचे अनुभव आणि माहीती त्या कार्यशाळेत मिळाली. सामाजिक बांधिलकी मानणार्‍या आणि जपणार्‍या मायबोली परिवारास त्याचा नक्कीच उपयोग होईल असे वाटले म्हणुन 'डायरी' ऐवजी 'रंगीबेरंगी' वर लिहावे असे ठरवले.

सगळ्यात प्रथम ओला कचरा आणि सुका कचरा याचे वर्गिकरण बघुया.

ओला कचरा - [कुजणारा - निसर्गनिर्मीत]
भाज्यांच्या साली- देठे, चहाचा चोथा, फळांची साले-बिया, बागेतील पाला-पाचोळा, निर्माल्य, केसांचा गुंतोळ, केरसुणीचे फोपटे, वर्तमानपत्राचे तुकडे, खराब झालेल्या भाज्या, शिळे अन्न, नारळाच्या शेंड्या, मक्याचे कणिस-साले, बुरशी-किड लागलेले धान्य, पिठे, ई.

सुका कचरा - [न कुजणारा - मानवनिर्मीत]
काच, प्लास्टिक, धातु , ई.

सुक्या कचर्‍याचा उपयोग एकतर फेर वापर किंवा टाकाउ तुन टिकाउ सारख्या काही वस्तु बनवण्यासाठी होउ शकतो [उदा. डॉ. अरविंद गुप्तांची वैज्ञानीक खेळणी]

ओल्या कचर्‍याचा उपयोग, कंपोस्ट खते, सेंद्रिय खते, गांडुळ खते, जैविक माध्यम, बायो गॅस ई. तयार करण्यासाठी होतो. त्यातल्या सहज शक्य होणार्‍या काही पध्दती आपण बघुया.

१: सौ. उषा कुलकर्णी, कोथरुड, पुणे. [०२० - २५३८२७५७]
आ़जींची पद्धत अगदीच सोपी. एखादी कुंडी घ्या अथवा खालच्या बाजुला छोटी-छोटी छिद्रे पाडुन प्लास्टीक ची पिशवी घ्या. तळाशी नारळाच्या शेंड्या, मक्याची कणासे अथवा पाने ठेवा. त्यावर साधारण २ ईंचाचा मातीचा थर द्या. त्यावर वर्मी कल्चरचा एक पातळ थर द्या. [या कल्चर मुळे जिवाणु तयार होण्यस मदत होते. आणि हे जिवाणु कचरा कुजवण्याचे काम करतात.] त्यात रोप ठेवा, मातीसहीत. उरलेल्या जागेत त्या दिवशीचा ओला कचरा टाका. कचरा टाकताना कुंडी १/३ रिकामी राहील याची काळजी घ्या. हवा खेळती राहण्यासाठी हे आवश्यक आहे. वरुन पाणी घाला. पाण्यात अथवा मातीत चिमुटभर हिंग आणि एक चमचा हळद मिसळा. नंतरही महिन्यातुन एकदा, हळद-हींग पाण्यातुन द्यायला विसरु नका. त्यामुळे कचर्‍याला किडे-मुंग्या लागत नाहीत.

तळाशी टाकलेल्या नारळाच्या शेंड्या ओलावा टिकवतात त्यामुळे रोपे ४ ते ५ दिवस पाण्याशिवाय टवटवीत रहातात. तसेच कल्चर मुळे तयार होणारे जिवाणु अती उष्णता आणि अती पावसा पसुन स्वताचे रक्षण करण्यासाठी या शेंड्यांचाच आधार घेतात.

हीच पद्धत वाफे, मोकळ्या पिशव्या, प्लास्टीक किंवा लोखंडी ड्रम, जुने डबे यामधे राबवता येते.

या प्रक्रियेत कचरा कुजवण्यासाठी वापरले गेलेले कल्चर सौ. उषा कुलकर्णीं यांचे कडे विक्रिस उपलब्ध आहे.

आजींनी स्वयंपाकघरा शेजारील गॅलरीत त्यांची बाग फुलवली आहे. हे त्या आवर्जुन सांगतात. कारण या कचर्‍याचा किंवा तयार होणार्‍या जिवाणुंचा कुठलाही त्रास होत नाही, वास येत नाही. ही बाग बघायला येण्याचे प्रेमळ आमंत्रण त्या सगळ्यांनाच देत होत्या.

त्यांनी दाखवण्या साठी बरोबर आणलेले कचर्‍यातुनच उगवलेले पपईचे झाड त्यांच्या यशस्वी प्रयोगाची साक्ष देत होते.

२: श्री. दांडेकर, माहीम, मुंबई. [०२२-२४४४ ०३९१, ०९८२०७८४२९१]
यांची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यांनी काही विशीष्ठ प्रकारची सयंत्रे बनवली आहेत, ज्याला ते जाळी पिंजरा असे म्हणतात. उंदराच्या पिंजर्‍या सारखाच जाळीदार, आवश्यकते नुसार आकाराने आडवा किंवा उभा असा हा पिंजरा असतो.

सयंत्राच्या तळाशी कल्चर चा एक थर द्यावा. त्यावर ओल्या कचर्‍याचा थर द्यावा आणि थोडे पाणी शिंपडावे. नंतर यंत्र भरे पर्यंत रोजचा कचरा वरुन टाकावा आणि रोजच थोडे पाणी शिंपडावे. या पद्धती मधे गांडुळ खत तयार होत असल्याने, गांडुळाची पैदास वाढण्यासाठी हा कचरा ओलसर रहाणे आवश्यक असते. गांडुळे कचरा खातात आणि विष्ठा मागे टाकतात. त्यांची विष्ठा म्हणजेच गांडुळ खत. दर ४ ते ५ दिवसांनी कचरा वर्-खाली करावा. साधारण ८० ते ९० दिवसांनी अत्यंत उपयुक्त असे 'गांडुळ खत' तयार होते. ते सयंत्रा मधुन काढुन झाडांना घालावे.

सयंत्र जाळीदार असल्यामु़ळे हवा खेळती रहाण्यास मदत होते व कचर्‍याला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही. हे सयंत्र वेगवेगळ्या आकारांमधे मिळत असल्याने गॅलरीत, गच्चीत, खिडकित कुठेही ठेवता येते.

सयंत्र आणि त्यात वापरले जाणारे कल्चर विकत घेण्या साठी फोन वर order स्विकारण्याची आणि तुमच्या पत्त्यावर पोहोचवण्याची सोय श्री. दांडेकर यांनी केली आहे.

ज्यांना शक्य आहे ते सयंत्र न वापरता जमीनीत खड्डा घेउन सुध्दा गांडुळ खत तयार करु शकतात.

३: सौ. शामला देसाई, मॉडेल कॉलनी, पुणे. [०२०-२५६५४१००, shyama_desai@yahoo.co.uk]
यांनी F.C.Road ते S.B. Road या संपुर्ण परिसरात, अनेक सोसायट्यांमधुन सुमारे ३००० लोकांना कचरा व्यवस्थापन करण्यास प्रव्रुत्त केले आहे. यांचा प्रयोग वैयक्तिक पेक्षा सार्वजनीक ठिकाणी जास्त फायदेशीर आहे.

यांनी प्रत्येक सोसायटीत मोकळ्या जागी, कंपाऊंड लगत, कोपर्‍यात किंवा गच्चीवर कडप्प्याची पीटं तयार केली आहेत. कडप्पा वापरल्यामुळे कुठल्याही प्रकारचे बांधकाम करावे लागत नाही. एका ठिकाणाहुन दुसर्‍या ठिकाणी हलवणे पण सहज शक्य होते. शिवाय फार खर्चिक पण नाही.

६ फुट उंच, २.५ फुट लांब आणि २.५ फुट रुंद आकाराचे पिट तयार करावे. पिट तयार करतान योग्य आकाराचे कडप्याचे तुकडे घेउन ते साधारण १/२ फुट जमीनीत रोवावे. बाहेरुन माती लावुन फटी बंद कराव्या. पिट तयार झाल्यावर मातिचा एक थर द्यावा , त्यावर एक शेणाचा थर द्यावा, त्यावर युरीया + सुपर फॉस्फेट चा थर द्यावा, मग त्यात ओला कचरा व पाणी टाकावे. हे मिश्रण सतत ओलसर रहाणे आवश्यक असते. शेण-मातीतील जीवाणूंच्या साह्याने हे खत तयार होते. साधारणपणे ३ महिन्यांनी यात कंपोस्ट खत तयार होते. हे खत सोसायटीत लावलेल्या झाडांसाठी वापरता येते. प्रमाण जास्त असेल तर महानगर पालीकेच्या उद्यानात पण देता येते. या पिटात कुठल्याही प्रकारचे किडे किंवा उंदीर होत नाहीत.

पिट तयार करण्याची अजुन एक पद्ध्त म्हणजे, बागेच्या कुठल्याही कोपर्‍यात तीन बा़जुंनी पक्के विटांचे बांधकाम करावे, चौथी बाजु न बांधता नुसत्याच विटा रचाव्यात. खत तयार झाले की विटा काढुन खत बागेत पसरवणे सोपे जाते.

कुठल्याही प्रकारचे पिट तयार न करता जमीनीत खड्डा घेउन सुध्दा याच पद्धतीने कंपोस्ट खत तयार करता येते.

कचरा व्यवस्थापनाचे फायदा म्हणजे, कचरा जेथे निघतो तेथेच जिरवला तर तो वाहून नेण्यात वाया जाणारे इंधन व लागणारा वेळ यांची बचत होते, पर्यावरणाचा योग्य समतोल राखुन ते एक सामाजिक व मोलाचे कार्यही होते. या बरोबरच अजुन एक फायदा म्हणजे महानगर पालीकेच्या करातुन मिळणारी ५% सुट. Solara System, कचरा व्यवस्थापन, rain water harvesting या तिन्ही पैकी कुठल्याही दोन उपक्रमांत तुमचा, तुमच्या सोसायटीचा सहभाग असेल तर १०% सुट मीळु शकते.

हा फायदा घेण्याची पद्धत खालिल प्रमाणे,
. पिट तयार करुन सलग ३ महिने तुम्ही ओला कचरा त्यात टाकत असाल तर महापालीकेत अर्ज करु शकता.

. अर्जा बरोबर कराच्या बिलाची प्रत जोडावी. सोसायटी असेल तर सर्व सभासदांची बिले जोडावी. [ही सुट प्रत्येकी ५% अशी मिळते]

.अर्ज केल्यावर महापालीकेचा कर्मचारी पाहणी करण्यास येतो. त्याने पाहणी केल्यावर त्याच्या कडुन पावती घ्यावी. त्यावर त्याचे नाव, सही, शिक्का, तारीख असा सगळा तपशिल त्यावर असावा.

.पाहणी केल्या नंतर येणार्‍या प्रत्येक बिलावर तुम्हाला ५% सुट मिळते. तसा उल्लेख बिलावर असतो.

.जर सुट मिळाली नाही तर बिल भरते वेळी पाहणी दरम्यान मिळालेली पावती घेउन जावी. ५% रक्कम ताबडतोब बिलातुन कमी केली जाते व कागद-पत्रात आवश्यक ते बदल केले जातात.

मॉडॅल कॉलनी परिसरातील ३००० कुटुंबे य सवलतीचा लाभ घेत आहेत. आपणही घ्यावा Happy

४: मेणवली ऑग्रो प्रॉडक्टस, सदाशिव पेठ, पुणे. [020-66027646, ०९८८१०४५८७९]
ओल्या कचर्‍याचा १ ते १.५ फूटांपर्यत पसरुन थर तयार करावा. त्यावर थोडे पाणी शिंपडून ठेवावे. तयार कल्चर १/२ लीटर पण्यात मिसळून हे मिश्रण त्यावर शिंपडावे. असे दोन ते तीन थर तयार करावेत. एक ते दोन दिवसांनी त्यावर पाणी शिंपडत रहावे. काही दिवसांत सेंद्रिय खत तयार होईल. असे खत तुम्ही बादली, कुंडी, टब अथवा खड्ड्यातही बनवू शकता. तयार खत रोपांसाठी वापरता येते.

हे सेंद्रिय खत तयार करण्यासाठी लागणारे कल्चर, मेणवली ऑग्रो प्रॉडक्टस, सदाशिव पेठ, पुणे येथे विक्रीस ठेवले आहे.

हे कल्चर पाण्यात मिसळुन घालायचे असल्याने, पुर्वी लावलेल्या झाडांना सुध्दा घालता येते. कुंडीतली थोडी माती बाजुला करुन कल्चर चे पाणी घालावे. आतला कचरा कुजण्यास मदत होते.

५: निसर्गसेवक, सदाशिव पेठ, पुणे. [०२० - २४३३३५०८, २४३३१६४८]
स्वयंपाकघरातील ओल्या कचर्‍यापासून खत निर्मीतीसाठी अजुन एक वेगळी पद्धत - 'माठ कंपोस्ट पद्धती'.

.या साठी मातीचा झाकणा सह माठ घ्यावा. घरातला सर्व प्रकारचा ओला कचरा बारीक करुन घ्यावा. यात हिरवे पदार्थ (नायट्रोजनयुक्त पदार्थ - N घटक) व काळे पदार्थ (कार्बनयुक्त पदार्थ - C घटक) समप्रमाणात असावेत.
.माठ कुठेही गळत नाही याची खात्री करुन घ्यावी. माठाच्या तळाशी पातळ मतीचा थर द्या.
.या थरावर घरातील N घटक असलेल्या पदार्थांचे मिश्रण १" ते ३" जाडीच्या थरामध्ये पसरा.
.एक मोठा चमचा ट्रायकोडर्मा पावडरची फवारणी करा.
.सर्व थर खुरप्याने चांगले वरखाली ढवळुन घ्या.
.मिश्रण कोरडे वाटल्यास आसश्यक तेवढेच पाणी फवारुन थर ढवळुन घ्या.
.माठावर घट्ट झाकण लावा.
.२ ते ३ दिवसांनी पुन्हा कचरा भरुन वरीलप्रमाणे क्रुती करा. तसेच संपुर्ण कचरा वर खाली करा. याप्रकारे कचरा हलवल्यामुळे विघटन प्रक्रियेत तयार झालेली उष्ण्ता कमी होते. कचर्‍यात हवा खेळती राहून विघटन क्रियेचा वेग वाढतो.

सुमारे १/२ महिन्यात माठ भरु शकतो (घरातील कचर्‍याच्या प्रमाणावर), काहींचा एक वर्षानेही भरेल. माठ संपुर्ण भरल्यानंतर माठाचे तोंड चिखलमाती वापरुन बंद करावे. २० दिवसानंतर माठातील संपुर्ण कचर्‍याचे खतामध्ये रुपांतर होते. हे खत काढुन झाडांसाठी वापरावे. दरम्यानच्या काळात नवीन माठ कचर्‍याकरिता वापरावा.

नायट्रोजन युक्त पदार्थ - हिरवे पदार्थ :
भाज्यांची साले, देठ, खराब पाने, किडकी फळे, निर्माल्य, पुष्पगुच्छातील फुले, चहाकॉफीचा चोथ-पावडर, भात, भाकरी, चपातीसारखे कोरडे अन्न, झाडांची छाटणी केलेली पाने, रोगट फांद्या वगैरे, खरब धान्य, कडधान्य.

काळे पदार्थ - कार्बनयुक्त पदार्थ :
कार्डबोर्ड, खाद्यपदार्थांची खोकॉ, वाया गेलेले कागद, भेटकार्डे, पत्रिका वगैरे. लाकडाचे तासकाम, अंड्याचे कवच, लाकडाची चुलीतली राख, केस, नखे, चिंध्या - हे पदार्थ जास्तीची ओल कमी करण्यासाठी घालावेत.

माठात न घालण्याचे पदार्थ :
मांस-माशांचे अवशेष, शिजवलेले मसालेदार पदार्थ, कोळसा किंवा कोळशाची राख, मंसाहारी प्राण्यांचे मल-मूत्र, सॅनिटरी नॅपकीन, औषधी गोळ्यांची पाकिटे, शिल्लक औषधे.

६: मल्चींग / आच्छादन
गच्चीतील मोठ्या कुंड्या अथव वाफ्यामधील झाडांच्या बुंध्यापाशी, मातीच्या प्रुष्ठभागावर कचर्‍याचा थर पसरावा. कचर्‍यामध्ये IVEM / डीकंपोस्टींग कल्चर मिसळावे. यास मल्चींग असे म्हणतात. कचर्‍याचा थर २-३ इंचा पेक्षा जास्त असू नये. त्यावर वाळलेला पाचोळा पसरावा. यामुळे झाडांना पाणी कमी द्यावे लागते. कचरा हळू-हळू मातीत मिसळत जातो. त्यामुळे मातीचा कस कायम रहातो.

पाणी आळ्यातुनच द्यावे. आठवड्यातुन दोनदा जसे इतर झाडांना देतो तसेच द्यावे.

थोडक्यात महत्वाचे :
.काही विशिष्ट प्रकारच्या जिवाणू व किटाणूंमुळेच कचर्‍याचे खतात रुपांतर होते. ते सर्व घटक जमिनीकरिता उपयुक्त आहेत. इतर रोगकारक जिवाणू यात जगत नाहीत.

.कचरा हलवण्यासाठी बागकामाचा चिमटा, एवढेच साधन पुरेसे आहे. उंदीर, फळ माश्या किंवा मुंग्या खताकडे आकर्षित होत नाहीत. पण दिसले तर ढीग खुप सुका आहे असे समजावे व ढिगावर पाणी शिंपडून ढिग हलवुन घ्यावा.

.कचरा हाताळणे अत्यंत सुरक्षित आहे, फक्त बागकाम करताना घ्यावयाची काळजी घ्यावी लागते. कचर्‍याचा ढिग गरम होण्याची आवश्यकता नाही.

.कचर्‍याच्या खतामुळे कुठल्याही प्रकारच्या रोग व किडीचा प्रसार होत नाही. कुजण्याच्या प्रक्रियेतील तापमानामुळे व आवश्यक जिवाणूंमुळे रोग व किडी नष्ट होतात.

.खत तयार करताना ओल्या कचर्‍याबरोबर आपण विषारी वनस्पती पण घालू शकतो. खत तयार होताना त्यातील विषारी द्रव्यांचाही नाश होतो.

विषय: 
प्रकार: 

चान्गला लेख! Happy
"कल्चरची" किम्मत काय?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

फारच माहीतीपुर्ण.
धन्यवाद.
हळद-हींगाची कल्पना फारच छान.
हे सन्केतस्थळ्पण बघा. आणखी कल्पन्नासाठी.
http://www.dailydump.org/

लेख मी अजून वाचला नाहीये. खूप मोठा असल्याने नंतर घरी वाचेन.

अवांतरः
मनोगतावर जसं 'वाचनखुणा' आहे, तसं इथे काही सोय आहे का, आवडलेल्या लेखाला बुकमार्क करायची?
-योगेश

छान माहीतीपूर्ण लेख. मी माझ्या आईसाठी printout काढून ठेवला. धन्यवाद.

उत्तम माहिती. धन्यवाद. Happy

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

चांगली माहिती. धन्यवाद.

चांगली माहिती. लेखाबद्दल धन्यवाद.

कचरा आणि लेख दोन्ही मस्त Happy सत्कार झालेल्या दोघींची नावे टाक(शील का ? एक नम्र सूचना Happy )

क्रमांक पाच मधे एक महत्वाचा मुद्दा द्यायचा राहिलाच आहे. माठास तोटी असेल तर बंद करुन ठेवावी Wink

फारच माहितीपुर्ण लेख आहे. धन्यवाद!! आणी हे सगळं चिकाटीने करणार्‍या लोकांना सलाम.

" Sustainability " च्या मागे वेड्यासारख्या धावणाय्रा आजकालच्या जगाला अश्या साध्या गोष्टींची किती गरज आहे ... हे कुठे इंग्रजी मधे मिळअले तर मी माझ्या अमेरिकन मित्रांन्ना नक्की सांगेन...

छान लेख आरती. माझ्या ओळखीत अनेक जण असा उद्योग करत असतात. प्रदर्शनातून हे व्यवस्थापन अनेक वेळा बघितले होतेच. सध्या माझ्या कचर्‍यावर अनेक भाज्या पिकवत आहे मी.
भाज्या निवडतानाच असा उपयुक्त कचरा वेगळा करता येतो.
प्लॅष्टिक, काच, धातू असे काहि घटक सोडले तर बहुतेक कचरा वापरता येतो.

चांगला लेख.
प्रचार आणि प्रसार खरच महत्वाचा आहे.
पोलिथिन चे काय करावे हा पण एक मोठ्ठा प्रश्न असतो (पिशव्या नाकारा पासुन ते सुरु व्हायला हवे).
अशा पिशव्या स्विकारणार्या देखिल अनेक ठिकाणे शहराशहरातुन असतात.

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

सहीये. घरी अगदी थोड्या मातीत, निळू दामलेंचं पुस्तक वाचून भरपूर बाग लावली आहे. त्यासाठी या माहितीचा नक्किच वापर होईल. धन्स आरती.

मस्त लेख आहे. माझ्या घरच्या बागेसाठी उत्तम आहे. इथे खत खूप महागच आहे तसे. Happy
इथे अमेरीकेत वरचे कुठले ऑप्शन्स चांगले अंमलात आणता येवु शकतात पहायला हवे. मला हा लेख मात्र खूपच आवडला. असे घरी खत बनवणे म्हणजे मस्तच. आणि हो, ही(अश्यापरकारे बनवलेली) खते कुठल्या फुलासांठी / झाडांसाठी ज्यास्त योग्य वगैरे माहीती आहे का?:)
कारण मी इथे गुलाबासाठी स्पेशल खत आणते आणि ज्या काही फळ भाज्या लावल्या गेल्यावेळेला त्याला वेगळे खत वापरले.

भाग्या, ते निळू दमलेंच कुठले पुस्तक गं?
ऑनलाइन ऑर्डर करून मिळेल का?

उत्तम लेख. या माहितीबद्दल मनापासून आभार. अशी संकलित माहिती फारच सोयीची आहे (घरी सुरू करण्याचा विचार असल्याने मी स्वतः शोधत होतो). हा दुवा आता मेलमधून अनेकांना पाठवत आहे.

  ***
  "If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away." - हेन्री डेव्हिड थोरो

  फारच माहितीपुर्ण लेख आहे. धन्यवाद!! Happy फक्त आता आमच्यासारख्यांनी छान माहीती म्हणुन गप्प बसण्याऐवजी त्या माहीतीचा वापर करणे व या अत्यंत मोलाच्या कामाला हातभार लावणे गरजेचे आहे.

  येत्या १-२ दिवसात घरातच आरतीच्या लेखातल्या माहितीप्रमाणे कचर्‍यातून खताची प्रक्रीया सुरू करतेय. वरती आश्चिग म्हणल्याप्रमाणे प्लॅस्टीकच्या पिशव्यांचे नियोजन कसे करायचे याबद्दल कुणी काही शास्त्रीय सूचना देऊ शकले तर फार बरे होईल. वापरायला नकोत हे खरेय पण ते संपूर्णपणे नाहीसे होणे अशक्य आहे.
  -नी

  खुप उपयोगि महिती मिळाली. धन्यवाद!
  माझ्या घरी काही झाडे लावली आहेत, आता त्यात वरुन ओला कचरा टाकला तर काही उपयोग होइल का?

  माझा खड्डा खणून झालाच आहे, आता पुढे काय करावे याच विचारात होतो, चांगली माहिती आहे. अगदी तुकड्या तुकड्यात तुटपुंजे वाचले होते याबद्दल, पण सर्व माहिती एकत्रीत स्वरूपात दिल्याबद्दल धन्यवाद.

  अहो ऑफिससमोरील खड्ड्याविषयी बोलत असाल तर तो महापालिकेने खणला आहे बरं का Lol

  सगळ्यांचे मनापासुन आभार ...... Happy

  लिम्बु, २० रुपयांपासुन १००० रुपयांपर्यंत कल्चर ची वेगवेगळी पाकिटे मिळतात.

  adtvtk, संकेतस्थळा साठी धन्यवाद !

  सिंड्रेला, सत्कार झालेल्या दोघींची नावे खरच विसरले. ईकडे तिकडे चौकशी करुन मिळाली तर नक्की टाकेन.

  manuswini,
  अश्याप्रकारे बनवलेली खते कुठल्याही फुल / फळ झाडांसाठी वापरता येतात.

  हा दुवा आता मेलमधून अनेकांना पाठवत आहे. >> धन्यवाद slarti, प्रचार आणि प्रसाराला त्यामुळे हातभारच लागेल. Happy

  rich,
  वरुन ओला कचरा टाकलेला चालतो, थोडी माती काढुन टाका कुंडीतली आणि कचरा टाकायला सुरुवात करा. कल्चर मिक्स केले जास्त फायदा होईल.

  शामला देसाई नी एक छोटी 'टिप' दिली .. सकाळी चहा केला की ते भांडे न धुता ओट्यावरच ठेवायचे. सगळा स्वयंपाक होई पर्यत, जो जो ओला कचरा तयार होईल तो त्यात टाकत जायचा आणि मग एकदमच ते भांडे बागेत नेउन रोज एकाच कुंडीत टाकायचा. म्हणजे ते काम न वाटता सहज शक्य होते.

  kitchen waste पासुन खत करताना चहाचा चोथा धुवुन वापरावा, कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त अस्ल्याने मुंग्या येतात. (स्वानुभव)
  ===================
  माझ्या तुमच्या जुळता तारा
  मधुर सुरांच्या बरसती धारा

  चहाचा चोथा धुवुन वापरावा, कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त अस्ल्याने मुंग्या येतात.

  चहाचा चोथा धुवुन कपभर पाण्यात टाकावा. त्यात थोडी साखर आणि दुध टाकून उकळवले की पिण्यायोग्य चहा बनतो व पैसे वाचतात. त्यानंतरही मुंग्या आल्याच तरी काळजी करु नये. मुंग्यांची पावडर टाकावी.
  ***************
  टवाळा आवडे विनोद (खन्ना)

  aschig,निरजा

  शामला देसाई प्लॅस्टीक पिशव्यांच्या नियोजना चे पण काम करतात. त्यांना contact केले तर अधिक माहीती मिळु शकेल.

  मी लेखात ज्या आजींचा उल्लेख केला आहे, त्या साडीपासुन 'carry bags' बनवण्याचे काम पण करतात. आत्तापर्यंत त्यांनी ६५००० बॅग बनवल्या आहेत आणि या वर्षी १ लाख पुर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.

  'त्रिवेणी योजने' अंतर्गत त्या हे काम करतात. त्यांनी आवाहन केल्यानंतर काही दुकान दार नियमीत पणे त्यांच्याकडुन या पिशव्या विकत घेतात.

  एका साडीत साधारण १० पिशव्या होतात. त्यांच्याकडे २ प्लॅन्स आहेत.
  १. एक साडी दिली की त्या तुम्हाला ३ पिशव्या देणार. उरलेल्या ७ पिशव्या, प्रत्येकी ७ रुपये दराने त्या दुकानदार , ग्रुहीणी किंवा कचरा व्यवस्थापनाच्या स्टॉल वर विकणार.

  २. एक साडी आणि ५० रुपये शिलाई दिली तर सगळ्या १० पिशव्या त्या तुम्हालाच देणार.

  या प्रकल्पाच्या माध्यमातुन त्यांनी २० महिलांना रोजगार उपल्ब्ध करुन दिला आहे. साडयां बरोबरच जुन्या ओढण्या, दिली घेतलेली ब्लाउज पिस या पासुन पण पिशव्या बनवल्या जातात. प्लेन कपडा असेल तर त्यावर पेंटींग, भरतकाम - विणकाम करण्याचे प्रशिक्षण महिला कामगारांना आजिंनी दिले आहे.

  मला असे वटते 'जुन्या ओढण्या' हा प्रश्ण सर्वच मुलिंना त्रास देणारा आहे Happy ... त्यामुळे लवकरच आजिंना भेटावे लागणार.

  आरती, छान लिहिलंस.
  मी सध्या 'स्वच्छ' या संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना जातेय. ते 'कागद-काच्-पत्रा कष्टकरी पंचायत' या संस्थेच्या लोकांन्नीच आयोजलेलं आहे आणि नागरीक म्हणूनही त्यांना लोकांन्नी यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्यात हे वैयक्तिक व्यवस्थापन व आपापल्या परिसराच्या कचर्‍याचे व्यवस्थापन आणि त्याच्याशी संबंधीत इतर अनेक बाबी ते शिकवतात.
  थोडं विषयांतर करते, बरेच जण कचरा व्यवस्थापन किंवा कचरा उचलणे ही पालिकेची जबाबदारी समजतात, त्यांचे म्हणणे आम्ही प्रॉपर्टी टॅक्स देतो. पण प्रॉपर्टी टॅक्समध्ये कचरा उचलण्यासाठीच्या शुल्काची योजना नाही हे कुणालाच माहिती नाही. दरवर्षी पालिका स्वखर्चाने हे व्यवस्थापन करते, तो बोजा, शिवाय स्वच्छता कर्मचारी, वाहतूक, कचरा हलवणे, डेपोची व्यवस्था, तिथल्या आगी वगैरे वगैरे या बाबी पालिकेला डोईजड होतात. आधीच पालिका निधीअभावी रडते. त्यामुळे आपण सर्वान्नीच वैयक्तिक कचरा व्यवस्थापन गांभीर्याने घेतले तर कचर्‍याचे प्रश्न तरी आपोआप सुटतील शिवाय सामाजिक आरोग्यावर त्याचा विधायक परिणाम दिसेल.

  मी इथे जवळच्या नर्सरी मध्ये कालच चौकशी केली कलचरची जे खतात टाकू शकतो पण एकडच्य मठ्ठ लोकांपैकी एकालाच माहीती होते व तो म्हणाला ऑर्डर केले तरच मिळते. तेव्हा बघुया कसे करायचे ते.
  मला मिळाले की मी खत बनवण्याचे फोटो सुद्धा टाकेन नी कलचरचे नाव. Happy
  त्या साडी स्टाइल पिशव्या इथे desingner bags म्हणून चक्क $65 होत्या. पण त्या #$%& चपट्या नी बनवलेल्या होत्या.... मस्त वाटतात कापडी पिशव्या. त्या साडीपासून नसल्या तरी रंग छान होते त्या चपट्यांच्या बँगाचे. ऑरेंजचा पट्टा ,पिशवीची कडा मस्त हिरवी फुले नी पुर्ण बाकीच भाग लाल तेव्हा मस्त होती... असो. (विषय भरकटला..) Happy

  छान लेख. पण मला नेहेमी शंका येते की कचरा कुजल्याचा वास येत नाही का?

  नाही आर्च , अजीबात वास येत नाही.
  माझा दीर गेली २-३ वर्श हा प्रयोग करत आहे

  Pages